Home Blog Page 307

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा

पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने सादर केलेल्या ‘वासंतिक उटी भजना’ने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून श्रींच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो. त्यानुसार भाविकांकडून श्रींच्या मूर्तीला चंदन, गुलाबजल, अत्तर, केशर, गंधा या मिश्रणाचा लेप लावण्यात आला आणि संपूर्ण मंदिर परिसर मोगऱ्यासह इतर फुलांनी सजवण्यात आले. यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने भजनसेवा करण्यात आली. त्यांच्या सुश्राव्य भजनाच्या स्वरांनी आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

0

पुणे:
पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास १ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. कंपनीतून वायु प्रदुषण होत असून त्याबाबत गुन्हा दाखल करु नये, यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. स्वप्नील मनोहर पाटील (वय ४०) असे या महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. पाटील हा पिंपरी चिंचवड महापालिकेत पर्यावरण अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहे.

याबाबत एका ३० वर्षाच्या उद्योजकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांची भोसरी एमआयडीसीमध्ये श्री ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. गेली १६ वर्षे यांची कंपनी कार्यरत आहे. २५ मार्च रोजी त्यांच्या कंपनीत दोघे जण आले. स्वप्नील पाटील याने सांगितले की, तुमच्या कंपनीच्या विरुद्ध वायु प्रदुषणाची सारथी अ‍ॅपवर ऑनलाईन तक्रार आली आहे. आजु बाजुच्या लोकांना कंपनीतून येणार्‍या वासाचा त्रास होत आहे, असे म्हणून मोबाईलमध्ये आलेली तक्रार दाखविली. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांना संपूर्ण कंपनी दाखविली. कोठेही वायु प्रदुषण होत नसल्याचे दाखविले. त्यानंतर तक्रार करणार्‍याला स्वप्नील पाटील याने बोलावून घेतले. त्यांनी कंपनीत बसून पंचनामा तयार केला. त्यानंतर त्यांना तुमच्याकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे सर्टिफिकेट आहे का अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी सर्टिफिकेट नसल्याचे सांगितले.

त्यानंतर काही दिवसांनी तुमच्याकडे प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे सर्टिफिकेट नसल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. त्याची नोटीस तयार असल्याचे सांगितले. तक्रारदार स्वप्नील पाटील याला पिंपरी महापालिकेतील कार्यालयात जाऊन भेटल्यावर त्याने कारवाई करायची नसेल तर १ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर स्वप्नील पाटील याने तक्रारदार, त्यांचे वडिल, कंपनीचे मॅनेजर यांना वारंवार फोन करुन लाचेची मागणी केली. त्यानंतर १४ मे रोजी त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीची पडताळणी केली असता स्वप्नील पाटील याने १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेत सापळा रचला. महापालिकेतील कार्यालयाबाहेर स्वप्नील पाटील आला. तक्रारदार यांच्या कारमध्ये येऊन त्यांच्याकडून १ लाख रुपये घेऊन स्वप्नील पाटील याने आपल्याकडील सॅगमध्ये ही रक्कम ठेवली. त्याचवेळी तक्रारदार यांनी कारचे चारही इंटीकेटर लावून इशारा केला. तेथेच थांबलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने स्वप्नील पाटील याला पकडले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाटील याला एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून


पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा
– पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 16 : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत 09 जून 2025 पासून सुरू होत आहे.
या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी IRCTC च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.
या प्रेरणादायी यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा चालवावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे”, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी केले आहे.
या उपक्रमासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वाल, वरीष्ठ व्यवस्थापक श्री. संजय ढेकणे तसेच सर्व संबंधित अधिकारी समन्वय साधत परीश्रम करीत असून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहे, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी सांगितले आहे.
🔶 सहल तपशील –
 सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
 शुभारंभ दिनांक: 09 जून 2025
 कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
 प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई
 प्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादर, ठाणे
🚆 यात्रेचा प्रवासमार्ग –
मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

🏰 प्रमुख स्थळांची माहिती –
 रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
 लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
 कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
 शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
 भीमाशंकर ज्योतिर्लिंग – 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
 प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
 कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
 पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): –
उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3AC), सुपीरियर (2AC) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती IRCTC च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: –
 भारत गौरव ट्रेनने प्रवास (SL / 3AC / 2AC)
 AC / Non-AC हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
 सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड
 ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन
 प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)
 सुरक्षा व्यवस्था.

❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: –
 साहसी खेळ, बोटिंग इत्यादी.
 खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.
 इतर कोणताही वैयक्तिक खर्च.
 कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): –
 पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.
 दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).
 तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.
 चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.
 पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.
 सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संपर्क: –
IRCTC वेबसाईट: www.irctctourism.com
/

भाजपा नेत्यांकडून सातत्याने सैन्य दलाचा अपमान, PM मोदी व जे. पी. नड्डांनीच माफी मागावी: हर्षवर्धन सपकाळ

मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा.

मुंबई, दि. १६ मे २५
ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा यांनी केलेले विधान भारतीय सैन्य दलाचा अपमान करणारे आहे. भाजपा नेत्यांच्या अशा वक्तव्याप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपा मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बद्दल केलेले विधान चीड आणणारे होते, देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजपाच्या दुसऱ्या नेत्याने वायफळ बडबड केली आहे. “संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.” असे निर्लज्जपणाचे विधान केले आहे. हे विधान भारतीय सैन्य दलाचे शौर्य, संस्कृती व परंपरेचा घोर अपमान करणारे आहे.
मंत्री विजय शाह यांच्यावर भाजपाने अद्याप कारवाई केलेली नाही. भाजपाचे नेते बेताल विधाने करत असताना नरेंद्र मोदी, अमित शाह व जे. पी. नड्डा गप्प का आहेत? भाजपा हा निर्ढावलेला व मस्तीखोर पक्ष आहे, पण जनता हा अपमान सहन करणार नाही. भाजपाचे मंत्री विजय शाह व जगदिश देवरा या दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत या विकृतांना वेड्याच्या इस्पितळात भरती केले पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट.

मुंबई, दि. १६ मे २५
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही एक शिष्टाचार भेट होती, यावेळी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही तेवढाच महत्वाचा आहे. प्रबोधन ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे हे सांगितलेले आहे. ‘देवांचा धर्म व धर्माची देवळे’ पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आज भाजपा धर्म बुडवायला निघाला आहे. भाजपा लोकशाही व संविधान विरोधी आहे. लोकशाही, संविधान व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढ्यात आगामी काळात सोबत राहणे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्थानिक नेतृत्वाला आघाडीचे अधिकार दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. या निवडणुकीची अधिसुचना निघाल्यावर मित्र पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी लोणार सरोवराची फोटोग्राफी असलेले एक पुस्तक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे फटकारे व पंढरपूरच्या वारीची फोटोग्राफी असलेले पुस्तक त्यांनी भेट दिले तर मी उद्धव ठाकरे यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावरील पुस्तक भेट दिल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ – पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजा कोसळून जीवित आणि वित्तहानी होते, ही हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनास दिले.
सुभेदारी विश्रामगृह येथे आज डॉ. श्रीमती गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, आरोग्य, ऊसतोड कामगार या विषयांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण,महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव आदी बैठकीस उपस्थित होते.
विजा कोसळून होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करावी. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची विशेष तरतूद करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये लाडक्या बहिणी व त्यांच्या किमान पाच सहकाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी. महिलांना होणारे गर्भाशयाचे कर्करोग, स्तनाचे कर्करोग, रक्तक्षय व इतर आजारासंदर्भातची तपासणी होऊन त्यावर उपचार करणे शक्य होईल. त्याद्वारे जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यास मदत होईल. प्रत्येक शासकीय आरोग्य केंद्रातआरोग्य सुविधा सह औषधे यांचा साठाही उपलब्ध करून देण्याबाबतही नियोजन करावे. शाळेमध्ये ‘गुड टच बॅड टच’ सारखे उपक्रम राबवून पोलीस यंत्रणेने शाळेमध्ये निर्भय वातावरण करण्यासाठी पोलीस दीदी आणि पोलीस काका यांच्या माध्यमातून वारंवार भेटी द्यावेत. विद्यार्थ्यांमध्ये निर्भय वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यामध्ये दशसूत्री उपक्रमा अंतर्गत शाळा महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य, तांत्रिक कौशल्य, निर्भय वातावरण, यासाठी उपक्रम राबविले जात असून या उपक्रमाची माहिती यावेळी दिली . विद्यार्थ्यांना समुपदेशन, तक्रारपेटी, शाळांमध्ये तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक यासाठीचे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.

जिल्ह्यामधील ऊसतोड कामगारांची नोंदणी एकूण २५८१३ असल्याचे पंचायत विभागामार्फत सांगितले. या ऊसतोड कामगारांसाठीच्या कामगार विभाग, सामाजिक न्याय विभाग व इतर विभागाने समन्वयाने ऊसतोड कामगारांच्या शैक्षणिक,आर्थिक विकासासाठी योजनांचा लाभ द्यावा,असे निर्देश श्रीमती गोऱ्हे यांनी दिले.

सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे नवीन मल्टी एजन्सी सेंटर (एमएसी) चे केले उद्घाटन

नवी दिल्ली-

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे नवीन मल्टी एजन्सी सेंटर (एमएसी) चे उद्घाटन केले. या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ राजकीय इच्छाशक्तीचे, गुप्तचर संस्थांच्या अचूक माहितीचे आणि आपल्या तिन्ही सशस्त्र दलांच्या अतुलनीय प्रहार क्षमतेचे अद्वितीय प्रतीक आहे. ते म्हणाले की, भारताला आपल्या तिन्ही सशस्त्र दलांचा, सीमा सुरक्षा दलाचा आणि सर्व सुरक्षा संस्थांचा अभिमान आहे.

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगाट्लू हिल्स (केजीएच) येथे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांनी (सीएपीएफ) अलीकडेच केलेल्या ऐतिहासिक नक्षलविरोधी कारवाईबद्दल बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, नक्षलवादाविरुद्धच्या या ऐतिहासिक कारवाईमधून आपल्या सुरक्षा दलांमधील उत्कृष्ट समन्वय दिसून येतो. ऑपरेशन सिंदूर दरम्यानही असाच समन्वय दिसून आला, यावरून हे निदर्शनास येते की एखादी मोहीम राबविण्यासाठी आपल्या गुप्तचर संस्था आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रक्रियेत आणि विचारसरणीत खूप चांगला समन्वय आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नवीन एमएसीमुळे आजच्या वातावरणात भेडसावणाऱ्या जटिल आणि परस्परांशी निगडित राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व एजन्सींच्या प्रयत्नांना समन्वयित करण्यासाठी एक अखंड आणि एकात्मिक व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यांनी आशा व्यक्त केली की हे नवीन जाळे दहशतवाद, उग्रवाद, संघटित गुन्हेगारी आणि सायबर हल्ल्यांसारख्या गंभीर धोक्यांचा सामना करण्यासाठी देशाच्या प्रयत्नांना बळकटी देईल.

अमित शहा यांनी नवीन एमएसी  नेटवर्कची प्रशंसा केली आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी संबंधित कामे विक्रमी वेळेत यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, यामध्ये एमएसी आणि जीआयएस सेवांमधील विशाल डेटाबेसची क्षमता वापरण्यासाठी एम्बेडेड (अंतर्भूत) एआय/एमएल तंत्रांसारख्या भविष्यकालीन क्षमतांचा समावेश आहे.

नवीन एमएसी बरोबर उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रगत डेटा विश्लेषणाचा लाभ घेण्यासाठी, या व्यासपीठावर विविध केंद्रीय संस्थांमध्ये विकेंद्रित असलेल्या इतर महत्त्वाच्या डेटाबेसना एकत्रित करण्याची गरज असल्याचे  अधोरेखित करून भविष्यातील रोडमॅप (पथदर्शक आराखडा) देखील त्यांनी मांडला. शाह म्हणाले की, या नवीन नेटवर्कमुळे एमएसी  नेटवर्कवर निर्माण होणाऱ्या डेटा विश्लेषणाची गुणवत्ता उच्च पातळीवर जाईल, ज्यामुळे अचूक ट्रेंड विश्लेषण, हॉटस्पॉट मॅपिंग आणि टाइमलाइन विश्लेषणाद्वारे अंदाज वर्तवण्याजोगे  आणि क्रियाशील निकाल मिळू शकतील अशी अपेक्षा आहे. संघटित गुन्हेगारीशी गुंतागुंतीचे संबंध असलेल्या दहशतवादी परिसंस्थेचा मुकाबला करण्यासाठी नवीन एमएसी मोठी मदत करेल.

भारतातील सर्वात मोठे इंटेलिजेंस फ्यूजन सेंटर म्हणून, मल्टी एजन्सी सेंटर अर्थात बहु संस्था केंद्र 2001 सालापासून अस्तित्वात आहे आणि केंद्रीय गृहमंत्री एमएसीच्या तांत्रिक अपग्रेडेशनसाठी (श्रेणी सुधारणा) सतत सक्रियपणे मार्गदर्शन करत आहेत. गुप्तचर विभागात स्थित नवीन एमएसीने सर्व गुप्तचर, सुरक्षा, कायदा अंमलबजावणी आणि तपास संस्थांना परस्परांशी जोडले आहे. 500 कोटींहून अधिक खर्च करून कार्यान्वित करण्यात आलेल्या नव्या एमएसी नेटवर्कमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही प्रकारचे परिवर्तन झाले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या नव्या एमएसी नेटवर्कमध्ये देशातील बेट प्रदेश, बंडखोरीग्रस्त भाग आणि उंच डोंगराळ भूभाग यांचा समावेश आहे, जे जलद आणि स्वतंत्र सुरक्षित नेटवर्कसह दुर्गम भागातील जिल्हा एसपींच्या पातळीपर्यंत, दुर्गम भागातही   कनेक्टिविटी प्रदान करते.

श्री तुळशीबाग महागणपतीला १५०० कलिंगडांचा नैवेद्य 

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने आयोजन ; वासंतिक चंदन उटी
पुणे : रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास… चंदन उटीचे लेपन आणि तब्बल १ हजार ५०० कलिंगडांचा नैवेद्य श्री तुळशीबाग महागणपतीला दाखविण्यात आला. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात (१२५) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पासमोर साकारलेला कलिंगडांचा नैवेद्य व पुष आरास पाहण्याकरिता गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने कलिंगडाचा महानैवेद्य‌ व वासंतीक चंदन उटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, दत्ताभाऊ कावरे, गणेश रामलिंग आणि परिसरातील व्यापारी उपस्थित होते. प्रसिद्ध पुष्प सजावटकार सुभाष सरपाले यांनी ही आरास साकारली.

संकष्टी चतुर्थी च्या दिवशी वासंतिक चंदन उटी लेपन करण्यात आले. तसेच रात्री गणेश जागर आणि महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

निवडणुका दिसताच टेंडरसाठी महापलिकेत जाणारे आता प्रशासकाला धारेवर धरण्याचे नाट्य रंगवू लागलेत- संजय मोरे

भाजप करतय पुणेकरांची दिशाभूल .. पुन्हा तेच ते आणि तेच …

पुणे- आज महापालिकेत अचानक भाजपच्या केंद्रीय राज्य मंत्री यांच्या नेतृत्वाखाली काही माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना बैठक घेऊन धारेवर धरण्याचे नाट्य केवळ निवडणुका समोर दिसू लागल्याने रंगविले असून आजपर्यंत ते केवळ टेंडर साठी महापालिकेत चकरा मारीत होते असा आरोप शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे .

ते पुढे म्हणाले,’ नाले सफाईत हात की सफाई नको. असे आयुक्तांना व प्रशासनाला खडसावून सांगणारे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी २०० कोटी निधी पुण्यातील ओढ्यांच्या सीमाभिंती बांधण्यासाठी आणला म्हणून संपूर्ण पुण्यात बॅनरबाजी केली होती. शेवटी तो निधी महाराष्ट्र सरकारकडून आलाच नाही. म्हणजे कोण कोणाला फसवत आहे ? नागरिकांना निवडणुकीत फसवायचे निवडून आल्यावर अधिकाऱ्यांना झापायचं मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, असा खेळ प्रशासन आणि भाजप सत्ताधारी करीत आहेत. ही पुणेकरांची दिशाभूल आहे. पहिल्याच अवकाळी पावसाने सगळ उघडं पडल, आणि महापालिका निवडणूका डोळ्यासमोर दिसतायत, त्यामुळे काहीतरी करतोय हे दाखविण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न दिसतो आहे. इतके दिवस फक्त स्वतःसाठी निधी आणि टेंडरसाठीच चकरा मारणारे भाजपचे नगरसेवक आत्ता अचानक प्रशासनाला धारेवर धरतायत. दिल्ली पासून गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. महापालिकेमधे प्रशासक यांच्याच सत्ताकाळात आहे. मागील आठ वर्षापासून भाजपची सत्ता पुणे महापालिकेत आहे. महापौर ते खासदार आणि केंद्रीय मंत्री या प्रवासात पुणेकरांच्या प्रश्नांचा विसर पडल्याने आता एकूणच पुण्याचं नेतृत्व करायचं आहे ? अस आजच्या बैठकीतून दिसत आहे. काही कोटीचे टेंडर लागूनही पुण्यातील ओव्हरहेड केबल भूमिगत करण्याचे काम अद्यापही झालेले नाही. भाजपच अस झालय नाचता येईना आणि अंगण वाकडं म्हणायच. जनतेची दिशाभूल करायची. आता ते शक्य नाही. पुणेकर सूज्ञ आहेत. अबकी बार भाजपा हद्दपार …होईल अशीच आता स्थिती आहे.

भाजप शहराध्यक्षाचे कार्यालय आणि व्यायामशाळा वीजचोरीत सापडल्याचा काँग्रेस- शिवसेना कार्यकर्त्यांचा दावा

पुणे:- भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे सानेगुरुजी नगर, आंबील ओढा येथील कार्यालय आणि त्यांचीच भ्रष्टाचारात अडकलेली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र वीजचोरीत अडकले असल्याची माहिती अधिकारात उघड झाल्याने काँग्रेस- शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, आज काँग्रेस – शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरण पुणे परिमंडळ चे मुख्य अभियंता सुनील काकडे यांची भेट घेऊन त्यांना घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्तीच झाडली. सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि पुणे भाजप च्या शहराध्यक्षाला वेगळा न्याय का? वीजचोरी उघड होऊनही कारवाई का नाही? गेले अनेकवर्ष सदर प्रकरण का दाबण्यात आले? असे अनेक प्रश्न विचारले गेले.यावेळी शिष्टमंडळात किशोर मारणे शहर अध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संघटन पुणे, अक्षय जैन – जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस, अनंत घरत शिवसेना प्रसिद्धी प्रमुख,सागर धाडवे सरचिटणीस युवक कॉंग्रेस पुणे, कुणाल काळे- युवक काँग्रेस उपाध्यक्ष पुणे, अविनाश अडसूळ – पुणे शहर सचिव, हनुमंत गायकवाड उपाध्यक्ष कोथरूड विभाग हे उपस्थित होते.सदर भ्रष्टाचाराची माहिती कांग्रेस कार्यकर्ते तक्रारदार सागर धाडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांस ह मेल द्वारे पाठविली आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी अनंत घरत आणि सागर धाडवे यांनी म्हटले आहे कि,’ पुणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्र २९ मधील भाजप शहराध्यक्षांचा तीन व्यायामशाळांचा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार विषय आज पुण्यात गाजत असताना माहिती अधिकारात अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे, आणि ह्या भ्रष्टाचारात महावितरण च्या पेशवे पार्क उपविभाग चा महत्वाचा वाटा आहे हे सिद्ध झाले आहे.

स्थळ पाहणी अहवालात भाजप कार्यालय तसेच स्थानिक नगरसेवक यांचे नाव गाळून फक्त कार्यालय” शब्दाचा उल्लेख केला आहे, वीज वापर मधे पब्लिक सर्व्हिस असे नमूद केले आहे पण सदर ठिकाणी शेकडो मुलांकडून व्यायामासाठी पैसे घेतले जातात त्यामुळे हा पब्लिक सर्व्हिस प्रकार नसून व्यावसायिक आहे, तसेच सदर स्थळ पाहणी अहवालात महावितरण च्या अधिकाऱ्यांकडून मुद्दाम पुन्हा स्थानिक सत्ताधारी भाजप नगरसेवकाला वाचवण्यासाठी कोणत्यातरी त्रयस्थ व्यक्तीचे नाव चालक म्हणून टाकण्यात आले आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांनी केला आहे.

तसेच दिनांक १६/०४/२५ च्या माहिती अधिकारात सदर कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर , लोकमान्य नगर व्यायामशाळा, आणि कै चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा, शाळा क्रमांक १७, नवी पेठ पुणे ३० , या पुणे मनपाच्या व्यायामशाळा मालमत्तेची विज मीटर ची बिले मागवली असताना महावितरण कडून माहिती अधिकारात मयत व्यक्तींची बिले देण्यात आली अश्या प्रकारे माहिती अधिकारात माहिती घेणाऱ्या ची फसवणूक पेशवे पार्क उपविभाग कार्यालय कडून केली गेली आहे .
सामान्य माणसाला ५००/-₹ नाही वेळेवर भरले तर विज तोडणारे महावितरण चे अधिकारी ह्या विषयात गेले १३ वर्ष शांत का आहेत
महावितरणने ही आपल्या महावितरणच्या अश्या भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करावी वीजचोरी साठी साथ देण्यास जबाबदार म्हणून कठोर कारवाई करावी मागील १२ वर्षाची थकबाकी तत्पर वसूल करावी तसेच वीजचोरी करणाऱ्या स्थानिक भाजप नगरसेवकावर तत्पर गुन्हा दाखल करण्यासाठी कारवाई करावी,अन्यथा आम्हाला सदर भ्रष्टाचाराच्या विरोधात , वीजचोरी विरोधात महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करावे लागेल आणि वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई सुरू करावी लागेल असे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळाकडून कळविण्यात आले .यावेळी बोलताना मुख्य अभियंता काकडे यांनी सदर वीजचोरी विषयात कडक कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिले .

सहकार खात्याकडून घोटाळेबाजांवर कारवाई ऐवजी ते काढणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींनाच धमकी

बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा
पुणे-

फलटण येथील यशवंत बँकेचा १५० कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे.यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा प्रमुख समावेश आहे. त्यांनी वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे आणि जणांच्या नावावर बोगस कर्ज काढलेली आहे ,कर्ज प्रकरण केलेली आहेत ,सदरचे कर्ज थकीत आहेत सदर कर्जाचे पैसे हस्तेपरहस्ते बोगस कंपन्यांमध्ये वळवलेले आहे. सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केला आहे .त्याचप्रमाणे बँकेमधील पैशाचा विनीयोग स्वतःच्या खाजगी मालमत्ता घेण्यासाठी केला असल्याने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
यावेळी फसवणूक झालेले बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांच्यासह निलेश जाधव, गणेश पवार, एस डी कुलकर्णी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या, यशवंत सहकार बँकेचे अनेक ठेवीदार यांच्याशी मी बोलणे केले. लोकांनी ज्या ठेवी बँकेत ठेवले होत्या ते मिळणे अशक्य झाले आहे. सदर रक्कम पाच लाखांच्या आत आहे दबाव ठेवीदार यांच्यावर टाकला जात आहे. माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कर्ज बुडीत यांच्या सोबत जाऊन मी त्यांची चुकीची बाजू घेत असल्याचा आरोप केला. परंतु बँक अध्यक्ष यांनी स्वतः पदाचा दुरुपयोग करून खोटी कर्ज प्रकरणे करून बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याने कर्ज बुडीत झाली आहे. १२७ कोटी रुपये कर्ज ही केवळ शेखर चरेगावकर यांच्या आणि नातेवाईक यांच्या नावाने आहे. स्वतःच्या बँकेतून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या नावावर कोणते कर्ज नाही सांगणे बिनबुडाचे आहे. ठेवीदार यांचे पैसे बँक देऊ शकत नसल्याने ती बुडीत दाखवून आरबीआयकडून केवळ पाच लाख रुपये ठेवीदार यांना देण्याचे आश्वासन देऊन ग्राहक आणि शासन यांची फसवणूक करण्यात येत आहे. कोणताही कागदपत्राची शहानिशा न करता कर्ज वाटप झाल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी मोठा घोटाळा केला असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी. बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा.चुकीचे व्यक्ती नावे कर्ज घेतल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.

खा.कुलकर्णी म्हणाल्या ,बँकेच्या २३० कोटी रुपयांच्या ठेवी आहे परंतु मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आलेले आहेत. राज्य सहकार खाते यांच्याकडे बँकेतील अनियमितता बाबत तीन अहवाल आले आहे. सहकार खात्याने मोठी अनियमितता असून कायदेशीर कारवाई अद्याप केली नाही. सहकार खाते, पोलीस खाते यांनी अद्याप कारवाई का केली नाही हा प्रश्न आहे. माझ्या संपर्कात ज्या व्यक्ती आहे त्यांना शेखर चरेगावकर यांचे भाऊ यांच्याकडून धमकावले जात आहे.तसेच सहकार खात्यातील अधिकारी यांच्यावर देखील दबाव टाकला जात आहे. मला देखील तुम्ही याप्रकरणात गप्प बसा अन्यथा तुमचे मागील वेळी सारखे तिकीट कापू असा इशारा शेखर चारेगावकर यांचे भाऊ शार्दुल चरेगावकर यांनी नाशिक येथील मध्यस्थ मार्फत दिला आहे. केंद्रीय सहकार विभाग यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटून मी तक्रार करणार आहे. जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण सामान्य नागरिकाचे पैसे यात लुबाडण्यात आले आहे. भाजप मधील पदाचे आडून कोणी असा गैरकारभार करत असेल तर पक्षातील वरिष्ठ त्याची गंभीर दखल घेतील.

सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

याप्रकरणी सहकार आयुक्तांना भेटून कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. याची सखोल चौकशी करून सहकार आयुक्तांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा ठेवीदार आणि कर्जदार यांना घेऊन सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला.

‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ (पीसीपीएल) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते संपन्न !!

छत्रपती संभाजी किंग्ज, विश्व टायगर्स संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे, १६ मेः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटने तर्फे आयोजित आणि ऑक्सिरीच पुरस्कृत ‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ (पीसीपीएल) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्ज आणि विश्व टायगर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला. स्पर्धेचे उद्घाटन माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंजवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत विशाल गव्हाणे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे छत्रपती संभाजी किंग्ज संघाने बंट्स वॉरीयर्सचा १८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्‍या छत्रपती संभाजी किंग्ज संघाने १४५ धावा धावफलकावर लावल्या. अथर्व भोसले (४१ धावा), अजिंक्य खानदेशे (२४ धावा) आणि विशाल गव्हाणे (२० धावा) यांनी संघाचा डाव बांधला. बंट्स संघाच्या प्रशांत तेलंगे याने ४ गडी बाद केले. या आव्हानाला उत्तर देताना बंट्स वॉरीयर्सचा डाव १२७ धावांवर मर्यादित राहीला. निनाद सी. याने ३८ धावांची आणि प्रशांत तेलंगे याने २१ धावांची खेळी केली. छत्रपती संभाजी संघाच्या सईश शिंदे याने तीन गडी तर, विशाल गव्हाणे आणि हरीश बाकळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला शानदार विजयी सलामी मिळवून दिली.

दुसर्‍या सामन्यामध्ये अर्णेश रॉय याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर विश्व टायगर्स संघाने मोरे पाटील पॅकर्स संघाचा ७ धावांनी निसटता पराभव करून विजयी सलामी दिली. विश्व टायगर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. अर्णेश रॉय याने ३४ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना मोरे पाटील पॅकर्स संघाचा डाव ६५ धावांवर मर्यादित राहीला.
 
याआधी माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, उपाध्यक्ष वसंतभाऊ कोकणे, संघमालक विजय कापसे, रवी शेट्टी, सुदाम मोरे-पाटी, आरती तांबोळी, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, स्पर्धा समितीचे विजय कोतवाल, प्रदीप वाघ, मुकेश गुजराथी, नरेंद्र कदम, प्रशांत तेलंगे, युसुफ बर्‍हाणपूरे आदि मान्यवर उपस्थित होते.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
छत्रपती संभाजी किंग्जः १९.१ षटकात १० गडी बाद १४५ धावा (अथर्व भोसले ४१, अजिंक्य खानदेशे २४, विशाल गव्हाणे २०, प्रशांत तेलंगे ४-२४, सागर जाधव २-८) वि.वि. बंट्स वॉरीयर्सः १९ षटकात १० गडी बाद १२७ धावा (निनाद सी. ३८, प्रशांत तेलंगे २१, सईश शिंदे ३-१४, विशाल गव्हाणे २-१९, हरीश बाकळे २-६, ); सामनावीर विशाल गव्हाणे;

विश्व टायगर्सः १० षटकात ८ गडी बाद ७२ धावा (अर्णेश रॉय ३४, हर्षल हडके १३, सार्थक गायकवाड ३-९, रूद्र भुजबळ १-५, फैयाझ लांडगे १-८) वि.वि. मोरे पाटील पॅकर्सः १० षटकात ५ गडी बाद ६५ धावा (तिलक जाधव ३३, पुलकेश हलामुनी १२, शुभ श्रीवास्तव १२, सचिन सावंत १-७); सामनावीरः अर्णेश रॉय;

ठाकरे- पवारांचा पक्ष ‘लोफर’ व्यक्तींच्या हातात दिला:संजय राऊत म्हणाले ‘माझ्या पुस्तकातील प्रसंग सत्य’

उपकाराची फेड अपकाराने करणारी लोकं..यापेक्षा असंख्य घटनेचा मी साक्षीदार, मात्र त्या सांगणार नाही

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. तो सत्य आहे, ती कादंबरी नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

या माध्यमातून संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नरकातला स्वर्ग या पुस्तकातील प्रत्येक घटना आणि प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. ती कादंबरी नाही. ते सर्व प्रसंग सत्य असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने कपोलकल्पित कथा सांगतात, त्याप्रमाणे मी पुस्तक लिहिलेले नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही कोणाच्या हातात दिली? एका लोफर माणसाच्या हातात ती दिली? त्यांचा राजकारण त्यांच्यापाशी मात्र ते शिवसेनेचे मालक कसे बनवू शकतात? तुम्ही कोण आहेत? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले. चौकटीच्या बाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी तुम्हाला मदत केली. त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले. हे त्यांना शोभले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आहे. याविषयी मी आतापर्यंत कधीही बोललेलो नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. काही गोष्टी गोपनीय असतात त्या गोपनीय राहायला हव्यात, असे देखील ते म्हणाले.

नरकाचा स्वर्ग या पुस्तकात माझे तुरुंगातील अनुभव असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कशी मदत केली, हे मला तुरुंगात असताना आठवले. त्यामुळे त्याचा उल्लेख देखील यामध्ये असल्याचे ते म्हणाले. पुस्तकातून तुरुंगातील अनुभव सांगितले असल्याचे देखील त्यांनी म्हणाले आहे. वरिष्ठ लोकांसोबत काही सिक्रेट गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत. त्या गोष्टी पुस्तक रूपाने सर्वांसमोर आणणे योग्य नाही, असे मला वाटते. मात्र पुस्तकांमध्ये मी केवळ एकच संदर्भ दिला आहे. शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे या प्रमुख महाराष्ट्रातील नेत्यांचे राजकारण पाहता मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता, या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडण्यात आले. तसेच पक्ष संपवण्याचा वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. उपकाराची फेड अपकाराने कशी केली, याचाच उल्लेख यात संजय राऊत यांनी केला आहे.

आजचे भाजपचे नेते बोलत आहेत त्यांना काय माहिती? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो. मात्र मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळली आहे. मर्यादेत राहील तेवढेच या पुस्तकात लिहिले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यापेक्षा असंख्य घटनेचा मी साक्षीदार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मी प्रदीर्घकाळ बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेलो आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मला माहिती आहे. मात्र मी त्या कधीही लिहिणार नाही आणि बोलणार देखील नाही. मात्र ‘नरकातला स्वर्ग’ हा वेगळा प्रवास आहे. तो तुरुंग आहे आणि त्यानिमित्ताने तुरुंगाची भिंतीशी आपण बोलतो. त्यावेळी आपल्याला अनेक संदर्भ आठवत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो. घाबरून पळून जावे लागत नाही, असा टोला देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे.

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपायुक्त विजय मुळीक उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. वारी कालावधीत अन्न शुद्धतेची खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासनाकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि येत्या काळात अन्न भेसळ करणाऱ्याविरोधात व्यापक मोहीम राबवावी. पालखी सोहळ्यासंदर्भातील राज्यस्तरीय बैठकीपूर्वी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण करावी. इतर जिल्ह्यात किंवा विभागात बदली झालेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा घेण्याबाबत संबंधितांना विनंती करावी. सर्व अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाचा संयुक्त दौरा करून व्यवस्थेबाबत परस्पर समन्वय ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त पुढे म्हणाले, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी. पालखी सोहळ्यादरम्यान आणि नंतरही स्वच्छता रहावी यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील यासाठी आवश्यक उपाय योजावेत. नीरा नदी परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पालखी पुढे गेल्यावर मागील गावात त्वरित स्वच्छता करावी. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतांना रुग्णवाहिकेत पुरेशा प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय अधिकारी असतील याची दक्षता घ्यावी.

पालखी मार्ग खड्डे मुक्त राहतील व उत्तम वाहतूक व्यवस्थापन राहील याची काळजी घ्यावी. पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. घाट परिसरात दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तिन्ही जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील व्यवस्थेबाबत एकत्र पुस्तिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरणीकरणाद्वारे पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. सोहळ्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली स्थापण्यात आली आहे २५ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सोहळ्यादरम्यान १ हजार ८६० स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. पालखी मार्गावर पाणी, विद्युत, आरोग्य, गॅस सिलेंडर, स्वच्छता आदी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. महिलांसाठी विशेष सुविधा करण्यात येत आहेत. वारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत चाचणी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील व सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी जिल्ह्यातील तयारीची माहिती दिली. बैठकीला पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन

बारामती, दि.१६ : राज्यात पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, आगामी काळात नागरिकांच्या वीज देयकात बचत करण्याच्यादृष्टीने दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यास राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मुढाळे येथे महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता संदीप हाके, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योजक, शेतकरी आणि घरगुती वापराकरिता लागणारी वीज तसेच राज्यातील वाढते औद्योगिकरण लक्षात घेता सर्व घटकांना योग्य दाबाने वीजपुरवठा झाला पाहिजे याकरीता राज्यशासनाच्यावतीने वीजेचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी याकरीता याकरीता सुमारे २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शेतात सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपाना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे.

पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेअंतर्गत १ लाख ३० हजार घरांच्याकरीता ५०० मेगॉवटपेक्षा अधिक क्षमतेचे छतावर सौरसंच बसविण्यात आले आहे तसेच या योजनेअंतर्गत १ हजार कोटी रुपयापेक्षा अधिक अनुदान लाभार्थ्यांना दिले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांनाही सोलरच्या माध्यमातून वीज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) वापरासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासर्व प्रयत्नामुळे वीजेच्या देयकात बचत होण्यास मदत होईल.

मुढाळे वीज उपकेंद्रामुळे परिसरातील वीजेच्या समस्या सोडविण्यास मदत होणार

मुढाळे गावासहित परिसरातील गावांची वीजेची समस्या विचारत घेता मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या उपकेंद्राकरीता सुमारे ६२ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे, उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर मुढाळे, माळेगाव, पणदरे, सांगवी, होळ, कऱ्हावागज, कोऱ्हाळे आदी गावांना नियमित दाबाने अखंड वीजपुरवठा होण्यासह विजेचा भारही कमी होणार आहे. ही यंत्रणा नसून राज्य शासनाच्या सक्षमीकरणाची पायरी आहे, या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या उपकेंद्राचे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. उपकेंद्र परिसरात अधिकाधिक वृक्षारोपन करुन ती जगविण्याकरीता प्रयत्न करावे.

राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष मोहिमेअंतर्गत बारामती तालुक्यात १ हजार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर

राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष मोहिमेअंतर्गत काळानुरुप बदल विचारात घेता नागरिकांना सोई-सुविधा मिळण्याकरीता सुमारे १ हजार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक विकासकामे करीत असताना ती दर्जेदार, टिकाऊ व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. विकास कामे करतांना समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून काम करण्यात काम करण्यात येत आहे, याकामी नागरिकांनीही सहकार्य करावे. राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा खरीप हंगाम आढावा आवश्यक ते नियोजन करण्यात येईल. याबाबतीत कुठलीही कमतरता भासणार नाही, याकरीता कृषी खात्यासोबत लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत दर्जेदार रोपे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.