पुणे –
जुना बाजार येथे होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या लोखंडी दिशादर्शक कमानींचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर मधोमध दिशादर्शक कमानींची उभारणी करण्यात आलेली आहे.गेले अनेक वर्षे या कमानींची स्थिती काय याची तपासणी झालेली नाही. जुना बाजार येथील होर्डिंग कोसळून चार नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला आहे तर आठ नागरिकांना गंभीर दुखापती झालेल्या आहेत. निष्काळजीपणा आणि होर्डिंगच्या कमकुवतपणांकडे दुर्लक्ष झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने तातडीने विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या दिशादर्शक कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नितांत गरज आहे. ज्या कमानी कमकुवत झालेल्या आहेत,त्या तातडीने काढून टाकण्यात याव्यात असेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे.