Home Blog Page 3080

…जर, कात्रजच्या तलावाची भिंत फुटली ……वसंत मोरेंचा इशारा (व्हिडीओ)

0

पुणे-शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रोड दांडेकर पुलाजवळ फुटला आणि हजारो लोकांची वाताहत झाली …हि दुर्घटना दिवसा घडली ..पण जर हि रात्री घडली असती तर विचार करा काय झाले असते …या आजच्या दुर्दैवी घटनेपासून धडा घ्या … पेशवेकालीन कात्रजचा तलाव ..ओसंडून वाहतो .. त्याचा बंधारा कमकुवत झालाय ..जर त्याला काही झाले तर .. किती मोठा अनर्थ होईल ..याची कल्पना करून वेळीच सावध व्हा .. असा इशारा आज महापलिकेच्या मुख्य सभेत मनसे चे गट नेते वसंत मोरे यांनी दिला . पहा आणि ऐका यावेळी मोरे काय म्हणाले त्यांच्याच शब्दात …

कालवाफुटीला पालकमंत्री बापट आणि जलसंपदामंत्री महाजन जबाबदार -प्रशांत जगताप(व्हिडीओ)

0

कालवाफुटी ला पालकमंत्री बापट आणि जलसंपदामंत्री महाजन जबाबदार -प्रशांत जगताप
पुणे- मुठा कालवा फुटून असंख्य कुटुंबांची जी वाताहत लागली त्यास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोप आज महापालिकेच्या मुख्य सभेत माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला .
त्यांनी जलसंपदा विभागाने कालवा दुरुस्ती साठी 2 कोटी रुपये मागूनही त्यांना उपलब्ध करून दिले नाहीत आणि पर्यायाने पुण्यातील हजारो नागरिकांचे संसार आज पुरात वाहून गेल्याची घटना घडून गेली .या दोघांचाही आपण तीव्र शब्दात निषेध करतो असे ते म्हणाले .

कालवा गळतीकडे पालिका प्रशासन, पाटबंधारे खात्याचे वारंवार लक्ष वेधले होते : नगरसेविका श्रीमती स्मिता वस्ते

0
पुणे :पर्वती पायथा _ दांडेकर पूल परिसरातून जाणाऱ्या खडकवासला धरणाच्या कालवा गळतीकडे पालिका प्रशासन, पाटबंधारे खात्याचे लक्ष वेधले होते , मात्र कार्यवाही झाली नाही, असे प्रभाग २९ क च्या नगरसेविका श्रीमती स्मिता वस्ते यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
सिंहगड रस्ता परिसरात कालवा फुटल्याने झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर श्रीमती वस्ते यांनी पालिका प्रशासन आणि पाटबंधारे खात्याशी केलेला पत्रव्यवहाराला उजाळा दिला आहे.
निवडून आल्यापासून सातत्याने आपण या समस्येकडे लक्ष वेधत होतो. प्रभाग समिती बैठकीत मुद्दा उपस्थित करीत होतो.गळती थांबवली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते, याचा इशाराच
वस्ते यांनी २o जूनला पत्रातून पाटबंधारे खात्याला  दिला होता. तर पालिकेला २४ मे रोजी पत्र लिहून गांभीर्याने लक्ष देण्यास सुचवले होते.

महापालिका आणि जलसंपदा वादातून कालवा फुटी -अजित पवार

0

पुणे-
कालव्याच्या डागडुजीस दाेन काेटी खर्च करण्यासंदर्भात एकमत न झाल्याने आणि अधिकारी भाजप प्रतिनिधींच्या ऐकण्यात न राहिल्याने पुण्याला कालवा फुटीसारख्या मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले आहे असा आरोप आज राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी येथे केला .
माजी उपमुख्यमंत्री अाणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पवार म्हणाले, खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे दुष्काळी भागाला तसेच शेतीला पाणीपुरवठा केला जाताे. कालव्याची डागडुजी करण्याकरिता दाेन काेटीचा खर्च करणे अपेक्षित हाेते मात्र, ताे सरकारने न केल्याने ही दुर्घटना घडली. भाजपच्या गलथन कारभारचा पुण्यातील नागरिकांना फटका बसला असून लाेकांच्या घरात पाणी घुसून त्यांचे संसार वाहून गेल्याने माेठे नुकसान झाले अाहे त्याची नुकसान भरपार्इ शासनाने द्यावी. लाखाे लिटर शेतीचे व पिण्याचे पाणी या दुर्घटनेमुळे वाया गेले असून त्याला काेण जबाबदार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.सत्ताधारी भाजप मध्ये प्रशासनाकडून काम करुन घेण्याची धमक नसल्याची खरमरीत टिका त्यांनी याप्रसंगी केली.

महेश मांजरेकरांच्या ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये दिग्गजांची मांदियाळी

0

मोठमोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवणं हे दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असतं. काही दिग्दर्शकांना मात्र हे कसब चांगलंच अवगत असतं. हिंदीपासून मराठीपर्यंत नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या विषयावरील सिनेमे बनवणाऱ्या निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता म हेश वामन मांजरेकर यांनी कायम बड्या कलाकारांसोबत सिनेमे केले आहेत. मी शिवाजी पार्कहा आगामी मराठी सिनेमाही याला अपवाद नाही. या सिनेमात  विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर हे दिग्गज एकत्र दिसणार आहेत. ‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा मी शिवाजी पार्क हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

‘न्यायदेवता आंधळी असते…आम्ही डोळस होतो’ अशी टॅगलाईन असलेल्या मी शिवाजी पार्क मध्ये पाच दिग्गजांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे. विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात नायकाच्या भूमिकेत दिसलेल्या गोखलेंनी साकारलेल्या चरित्र भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहणाऱ्या ठरल्या आहेत. सतीश आळेकर हे नाव एकांकिकांपासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत आणि छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यार्पंत विविध पातळीवर गाजलेलं आहे. अशोक सराफ हे केवळ नावच खूप आहे. विनोदी अभियनाचा बादशहा असं विरुद मिरवणाऱ्या अशोक सराफ यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. आपल्या अनोख्या अभिनयशैलीमुळे छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यार्पंत अबालवृद्धांना मोहिनी घालण्याचं कसब शिवाजी साटम यांच्याकडे आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचं कौशल्य दिलीप प्रभावळकरांच्या ठायी आहे.

अशा सर्व दिग्गजांना एकाच फ्रेममध्ये आणण्याचं काम दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मी शिवाजी पार्क या संवेदनशील कलाकृतीच्या माध्यमातून केलं आहे. या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस आदि बरेच कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. सिनेमाचं शीर्षक आणि टॅगलाईन पाहता मी शिवाजी पार्क मध्ये काहीतरी गहन विषय मांडण्यात आल्याची चाहूल नक्कीच लागते. या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

१८ ऑक्टोबर ला मी शिवाजी पार्क सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

… ‘त्यांच्या’साठी कार्यकर्ते सरसावले !

0
पुणे  पुण्यातील जनता वसाहतजवळून जाणारा मुठा कालवा गुरूवारी दुपारी फुटला आणि संपूर्ण परिसर जलमय झाला. अनेकांचे संसार वाहून गेल्याने आता आम्ही करायचं काय असा उद्विग्न सवाल करणाऱ्या नागरिकांसाठी कार्यकर्ते धावून गेले. पिण्याच्या पाण्यासह चहा ,जेवणाची  व्यवस्था शहर काँग्रेसचे अमित बागुल आणि मित्र परिवाराने केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
जनता वसाहत येथे मुठा कालव्याला भगदाड पडल्याने सर्वत्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढयात अनेकांचे संसार डोळ्यादेखत वाहून गेल्याने हतबल झालेल्या नागरिकांना आता करायचे काय ? या प्रश्नाने ग्रासले. पिण्यासाठी पाणी नाही कि खायलाही काही नाही अशा स्थितीत असलेल्या नागरिकांसाठी अमित बागुल आणि मित्र परिवार तसेच पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी सरसावले. माजी उपमहापौर आबा बागुल हेही घटनास्थळी होते. त्यांच्या सूचनेनुसार नागरिकांना पिण्याचे पाणी, चहा, जेवण उपलब्ध करून देण्यात आले. कालवा फुटला आणि सायंकाळी पाऊसाने झोडपले. भरपावसात कार्यकर्ते नागरिकांसाठी कार्यरत असल्याचे चित्र होते.

मुठा कालवा फुटल्याने सुरक्षिततेसाठी चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद

0

पुणे, दि. 27 सप्टेंबर 2018 : सिंहगड रस्त्यावर मुठा कालवा फुटून जनता वसाहत व परिसरातील अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून महावितरणकडून चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 28) सकाळी सर्व घरांची पाहणी करून वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे.

मुठा उजवा कालवा गुरुवारी (दि. 27) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटल्यानंतर जनता वसाहत व परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. सार्वजनिक तसेच घरांमधील विजेचा धोका टाळण्यासाठी महावितरणने या परिसराला वीजपुरवठा करणार्‍या वाघजई व पेशवेपार्क या दोन्ही 11 केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा तातडीने बंद केला. पाणी ओसरल्यानंतर दीड तासांनी तो पूर्ववत करण्यात आला. मात्र जनता वसाहत व परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 500 घरांचा वीजपुरवठा बंद आहे. या घरांमध्ये पाणी आहे. वीजमीटर भिजले आहे. भिंतींना ओल आली आहे. भिंतीची पडझड झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. महावितरणचे सुमारे 20 अभियंते व जनमित्र आज या परिसरात कार्यरत होते. कालव्यातील पाण्यामुळे वीजधोके टाळण्यासाठी त्यांच्याकडून उपाययोजना करण्यात आल्या.

दरम्यान शुक्रवारी (दि. 28) सकाळी महावितरणचे सुमारे 30 अभियंते व जनमित्र आवश्यक साहित्यांसह परिसरातील घराघरांत जाऊन वीज यंत्रणेची पाहणी करणार आहेत. सुरक्षिततेसाठी आवश्यक दुरुस्तीचे काम व उपाययोजना केल्यानंतरच संबंधीत घरांमधील वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे.

पुण्यात मुठा कालवा फुटल्याने हाहाकार ……

0

पुणे- मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांला फुटला. दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले . अनेक घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचले आणि  अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.  डागडुजी न झाल्याने कालव्याची भिंत कोसळ्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान दुपारी बीन पावसाच्या  पुराने  पुण्याचा हा परिसर हैराण झाला असताना संध्याकाळी पुण्यात जोरदार पावसाने तडाखा दिल्याने शहरात सकाळपासूनच वाहतूकव्यवस्था पूर्णतः कोलमडून पडली . माजी उपमुख्यमंत्री अाणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.आणि कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेचा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला .डागडूजी साठी 2 कोटी रुपये खर्चाच्या कामाला अतिविलंब केल्याने, ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. 

 कालव्‍याची भिंत कोसळल्‍याने 40 ते 50 हजार लोकसंख्‍येच्‍या वस्‍तीत पाणी शिरले आहे. ज्‍या झोपडपट्ट्यांमध्‍ये पाणी शिरले आहे, त्‍या भागात पंचनामे करून मदत दिली जाईल, असे आश्‍वासन पुण्‍याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.

खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात या कालव्यातून पाणी पुरवठा करण्यात येतो. कालव्याची तातडीने डागडुजी करण्‍याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत.परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापाैर मुक्ता टिळक या दांडेकर पुल परिसरातील जनता वसाहतीत अाल्या असता, स्थानिक नागरिकांनी त्यांना घेराव घालत अाम्हाला नुकसान भरपार्इ काेण देणार, अामच्या मदतीला वेळेला प्रशासनाचे काेणीच धावून अाले नाही असे सांगत तक्रारींचा भडिमार केला. टिळक यांनी याप्रकरणी मनपाने वारंवार पाटबंधारे खात्यास सूचना दिल्या हाेत्या असे सांगत सध्या अाप्तकालीन परिस्थीतीशी सामना करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. लाेकांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून सर्व लाेकप्रतीनिधींनी मिळून त्यावर उपाययाेजना करु असे स्पष्ट केले अाहे. कालव्याशी संबंधित काेणत्या तृटी राहिल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवार्इ केली जार्इल असे त्यांनी सांगितले.

गळती वाढत गेल्याने घटना घडली
मुठा उजवा कालवा नेमका ज्याठिकाणी फुटला त्याबाबतची पाहणी केल्यावर खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, कालव्याच्या भिंतीच्या विविध ठिकाणी गळती हाेत असून सदर गळती याठिकाणी वाढत जाऊन कालवा फुटला अाहे. पुण्याचे पाणी पुरवठयावर ही या दुर्घटनेमुळे परिणाम हाेणार अाहे. खडकवासला धरणातून निघाल्यानंतर हा कालवा पर्वती जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत येताे. तिथपर्यंत पाणी घेता येर्इल मात्र, त्यापुढे पाणी नेता येणार नाही. त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून पुण्यातील ज्या भागाला पाणी जाते ताे भाग वगळुन उर्वरित भागाला पाणीपुरवठा करता येणार नाही. पर्वती जलशुध्दीकरण केंद्रानंतर पाणी कॅन्टान्मेंट जलशुध्दीकरण केंद्र व इतर केंद्रात जात असते, मात्र कालवा फुटल्याने तिथपर्यंत पाणी पाेहचवता येणार नाही. 

जलसंपदा विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे म्हणाले, “”खडकवासला धरणातून शहरासह जिल्ह्यासाठी पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुणे शहराच्या लष्कर व पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 365 दिवस पाण्याचा विसर्ग सुरू असतो. त्यामुळे त्याठिकाणी कोणतीही दुरुस्तीचे काम होऊ शकत नाही. जनता वसाहतीच्या लगतच्या कालव्याला 10 मीटरपेक्षा कमी रुंदीचा मातीचा भराव वाहून गेला आहे.
कालव्याच्या डागडुजीस दाेन काेटी खर्च केला नाही
माजी उपमुख्यमंत्री अाणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पवार म्हणाले, खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे दुष्काळी भागाला तसेच शेतीला पाणीपुरवठा केला जाताे. कालव्याची डागडुजी करण्याकरिता दाेन काेटीचा खर्च करणे अपेक्षित हाेते मात्र, ताे सरकारने न केल्याने ही दुर्घटना घडली. भाजपच्या गलथन कारभारचा पुण्यातील नागरिकांना फटका बसला असून लाेकांच्या घरात पाणी घुसून त्यांचे संसार वाहून गेल्याने माेठे नुकसान झाले अाहे त्याची नुकसान भरपार्इ शासनाने द्यावी. लाखाे लिटर शेतीचे व पिण्याचे पाणी या दुर्घटनेमुळे वाया गेले असून त्याला काेण जबाबदार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.सत्ताधारी भाजप मध्ये प्रशासनाकडून काम करुन घेण्याची धमक नसल्याची खरमरीत टिका त्यांनी याप्रसंगी केली.

प्रवास २ तासाचा अन विमान तब्बल चार तास लेट.. प्रवाशांना नाही उरला वाली कोणी ?

0

पुणे – पुणे- दिल्ली आणि दिल्ली- पुणे मार्गावरील स्पाईस जेटच्या विमानांच्या उड्डाणाला गेले दोन दिवस होत असलेल्या विलंबामुळे प्रवासी वैतागले असून त्यांनी सोशल मिडिया वरून याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे.  दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे विमानाला उशीर होत असल्याचे ‘जेट’ने स्पष्ट केले आहे. विमान प्रवासाबाबत होणाऱ्या अशा ग्राहक-प्रवासी छळवादाबाबत आता कोणी प्रवासी संघ ,ग्राहक मंच यात लक्ष घालील कि नाही ,घातले तरी अशा समस्यांनी प्रवासी हैराण होतच राहील ? हे मात्र येणारा काळ च ठरविणार आहे.

दिल्ली- पुणे मार्गावरील विमान प्रवास अवघ्या २ तासाचा आहे .वेळ वाचवा म्हणून प्रवासी हजारो रुपये मोजतात आणि विमान प्रवास कडे वळतात. पण हल्ली विमाने लेट होतात आणि मनस्ताप वाढतो अशा अनुभवांची मालिका लांबलचक होते आहे . अशाच विमानाचे मंगळवारी सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी पुण्याकडे उड्डाण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते रात्री नऊच्या सुमारास झाले. प्रवासी विमानात बसलेले होते. परंतु, उड्डाण झाले नाही. त्यामुळे प्रवाशांनी सायंकाळी सहाच्या सुमारास वैतागून विचारणा केली. त्या वेळी विमानात तांत्रिक समस्या उद्‌भवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवासी विमानातच बसून होते. तर बुधवारी सकाळी पुण्याहून दिल्लीला जाणारे विमानाचे सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी उड्डाण होणे अपेक्षित होते. ते दिल्लीला सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी पोचणार होते. परंतु, त्या विमानाचे उड्डाण सकाळी अकराच्या सुमारास झाले. या बाबत जेटने म्हटले आहे की, पुणे विमातळावर सकाळी ९ ते ११ दरम्यान हवाई दलाचा सराव होतो. तसेच तांत्रिक कारणामुळेही विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही. दरम्यान, या विलंबामुळे प्रवाशांनी ट्‌विटरवर जेटकडे नाराजी व्यक्त केली.

महापालिकेच्या तिजोरीचा ताबा दोन मुख्य लेखापरीक्षकांकडे

0

पुणे – वाढत्या आर्थिक व्यापाचे कारण पुढे करीत महापालिकेच्या तिजोरीचा ताबा दोन मुख्य लेखापरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. जमा बाजूसाठी एक लेखापरीक्षक, तर खर्चासाठी दुसरा लेखापरीक्षक अशा पद्धतीने सध्या महापालिकेचा कारभार सुरू करण्यात आला आहे. अशा प्रकारे दोन मुख्य लेखापरीक्षक नेमण्याची ही महापालिकेतील पहिलीच घटना असल्याचे समजते .राज्य सरकारच्या आदेशानुसार ही कार्यवाही केली आहे. मुख्य लेखापालची दोन पदे निर्माण करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.असे  सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अनिल मुळे यांनी सांगितले .

महापालिकेच्या स्थापनेपासून अगदी गेल्या महिन्यापर्यंत मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे एकच पद होते. या पदासाठी सनदी लेखापाल (सीए) अथवा आयसीडब्ल्यूए या पात्रतेच्या उमेदवाराची नियुक्ती करता येते होते. २०१४ मध्ये महापालिकेने तयार केलेल्या सेवा नियमावलीत दोन मुख्यलेखापाल पदांची शिफारस केली नव्हती. मात्र सरकारच्या पातळीवर परस्पर त्यामध्ये बदल करून दोन मुख्य लेखापाल नेमण्याची तरतूद करून त्या नियमावलीस मान्यता देण्यात आली. नियमावलीत राज्य सरकारकडून परस्पर असे अनेक बदल करण्यात आल्यामुळे त्याविरोधात महापालिकेतील कामगार संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये देखील राज्य सरकार प्रतिवादी आहे. त्या याचिकेवरील सुनावणी अद्याप सुरू आहे. असे असताना राज्य सरकारने दीड वर्षांपूर्वी प्रतिनियुक्तीवर एका अधिकाऱ्याची मुख्यलेखापाल या पदावर नियुक्ती करण्यासंदर्भातील आदेश काढले होते. मात्र तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांची अंमलबजावणी केली नाही.

मात्र महिनाभरापूर्वी महापालिकेचा आर्थिक व्याप वाढल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी तिजोरीच्या कामकाजाचे महसूल आणि खर्च असे दोन भाग करून त्यावर दोन मुख्यलेखापालांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश काढले. त्यानुसार आता महापालिकेच्या तिजोरीचे काम दोन मुख्य लेखापाल यांच्याकडून पाहिले जात आहे. या पदासाठी असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या निकषाला देखील हरताळ फासण्यात आल्याचा आरोप प्रतिस्पर्धी करत आहेत. मुंबईसह राज्यातील अन्य कोणत्याही महापालिकेत अशा प्रकारे दोन मुख्यलेखापालांची नियुक्ती नसताना पुण्यातच का, असा प्रश्‍न ते  उपस्थित करीत  आहे.

विशिष्ट व्यक्ती डोळ्यासमोर ठेऊनच कर्करुग्णांसाठीच्या स्वतंत्र हॉस्पिटलचा विषय मंजूर

0

पुणे – शहरात फुटकळ कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात असताना कर्करुग्णांसाठीचे हॉस्पिटल मात्र सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) किंवा बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर सुरू करण्याचा घाट  विशिष्ट व्यक्ती डोळ्यासमोर ठेऊनच कर्करुग्णांसाठीच्या स्वतंत्र हॉस्पिटल च्या विषयाला महिला बालकल्याण समिती ने मंजुरी दिल्याचा आरोप वैद्यकीय क्षेत्रातून होतो आहे.  अशा योजना कोणाच्या घशात घालायचे, याचेही नियोजन करूनच योजना पुढे आणल्या जात असल्याचे चित्र आहे.

अगदी या साठीच सहा महिने रेंगाळलेल्या कर्करुग्णांकरिता स्वतंत्र हॉस्पिटलच्या प्रस्तावावरील धूळ बुधवारी  झटकण्यात आली असून, या योजनेला महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने मंजुरी दिली. शुक्रवार पेठेतील महापालिकेच्या मिळकतीमध्ये हे  हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. कर्करुग्णांना सर्व प्रकारचे उपचार अल्पदरात देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. असे प्रथमतः तरी म्हटले आहे.

या रुग्णांसाठी प्रथमच महापालिकेने ही सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला असून, विशेष म्हणजे, तिचे खासगीकरण न करता महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत हॉस्पिटल चालविण्याचा प्रयत्न असेल, असे समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले यांनी (शुरू शुरू मे )तूर्तास तरी म्हटले आहे. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता शहराच्या मध्यवर्ती भागातील जागेत हॉस्पिटल सुरू करण्यात येईल, असेही नवले यांनी हटले आहे.

कर्करुग्णांना उपचाराकरिता शहरी गरीब योजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र, उपचार आणि त्यावरील खर्च लक्षात घेता, स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव नगरसेवक अजय खेडेकर आणि सम्राट थोरात यांनी मांडला होता. त्यावर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. काही त्रुटी असल्याचे कारण सांगत, प्रस्ताव अभिप्रायासाठी पाठविण्यात आला. त्यानंतर संबंधित प्रस्ताव फारसा गांभीर्याने घेण्यातच आला नाही. तरीही, ही योजना सुरू करणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर होता. अखेर अभिप्रायावर चर्चा करून तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

 

 

कुसंगतीने भरकटलेल्या तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी आबा बागुलांचा नवा उपक्रम

0
पुणे फर्स्टद्वारे समुपदेशन  आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध 
 
पुणे :मजेखातर म्हणा ‘थ्रिल’ म्हणून अजाणते वयात पोलीस स्टेशनची पायरी चढलेल्या आणि पोलीस दफ्तरी गुन्हे दाखल झालेल्या १५ ते २५ वयोगटातील तरुण – तरुणींच्या पुनर्वसनासाठी आता पुणे फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे .  भरकटलेल्या तरुणाईला समुपदेशनाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांचे पुर्नवसन करणार असल्याची माहिती पुणे फर्स्टचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली. 
यासंदर्भात पुणे फर्स्टचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, सध्या १५ ते २५ या वयोगटातील तरुण – तरुणींकडून कुसंगतीमुळे अनेक गुन्हे घडत असल्याची वास्तवता  आहे. 
कुसंगतीमुळे गुन्हेगारीच्या मार्गावर असलेल्या या पिढीला आज दिशा देण्याची नितांत गरज आहे.त्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. 
त्यानुसार पुणे फर्स्ट या  आमच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत समुपदेशन आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. छोटे -छोटे गुन्हे दाखल असलेल्या या १५ ते २५ वयोगटातील तरुण – तरुणींचे आयुष्य उद्धवस्त होऊ नये आणि गुन्हेगारीचा आलेख उंचावू नये यासाठी पुणे फर्स्टद्वारे विविध कंपन्यांशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि कंपन्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला  आहे. 
गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या तरुण – तरुणींना व्यवसाय – नोकरीद्वारे नवा चेहरा मिळावा आणि गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त करावे  हा उद्देश  असून हा उपक्रम  पुणे शहर पोलिसांच्या सहकार्याने राबविण्याचा मानस आहे .

औषध विक्रेतेही उद्या बंदमध्ये सहभागी

0

पुणे – औषधांची ऑनलाइन विक्री, ई- फार्मसीजच्या निषेधार्थ ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (एआयओसीडी) शुक्रवारी (ता. 28) पुकारलेल्या बंदमध्ये पुण्यातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.

ऑनलाइनमुळे अनेक औषधांची बेकायदेशीर विक्री होण्याचा धोका आहे. अशाप्रकारे विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून औषध कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली गेली नाही, असा दावा संघटनेने केला आहे. गुंगी आणणाऱ्या औषधांची डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री केली जात असून, त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. त्यामुळे ऑनलाइन औषध विक्रीला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. यामध्ये केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍टचे साडेसात हजार सदस्य सहभागी होणार असल्याचे सुशील शहा, अनिल बेलकर यांनी सांगितले.

भारत बंदच्या समर्थनार्थ दुचाकी रॅली! रिटेलमधील परकीय गुंतवणुकीला रिटेल व्यापारी संघाचा विरोध

0
पुणे: केंद्र सरकारने भारतात रिटेलमध्ये 100 टक्के गुंतवणूकीस परवानगी दिल्याने आधीच मॉलमुळे त्रस्त झालेला रिटेल व्यापारी आता उध्वस्त होण्याची भिती आहे. या निर्णयाविरोधात येत्या शुक्रवारी (28 सप्टेंबर) पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने दुचाकी रॅली काढून निषेध नोंदविला जाणार आहे.
ही दुचाकी रॅली सीएआयटी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा म्हणूनही काढली जाणार आहे. सारसबागेतील गणपतीची आरती करून सकाळी 11 वाजता ही दुचाकी रॅली बाजीराव रस्त्याने जुना बाजारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. त्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

वॉलमार्टसारख्या कंपन्यांना व्यवसायासाठी 2 टक्क्यांनी कर्ज मिळते तर, आपल्याकडे कर्जावरील व्याजाचा दर 9 ते 18 टक्के आहे. मॉलच्या स्पर्धेत कंबरडे मोडलेला रिटेल व्यापारी या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी कशी स्पर्धा करणार आहे? देशात 35 कोटींहून अधिक नागरिक रिटेल व्यवसायातून रोजगार मिळवून जगतात. आणि आपले केंद्र सरकार 7 कोटी लोकांना रोजगार देण्यासाठी 35 कोटी लोकांच्या रोजगारावर पाय देऊन रिटेल व्यवसायात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आहे. इतका साधा व सरळ विचार केंद्र सरकारच्या लक्षात येत नाही हेच विशेष आहे. आजच्या घडीला अमेरिकेने कायदा करून देशांतील व्यापाराला संरक्षण दिले आहे. चीन, रशिया सर्वजण स्थानिकांना प्रथम प्राधान्य देत असताना आपले सरकार मात्र स्थानिक रिटेल व्यवसाय संपविण्याचे काम करीत आहे, असे सचिन निवंगुणे यांनी सांगितले.
रिटेल व्यवसायात काम करणाऱ्यांचे शिक्षण कमी आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल, असेही निवंगुणे म्हणाले.

पदमशाली संघमच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0

पुणे-अहमदनगर येथील ११ वर्षाच्या चिमुरड्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ व अपराधी नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी पुणे शहरात पश्चिम महाराष्ट्र पदमशाली संघमच्यावतीने “   मूक मोर्चा “  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला . या मोर्चाची सुरुवात भवानी पेठमधील कामगार मैदानापासून करण्यात आली . हा मोर्चा नाना पेठ , ए. डी. कॅम्प चौक , पावर हाऊस , समर्थ पोलीस स्टेशनमार्गे ससून कर्मचारी वसाहत , जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला .

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले . अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील १० वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अफसर लतीफ सय्यद यास फाशीची कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी .पीडित कुटुंब आर्थिक दृष्टया दुर्बल आहे . त्यामुळे पीडित कुटुंबावर दबाव येऊ नये . यासाठी तातडीने कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे . नराधमास मदत करणारे व दबाव टाकणारे यांनाही सहआरोपी करावे , सदर खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा , नामांकित विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी , पीडित मुलीच्या कुटुंबाला तातडीची मदत २५ लाख रूपये दयावे . पीडित मुलीच्या शिक्षणासाठी खर्च शासनाने करावा व भविष्यात तिला शासकीय नोकरीची लेखी हमी द्यावी , मुलीच्या सर्व प्रकारची उच्च दर्जाची वैद्यकीय मदत मिळावी , पीडित मुलीच्या कुटुंबीयास पूर्ण संरक्षण मिळावे. या सर्व मागण्या मान्य करून खऱ्या अर्थाने पीडित कुटुंबाला न्याय द्यावा . या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या .

या मूक मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्र पदमशाली संघमचे अध्यक्ष वसंतराव येमूल , कार्याध्यक्ष सोमनाथ केंची , पुणे शहर पदमशाली पंच कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोड्डू , अध्यक्ष पंकज सामल , पश्चिम महाराष्ट्र पदमशाली युवक संघमचे अध्यक्ष महेश यमजाल , पुणे शहर पदमशाली युवक संघमचे अध्यक्ष नरेश पासकटी , प्रशांत दासरी , मनिष आंदे , रोहन दंतुल , महिलाध्यक्षा वंदना पासकटी , शुभांगी आंदे , नंदा गरदास, दीपाली जनु  , मीनाक्षी काडगी , महेश मद्दी, देविदास अंकम, विनोद जालगी, रविंद्र बोगम , महादेव काडगी , विनोद गंदाल, मेघा चिंतल , श्रीकांत कोनपेल्ली , गोपाळ येमूल , भास्कर तन्नीर , राहुल मेरगू , श्रीनिवास गुड्डूर , सुहास मंचे , दिनेश दोमा, अभिजित जिंदम , उमा भंडारी , रोहिणी चन्नुर व अनुराधा भंडारी व मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते .