किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (केव्हीआयएफएफ) द्वारा ‘वेंगुर्ला मॉडेल’च्या यशस्वी कथेवर लघुपट.
डॉ . पी . ए . इनामदार याना मौलाना आझाद सन्मान प्रदान
पुणे लोकसभेची जागा पुन्हा काँग्रेसकडे आणणारच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर
पुणे -लोकसभा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून पुण्याची जागा काँग्रेसच लढविणार आणि काँग्रेस पक्षाने मला लोकसभेकरिता संधी दिल्यास पुणे लोकसभेची जागा पुन्हा काँग्रेसकडे आणणारच असे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले , काँग्रेस पक्षाच्यावतीने पुणे लष्कर भागात जे जे गार्डन मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते .
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस बाळासाहेब शिवरकर व संगीता पवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे कॅन्टोमेंटच्या माजी नगरसेविका व कॅन्टोमेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा संगिता अशोक पवार होत्या . यावेळी सुल्तान खान, विजय जाधव, प्रशांत तुपे,हसन कुरेशी,अल्ताफ शेख,आमीन शेख, अकबर शेख,गणेश फुलारे,नितीन आरु , माजी नगरसेविका पार्वती भडके , सुरेंद्र परदेशी , बलबीरसिंग कलसी , रे फर्नाडिस , परेश गायकवाड , राजू राऊत , जान मोहम्मद शेख व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करून बालदिन साजरा करण्यात आला.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले कि , पंडित जवाहरलाल नेहरू अंत्यन्त उच्चभ्रू व श्रीमंत घरातले असताना देशाला स्वतंत्र्य मिळण्याकरिता त्यांनी सर्व सुख सुविधांचा त्याग केला . ते आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते . देशाचा गाडा अत्यन्त सुलभ व चांगला चालावा म्हणून व आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला पोटभर अन्न मिळावे म्हणून त्यांच्या कारकिर्दीत शेतीला ( कृषी )ला प्राधान्य देउन जास्तीत जास्त अन्नधान्य निर्मितीची क्रांती केली . म्हणून आपल्या देशाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते . त्याच बरोबर आपल्या देशातील तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे म्हणून औद्योगिक क्रांतीची निर्मिती केली . त्यामुळे आज अनेक तरुणांना रोजगार मिळाले आहेत . त्यांना लहान मुले प्रिय होती . म्हणून आजचा दिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो . अशा थोर काँग्रेसच्या नेत्याला माझा मनापासून मानाचा मुजरा . आणि अशा थोर पुरुषांच्या जयंती आम्ही वेगवेगळ्या भागात साजरी करू व काँग्रेस पक्ष भक्कम करण्याचा निर्धार व आवाहन याप्रसंगी बाळासाहेब शिवरकर यांनी केले .
या कार्य्रक्रमाचे प्रास्तविक पुणे महापालिका शिक्षण मंडळ माजी सदस्य विजय जाधव यांनी केले . तर सूत्रसंचालन अमीन शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजक पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस हसन कुरेशी यांनी आभार मानले .
कर्वे समाज सेवा संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वेंच्या स्मृतींना उजाळा
पुणे: स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देऊन महिलांसाठीचे पहिले (एस एन डी टी) विद्यापीठ स्थापन करणारे शिक्षणमहर्षी भारतरत्न डॉ धोंडो केशव कर्वे यांच्या नावे १९६३ साली स्थापन करण्यात आलेल्या कर्वे समाज सेवा संस्थेचा नुकताच वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावेळी महर्षी आण्णांच्या विचाराना व स्मृतींना उजाळा देण्यात आला.
संस्थेचे सचिव एम. शिवकुमार, व्यवस्थापन मंडळ सदस्य वैजिनाथ बिरादार, महाविद्यालयाचे प्र. संचालक डॉ. महेश ठाकूर, रजिस्ट्रार विनायक कस्तुरे, प्रा. चेतन दिवाण व समन्वयक प्रसाद कोल्हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न महर्षी डॉ धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत त्यांच्या विचाराना व स्मृतींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व संस्था कर्मचाऱ्यांचे स्वागत प्र. संचालक डॉ. महेश ठाकूर यांनी केले तसेच महर्षी अण्णांनी खडतर काळात गावोगावी पायी फिरून गोळा केलेल्या निधीच्या सहाय्याने उभ्या केलेल्या शिक्षण क्षेत्रामधील त्यांच्या पर्वतापेक्षा महान अशा अतुलनीय कार्याचा आढावा यावेळी आढावा घेण्यात आला.
कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन सदानंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालयीन अधीक्षक सतीश खुडे, विष्णू कुदळे, विजय कुंभार, सुनील वाघमोडे, सतीश परभाने आदींनी विशेष परिश्रम घेतले.
बालदिनी अंगणवाडीला आगीचा तडाखा -(व्हिडीओ)
पुणे-धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील क्रीडा संकुलाच्या अडगळीच्या खोलीत आग लागली आणि तिची झळ लगतच्याच अंगणवाडीला पोहोचली. यावेळी बालदिन साजरा करण्यास आलेली मुले आणि शिक्षिका वेळीच अंगणवाडी बाहेर पळाल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही .मात्र अंगणवाडीतील मुलांचे शैक्षणिक साहित्य,खेळाच्या वस्तू आणि कागदपत्रे जाळून खाक झाली . महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी हि आग तत्काळ विझवली. यासाठी आगीचे ३ बंब आणि एक टँकर येथे खबर मिळताच अवघ्या सात मिनिटात दाखल झाले सुमारे २० जवानांनी हि आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.आगीची खबर मिळताच येथे माजी उपमहापौर आबा बागुल ,नगरसेवक राजेंद्र शिळीमकर ,महेश वाबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली .आणि येथील पाहणी केली .दिवाळीच्या सुट्टीमुळे २५ पैकी केवळ आठ मुलेच आज बालदिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यापैकी एका मुलाने लघुशंकेसाठी जातो असे सांगून निघाला आणि तो तातडीने मला धूर येतोय असे म्हणाला ..तत्क्षणी आगीची कल्पना आली आणि आम्ही बाहेर पडलो असे अंगणवाडी शिक्षिका शैला भोसले यांनी सांगितले, त्या यावेळी खूप भावूक झाल्या होत्या ,अंगणवाडी बेचिराख झाल्याचे दुखः त्यांना आवरत नव्हते .पहा घटनास्थळीचा हा व्हिडीओ रिपोर्ट
‘राफेल’ .. पिक्चर अभी बाकी है दोस्त’ – राहुल गांधी
नवी दिल्ली : राफेल कराराच्या मुद्यावरून मोदी सरकारला घेरत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नरेंद्र मोदी यांनी आपली चूक मान्य केली आहे.
राहुल गांधी यांनी मंगळवारी याबदल एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयात मोदी यांनी आपली चोरी मान्य केली आहे’. ‘प्रतिज्ञपत्रात त्यांनी मान्य केले आहे की, त्यांनी वायूसेनेला न विचारताच करार बदलला आणि 30,000 कोटी रूपये अंबानी यांच्या खिशात टाकले’. पुढे राहुल गांधी यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असं लिहित ‘राफेल करारा’बाबत आणखी खुलासे होणे बाकी असल्याचे सुचविले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने आज राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली. राफेलची खरेदी प्रक्रिया आणि किंमत जाहीर करण्यास केंद्र सरकार सारखी कां-कूं करीत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने ’36 राफेल विमान खरेदी निर्णय प्रक्रियेची सविस्तर माहिती’ असे लिहिलेला लिफाफा न्यायालयात सादर केला.
राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती सादर करताना केंद्र सरकारने म्हटले आहे की, जेट खरेदी प्रकरणात सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. कॅबिनेटच्या संरक्षणविषयक समितीने मंजुरी दिल्यानंतरच सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने ही माहिती एका बंद लिफाफ्यात दिली आहे.
पाया भुसभुशीत; शिवस्मारकाचे काम थांबवा: मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई – अरबी समुद्रात राजभवनाजवळ उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठीच्या नियोजित स्थळी स्मारकाचा भार पेलवेल असा कठीण पाया नाही, असा दावा करत या स्मारकाचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी ‘आपली मुंबई’ या संस्थेने केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष व निवृत्त व्हाइस अॅडमिरल आय. सी. राव यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सोमवारी याबाबतचे पत्र पाठवले. पत्रात म्हटले आहे की, एल अँड टी कंपनीने स्मारकस्थळी मे २०१८ मध्ये १०० मीटर खोलीचे एकूण १७ बोअर घेतले. त्यातले दोन बोअर्स २१२ मीटर उंच छत्रपतींचा पुतळा जेथे उभा करण्यात येणार आहे त्या खाली घेतले होते. त्या ठिकाणी ११ मीटर खाेलीपर्यंत जांभा दगड (कठीण) आढळून आला. मात्र त्याच्या खाली १०० मीटरपर्यंत ज्वालामुखीच्या राखेपासून (व्होलकॅनिक टफ) बनलेला खडक (ठिसूळ) आढळून आला आहे. उर्वरित १५ बोअर्स घेतले.
त्याच्या ६ मीटर खोलीपर्यंत वाळू आढळली, तर त्याच्या खाली ३० मीटर खोलीपर्यंत ज्वालामुखीच्या राखेपासून बनलेला ठिसूळ असा खडक आढळून आला. त्यामुळे अशा भुसभुशीत पाया एकूण स्मारकाचे २० लाख टन (२ मिलियन) वजन पेलू शकणार नाही. भुसभुशीत पायामुळे छत्रपतींचे स्मारक भविष्यात कोसळून पडण्याचा धोका असल्याचा दावा राव यांनी भूगर्भशास्त्रज्ञाच्या हवाल्याने केला आहे. स्मारकाच्या पायाची चाचणी एल अँड टी कंपनीने केली आहे. २१२ मीटर उंच पुतळ्याचा भार पेलवण्याइतपत पाया कठीण नसल्याचे कंपनीच्या लक्षात येऊनही स्मारकाचे काम कसे काय चालू आहे, असा प्रश्न राव यांनी आपल्या पत्रात उपस्थित केला आहे.
छत्रपतींच्या स्मारकाला अपघात होऊ द्यायचा नसेल आणि साडेतीन हजार कोटींचा खर्च वाया जाऊ द्यायचा नसेल तर स्मारकासंदर्भात २८ फेब्रुवारी २०१४ रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय (जीआर) आणि १२ आॅक्टोबर २०१८ रोजी प्रकल्पाच्या कामाचा दिलेली कार्यारंभ आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राव यांनी केली अाहे.
कोण आहेत राव ?
आय. सी. राव हे निवृत्त व्हाइस अॅडमिरल (कुलाबा) व आपली मुंबई संस्थेचे अध्यक्ष अाहेत. ते समुद्रविषयक जाणकार मानले जातात. स्मारकाची नियोजित जागा अयोग्य असल्याचे त्यांचे मत आहे. ‘आरटीआय’अन्वये त्यांनी स्मारक प्रकल्पातील अनेक अनागोंदी उघडकीस आणल्या आहेत. छत्रपतींचे स्मारक भाऊच्या धक्क्याशेजारच्या क्रॉसआयलँड वर करावे अशी त्यांची मागणी आहे .
गुप्तचर विभागाच्या प्रमुखांची आयोगासमोर उलटतपासणी करण्याची गरज- अॅड. प्रकाश आंबेडकर
पुणे – गरज पडल्यास कोरेगाव-भीमा प्रकरणाशी संबंधित असलेले सरकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांनाही चौकशीसाठी बोलावू, असे मत कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने व्यक्त केले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज चौकशी आयोगासमोर प्रा. म. ना कांबळे यांची बाजू मांडली. हे प्रकरण हाताळताना सरकारी यंत्रणेच्या कुठे चुका झाल्या? कशा पद्धतीने चुका झाल्या? याची चौकशी करण्यासाठी सनदी अधिकारी आणि राजकीय अधिकारी यांना चौकशीसाठी बोलवावे, असे मत आयोगाने व्यक्त केले आहे.राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांची आयोगासमोर उलटतपासणी करण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी आयोगासमोर सांगितले.
आंबेडकर यांनी यावेळी आयोगासमोर बोलताना पुणे ग्रामीण पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि पुणे शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे सांगितले. कोरेगाव-भीमा आणि आजुबाजुच्या ५ गावांतील ग्रामपंचायतींनी १ जानेवारीला बंद पुकारला होता. याची माहिती या गावांमधील ग्रामसेवकांनी २० डिसेंबरलाच पोलिसांना दिली होती. १ जानेवारी रोजी सकाळी वढु गावामध्ये समस्त हिंदू आघाडीकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला स्थानिक पोलिसांनी परवानगी दिली होती का? दिली असल्यास या बंदोबस्तासाठी किती पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांची नावे काय? याची माहिती देण्यात यावी. या दरम्यान वायरलेसवरुन आणि इतर माध्यमातून पोलिसांमध्ये काय संवाद झाला? याचीही माहिती देण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
आंबेडकरांच्या या मागणीवर चौकशी आयोगाला मदत करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचे वकिलांनी सांगितले. परंतु, बंद लिफाफ्यात आयोगाला ही माहिती पुरवली जाऊ शकते, अशी भुमिका सरकारी वकिलांनी मांडली. २० डिसेंबरला कोरेगाव-भीमा परिसरातील हिंसाचार झालेल्या ५ गावातील ग्रामसेवक आणि तलाठी यांनी १ तारखेला बंद पुकारल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली होती. मात्र, त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. याची चौकशी करण्यासाठी राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांची आयोगासमोर उलटतपासणी करण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी आयोगासमोर सांगितले.
शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका – मदतनीसांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मान्यता
राज्यातील दोन लाख कर्मचाऱ्यांना लाभ
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका -मदतनीसांचे सेवा समाप्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यास मान्यता देणे, मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करणे, गुंजवणी प्रकल्पाच्या सुप्रमामधील अटीत बदल करून सिंचनासाठी नैसर्गिक दाबाद्वारे पाणी उपलब्ध करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात त्यांच्या संघटनेसोबत झालेल्या चर्चेवेळी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय 60 वर्षे करणे, मानधनात वाढ करणे याबाबतचा शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2018 रोजी काढण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या सेवा समाप्तीचे वय 65 वर्षे ठेवण्याबाबत विधानमंडळाच्या मार्च-2018 च्या अधिवेशनात सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून कार्यरत असलेल्या सेविकांचे सेवा समाप्तीचे वय 65 वर्षे ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहास देण्यात आले होते. त्यानुसार आजचा निर्णय घेण्यात आला.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर केंद्र शासनाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या पाहता त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे 60 वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीस सक्षमपणे काम करण्यास वैद्यकीय कारणास्तव अडचणी येतात. त्यामुळे वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. त्यामुळे 1 डिसेंबर 2018 रोजी वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांची वैद्यकीय तपासणी करुन त्या काम करण्यास पात्र असल्याबाबतचे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना मानधनी सेवेत ठेवण्यात येणार आहे. शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार 60 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर आणि 63 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर असे दोन वेळा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रथमत: तीन वर्षे म्हणजे वयाची 63 वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि त्यानंतर पुढील दोन वर्षे म्हणजे वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत काम करता येणार आहे. आदिवासी व ग्रामीण प्रकल्पांसाठी जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांचे तसेच नागरी भागासाठी शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक किंवा वैद्यकीय मंडळ यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल. सेविका-मदतनीस यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय वैद्यकीय यंत्रणांना कळविल्यानंतर त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करुन त्यांना विहित नमुन्यात मोफत प्रमाणपत्र देण्यात येईल.
नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या (1 नोव्हेंबर 2018 पासून) अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाड्यांच्या एकत्रिकरणानंतर मदतनीसाची अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक केल्यास त्यांची मानधनी सेवा 60 वर्षे राहणार आहे. अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासह माहिती संकलनाचे कामकाज डिजिटल होत असून अंगणवाडीबाबतच्या नोंदी Common Application Software मध्ये भरावयाच्या असल्याने अंगणवाडी सेविकांना तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रावीण्य परीक्षा आयोजित करण्यासही मान्यता देण्यात आली.
मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचाही समावेश
राज्यातील मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापन हे शब्द समाविष्ट करून या विभागाचे नाव आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 2 (स) नुसार आपत्ती व्यवस्थापनावर नियंत्रण असलेला विभाग राज्य शासनात कार्यरत असून कलम 14 नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणही स्थापन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. आपत्ती व्यवस्थापन हा विषय मदत व पुनर्वसन विभागामार्फत हाताळण्यात येतो. अतिरिक्त सचिवांच्या अखत्यारित असलेल्या या विभागात मदत व पुनर्वसनसाठी स्वतंत्र उपसचिव आहेत तर आपत्ती व्यवस्थापनासाठी आपत्ती व्यवस्थान संचालक हे पद पदसिद्ध उपसचिवाचे आहे. त्यामुळे मदत व पुनर्वसन विभागातर्फेच आपत्ती व्यवस्थापन करण्यात येत असल्याने या विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्यास आज मान्यता देण्यात आली.
गुंजवणी प्रकल्पाच्या सुप्रमामधील अटीत बदल; सिंचनासाठी नैसर्गिक दाबाद्वारे पाणी उपलब्ध होणार
पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमधील पहिल्या अटीत बदल करण्यात आला असून त्यानुसार धरण पायथा जलविद्युतगृह उभारणी रद्द करुन त्याऐवजी धरणातील पाण्याचा प्रवाही सिंचनासाठी वापर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वीज पंपाचा वापर न करता नैसर्गिक दाबाने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शासन आणि शेतकऱ्यांच्या वीज खर्चात मोठी बचत होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील गुंजवणी प्रकल्पावर बीओटी तत्त्वावर जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. यासाठी 3 ऑगस्ट 2018 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पास दिलेल्या दुसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेत अट क्र.1 समाविष्ट करण्यात आली होती. परंतु, जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीमुळे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना अपेक्षित नैसर्गिक दाबाने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नसते. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना वीज पंपाचा वापर करावा लागला असता. हे लक्षात घेऊन यासंदर्भातील अट क्र.1 वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे या प्रकल्पातील जलविद्युतगृह रद्द होणार आहे.
राज्य शासनाच्या सध्याच्या धोरणानुसार शेतीसाठी बंद नलिकेद्वारे (पाईपलाईन) सिंचनाची पद्धत अवलंबली जाणार आहे. गुंजवणी धरणक्षेत्रात ही व्यवस्था राबविताना जलविद्युत प्रकल्पामुळे पाण्याला अपेक्षित दाब मिळाला नसता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून पाण्याच्या दाबाचा वापर करुन सिंचन व्यवस्था राबविल्याने पाईपलाईन आणि वीजेच्या खर्चात बचत होणार आहे. वीज निर्मिती प्रकल्पाच्या तुलनेत अशा प्रकारे होणाऱ्या बचतीसह इतर दीर्घकालीन फायदे लक्षात घेऊन गुंजवणी प्रकल्पाच्या संकल्पनातील बदलास मान्यता देण्यात आली. यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक दायित्वाबाबत निर्णय घेण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे.
लहुजी वस्ताद स्वातंत्र्यसंग्रामाचे उद्गाते : प्रा. शिवाजी दळणर
गुजरात दंगल- मोदींना क्लीन चीट- विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली;2002 मध्ये गुलबर्ग सोसायटीमध्ये भडकलेल्या दंगलींमध्ये काँग्रेस खासदार एहसान जाफरींसह 69 जणांची हत्या झाली होती.
नवी दिल्ली – 2002 च्या गुजरात दंगलींदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना एसआयटीकडून क्लीन चीट मिळण्याच्या विरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. यावर 19 नोव्हेंबरला सुनावणी होईल. गोध्रा कांडानंतर अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीतही हिंसा झाली होती. त्यात काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी जकिया जाफरी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
साबरमती रेल्वेमध्ये जाळपोळीनंतर भडकली दंगल
27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रामध्ये साबरमती रेल्वेच्या कोचला आग लावली होती. त्यात 59 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतांश अयोध्याहून परतणारे कारसेवक होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगली कोसळल्या. त्यात जवळपास 1000 जणांनी प्राण गमावला होता.
