Home Blog Page 3162

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विश्‍वरत्न म्हणून जगात ओळख

0

प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा.कराड यांचे मतः एमआयटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
पुणे:“ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासलेल्या समाजाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी देशात सत्याग्रह केला. मागासलेल्या समाजातील अपृश्यता दूर करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना देशात व जगात विश्‍वरत्न म्हणून आज ओळखले जातेे.” असे उद्गार एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी काढले.
एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे व विश्‍वशांती केंद्र(आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे, माईर्स एमआयटीचे उपकुलसचिव श्री. अभय बिरारी, डॉ.ए.ए. कुलकर्णी, प्रा. सुब्रह्मण्यम, विद्यार्थी जगन्नाथ वणवे, श्रीनिवास चक्रार्या, व भाग्यश्री पगार हे उपस्थित होते.
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ आपल्या देशात महात्मा गांधी, वि.दा. सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. या महापुरूषांच्या चरित्रांचे व ग्रंथांचे वाचन करुन ते आचरणात आणले, तर समाजात परिवर्तन होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष करुन अपृश्यता दूर करण्याचे काम केले आहे.”
प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील म्हणाले,“ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशात व जगात पूजा केली जात आहे. नुसते फोटो किंवा पुतळे उभारुन चालणार नाही. त्यांनी समाजाला दिलेला विचार आचरणात आणला पाहिजे. खरे म्हणजे पूजा ही विचारांची करावी. जात-पात विसरुन कार्य केल्यास समाजाची उन्नती होईल.”
प्रा. दीपक आपटे म्हणाले,“ घटनेवर श्रद्धा ठेऊन त्याचे पालन करावे. उल्लंघन करु नये. तन, मन व धनाने अभ्यास करावा. तेच खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल.”
जगन्नाथ वणवे म्हणाला,“ डॉ. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणल्यास समाजाचा व देशाचा सर्वांगीण विकास होईल. चांगल्या विचारातूनच समाजाची उन्नती होते.”
श्रीनिवास चक्रार्या म्हणाला,“ सर्व मानव जात एक आहे. जर समाजामध्ये एकतेची भावना रूजवली गेली, तर समाज एक संघ होऊ शकतो. तेच काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. त्यांचा आदर्श आपण तरुण पिढीने घ्यावा.”
भाग्यश्री पगारे म्हणाली,“आपण प्रत्येकजण जाती बद्दल बोलत असतो. पण तो विचार प्रत्येकाच्या मनात कोठे तरी घर करुन बसलेला असतो. जर जात हद्दपार केली तरच संपूर्ण मानव जातीचे कल्याण होईल. प्रत्येकाने मानव हीच जात व मानवता हाच धर्म मानावा.”
या प्रसंगी डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले.
माईर्स एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचार्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

‘व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर ग्राहक गमावू नका’ मसालाकिंग डॉ. धनंजय दातार

0

पुणे : “सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या काळात ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ग्राहकांना योग्य माहिती व सौजन्यपूर्ण वागणूक न मिळाल्यास ते इतरत्र जातात आणि त्यातून आणखी दहा संभाव्य ग्राहक दुरावण्याचा धोका असतो. त्यामुळे व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर सातत्याने नवे ग्राहक आकर्षित करणे व जोडलेले ग्राहक टिकवून ठेवणे, याची कसोशीने काळजी घ्यावी,” असा सल्ला अल अदील समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी काल येथे नवउद्योजकांना दिला.

‘मराठी युवा उद्योजक उद्योगिनी सेवाभावी संस्था, महाराष्ट्र’तर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘खासा २०१८’ या उद्योग प्रदर्शन-विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दातार यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी टिळक स्मारक मंदिरात प्रसिद्ध निवेदिका सौ. उत्तरा मोने यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

डॉ. दातार म्हणाले, “विक्रेत्यांची बाजारपेठ (सेलर्स मार्केट) आणि खरेदीदारांची बाजारपेठ (बायर्स मार्केट) असे दोन प्रकार आहेत. विक्रेत्यांचे नियम, शैली व मर्जीनुसार चालणारी बाजारपेठ सेलर्स मार्केट असते तर ग्राहकांच्या गरजा व अपेक्षा ओळखून चालणारी बाजारपेठ बायर्स मार्केट असते. विकसित देश सध्या बायर्स मार्केट आहेत आणि उर्वरित जगाचा प्रवासही त्याच दिशेने सुरु आहे. व्यावसायिकाला यश आणि प्रसिद्धी त्याचे ग्राहक मिळवून देतात, हा माझा अनुभव आहे. मी व्यवसाय करताना नेहमी ‘डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर’ (संयम आणि सौजन्य) या तंत्राचा वापर केला. त्याचवेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादने शुद्ध, स्वच्छ व सुरक्षित असतील याची काळजी घेतली. ग्राहकांना वस्तू हाताळायला व स्वतः निवडायला आवडतात, हे ओळखून साध्या दुकानांचे रुपांतर सुपर स्टोअर्समध्ये केले. दुबईतील एका छोट्या दुकानापासून सुरवात करुन आखाती देशांमध्ये ३९ सुपर स्टोअर्सची विस्तारण्यामागे संतुष्ट ग्राहक हेच कारण आहे.”

उद्यमशील तरुणाईला व्यवसायाचे महत्त्वपूर्ण कानमंत्र देताना ते म्हणाले, “कोणताही नवा व्यवसाय स्थिरावायला तीन वर्षे लागतात. तान्ह्या बाळाप्रमाणेच व्यवसायाचे संगोपन करावे लागते आणि नंतरही व्यवसायावर बारीक लक्ष ठेवावे लागते. नजर हटी तो दुर्घटना घटी, हे रस्त्यावरील इशारादर्शक वाक्य व्यवसायालाही लागू होते. सध्याचा काळ तीव्र स्पर्धेचा असल्याने मनात इर्ष्या ठेऊन व्यवसाय करावा. उलाढालीपेक्षा पदरात नफा किती पडतो, यावर श्रीमंती अवलंबून असते. त्यामुळे महत्त्व नफ्याला द्यावे. व्यवसाय ही कुठल्याही समाजाची मक्तेदारी नसते. देवाने प्रत्येकाला समान बुद्धी दिलेली आहे. त्याला कष्ट व प्रामाणिकपणाची जोड दिल्यास कुणीही व्यवसायात प्रगती करु शकतो.”

ते पुढे म्हणाले, “व्यवसायात  ‘जो दिखता है वो बिकता है’ हे तत्त्व म्हणजेच दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) फार महत्त्वाची असते. अगदी उद्योजकाचे व्यक्तीमत्त्व, व्यवसायस्थळाची रचना व सौंदर्य, उत्पादनाची मांडणी व पॅकेजिंग, प्रसिद्धी या सगळ्यात त्याचे प्रतिबिंब पडते. म्हणून उद्योजकांनी केवळ उत्पादनांचेच नव्हे तर आपल्या व्यवसायाचे व स्वतःचेही ब्रँडिंग करावे. परिवर्तन संसार का नियम है या वचनानुसार कालसुसंगत बदल घडवावेत. व्यवसायात समस्या येतात आणि त्यातील केवळ पाच टक्के समस्या शांत राहून आपोआप सुटतात. उर्वरित ९५ टक्के समस्या आपल्याला तटवाव्या लागतात. समस्यांना घाबरु नये. उलट आपण समस्येपेक्षा मोठे व्हावे. कोणत्याही स्थितीत व्यवसायातून पाय मागे घेणार नाही, ही जिद्द बाळगावी, सर्वांत महत्त्वाचे आरोग्याकडे दुर्लक्ष करुन निव्वळ पैशाच्या मागे लागू नये. घाम गाळून मिळवलेला पैशाचा कुटुंबासमवेत आनंद घ्यावा.”

मुलाखतीदरम्यान डॉ. दातार यांनी आजवरचा आपला संघर्षमय प्रवास उलगडून सांगितला. बालपणातील गरिबीचे दिवस, तरुण वयात दारोदार फिरुन घेतलेला विक्रीकलेचा अनुभव, व्यवसायात पहिल्याच वर्षी झालेले प्रचंड नुकसान, ते भरुन काढण्यासाठी आईने मंगळसूत्र विकून जागवलेला निर्धार, दुबईतील कष्टमय वाटचाल, इराक-कुवेत युद्धादरम्यान उद्भवलेले धंदा बुडण्याचे संकट, व्यवसायातील प्रगतीसाठी पत्नीची झालेली अनमोल मदत असे अनुभव विशद केले.

‘मराठी युवा उद्योजक उद्योगिनी सेवाभावी संस्था, महाराष्ट्र’चे सुनील दातार यांनी धनंजय दातार यांचे तर आशिष संकपाळ यांनी सौ. वंदना दातार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमात मराठी चेंबर ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांचे, तसेच डॉ. सुनील काळे यांचे यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. कार्यक्रमात डॉ. अंजली चौगुले (मॉडेलिंग), मनाली पाळंदे (पाळंदे टेक सोल्यूशन्स), मिलिंद आपटे (चित्रकार), नितीन ढेपे (पर्यटन), नवनाथ येवले (येवले अमृततुल्य) या पाच उद्योजकांना यशस्वी मराठी उद्योजकता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. योगिता बडवे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

पुण्याच्या आत्मीय आठवणी

पुणे शहराबाबतच्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना डॉ. दातार म्हणाले, “सन १९९६ मध्ये मी कराडवरुन मुंबईला येत असताना शिरवळजवळ माझ्या कारला एका ट्रकने जबरदस्त धडक दिली होती. त्या अपघातात मी, माझी पत्नी व चालक बेशुद्ध झालो तर माझा एक वर्षाचा मुलगा दुखापत होऊन रडत होता. आम्ही सर्वजण दरवाजे लॉक झाल्याने गाडीत अडकलो होतो आणि गाडीने बाहेरुन पेट घेतला होता. त्यावेळी पुण्यातील एक मारवाडी सद्गृहस्थ तेथून चालले होते. त्यांनी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून तातडीने धाव घेतली व काचा फोडून आम्हाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. बरा झाल्यावर मी माझी अपघातग्रस्त कार पुण्यातील गॅरेजमध्ये दुरुस्तीला टाकली. त्यानंतर विमा भरपाईच्या पूर्ततेसाठी मला सतत मुंबईहून पुण्याला यावे लागायचे. पुण्यात उत्तम आणि रुचकर खाद्यपदार्थ मिळत असल्याने मी या फेऱ्यांत अशा पदार्थांचा मनापासून आस्वाद घ्यायचो.”

५ हजार विद्यार्थ्यांची अभिवादन मिरवणूक !

0
पुणे :

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस )च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ५ हजार विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते . मिरवणुकीचे उद्घाटन ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता  झाले . संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले . मिरवणुकीचे हे 14 वे वर्ष होते .
राज्यघटनेची प्रत तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांना सुपूर्द करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील बैलगाडीवरील जिवंत देखावा हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले . या देखाव्यात पंडित जवाहरलाल नेहरू ,वल्लभभाई पटेल ,राजगोपालाचारी ,मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी होते .
 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे फलक विद्यार्थी -विद्यार्थीनिनी हाती घेतले होते . जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ आंबेडकर पुतळ्याजवळ एड . प्रकाश आंबेडकर ,महापौर मुक्ता टिळक ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी या अभिवादन मिरवणुकीचे स्वागत केले .
संस्थेतील अल्पसंख्यक, ओबीसी, बीसी आणि सर्व धर्मातील विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले .
दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल – ताशा यांचा मिरवणुकीत समावेश होता
आझम कॅम्पस येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, जुना मोटार स्टँड, पद्मजी पोलीस चौकी, भारत सिनेमा, ए. डी. कॅम्प चौक, मॉडर्न बेकरी चौक, संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषद, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली
मिरवणुकीत शाहीद इनामदार,वाहिद बियाबानी, शाहीद मुनीर शेख, अब्दुल वहाब, प्रा. इरफान शेख, प्रा. मुझफ्फर शेख, डॉ. शैला बूटवाला, प्रा. अनिता फ्रान्झ, प्रा.रबाब खान, प्रा.शाहीन शेख, डॉ. किरण भिसे, डॉ.व्ही.एन. जगताप, प्रा. मुमताझ सय्यद, मसकूर चाँद शेख, सिकंदर पटेल, सहभागी झाले.
दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

आंबेडकर -गांधी यांच्यात वैमनस्य नव्हते :तुषार गांधी

0
पुणे :’ बापू आणि बाबासाहेब यांच्या विचारात वैमनस्य  नाही ,दोघांच्या डोळ्यासमोर मागास जनतेच्या पुनरुत्थानाचाच विचार होता ,दोघांच्यात वैमनस्य असते तर संविधानाच्या निर्मितीसाठी महात्मा गांधींनी बाबासाहेबांची निवड केली नसती आणि बाबासाहेबांच्या मनात द्वेष असता तर गांधींच्या प्रस्तावाचा स्वीकार केला नसता ‘असे ठाम प्रतिपादन महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी येथे केले .
ज्या शक्तींनी बापूना मारले आणि बाबासाहेबांना बाजूला केले ,सध्या त्याच  शक्ती आंबेडकरांच्या नावात आतापर्यंत नसलेला राम जोडत आहेत . त्यांच्या मनातील डाव ओळखून त्यावर मात केली पाहिजे . बापूंचा राष्ट्रविचार आणि बाबासाहेबांच्या संविधान विचाराला याच शक्ती चूड लावू पाहत आहेत . लोकशाही व्यवस्स्था,न्यायालये खिळखिळी करण्याचे काम चालू आहे .  त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही ,कि नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ ,याची काळजी आहे . पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल कि नाही याचीही काळजी वाटत आहे  ,असेही ते म्हणाले .
घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ;क्रांतीज्योती ‘संस्था आयोजित ”वैचारिक भीमजयंती ‘ कार्यक्रमात तुषार गांधी बोलत होते . अन्वर राजन ,डॉ सिद्धार्थ धेंडे ,एड . वैशाली चांदणे ,डॉ . अमोल देवळेकर ,उमेश चव्हाण,विठ्ठल गायकवाड  व्यासपीठावर उपस्थित होते .
जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात हा कार्यक्रम शुक्रवारी रात्री ९ वाजता झाला . तुषार गांधी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला .
तुषार गांधी म्हणाले ,’जात ,धर्म ,प्रदेश ,लिंग अशा विघटनवादी घटकांमध्ये आपण विभागले गेलो आहोत . अशातच गांधी विचार आणि आंबेडकरवादी विचार वेगळे असल्याची आवई उठवली जाते . त्यात तथ्य नाही . दोघांच्या डोळ्यासमोर या राष्ट्राच्या कल्याणाचा आणि सामान्य जनतेच्या पुनरुत्थानाच्या विचार होता .
लोकशाही व्यवस्स्था,न्यायालये खिळखिळी करण्याचे काम चालू आहे .  त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही ,कि नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ ,याची काळजी आहे . पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल कि नाही याचीही काळजी वाटत आहे
अशावेळी विघटनवादी विचारांवर मात करण्यासाठी सर्व समविचारी व्यक्ती ,संस्थांनी एकत्र येऊन क्रांतीचा लढा दिला पाहिजे
वैशाली चांदणे यांनी प्रास्ताविक केले . डॉ अमोल देवळेकर यांनी सूत्रसंचालन केले .

भुजबळांच्या सुटकेबाबत पंकजा मुंडेंचे संकेत ? (व्हिडीओ)

0

माढा: मला न्याय देण्याचा अधिकार असता तर छगन भुजबळांबाबत वेगळा न्याय दिसला असता, असे विधान ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथील माळी समाजाच्या मेळाव्यात बोलताना केले.दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनातील भाषणातून बोलताना अजित पवार यांनीही लवकरच भुजबळ परत येतील असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्यानंतर झालेल्या पंकजा  मुंडे यांच्या भाषणातील काही वाक्यांनी भुजबळांच्या सुटकेबाबत संकेत मिळत आहेत कि काय ? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होऊ पाहतो आहे.

संत सावता  माळी यांच्या जन्मगावी अरण येथे आज ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी सावता माळी यांचे  दर्शन घेतले. आणि  माळी समाज बांधवांचा मेळाव्यात भाषण केले . यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळांना न्याय देण्याचा अधिकार असता तर त्यांच्या बाबतीत मी निश्चित दिला असता ,असे स्पष्ट केले. पंकज भुजबळ व माझे चांगले संबंध आहेत. त्यांना मदत केली आहे.भुजबळ साहेबांनी मला जेल मधून पत्र लिहिले आणि त्यांच्या  मागणीनंतर तातडीने आपण  निधी दिल्याचेही त्यांनी जाहीर सभेत सांगितले.
मेळाव्याच्या निमित्ताने सर्वच पक्षातील माळी समाजातील नेत्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळांचा राजकीय बळी घेतल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळांवरील आपले प्रेम व्यक्त करत त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. मंत्री मुंडे यांच्या उपस्थित झालेल्या या मेळाव्यात सरकारने छगन भुजबळांची सुटका करावी या मागणीचा हात उंचावून ठराव देखील केला. पंकजा मुंडे तुमची लेक आहे, मला तुम्ही दत्तक घ्या असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यास आमदार अतुल सावे, मनिषा चौधरी, आयोजक कल्याण आखाडे, भास्कर अंबेकर, शंकर बोरकर, बाळासाहेब माळी आदी व्यासपाठीवर उपस्थित होते.

संभाजी भिडेंना रोखा, अन्यथा महाराष्ट्राचा कठुआ – उन्नाव होईल – तुषार गांधी

0

मुंबई-संभाजी भिडेंना रोखा नाहीतर महाराष्ट्रात कठुआ व उन्नावसारख्या घटना घडतील अशी भीती समाजसेवक तुषार गांधी यांनी व्यक्त केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंचा काय संबंध होता याची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी करताना मुख्यमंत्री त्यांना कशी काय क्लीन चीट देऊ शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

उन्नाव व कठुआ येथे घडलेल्या भयानक घटनांचा दाखला देत तुषार गांधी व माजी पोलीस अधिकारी शिरीष इनामदार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महाराष्ट्रासह देशामध्ये विखारी विचारसरणी लोकांच्या मनामध्ये भिनवली जात असल्याचा आरोप केला. ज्यावेळी राजकीय उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी अन्य समाजाच्या संदर्भात लोकांच्या मनात विष पेरलं जातं त्यावेळी उन्नाव व कठुआसारख्या घटना घडतात असं इनामदार म्हणाले. त्याचप्रमाणे संभाजी भिडे यांची नि:पक्षपाती चौकशी पोलीस यंत्रणांनी करायला हवी आणि त्याचा अहवाल द्यायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कुठल्याही प्रकरणात क्लीन चीट पोलीस किंवा न्याय यंत्रणा देऊ शकते, मग याच प्रकरणी मुख्यमंत्री कसे काय क्लीन चीट देतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

गुप्तचर यंत्रणांचं पहिलं अपयश

भीमा कोरगाव प्रकरणी दोन अडीच महिन्यांपासून वातावरण तापवलं जातं, हजाराच्या वर तरूण जमतात, त्यातलेच 250 जण दुसऱ्या ठिकाणी रवाना होतात आणि या सगळ्याचा गुप्तचर यंत्रणांना पत्ता असू नये हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याची टीकाही इनामदार यांनी केली. अशा प्रकारचं अपयश हे महाराष्ट्रातलं पहिलंच असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पश्चिम महाराष्ट्रात हिंदू राष्ट्रवादाचा विखारी प्रसार करण्यात आला असून कठुआ व उन्नावप्रमाणे महाराष्ट्रातही असे प्रकार घडायला नको असतील तर आत्ताच सतर्क रहायला हवं, अशी भीती गांधी यांनी व्यक्त केली आहे. संभाजी भिडे हे अशा प्रचारात अग्रणी असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी अशी आपली ठाम मागणी असल्याचे गांधी म्हणाले. कारवाई राहिली बाजुला भिडेंसारख्यांना राजकीय वरदहस्त लाभत असल्याचे सांगत ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे गांधी म्हणाले.

महाराष्ट्र सरकार जर भिंडेवर कारवाई करत नसेल तर तुम्ही कोर्टाचा मार्ग स्वीकारणार या प्रश्नावर अद्याप तरी असा काही विचार केला नसल्याचे व सध्या अराजकीय व्यक्तिंनी दडपण आणण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेण्याची गरज- आमदार भीमराव तापकीर

0

पुणे-“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःसह समाजाचा उत्कर्ष साधला. आपल्या विकासात शिक्षणाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. ‘वाचाल तर वाचाल’ हा मूलमंत्र ध्यानात घेऊन वाचन करत बाबासाहेबांचे विचार आत्मसात करायला हवेत” असे मत आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ या उपक्रमाअंतर्गत महापुरुषांची १० हजार चरित्र पुस्तके वाटण्यात येणार आहेत. नालंदा विहार, पद्मावती येथे झालेल्या या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी भीमराव तापकीर बोलत होते. यासाठी बनविण्यात आलेल्या ‘छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथा’चे फीत कापून त्यांनी उद्घाटन केले.

याप्रसंगी चाटे शिक्षण समूहाचे प्रा. फुलचंद चाटे, आरपीआय नेते महेश शिंदे, स्थानिक नगरसेवक महेश वाबळे, आरपीआयचे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, सचिन गजरमल, पत्रकार नंदकिशोर शहाडे,संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत कांबळे, सल्लागार दत्ता पवार, युवा अध्यक्ष विकास कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पद्मावती, दत्तनगर परिसरातील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटण्यात आली.

भीमराव तापकीर म्हणाले, “बाबासाहेबांनी दिलेला प्रत्येक विचार आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. जयंतीदिवशी केवळ डीजेपुढे नाचण्यापेक्षा वाचन करून बाबासाहेब समजून घेतले तर आपला उत्कर्ष होईल. त्यामुळे अधिकाधिक युवकांनी महापुरुषांची चरित्रे वाचून त्यांचे विचार दैनंदिन जीवनात अंमलात आणावेत”

शशिकांत कांबळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावशाली विचारांतून प्रेरणा घेऊन युवापिढी घडली पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र घेऊन त्यांना अभिप्रेत समाजाची निर्मिती व्हायला हवी. याच विचारांतून यंदाच्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प आम्ही सोडला आहे.”

हा ‘छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकर विचाररथ’ पुण्यातील विविध दलित वसाहतींमध्ये फिरणार आहे. यामध्ये दत्तनगर, पर्वती, कासेवाडी, राजेवाडी, ढोले पाटील रोड, विश्रांतवाडी, बोपोडी, औंध, रामनगर, वारजे, धनकवडी, पद्मावती, मंगळवार पेठ, कामगार पुतळा आदी ठिकाणांचा समावेश आहे. या रथाद्वारे पुस्तक वाटपासह जनजागृती केली जाणार आहे. प्रा. फुलचंद चाटे यांनीयावेळी आपले मनोगत व्यक्त केले .

राजाराम पूल ते म्हात्रे पूल डी पी रस्ता ३६ मीटर होणार कधी? -संदीप खर्डेकर

0

पुणे- राजाराम पूल ते म्हात्रे पूल डी पी रस्ता ३६ मीटर होणार कधी…? असा सवाल करणारे पत्र क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे

खर्डेकर यांनी या पत्रात म्हटले आहे कि ,म्हात्रे पुलाकडून राजाराम पुलाकडे जाणाऱ्या डी पी रस्त्याची व येथील रहिवाश्यांनी व्यथा आपल्या समोर मांडत आहे,एकात्मिक रस्ते विकास योजने अंतर्गत या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम गेले अनेक वर्ष रखडले आहे,मी सातत्याने पाठपुरावा करून किमान काँक्रिटीकरणाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी गेले वर्षभर प्रयत्नरत आहे ..यात विविध विभागातील समन्वयाअभावी आणि इच्छाशक्ती अभावी ह्या रस्त्याचे स्वरूप हास्यास्पद झाले आहे.म्हात्रे पुलाकडून राजाराम पुलाकडे जाताना उजव्या बाजूस रस्ता १८ मीटर झाला आहे तर डाव्या बाजूस कुठे ९ मीटर,कुठे १२,तर कुठे १५ मीटर,कुठे चिंचोळा…..ज्या वस्तीतील लोकांचे पुनर्वसन झाले आहे त्यांना उठवून रस्ता करायला ही विविध विभागांची टोलवाटोलवीचाच अनुभव येतोय,मधला एक पट्टा न्यायप्रविष्ट तर अन्यत्र जागा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु आहे असे सांगितले जाते,तरी ह्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम कधी पूर्ण होणार याची माहिती द्यावी.
तसेच सदर रस्ता हा नो हॉकर्स झोन केला जावा व येथील उत्तम पदपथावर कोणत्याही परिस्थितीत पथारीवाले बसणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी अशी आग्रही मागणी करत आहे,हे न केल्यास या भागातील नागरिकांसह आंदोलन उभारावे लागेल याची नोंद घ्यावी. असा इशारा खर्डेकर यांनी दिला आहे.

टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत सायना देशपांडे, यशराज दळवी यांना विजेतेपद

0

दुहेरीत सिया देशमुख व रुमा गाईकैवारी यांना, तर दक्ष अगरवाल व अनर्घ गांगुली यांना विजेतेपद

पुणे :  मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अरुण वाकणकर मेमोरिअल करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात सायना देशपांडेने तर, मुलांच्या गटात यशराज दळवी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

एस.पी. कॉलेज टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत पाचव्या मानांकित सायना देशपांडे हिने रुमा गाईकैवारीचा 6-2, 6-1असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. सायना हि विखे पाटील शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून संदीप किर्तने टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक संदीप किर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. याआधी तिने यावर्षी मुंबई येथे 14 वर्षाखालील चॅम्पियन सिरिज स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित यशराज दळवी याने तिसऱ्या मानांकित दक्ष अगरवालचा 6-2, 6-2असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. यशराज एमआयटी शाळेत नववी इयत्तेत शिकत असून सोलारिस क्लब येथे प्रशिक्षक आदित्य मडकेकर आणि कैफी अफजल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. यशराजचे या वर्षातील या गटातील हे पहिलेच विजेतेपद आहे. अनर्घ हा सोलारिस क्लब येतेच प्रशिक्षक आदित्य मडकेकर आणि कैफी अफजल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत  दक्ष अगरवालने अनर्घ गांगुलीच्या साथीत इंद्रजीत बोराडे व रोहन फुले यांचा 6-1, 6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात सिया देशमुख व रुमा गाईकैवारी या जोडीने लोलाक्षी कांकरिया व समीक्षा श्रॉफ यांचा 7-5, 6-3असा पराभव करून विजेतेपद मिळविले. 


स्पर्धेचे पारितोषिक वितरण शीप्र मंडळी चे क्रीडा समितीचे चेअरमन अशोक वझे, चितळे बंधू मिठाईवालेचे एस आर चितळे, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, अपर्णा वाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मंदार वाकणकर, सुपरवायझर अवनी गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: अंतिम फेरी: 16 वर्षाखालील मुली: सायना देशपांडे(5)वि.वि.रुमा गाईकैवारी 6-2, 6-1;

16वर्षाखालील मुले:
यशराज दळवी(2)वि.वि.दक्ष अगरवाल(3) 6-2, 6-2;

दुहेरी गट: अंतिम फेरी: मुले: दक्ष अगरवाल/अनर्घ गांगुली(1)वि.वि.इंद्रजीत बोराडे/रोहन फुले 6-1, 6-3;
मुली: सिया देशमुख/रुमा गाईकैवारी वि.वि.लोलाक्षी कांकरिया/समीक्षा श्रॉफ(3)7-5, 6-3.

यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकसित होणे गरजेचे – योगेश उंडे

0
‘यशस्वी’ संस्थेच्या आयआयएमएस मध्ये ‘चॅम्पियन प्रवृत्ती’ विषयावरील व्याख्यान संपन्न

पुणे :कोणत्याही क्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकसित होणे आवश्यक असून आपल्या स्वभावात व विचारप्रक्रियेत सकारात्मकतेच्या दृष्टीने बदल केल्यासच आपला यशस्वी बनण्याचा प्रवास सुरु होतो, असे मत सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते योगेश अशोक उंडे यांनी व्यक्त केले. ते चिंचवड येथे यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चॅम्पियन प्रवृत्ती’ या  विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यतः कोणत्याही व्यक्तीची प्रवृत्ती ही  अनुवांशिकता,सभोवतालचे वातावरण आणि मानसिकता या तीन गोष्टींमुळे घडत असते.  प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, प्रत्येकाला स्वत:चे  असे कर्म  आहे. त्याने स्वत:च्या कर्माला पूर्णत्व दिलं पाहिजे. यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न येणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी सुरुवातीला स्वतःमध्ये बदल करण्याची मानसिकता होणे गरजेचे आहे.कोणतेही  नेमून  दिलेले काम  निर्धारित वेळेतच पूर्ण करण्याचा ध्यास असायला हवा, नेहमी आधीपेक्षा उत्तम आणि सर्वोत्तमतेच्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे. लक्षात घ्या आपले बोलणे, एखाद्या घटनेवर आपली काय प्रतिक्रिया आहे यावरूनच आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते. त्यामुळे सर्वात मुळाशी फक्त आणि फक्त आपली ‘प्रवृत्ती’ आहे. त्यामुळे जर खऱ्या  अर्थाने आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला ‘चॅम्पियन प्रवृत्ती’ चा अंगीकार करायला हवा. स्वतःला सतत, वारंवार आपण जिंकणारच आहोत असे सांगितले पाहिजे.

याप्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच तुम्ही जे ध्येय निश्चित केले असेल ते आणि फक्त ते पूर्ण करण्याचाच सातत्याने प्रयत्न करा. आपला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती ही  ध्येयपूर्तीच्या दिशेनेच असली पाहिजे याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे असा संदेश योगेश उंडे यांनी व्याख्यानाचा समारोप करताना दिला. याप्रसंगी  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ. मिलिंद मराठे, प्रा.डॉ. अमितकुमार गिरी, प्रा.अमर गुप्ता, प्रा.आशा महाजन. ग्रंथपाल पवन शर्मा यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शाळा- महाविद्यालयांच्या माध्यमातून राबविणार मानसिक आरोग्य जागृती कार्यक्रम- डॉ.दीपक वलोकर

0

पुणे: पुणे शहर व परिसरातील विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये वर्षभर मानसिक आरोग्य जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याची सुरुवात एप्रिल महिन्यातच विविध महाविद्यालयांच्या “शिक्षक जनजागृती” या कार्यक्रमाने करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य जागृती कार्यक्रम समितीचे प्रमुख मार्गदर्शक तथा कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. नितीन पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नव्याने गठीत करण्यात आलेल्या शासकीय राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम समितीची बैठक कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये डॉ दीपक वलोकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच समितीचे समन्वयक प्रा. चेतन दिवाण, जेष्ठ सदस्य डॉ वासुदेव परळीकर, प्रा. साधना नातू, डॉ. सुप्रकाश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्यावेळी डॉ वलोकर यांनी हो घोषणा केली.

मानसिक आरोग्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन अत्यंत वेगळ्या प्रकारचा असून जनतेमध्ये मानसिक आरोग्यामध्ये जनजागृती करण्यासाठी पुणे व परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थी व प्राध्यापकांबरोबरच त्या भागातील नगर-वस्त्यामध्ये देखील विविध संस्थांच्या मदतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.वलोकर यांनी दिली.

समितीचे समन्वयक प्रा. चेतन दिवाण, जेष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ वासुदेव परळीकर, डी. वाय. पाटील. वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सुप्रकाश चौधरी, माडर्न महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. साधना नातू, सिम्बोयीसीस महाविद्यालयाच्या डॉ. अल्पना वैद्य, फर्गुसन महाविद्यालयाच्या डॉ. शीतल रुईकर,स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोशियेशन चे अनिल वर्तक व स्मिता गोडसे, चैतन्य पुनर्वसन केंद्राचे रॉनी जॉर्ज व राहुल शिरुरे, कानेक्टिग हेल्पलाईन चे विरेन रजपूत, बापू ट्रस्टc च्या ज्युली बापट, शिल्पा तांबे, प्रिझम फौंडेशन च्या विद्या भागवत, स्नेह फौंडेशनच्या श्रद्धा देव, तसेच नाशिक येथील मानसोपचारतज्ञ डॉ. अभिजित करेगावकर आदींनी बैठकीमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रभर विविध ठिकाणी मानसिक आरोग्य जागृतीसाठी राबविण्यात येऊ शकणाऱ्या विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना,उपचार पद्धती,पुनर्वसनपद्धती, व त्यासाठी लागणाऱ्या तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शन व जनतेच्या सहभागाबाबत विस्तृत चर्चा केली.

बैठकीच्या सुरुवातीस महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम समितीच्या सर्व नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करीत डॉ दीपक वलोकर प्रा. चेतन दिवाण व डॉ वासुदेव परळीकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया

0

पुणे – ‘लीड मिडिया’ च्या वतीने आणि अखिल सदाशिव, शनिवार, नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती व वंदेमातरम संघटना यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये कलाकार, साहित्यिक, उद्योजक, विद्यार्थी, शिक्षक आणि माध्यम प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी एकत्र येऊन वाचन महायज्ञ करणार आहेत.

सहभाग  – विनोद सातव, अभिनेता- दिग्दर्शक प्रवीण तरडे, अॅड. असीम सरोदे, वैभव जोशी, विश्वंभर चौधरी, मेघराज राजेभोसले, सुरेश देशमुख, सचिन इटकर, सुनील अभ्यंकर, अश्विनी दरेकर, मृण्मयी देशपांडे, पौर्णिमा गानू, अॅड. रमेश परदेशी, केदार वांजपे, शैलेंद्र नांदुरकर, दीपक रेगे, मकरंद टिल्लू, वैभव वाघ, सचिन जामगे, अनघा फाटक, वंदे मातरम् संघटना, अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखा पुणे, सेवादल परिवार, एकपात्री कलाकार परिषद, रसिक साहित्य.

वाचन महायज्ञ

दिनांक – १४ एप्रिल २०१८

वेळ – सायंकाळी ४.३० ते ६.३०

ठिकाण –  सुशील बंगला, हॉटेल कोरोनेट शेजारी, संतोष बेकरी समोर आपटे रोड, पुणे.

रेल्वे लाईन्स नजीक राहणाऱ्याना कायमस्वरूपी घर; रेल्वे मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक-खा. अनिल शिरोळे

0

पुणे-गेली सुमारे ३०-४० वर्षांहून अधिक काळ पुणे शहरातील रेल्वे लाईन्स नजीक राहणाऱ्याना  कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देणेबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल ह्यांच्या समवेत येत्या महिन्याभरात सर्व संबंधित संस्था आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी निश्चित केल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी दिली आहे. काल (दि १२ एप्रिल) मुख्यमंत्र्यांशी अनिल शिरोळे यांची चर्चा झाली. त्यानुसार ही  बैठक होणार असून “Housing for all” ह्या योजने अंतर्गत ह्या सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिरो ळेयांनी सांगितले.

थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्सचे चित्राविष्कार पाहण्याची पुणेकरांना संधी

0

पुणे : इचलकरंजी येथील थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्स आर्टिस्ट डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी साकारलेल्या 14 थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्सचे येत्या 16 ते 19 एप्रिल दरम्यान घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे पुण्यातील शिवाजी ट्रेल या संस्थेने आयोजित केले आहे. दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 8.00 या वेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना विनामूल्य पाहता येईल, अशी माहिती शिवाजी ट्रेल संस्थेचे संस्थापक मिलिंद क्षीरसागर, थ्रीडी कोलाज पोर्टेट्स आर्टिस्ट डॉ. ज्योती बडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुकुंद उत्पत, संजय लाहोटी, डॉ. दशावतार बडे आदी उपस्थित होते.

     थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्स विश्‍वातील डॉ. ज्योती बडे यांनी शिवस्मृती नामक थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्समध्ये एकूण 14 भव्य पोर्ट्रेट्स साकारली आहेत. शिवचरित्रातील प्रसिद्ध चित्रकार दलाल यांच्या मूळ चित्रावरून ही पोर्ट्रेट्स साकारली असून, ती पाहताना डॉ. ज्योती बडे यांचा चित्रकलेचा गाढा अभ्यास दिसून येतो. डॉ. ज्योती बडे यांचा हा अविष्कार अनोखा व पहिलाच असून, चित्रकलेच्या अभ्यासकांसह चित्रकला रसिकांनी त्यांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मिलिंद क्षीरसागर यांनी केले आहे. 

     या प्रदर्शनास अनेक मान्यवरांसोबत शिवाजी ट्रेल संस्थेचे बँड अ‍ॅम्बेसेडर डॉ. अमोल कोल्हे हे देखील भेट देणार आहेत, अशी माहिती डॉ. बडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

     यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, इतिहास संशोधक डॉ. अमर आडके, संभाजी भिडे गुरुजी यांनी ही कलाकृती पाहून या पोर्ट्रेट्सची प्रशंसा केली आहे. अशा अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाची खासियत अधोरेखीत केली आहे. पुणेकरांसाठी दि. 16 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत खुले राहणार आहे. रसिकांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही डॉ. ज्योती बडे यांनी केले आहे.

ही पोर्ट्रेट्स त्रिमितीय आहेत. विशेष म्हणजे रंगांचा अगदी अल्प वापर करीत ही पोर्ट्रेट्स साकारली आहेत. यामध्ये कपडे आणि दागिने वापरण्यात आले आहेत. प्रत्येक पोर्ट्रेट फ्रेम करताना थ्रीडी साधण्यासाठी 9 इंच इतकी खोली दिल्यामुळे पोस्टर पाठीमागून पुढे टप्प्या टप्प्याने पुढे घेतली गेली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या अंगावरील कपडे, फेटे, दाग दागिने वास्तवातील वापरले असल्याने जिवंतपणा साकारला आहे. चित्रांचे असणारे भव्य परिणाम वास्तविकतेच्या जवळ घेऊन जातात.

 

साईबाबांनी धारण केलेल्या पादुका रविवारी पुण्यात

0

पुणे, श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने साईबाबा शताब्दीच्या निमित्ताने साईबाबांनी धारण केलेल्या चर्म पादुका पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती साईगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.
शनिवार पेठेतील न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात रविवारी (ता. १५ एप्रिल) पहाटे पाच ते रात्री दहा या वेळेत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. कोल्हापूरच्या करवीर पीठाचे श्री शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह भारती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पहाटे भूपाळी, तुकाराम दैठणकर व सुरेश लोणकर यांचे सनई वादन, साईबाबांच्या पादुकांना अभिषेक व उटी लेपन पूजा, श्रीविष्णू सहस्त्रनाम पठण, साई ग‘ंथाचे सामुदायिक पारायण, सबका मालिक एक हे सत्यश्री महाराजांचे प्रवचन, गुरुपाठ, भजन असे धार्मिक कार्यक‘म आयोजित करण्यात आले आहेत.
साई संस्थांचा विश्‍वस्तांचा शताब्दीनिमित्त सन्मान करण्यात येणार आहे. साईगंगा प्रतिष्ठान, साईदास मंडळ आणि साईबाबा पालखी सोहळा समिती यांनी या कार्यक‘माचे संयोजन केले आहे.