पुणे: पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभर मानसिक आरोग्याबाबत जनजागृती व इतर विविध कार्यक्रम राबविनेसाठी महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व इतर तज्ञांचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय “मानसिक आरोग्य जनजागृती समिती”ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती राज्य अपंग कल्याण आयुक्त डॉ नितीन पाटील व समितीचे समन्वयक प्रा चेतन दिवाण यांनी दिली.
मानसिक आरोग्याबाबत राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अशिक्षित व सुशिक्षित जनतेबरोबरच शाळा- महाविद्यालयातील बहुतांशी विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गामध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीची आवशकता असल्याचा सूर अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या मानसिक आरोग्य सप्ताहामध्ये आयोजीत कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळताच पुढे आलेल्या सर्व सूचना व समस्यांवर उपाययोजना म्हणून लवकरच मानसिक आरोग्य व विविध उपचार पद्धतींवर जनजागृती करण्यासाठी आपण एका समितीचे गठन करणार असल्याची घोषणा अपंग कल्याण आयुक्त डॉ नितीन पाटील यांनी समारोप कार्यक्रमप्रसंगी केली होती.
अपंग कल्याण आयुक्त डॉ नितीन पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर, कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ प्रभाकर देसाई, समितीचे समन्वयक प्रा चेतन दिवाण व मौंडर्ने महाविद्यालयाच्या श्रीमती साधना नातू यांच्यासह इतर विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, मनोचिकीत्सक, विविध मनसोपचार पद्धतीवर काम करणारे मानसोपचार तज्ञ व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आलेला असून लवकरच मानसिक आरोग्यासंबंधी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य अपंग कल्याण आयुक्त डॉ नितीन पाटील व समितीचे समन्वयक प्रा चेतन दिवाण यांनी दिली आहे.