गोध्रा कांडाच्या दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीत दंगलीमध्ये काँग्रेस खासदार जाफरी यांच्यासह 69 जणांची हत्या झाली होती. घटनेनंतर सोसायटीतील 39 जणांचे मृतदेह आठळले होते. इतर 30 जणांचे मृतदेह न आढळल्याने 7 वर्षांनी त्यांना मृत मानण्यात आले होते.
गुलबर्ग सोसायटीत 28 बंगले आणि 10 अपार्टमेंट आहेत. गुजरात दंगलीमध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या ठिकाणांपैकी गुलबर्ग सोसायटी ही एक होती. सुप्रीम कोर्टाच्या निगराणीमध्ये एसआयटीने गुलबर्ग सोसायटी प्रकरणाची पुन्हा चौकशी केली होती. एसआयटीने या प्रकरणात 66 जणांना अटक केली होती.
जकिया जाफरी यांचा आरोप आहे की, दंगल भडकल्याच्या दरम्यान त्यांचे पती हे मोठे नेते आणि पोलिसांना फोन करत होते. पण तरीही गुलबर्ग सोसायटीपर्यंत मदत पोहोचली नाही आणि दंगल घडवणाऱ्यांना अडवता आले नाही.
दंगलींच्या वेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होती. एसआयटीने 8 फेब्रुवारी 2012 रोजी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यात नरेंद्र मोदींसह इतर अधिकाऱ्यांना क्लीन चीट देण्यात आली. त्या क्लीन चीटच्या विरोधात जकिया जाफरी यांची याचिका डिसेंबर 2013 मध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने आणि 2017 मध्ये गुजरात हायकोर्टाने फेटाळली होती .ती याचिका आता सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे.
सई ताम्हणकरच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रु
अभिनेत्री सई ताम्हणकर आणि फिल्ममेकर संजय जाधव एकत्र आले की सुपहिट फिल्म पाहायला मिळणार, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय. फिल्ममेकर-हिरोईनची ही जोडी सिनेमाक्षेत्रातच नाही तर खेळाच्या मैदानावरही हिट आहे, हे सध्या सुरू असलेल्या कुस्ती दंगलमध्ये पून्हा एकदा सिध्द झांलं.
सोमवारी संजय जाधव ह्यांच्यासह सई ताम्हणकरची संपूर्ण टीम बालेवाडीमध्ये कोल्हापूर मावळे विरूध्द वीर मराठवाडा मॅचसाठी उपस्थित होती. आणि सईच्या कोल्हापूर मावेळ टीमला 4-2 अशा गुणांसह घवघवीत यश मिळाले. गेल्या काही दिवसांमधल्या मॅचेसमध्ये सोमवारी झालेली कोल्हापूर मावळेची लढत सर्वाधिक चुरशीची होती. टीम जिंकताच सईच्या डोळ्यांत आनंदाश्रु तरळले.
आपली टीम ‘कोल्हापूर मावळे’ सोबत आनंद साजरा केल्यावर उत्साहात असेली सई ताम्हणकर म्हणाली, “आजपर्यंत कुस्ती दंगलमध्ये झालेल्या सर्व लढतींपैकी सोमवारची लढत ही सर्वाधिक चुरशीची आणि मनोरंजक लढत होती. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या टीमच्या कुस्तीवीरांनी समोरच्या खेळाडूला मात देऊन यश मिळवलं. संजयदादा पहिल्यांदाच मॅच पाहायला आला. आणि आम्ही मॅच जिंकलो. मी नेहमी म्हणते, दादा माझा लकीचार्म आहे. आणि ते पून्हा एकदा सिध्द झालं.”
सई मिश्किलपणे संजय जाधव ह्यांच्याकडे पाहत पूढे म्हणाली, “आता मला जिंकवायला संजयदादाला प्रत्येक मॅचसाठी यावंच लागणार. ”
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले १५ नोव्हेंबर रोजी साधणार ई-लाईव्ह संवाद
पुणे -सामाजिक न्याय विभागामार्फत मागील चार वर्षाच्या काळात घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय व राबविण्यात आलेल्या योजनांच्या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले १५ नोव्हेंबर रोजी सकाळी 11-30 वा राज्यातील नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी व सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी यांच्या समवेत पार्थ नॉलेज नेटवर्क, ऐरोली, नवी मुंबई येथील डिजीटल प्लॅटफॉर्म वरुन ई-लाईव्ह संवाद साधणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण http://elearning.parthinfotech.in/ या लिंकव्दारे प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच ज्या व्यक्तींना/विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावयाचे असतील त्यांनी 8384858685 या मोबाईल क्रमांकावर WhatsApp व्दारे प्रश्न विचारावेत.
सर्व संबंधितांना याची नोंद घ्यावी व या उपक्रमात मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन मिलिंद शंभरकर, समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची ‘मुंबई आयआयटी रिसर्च इंटर्नशिप ‘साठी निवड
कात्रजचं रूपवान तळं.. अखेर हरवलं…
पुणे-पुण्याचं दक्षिण प्रवेशद्वार ..कात्रज ..निसर्गसमृद्धी नं नटलेलं हे प्रवेश द्वार हळू हळू काँक्रीटीकरणानं लोप पावतंय कि काय ? अशी भीती असताना आता चक्क ..पेशवेकालीन ,ऐतिहासिक कात्रजचे रूपवान तळे च जणू नाहीसं झालं आहे ,जणू हरवलं आहे … होय पूर्वीच ते तळं.. आता दुर्गंधीनं आणि जलपर्णीनं माखलं आहे . आज ड्रोन कॅमेरा लावून या तळ्याचा शोध घेण्याची वेळ मनसेच्या नगरसेवकावर आली ..त्याची हि हकीकत ….
गेल्या सुमारे दीडवर्षापासून कात्रज तलावाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता कात्रजचा वरचा तलाव जलपर्णी आणि दुर्गंधीने वेढला आहे . आज या तलावाचे ड्रोन कॅमेरा वापरून मनसे चे स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांनी फोटो काढून ते प्रसिद्धीसाठी पाठवले आहेत . येथील भाजपच्या नगरसेवकाने प्रशासनावर दबाव टाकून कात्रजच्या लगतची पण महापालिका हद्दीच्या बाहेरच्या गावांमधील ड्रेनेज च्या कामासाठी महापालिकेच्या तिजोरीतून म्हणजे पुणेकरांच्या पैशातून १० कोटी रुपये मंजूर करवून घेतले होते . यावेळी यातील 2 कोटी रुपये कात्रजच्या तलावाच्या स्वच्छतेसाठी वापरावेत अशी उपसूचना देखील वसंत मोरे यांनी दिली होती . मात्र भाजपच्या या नगरसेवकाच्या हट्टापायी ती नाकारली गेली . महापालिकेत नसलेल्या गावांमधील ड्रेनेजचे काम झाले किंवा कसे याची माहिती मिळू शकली नाही पण कात्रजच्या तलावाची मात्र मोठी दुरवस्था झाली आहे . यासाठी निवडणुकीपूर्वी दिसणारा कात्रजचा तलाव आणि आता निवडणुकीनंतर म्हणजे पावसाळ्यानंतर कात्रजच्या तलावाची झालेली दुरवस्था याकडे वसंत मोरे यांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे
सध्या असे जलपर्णी ने कात्रजच्या तळ्याला वेधले आहे ..दुर्गंधी आणि जलपर्णी ने कात्रज च्या तलावाची दुरवस्था झाली आहे
आणि हे पहा कात्रजच्या तलावाचे गेल्या वर्षीचे फोटो ..ना जलपर्णी ,ना दुर्गंधी …आपण येथे महापालिकेकडून कामे करवून घेऊन या तलावाची निगा राखली होती .असे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले











