पुणे- आज महापालिकेच्या प्रवेशद्वारा नजीक पार्किंग पॉलीसी च्या विरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली .
विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील ,नगरसेवक विशाल तांबे ,नंदा लोणकर, महेंद्र पठारे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते . ही पार्किंग पॉलीसी म्हणजे ४० लाख वाहनांकडून रोज करोडो रुपयांची लुट करण्याचा प्रकार म्हणजे दरोडा च असल्याचा आरोप यावेळी चेतन तुपे पाटील यांनी केला … पहा या आंदोलनाची झलक …
पार्किंग पॉलीसी च्या विरोधात राष्ट्रवादी ची निदर्शने
जीएसटी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त 30 हजाराची लाच घेताना पकडला
पुणे- 30 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना येरवडाच्या जीएसटी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय-48, रा. B/2, फ्लॅट नंबर 204, प्रसादनागर, वडगाव शेरी, पुणे) याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी 12.45 वाजता जीएसटी कार्यालच्या कॅन्टीनमध्ये केली.
याप्रकरणी एका ज्येष्ठ व्यक्तीने तक्रार दिली होती. तक्रारदार हे काँट्रॅक्टर आहेत. त्यांनी 2013 साली केलेल्या सिव्हिल वर्कच्या कामाच्या वेळी 5 टक्के व्हॅट होता. त्यानुसार तो टॅक्स त्यांनी भरला होता. परंतु लोकसेवक प्रसाद पाटील यांनी तक्रारदाराला कमी टॅक्स भरला असल्याचे सांगितले. तो टॅक्स 8 टक्क्यांप्रमाणे भरायचा असून त्याप्रमाणे तक्रारदार यांना असेसमेंटची ऑर्डर त्यांच्या विरुद्ध अपिलमध्ये न जाण्यासाठी त्यांच्याकडून 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदारांनी याची माहिती लालचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार आज दुपारी 12.45 वाजता जीएसटी कार्यालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये सापळा रचून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रसाद पाटील याला रंगेहात पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मानसिक आरोग्य कार्यक्रमांसाठी अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत समितीचे गठन
पुणे: पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभर मानसिक आरोग्याबाबत जनजागृती व इतर विविध कार्यक्रम राबविनेसाठी महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व इतर तज्ञांचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय “मानसिक आरोग्य जनजागृती समिती”ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती राज्य अपंग कल्याण आयुक्त डॉ नितीन पाटील व समितीचे समन्वयक प्रा चेतन दिवाण यांनी दिली.
मानसिक आरोग्याबाबत राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अशिक्षित व सुशिक्षित जनतेबरोबरच शाळा- महाविद्यालयातील बहुतांशी विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गामध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीची आवशकता असल्याचा सूर अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या मानसिक आरोग्य सप्ताहामध्ये आयोजीत कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळताच पुढे आलेल्या सर्व सूचना व समस्यांवर उपाययोजना म्हणून लवकरच मानसिक आरोग्य व विविध उपचार पद्धतींवर जनजागृती करण्यासाठी आपण एका समितीचे गठन करणार असल्याची घोषणा अपंग कल्याण आयुक्त डॉ नितीन पाटील यांनी समारोप कार्यक्रमप्रसंगी केली होती.
अपंग कल्याण आयुक्त डॉ नितीन पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर, कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ प्रभाकर देसाई, समितीचे समन्वयक प्रा चेतन दिवाण व मौंडर्ने महाविद्यालयाच्या श्रीमती साधना नातू यांच्यासह इतर विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, मनोचिकीत्सक, विविध मनसोपचार पद्धतीवर काम करणारे मानसोपचार तज्ञ व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आलेला असून लवकरच मानसिक आरोग्यासंबंधी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य अपंग कल्याण आयुक्त डॉ नितीन पाटील व समितीचे समन्वयक प्रा चेतन दिवाण यांनी दिली आहे.
वाजवी किमतीत ऑरगॅनिक उत्पादने उपलब्ध करून देणारे ‘व्हेजमार्ट’ पुण्यात सुरु
पुणे-वाजवी किमतीत ऑरगॅनिक उत्पादने उपलब्ध करून देणारे ‘व्हेजमार्ट’पुण्यात सुरु झाले आहे. व्हेजमार्ट या मंचाची स्थापना २०१४ मध्ये करण्यात आली. देशातील नागरिकांना एक आरोग्यदायी आणि ऑरगॅनिक लाईफस्टाईल उपलब्ध करून देण्याच्या हेतूने व्हेजमार्ट या अनोख्या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून त्याची सुरवात पुणेकरांपासून होत आहे. या उपक्रमांतर्गत प्रमाणित, पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि ऑरगॅनिक अन्नधान्य पदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. व्हेजमार्ट ची आखणी अत्यंत धोरणात्मक अशी करण्यात आली असून समाजात मोठ्या प्रमाणावर एक निरोगी आणि ऑरगॅनिक लाईफस्टाईल रुजविणे हे ‘व्हेजमार्ट ’चे मुख्य ध्येय आहे. त्यानुसार सर्व ऑरगॅनिक उत्पादने अगदी वाजवी दरामध्ये थेट शेतामधून ग्राहकांच्या घरापर्यंत (फार्म टू किचन) पोहचविली जाणार आहेत.
ग्राहकांची सोय बघतानाच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी देखील व्हेजमार्ट कटीबद्ध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसोबत एक धोरणात्मक सहयोग करणे, त्यांच्यासाठी एक शाश्वत व्यवसाय वातावरण निर्माण करणे आणि ते टिकवणे, ग्राहकांसाठी आरोग्यदा
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड समभाग विक्रीला सुरुवात
पुणे: आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडने (the “कंपनी” or the “इश्यूअर”) प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 77,249,508 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची गुरुवार, मार्च 22, 2018 रोजीपासून शेअर प्रीमिअमसह रोख पद्धतीने प्रारंभी समभाग विक्री करायचे ठरवले (“ऑफर”) असून त्यामध्ये आयसीआयसीआय बँक लिमिटेडतर्फे 77,249,508 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”) समावेश आहे आणि त्यापैकी 3,862,475 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आयसीआयसीआय बँकेच्या भागधारकांना शेअर प्रीमिअमसह रोख रकमेला खरेदी करण्यासाठी राखीव असतील (“आयसीआयसीआय बँकेच्या भागधारकांसाठी रिझर्व्हेशन पोर्शन”). ऑफरमध्ये विक्रीनंतरच्या पेड-अप इक्विटी भागभांडवलाचा समावेश 23.98% असेल व नेट ऑफरचा समावेश (“आयसीआयसीआय बँकेच्या भागधारकांसाठी रिझर्व्हेशन पोर्शन” वगळता ऑफर) 22.78% असेल.
ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 519 रुपये ते 520 रुपये निश्चित केला आहे. किमान बोलीचे प्रमाण 28 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 28 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल.
ऑफर कालावधी सोमवार, 26 मार्च 2018 रोजी बंद होणार आहे. लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2009 (म्हणजेच “सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) नुसार अँकर इन्व्हेस्टरच्या सहभागाचा विचार करू शकतात. अँकर इन्व्हेस्टरसाठी बिड/इश्यू कालावधी बिड/इश्यू सुरू होण्याच्या तारखेपूर्वी एक कामाचा दिवस अगोदर, म्हणजे 21 मार्च 2018 रोजी असेल.
इक्विटी शेअर्सची विक्री 13 मार्च 2018 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (“आरएचपी”) केली जाणार आहे व इक्विटी शेअर्स बीएसई व एनएसई येथे सूचिबद्ध केले जाणार आहेत.
डीएसपी मेरिल लिंच लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एडलविस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड व एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, आयसीआसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम” किंवा “लीड मॅनेजर्स”) आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड बीआरएलएम – मार्केटिंग म्हणून जबाबदारी पार पाडेल.
*प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स बीआरएलएमच्या सल्ल्याने क्यूआयबीपैकी 60% पर्यंत भाग कदाचित अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइसनुसार अँकर इन्व्हेस्टरसाठी राखून ठेवतील (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). त्यापैकी एक-तृतियांश देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर अलोकेशन प्रइसने वा त्याहून अधिक वैध बोलीनुसार केवळ देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार राखले जातील. नेट क्यूआयबीच्या (अँकर इन्व्हेस्टर वगळता) 5% चे प्रतिनिधित्व करणारे इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील, व उर्वरित नेट क्यूआयबी भाग विशिष्ट प्रमाणात क्यूआयबींना (अँकर इन्व्हेस्टर वगळता) त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. ऑफरपैकी किमान 15% भाग विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक बिडर्ससाठी राखून ठेवला जाईल आणि विक्रीच्या किमतीइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोली व रिटेल इंडिव्हिज्युअल बिडरसाठी किमान 10% शेअर्स राखून ठेवता येतील. अँकर इन्व्हेस्टर व्यतिरिक्त सर्व गुंतवणूकदारांना अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होता येईल व यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. या खात्यात एससीएसबीकडून बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकेमार्फत (एससीएसबी) ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सहभागी होता येणार नाही.
ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी पार्किंग प्रस्ताव
पुणे- पुण्यात आता रस्तोरस्ती ..गल्लीबोळात .. पार्किंग शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली …
कोणतेही सादरीकरण न करता , स्पष्टीकरण न देता , नवीन अध्यक्ष आणि त्यांच्या समितीकडून अचानक पणे पार्किंग प्रस्ताव मंजूर करवून घेणारी बाब संशयास्पद असल्याचे कॉंग्रेसचे पालिकेतील गट नेते अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे . हि योजना त्यामुळे निव्वळ ठेकेदारांचे जाळे पसरवून जिझिया कर वसूल करणारी ठरेल असेही ते म्हणाले .
नेमके अरविंद शिंदे काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका ..पहा …
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे साहित्य प्रकाशित करा
युवा माळी संघटना व भिडे वाडा बचाव मोहीमच्यावतीने मागणी
पुणे-महाराष्ट्र शासनाच्यावतीने महात्मा फुले व सावित्रिबाई फुले यांच्या जीवनावरील साहित्य गेले अनेक वर्षांपासून प्रकाशित करण्यात आलेले नाही ,महाराष्ट्र शासनाच्यावतीने महात्मा फुले गौरव ग्रंथ , महात्मा फुले समग्र वाड्मय ,शेतकऱ्याचा आसूड अशी अनेक पुस्तके शासनाकडून प्रकाशित करण्यात येत होती . परंतु , शासकीय ग्रंथागारात हि पुस्तके गेली कित्येक वर्षांपासून वाचकांना उपलब्ध होत नाही , त्यामुळे महात्मा फुले व सावित्रिबाई फुले यांच्या जीवनावरील साहित्य लवकरात लवकर प्रकाशित करण्याची मागणी युवा माळी संघटना व भिडे वाडा बचाव मोहीमकडून जी. पी. ओ. रोडवरील शासकीय ग्रंथागार मुद्रणालयाचे व्यवस्थापक पोळ साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
तरी आपण महात्मा फुले व सावित्रिबाई फुले यांच्या जीवनावरील साहित्य प्रकशित कराल, अन्यथा युवा माळी संघटना व भिडे वाडा बचाव मोहीमच्यावतीने आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देण्यात आला .
यावेळी युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत , सचिव वृषाली शिंदे. हनुमंत टिळेकर , अरुणकुमार कोद्रे . सचिन कचरे , भिडे वाडा बचाव मोहिमचे प्रमुख प्रशांत फुले , सुधीर नाईकव , राहुल रासकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .
39 हजार कोटींच्या थकबाकीने महावितरणची आर्थिक कोंडी
मुंबई : राज्यात सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे सुमारे 39 हजार कोटी रुपयांची वीजबिले थकीत असल्याने महावितरणची अतिशय गंभीर स्वरूपाची आर्थिक कोंडी झाली आहे. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा परिणाम होत आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणकडून राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
महावितरणवर वाढत्या थकबाकीमुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या सुमारे १ कोटी 41 लाख ग्राहकांकडे जानेवारी 2018 अखेरीस एकूण थकबाकी 39 हजार कोटी एवढी आहे. या थकबाकीत 57 लाख 56 हजार घरगुती ग्राहकांकडे सुमारे 1 हजार 500 कोटी, 5 लाख 73 हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे सुमारे 478 कोटी, 1 लाख 5 हजार उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे 847 कोटी, 41 हजार सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे सुमारे 1 हजार 500 कोटी, 79 हजार पथदिवे ग्राहकांकडे सुमारे 3 हजार 300 कोटी, 38 लाख कृषी ग्राहकांकडे सुमारे 23 हजार कोटी, 45 हजार 219 यंत्रमाग ग्राहकांकडे सुमारे 938 कोटी, 57 हजार इतर ग्राहकांकडे सुमारे 79 कोटी रुपयांचा समावेश आहे. तसेच राज्यात 3 लाख 57 हजार कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदार ग्राहकांकडे 7 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.
महावितरणचा उद्देश नफा कमावणे नसून ग्राहकांना सुरळीत सेवा देणे हा आहे. परंतु वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीची होत असलेली आर्थिक कोंडी पाहता थकीत वीजबिलांची वसुली अत्यावश्यक झाली आहे. प्रत्येक महिन्यातील ग्राहकांकडून येणाऱ्या महसूलापैकी सुमारे 85 ते 90 टक्के खर्च वीज खरेदीवर होत आहे. परंतु प्रत्येक महिन्यात बरेच ग्राहक वीजबील भरत नसल्याने वीज खरेदीकरिता लागणारी आवश्यक रक्कमसुध्दा महावितरणकडे जमा होत नाही. वीज खरेदीमध्ये उधारीचे दिवस संपल्याने चालू वीजबिलांसह थकबाकीची 100 टक्के वसुली करणे आवश्यक झाले आहे. वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी राज्य शासन व महावितरणकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु वारंवार विनंती करूनही वीजग्राहकांनी या योजनांना अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. या सर्व पर्यायानंतर महावितरणने थकबाकी वसुलीसाठी आता थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आहे. तसेच ग्राहकांना वीजबिलासंदर्भात तक्रारी असल्यास प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करावे अशा सूचना मुख्यालयातून यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत.
थकीत वीजबील भरण्यासाठी राज्यभरातील स्थानिक वीजबील भरणा केंद्रे तसेच घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल ॲप असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकीचा भरणा त्वरीत करावा व वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
‘पै इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईन’ चा फॅशन शो
शंभूराजांच्या बलिदान स्मरणदिनाला अमोल कोल्हेंची उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे वारसदार धर्मवीर संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विविध बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. या कामी अभिनेते डॅा. अमोल कोल्हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेद्वारे ‘ऑनस्क्रीन’ संभाजी महाराज साकारतानाच पडद्यामागेही शंभूराजांचं जीवनचरित्र जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेल्या कोल्हे यांच्या उपस्थितीत संभाजी महाराजांचा ३२९ वा बलिदान स्मरणदिन तालुका शिरूर येथील श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथे साजरा करण्यात आला.
मृत्युंजय अमावस्या म्हणजेच फाल्गुन वद्य अमावस्या ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथी बलिदान स्मरण दिन म्हणून साजरी केली जाते. याप्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॅा. अमोल कोल्हे, शंतनू मोघे (शिवाजी महाराज), स्नेहलता वसईकर (सोयराबाई), पल्लवी वैद्य (पुतळाबाई), प्राजक्ता गायकवाड (यसूबाई), दिग्दर्शक विवेक देशपांडे, कार्तिक केंढे, निर्माते डॅा. घनश्याम राव, छायालेखक निर्मल जानी, क्रिएटिव्ह हेड सचिन गद्रे, कार्यकारी निर्माते समीर कवठेकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शंभूराजांच्या समाधीला महाअभिषेक करण्यात आला. पवित्र मंत्रोच्चारांच्या जयघोषात संभाजी महाराजांच्या समाधीवर हेलिकॅाप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मूक पदयात्रा काढण्यात आली. शिवकालीन पोवाड्यांनी दुमदुमलेल्या वढूमध्ये शंभूराजांच्या समाधीची पूजा करून शासकीय मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पुरंदर ते वढू बु. भव्य पालखी सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले. धर्मसभा व पुरस्कार वितरणही करण्यात आले.
धर्मासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांचा खरा इतिहास आजवर जगासमोर येऊ न शकल्याची खंत डॅा. अमोल कोल्हेंच्या मनात होती. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेद्वारे आजतागायत अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण केलं जात असून त्यात आपला खारीचा वाटा असल्याने जीवन कृतार्थ झाल्याची भावना कोल्हे यांनी व्यक्त केली. पूर्वी नाटक आणि आता मालिकेच्या निमित्ताने शंभूराजांच्या जीवनचरित्राचा विविध अंगांनी अभ्यास करताना संभाजी महाराजांचं खरं दर्शन घडलं आणि त्यातून उलगडलेले संभाजीराजे आज ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये साकारत असल्याचेही कोल्हे म्हणाले. मृत्युंजय अमावस्येला असणारा संभाजी महाराजांचा बलिदानस्मरण दिन सोहळा अंगावर रोमांच आणणारा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात शंभूराजांनी दिलेल्या धर्मलढ्याची आठवण करून देणारा असल्याचं मतही कोल्हे यांनी व्यक्त केलं.
गल्ली बोळातल्या पार्किंग शुल्क आकारणीला उपमहापौरांचा विरोध(व्हिडीओ)
पुणे- भाजपच्या सोबत महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी एकीकडे पार्किंग प्रस्ताव हा जुन्या कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या काळातील असला आणि पार्किंग धोरण असावे असे आपलेही मत असले तरीहीआयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावात आणि स्थायी समिती मध्ये .. मंजूर झालेल्या प्रस्तावात अगदी झोपडपट्टी पासून शहरातील गल्ली बोळातील रस्त्यावर अगदी रात्री होणाऱ्या पार्किंग बाबत हि शुल्क वसुली व्हावी यास आपला विरोध असल्याचे जाहीर केले आहे . याबाबत आम्ही आमची भूमिका २३ तारखेला मुख्य सभेत मांडू असे ते म्हणाले …पहा आणि एका नेमके त्यांनी काय म्हटले आहे ..
पार्किंग प्रस्ताव म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी ‘(व्हीडीओ)
पुणे- महापालिकेच्या स्थायी समितीने आज अखेर अचानक पणे मंजूर केलेला पार्किंग प्रस्ताव म्हणजे भाजप ला झालेली विनाश काले विपरीत बुद्धी आहे . अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी पुणेकरांनो जागे व्हा असे आवाहन केले आहे . पहा आणि ऐका नेमके बाळासाहेब ओसवाल काय म्हणाले …
‘पार्किंग प्रस्ताव ‘ हा तर तमाम पुण्यावर दरोडा
पुणे- महापालिकेच्या स्थायी समितीने आज अखेर अचानक पणे मंजूर केलेला पार्किंग प्रस्ताव म्हणजे तमाम पुण्यावर भाजपने उघड्या डोळ्या समक्ष टाकलेला दरोडा ठरेल अशी जळजळीत प्रतिक्रिया माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दिली आहे .
नाही नाही करत ,आज अचानक घाईने मोठ्या शिताफीने मंजूर करवून घेवून आता २३ तारखेला मुख्य सभेत हा प्रस्ताव मंजूर करून त्याद्वारे ३८ लाख पुणेकरांची लुट करण्याचा हा पराक्र अत्यंत धोकादायक आणि निंदनीय असून जनतेने आता वेळीच जागे व्हावे आणि रस्त्यावर आले पाहिजे असे ते म्हणाले … पहा आणि एका नेमके प्रशांत जगताप काय म्हणाले ….
अखेर भाजपचा जिझिया कर.. पुणेकरांच्या माथ्यावर.. (व्हिडीओ )
पुणे-आयुक्त कुणालकुमार यांनी प्रतिष्ठेचा केलेला पार्किंग धोरणाचा प्रस्ताव आज अचानक स्थायी समितीत आणून तो मान्य करवून घेवून तातडीने मुख्य सभेत कोणाचाही विरोध न होता दाखल करण्यात आला .या प्रस्तावाद्वारे प्रत्येक पुणेकराला आपण वापरत असलेल्या वाहनाद्वारे हजारोचा कर महापालिकेच्या झोळीत टाकावा लागणार आहे . खाजगी वाहने वापरू नयेत म्हणून पुणेकरांची या कराद्वारे गळचेपी ..करून जबरदस्ती करणारा हा प्रस्ताव आहे . त्यामुळे या कराला औरंगजेबाच्या जिझिया कराचा बाप म्हणण्याची वेळ पुणेकरांवर येईल असे मानले जाते . भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांचा आणि भाजपमधील अनेक नगरसेवकांचा विरोध असताना सुद्धा हा कर पुणेकरांच्या माथ्यावर लादण्याचा प्रयत्न होतो आहे .येत्या २३ तारखेला हा प्रस्ताव आता मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी चर्चेला येईल .
शहरातील, उपनगरातील कोणत्याही रस्त्यावर तुम्हाला गाडी पार्क करायची असल्यास दुचाकीसाठी तासाला 2ते 4 रुपये तर चारचाकी 10 ते 20 रुपये शुल्क मोजावे लागतील असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला . राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या 4 सदस्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले तर भाजपच्या १० सदस्यांनी पक्षाचा आदेश म्हणून यास सहमती दिली .
पुणे शहरामध्ये प्रशासन कडून सायकल योजने नंतर आता संपूर्ण शहरामध्ये नवीन सार्वजनिक पार्किंग धोरण तयार करण्यात आले आहे. यासाठी एका कंपनीकडून या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील खासगी वाहनांना रोखण्यासाठी आणि वाहतुक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी महापालिकेने संपुर्ण शहरभर पे अॅन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे.
रहदारीनुसार वर्गवारी आणि पार्किंगचे दर –
शहरात रस्त्यांवरील रहदारी आणि गर्दी विचारात घेऊन तीन झोन निश्चित करण्यात आले आहेत. ‘अ’ झोनमध्ये कमी वर्दळ, ‘ब’ झोनमध्ये तीव्र वर्दळ आणि ‘क’ झोनमध्ये अतितीव्र वर्दळ अशी वर्गवारी करण्यात येणार आहे.
त्या वर्गवारीनुसार अनुक्रमे दुचाकींना दोन रुपये, तीन आणि चार रुपये, रिक्षाचालकांना सहा रुपये, नऊ आणि 12 रुपये तसेच चारचाकी वाहनांना दहा, 15 आणि 20 रुपये दर आकारण्यात येणार आहे.
- प्रशासनाच्या प्रस्तावित दरापेक्षा 80 टक्के कपात केल्याचा स्थायीचा दावा
- पार्किंग झोनसाठी शहरातील 1800 किलोमीटरचा सर्वे करणार
- पोलिस आणि महापालिकेच्या पथकाकडून संयुक्त पाहणी
- पोलिसांच्या अधिसूचनेनंतर पार्किंग झोन निश्चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी
- रात्री दहा ते आठपर्यंत पार्किंगची रक्कम महापालिका वसूल करणार
- दिल्ली, मुंबई आणि नागपूर येथील पार्किंगच्या तुलनेत दर कमी असल्याचा दावा
- स्थायी समितीमध्ये दहा विरुद्ध चार मताने प्रस्ताव मंजूर
असे असतील पार्किंगचे दर –
पार्किंगचे दर अ, ब आणि क वर्गवारीनुसार (प्रति तासाला)
| वाहन प्रकार | अ वर्ग | ब वर्ग | क वर्ग |
|---|---|---|---|
| दुचाकी | दोन रुपये | तीन रुपये | चार रुपये |
| तीनचाकी आणि रिक्षा | सहा रुपये | नऊ रूपये | 12 रुपये |
| मोटार | 10 रुपये | 15 रुपये | 20 रुपये |
| मालवाहू टेम्पो | सहा रुपये | नऊ रुपये | 12 रुपये |
| मिनी बस | 15 रुपये | 12 रुपये | 30 रुपये |
| अवजड वाहने आणि ट्रक | 20 रुपये | 30 रुपये | 40 रुपये |
| खासगी प्रवासी बस | 30 रुपये | 45 रुपये | 60 रुपये |
निवासी -रात्री पार्किंग शुल्क (रात्री १० ते सकाळी ८ )
एका रात्रीला १० रुपये –वार्षिक ३६५० रुपये
जुने वाडे ,जुनी वसाहती,,समाविष्ट गावातील इमारती,
रात्रीला 5 रुपये याप्रमाणे वार्षिक १८२५ रुपये
झोपडपट्टी रात्रीला अडीच रुपये याप्रमाणे वार्षिक ९१० रुपये
याबाबतचा मूळ प्रस्ताव आयुक्तांचा होता त्यातील शुल्कात ८० टक्के कपात करणारी उपसूचना देण्यात आली त्यात शुल्क कमी केलेली आहे हि उपसूचना मंजूर करण्यात आली . . विशेष म्हणजे या उपसूचनेवर नगरसेविका नीलिमा खाडे आणि कविता वैरागे यांच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या घेण्यात आलेल्या आहेत .
सविस्तर उपसूचनेसह प्रस्ताव पुढे फोटो स्वरूपात जसाच्या तसा ..पहा
आणि संदर्भातील स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेतच सत्ताधाऱ्यांचे वाभाडे निघाले ..हि पत्रकारपरिषद पहा आणि ऐका जशीच्या तशी …
राष्ट्रवादीकडून पूजा कोद्रे तर भाजपकडून सुकन्या गायकवाड (महापालिका पोटनिवडणूक )
पुणे-: माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन झाल्याने मुंढवा-मगरपट्टा सिटी प्रभाग 22 क मध्ये रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. हि पोटनिवडणूक पूर्व भागातील जनतेचा २०१९ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने जनमानसाचा कौल देणारी ठरू शकणार आहे .
या निवडणुकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शहरअध्यक्ष योगेश गोगावले यांच्या उपस्थितीत सुकन्या गायकवाड यांनी आज अर्ज भरला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस ने पूजा समीर कोद्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुणे शहर अध्यक्ष खा . वंदना चव्हाण यांनी मंगळवारी सकाळी ही घोषणा केली . पूजा समीर कोद्रे या दिवंगत चंचला कोद्रे यांच्या जाऊबाई आहेत
.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापुर्वीच ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंढवा, मगरपट्टासिटी, माळवाडी, आकाशवाणी, 15 नंबर, लक्ष्मी कॉलनी असा भाग असलेल्या या प्रभागात पुरुष 29 हजार 278 व 26 हजार 436 महिला असे एकूण 55 हजार 714 मतदार आहेत.





