Home Blog Page 3197

खासदार काकडे यांनी सूचविलेल्या तोडग्यावर मुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब-पुण्याची शिवसृष्टी

0

पुणे, : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक शिवसृष्टीसाठी बीडीपीची 50 एकर जागा व पुणे मेट्रोच्या डेपोसाठी कोथरुड येथील कचरा डेपोची जागा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निर्णय घेतला. याबद्दल खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती पुणेकरांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. 18 नोव्हेंबर 2017 रोजी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून शिवसृष्टीसाठी बीडीपीची जागा द्यावी व कचरा डेपोच्या जागेवर पुणे मेट्रोचा डेपो करावा असा तोडगा सर्वप्रथम सूचविला होता. आजच्या निर्णयामुळे काकडे यांच्या तोडग्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट होत आहे.

कोथरुडमधील ऐतिहासिक शिवसृष्टी व मेट्रो डेपो यांच्या जागेविषयीच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे आज अखेर पडदा पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीवर ही शिवसृष्टीसाठी होत असल्याने शिवप्रेमींच्या मनामध्ये त्याविषयी मोठी आस्था आहे. तसेच, वाहतूक कोंडीतून पुण्याची सुटका करण्यासाठी मेट्रोचा डेपो होऊन त्याचे काम गतीने मार्गी लागणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींवरून सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपात शिवसृष्टीला बीडीपी ची जागा द्यावी व कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो डेपो करावा, अशी मागणी राज्यसभेचे खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 18 नोव्हेंबर 2017 रोजी पत्राद्वारे सर्वप्रथम केली होती. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.

पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता मेट्रोचे काम वेळेत होणे आवश्यक आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर असून त्यास आणखी गती मिळण्यासाठी कचरा डेपोची जागा मेट्रोला त्वरित मिळणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात निर्णयही झाला होता. मात्र अद्याप त्या जागेचे हस्तांतरण पुणे मेट्रोला झालेले नाही. तसेच, कचरा डेपोच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या शिवसृष्टीसाठी कोथरुड येथीलच बीडीपीची जागा देण्यात यावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याकामी स्वत: जातीने लक्ष घालावे आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यास सूचना कराव्यात, असे खासदार काकडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.

कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला व बीडीपीची जागा शिवसृष्टीला मिळणार असल्याने दोन्ही विकासकामे मार्गी लागतील. कोथरुडच्या व पर्यायाने पुण्याच्या वैभवात त्याने भरच पडणार असल्याचेही खासदार काकडे म्हणाले आहेत.

8 नोव्हेंबर 2017 रोजी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले पत्र

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे लक्ष -पुण्याची शिवसृष्टी

0
पुणे- कोथरूड मध्ये जिथे मेट्रो चे स्टेशन आहे तिथे शिवसृष्टी व्हावी … म्हणजेच शिवसृष्टी जिथे तिथे मेट्रो … अशा स्वरूपाचे कित्येक वर्षे पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार काय ? या प्रश्नाचे उत्तर आता बहुधा अंतिम टप्प्यात आले असावे . हे स्वप्न पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पाहिलेले..आणि अजूनही त्याच स्वप्नासाठी सातत्याने संघर्ष त्यांनी सुरु ठेवला आहे . दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील मंत्रालयात याच भूमिकेवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महापालिकेतील गटनेत्यांची बैठक होते आहे .
गेली कित्येक महिने हा प्रश्न वारंवार उपस्थित करूनही सातत्याने त्याकडे डोळेझाक झाल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे .दीपक मानकर यांचे म्हणणे आहे , त्याप्रमाणे तिथेच मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी या दोन्ही गोष्टी शक्य असल्याचे आजवर मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह सर्वांनी मान्य केलेले आहे . पण याबाबत ठोस भूमिका का घेतली गेली नाही ? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही पुणेकरांना किंवा शिवप्रेमींना मिळालेले नाही . मुख्यमंत्र्यांनी अखेर पुण्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाला मान्यता देवून या विषयावर निर्णय घेण्यासाठी वेळ दिला आहे .
येत्या ९ तारखेला शिवसृष्टी या विषयावर महापालिकेची 5 वि खास सभा आहे . तत्पूर्वी ,मंगळवारी 6 तारखेला होणाऱ्या बैठकीत खरे तर अंतिम निर्णयच अपेक्षित आहे . मुख्यमंत्र्यांचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा देखील …
या पार्श्वभूमीवर तमाम शिवप्रेमी आणि पुण्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेकांचे अजित पवार  आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत काय होतंय याकडे लक्ष लागून आहे .

शरद पवार उत्तम विरोधक; त्यांनी विरोधकाची भूमिका कायम बजवावी -शरद पवारांच्या विधानावर खासदार संजय काकडे यांचा हल्ला बोल

0

पुणे, दि. 4 फेब्रुवारी : शरद पवार यांनी 50 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीतील तब्बल 40 वर्षे सत्तेत घालविली. इतकी वर्षे सत्तेत असताना त्यांना शेती मालाला हमीभाव द्यायला आणि मराठ्यांना आरक्षण द्यायला सूचलं नाही. पवारांनी शेती मालाला हमीभाव दिला असता तर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. परंतु, आता विरोधात असताना मात्र मोदी सरकारचे धोरण फसवे असल्याचे पवारांना वाटत आहे. सत्तेत असताना काही केले नाही आणि विरोधात असताना त्याच गोष्टींसाठी टीका करायची हे शरद पवारांनाच जमू शकते. विरोधकाची भूमिका ते उत्तम करीत आहेत. त्यांनी ती कायम बजवावी, अशा शब्दांत भाजपाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर हल्ला बोल केला.

औरंगाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातील मोदी सरकारची धोरण फसवे असल्याचे विधान केले. या विधानाचे आपल्याला आश्चर्य वाटले. कारण, ही टीका करणारे शरद पवार गेली 50 वर्षे राजकारणात आहेत. त्यातील तब्बल 40 वर्षे ते सत्तेत राहिले. या दरम्यान, 1985 साली शरद जोशी यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून देशभर आवाज उठविला. तेव्हापासून ते 1999 पर्यंत बहुतांश सर्व काळ काँग्रेसचे सरकारच सरकार सत्तेत होते. शरद पवार या सरकारमध्ये होते. 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना स्वामिनाथन आयोग स्थापन केला. 2006 मध्ये शरद पवार केंद्रीय कृृषी मंत्री असतानाच स्वामिनाथन आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला. याचवेळी जर हा अहवाल शरद पवार यांनी मान्य केला असता व त्याची अंमलबजावणी केली असती तर, त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या. त्यानंतर 2006 ते 2014 पर्यंत शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते. याकाळात स्वामिनाथन आयोगाचा अहवाल एका कोपऱ्यात धूळ खात पडला होता. तेच शरद पवार आता पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीड पट हमीभाव जाहीर केल्यावर पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करण्याऐवजी मोदी सरकारचे धोरण फसवे असल्याचे जाहिरपणे सांगत जनतेची दिशाभूल करीत आहेत. हे फक्त शरद पवार यांनाच जमू शकते, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आताच्या बजेटमध्ये जाहीर केलेला हमीभाव लगेचच लागू होणार आहे. दुष्काळ व अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा योजना, शेतमालासाठी एक देश एक मार्केट आदी योजना मोदी सरकारने युद्धपातळीवर राबविल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ नक्की होणार आहे. ही योजना राबविताना काही तांत्रिक अडचणी नक्की आल्या. परंतु, लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहे. त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. एकदा का सरकारने योजना जाहीर केली तर ती पूर्ण होत असते हे शरद पवांना माहिती आहे. त्यामुळे कर्जमाफी योजना यशस्वीपणे राबविली जात आहे व खऱ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ नक्की मिळणार. काँग्रेसच्या काळात त्यांनीही कर्जमाफी केली मात्र खऱ्या व गरजू शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही. शरद पवार हे जाणते राजे आहेत तर, त्यांनी आपल्या दीर्घकालीन सत्तेच्या राजवटीत शेतकऱ्यांना फायदा होतील अशा योजना आखणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी ते केले नाही. त्यामुळे जनतेने त्यांना याच कारणाने विरोधात बसविले आहे. आणि शरद पवार देखील विरोधकाची भूमिका उत्तम करीत आहेत.

मराठा आरक्षणाबद्दल शरद पवार अलिकडच्या काही काळात बोलत आहेत. प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत पवार सत्तेत खूप वर्षे राहिले. तेव्हा ते मराठा आरक्षणाबद्दल एक चकार शब्दही बोलले नाहीत. ही शरद पवार यांची दुटप्पी भूमिका नेहमीच राहिली आहे. हल्ला बोल यात्रा काढून विदर्भ व मराठवाड्यात 10 ते 15 हजार लोक जमवून शरद पवार सत्तेत येण्याचे स्वप्न पाहात आहेत. जनतेला इतकी वर्षे पवारांनी आपल्यासाठी काय केले? हे समजते. जनता आता पवारांच्या शब्दांना भुलणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काँग्रेस राजवटीत झाल्या. त्यांची धोरणेच याला कारणीभूत असताना दहा वर्षे कृषी मंत्री राहिलेले शरद पवार मोदी सरकारचे धोरण फसवे असल्याचे म्हणत आहेत. हे मोठे आश्चर्यच आहे, असे खासदार संजय काकडे यांनी यावेळी सांगितले.

लातूर येथे दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन

0

पुणे- साहित्य-संस्कृतीच्या माध्यमातुन उपेक्षित समाजांत वैचारिक जागरण घडवण्याच्या हेतुने धनगर साहित्य परिषदेने यंदा लातूर येथे दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित केले आहे. नऊ ते अकरा फेब्रुवारीपर्यंत भरणार असलेल्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, “हुमान” या विदारक आत्मकथनाने गाजलेल्या मालेगांव महापालिकेच्या आयुक्त श्रीमती संगीता धायगुडे असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटक जेष्ठ साहित्यिक आणि रानकवी मा. श्री. ना. धो. महानोर हे या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत. अँड. श्री. आण्णारावजी पाटील हे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत. समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम साहित्यिक व थोर विचारवंत मा. डॉ. कांचा इलय्या – शेफर्ड हे लाभले आहेत. तर जेष्ठ साहित्यिक आणि ख्यातनाम विचारवंत संजय सोनवणी हे या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत अशी माहिती धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. जयसिंग तात्या शेंडगे यांनी दिली.

या संमेलनात साहित्य संस्कृती, माध्यमांची भुमिका, महिलांचे संस्कृतीतील योगदान, समाजासमोरील ज्वलंत प्रश्न अशा अनेक विषयांवर भरगच्च परिसंवाद आयोजित करंण्यात आले असुन सर्व समाजांतील महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत त्यात बोलणार आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या अस्वस्थ सामाजिक वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य आदिवासी धनगर साहित्य संमेलन करेल असा विश्वासही श्री. शेंडगे यांनी व्यक्त केला.

लातूर साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांना विविध सन्मानांनी गौरवण्यात येणार असून श्री. ना. धों. महानोर, कांचा इलय्या – शेफर्ड, महेश कोठारे आणि संजय सोनवणी यांना प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयाचा जीवनगौरव व कृतज्ञता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सोलापुर येथे झालेल्या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनानंतर लातूर येथे होणारे हे दुसरे सम्मेलन अत्यंत भव्य व वैचारिक दृष्ट्या सामाजिक भर घालणारे असेल असा विश्वासही श्री. शेंडगे यांनी व्यक्त केला.

डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य अडथळा…

0

पुणे- – अंधत्व ही आमची अडचण नसून, डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य  अडथळा आहे. इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही जग जिंकू शकतो, आम्हाला ध्येय गाठण्यासाठी सर्वांची साथ अपेक्षित असल्याचे मत स्वतः अंध असून, अंधत्वावर मात करीत अंध व अपगांसाठी संगणक शिक्षण देऊन सक्षमीकरणाचे काम करणारे राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.
रा. स्व. संघ जनकल्याण समितीचा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ समितीचे प्रांत सह-कोषाध्यक्ष चंदन कटारिया, प्रांत उपाध्यक्षा पूनम मेहता, पुणे महानगर अध्यक्ष विश्‍वास जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, देवता देशमुख, सचिमीचे प्रांत कार्यवाह शैलेंद्र बोरकर, पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख गणेश बागदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक्केचाळीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
श्री. देशमुख पुढे म्हणाले, ‘अंधांबाबतच्या गैरसमजांमुळे रेल्वेच्या ङ्गलाटावर झोपून शिक्षण घेतले. समाजात बरे-वाईट अनुभव आले. ध्येयाप्रती आत्मविश्‍वासानाने जाताना खचलो नाही. आपली परिस्थिती बदलण्यासाठी बाहेरून कोणी येईल याचा विश्‍वास नव्हता. आपल्यावर आलेली वेळ इतर अंध व अपंगांवर येऊ नये म्हणून कार्यरत झालो. त्यातून सुमारे ९०० अंध व अपंगांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन सक्षम करता आले.’
श्री. देवधर म्हणाले, ‘अनेक प्रकारच्या समस्या येतात परंतु त्याचा धैर्याने सामना केला पाहिजे ही स्वामी विवेकानंदांची शिकवण होती. याच प्रेरणेतून राहुल देशमुख यांच्यासारखे कार्यकर्ते घडतात. सर्व समाज एका पातळीवर येऊन समाजाची उन्नती झाली पाहिजे हा विवेकानंदांचा आध्यात्मिक विचार होता. पृथ्वीवरील छोट्याशा जीवाचा ही विचार अध्यात्मात आहे. हीच आध्यात्मिक भारताची ओळख विवेकानंदांनी जगाला करून दिली.’
चंदन कटारिया यांनी प्रास्ताविक केले. समितीच्या महानगर उपाध्यक्षा अलका पेटकर यांनी परिचय करून दिला. अश्‍विनीकुमार उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. विश्‍वास जोशी यांनी आभार मानले.

रेडीरेकनर दर ३ वर्षांनी जाहीर करावा – क्रेडाई महाराष्ट्राची राज्य सरकारकडे मागणी

0

पुणे ; संपूर्ण बांधकाम व्यवसाय गेले ५ वर्ष मंदीच्या वातावरणातून जात आहे. एकीकडे परवडणारी घरे देण्याकडे सरकारचा प्रयास असला तरी गेल्या दशकात सातत्याने राज्यात रेडीरेेकनर दरात १० ते २५ टक्के दर वाढ झाली आहे. स्टॅम्प ड्युटीच्या वाढीव्यतिरिक्त घर घेणाऱ्या ग्राहकाला जीएसटी या कराचा अतिरिक्त बोजाही पडला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन राज्य सरकारने दर तीन वर्षांनी दर जाहीर करावा, यासह अनेक मागण्यांसाठी क्रेडाई महाराष्ट्राचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहेत.

क्रेडाई महाराष्ट्रने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, क्रेडाई महाराष्ट्राचे पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री, महसूलमंत्री व आयजीआर यांना भेटून अडचणी दूर करण्याची विनंती करणार आहे. तसेच २००९ साली राज्य सरकारने मंदीचे वातावरण लक्षात घेऊन रेडीरेकनरचे दर न वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला तसाच यावर्षीही घ्यावा, असे सूचित करणार आहेत.

याविषयी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी  सांगितले की,  गेल्या ७ वर्षात अनेक ठिकाणी ३०० टक्क्यांहून अधिक दरामध्ये वाढ झाली आहे. तळटीपांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ही वाढ अधिकच जाचक झाली आहे. हे लक्षात घेऊन काही प्रमुख मागण्या आम्ही या भेटीदरम्यान सरकार दरबारी मांडणार आहे, त्यातील काही प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे, रेडिरेकनर दर तीन वर्षांनी सादर करावा तसेच रेडिरेकनरमध्ये निवासी दर अशी वर्गवारी करण्याची पद्धत बंद करावी, प्रत्येक मिळकतीचे स्वतंत्र मूल्यांकन करण्यात यावे, मूल्यदर ठरविण्याची पद्धत शास्त्रशुद्ध असावी, जिथे मूल्यदर कमी झाले आहेत तिथे ती कमी करण्याची तरतूद कायद्यात असावी, तसेच याची चूक दुरुस्तीची कार्यपद्धत पारदर्शक, गतिमान व वस्तुनिष्ठ असावी, रेडिरेकनरचे दर सरासरी दरांवर आधारित नसावे ते त्या क्षेत्राच्या न्यूनतम दरांवर असावेत, मूलतक्त्यामध्ये बांधकाम खर्च  कमी करावा तो प्रत्येक असलेल्या खर्चांशी निगडित असावा, वस्तू सेवा कर लागू झाल्याने १ टक्का एलबीसी बंद होणे गरजेचे होते ते झाले नाही, तळटीपांमध्ये वस्तुस्थितीत धरून दुरुस्त्या कराव्यात, यावर्षी रेडिरेकनरचे दर वाढवू तर नयेच पण जेथे कमी करणे वास्तविकतेला धरून आहे तेथे ते कमी करावेत आदी मागण्या आम्ही करणार असल्याचे कटारिया यांनी नमूद केले आहे.

सद्यःस्थितीचा आढावा घेत कटारिया म्हणाले की, विक्री वाढविण्यासाठी व्यावसायिक अधिक सवलती देण्यास तयार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक सकारात्मक आहेत परंतु, सरकारकडूनही सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. आज मुद्रांक शुल्क हे राज्यांचे दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न देणारे स्रोत आहे. त्यातच यावर्षी ग्रामीण व प्रभावी क्षेत्रात या शुल्कात १ टक्का वाढ झाल्यामुळे चालू वर्षात सरकारी उत्पन्नात भरपूर वाढ झाली आहे. मात्र या वाढीमुळे अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न हवेत विरले आहे. गेल्या वर्षी परवडणाऱ्या घरांसाठी ग्रामीण भागात (गावठाण लागत) उपलब्ध करून दिलेल्या जमिनीच्या दरात ६०० ते १००० टक्के वाढ झाल्याने परवडणाऱ्या घरांचे सरकारी धोरण लागू होण्यापूर्वीच निष्फळ ठरेल की काय असे चित्र निर्माण झाले असल्याचेही त्यांनी आवर्जुन नमूद केले आहे.

मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राण्यांची शहराकडे धाव – उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे

0

पुणे-मानवी हस्तक्षेपामुळेच आज वन्यप्राणी शहरी भागावर किंवा नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी अतिक्रमण करत असून त्यांचे स्थलांतर रोखायचे असल्यास आपली अभयारण्ये व वने सुरक्षित ठेवली पाहिजेत.खरे तर यात लोकशिक्षण महत्वाचे असून वन विभागाने करावयाचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे मत पुणे विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी व्यक्त केले.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि वाईल्डलाईफ अनलिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद ताथवडे उद्यान येथे ‘ नाते निसर्गाशी ” ह्या व्यासपीठाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.ह्या व्यासपीठाद्वारे मुलांमध्ये वन्यप्राण्यांविषयी आपुलकी निर्माण होऊन सकारात्मक बदल घडतील व यासाठी वनविभाग संपूर्ण सहकार्य करेल असे ही ते म्हणाले.
सध्या मुले मोबाईल च्या खूप आहारी गेली आहेत अशी तक्रार पालक करत असतात,यासाठी मुलांचे मन अन्यत्र वळविणे महत्वाचे असून त्यासाठीच ” नाते निसर्गाशी ” हे व्यासपीठ निर्माण केले असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.मुलांना जशी खेळांची आवड निर्माण करणे गरजेचे आहे तसेच त्यांना निसर्गाविषयी ची ओढ निर्माण व्हावी यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून निसर्गावरील व वन्यजीवांवरील विविध फिल्म्स दाखविल्या जातील तसेच विविध तज्ञ् मंडळींचे व्याख्यान ही आयोजित केले जाईल व मुलांच्या प्रश्नांना उत्तरे ही दिली जातील असे ही त्या म्हणाल्या.यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन व वाईल्डलाईफ अनलिमिटेड या दोन स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले असून आज पहिल्याच कार्यक्रमाला पालकांनी मुलांसह भरभरून प्रतिसाद दिला याचा आनंद वाटतो असे ही त्या म्हणाल्या.आपण मुलांना पर्यावरण रक्षणाचे महत्व समजावून सांगितले कि मुले ते आत्मसात करतात व यासाठी प्रयत्नशील असतात हा माझा अनुभव असल्याचे ही त्या म्हणाल्या.
या वेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,वाईल्डलाईफ अनलिमिटेड चे ओंकार बापट,श्रीनिवास घैसास,कौस्तुभ सोमण,भाजप चे राजेंद्र येडे,चंद्रकांत पवार,सुनील होलबोले,अजय काळे,माणिकताई दीक्षित,संगीताताई आदवडे,सुवर्णाताई काकडे,नारायण वायदंडे,किरण देखणे,एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अजित गोखले इ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुश्री खर्डेकर यांनी केले तर संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन व ओंकार बापट यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली व आभार प्रदर्शन केले.

‘पुणे इंटरनॅशनल डिजिटल फोटोग्राफी सलोन एक्झीबिशन ‘मध्ये चीनचे अलेक्झांड्रिनो प्रथम

0
पुणे :‘ आर्ट इनसाईट मीडियम ‘ संस्थेतर्फे आयोजित “पुणे इंटरनॅशनल डिजिटल फोटोग्राफी सलोन एक्झीबिशन’ मध्ये चीन चे अलेक्झांड्रिनो एल . ए . हे छायाचित्रकार प्रथम आले . सायप्रस चे आंद्रेस आंद्रेयो द्वितीय तर चीन चे एच . डब्ल्यू .चान तृतीय आले . भारताच्या   राकेश रावळ यांचा चौथा क्रमांक आला . २  ते ४ फेब्रुवारी दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात   मोनालिसा कलाग्राम ( कोरेगाव पार्क,गल्ली क्र. ७ ) येथे करण्यात आले होते .
जेनिफर मिस्त्री, श्याम ढवळे, अजय जाधव, प्रबुद्ध घोष  यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाला प्रारंभ झाला.एकूण २० देशातील  १७५ फोटोग्राफर्सनी यात भाग घेतला . निवडक ४० फोटो  , आणि ५०० स्लाईड प्रदर्शित करण्यात आल्या .  जगाच्या फोटोग्राफी नकाशावर पुण्याला आणणे, हा या प्रदर्शनाचा हेतू होता , अशी माहिती अजय जाधव यांनी दिली.
कलर डिजिटल इमेज, मोनोक्रोम डिजिटल, फोटो ट्रॅव्हल डिजिटल या ३ प्रकारात हे प्रदर्शन होते , अशी माहिती  ‘ आर्ट इनसाईट मीडियम ‘ चे सचिव प्रबुद्ध घोष, अध्यक्ष अजय जाधव यांनी दिली.अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली

महावितरणच्या संचालक (वित्त) पदी जयकुमार श्रीनिवासन रूजू

0

मुंबई

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी  (महावितरण) च्या संचालक (वित्त) पदी श्री. जयकुमार श्रीनिवासन यांची थेट निवडभरतीत गुणवत्तेवर निवड करण्यात आली असून त्यांनी नुकतीच या पदाची सूत्रे सांभाळली आहेत.

श्री. जयकुमार श्रीनिवासन यांनी नागपूर विद्यापीठातून बी.कॉम. पदवी व त्यानंतर आयसीडब्ल्यूए  पुर्ण केले आहे. त्यांनी जून-2014 ते जूलै-2017 या दरम्यान महानिर्मिती कंपनीचे संचालक (वित्त) या पदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली असून ऑगस्ट-2017 पासून एमएसईबी होल्डींग कंपनीचे संचालक (वित्त) म्हणून ते काम सांभाळत होते. याशिवाय महागुज कॉलेरी कंपनी लि., युसीएम कोल कंपनी लि., धोपवे कोस्टल पॉवर लि., महागाम इत्यादी कंपन्यांत त्यांनी अर्धवेळ संचालक म्हणून काम पाहिले आहे.

महानिर्मितीच्या विविध प्रकल्पांच्या यशस्वी कार्यान्वयात श्री. श्रीनिवासन यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली असून महानिर्मिती कंपनीत सॅप प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीतही त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे. महानिर्मितीच्या सेवेत असताना त्यांनी ईटलीमधील एसडीए बुकोनी विद्यापीठ व टोरिनो आणि पॅरिस येथील ईएससीपी बिझिनेस स्कूल येथील ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रणालींचा अभ्यास केला आहे.

कर्वे समाज सेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांचा तंबाखूमुक्त जीवनाचा सामुहिक संकल्प

0

पुणे-येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तंबाखू व तंबाखुयुक्त पदार्थांचे सेवन न करण्याचा तसेच आपल्या संपर्कातील व्यक्तीनाही तंबाखूमुक्त जीवन जगण्यास प्रोत्साहन देण्याचा सामुहिक महासंकल्प संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर यांच्या उपस्थितीत केला.

कर्वे समाज सेवा संस्था व महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालयामध्ये संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, रजिस्ट्रार विनायक कस्तुरे व प्रा चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखूमुक्त जीवन संकल्प उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः संचालक डॉ वलोकर यांच्याकडून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्याची सामुहिक शपथ घेतली.

डॉ वलोकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना समाजात आपल्या संपर्कात असणार्या नागरिकांना तंबाखूमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.  प्रा चेतन दिवाण यांनी विध्यार्थ्यांच्या संकल्पपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या.मकबूल देशिंग व प्रवीण गुंजाळ यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते

तळजाईवर माधुरी दीक्षित ने केली बाईक रायडींग

 

पुणे- पुण्याची तळजाई टेकडी सर्वपरिचित अशी आहे . अनेक जन इथे फिरायला येतात ,पायी चालण्याचा व्यायाम करतात ,निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवितात . येथे अनेकदा बाईक रायडर थिल्लर तरुणांचा त्रास तळजाईच्या चाहत्यांना होतो ..तर हौशी फोटोग्राफर चा हि काही प्रमाणात अडथळा असतो…पण काल बाईकवर येथे चक्क माधुरी दीक्षित पोहोचली .. आणि तळजाई ला एक सुखद धक्का बसला …..

आगामी बकेट लिस्ट या मराठी सिनेमात पुणेरी गृहिणी साकारणारी माधुरी तळजाई परिसरात सुपर बाईकवर मनसोक्त हिंडताना दिसली… निमित्त होतं या चित्रपटाच्या शूटींगचं…

पुण्याच्या प्रभात रोडवर सुरू असणाऱ्या शूटींगदरम्यान जीन्स, व्हाईट शर्ट आणि गळ्यात निळा स्कार्फ अशा वेशभूषेत ही हास्यसम्राज्ञी व्हॅनिटीतून बाहेर आली आणि तिची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या तुडुंब उत्साहानं भारलेला तो परिसरच ‘माधुरीमय’ झाला.

आतापर्यंतच्या फिल्मी करीअरमध्ये कधीच बाईक न चालवलेली माधुरी बकेट लिस्टच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुपर बाईकवर दिसली आहे. आपल्या आयुष्याच्या एका वळणावर ही गृहिणी थेट बाईकवर स्वार होते…यामागे नेमकं काय गोम आहे, हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणारच आहे, पण यानिमित्ताने पुण्यात अवरलेल्या या अप्सरेला पाहून पुणेकर मात्र सुखावले आहेत. चित्रपटाच्या शूटींगसाठी पुण्यात अवतरलेली ही अप्सरा आपल्या आठवणींमध्ये चांगलीच रमली. याविषयी सांगताना आपल्या भावंडांबरोबर पुण्यात धमाल उडवून दिल्याचं ती म्हणाली. याविषीयी पुढे बोलताना, “पर्वती, शिंदेछत्री अशा पुण्यातल्या कितीतरी ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या. आम्ही भावंड इथं वेड्यासारखे भटकलोय आणि चिंचा, बोरं, करवंदांवरही ताव मारला” असं ती म्हणाली.

पुण्याच्या साने कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत माधुरी आपल्याला दिसणार असून एकाचवेळी बऱ्याच भूमिका सक्षमपणे पार पाडणाऱ्या गृहिणींचं प्रतिनिधित्त्व ही हास्यवदना करते आहे. आपल्या या भूमिकेसाठी पुणेकरांचा हजरजबाबीपणा आणि टोमणेदार विनोदी बोलणं आपण आत्मसात केल्याचंही तिने म्हटलं आहे.

तर या बकेट लिस्ट सिनेमाच्यानिमित्ताने रसिकांना नेहमीपेक्षा वेगळी माधुरी पाहायला मिळणार असल्याचं दिग्दर्शक तेजस विजय प्रभा देऊस्कर यांनी म्हटलं आहे. “माधुरीची हिरोईनची इमेज बाजूला ठेवून त्यांना या सिनेमातल्या भूमिकेसाठी डी-ग्लॅम लूक आम्ही दिला. या लूकमध्येही त्या खूप सुंदर दिसत असल्याचं म्हणत भूमिकेसाठी सर्वस्व ओतून त्यांनी काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माधुरीची ही वेगळी छवी चाहत्यांना नक्की आवडेल, असा विश्वासही दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी दाखवला आहे.”

ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ या सिनेमाची कथा दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मंथन’मधून घडले कथक कलेच्या सामर्थ्याचे दर्शन

0
उद्गारच्या दशकपूर्तीचे औचित्य
 
पुणे: हळूवार अभिनयातून रसिकांना भुरळ पाडणारी ‘राधा’ तर कधी सारंगीच्या तालावर ठेका धरणारी नर्तिका, आपल्या कर्माची जाणीव करून देतानाच मानसिक रुग्णांच्या भावना नृत्य अभिनयातून उलगडून अंतर्मुख करायला लावणारी नृत्यात्मिका अशा विविध रचना एकाच रंगमंचावरून अनुभवताना रसिकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटले. निमित्त होते उद्गारतर्फे झालेल्या मंथन मैफलीचे. या मैफलीतून कथक कलेच्या सामर्थ्याचे साक्षात दर्शनच कथक नृत्यांगना आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी घडविले. 
तीन वेगळे ताल त्यांचे वेगळे स्वभाव तरी त्यांना एकत्रित बांधण्याची  ‘त्रिविधा’ ही संकल्पना आणि यास नृत्याविष्कारातून प्रत्यक्षात साकारणाऱ्या  कथक नृत्यांगना आसावरी पाटणकर आणि मुग्धा पाटणकर यांच्या सादरीकरणाने मैफलीची सुरूवात झाली. यानंतर ‘चैतन्य’ ही अतिशय वेगळ्या धाटणीची नृत्यरचना स्वरमंचावर सादर झाली.  ‘स्क्रिझोफ्रेनिया’ या रुग्णांना समाजातील घटकांतून मिळणारा दुजाभाव तर याच समाजातून मिळणारा आधार आणि आपलेपणा अशी संमिश्र मानसिकता आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी नृत्य, भाव आणि अभिनयाच्या रूपातून अचूक मांडली. व्यक्त करण्यास अतिशय अवघड असणाऱ्या या रचनेस केदार पंडित यांनी संगीतबद्ध केले. 
 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नृत्याविष्काराच्या रूपाने अवतरलेली ‘राधा’ रसिकांना विशेष भावली. राधेच्या तीन अवस्था मुग्धा, मध्यम व प्रौढ अवस्था, व श्रीकृष्णाच्या अवतार कार्यामधील तिचे स्थान उलगडण्याचा प्रयत्न आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी या नृत्यामिकेतून केला.  प्रसिद्ध सारंगीवादक संदीप मिश्रा यांचे सारंगी वादन, ‘सारंगी’ या नृत्यरचनेतून व्यासपीठावर दृकश्राव्य माध्यमातून अनुभवताना अधिकच सुश्राव्य भासले. 
 
