पुणे:‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) ला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. भारती विद्यापीठ संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांचा मासिक स्मृतीदिन 9 एप्रिल रोजी असून, या दिवशी त्यांच्या स्वप्नपूर्तिच्या उपक्रमांना आयएमईडीमध्ये सुरवात करण्यात येणार आहे, अशी माहिती आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही पत्रकार परिषद गुरूवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आली होती.
स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचा उत्कृष्ट दर्जा आणि रोजगाराच्या सुवर्णसंधी यावर संस्थेने सातत्याने भर दिला. शिक्षणक्षेत्र आणि समाजघडण यांच्यातील तफावत लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिक्षणक्षेत्र व समाजसेवा यांचा समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे,’ असे डॉ. सचिन वेर्णेकर यांनी सांगीतले.
‘येत्या शैक्षणिक वर्षामध्ये प्र-कुलगुरू डॉ.शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पदव्या प्राप्त विद्यार्थ्यांची समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती जतन व्हावी, समाजाशी-कुटुंबाशी त्यांची नाळ जोडलेली रहावी यासाठी फॅमिली बाँडिंग, फॅमिली हार्मनी तसेच नितीमूल्य जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील इतर काही शहरांमध्ये उद्योजकता विकास शिबीरे आयोजित करण्यात येतील.
छोटे उद्योग करणाऱ्या समाजातील विविध स्तरांवरील व्यक्तींना त्यांच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी व इतरही अनेक उद्देश ठेऊन मार्गदर्शन देण्यात येणार आहेत. समाजोपयोगी व्याख्यानमाला, ग्राहक बाजार चे नियोजन आहे. प्रदुषण मुक्त पर्यावरणाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिने ‘नो प्लास्टिक-गो ग्रीन’असे कार्यक्रम राबविले जातील. टी.सी.एस. कंपनीबरोबर करार करून बीबीए चा नवीन उपक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख असे या कोर्सचे स्वरूप असेल.
इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये विविध कंपन्यांचे अधिकारी, यशस्वी उद्योजक, विद्यापीठांचे कुलगुरू व विद्यार्थी यांचा समावेश असेल. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे सायबर सिक्युरीटीविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी व्याख्यानसत्र, रस्ता -सुरक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान असे कार्यक्रमदेखील नियोजनात आहेत.
डॉ. वेर्णेकर म्हणाले,‘भारती विद्यापीठाच्या प्रांगणात 1978 साली स्थापन झालेली आयएमईडी ही संस्था आज व्यवस्थापन, संगणकशास्त्र व संशोधनक्षेत्रात 40 वर्षे अखंड योगदान देत आहे. म्हणूनच आज ही संस्था भारतातील अतिशय नावाजलेल्या संस्थांमध्ये गणली जात आहे. तसेच ‘एनआयआरएफ( मिनीस्ट्री ऑफ एच आर डी गव्हर्मेंट ऑफ इंडिया’)च्या वतीने सतत 3 वर्षे ही संस्था पहिल्या 50 इन्स्टिट्यूटमध्ये आहे. पश्चिम भारतातील बी-स्कूलमध्ये देखील नामांकित आहे. ‘नॅक’ने ए + श्रेणी प्रदान केलेली ही संस्था आहे.
गेल्या 40 वर्षांमध्ये शिक्षणक्षेत्रच नव्हे तर बँक, कला, क्रीडा, उद्योगसमूह, ग्राहक बाजारपेठ अशा अनेक माध्यमांतून इन्स्टिट्यूटचे विद्यार्थि कार्यरत आहेत