Home Blog Page 3166

अखेर कुणालकुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार सोडला …

0

पुणे- महापालिकेत सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या कुणाल कुमार यांची नुकतीच केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी आपल्या आयुक्तपदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याकडे सोपवला आहे.विभागीय आयुक्त पदावरून चंद्रकांत दळवी निवृत्त झाल्यानंतर त्यांचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी सौरभ राव सांभाळीत आहेत . हे पाहता आता पुणे विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त अशा दोन वरिष्ठ आणि महत्वपूर्ण पदावर शासनाने अद्याप कोणाच्याही नियुक्त्या केल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .

कुणाल कुमार यांच्या कार्यकाळात नदी सुधार प्रकल्प, चोवीस तास समान पाणी पुरवठा, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि केबल डक्ट हे विषय खूप गाजले.या विषयांवर आक्षेप घेण्यात आले पण  या सर्वांवर नेहमीच महापालिका आयुक्तांनी मात केल्याचे दिसून आले. आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खासदार वंदना चव्हाण यांचे शपथ विधी नंतर पुण्यात मिरवणुकीने स्वागत

0
पुणे : खासदार वंदना चव्हाण यांचे शपथ विधी नंतर पहील्यादा पुणे शहरामध्ये दि.६/४/२०१८ सायंकाळी  पावणे सात वाजता लोहगाव विमान तळ येथे आगमन झाले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंदना चव्हाण यांचे दमदार स्वागत केले.
पक्षाच्या वतीने सलग दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची  शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन पर भव्य स्वागत मिरवणुकीचे आयोजन केले होते.
ही मिरवणूक लोहगाव विमानतळापासुन सुरुवात, मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यान, वाडिया कॉलेज, दादासाहेब गायकवाड पुतळा, महात्मा गांधी पुतळा, रेल्वे स्टेशन दर्गा, डाॅ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलेक्टर आॅफीस, सारसबाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा आणि स्वातंत्र्य सेनानी जमनालाल बजाज,अहिल्यादेवी होळकर ,महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना  अभिवादन करून सारसबाग गणपतीची महाआरती करून रॅलीचा समारोप समारोप झाला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी वाडिया महाविद्यालयानजीक खा . वंदना चव्हाण यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या .
या मिरवणुकीत मोठ्या संख्येने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी, सेल अध्यक्ष आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सौंदर्याचं मर्म उलगडणारा ‘जश्न-ए-हुस्न’

0

कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पहावे लागेल. रसिकतेने ते सौंदर्य अनुभवत कलेच्या आगळ्या आविष्काराचा आनंद जश्न-ए-हुस्न या सांगीतिक कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. संगीत आणि नृत्याच्या माध्यमातूनच तिचा साजशृंगार, तिचं सौंदर्य याची ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला तर तो रसिक मनावर ठसेल आणि अंतरी रुळेल हे जाणून ज्येष्ठ गायिका राणी वर्मा यांनी जश्न-ए-हुस्न हा अनोखा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सिस्टर कनर्सन एन्टरटेंन्मेंट आणि राणी वर्मा यांची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमाचा ‘श्रीगणेशा’ ८ मार्चला महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर झाला. रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग शुक्रवार १३ एप्रिलला रात्रौ ८.०० वा. रविंद्र नाट्यमंदिर येथे रंगणार आहे. तर तिसरा रविवार १५ एप्रिलला ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृहात रात्रौ ८.३० वा. संपन्न होईल.

भारतीय हिंदी सिनेसंगीताने कित्येक पिढ्यांच्या रसिकांचे भावविश्व व्यापून टाकले आहे. असंख्य गीतांमधून स्त्री सौंदर्याची विलोभनीय वर्णने आपण अनुभवलेली आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती राणी वर्मा यांची आहे. पहिल्या प्रयोगाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि नागेश प्रसाद यांनी केले होते. दुसऱ्या प्रयोगाचे सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले आणि सुनील मटू करणार आहेत. दिग्दर्शन संदीप पडियार, लेखन डॉ. सुनील देवधर, संगीत संयोजन दिलीप पोतदार, कोरिओग्राफी विश्वास नाटेकर, प्रकाशयोजना अमोघ फडके तर ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स सचिन जाधव यांनी केले आहे. श्लोक चौधरी, श्रीरंग भावे, ज्योतिका शर्मा, अर्चना गोरे, मनिष आणि नवीन त्रिपाठी अशा आघाडीच्या गायकांचा स्वरसाज या कार्यक्रमाला लाभला आहे.

या अनोख्या संकल्पनेबद्दल बोलताना गायिका राणी वर्मा सांगतात की, ‘स्त्री सौंदर्याशी निगडीत अनेक लोकप्रिय गीतांतून आणि तितक्याच लयबद्ध नृत्याविष्कारातून, त्यातील भावभावनांचे लोभसवाणे सादरीकरण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा या संपूर्ण समूहाचा प्रयत्न आहे’. जश्न-ए-हुस्न हा मोहवणारा एक परिपूर्ण कलाविष्कार सर्व कलाप्रेमींना नक्कीच आवडेल असा विश्वास राणी वर्मा व्यक्त करतात.

फडणविसांनी पहा कसा केला थेट शरद पवारांवर हल्ला (व्हिडीओ)

0

मुंबई – ज्या भाजपच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी अनेकदा शरद पवारांचे कौतुक केले आज त्याच भाजपच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांवर हल्ला केला .
भाजपाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लांडग्यांची उपमा देत हल्लाबोल केला आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. विरोधकांनी हल्लाबोल यात्रा नव्हे, तर डल्ला मारो यात्रा काढली होती. भाजपाला नेहमीच भटा,ब्राम्हणांचा  पक्ष म्हणून हिणवलं गेलं. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भविष्य आहे. संविधानात दिलेलं आरक्षण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे, तुमच्यासारखा रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही, मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना लक्ष्य केलं. ‘आम्ही चहा पितो. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या लोकांनाही आम्ही चहाच देतो,’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी पवारांना थेट इशाराही दिला. ‘पवारसाहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. 2014 मध्ये उडालेली धूळधाण लक्षात ठेवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवारांवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवरही त्यांनी टीका केली. आधी राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.भाजपमध्ये खरी लोकशाही येथे सामन्यांना पक्षाध्यक्ष होता येतं. त्याचमुळे मी अध्यक्ष बनू शकलो. भारतीय जनता पार्टी ही खरी जनतेची पार्टी असून, ही आई व मुलाची पार्टी नाही असे नितीन गडकरी म्हणाले.
या सभेत काय म्हणाले अमित शहा-
– राहुल गांधी सध्या शरद पवारांसोबत बसतात, त्यांनी इंजेक्शन दिल्याने ते मोदींना साडेचार वर्षात काय केले असे विचारतात, पण काँग्रेसने मागील 70 वर्षात काय केले त्याचे उत्तर द्यावे.
– मोदींचा सबका साथ, सबका विकास हे धोरण.
– मोदींच्या नेतृत्त्वात देशाच्या काना- कोप-यात कमळ पोहचले.
– 38 वर्षात अनेक मान्यवरांनी कठोर परिश्रम घेतल्याने भाजप पक्ष मोठा झाला.
– भाजप एससी, एसटी समाजाच्या पाठीशी, आरक्षण हटविणार नाही आणि इतरांना ते हटवूही देणार नाही.
– राजकारणात सत्तेत उपभोग घेण्यासाठी भाजपचा जन्म झाला नाही- अमित शहा- काँग्रेसच्या काळात शेतीमालाला भाव मागून शेतकरी थकले पण तो वाढवून दिला नाही.
– 2019 च्या निवडणुकीच्या बिगूल वाजला आहे. सर्व विरोधक एकत्र या एकत्र या म्हणत आहेत कारण तो मोदींना घाबरले आहेत- अमित शहा
– 2019 च्या निवडणुकीत मोदी सरकारच्या लेखा-जोखा घेऊन लढायचे आहे.
– राहुल गांधींवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले, आम्ही यूपीमध्ये पोटनिवडणुकीत केवळ दोन जागा हरलो आहे. तर काँग्रेस 11 राज्यांत पराभूत झाली आहे.
– मात्र, काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली तरी ते दुस-यासाठी पेढे वाटत आहेत, असा नेता व पक्ष पहिल्यांदाच पाहिला जो अनामत रक्कम जप्त झाल्यानंतर पेढे वाटले. .
*काय म्हणाले चंद्रकांतदादा पाटील
– होय, भुजबळांच्या कोठडीशेजारी दोन जागा…
काय म्हणाले सुधीर मुनंगटीवार-
– उंदिर मंत्रालयात नाहीत तर यांच्या डोक्यात…

चंद्रकांत दादांनी स्वतःच्या १६ भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करून ठेवावी-धनंजय मुंडे

0

 

पंढरपूर : ज्या ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करते त्या त्या वेळी सरकार सत्तेचा वापर करून आम्हाला धमकी देण्याचे काम करते, चंद्रकांत दादा यांनी आम्हाला धमकी देण्यापेक्षा स्वतःच्या मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करून ठेवावी असा पलटवार विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

‌मुंबईतील भाजपाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या टिकेला प्रतिउत्तर देतांना धनंजय मुंडे म्हणाले की , आजच्या दिवशी स्थापना दिवस साजरा करण्यापेक्षा चार वर्षे जनतेची फसवणूक करणा-या ( फुल बनवणा-या ) भाजपाने आपला स्थापना दिवस ६ एप्रिल ला नाही तर १ एप्रिल या एप्रिल फुल दिवशी साजरा करायला हवा होता असा टोला लगावला. आज २८ -२८ रेल्वे द्वारे माणसे आणून भाजपा आता स्वतःचीच फसवणूक करत असल्याचे ते म्हणाले .

शिवसेनेने सत्तेचा लाभ घेऊन पुन्हा केवळ जनतेला दाखवण्यासाठी विरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे या दूटप्पी भूमिकेला अजितदादा यांनी गांडूळासारखे दुतोंडी म्हटले तर बिघडले कुठे ? असा सवाल त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. हल्लाबोल यात्रेदरम्यान पंढरपूर येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार….भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत !

0

मुंबई : भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त बीकेसीच्या मैदानावर सुरू असलेल्या भाजपच्या महामेळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधत अजित पवार….भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत असा थेट इशारा दिला.

भाजपाने बीकेसीच्या मैदानात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या महामेळाव्याला भाजपाध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता आदी नेते आमदार खासदार उपस्थित आहेत. या महामेळाव्यात महसूलमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात मित्र पक्ष शिवसेनेची बाजू घेत अजित पवार यांच्यावर हल्ला चढविला. शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहे. हल्लोबोल यात्रा काढणा-यांनी आधी स्वतःचा गल्ला भरला असून, भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत असे म्हणत पाटलांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

भाजपच्या मुखात शिवाजी महाराज आणि ह्रदयात छिंदम

0

मुंबई : देशात आणि राज्यात सामाजिक एकता, अखंडता धोक्यात आणणा-या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कृषी, परराष्ट्र निती, अंतर्गत सुरक्षा या सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपचा स्थापना दिवस सोहळा म्हणजे नापास झालेल्यांनी आनंद साजरा करण्याचाच प्रकार आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपची जुमलेबाजी जनता आता स्विकारणार नसून २०१९ साली भाजपची हकालपट्टी निश्चित आहे,अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.मंत्रालयाला आत्महत्यालय करणारे शेकडो कोटींची उधळपट्टी करून स्थापना दिवसाचा उत्सव साजरा करित आहेत. हा कसला उत्सव आहे? १३ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या त्या शेतक-यांच्या मरणाचा उत्सव का?असा सवाल करून या उत्सवासाठी खर्च झालेले कोट्यवधी रूपये कुठून आले? निरव मोदींकडून की विजय माल्याकडून ? अशी विचारणा खा. चव्हाण यांनी केली.

राज्याच्या मंत्रीमंडळातील २१ मंत्र्यांवर गंभीर घोटाळ्य़ाचे आरोप आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील घोटाळेबाज मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले भाजप अध्यक्ष अमित शहा भ्रष्टाचाराच्या डोंगरावर उभे राहून पारदर्शकतेच्या वल्गना करित आहेत हे हास्यास्पद आहे.

गोळवलकरांच्या विचारधनातून आलेला संघाचा मनुवाद जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून आहे. आरक्षण हटवू देणार नाही असे कितीही म्हटले तरी मोहन भागवतांनी संघ आणि भाजपचे आरक्षण विरोधी मत अगोदरच प्रदर्शित केलेले आहे.

राहुल गांधींना चार पिढयांचा हिशोब मागणा-या भाजपाध्यक्षांना उत्तर देताना खा. चव्हाण म्हणाले की, राहुल गांधीजींच्या परिवारातील पंडित नेहरूंनी देशासाठी १० वर्ष तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. संघ परिवारातील एकातरी नेत्याची करंगळी तरी देशासाठी कापली गेली का? असा प्रश्न विचारून काँग्रेस व गांधी परिवाराने देशासाठी त्याग करून पायाभरणी केली. त्यातूनच एक तथाकथित चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकला. परंतु भाजपने घोटाळा करण्यासाठी तो चहा ही सोडला नाही असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला.

या सोहळ्यानिमित्त भाजप नेत्यांमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धाच लागली होती. मुख्यमंत्र्यांना आपण चार वर्षात काय केले हे आपल्या भाषणात सांगता आले नाही. भाजपाध्यक्षांनी आपल्या जुमलेबाज व्यक्तिमत्त्वाला साजेसे महाराष्ट्रात आत्महत्या कमी झाल्या आहेत. गुंतवणूक वाढली आहे. भ्रष्टाचार कमी झाला आहे अशा हास्यास्पद कोट्या केल्या व २०१९ साठी काही नविन जुमले सोडले. शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन सत्तेवर येऊन चार वर्ष झाल्यानंतर भाजपला आठवले आहे. भाजपच्या खोटारडेपणाचा जनतेला उबग आला असून पैसे खर्च करून, खोटी अमिषे दाखवून जमा केलेल्या गर्दीचा अनुत्साह आणि थंडा प्रतिसाद पाहता २०१९ मध्ये भाजपची हाकालपट्टी निश्चित आहे हे आता भाजपच्या कार्यकर्त्यांनाही समजले आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

राज्यभरातील नादुरुस्त वीजमीटर महिन्याभरात बदला

0

महावितरणचे सीएमडी श्री. संजीव कुमार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सुमारे 10 लाख 37 हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी दिले आहेत. राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई मुख्यालयात आयोजित मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

श्री. संजीव कुमार म्हणाले, अचूक बिलींगसाठी विशेषत्वाने प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंगल फेजचे आणखी 30 लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त आढळून आलेले 10 लाख 37 हजार सिंगल फेजचे वीजमीटर सर्वप्रथम एक महिन्याच्या कालावधीत बदलण्यात यावेत. त्यानंतर नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.

महावितरणकडून मीटर रिडींग मोबाईल अ‍ॅपद्वारे सुरु असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आलेली आहे. गतीमानता आली आहे. परंतु मीटर रिडींग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रिडींग घेण्याचे प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास होत आहे. मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोबतच महावितरणच्या महसुलाचे सुद्धा नुकसान होत आहे. असे सदोष रिडींगचे प्रकार टाळण्यासाठी व बिलींगमध्ये अचूकता आणण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना कराव्यात असेही अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यावेळी म्हणाले.

महावितरणच्या राज्यभरातील 16 परिमंडलात सद्यस्थितीत नादुरुस्त असल्याचे आढळून आलेल्या एकूण 10 लाख 37 हजार सिंगल फेज नादुरुस्त वीजमीटरमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागातील 1 लाख 85 हजार, नागपूर प्रादेशिक विभाग – 2 लाख, कोकण प्रादेशिक विभाग – 4 लाख 53 हजार तसेच पुणे प्रादेशिक विभागातील 1 लाख 98 हजार मीटरचा समावेश आहे. हे सर्व नादुरुस्त वीजमीटर तातडीने बदलण्यासाठी येत्या महिन्याभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या बैठकीला संचालक (प्रकल्प) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (वित्त) श्री. जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचालन) श्री. अभिजित देशपांडे, संचालक (वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण यांच्यासह प्रादेशिक व कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता, वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

बॉलीवूड अभिनेते राजकिशोर यांचे निधन

0

मुंबईः एकीकडे संपूर्ण बॉलीवूड आणि माध्यमे सलमान खान च्या जेलमधील रात्रीची आणि त्याच्या बेल ची चिंता वाहत असताना दुसरीकडे  बॉलिवूडच्या  ‘शोले’ सह असंख्य चित्रपटात भूमिका केलेल्या  अभिनेते राजकिशोर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गुरुवारी रात्री 1.30च्या सुमारास मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकिशोर यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. यापैकी एक शोले हा चित्रपट होता. या चित्रपटातील लोकप्रिय दृश्यात राजकिशोर होते.राजकिशोर यांनी तहलका, शहजादी, फरिश्ते, एक नया रिश्ता, मारधाड, काला धंधा गोरे लोग, तन बदन आणि मिस्टर अँड मिसेज खिलाडी या चित्रपटांमध्ये झळकले होते.

‘शिकारी’ २० एप्रिल रोजी

0

चित्रपटांसाठी केलेली वेगळ्या वाटेवरील कथांची निवड आणि त्यांना दिलेल्या वेगळ्या हाताळणीसाठी महेश वामन मांजरेकर ओळखले जातात. त्यांचा ‘शिकारी’ नावाचा नवीन मराठी चित्रपट येत असून त्याचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांनी केले आहे आणि हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट २० एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि टीजर्स नुकतेच सार्वजनिक झाले आणि सिनेरसिकांमध्ये काही प्रमाणात खळबळ माजली. ‘शिकारी’ या चित्रपटाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकर, सुव्रत जोशी, नेहा खान, कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, दिग्दर्शक विजू माने आणि आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यावेळी उपस्थित होते. ‘शिकारी’ हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी प्रस्तुत केला असून आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद वैद्यनाथन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

 गाजलेली मराठी मलिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने घराघरात पोहोचलेला आणि स्वतःचे असे वेगळे स्थान अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलेला सुव्रत आणि नेहा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा या चित्रपटातून चित्रपटसृष्टीतील आपले पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.  

 अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा धांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.

 या चित्रपटाची पोस्टर्स सार्वजनिकपणे नुकतीच झळकली आणि मराठी चित्रपट रसिकांमध्ये त्याबद्दल चर्चा सुरु झाली. हा चित्रपट विनोदी आहे की ती एक सेक्स कॉमेडी आहे की मग ती एक सामाजिक अंगाने जाणारी नाट्यमय कलाकृती आहे, याबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. महेश वामन मांजरेकर हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता असल्याने आणि विजू माने यांचे दिग्दर्शन असल्याने ही चर्चा अधिक रंगली आहे.  

 “शिकारी’चा विषय वेगळा आणि मस्त होता त्यामुळे त्यावर काम करायला मजा आली. तो एक विनोदी आणि संपूर्णतः व्यावसायिक चित्रपट आहे. विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आम्ही वाहिलेली ती एक मानवंदना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की, तुम्हाला आणि विशेषतः मुलींना जर या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर खुशाल या, पण आंधळेपाने वावरू नका.” असे “शिकारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता महेश वामन मांजरेकर म्हणाले.

 ‘शिकारी’चे दिग्दर्शक विजू माने म्हणतात, “स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकर ह्या सिनेमात प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेत असले तरी हा सिनेमा आकार घेत असताना त्यांनी देलेले योगदान खूप खूप मोठे आणि अनुभवसिद्ध आहे.”

 चित्रपटाचे निर्माते आणि आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील म्हणाले, “शिकारी’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. हा चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांनी दिग्दर्शित केला असून बहुआयामी व्यक्तिमत्व महेश मांजरेकर यांनी त्याचे सादरीकरण केले आहे. माझे वडील एस आर पाटील यांनी पूर्वी ‘बायको असावी अशी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात माझ्या वडिलांनी मध्यवर्ती भूमिका ही केली होती. तो चित्रपट मनोरंजन आणि सामाजिक संदेश यांचे अचूक मिश्रण होते आणि आता २० एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित होत असलेला शिकारी’ या आमच्या चित्रपटातून आम्ही अशाच प्रकारची संकल्पना मांडली आहे.

बिटकॉइन फसवणूक -अमित भारद्वाजला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

0

पुणे : बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित महेंद्रकुमार भारद्वाज आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज यांना काल रात्री दिल्ली विमानतळावर अटक केल्यानंतर आज न्यायालयाने १३ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.अशी माहिती येथे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.

या प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस आणखी सहा आरोपींचा शोध घेत आहे. बिटकॉइन घोटाळा जून २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत घडला होता. या प्रकरणातील मुख्या आरोपी असलेले अमित महेंद्रकुमार भारद्वाज आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, ही संबंधित कंपनी सिंगापूरची असून आरोपींनी काही आपल्याकडील माहिती डिलीट केली आहे. त्यामुळे सर्व माहिती तसेच लॉग इन आयडी आणि पासवर्ड घेण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केल्यावर न्यायालयाने १३ एप्रिल पर्यँत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या बिटकॉइन फसवणूक प्रकरणी देशभरात तीन गुन्हे दाखल असून त्यातील दोन गुन्हे निगडी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती देण्यात आली.

 

आमचा उकिरडा करू नका .. 11 गावांतील ‘त्यांची’ ओरड…

0

 

पुणे-आमचा उकिरडा करू नका .. “महापालिकेत येऊन फायदा काहीच झालेला नाही, पण उलटपक्षी गावचा कारभार थांबला. महापालिकेपेक्षा आमचे गाव बरे म्हणण्याची वेळ आली,’ अशा शब्दांत समाविष्ट 11 गावांमधील ‘त्या’ म्होरक्यांनी महापालिकेच्या सभागृहात ओरड केली . तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावात पायाभूत सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. परंतू ते आश्वासन आजवर पाळले गेले नाही. त्यामुळे या दोन गावांना दिलेली आश्वासने पुर्ण करा अन्यथा येत्या 20 एप्रिलपासून पुणे शहराचा कचरा येऊ देणार नाही, असा इशारा फुरसुंगी ग्रामस्थांनी दिला.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी पालिकेच्या मुख्य सभागृहात महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला पालिकेचे अधिकारी आणि समाविष्ट गावातील नेतेमंडळी व नागरिक उपस्थित होते

शहराची घाण आमच्या माथी का मारता, असा प्रश्‍न उपस्थित करत फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी या बैठकीत संताप व्यक्त केला. तसेच महापालिकेच्या हद्दीत फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांचा समावेश केल्याने कचरा डेपो विरोधातील लढा थांबेल, किंवा गावांचा समावेश केल्यांने आंदोलन होणार नाही, असे समजू नका असा इशारा फुरसुंगी गावातील नागरिकांनी दिला आहे. कचरा डेपो अन्यत्र हलवेपर्यंत कचर्‍याच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शहराच्या विविध भागांत कचरा विघटन प्रकल्प कार्यान्वीत करून टप्या-टप्याने फुरसुंगीचा कचरा डेपो बंद करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील युवकांना महापालिकेत नोकरी देण्याचे आश्‍वासनही दिले होते. नोकरी दिलेल्यांना सहा महिन्यात कामावरून काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. त्यांनी एकप्रकारे आमची फसवणुकच केली आहे. गावातील विकासकामे करण्यसाठी त्वरीत निवीदा प्रक्रीया राबवावी, अन्यथा 20 एप्रिलपासून शहराचा कचरा फुरसुंगी कचरा डेपोकडे येऊ दिला जाणार नाही, असा ईशारा यावेळी फुरसुंगी ग्रामस्थांनी दिला.

फुरसुंगीचे संजय हरपळे म्हणाले, “”गावकऱ्यांनी लाखो रुपयांचा कर भरला पण, एक एस्केव्हेटर (जीबी) किरकोळ कारणावरून बंद आहे. अशी कामे करता येत नसेल, आम्ही महापालिकेत का घेतले ? डेपोत टप्प्या-टप्प्याने कचरा बंद करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याचे काय झाले ? “गावकऱ्यांच्या मागण्या केवळ कागदांवर ठेवल्या जातात. त्यांची पूर्तता करा, अन्यथा पंधरा दिवसांत गावकारी पुन्हा आंदोलनाची पवित्रा घेतील. कचरा डेपोबाबतची भूमिका स्पष्ट न केल्यास डेपोत कचरा येऊ देणार नाही,” अशा शब्दांत संजय हरपळे यांनी इशारा दिला .

उंड्रीचे सचिन घुले म्हणाले, “गावांचा विकास होईल, चांगल्या सेवा मिळतील, ही आशा खोटी ठरली. एकाही समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तेव्हा गावांत महापालिकेची राजवट का आणली ? नवे शैक्षणिक वर्षे सुरू होणार आहे. त्यामुळे शाळांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.’

शंकर हरपळे, श्रीरंग चव्हाण, दीपक बेलदरे, आशा बेनकर, संदीप तुपे, किशोर पोफळे, विकास कामठे, सुनील शिंदे यांनीही आपल्या भाषणात महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, “”गावांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. त्यानुसार पायाभूत सुविधा प्राधान्य असेल. शैक्षणिक वर्षे सुरू होण्याआधी नियोजन करू.” 

गहुंज्याला १८ लाखापासून फ्लॅट- 50 एकर क्षेत्रात विस्तारलेला प्रकल्प पेनिन्सुला लँडचा प्रकल्प

0

पुणे: पेनिन्सुला लँड लिमिटेड या अशोक पिरामल समूहाचा भाग असलेल्या आघाडीच्या कॉर्पोरेट रिअल इस्टेट विकसकाने पुण्यातील गहुंजे येथे `अॅड्रेसवन` प्रकल्पाद्वारे परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीमध्ये प्रवेश केल्याचे आज जाहीर केले. 50 एकरांमध्ये विस्तारलेला, अॅड्रेसवन प्रकल्प मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पुण्याच्या बाजूला, एमसीए क्रिकेट स्टेडियमच्या बाजूला, मोक्याच्या ठिकाणी वसला आहे.

आलिशान आणि परवडणारे अशी दोन्ही वैशिष्ट्ये असलेले घर उपलब्ध करून, संभाव्य घर ग्राहकांना ‘लक्झरी फॉर ऑल’ घरे देण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, कंपनी अंदाजे 1000 युनिट उपलब्ध करणार असून त्यामध्ये चार मजल्यांच्या 51 इमारतींचा समावेश असेल व प्रत्येक मजल्यावर फक्त चार अपार्टमेंट असतील. पेनिन्सुला लँडचा हा पुण्यातील पहिला परवडणारा लक्झरी प्रकल्प आहे. त्यापूर्वी कंपनीने हिंजवडी येथे अशोक मिडोज हा अत्यंत यशस्वी प्रकल्प पूर्ण केला. हा प्रकल्प नामवंत आर्किटेक्ट हाफीझ काँट्रॅक्टर यांनी आखला आहे व त्यास पीएमएवायची (प्रधान मंत्री आवास योजना) मंजुरी मिळाली आहे.

पेनिन्सुला लँड लि.ने भागीदार म्हणून अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सची निवड केली आहे. मुबंई पुणे एक्स्प्रेसवेपासून जवळच असलेल्या या प्रकल्पाचे ठिकाण अतिशय मोक्याचे असून ते हिंजवडीशी सहजपणे जोडले जाणारे आहे, म्हणजेच हिंजवडीपासून 10 किमीपेक्षाही कमी अंतरावर आहे.

पेनिन्सुला लँड लि.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव पिरामल म्हणाले, “लक्झरी घरांच्या क्षेत्रातील आमचा दीर्घ अनुभव व कौशल्य परवडणाऱ्या घरांसाठी वापरण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. त्यामुळे अॅड्रेसवन प्रकल्पाची घोषणा करणे ही व्यक्तिशः माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या दृष्टीने परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रामध्ये आज प्रचंड संधी असून या क्षेत्रासाठी सध्या कमालीची मागणी आहे. परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

​ ​पेनिन्सुला लँड ‘हाउसिंग फॉर ऑल’ या तत्त्वावर भर देते आणि हेच तत्त्व ‘लक्झरी फॉर ऑल’ या विचारालाही लागू करण्यासाठी वाव असल्याचे कंपनीला वाटते. अॅड्रेसवनच्या निमित्ताने आम्ही ग्राहकांना अतिशय आलिशान घरे परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करणार आहोत.”

या भागीदारीविषयी बोलताना, अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्स प्रा. लि.चे अध्यक्ष अनुज पुरी यांनी नमूद केले, “लक्झरी श्रेणीतील मैलाचे टप्पे ठरतील अशा प्रकल्पांसाठी गौरवल्या जाणाऱ्या पेनिन्सुला लँड या समूहाशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. परवडणाऱ्या घरांच्या बाबतीत लक्झरी घटकांचा समावेश करणाऱ्या या प्रकल्पाबाबत आम्ही विशेषतः उत्सुक आहोत. परवडणारे दर असलेल्या ‘लक्झरी फॉर ऑल’ घरांसाठी असंख्य ग्राहक उत्सुक असल्याचे आम्ही सुरुवातीला केलेल्या संशोधनामध्ये आढळले आहे. पुण्यातील या परिसरामध्ये झपाट्याने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, येत्या काही वर्षांत दरांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने गहुंजे येथे प्रचंड संधी आहे. तसेच, या घरांसाठी केवळ पुण्यातूनच नाही, तर मुंबईतून व महाराष्ट्राच्या अन्य भागांतूनही मोठी मागणी आहे.”

मुंबईपासून नजिक असल्याचा फायदा पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला झाला आहेच, शिवाय आयटी/आयटीईएस, उत्पादन व सेवा उद्योगांतील विविध घटकही या क्षेत्राला चालना देत आहेत. परंतु, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेले बांधकाम व जागेची चणचण असलेल्या परिसरांमध्ये वेगाने वाढत असलेले दर यामुळे पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने वाढ होत असलेल्या गहुंजे यासारख्या परवडणाऱ्या भागांत निवासी घरांसाठी मागणी वाढते आहे. रिअल इस्टेट हा क्षेत्र दराच्या बाबतीत कमालीचे संवेदनशील आहे आणि परवडणाऱ्या घरांना सध्या सर्वोच्च मागणी आहे.

शहर सुधारणा समिती चे अध्यक्षपद सुशील मेंगडेंकडे….

0

पुणे : पुणे महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नव्या चेहऱ्यांना  संधी दिली असून, या समित्यौपकी महत्त्वाच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदाची माळ तरुण नगरसेवक सुशील मेंगडे यांच्या गळ्यात पडणार आहे.भाजपच्या जुन्या निष्ठावंत परिवारातील सध्याची तरुणाई म्हणून सुशील मेंगडे यांच्याकडे पाहिले जाते .

 महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी नगरसेविका राजश्री नवले यांना संधी मिळाली आहे. तर, विधी समितीकरिता माधुरी सहस्त्रबुध्दे आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल भंडारे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे, चारपैकी तीन समित्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाजपने पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांवर सोपविली आहे.

  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करून ही नावे निश्‍चित केल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या विषय समित्यांची मुदत संपल्याने त्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपसाठी येत्या नऊ एप्रिलला निवडणूक होत आहे. त्यासाठी मेंगडे, नवले, भंडारे आणि सहस्त्रबुध्दे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. सभागृहातील संख्याबळानुसार चारही समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे. समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी इच्छुकांनी मार्चेबांधणी केली होती. त्यामुळे या पदांसाठी भाजप कोणाला संधी देणार, याबाबत पक्ष वर्तुळात उत्सुकता होती.

त्यात शहर सुधारणासाठी मेंगडे यांचे, तर महिला व बालकल्याण समितीसाठी नवले यांचे नाव पक्षाने निश्चित केले आहे. क्रीडा समितीसाठी भंडारे यांच्या नावाला पसंती मिळाली. हे तीनही सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत. विधी समितीसाठी अर्ज भरलेल्या सहस्त्रबुध्दे दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. या आधी मेंगडे यांच्याकडे वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीचे अध्यक्षपद होते. 

शहर सुधारणा समितीच्या उपाध्यक्षपासाठी अजय खेडेकर, महिला व बालकल्याण समितीसाठी दिशा माने, क्रीड समितीच्या साठी  जयंत भावे तर विधी समितीच्या उपाध्यक्षपसाठी विजय शेवाळे यांनी अर्ज भरला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसतर्फे शहर सुधारणा समितीसाठी भैय्यासाहेब जाधव, लक्ष्मी आंदेकर, महिला व बालकल्याण समिती परवीन शेख, चांदबी नदाफ, क्रीडा समितीसाठी वनराज आंदेकर, अशोक कांबळे यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. 

आयएमईडीला 40 वर्षे पूर्ण … पत्रकार परिषदेत समाजाभिमुख उपक्रमांची घोषणा

0
पुणे:‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) ला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. भारती विद्यापीठ संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांचा मासिक स्मृतीदिन 9 एप्रिल रोजी असून, या दिवशी त्यांच्या स्वप्नपूर्तिच्या उपक्रमांना आयएमईडीमध्ये सुरवात करण्यात येणार आहे, अशी माहिती आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही पत्रकार परिषद गुरूवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आली होती.
स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचा उत्कृष्ट दर्जा आणि रोजगाराच्या सुवर्णसंधी यावर संस्थेने सातत्याने भर दिला. शिक्षणक्षेत्र आणि समाजघडण यांच्यातील तफावत लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिक्षणक्षेत्र व समाजसेवा यांचा समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे,’ असे डॉ. सचिन वेर्णेकर यांनी सांगीतले.
‘येत्या शैक्षणिक वर्षामध्ये प्र-कुलगुरू डॉ.शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पदव्या प्राप्त विद्यार्थ्यांची समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती जतन व्हावी, समाजाशी-कुटुंबाशी त्यांची नाळ जोडलेली रहावी यासाठी फॅमिली बाँडिंग, फॅमिली हार्मनी तसेच नितीमूल्य जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील इतर काही शहरांमध्ये उद्योजकता विकास शिबीरे आयोजित करण्यात येतील.
छोटे उद्योग करणाऱ्या समाजातील विविध स्तरांवरील व्यक्तींना त्यांच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी व इतरही अनेक उद्देश ठेऊन मार्गदर्शन देण्यात येणार आहेत. समाजोपयोगी व्याख्यानमाला, ग्राहक बाजार चे नियोजन आहे. प्रदुषण मुक्त पर्यावरणाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिने ‘नो प्लास्टिक-गो ग्रीन’असे कार्यक्रम राबविले जातील. टी.सी.एस. कंपनीबरोबर करार करून बीबीए चा नवीन उपक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख असे या कोर्सचे स्वरूप असेल.
इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये विविध कंपन्यांचे अधिकारी, यशस्वी उद्योजक, विद्यापीठांचे कुलगुरू व विद्यार्थी यांचा समावेश असेल.  सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे सायबर सिक्युरीटीविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी व्याख्यानसत्र, रस्ता -सुरक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान असे कार्यक्रमदेखील नियोजनात आहेत.
डॉ. वेर्णेकर म्हणाले,‘भारती विद्यापीठाच्या प्रांगणात 1978 साली स्थापन झालेली आयएमईडी ही संस्था आज व्यवस्थापन, संगणकशास्त्र व संशोधनक्षेत्रात 40 वर्षे अखंड योगदान देत आहे. म्हणूनच आज ही संस्था भारतातील अतिशय नावाजलेल्या संस्थांमध्ये गणली जात आहे. तसेच ‘एनआयआरएफ( मिनीस्ट्री ऑफ एच आर डी गव्हर्मेंट ऑफ इंडिया’)च्या वतीने सतत 3 वर्षे ही संस्था पहिल्या 50 इन्स्टिट्यूटमध्ये आहे. पश्चिम भारतातील बी-स्कूलमध्ये देखील नामांकित आहे. ‘नॅक’ने ए + श्रेणी प्रदान केलेली ही संस्था आहे.
गेल्या 40 वर्षांमध्ये शिक्षणक्षेत्रच नव्हे तर बँक, कला, क्रीडा, उद्योगसमूह, ग्राहक बाजारपेठ अशा अनेक माध्यमांतून इन्स्टिट्यूटचे विद्यार्थि  कार्यरत आहेत