त्यानंतर सादर झालेली ‘कर्म’ ही रचना पाहताना प्रेक्षक सुन्न झाले. मानवी मनाच्या सृष्ट व दुष्ट अवस्था, व कर्मयोगाचे महत्त्व या गोष्टी ‘कर्म’ रचनेच्या द्वारे उद्गारच्या नृत्यांगनांनी अभिनय व नृत्यविष्कारातून उलगडल्या. यासाठी संहिता लेखन शैलेश कुलकर्णी, व संगीत दिग्दर्शन केदार पंडित यांनी केले, तर कथक नृत्यांगना मनीषा अभय व आभा वांबुरकर यांचाही विशेष सहभाग यास लाभला. 
 
ध्वनीमुद्रित स्वरूपात या पाच रचनांचे सादरीकरण झाले. नृत्यरुपी ‘मंथना’तून अनेक रत्नांचे दर्शन या अनोख्या मैफलीतून रसिकांना घडले. आनंद देशमुख यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. आसावरी पाटणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मंथन’ मैफलीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. 

बीएमसीसीत आंतरराष्ट्रीय परिषद

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘इंटरनॅशनलायझेशन ऑङ्ग कॉमर्स ऍण्ड मॅनेजमेंट एज्युकेशन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य अनिरुध्द देशपांडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
जगातील गुणवत्तापूर्ण अभ्यासक‘म एकाच ठिकाणी शिकवता येतील असे विश्‍व विद्यापीठ उभारणे आवश्यक असल्याचे मत प्राचार्य देशपांडे यांनी या वेळी व्यक्त केले. जर्मनीच्या एङ्गओएम विद्यापीठाचे कुलपती डॉ. हेरॉल्ड बेश्‍चोअरनर यांचे बीजभाषण झाले. रोजगारनिर्मितीसाठी कौशल्य विकास अभ्यासक‘मांची गरज आहे. बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन अभ्यासक‘मांची गरज केली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, अभिनव कल्पना, संशोधनाची गरज आहे.
डॉ. आदीत्य अभ्यंकर यांनी उद्योग व प्रशासनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, डॉ. विनायकराव गोविलकर यांनी उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी राष्ट्रीय धोरण, डॉ. अशोक जोशी यांचे नेतृत्वाची कामगिरी व व्यवस्थापन विकास, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण या विषयातील अभिनव कल्पना या विषयावर मिलिंद दाते यांनी सादरीकरण केले. परिषदेत ३५ पेपर सादर करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी स्वागत केले.

फर्ग्युसनमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

0


पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांनी मार्गदर्शन केले. पुस्तकांचा अभ्यास करून केवळ परीक्षार्थी बनू नका. जीवनात यशस्वी होण्यासाठी घेतलेल्या अनुभवाचा उपयोग योग्य पध्दतीेने करता येणे आवश्यक असल्याची मत डॉ. परदेशी यांनी यावेळी व्यक्त केले. उपप्राचार्या संध्या देशपांडे, पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.

‘बेटर पोलिसिंग’वर नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात परिसंवाद

0

पुणे, ता. ४ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल  फिरोदिया विधी महाविद्यालयात ‘पब्लिक कन्सर्न ङ्गॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’च्या सहकार्याने ‘बेटर पोलिसिंग’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, उत्तर प्रदेश पोलीस दलाचे निवृत्त महासंचालक प्रकाश सिंग प्रमुख वक्ते होते.
यावेळी बोलताना श्री. सिंग म्हणाले, कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याबरोबर दहशतवाद, नक्षलवाद, अमली पदार्थांची तस्करी, घुसखोरी रोखण्यासाठी पोलीसांना काम करावे लागते. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांच्या कामकाजात सुधारणा करण्यात आल्या आहेत. परंतु अपुरे मनुष्यबळ, पोलिसांच्या घरांचा प्रश्‍न अजूनही कायम आहे.
श्री. उमराणीकर म्हणाले, समाजात पोलीस नेहमीच टीकेचा विषय ठरला आहे. पोलिसांना अनेक पातळ्यांवर काम करावे लागते. पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी सूचना झाल्या, आयोगाची निर्मिती झाली, प्रत्यक्षात सूचना, सुधारणा कागदावरच राहिल्या. पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांनी स्वागत केले. एस. सी. नागपाल, सत्यबीर दोड, ए. व्ही. कृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती.