Home Blog Page 306

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई

“जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड करायची असेल तर मी पाकिस्तानपेक्षा नरकात जाणं पसंत करेन. मी कधीही पाकिस्तानला जाणार नाही”, अशी टीका ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर केली आहे.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना ते असं म्हणाले आहेत. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ते होते. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

जावेद अख्तर म्हणाले की, “माझे ट्वीटर पाहा, त्यात खूप शिव्या देणारे आहेत, पण काही लोक माझी प्रशंसाही करतात. काही लोक म्हणतात की, तुम्ही काफिर आहात. काही लोक म्हणतात जिहादी, तू पाकिस्तानला जायला हवे. जर मला पाकिस्तान किंवा नरक यापैकी एक निवडण्याची संधी मिळाली तर मी नरकात जाणे पसंत करेन.”

यावेळी संजय राऊत यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, “संजय राऊत हे टी-20 खेळाडू आहे. तो क्रीजबाहेर येतात आणि फक्त चौकार आणि षटकार मारतात. त्यांना बाद होण्याची चिंता नाही.”

या पुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला; संजय राऊत यांचं खणखणीत भाषण

मुंबई:खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले उपस्थित होते.

यावेळी संजय राऊत यांनी खणखणीत भाषण करत तुरुंगातील अनुभव व्यक्त केले. यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो, ज्याच्या नादाला ईडी लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, अशा रोखठोक शब्दांत संजय राऊत यांनी ईडीचा समाचार घेतला.

जावेद अख्तर, साकेत गोखले, शरद तांदळे यांच्या हिंमतीचे कौतुक करताना संजय राऊत यांनी ईडीच्या चक्रव्यूहावर सडकून टीका केली. साकेत आणि मी आमच्या दोघांमध्ये साम्य असं आहे की, मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. ते ही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. आमचे शरद तांदळे.. त्यांनी खरोखरच हिंमतीचे काम केलं आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो, ज्याच्या नादाला ईडी लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, असे संजय राऊत म्हणाले.

भाषणामधून ईडीचा समाचार घेतानाच त्यांना ज्येष्ठ पटकथाकार जावेद अख्तर यांचे भरभरुन कौतुक केले. ते म्हणाले, जावेद अख्तर साहेब केवळ पटकथाकार, लेखक नाहीत. जिथे जिथे देशात अन्याय घडेल, तिथे जावेद साहेब सातत्याने आपला आवाज उठवत असतात. जावेद साहेबांचं इथं असणं हे अत्यंत प्रेरणादायी आहे. माननीय शरद पवार साहेब, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाहीत. ते ही पडद्यामागून आमच्यासाठी अशा अनेक लढाया लढत राहिले आणि समोरूनही लढत असतात. माननीय उद्धव साहेब माझे सर्वोच्च नेते, मित्र आणि सदैव माझ्या पाठिशी ते उभे राहिले. आणि खास पाहुणा जो आपण कलकत्त्यातून बोलावला आहे. त्यांचं नाव गोखले आहे. आता साकेत गोखले कोलकात्त्यात कुठे गेले? ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलावून खासदार केलं. का? महाराष्ट्रातून एक लढवय्या त्यांना हवा होता कोलकात्त्यात. आमच्या दोघांमध्ये साम्य असं आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. ते ही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. साकेत गोखले हे काही काळापासून एक तरुण राजकारणी, उत्तम पत्रकार, उत्तम लेखक आहेत ते. ते मूळचे मुंबईचे आहेत.

संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचे प्रकाशक न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे शरद तांदळे यांच्या हिंमतीला दाद दिली. आमचे शरद तांदळे हिंमतीचे काम त्यांनी खरोखर केलेले आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो ईडी त्याच्या नादाला लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, असा जबरदस्त टोलाही यावेळी त्यांनी हाणला.

पुस्तकावर बरीच चर्चा सुरु आहे ती असालयाच पाहिजे. अगर मै एक एडिट लिखता हू तो उसकी चर्चा होती है, किताब लिखता हू तो होनी ही चाहिए. एक संपादकीय मी लिहितो त्याची रोज चर्चा होते. मग जेव्हा एक पुस्तक लिहिलं त्याची चर्चा झाली नाही तर उपयोग काय? दोन दिवसांपासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत. धडाधड सोशल मीडियावर सुरू आहे, उसने ये लिखा, उसने वो लिखा. पण जे लिहिलंय ते सत्य आहे, वो सच है. आणि माझी ओळख जी माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली. सत्य आणि नितिमत्ता या दोन गोष्टींची कास तू सोडू नको, हे बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं, ते मी शेवटपर्यंत पाळलं.

जावेद अख्तर यांना उद्देशून संजय राऊत पुढे म्हणाले, आपकी दो लाईने मुझे हमेशा याद आती है, जो बात कहते डरते है सब वो बात लिख, इतनी अंधेरी थी न कभी रात लिख. डरना नहीं है वो लिखो. बहुत जोर से कहा है जावेद साहबने. हम लिखनेवाले लोग है, हम बोलनेवाले भी लोग है. आम्ही वाकणार नाही, साकेत वाकला नाही, संजय सिंग झुकला नाही. आमचे अनिल देशमुख बसलेत समोर. आम्ही ठरवलं की काही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही, आपण लढत रहायचं. कुणीतरी लढावंच लागेल. पुस्तक जेव्हा तुरुंगात लिहायचं ठरवलं. मी त्यांनाही प्रेरणा दिली….देशमुखांना. वेळ घालवायचा आहे ना, जेलमध्ये एक मिनिट एक वर्षासारखा वाटतो. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता, त्यातून झुकून जावं लागतं आणि झुकून यावं लागतं.

जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा तुमचा जगाशी संबंध तुटतो. मग तुम्ही करायचं काय? बाहेरचा संपर्क नाही, संबंध नाही. दगडाच्या भिंती बघायच्या आणि दिवस काढायचे. अशामध्ये लिहिणं, वाचणं, चांगला सकारात्मक विचार करणं आणि उद्या मी कदाचित बाहेर पडेन हा विचार करायचा. कधी देशमुख साहेब बाहेर पडले, आज तुमचा जामीन होणार, डोन्ट वरी. कधी मी बाहेर पडलो, आज तुमचं आर्ग्युमेंट चांगलं झालं. अशामध्ये दोन-चार, पाच महिने निघून जातात. आणि त्यातून कुणी एखादा सुटलाच तर तो कसा सुटला त्याच्यावरती अख्खं जजमेंट घेऊन अभ्यास करायचा. सगळे जजमेंट वाचत बसल्यावर कळते कोणता पॉईंट काय आहे? हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टर होऊन बाहेर पडतात. आठ दिवस जरी तुरुंगात राहिला तर तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत… कसं चालवायचं कोर्ट आणि कोणता जज, कोणतं बेंच, ये क्या है? यावर पीएचडी होते. हे सर्व वेगळं जग आहे. पण त्यातून आपण आलो, एक राजकीय लढाई असते.

आम्ही ज्या आर्थर रोड तुरुंगात होतो. तिथे एकदा आम्ही उभे होतो, मला वाटलं की इथे ससे कुठून आले? आमच्याबरोबर कुंदन शिंदे होते, ते म्हणाले साहेब तो ससा नाही उंदीर आहे. त्याला म्हटलं इथं आम्हाला खायला मिळत नाही.. उंदरांना काय खायला मिळतयं. सशासारखे उंदीर, घुशी.. उंच धिप्पाड. देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत. त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं. पण एक सांगतो, तुरुंगातलं वैशिष्ट्य असं आहे की, माझा सामनातला अग्रलेख… हर दिन मेरा एडिट बाहर आता था.

सरकारने चौकशी कमिशन लावलं होतं. सामना का एडिटोरियल बाहर कैसा आ रहा है. रोज माझं रोखठोक कॉलम बाहेर यायचं. मै खूश होता था मेरा काम हो रहा है. अंदर की बात अंदरही. अखबार तो निकल रहा है ना, लढाई तो जारी है. पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो मनाने कधी खचत नाही. मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, त्या माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली कि खचू नका, आत्मविश्वास महत्वाचा आहे.

मी एकदा ईडीच्या कोठडीत होतो आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. मी ईडीच्या आतमध्ये बसून आहे आणि सर्व नॅशनल चॅनेलला बातम्या, संजय राऊत तो जेल में है तो लिखा किसने? रात्री साडेअकरा वाजता दोन अधिकारी मला उठवायला आले. म्हणाले आपका स्टेटमेंट लेना है. मी विचारले का? ते बोलले, जबाब घ्यायचा आहे. चार दिन हो गया आप यहा बैठे है और आपका आर्टिकल आज पब्लिश हो गया, टीव्ही पर चल रहा है. राज्यपालांवर मी लिहिलं होतं, तेव्हाच्या टोपीवाल्या, हे कसे महाराष्ट्रद्रोही आहेत. आणि ती चौकशी लागली. मी म्हणालो, ‘लो मेरा स्टेटमेंट लो आप, मै पहले लिखकर आया था, मुझे पता था ये गंदगी करनेवाला है.’ हे स्टेटमेंटमध्ये आहे माझ्या. बोललो.. आपके यहा तो सीसीटीव्ही फुटेज है, देख लो कैसे गया वो. प्रत्येकाच्या या कथा फार सुंदर आहेत, रोमांचक आहेत.

साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत. साकेत गुजरातच्या साबरमती तुरुंगात होता. साकेतला विमानतळावरून उचललं. साकेत सात महिने तुरुंगात होता. आम्ही त्याच्या मानाने कमी राहिलो. त्याचा अनुभव जास्त आहे. त्याबाबतीत तो मला ज्येष्ठ आहे. 80 टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं, 20 टक्के लिहायला दोन वर्षे लागली. दोन वर्षांत निवडणुका आल्या. मुली मागे लागल्या, बाबा लिहा पूर्ण करा. शेवटी लिहून झालं पुस्तक, ते प्रसिद्ध झालंय. सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बराकमध्ये राहिलो होतो, ते कुणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी. आता काय सांगणार. जयंतराव पाटील गृहमंत्री, इंजिनिअर आदमी है ये. कसाब के लिए स्पेशल बराक कैसे होना चाहिए इसका डिझाईन ये जयंतराव पाटीलने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया. और मेरे को बाद में पूछता कैसा था, ये मैने बनाया है. या सर्व गमतीजमती पुस्तकामध्ये आहेत. कटु आठवणी असतातच, पण त्या कटु म्हणून घ्यायच्या नाहीत, तो अनुभव म्हणून घ्यायचा.

उद्धवजींनी पुस्तक वाचलं आणि एका वाक्यात पुस्तकाचं वर्णन केलं… पुस्तकात रडगाणं नाही आहे. पकडा ठीक है, गया जेल में, वापस आ गया, जिसने मुझे पकडा उसको पश्चाताप हो गया. झक मारली आणि याला पकडला. अरे हम गुंडे लोग है, हम जेल जाने से नहीं डरते. देश को ऐसे लोगों की जरुरत है. लोहा लोहे को काटेगा अभी. पूरे देश में एक माहौल बन गया है.

या पुस्तकाचं सार काय आहे? हे पुस्तक राजकीयच आहे. ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे, त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे. ज्याला सत्तेची चाटूगिरी करायची आहे, सत्तेसाठी सर्वकाही करायचं आहे, त्याच्यासाठी हे पुस्तक नाही. ज्यांना विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे. या पुस्तकाचा सर्वात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे. महाराष्ट्र मर्दों की औलाद आहे. या पुस्तकाचं एक महत्व आहे. आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, अनेकांना त्रास झाला. अनिल परबांना त्रास झाला. झुके नहीं, आज भी लढते रहे.. रहेंगे. आज भी मै कोर्ट में जाता हू. जज के सामने खडा रहता हू, बोलिए क्या है वापस अरेस्ट करोगे, क्या करोगे आप. तानाशहा कब तक तानाशाही करता रहेगा? केव्हा ना केव्हा तरी त्या हुकूमशहालाही जमिनीत गाडलं जातं. हा देशाचा इतिहास, नाही जगाचा इतिहास आहे. सगळे मोठ्या संख्येने इथे आलात. ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी 100 लोकांनी घेतली तर या देशातून, राज्यातून हुकूमशाही पूर्णपणे नष्ट होईल, गाडली जाईल. जे राज्याला, आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं राज्य.. ते या देशात आणि महाराष्ट्रात येईल.. काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक केला आहे, त्याचा स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल, असा आशावाद संजय राऊत यांनी भाषणाच्या शेवटी व्यक्त केला.

महापालिका मिळकतकर प्रमुखपदी अविनाश सपकाळ तर निवडणूक प्रमुखपदी प्रसाद काटकर

पुणे :महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज संध्याकाळी उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. मिळकत कर आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख पदी अविनाश सपकाळ यांची तर सामान्य प्रशासन आणि निवडणूक विभागाच्या उपायुक्त पदी प्रसाद काटकर यांची नियुक्ती केली आहे .
सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त तसेच कर आकारणी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रतिभा पाटील यांना दक्षता ,मालमत्ता व व्यवस्थापन तसेच भूसंपादन व व्यवस्थापन विभाग प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले आहे. तर उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना, मुद्रणालय तसेच परिमंडळ चारची जबाबदारी देण्यात आली आहे. उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे क्रीडा विभाग मध्यवर्ती भांडार विभाग सोबतच परिमंडळ दोन ची जबाबदारी देण्यात आली आहे.

अतिक्रमण तसेच मिळकतकर विभागातील प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली . त्यांच्याकडील मिळकतकर विभागाचा पदभार काढून उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला होता. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेला मिळकत कर विभाग मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे .या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती होईल अशी चर्चा होती .परंतु आज महापालिका आयुक्त यांनी महापालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवत पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सपकाळ यांच्याकडे महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राच्या संपादनाचेही काम आहे. त्यांनी यापूर्वी परिमंडळ गवणी या ठिकाणी काम केले आहे. शासन सेवेतील प्रसाद काटकर यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग तसेच निवडणुकीचे कामकाज देण्यात आले आहे

अजित पवार गटाच्या बावधनच्या नेत्यावर गुन्हा दाखल


पुणे : कबुल केल्याप्रमाणे हुंडा दिला नाही, म्हणून विवाहितेला मारहाण करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे याच्यासह पाच जणांवर बावधन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी शशांक हगवणे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. बावधन पोलिसांनी शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ५७), सासु लता राजेंद्र हगवणे (वय ५०), नंणंद करीश्मा राजेंद्र हगवणे (वय२४), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे (वय ५१, रा. संतकृपा निवास, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात सध्या असून २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेचे शरद ढमाले यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुळशी विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढविली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद कस्पटे यांची मुलगी वैष्णवी आणि भुकुम येथील शशांक हगवणे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते़ राजेंद्र हगवणे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेले असल्याने वैष्णवी व शशांक यांच्या लग्नाला त्यांनी संमती दिली. वैष्णवी हिच्यासाठी त्यांच्याकडून ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी देऊन सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याचे बोलीवर २८ एप्रिल २०२३ रोजी लग्न करुन दिले. त्यानंतर वैष्णवी नांदण्यास गेली. लग्नाच्या दुसर्‍या दिवसांपासून शशांक व तिचे सासुसासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या कारणात्सव वाद घालून तिच्या बरोबर भांडणे करु लागले. वैष्णवी हिने फोनद्वारे सांगितले. त्यांनी मुलीचा संसार टिकावा, म्हणून दोघांना समजावून सांगून वेळ मारुन नेत ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गर्भवती राहिली. तेव्हा शशांक याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला तिला मानसिक त्रास दिला. घरातून हाकलून दिले.

हुंड्याच्या पैशांसाठी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळून विषारी औषध खाऊन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शशांक याने जमीन खरेदी करण्यासाठी पैशांची कमतरता आहे, २ कोटी रुपये द्या अशी मागणी केली. त्याचे घरी जाऊन शशांक याने वैष्णवी हिला तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय़ मी तुला काय फुक्कट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने पैसे दिले नाही तर मी तुझ्या आख्ख्या खानदानाचा काटाच काढतो, असे बोलून धमकी दिली. त्यानंतरही तिला त्रास देणे सुरु होते. मार्च २०२५ मध्ये तिला वाकडला आणून सोडले.

गाडीमध्येही तिला सासु, नणंदेने मारहाण केली. तेव्हा वैष्णवी हिने गाडीतून उडी मारुन जीव देईन असे बोलल्यावर त्रास देणे बंद केले. १६ मे रोजी प्रणव उत्तम बहिरट याने फोन करुन शशांक हगवणे व वैष्णवीचे वाद झाले असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी शशांक याला फोन केल्यावर त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर दुपारी शशांक याने प्रणव याला फोन करुन वैष्णवीने फाशी घेतल्याचे सांगितले. ते तातडीने चेलाराम हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती. डॉक्टरांकडे चौकशी केल्यावर तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. तिच्या दोन्ही हातावर, दोन्ही मांडीवर, पायावर, पाठीवर, डोक्यावर जखमेच्या खुणा तसेच गळ्याच्या हनुवटीवर लालसर व्रण दिसत होता. डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालावरुन तिचा मृत्यु नेमका कसा झाला, हे समजल्यानंतर त्यानुसार कलम वाढ करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

ED ने अटक करण्यापूर्वी मला एकनाथ शिंदेंचा फोन आला:अमित शहांशी बोलण्याचा ठेवला होता प्रस्ताव: संजय राऊत

मुंबई:
शिवसेना-भाजप युतीत दरी निर्माण होण्यास भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा ठपका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठेवला आहे. “अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढला. स्व. अरुण जेटली यांनीही शहा यांना दोनदा समजावले होते की, शिवसेनेशी वागणुकीत सावधगिरी बाळगा,” असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, “अरुण जेटली रुग्णालयात असताना अमित शहा त्यांना भेटायला गेले. तेव्हा जेटली म्हणाले होते – शिवसेना हा आपला जुना सहकारी पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या सोबत राहायला हवे. ही माहिती मला स्वतः जेटलींनी दिली होती.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे किंवा अन्य विरोधी पक्षांची संबंध कधीही वाईट नव्हते. अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर हे सर्व सुरू झाले. अमित शहांचे काम म्हणजे विरोधकांना ‘खतम करा’ असे आहे. आपली सत्ता बळकट करण्यासाठी त्यांनी अतिशय निर्घृण पद्धत वापरली. ही या देशाची लोकशाही किंवा राजकीय संस्कृती नाही अशी व्यवस्था देशात कधीही नव्हती, असेही राऊत यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
भाजपमध्ये आलेली मंडळी तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत होती:
संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले तेव्हा तिथे मी उपस्थित होतो त्यांचे फोटो आहेत. पण आता जे भाजपचे लोकं आहेत ते तेव्हा नव्हते असा टोला भाजपच्या नेतृत्वाला राऊतांनी लगावला आहे. काल भाजपमध्ये आलेली पोरं ही तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होती. त्यांना काय माहिती शिवसेना-भाजपचे काय नाते होते.
माझ्या अटकेपूर्वी कुटुंबीयांना त्रास दिला:
संजय राऊत म्हणाले की, मला अटक करण्यापूर्वी माझ्या निकटवर्तीय लोकांना त्रास देण्यात आला. ईडीच्या अटकेआधी मी गृहमंत्री अमित शहांना फोन करत सांगितले होते कुटुंबियांना त्रास देण्यापेक्षा मी दिल्लीतील माझ्या बंगल्यावर आहे तिथून मला अटक करायची असेल तर करा. पण लोकांना त्रास देण्याची नौटंकी थांबवा. मी अमित शहांचा फोन ठेवला आणि आशिष शेलार यांचा मला फोन आला. मी शेलारांना सांगितले मला त्रास द्या मी तुमच्याशी लढायला समर्थ आहे. पण ज्या लोकांचा याशी काही संबंध नाही त्यांना त्रास देऊ नका. त्यावेळी ईडीचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही सर्व माहिती देत होते.

अटकेपूर्वी सीएम शिंदेंचा फोन आला होता: संजय राऊत म्हणाले की, मला ईडी अटक करणार होती त्यापूर्वी मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. मी अमित शहा यांच्याशी बोलू का? असे शिंदेंनी मला विचारले होते. तुम्ही वर बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही हे मी शिंदेंना तेव्हाच स्पष्ट केले होते. मी वर बोलायला समर्थ आहे, तुम्ही बोलायची काही गरज नाही. मी पळून जाणार नाही, होऊ द्या मला अटक असे मी शिंदेंना सांगितले होते.

पुणे ISIS च्या स्लीपर सेलचे सदस्य असलेल्या 2 अतिरेक्यांना मुंबई विमानतळावर अटक


मुंबई:पुण्यात आयईडी तयार करण्याच्या कटप्रकरणात फरार असलेल्या ISIS च्या स्लीपर मॉड्यूलमधील दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. अब्दुल्ला फयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी या दोघांची नावे असून, ते इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात लपून बसले होते.
या दोघांना मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल 2 वर उतरताच अडवून, एनआयएने अटक केली. हे दोघे 2023 च्या पुणे आयईडी कटप्रकरणात फरार होते. त्यांच्यावर अजामिनपात्र वॉरंट जारी होते आणि त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
एनआयएच्या तपासात उघड झाले की, 2022-23 दरम्यान पुण्यातील कोंढवा परिसरात भाड्याने घेतलेल्या घरात या आरोपींनी आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण दिले आणि नियंत्रित स्फोट चाचणी घेतली.
या प्रकरणात एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात UAPA, स्फोटक पदार्थ कायदा आणि IPC च्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या गटाने भारत सरकारविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचत, देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया केल्या होत्या, असे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये आता अटक झालेल्या दोघांसह खालील आरोपींचा समावेश आहे: मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब काझी, झुल्फिकार बारोडावाला, शमिल नाचन, आकिफ नाचन, शहनवाज आलम, सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सरकारने खरी म्हणून नकली वाघनखे आणली:​​​​​​​असिम सरोदे यांनी केला लंडनच्या अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्यूझियम मधून आरोप

राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजाची म्हणून महाराष्ट्रात खोटी वाघनखे आणली आणि त्याचे प्रदर्शन केले. या प्रकरणी सरकारने करदात्यांच्या पैशांचा गैरवापर केला, अशी टीका वकील असिम सरोदे यांनी शनिवारी सरकारवर निशाणा साधताना केली आहे.

असिम सरोदे सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी तेथील अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्यूझियमला भेट देऊन एका व्हिडिओद्वारे सरकारवर उपरोक्त आरोप केला. सरकारने आणलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत. सरकारने ती शिवाजी महाराजांची म्हणून महाराष्ट्रात खोटे प्रदर्शन केले. लोकांच्या टॅक्समधून जमवलेल्या लोकनिधीचा गैरवापर केला. हे सर्व घडत असताना आपण केवळ बघत राहिलो, असे ते म्हणाले.

ती वाघनखे खरेच महाराजांची आहेत का?

असिम सरोदे आपल्या एका व्हिडिओ पोस्टमध्ये म्हणाले, आम्ही अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया मेमोरियल म्यूझियममध्ये उभे आहोत. महाराष्ट्र व भारताच्या विषयाशी संबंधित एका महत्त्वाच्या मुद्यासाठी इथे लंडनमध्ये आलो आहोत. म्यूझियममला हा कोपरा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मुघल व मराठा साम्राज्याच्या काळात ज्या काही लढाया व युद्ध झाले किंवा शस्त्रास्त्र वापरण्यात आले ते इथे ठेवण्यात आलेत. शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला ती वाघनखे येथे होती असे आपल्याला सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने काही कोटी रुपये खर्च करून ती वाघनखे 3 वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेतली आहेत असे सांगण्यात आले.

आता मुळात ही वाघनखे खरेच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती का? याविषयी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी फार चांगले विश्लेषण केले आहे. मी काही इतिहासकार नाही. पण तरीही अभ्यासू लोकं काहीतरी सांगत असतात तेव्हा आपण काही गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे. लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ग्रँड डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपती यांनी वाघनखे भेट दिली. त्यांनी सुद्धा ही वाघनखे शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केला नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सातारा छत्रपतींकडे आहे असे त्या प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवले आहे. याच अस्सल वाघनखांसारखी दिसणारी वाघनखे प्रतापसिंह यांनी मला भेट दिली असे एल्फिन्सनसारखा भारताचा इतिहास लिहिणाला माणूस सांगतो. यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न इंद्रजित सावंत यांनी विचारला आहे.

वाघनखांनी लोकांच्या जिवनात काय फरक पडला?

असिम सरोदे पुढे म्हणाले, व्हिक्टोरिया अल्बर्ट म्यूझियममध्ये यासंबंधी लावण्यात आलेल्या फलकावर ‘क्लेम’ असा शब्द लिहिण्यात आला आहे. या म्यूझियमच्या 22 व्या क्रमांकावर सरकारने आणलेली वाघनखे ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी ही वाघनखे शिवाजी महाराजांची असल्याचे, पण त्याचवेळी अनेकांनी असा दावा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने ही वाघनखे आपल्या सर्वांच्या करामधून गोळा झालेल्या पैशांचा वापर करून ही वाघनखे महाराष्ट्रात आणली आहे. पण ही वाघनखे खरी नसल्याचा दावा सर्व इतिहासकार करत आहेत. वाघनखे महाराष्ट्रात नेल्यानंतर लोकांच्या जिवनात फार काही फरक पडेल असेही नाही. मग कोट्यवधी रुपये खर्च करून या म्यूझियमची कमाई का करून देण्यात आली? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सजग नागरिकांनी व शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी येथील वाघनखे भाड्याने महाराष्ट्रात प्रदर्शन करण्यासाठी का नेले? असा प्रश्न केला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज जानते राजे होते. कारण, ते जनतेचा पैशांचा गैरवापर कधीही होऊ देत नव्हते. शेवटचा पैसा सुद्धा लोकांच्या उपयोगासाठी व विकासासाठी वापरला पाहिजे असे समजणाऱ्या शिवाजी महाराजांचे धोरण व विचार या लोकांना पाळता येत नाही. हे लोक इथले कुणाचे तरी नकली वाघनखे घेऊन महाराष्ट्रात जातात व तिथे सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांवर प्रेम करतो म्हणून ते आणले आहेत. ते विकत घेतले असते तर आपण समजू शकलो असतो. पण भाड्याने 3 वर्षांसाठी इथून नेलेत. त्यासाठी एक मोठी रक्कम नागरिकांच्या करांतून द्यावी लागली. याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे, असे असिम सरोदे यांनी म्हटले आहे.

यूट्यूबर ज्योतीला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

हिसार ;

हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.हिसार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होती. ती सोशल मीडियाद्वारे भारताची गोपनीय माहिती पाठवत होती. ज्योतीने चार वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे, ज्यामुळे ती भारतीय सुरक्षा एजन्सींच्या देखरेखीखाली होती.

ज्योती पाकिस्तानात क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेल्यावर सुरक्षा यंत्रणांचा तिच्यावरील संशय अधिकच वाढला. तिथल्या एका मैत्रिणीने ज्योतीच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च उचलला. याशिवाय, ती भक्तांच्या गटासह तीनदा पाकिस्तानला गेली होती. ज्योतीविरुद्ध हिसार सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योतीचे घर हिसारमधील घोडा फार्म रोडवर आहे. तिचा सोशल मीडियावर एक ट्रॅव्हल ब्लॉग आहे. पूर्वी ती गुरुग्राममध्ये एका खासगी कंपनीत काम करायची, पण कोविड दरम्यान तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यानंतर ती ब्लॉगर बनली. ज्योतीचे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे एक चॅनेल आहे.
२०२३ पासून हेरगिरीचा संशय: मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्योती २०२३ मध्ये पाकिस्तानला गेली होती. उच्चायुक्तालयातून व्हिसा मिळाल्यानंतर तिने ही यात्रा केली. या काळात ज्योतीची भेट पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशशी झाली, ज्याच्याशी तिचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. दानिशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंटांशी झाली, ज्यात अली अहसान आणि शाकीर उर्फ ​​राणा शाहबाज (ज्यांचे नाव तिने तिच्या फोनमध्ये ‘जट्ट रंधावा’ असे सेव्ह केले होते) यांचा समावेश होता.
सोशल मीडियाद्वारे एजंट्सशी संपर्कात राहिले: अहवालानुसार, ज्योती व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे या एजंट्सशी संपर्कात राहिली. ती सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने सकारात्मक प्रतिमा तर मांडत होतीच, शिवाय संवेदनशील माहितीही शेअर करत होती. दानिश आणि त्याचा सहकारी अली अहसान यांच्यामार्फत ज्योतीची पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी (पीआयओ) ओळख झाली, ज्यांनी तिच्या पाकिस्तानात प्रवास आणि राहण्याची व्यवस्था केली. त्याने एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी जवळचे संबंध निर्माण केले आणि अलीकडेच त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली बेटावर प्रवास केला.
२०२५ मध्ये दानिशला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते : मीडिया रिपोर्ट्सनुसार, एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशला १३ मे २०२५ रोजी भारत सरकारने हेरगिरीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली पर्सना नॉन ग्राटा घोषित केले होते आणि देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्योती यांना सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पाकिस्तान त्याचा वापर भारताविरुद्ध प्रचार आणि हेरगिरीसाठी करत होता.

रंगला मराठी गझल मुशायरा

गझल लिहिणे ही एक जोखीमच असते : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : केवळ काफीया आणि रदीफ साधून उत्तम गझलरचना होत नाही. वृत्तरचनेइतकाच गझलेमध्ये लघु गुरु अक्षरांचा क्रम कसोशीने सांभाळाचा लागतो आणि मात्रांचा हिशेब तर गणिती पद्धतीने चोख राहील याची काळजी घ्यावी लागते. ही सारी आचारसंहिता पाळली तरच निर्दोषपणा आणि सफाई फार चांगल्या पद्धतीने प्रत्ययाला येते. गझल लिहिणे ही एक जोखीमच असते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
ब्रह्मकमळ साहित्य समूह, मुंबई आयोजित मराठी ग़झल मुशायरा या कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. आनंद पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी गझल मुशायरा सादर करण्यात आला. त्यात विश्वास कुलकर्णी, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी, महेश देशपांडे, निर्मिती कोलते, संदीप मर्ढेकर, विशाल राजगुरु, एजाज शेख यांनी सहभाग घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलकारांचा यथोचित सन्मान व्हावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात योग्य ते स्थान मिळावे, अशी अपेक्षा गझलकारांनी व्यक्त केली. त्यावर सकारात्मक विचार करू असे प्रा. जोशी यांनी सांगितले.
प्रा. जोशी म्हणाले, गझल म्हणजे केवळ प्रेमगीत नसते. त्यातून सामाजिक आशयही प्रभावीपणे प्रकट करता येतो. लेखनातीलच नव्हे, वाचनातीलही बेहोषी, बुद्धिचातुर्य, अनुभवांच्या विरोधपूर्ण मांडणीतून साधली जाणारी कल्पना चमत्कृती, ठाम आणि निर्णायक विधानांमुळे आविष्कारात येणारा ठोसपणा या विशेषांमुळे गझलला दादही भरपूर आणि तत्काळ मिळते. एखाद्या नाजूक, तरल, संयत आणि सूचक कवितेपेक्षा आवाहक आणि आक्रमक गझल श्रोत्याला अधिक मानवते. श्रोत्यांकडून चटकन्‌‍ दाद वसूल करणारा आणि लोकप्रियेतेचे भरगच्च माप कवीच्या पदरात टाकणारा हा रचना प्रकार आकर्षक आणि अनुकरणीय वाटला, तरी गझलरचना वाटते तितकी सोपी नसते. सच्चा अनुभव त्याच्या लयीसह गझलेत उत्स्फूर्तपणे मांडत शेर कसा बोटीबंद होईल याचे कसब साधावे लागते. सूत्रसंचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले.

मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १७: मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, हिरामण मांडेकर, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ आदी उपस्थित होते.

जिल्ह्याने ॲग्री हॅकॅथॉनचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. ज्याचा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग होईल. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्याचा वापर करण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर अधिक मागणी होईल. ते पाहता विविध पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा म्हणून अधिकची तरतूद करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार रुपये अनुदान दिले जात होते. ते नंतर वाढवून ७५ हजार रुपये केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी होत असून १ लाख रुपयांपर्यंत कसे वाढविता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बियाणे, किटकनाशकांच्या बाबतीत तक्रारींकडे तात्काळ लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. डोंगरी भागात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथील पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभाची रक्कम महाडिबीटी मार्फत वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी प्रास्ताविकात सांगितले, मान्सून वेळेवर येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून त्यानुसार जिल्ह्यात बियाणे आणि खतांच्या पुरेशा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३४ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ४८ हजार क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ लाख ९६ हजार मे. टन रासायनिक खतसाठा मंजूर आहे. त्यानुसार पुरवठ्याबाबत अडचण येणार नाही. युरियाचा ७ हजार ५०० मे. टन आणि डी.ए.पी. चा १ हजार मे. टनचा संरक्षित (बफर) साठा करण्यात येणार आहे.

यावर्षी ॲग्री हॅकॅथॉन हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून यात कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच उद्योग संघटना आदींनी स्पर्धक म्हणून नोंदणी केली आहे. यात कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून त्यावर स्पर्धकांनी सादर केलेल्या उपाययोजनांची छाननी करुन १ ते ३ जूनदरम्यान हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. एआय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, जीआयएस, आयओटी, ड्रोन तंत्रज्ञान, शेतीमध्ये मशीन लर्निंग आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक वर्गीकरणातील प्रथम विजेत्यास २५ लाख रुपये व द्वितीय विजेत्यास १५ लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाईल.

याशिवाय पुढील पाच वर्षात निर्यातक्षम पिकांच्या लागवड तसेच उत्पादन वाढीसाठी समूह अर्थात क्लस्टर पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. यात केळी, अंजिर, स्ट्रॉबेरी, आंबा, करडई व सूर्यफूल, ज्वारी, भात, भाजीपाला, सोयाबीन यासह ऊस उत्पादकतेत वाढ करणे यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

इंद्रायणी भाताला भौगोलिक ओळख (जीआय) मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा आमदार श्री. शेळके यांच्या मागणीच्या अनुषंगाने कृषी विभागाने तात्काळ तसा प्रस्ताव करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या रकमेत वाढ व्हावी, वनविभागाच्या हद्दीतील जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, अशी मागणी आमदार कुल यांनी केली. त्यावर कार्यवाही निर्देश श्री. पवार यांनी दिले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी या योजनेचे अनुदान आजच बँक खात्यावर जमा झाल्याचा लघुसंदेश (एसएमएस) उपमुख्यमंत्री महोदयांना दाखविल आणि समाधान व्यक्त केले.
0000

अधिकाधिक असंघटित  कामगारांना ई – श्रमिक कार्ड मध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न – अर्णब चॅटर्जी

0

भारतीय जनता मजूर सेलच्या राज्य कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

पुणे : राज्य आणि केंद्र सरकार असंघटित कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या सबलिकरणाचा प्रयत्न करत आहे. मात्र विरोधी  कामगार संघटना या योजना कामगारांपर्यंत घेऊन जात नाहीत किंवा त्यांचा लाभ कामगारांना मिळू देत नाहीत. भारतीय जनता मजदूर सेल सरकारी योजना कामगारांपर्यंत घेण्यासाठी आणि अधिकाधिक असंघटित  कामगारांना ई – श्रमिक कार्ड मध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती भारतीय जनता मजूर सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी यांनी शनिवारी दिली. 

भारतीय जनता मजूर सेलच्या महाराष्ट्र  राज्य कार्यकारिणीच्या  पदग्रहण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात अर्णब चॅटर्जी  बोलत होते. यावेळी सेलच्या प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर, युवा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शर्मा, राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल,महाराष्ट्र उपाध्यक्ष जयेश टांक, गुजरात राज्य अध्यक्ष अजय बिडवाई, नवनिर्वाचित राष्ट्रीय प्रवक्ते सुधीर जानज्योत, संतोष पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.  याप्रसंगी राज्य कार्यकारिणीतील 34 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

पुढे बोलताना चॅटर्जी म्हणाले,  भारतीय जनता मजूर सेल (BJMC) ही राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त व शासन नोंदणीकृत कामगार संघटना आहे. भारतातील २९ राज्यांमध्ये BJMC चे कार्य चालू असून, महाराष्ट्रातही सशक्त विस्तार करण्यात आला आहे. सध्या आम्ही असंघटित क्षेत्रातील कामगारांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आज राज्यात 30 लाखांहून अधिक कामगारांना ई श्रमिक कार्ड मिळाले आहे, अजूनही अनेक कामगार या सुविधे पासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत सरकारची ही योजना घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बालकामगार कमी करण्याचा आमचा हेतु असून यासाठी महाराष्ट्रात लवकरच एक शाळा सुरू करण्यात येणार आहे. 

ज्योती सावर्डेकर म्हणाल्या, कामगार व शासन यांच्यात मजबूत सेतू निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.  सामाजिक न्याय, आर्थिक सक्षमीकरण व कल्याणकारी योजना सर्व कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची कार्यकारिणी प्रयत्न करणार आहे. आजच्या कार्यक्रमात  नवीन पदाधिकाऱ्यांना अधिकृत नेमणूक पत्र वितरित करण्यात आले आहे. आता  विविध जिल्हा, नगरपालिका, पंचायतस्तरावर कामकाज सुरू होणार आहे. 

महाराष्ट्रातील  सफाई कामगारांचे सशक्तीकरण,किमान वेतन लागू करणे, सुरक्षा साधने (हॅट, ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझर, बूट) देणे. आरोग्य विमा, वेळेवर पगार, पेन्शन योजना स्वच्छता, अधिकार व सुरक्षा यावर जनजागृती यासाठी आम्ही काम करणार आहोत. वाहतूक कामगार (ऑटो, ई-रिक्शा, ट्रक चालक), ई-श्रमिक कार्ड नोंदणी, कामगारांच्या कुटुंबांना आरोग्य, विमा, शिक्षण योजना  यांचा त्यांना लाभ मिळवून देण्यात आमचा पुढाकार असेल. फेरीवाल्यांसाठी परवाने व ओळखपत्रे मिळवून देणे, विक्रेता झोन निश्चित करण्यात मदत करणे,PM SVANidhi व सूक्ष्म वित्त योजना आणि उद्योजकता प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता त्यांच्यात आणण्याचे आमचे ध्येय आहे.

रेशनवरील धान्याचा कोटावाढवून मिळावा:आ. सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे : शहरातील वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता राज्य शासनाने पुणे शहरासाठी रेशनवरील धान्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शनिवारी) केली.

शहर आणि जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत आमदार शिरोळे सहभागी झाले. त्यांनी रेशनिंग कोटा वाढवून मिळावा अशी मागणी बैठकीत केली. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातही रेशन कार्ड्सची संख्या आणि धान्याचा कोटा वाढवून मिळावा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

रेशन दुकानातील धान्य पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तत्काळ निवारण करण्यात यावे. पुणे शहरात रेशन विभागाचे ११ परिमंडल झोन आहेत, तेथील कामकाजात गती येण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, असेही आमदार शिरोळे यांनी सुचविले.

पब्लिक लॉगिन मध्ये ऑनलाईन काम करताना आरसीएमएस ही वेबसाईट सुरळीत चालत नाही. सर्व्हर खूप वेळा स्लो असतो किंवा बंदही असतो, याकडे शिरोळे यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले

युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

येत्या काळात लोहगाव आणि वडगावशेरी परिसरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल-उपमुख्यमंत्री

पुणे, दि.१७: रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. येत्या काळात लोहगाव आणि वडगावशेरी परिसरात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ययुक्त शिक्षण मिळण्याकरीता कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टाटा ग्रुप, नगरविकास विकास, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, सीओईपी टेक विद्यापीठाचे कुलगुरू सुनील जी. भिरुड, टाटा टेक्नॉलॉजीसचे कौशल्य विभागाचे प्रमुख सुशीलकुमार, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आदी उपस्थित होते.

राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यावर भर
श्री. पवार म्हणाले, औद्यागिक प्रशिक्षणाला काळानुरुप अत्याधुनिक बनविण्याची गरज होती, कृत्रिम बुद्धीमत्तासारखे अत्याधुनिक प्रशिक्षण युवकांना मिळाले पाहिजे, यादृष्टीने टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून राज्यात चंद्रपूर, गडचिरोली येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कौशल्यवर्धन केंद्राकरिता टाटाने २४० कोटी रुपये आणि राज्य शासनाने ४० कोटी रुपये तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापिठातील केंद्राकरीता टाटाकडून १४५ कोटी रुपये आणि राज्य शासनाकडून ३० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच कल्याण डोंबिवली, रत्नागिरी, पुणे, शिर्डी, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही कामे सुरु आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत

श्री. पवार पुढे म्हणाले, पुणे शहर ही शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. अलीकडील काळात पिंपरी-चिंचवडमुळे पुणे शहरालादेखील औद्यागिक नगरी अशी ओळख मिळाली आहे. पुण्यासहित परिसराचा औद्योगिक विकास होताना आयटी पार्क सारख्या संस्था स्थापना झाल्या आहेत. उद्योग आणि आयटी पार्कमध्ये कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज विचारात घेता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडमार्फत संचालित बाणेर येथील कौशल्यवर्धन केंद्रातून युवकांची रोजगारक्षम पिढी निर्माण करणारे अत्याधुनिक, तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. उद्योगाधंद्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याचे प्रात्याक्षिकही दिले जाणार आहे. यामुळे युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार तसेच औद्यगिक क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी
या प्रकल्पाअंतर्गत सर्व यंत्रसामुग्री, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधने आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर व इतर सर्व वस्तूंचे हस्तांतरण पुणे महानगरपालिकेस करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पीईबी इमारत माहे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी. सर्व सुविधांनी युक्त आराखडा तयार करुन त्याप्रमाणे कामे दर्जेदार पद्धतीने गतीने पूर्ण करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात विविध सार्वजनिक विकासकामे सुरु असून अधिकाऱ्यांनी समर्पण भावनेने काम करावे, तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

कौशल्यवर्धन केंद्राच्या माध्यमातून ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट-डॉ. राजेंद्र भोसले

पुणे शहरातील विद्यार्थ्यांसोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कौशल्यवर्धन केंद्रातून दरवर्षी सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये २७९ कोटी ६७ लाख इतकी असून या रक्कमेपैकी रुपये २३७ कोटी ७२ लाख रुपये इतकी रक्कम टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याकडून तर उर्वरित खर्च रुपये ४१ कोटी ९५ लाख रुपये नगर विकास विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून सुमारे १ एकर (३ हजार ६०५ चौ.मी.) जागा उपलब्ध देण्यात आली असून त्यामध्ये सुमारे २२ हजार चौरस फूट क्षेत्रफळात इमारत उभारण्यात येणार आहे. या केंद्राचा नवउद्योजक, स्टार्टअप यांच्यासोबत लाखो युवकांना लाभ होणार आहे, असे प्रास्ताविकात डॉ. भोसले म्हणाले.
000

आघाडी काळात अनेक भ्रष्टाचार झाले हे राज्याचे दुर्देव _ भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी

लेखक विनायक आंबेकर लिखित “किंगमेकर क्रॉनिकल_ वसुली व घोटाळ्याचे पर्व “पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, प्रतिनिधी _
सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक नंतर निकाल आले आणि राज्यातील राजकारण बदलले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युतीने एकत्रित त्या निवडणूक लढवल्या आणि निकालात आम्हाला १६१ जागा देखील मिळाल्या. त्यामुळे राज्यात सरकार युतीचे येणे आवश्यक होते. पण शिवसेनेने जनतेचा, भाजपचा विश्वासघात केला आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन आघाडी सोबत त्यांनी सरकार स्थापन केले. त्यांचा अडीच वर्षाचा कारभार हा दुर्देवी होता.कोरोना काळात तत्कालीन राज्य सरकार अपयशी ठरले. यादरम्यान अनेक भ्रष्टाचार झाले हे राज्याचे दुर्देव आहे असे मत भाजप नेते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे.

लेखक विनायक आंबेकर लिखित “किंगमेकर क्रॉनिकल_ वसुली व घोटाळ्याचे पर्व “पुस्तकाचे प्रकाशन भाजप नेते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. यावेळी भंडारी म्हणाले, किंगमेकर क्रॉनिकल हे पुस्तक आज प्रकाशित केले हे चांगले आहे. विनायक आंबेकर यांचे लेखन अभ्यासपूर्ण आहे. त्यांनी धर्मकन्या 2014 साली लिहिले. 2016 साली नोटबंदीवर देखील त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले होते. मराठी मध्ये राजकीय विषया बाबत अभ्यासपूर्ण फारसे लिखाण येत नाही.राजकीय घटना कादंबरी स्वरूपात सर्वजण वाचतात. कादंबरीमध्ये थोडे विस्ताराने लिखाण करता येते. सर्व घटनामागील दडलेल्या गोष्टी, हितसंबंध, अंतस्थ हेतू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आंबेकर यांनी या पुस्तकातून केला आहे. आंबेकर यांनी हे लिखाण आज लिहिले नसून त्याची तयारी आधीच त्यांनी केली होती.

लेखक विनायक आंबेकर म्हणाले, विविध घटना बद्दल किंवा पंतप्रधान ते मुख्यमंत्री सर्वांबद्दल अर्वाच्च भाषेत बोलणारे असे का बोलतात ते जनतेने समजून घेणे आवश्यक आहे. असे करताना त्यांना जनतेपासून काय लपवयचंय हे जनतेला माहिती व्हावे या साठी हे पुस्तक लिहिले आहे. कोरोना काळ आणि महाविकास आघाडी काळातील घोटाळ्यांची साखळी या पुस्तकातून स्पष्ट केली आहे. मी जे लिखाण केले ते ज्या तथ्य गोष्टी दिसल्या त्याबाबत आणि त्यामागील भूमिका विशद केली आहे. जनतेसमोर आघाडी काळातील विविध घटनांमागील हितसबंधाची, बोगस कार्यपध्दतीची पूर्ण माहिती मिळावी हा माझा उद्देश आहे. एका व्यक्तीला असा भ्रम झाला आहे की,आपण बोलू ते सर्व सत्य आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही हे मी दाखवून दिले आहे. आघाडी सरकारच्या काळातील घोटाळ्यांच्या सर्व प्रकरणा मागील तथ्य या पुस्तकात मांडले गेले आहे.

सहेला रे..’ गानमैफलीला रसिकांचा भरघोस प्रतिसाद

भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशनचे आयोजन

पुणे:भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कलाश्री’ प्रस्तुत ‘सहेला रे..’ ही गानमैफल भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात सादर झाली. रसिक श्रोत्यांच्या भरघोस उपस्थितीत आणि उत्स्फूर्त प्रतिसादात ही सांगीतिक संध्या रंगली.

या मैफलीत  गायिका डॉ. राधिका जोशी आणि गायक अभिषेक काळे यांनी  भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या रचना अत्यंत भावपूर्ण सादर केल्या. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या आशयपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमाला एक वेगळेच साहित्यिक व कलात्मक परिमाण लाभले.भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक  केले आणि त्यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार ज्ञानेश्वरीची प्रत आणि प्रशस्तिपत्रक  देऊन करण्यात आला.

मैफलीची सुरुवात डॉ.राधिका जोशी यांनी राग भूपमधील ‘सहेला रे’ या रचनेने केली. त्यानंतर ‘कलाश्री’, ‘राम रंगी’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘जमुना के तीर’, ‘ भाग्यदा लक्ष्मी बारम्मा अशा विविध रचना अभिषेक काळे यांनी सादर केल्या. डॉ. राधिका जोशी यांनी ‘म्हारो प्रणाम’, ‘ जाईन विचारित रानफुल’, ‘’, किशोरीताईंनी स्वरबद्ध केलेली  गझल, तसेच ‘बोलावा विठ्ठल’, ‘अवघा रंग एक झाला’ अशा सशक्त गायनरचना सादर केल्या. आणि रंगलेल्या मैफलीचा समारोप केला.

या गानसंध्येस मालू गावकर (हार्मोनियम) आणि रामकृष्ण करंबेळकर (तबला) यांची प्रभावी साथ लाभली.

‘ सहेला रे’ ही मैफल भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत आयोजित २४४ वा कार्यक्रम होता . या मैफिलीला  प्रवेश विनामूल्य होता .हा कार्यक्रम १७ मे २०२५ रोजी सायंकाळी झाला.