Home Blog Page 3074

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

0

पुणे -पुणे नवरात्रौ महोत्सव या सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतर्गत संपन्न होणार्‍या पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा 19वे वर्ष साजरे करीत असून याचे उद्घाटन गुरुवार दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेसमोर, वसंतराव बागुल उद्याननजीक, शिवदर्शन, पुणे येथे संपन्न होईल. याचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या
अतिरिक्त आयुक्त शीतल उगले करणार आहेत. याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या महिलांना’तेजस्विनी’ पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. ‘माहेर’ मासिकाच्या कार्यकारी संपादिका सुजाता देशमुख, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर आणि भोर येथील राज्य शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम
करणार्‍या शीतल चव्हाण यंदाच्या ‘तेजस्विनी’पुरस्काराच्या मानकरी आहेत. 5000/- रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी दिली.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात भाग्यलक्ष्मी स्पर्धा व लकी ड्रॉ यांचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्यांना मोठी बक्षिसे दिली जातील. महिला महोत्सवाच्या उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.12 रोजी सकाळी 10 वाजता कन्यापूजन, दि. 13 रोजी इयत्ता 1 ली ते 3 री, इयत्ता 4 थी ते 6
वी आणि 7 वी ते 9 वी या वयोगटातील मुलींसाठी सकाळी 9 वाजता चित्रकला स्पर्धा, दि. 14 रोजी सकाळी 10 वाजता 8 ते 12 वर्षे व 13 ते 20 वर्षे वयोगटातील मुलींसाठी नृत्य स्पर्धां, दि. 15 रोजी सायंकाळी 6 वाजता महिलांची महाआरती आणि दि. 16 रोजी महिलांचे श्री सुक्तपठण संपन्न होईल. कन्यापूजन व महाआरतीसाठी नाव नोंदणी आवश्यक असल्याचे अध्यक्षा सौ.
जयश्री बागुल यांनी सांगितले.
यंदाच्या ‘तेजस्विनी’ पुरस्काराच्या मानकरी असणार्‍या सुजाता देशमुख या ‘मेनका प्रकाशनामध्ये ग्रंथसंपादक असून माहेर मासिकाच्या कार्यकारी संपादक आहेत. नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आत्तापर्यंत त्यांनी 12 पुस्तके संपादित केली असून यापूर्वी पुण्यातील विविध वृत्तपत्रे व वृत्त एजन्सीमध्ये पत्रकार म्हणून त्यांनी काम केले आहे.’मंथन’या बेळगाव इथल्या संस्थेने आयोजित केलेल्या 21व्या मराठी महिला साहित्य संमेलनाचे
अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
मीनल मोहाडीकर महिला उद्योजकांना मार्गदर्शन व योग्य दिशा दाखवण्याचे कार्य आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’तर्फे दीर्घकाळ करीत आहेत.’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर’च्या त्या माजी अध्यक्ष असून महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या त्या उपाध्यक्ष
आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे ‘कन्झ्युमर शॉपी’ व फेस्टिव्हल शॉपी या नावाने नियमित प्रदर्शने त्या आयोजित करतात. खाद्य पदार्थ वितरक संस्था ‘स्वरूप एजन्सी’च्या त्या संचालक आहेत.
भोर येथील शीतल चव्हाण या राज्य शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करतात. तेथे सफाई कामगार म्हणून काम करणारी ही तरुण मुलगी फार आधीपासून शवविच्छेदन कामात जबाबदारी घेऊन शवविच्छेदन करते. आतापर्यंत शेकडो मृतदेहांचे तिने शवविच्छेदन केले असून एवढ्या लहान वयात शवविच्छेदनाची जबाबदारी पार पाडणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच मुलगी असावी.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या दि. 11 ऑक्टोबरच्या उद्घाटन सोहोळ्यात या 3कर्तबगार महिलांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार 5000/- रु. रोख, स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ देऊन गौरवले जाणार आहे असे सौ. जयश्री बागुल यांनी सांगितले.

सलीम-सुलेमान यांचा मराठीत ‘प्रवास’

0

 शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ चित्रपटाच्या निमित्ताने सलीम–सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण

 आजवर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मांदियाळीत हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक आघाडीची संगीतकार जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट या दोघांचीही आपली एक खास ओळख आहे. या जोडीने हिंदी चित्रपटांसाठी गायक-संगीतकार म्हणून काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही प्रसिद्ध जोडी आता मराठी चित्रपटात संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहे. शशांक उदापूरकर दिग्दर्शित प्रवास या आगामी मराठी चित्रपटात त्यांच्या संगीताची जादू अनुभवता येणार आहे.

‘चक दे इंडिया’, ‘अब तक छप्पन’, दोस्ताना’, ‘धूम २’ , ‘फॅशन’ , ‘सिंग इज किंग’ ‘मुझसे शादी करोगी’, ‘आजा नचले’ ‘इक्बाल’   ‘हम तुम’ या सारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटातील सलीम- सुलेमान यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांवर गारूड केले आहे. आता मराठीतही आपला जलवा दाखवायला ते सज्ज झाले आहेत.

‘प्रवास’ चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने संगीतकार सलीम- सुलेमान, गायक सोनू निगम आणि  गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन गुणी कलावंत एकत्र आले आहेत. या गाण्याचं रेकोर्डिंग नुकतंच संपन्न झाले आहे.प्रवास चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे सलीम- सुलेमान सांगतात की,  आमच्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. या निमित्ताने आम्ही मराठी चाहत्यांसाठी गीत-संगीताची अनोखी पर्वणी देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.

ओम छंगानी फिल्म्स निर्मित प्रवास या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी  सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे.

श्रीकृष्ण तांबे’ यांचे कार्य दिपस्तंभासारखे- डॉ. अनिल अवचट

0
रामकृष्ण डुंबरे यांना  ‘श्रीकृष्ण भूषण पुरस्कार’प्रदान
ओतुर – दि.८ (संजोक काळदंते)
ओतूर हे सत्यशोधक चळवळीचे मुख्य केंद्र होते. शिक्षणाची गंगोत्री आपल्याला शुध्द करेल. जीवनात जिवाभावाचे मित्र जोडावेत. जीवन सकस जगण्यासाठी अनेक गोष्टी याव्या लागतात. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. खेडयांनी शहरांच अनुकरण करू नये. ‘ते झाड कुठे रे गेले’ या कवितेतून झाडांचे महत्त्व सांगितले. आपल्या मातीशी प्रामाणिक रहा.दुसऱ्याला जगण्याला मदत करणे म्हणजे जीवन होय. सर्वांना प्रकाश देणारे दिप आपण होऊया असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी ओतुर येथे केले.
ग्रामविकास मंडळ ओतूरच्या वतीने जुन्नरचे माजी आमदार ‘श्रीकृष्ण रामजी तांबे’ उर्फ झांबरशेठ यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन चैतन्य विद्यालय ओतूर या ठिकाणी करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  आदरांजली समारंभास जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, गटनेत्या आशाताई बुचके, उद्योजक मारूती नरवडे, नितीन गाढवे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे आदी उपस्थित होते.
स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणारा कै.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे भूषण पुरस्कार यावर्षी  काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट खामुंडी चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पंढरीनाथ डुंबरे यांना ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरदअण्णा चौधरी,शिवनेर भुषण ह.भ.प.विष्णूपंत ढमाले, जि.प.सदस्य मोहित ढमाले,श्री.गजानन महाराज शिक्षण मंडळाचे सचिव वैभव तांबे,गाडगे महाराज मिशनचे संचालक नितिन पाटील,माजी सरपंच गंगाराम डुंबरे,भा.ज.प.चे तालुका अध्यक्ष भगवान घोलप, वसंत तांबे, जयवंत पानसरे, भरत अवचट, रंगानाथ पाटील घोलप, वसंत दांगट, शकुंतला डुंबरे, प्रमिला शिंदे, भानुविलास गाढवे,ॲड. संजय शेटे, शांताराम शिंगोटे, आत्माराम गाढवे, रघुनाथ तांबे, प्रभाकर काका तांबे,ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष माधवराव डुंबरे, राजेंद्र डुंबरे, प्रदिप गाढवे, पंकज घोलप, मुख्याध्यापक , शिक्षक, बहुसंख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप गाढवे व पाहुण्यांचा परीचय व सत्कार यांचे नियोजन शरद माळवे यांनी केले. सूत्रसंचालन पुरस्कार समितीचे कार्यवाह भाऊसाहेब खाडे  यांनी केले तर आभार पंकज घोलप यांनी मानले.

मतदार नावनोंदणी अभियानाला ‘पर्वती’मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे-. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरु करण्यात आलेल्या मतदार नावनोंदणी अभियानाला पर्वती विधानसभा मतदारसंघात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी स्वतः  नव्या मतदारांची नोंदणी केली. 
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदार संघातर्फे अध्यक्ष नितीन कदम यांनी  मतदार नावनोंदणी अभियानाचे आयोजन केले होते. त्यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी स्वतः नव मतदारांची नोंदणी केली. या अभियानाला सोसायटी आणि मिश्र वस्तीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळीकार्याध्यक्ष दिलीप कांबळे, श्वेताताई होनराव,श्रीमती,मा.फहीम शेख, रझियाआपा काझी,लक्ष्मीताई होनराव, दिनेश खराडे ,मोहसीन काझी ,बाबा महेदवी ,अन्वर  शेख,महेबुब मणियार,इरफान बांगी,शाफिक सय्यद,दादालाल हन्नूर,मकबूल भोले, मुबारक हन्नुरे,उमेश डोलारे,लखन वाघमारे,योगेश रणदिवे, संतोष अडागळे,सलीम सय्यद, सोहेल शेख,जावेद हन्नुरे तसेच पर्वती मतदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मोहसीन काझी,बाबा महेदवी,संग्राम होनराव यांनी विशेष परिश्रम घेतले. 

‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल

0

पूर्वीच्या काळी जशी नॉन फिल्मी कॅसेट्स किंवा रेकार्ड्समध्ये गाजलेली काही गाणी सिनेमातही ऐकायला मिळायची. आजही ती परंपरा सुरू आहे. केवळ माध्यमं बदली आहेत. आजच्या काळात यूट्युबवर गाजलेली काही गाणी सिनेमांच्या माध्यमांतून घराघरात लोकप्रिय होत आहेत. दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या मी शिवाजी पार्कया सिनेमातही असंच एक गाजलेलं गाणं ऐकायला मिळणार आहे. सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी लोकप्रिय झालेल्या सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय या  गाजलेल्या गाण्याचं विडंबन मी शिवाजी पार्कया चित्रपटात पहायला मिळणार आहे. गौरी पिक्चर्स प्रोडक्शनमहेश मांजरेकर मूव्हीजचा मी शिवाजी पार्कहा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय कायया गाण्याचं महानगर पालिकेच्या कारभारावर भाष्य करणारं विडंबनही खूप गाजलं. प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी आता या गाण्याचं आणखी एक विडंबन केलं आहे. मी शिवाजी पार्कया चित्रपटासाठी श्रीरंग गोडबोले यांनी दीघ्या तुझा पोलिसांवर भरवसा ‘हाय कायहे गीत लिहिलं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ, विक्रम गोखले, शिवाजी साटम, सतिश आळेकर आणि विद्याधर जोशी यांच्यासह महेश मांजरेकर यांनी हे गीत गायलं आहे. गायक-संगीतकार अजित परबने या गीताला स्वरसाज चढवला आहे.

मी शिवाजी पार्कहा सिनेमा वर्तमानकाळात घडणाऱ्या वास्तव घटनेवर प्रकाश टाकणारा असल्याने अशा प्रकारच विडंबनात्मक काव्य करण्याची कल्पना सुचली आणि भरवसा हाय काय…’ हे गाणं या चित्रपटात आल्याचं मांजरेकर सांगतात. या चित्रपटात पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट आहे. या प्रत्येक अभिनेत्याच्या आवाजाची वेगळी ओळख आहे. प्रोफेशनल गायकांच्या आवाजात हे गाणं जर रेकार्ड केलं असतं, तर यांच्या आवाजाची जादू गाण्यात उतरवता आली नसती. यासाठी हे गाणं चित्रपटातील कलाकारांसोबतच ध्वनीमुद्रित करण्यात आल्याचंही मांजरेकर म्हणाले. अशोक सराफ, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी पार्श्वगायन करण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी इतर कलाकारांच्या आवाजात एखादं गाणं ऐकणं ही मात्र प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण गोष्ट ठरणार आहे. हाच या गाण्याचा मुख्य युएसपी आहे.

या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून  मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत. छायांकन करण रावत यांचे असून संकलन सर्वेश परब यांनी केले आहे.

१८ ऑक्टोबरलामी शिवाजी पार्क सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

गांधीना मारल्यानंतरही गांधी विचारांचा शोध भारतात निरंतर सुरु :प्रा. अपूर्वानंद झा

0

पुणे :’गांधीना मारल्यानंतरही त्यांचा, त्यांच्या विचारांचा भारतात निरंतर शोध सुरु आहे. त्यांनी राजकारणाला रणभूमी न करता नैतिकतेचे आंदोलन केले, भवतालच्या प्रत्येक समस्येला त्यांनी मानवतेचे कोंदण दिले ‘ , असे प्रतिपादन दिल्ली विश्वविद्यापीठातील प्राध्यापक अपूर्वानंद झा यांनी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ निमित्त प्रा. अपूर्वानंद झा (प्राध्यापक, दिल्ली विश्वविद्यापीठ) यांनी ‘गांधी की खोज’ विषयावर व्याख्यान दिले.

हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी येथे झाला.

यावेळी व्यासपीठावर अन्वर राजन, संदीप बर्वे, मयुरी शिंदे, अप्पा अनारसे उपस्थित होते.

प्रा.अपूर्वानंद म्हणाले, ‘ महात्मा गांधी ही भारतीय दंतकथा आहे. त्यांना आपण महात्मा समजत असलो तरी एक राजकीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहायला हवे. त्यांनी राजकारणाला रणभूमी न करता नैतिकतेचे आंदोलन केले.
गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्यासाठी भारतीयांना जागे केलेच पण भारतीय स्वातंत्र्यलढयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवतेचा लढा असे स्वरुप दिले.

अस्पृश्यता विरोध, न्यायाचा शोध, हिंदू – मुस्लीम एकता हे त्यांच्या जगण्याचे महत्वाचे अंग होते. भवतालच्या प्रत्येक समस्येला ते मानवतेचे कोंदण देत होते. प्रत्येक वेळी ते
अंतरात्म्याचा आवाज ऐकत होते.

भारतीय नागरिक,अनुयायी,सहकाऱ्यांकडूनही ते कठोर योगदानाची अपेक्षा करीत. गांधीजींच्या स्वप्नात एक भारत होता, त्या भारताचा ते सतत शोध घेत होते.

अहिंसा ही रणनीती न मानता नीति म्हणून अंगीकारावी असा त्यांचा आग्रह होता.
गांधींजींनी स्वतःसाठी आणि भारतीयांसाठी निवडलेला उच्च नैतिकतेचा मार्ग अत्यंत खडतर होता, हेही त्यांच्या हत्येचे कारण होते का ? असा प्रश्न पडतो. सवर्णांचा क्रोध हेही त्यांच्या हत्येला कारणीभूत ठरले.

गांधीजींचे जीवन ही प्रयोगांची साखळी आहे. त्यात यश -अपयशाच्या पलिकडे बरेच काही आहे. गांधींचे अपयश हे त्यांची हाक न ऐकणाऱ्यांचेही अपयश आहे. गांधींचे अपयश आपले अपयश न मानणे , ही आत्मवंचना ठरेल, असेही प्रा. अपूर्वानंद यांनी शेवटी सांगीतले.

उद्योगक्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज-डॉ. विश्वनाथ लेले

0

पुणे : “बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. परंतु, त्यासाठी केवळ अभियांत्रिकीची पदवी पुरेशी नाही. पदवीसोबतच विद्यार्थ्यांनी इतर कौशल्य आत्मसात करणे ही आजची गरज आहे. कारण उद्योगक्षेत्राकडून कुशल मनुष्यबळाची मागणी केली जात आहे,” असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या (एनआयसीएमएआर) ‘प्लेसमेंट अँड इंडस्ट्री रिलेशन विभागाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ लेले यांनी व्यक्त केले.

वाघोली येथील जीएच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे ‘बांधकाम व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ या विषयावर आयोजित एक दिवसाच्या सेमिनारमध्ये डॉ. लेले बोलत होते. याप्रसंगी ‘एनआयसीएमएआर’चे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत गोखले, डॉ. जोनार्दन कोनेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, विभागप्रमुख प्रा. एस. जी. बन, प्रा. एस. व्ही. जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. चंद्रकांत गोखले म्हणाले, “पायाभूत सुविधा उभारणीचे काम जोमाने चालू आहे. बांधकाम क्षेत्रालाही चांगले दिवस येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित विषयात आपली निपुणता असली पाहिजे.” डॉ. जोनार्दन कोनेर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. एन. यू. कोरडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. एस. शिंदे यांनी संयोजन केले व आभार मानले. 

धोकादायक होर्डींग्ज तातडीने काढा -दुर्घटनाग्रस्तांना रेल्वेत नौकरी द्या – चेतन तुपे पाटील

0

पुणे -शहरातील धोकादायक होर्डींग्ज तातडीने महाप्लीकेने काढून घ्यावेत आणि जुनाबाजार येथील दुर्घटनाग्रस्तांना अगर त्यांच्या नातलगांना रेल्वेने नौकरी द्यावी अशी मागणी काल महापालिकेतील विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी केली .

कॅंटोन्मेंट राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने काल पुणे शहरातील शाहीर अमर शेख चौकातील बेकायदा होर्डीगचा सांगाडा कोसळुन चार नागरीकांचा बळी गेला त्या मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी पुणे कॅन्टोमेंट मतदार संघाच्या वतीने कॅन्डल लावुन भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरीकांनी याविषयी तीव्र असंताप व्यक्त केला. या होर्डिंग्सचे जे व्यवसायिक आहेत त्यांच्याकडुन मिळणारी मलई खावुन जे अधिकारी अशा धोकादायक होर्डिंग्स ला भरिस त्यांच्यावर सुध्दा कारवाई व्हावी अशी मागणी नागरीक करत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी श्रध्दांजली वाहताना यासारखे अनेक धोकादायक होर्डिंग्स पुणे शहरात आहेत त्या सर्व होर्डिंग्सवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व राज्यात जी होर्डिंग्स पॉलीसी आहे ती पुणे शहरामध्ये राबविण्यात यावी तसेच रेल्वेने जी मदत जाहीर केली आहे त्यापेक्षा त्या कुटुंबातील सदस्याला रेल्वे मध्ये नोकरी देण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रदिप गायकवाड,भोलासिंग अरोरा, राकेश कामठे, फहीम शेख, शशी भिसे, विशाल नाटेकर,गणेश नलावडे,मिनाताई पवार, मेहबुब शेख, अजीम गुडाकुवाला, नितीन राठोड, निखिल बटवाल, राहुल तांबे, माधुरी भांडरकर, गोपी कुवर , संतोष गायकवाड, मंगेश मोरे, दिपक कांबळे, जावेद इनामदार,भारत परदेशी तसेच या भागातील स्थानिक नागरीक उपस्थित होते.

पालिकेच्या दिशादर्शक कमानींचे ऑडिट करा माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी

0
पुणे –
जुना बाजार येथे होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या लोखंडी दिशादर्शक कमानींचे  स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर मधोमध दिशादर्शक कमानींची उभारणी करण्यात आलेली आहे.गेले अनेक वर्षे या कमानींची स्थिती काय याची तपासणी झालेली नाही. जुना बाजार येथील होर्डिंग कोसळून चार नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला आहे तर आठ नागरिकांना गंभीर दुखापती झालेल्या आहेत. निष्काळजीपणा आणि होर्डिंगच्या कमकुवतपणांकडे दुर्लक्ष झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने तातडीने विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या दिशादर्शक कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नितांत गरज आहे. ज्या कमानी कमकुवत झालेल्या आहेत,त्या तातडीने काढून टाकण्यात याव्यात असेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे.

मराठी तरुणाईला वैचारिक वाङ्मय आवडते : आ. ह. साळुंखे

0

पुणे : “तरुणपिढी स्वैराचारी, सोशल मीडियात गुरफटत असून, वाचनसंस्कृती लोप पावत आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. तरुणांमध्ये ज्ञानाची भूक मोठी आहे. ही भूक इंटरनेट भागवू शकत नाही. मराठी तरुणाईला वैचारिक वाङ्मय वाचायला आवडते. तसे सकस साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले.

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर ‘पुस्तकांबरोबर चहा’ या संकल्पनेतून सुरु झालेल्या ‘वर्ड्स अँड सीप्स’ या बुक कॅफेला डॉ. साळुंखे यांनी भेट दिली. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. येथे असलेल्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील अनेक गाजलेली दर्जेदार पुस्तके पाहून डॉ. साळुंखे यांनी कौतुक केले. प्रसंगी सनदी अधिकारी धीरज मोरे, ‘वर्ड्स अँड सीप्स’चे एजाज शेख आदी उपस्थित होते.

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, “पुस्तके आणि चहा असे मिश्रण असलेले ग्रंथालय पहिल्यांदाच पाहिले. सहज चहा घेताना सेल्फमध्ये लावलेल्या पुस्तकांवर नजर पडते आणि पुस्तक वाचण्याची इच्छा होते, असे हे बुक कॅफे आहे. तरुणपिढीला वाचायला लावण्याचा हा अनोखा प्रयत्न कौतुकास्पद आहे. व्यासंगी वाचकांसाठी या तरुणांनी साहित्याचा एक खजिना उपलब्ध करून दिला आहे.” एजाज शेख यांनी स्वागत केले.

पुणे होर्डिंग दुर्घटना, दोघांना अटक:दुर्घटना रेल्वेमुळेच-जाहिरात कंपनीचा दावा

0

पुण्यातल्या होर्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमधे लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डींग काढण्याचे काम करत होते. मात्र होर्डींग वरुन कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी दुपारी जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले. मध्ये रेल्वेच्या जागेत रस्त्यालगत हे होर्डिंग उभारण्यात आले होते.

दुघर्टनेसाठी ‘रेल्वे’ जबाबदार; जाहिरात कंपनीचा दावा

मध्य रेल्वे प्रशासनाने यासाठी जाहिरात एजन्सीला दोषी ठरवले आहे. परंतु, आता ज्या जाहिरात कंपनीकडे या होर्डिंगचा ठेका होता. त्यांनी मात्र या दुर्घटनेसाठी मध्य रेल्वेच दोषी असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी यापूर्वी मध्य रेल्वेशी हे होर्डिंग काढण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती पुरावा म्हणून सादर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, या प्रकारातून मध्य रेल्वे प्रशासनाची अनास्थाही समोर आली आहे.

शुक्रवारी पुण्यातील जुना बाजार मुख्य चौकातील होर्डिंगचा लोखंडी सांगाडा काढताना तो सिग्नलसाठी उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पडला होता. यात चार जणांना नाहक जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर एकमेकांकडे बोट करण्यात आले.
या होर्डिंगचा ठेका कॅप्शन या जाहिरात कंपनीकडे होता. यापूर्वी या कंपनीने अनेकवेळा मध्य रेल्वेच्या अभियंता विभागाला हे होर्डिंग काढण्याबाबत पत्रव्यवहार केला. पण त्यांना रेल्वे प्रशासनाकडून कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. या अनास्थेमुळे मात्र चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर गंभीररित्या जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत

पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; 11 डिसेंबरला निकाल

0

मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली -केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका १५ डिसेंबरपूर्वी घेण्याची घोषणा आज केली. तसेच या निवडणुकांसाठी आचारसंहिता आजपासून लागू होत असल्याचेही निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्पा १२ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबर रोजी होईल. मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर रोजी, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभेसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असल्याचे रावत यांनी जाहीर केले आहे.या पाच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, पत्रकार परिषदेची वेळ दुपारी साडे बारा ऐवजी बदलून दुपारी 3 वाजता करण्यात आल्याबद्दल निवडणूक आयोगाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला निवडणूक होईल. छत्तीगसडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होईल. या पाचही राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे. तेलंगणामध्ये टीआरएसने नुकतीच विधानसभा विसर्जित केली होती. ठरलेल्या वेळेआधी निवडणुका व्हाव्या अशी त्यांची इच्छा होती. त्याठिकाणी पुढील वर्षी निवडणूक होणार होती. तर मिझोरममध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

निवडणूक कार्यक्रम असा

छत्तीसगड पहिला टप्पा (यात नक्षलग्रस्त भागात मतदान होणार) 
अधिसूचना : 16 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर
अर्जांची छाननी : 24 ऑक्टोबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टोबर
मतदान : 12 नोव्हेंबर
एकूण जागा : 18
छत्तीसगड दुसरा टप्पा 
एकूण जागा : 72
अधिसूचना : 26 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 3 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर
मध्यप्रदेश आणि मिझोरम 
अधिसूचना : 2 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 12 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर
मतदान : 28 नोव्हेंबर
राजस्थान आणि तेलंगाना
अधिसूचना : 12 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 20 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर
मतदान : 7 डिसेंबर
सर्व राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होतील. 
कोणत्या राज्यात कधी संपणार विधानसभांचा कार्यकाळ 
छत्तीसगड : 5 जानेवारी 2019
मध्यप्रदेश : 7 जानेवारी 2019
राजस्थान : 20 जानेवारी 2019
मिझोरम : 15 डिसेंबर 2018

2013 ची स्थिती

पक्ष मध्यप्रदेश छत्तीसगड राजस्थान
भाजप 165 49 163
काँग्रेस 58 39 21
बसपा 4 1 3
इतर 3 1 13
एकूण 230 90 200
सध्याचे सरकार भाजप भाजप भाजप

लोकसभा निवडणूक 2014 ची स्थिती

पक्ष मध्यप्रदेश छत्तीसगड राजस्थान
भाजप 27 10 25
काँग्रेस 2 1 0
बसपा 0 0 0
एकूण 29 11 25
सत्तेचे दावेदार
मध्यप्रदेश – शिवराज सिंह चौहान, कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया
छत्तीसगड – रमन सिंह, अजित जोगी, भूपेष बघेल, टीएस सिंहदेव
राजस्थान – वसुंधरा राजे सिंधिया, अशोक गेहलोत, सचिन पायलट
प्रत्येक ठिकाणी प्रचाराचे तीनच चेहरे : नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी
निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह
निवडणूक आयोग आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. यासाठीची पत्रकार परिषद पूर्वनियोजित वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता होणार होती. पण आयोगाने ती अचानक पुढे ढकलून ३ वाजता ठेवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज दुपारी १ वाजता अजमेर येथे रॅली आहे, त्या पार्श्वभूमीवर आयोगाने पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

भाजप – सेना युती झाल्यास लक्ष्मण जगताप यांची भाजपला सोडचिट्ठी! लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीकडून इच्छुक!

0

मुंबई-पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांनी असमर्थता दर्शवली असून पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली, तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्या प्रतीप्रश्नावर अजित पवार यांनी या बैठकीत सूचक मौन बाळगले असल्याचे समजते. दरम्यान मावळ मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी पक्षाकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भाजप – सेना युती झाल्यास लक्ष्मण जगताप भाजपला सोडचिट्ठी देतील अशी शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप यांचा सुरु झालेला प्रवास राष्ट्रवादी ते शेकाप असा होऊन पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष प्रवेशापर्यंत पोहोचला हा प्रवास आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्ण गोलाकार होऊन पुन्हा राष्ट्रवादी पक्षाकडे चक्राकार पद्धतीने सुरु राहणार की काय अशी चर्चा सुरु आहे. अशी राजकीय उलथापालथ झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण ढवळून निघेल. मावळ लोकसभा मतदार संघाचा पवार यांनी आढावा घेतला. मतदार संघात पक्षाची बांधणीची माहिती घेतली. कोण कोण इच्छुक आहे याची माहिती घेतली. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपण मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. संजोग वाघेरे यांनी मतदार संघातील राजकीय परिस्थितीची माहिती शरद पवार यांना दिली. शरद पवार यांनी यावेळी मावळातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलाच पाहिजे. सर्वांनी एकदिलाने काम करा, अशा सूचना दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत दोन दिवस बैठक होत आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत काँग्रेसकडील मतदारसंघांवर दावा सांगताना राष्ट्रवादी हा मतदारसंघ कशा प्रकारे जिंकणार याचा आढावा घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्यातली एक जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून देण्यास तयार आहे. राष्टावादी काँग्रेसला काँग्रेसकडून काही जागा बदलून हव्या आहेत. 2019 ची निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून दोन आकडी जागा जिंकण्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. पुणे, औरंगाबाद, हातकणंगले, जालना या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे मागितलेल्या आहेत. तर राजू शेट्टी यांना आपल्या कोट्यातून हातकणंगलेची जागा देण्यास राष्ट्रवादी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसकडून परभणी आणि अमरावती या जागा बदली करून हव्या आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लढलेल्या जागा पुढीलप्रमाणे आहेत जळगाव, रावेर, बुलढाणा, अमरावती, भंडारा, परभणी, दिंडोरी, नाशिक, कल्याण, ठाणे, ईशान्य मुंबई, रायगडमावळ, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, माढा,सातारा,कोल्हापूर अशा आहेत याशिवाय मुंबईतही राष्ट्रवादीला एक जागा वाढवून हवी आहे. मुंबईतील मुंबई उत्तर पश्चिम म्हणजे जिथून गुरुदास कामत यांनी निवडणूक लढवली ती जागा किंवा प्रिया दत्त लढवत असलेली मुंबई उत्तर मध्यची जागा देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या व्यतिरिक्त काही जागांवर उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत त्यामध्ये ईशान्य मुंबई -संजय दिना-पाटील, ठाणे -संजीव नाईक, रायगड-सुनील तटकरे, बारामती – सुप्रिया सुळे, कोल्हापूर – धनंजय महाडिक, भंडारा-गोंदिया – प्रफुल्ल पटेल, नाशिक – छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ, दिंडोरी – डॉ. भारती पवार, जळगाव – मनिष जैन, माढा – विजयसिंह मोहिते-पाटील, उस्मानाबाद – पद्मसिंह पाटील या नावांचा समावेश असून यांची नावं निश्चित झाल्याचे समजते आहे.

लोकसभा निवडणूक लढविणार नाही – शरद पवार यांनी केले स्पष्ट

0

मुंबई-मी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यातूनही निवडणूक लढविण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातून निवडणूक लढविण्याचा चर्चेला पूर्णविराम दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक मुंबईत घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ असे सर्व महत्त्‍वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी पुण्यातून निवडणूक लढविण्यासाठी कोण इच्छुक आहे का? अशी विचारणा केली. त्यावर उपस्थितांमधून कोणीच पुढे आली नाही. त्यानंतर प्रवक्ते अंकुश काकडे यांनी उभे राहून शरद पवारसाहेब तुम्हीच पुण्यातून निवडणूक लढवावी, तुम्ही उमेदवार असेल तर कोणाचाच विरोध राहणार नाही, टीव्‍ही चॅनलच्या माध्यमातून मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यावर पवार यांनी लगेच माईक हातात घेत मी या आधीच लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीचा प्रश्न येत नाही. काकडे यांना वृत्त वाहिन्यांवर चर्चेची निमंत्रण येत असतात त्याचा त्यांनी आनंद घ्यावा असे सांगून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

माजी आमदार बापू पठारे यांनी शहराध्यक्ष चेतन तुपे यांचा दावा खोडला

0

मुंबई-आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक मुंबईत घेतली या आढावा बैठकीत पुण्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाची ताकद काँग्रेसपेक्षा कशी जास्त आहे याचा सविस्तरपणे आढावा सादर केला. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे नगरसेवक कसे जास्त आणि पालिका निवडणुकीत मिळालेले मतदान आणि त्याची टक्केवारीही सादर केली. मात्र, त्यानंतर माजी आमदार बापू पठारे यांनी ही पुण्यात पक्षाची ताकद एवढी नसून चेतन तुपे यांनी जी माहिती दिली त्यात बारामती आणि शिरूर मतदार संघात मोडणाऱ्या खडकवासला व हडपसर या मतदार संघातील आकडेवारीचा समावेश आहे. प्रत्यक्ष पुणे लोकसभा मतदार संघात एवढे नगरसेवक नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत त्यांनी पक्षाच्या शहरातील ताकदीचा दावा खोडून काढला त्यानंतर ही बैठक काही वेळातच संपविण्यात आली.