पुणे फर्स्टद्वारे समुपदेशन आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध
पुणे :मजेखातर म्हणा ‘थ्रिल’ म्हणून अजाणते वयात पोलीस स्टेशनची पायरी चढलेल्या आणि पोलीस दफ्तरी गुन्हे दाखल झालेल्या १५ ते २५ वयोगटातील तरुण – तरुणींच्या पुनर्वसनासाठी आता पुणे फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे . भरकटलेल्या तरुणाईला समुपदेशनाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांचे पुर्नवसन करणार असल्याची माहिती पुणे फर्स्टचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली.
यासंदर्भात पुणे फर्स्टचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, सध्या १५ ते २५ या वयोगटातील तरुण – तरुणींकडून कुसंगतीमुळे अनेक गुन्हे घडत असल्याची वास्तवता आहे.
कुसंगतीमुळे गुन्हेगारीच्या मार्गावर असलेल्या या पिढीला आज दिशा देण्याची नितांत गरज आहे.त्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.
त्यानुसार पुणे फर्स्ट या आमच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत समुपदेशन आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. छोटे -छोटे गुन्हे दाखल असलेल्या या १५ ते २५ वयोगटातील तरुण – तरुणींचे आयुष्य उद्धवस्त होऊ नये आणि गुन्हेगारीचा आलेख उंचावू नये यासाठी पुणे फर्स्टद्वारे विविध कंपन्यांशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि कंपन्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या तरुण – तरुणींना व्यवसाय – नोकरीद्वारे नवा चेहरा मिळावा आणि गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त करावे हा उद्देश असून हा उपक्रम पुणे शहर पोलिसांच्या सहकार्याने राबविण्याचा मानस आहे .