रामकृष्ण डुंबरे यांना ‘श्रीकृष्ण भूषण पुरस्कार’प्रदान
ओतुर – दि.८ (संजोक काळदंते)
ओतूर हे सत्यशोधक चळवळीचे मुख्य केंद्र होते. शिक्षणाची गंगोत्री आपल्याला शुध्द करेल. जीवनात जिवाभावाचे मित्र जोडावेत. जीवन सकस जगण्यासाठी अनेक गोष्टी याव्या लागतात. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. खेडयांनी शहरांच अनुकरण करू नये. ‘ते झाड कुठे रे गेले’ या कवितेतून झाडांचे महत्त्व सांगितले. आपल्या मातीशी प्रामाणिक रहा.दुसऱ्याला जगण्याला मदत करणे म्हणजे जीवन होय. सर्वांना प्रकाश देणारे दिप आपण होऊया असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी ओतुर येथे केले.
ग्रामविकास मंडळ ओतूरच्या वतीने जुन्नरचे माजी आमदार ‘श्रीकृष्ण रामजी तांबे’ उर्फ झांबरशेठ यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन चैतन्य विद्यालय ओतूर या ठिकाणी करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आदरांजली समारंभास जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, गटनेत्या आशाताई बुचके, उद्योजक मारूती नरवडे, नितीन गाढवे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे आदी उपस्थित होते.
स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणारा कै.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे भूषण पुरस्कार यावर्षी काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट खामुंडी चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पंढरीनाथ डुंबरे यांना ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरदअण्णा चौधरी,शिवनेर भुषण ह.भ.प.विष्णूपंत ढमाले, जि.प.सदस्य मोहित ढमाले,श्री.गजानन महाराज शिक्षण मंडळाचे सचिव वैभव तांबे,गाडगे महाराज मिशनचे संचालक नितिन पाटील,माजी सरपंच गंगाराम डुंबरे,भा.ज.प.चे तालुका अध्यक्ष भगवान घोलप, वसंत तांबे, जयवंत पानसरे, भरत अवचट, रंगानाथ पाटील घोलप, वसंत दांगट, शकुंतला डुंबरे, प्रमिला शिंदे, भानुविलास गाढवे,ॲड. संजय शेटे, शांताराम शिंगोटे, आत्माराम गाढवे, रघुनाथ तांबे, प्रभाकर काका तांबे,ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष माधवराव डुंबरे, राजेंद्र डुंबरे, प्रदिप गाढवे, पंकज घोलप, मुख्याध्यापक , शिक्षक, बहुसंख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप गाढवे व पाहुण्यांचा परीचय व सत्कार यांचे नियोजन शरद माळवे यांनी केले. सूत्रसंचालन पुरस्कार समितीचे कार्यवाह भाऊसाहेब खाडे यांनी केले तर आभार पंकज घोलप यांनी मानले.

