Home Blog Page 304

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाकरीता पूर्व प्रशिक्षणाची सुर्वणसंधी

पुणे दि. १९ : जिल्ह्यातील युवक-युवतींना भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र होण्याच्यादृष्टीने कंम्बाईन्ड डिफेन्स सिर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे १६ जून २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे, या संधीचा लाभ घेण्याकरीता जिल्हा सैनिक कार्यालय येथे १२ जून २०२५ रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील सीडीएस-६५ अभ्यासक्रमाकरीता (संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडील मुद्रित) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टाची तीन मुद्रीत प्रती सोबत घेऊन यावे. इच्छुक उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस (या परीक्षेकरिता ऑनलाईनपद्धतीने अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉटस्ॲप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्याकरीता) कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त) यांनी केले आहे.

पुरातन उमा महेश्वर मंदिरात वासंतिक चंदन उटी सोहळा 

शुक्रवार पेठेतील दोनशे वर्षांहून अधिक पुरातन मंदिरात मोगऱ्याची आरास
पुणे : मोगऱ्याची सुवासिक फुले, झेंडूची फुले आणि केळीचे खुंट वापरून सुशोभित करण्यात आलेल्या शुक्रवार पेठेतील दोनशे वर्षांहून अधिक पुरातन असलेल्या श्री उमा महेश्वर मंदिरात वासंतिक चंदन उटी सोहळा आयोजित करण्यात आला. चंदन उटी सोहळ्यासह मुक्त द्वार भंडारा देखील मंदिरात पार पडला.

श्री उमामहेश्वर मंदिर विश्वस्त मंडळ व व्यवस्थापक, आदिमाया प्रतिष्ठान स्वामी भक्त परिवार, नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट आणि सर्व वादक मित्रपरिवार यांच्यातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती.

हिंदुस्तान जागरण न्यासाच्या श्री उमामहेश्वर मंदिर विश्वस्त मंडळातील विनायक थोरात, कैलास सोनटक्के, गुरुनाथ शिरोडकर, महेश करपे, अमोल देशपांडे, प्रसाद डोईफोडे, आनंद कुलकर्णी, मंदिर व्यवस्थापक राजेंद्र टिपरे यांसह आदिमाया प्रतिष्ठान आणि नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट चे  कमलेश कामठे, आनंद खंडेलवाल, स्वप्निल जोशी, अक्षय ढाकुळ आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्याध्यापक पदाकरीता अर्ज करण्याचे सैनिक कल्याण विभागाचे आवाहन

पुणे, दि. १९: दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आशा शाळेकरीता कंत्राटी तत्वावर मुख्याध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी २६ मे २०२५ अखेर अर्ज सादर करावेत.

अर्जदार प्राधान्याने पदव्युत्तर पदवी, विशेष शिक्षणात पदवीधर आरसीआय नोंदणीकृत असावा. विशेष समावेशक शाळेचे , मुख्यध्यापक , विशेष शिक्षक म्हणून पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. नियुक्तीच्या तारखेला अर्जदाराचे वय ५५ वर्षांपेक्षा कमी असावे.

इच्छुक उमेदवारांनी साध्या कागदावर अनुभवाच्या तपशीलासहित बायोडाटा, अलीकडील पारपत्र आकाराचा फोटो, अनुभव प्रमाणपत्र, प्रशस्ताऐवजांच्या प्रती तसेच संबंधित तपशीलांसह ‘आशा स्कूल, पुणे येथील मुख्याध्यापक पदासाठी अर्ज’ असे लिहिलेल्या सीलबंद लिफाफ्यात नोंदणीकृत किंवा शीघ्रगती टपालाद्वारे (स्पीड पोस्ट) संचालक, आशा शाळा, ८ जिजामाता रोड मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र जवळ, पुणे-४११००१ या पत्त्यावर अर्ज सादर करावे. अर्जासोबत सर्व शैक्षणिक पात्रता, गुणपत्रिका, अनुभव, कामगिरी यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

अधिक माहितीसाठी ७७७०००४५३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त) यांनी केले आहे.
000

गायक, कलावंतांनी  कालानुरूप होणारे बदल स्वीकारले पाहिजे – पं. अजय पोहनकर

सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

पुणे : आजच्या युवा पिढीला ऐकण्यासाठी मी इथे आलो आहे. गायकांनी भूतकाळात न जागता बदल मान्य केले पाहिजेत. आज कराओके च्या युगात गायकांना वाद्यवृंदासह गायनाचे व्यासपीठ मिळवून देण्याचे सोमेश्वर फाऊंडेशनचे काम  कौतुकास्पद आहे. या संधीचा फायदा महाराष्ट्रातील नवोदित गायकांनी घ्यावा, गायक, कलावंतांनी  कालानुरूप होणारे बदल स्वीकारले पाहिजे असे मत ज्येष्ठ गायक पं. अजय पोहोणकर यांनी व्यक्त केले.  

सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे पुणे आयडॉल स्पर्धा. या स्पर्धेचे उद्घाटन आज  पं.  भीमसेन जोशी सभागृह, औंध येथे   पं. अजय पोहणकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सावनी रविंद्र (राष्ट्रपती पदक विजेती गायिका), ,माजी नगरसेविका स्वातीताई निम्हण, सोमेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण,नंदकुमार वाळुंज, बिपिन मोदी, ज्ञानेश्वर मुरकुटे आदि मान्यवर  उपस्थित होते. 

पुढे बोलताना पं. अजय पोहणकर म्हणाले, जसे जुनी घरे जाऊन आज ऊंच इमारती निर्माण झाल्या, भावना तीच आहे फक्त स्वरूप वेगळे असते तसेच गायनातही बदल होत आहेत, ते कलाकारांनी स्वीकारून पुढे गेले पाहिजे. आजच्या स्पर्धेतील मुलांना मी सांगू इच्छितो की त्यांनी श्रवण करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्यातूनच आपण एक चांगले गायक होऊ शकतो.  आयुष्यात स्पर्धा ही दुय्यम असते, तुम्ही प्रामाणिकपणे गाणे गात रहा असा सल्ला त्यांनी स्पर्धकांना दिला. 

सावनी रवींद्र म्हणाल्या, एखादी गोष्ट सुरू करणे सोपे असते मात्र त्यामध्ये सातत्य टिकवणे अत्यंत अवघड काम असते. सोमेश्वर फाऊंडेशनने ते काम करून दाखवले आहे.  लहानपणापासून या व्यासपीठावर येण्याची इच्छा होती, आज इथे येता आले हे मी माझे भाग्य समजते. 

प्रास्ताविकपर भाषणात  सनी विनायक निम्हण म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा यासह कला, क्रीडा, सांस्कृतिक वारसा जोपासला तर एक समृद्ध जीवनशैली तयार होते अशी सोमेश्वर फाऊंडेशनची भावना आहे. यामुळेच आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, समृद्ध जीवनशैलीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल महत्वाची असते. त्या अनुषंगाने काम करत  मागील 23 वर्षांपासून पुणे  आयडॉल च्या माध्यमातून काम करत आहोत.   

पुणे आयडॉल स्पर्धा चार गटात होते. या स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार, 24 मे 2025 रोजी  दु. 12  ते  3 यावेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. तसेच या दिवशी  बक्षीस समारंभ कार्यक्रमानंतर  जितेंद्र भूरुक प्रस्तुत ‘गीतों का सफर’ या  सांगीतिक कार्यक्रमाने स्पर्धेची सांगता होणार आहे.

अमित मुरकुटे, हेमंत कांबळे, अनिकेत कपोते, वनमाला कांबळे, संजय माजिरे, गणेश शेलार, संजय तरडे आदि  कार्यकर्ते स्पर्धेच्या यशासाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे परीक्षण गायक जितेंद्र भुरुक आणि मुग्धा वैशंपायन करत आहेत.

हडपसरमध्ये मोठ्ठी चोरी: कुटुंब झोपले असताना खिडकीतून घरात शिरून २३ लाखांचे दागिने लंपास

पुणे-पुणे शहरातील हडपसर भागात मगरपट्टा येथे चार बीएचके फ्लॅट मध्ये रहाणाऱ्या साॅफ्टवेअर कंपनीच्या मालकाच्या घरी चाेरट्यांनी डल्ला मारत २३ लाख ४३ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने व राेख रक्कम चाेरी करुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे कुटुंबीय घरातच असताना चाेरट्याने खिडकीवाटे हळूच घरात शिरुन ही चाेरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याप्रकरणी पार्थ मलकन गाैंडा (वय – ४४) यांनी अज्ञात आराेपी विराेधात पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पार्थ गाैंडा हे संगणक अभियंता असून त्यांची एक साॅफ्टवेअर आयटी कंपनी आहे. १७ मे राेजी रात्री ते १८ मे राेजी दुपार दरम्यान त्यांचे घरात कुटुंबीय घरातच होते. त्यावेळी अज्ञात चाेरट्याने खिडकीच्या वाटे घरात प्रवेश केला. त्याने बेडरुममधील कपाटात ठेवण्यात आलेली गाेदरेजची छाेटी लाॅकर ताेडली. त्यात ठेवण्यात आलेले २३ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने व राेख रक्कम घेऊन ताे पसार झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत पाेलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

हडपसर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक संजय माेगले याविषयी बोलताना म्हणाले, घटनेच्या दिवशी तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय घरात झाेपले होते. त्यांच्या पहिल्या मजल्यावरील घरात आराेपी हा पार्किंगमध्ये पार्क करण्यात आलेल्या गाडीच्या टपावरुन गॅलरीत शिरला व तेथून त्याने स्लायडिंग खिडकी उघडून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणात आराेपी घरातून मुद्देमाल घेऊन जातानाचा प्रकार साेसायटी मधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याआधारे आराेपीची ओळख पटवण्यात येत आहे. सदर फ्लॅट जवळील सुरक्षारक्षक याच्याकडे देखील याअनुषंगाने तपास करण्यात येत आहे. संशयित आराेपीचा माग काढण्यासाठी पाेलिस पथके कार्यरत झाली आहेत. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस गेंड करत आहेत.

मोदीसाहेब… पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी कुठेत?तुम्ही कशाचा आनंद साजरा करत आहात? प्रकाश आंबेडकर यांचा थेट सवाल

मुंबई-‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सत्ताधारी भाजपने देशभर तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. पण आता या विजयोत्सवावरून विविध नेते केंद्र सरकारला प्रश्न करू लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनीही या प्रकरणी ‘पहलगाम हल्ल्याला जबाबदार अतिरेकी कुठे आहेत?’ असा जळजळीत प्रश्न उपस्थित करत केंद्रावर निशाणा साधला आहे.

गेल्या 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह 26 पर्यटक मारले गेले होते. अतिरेक्यांनी या सर्वांना त्यांचा धर्म विचारून मारल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाक स्थित अतिरेकी अड्ड्यांवर हल्ला चढवण्यात आला. यावेळी दोन्ही देशांत भीषण धुमश्चक्री झाली. त्यात भारताने नेहमीसारखा आपला वरचष्मा राखला होता. पण त्यानंतर अचानक दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली. यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले. अनेकांनी या प्रकरणी केंद्राच्या निर्णयावर टीका केली. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभरात तिरंगा यात्रेचे आयोजन करून ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी या विजयोत्सावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पहलगाम हल्ल्याचे अतिरेकी अजून सापडले नसल्याकडे बोट दाखवले आहे. आंबेडकर सोमवारी एका पोस्टमध्ये थेट पंतप्रधानांना उद्देशून म्हणाले की, मोदी, पहलगाम अतिरेकी हल्ल्याला जबाबदार अतिरेकी कुठे आहेत? जवळपास एक महिना झाला. तुम्ही कोणत्या गोष्टीचा उत्सव साजरा करत आहात? या हल्ल्यात ठार झालेल्या पीडितांच्या पत्नींना अद्याप न्याय मिळाला नाही.

विधान भवनाच्या प्रवेशद्वाराला आग: आमदार सुरक्षित…अग्निशमनच्या जवानांनी मिळवले नियंत्र

मुंबई-विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वारालगत आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग नेमकी कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ती शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईतील विधानभवन परिसर नेहमीच गजबजलेला असतो. येथे सदैव नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी असते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही येथे आपल्या समस्या घेऊन येत असतात. त्यामुळे सोमवारी दुपारी अचानक विधान भवनाच्या प्रवेशद्वारालागत आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यासंबंधीच्या माहितीनुसार, विधान भवनाच्या प्रवेशद्वारालगतच्या परिसरात ही आग लागली आहे. तेथून धुराचे काळे लोट बाहेर येत आहेत. अधिकाऱ्यांनी तत्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ही आग नेमकी कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण प्रवेशद्वारालगत असणाऱ्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ती लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीची घटना घडली तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान भवनातील एका कार्यक्रमात होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतील. स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला. विधान भवनाच्या रिसेप्शन एरियात जी स्कॅनिंग मशीन असते, त्यात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे छोट्या प्रमाणात ही आग लागली आहे. ती नियंत्रणात आलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या थोड्याच वेळात येथे येत आहेत. परंतु स्थिती नियंत्रणात असल्यामुळे कुणीही चिंता करण्याची गरज नाही. तूर्त, स्कॅनिंग मशीनमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वजण सुरक्षित आहेत, असे नार्वेकर म्हणाले.

पत्रकारांनी यावेळी त्यांना सुरक्षेतील चुकीसंबंधीचा प्रश्न केला. पण राहुल नार्वेकरांनी तो धुडकावून लावला. हा एक अपघात आहे. ही आग इस्टाब्लिशमेंटच्या कनेक्शनमध्ये लागली नाही. स्कॅनिंग मशीनमध्ये काही बिघाड झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले असेल. स्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. सर्वजण सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. मशिनच्या नुकसानीसंदर्भात आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे नार्वेकर म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. ते घटनास्थळी आले तेव्हा राहुल नार्वेकर पत्रकारांशी संवाद साधून परत जात होते. जाता-जाता त्यांनी आदित्य ठाकरे यांना फारशी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यानंतर ठाकरे व दानवे यांनी आग विझवणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून स्थितीचा आढावा घेतला.

वस्तू आणि सेवा कराच्या  अंमलबजावणीला आठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘संडेज ऑन सायकल ’ या फिटनेस आणि वस्तू आणि सेवाकर विषयक जनजागृती मोहिमेचे आयोजन

मुंबई-

वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीला आठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने  ‘संडेज ऑन सायकल ’  या देशव्यापी सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळी अंतर्गत आणि फिट इंडिया चळवळीच्या समन्वयाने हा उपक्रम आयोजित केला गेला. या मोहिमेअंतर्गतचे मुख्य आयोजन आज जीएसटी  सकाळी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम इथे केले गेले. यात देशभरातील 100 पेक्षा जास्त सीजीएसटी आयुक्तालयांनीही सहभाग घेतला होता.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे सदस्य शशांक प्रिया यांनी नवी दिल्ली इथल्या सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. आपल्या संवादातून त्यांनी वस्तू आणि सेवा कराचा भारताच्या कर प्रणालीवरील  परिवर्तनकारी परिणामांविषयी सांगितले. वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सुमारे 30 वेगवेगळ्या अप्रत्यक्ष करांचे एकात्मिकीकरण करून कशारितीने एकच पारदर्शक कर व्यवस्था तयार केली गेली हे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे व्यवसाय आणि नागरिक दोघांसाठीही कर प्रशासन आणि संबंधित अनुपालन सुलभ झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

जीएसटी कंपोझिशन योजना आणि मासिक पेमेंट तिमाही विवरणपत्र  (Quarterly Return Monthly Payment – QRMP) योजनेसारख्या उपक्रमांद्वारे छोट्या करदात्यांना मिळत असलेल्या लाभांची माहिती देखील त्यांनी उपस्थितांना दिली. यामुळे अनुपालन भार कमी झाला असून व्यवसाय सुलभता वाढली असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय वस्तु आणि सेवा कराच्या मुंबई आणि पुणे विभागातून अभिनेता सुनील शेट्टी, मिलिंद सोमण  आणि जॉन अब्राहम हे बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या उपक्रमात सहभागी झाले होते.

या सायक्लोथॉनमध्ये देशभरातील 50,000 हून अधिक सायकलस्वारांनी उत्साहाने भाग घेतला. यामध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे  वरिष्ठ अधिकारी –केंद्रीय वस्तू आणि सेवा कर दिल्ली विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त राजेश सोधी, वस्तू आणि सेवा कर विभागाचे  प्रधान महासंचालक तसेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे महासंचालक सी.पी. गोयल, आणि करदाता सेवेचे महासंचालक महेश कुमार रस्तगी या वरीष्ठ अधिकाऱ्यांसह विविध मंत्रालये आणि विभागांचे प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक देखील या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी, सहभागींशी संवाद साधण्यासाठी आणि जीएसटी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी जीएसटी विषयी जाणून घ्या हे समर्पित जीएसटी मदत दालनही  उभारण्यात आले होते. सुलभता तसेच प्रचार प्रसाराची व्याप्ती वाढवण्यासाठी, जीएसटीच्या प्रमुख विषयांवरील विविध माहितीपूर्ण पुस्तिकांचेही वाटप यावेळी केले गेले.

याशिवाय ठिकठिकाणी क्यूआर कोडची सोय असलेली डिजीटल  किओस्कदेखील उभारण्यात आले होते. यामुळे या उपक्रमात सहभागी झालेल्यांना स्कॅन करून थेट आपल्या मोबाइल उपकरणावर जीएसटी विषयक सामग्री डाउनलोड करता आली.

ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज् विकत घेणार आयएसी ग्रुपचा भारतातील उर्वरित हिस्सा

नवी दिल्ली१९ मे २०२५: आघाडीची टियर-१ ऑटोमोटिव्ह सिस्टम्स आणि घटक पुरवठादार कंपनी ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (“LATL”), ने इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स ग्रुप (“IAC ग्रुप”) कडून आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“IAC इंडिया”) मधील उर्वरित २५% हिस्सा विकत घेण्यासाठी करार केला आहे. IAC ग्रुप, तंत्रज्ञान सहाय्य कराराच्या माध्यमातून IAC इंडियाला यापुढेही तांत्रिक पाठबळ देत राहील.

IAC इंडिया ही एक प्रस्थापित टियर-१ प्लास्टिक इंटीरियर सिस्टम्स व घटकांची पुरवठादार कंपनी आहे जी महिंद्रा, मारुती सुझुकी, फॉक्सवॅगन आणि व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेईकल्स यांसारख्या भारतातील प्रमुख ऑटोमोबाईल OEM कंपन्यांना सेवा पुरवते. IAC इंडिया ही वाहनांच्या अंतर्गत रचनेत अग्रगण्य असून महिंद्राच्या नव्याने लाँच झालेल्या BEV मॉडेल्स – BE6 आणि XEV 9e – साठी एकमेव इंटिग्रेटेड कॉकपिट आणि डोअर पॅनल्स पुरवठादार आहे. याशिवाय, ही कंपनी भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसाठी प्रगत डिझाइन आणि अभियांत्रिकी सेवा पुरवणारे एक प्रस्थापित इंजिनीअरिंग सेंटर चालवते, ज्यामुळे तिला स्पर्धात्मक फायदा मिळतो.

ल्युमॅक्स ग्रुपचे चेअरमन श्रीदीपक जैनम्हणाले, “ही एकत्रीकरण प्रक्रिया आमच्या धोरणात्मक दृष्टीकोनाला बळकटी देऊन भविष्यवाढीस चालना देईल. मजबूत पाया तयार करून सातत्य, कामगिरी व स्केलेबिलिटी साध्य करण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे. ही घडामोड आमच्या प्रदीर्घ काळातील मूल्यनिर्मितीच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि लायटिंग, प्लास्टिक आणि इंटिरिअर्स क्षेत्रात संपूर्ण उपाययोजना पुरवण्यासाठी आम्हाला मदत करेल. तसेच यामुळे IAC इंडियामधील आमचे धोरणात्मक स्थान मजबूत होणार आहे जे महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या आघाडीच्या ओईएमच्या प्रमुख इलेक्ट्रिक व्हेईकल प्लॅटफॉर्मवर आमचा ठसा उमटविण्यास महत्वपूर्ण ठरेल. यामधून आमची शाश्वत गतिशीलतेबाबतची बांधिलकी दिसून येते.”

श्रीअनमोल जैनव्यवस्थापकीय संचालकल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज्, म्हणाले, “ही धोरणात्मक हालचाल ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीजची चारचाकी ऑटोमोटिव्ह प्लास्टिक क्षेत्रातील उपस्थिती अधिक बळकट करेल. या एकत्रीकरणामुळे खर्च नियंत्रण व संसाधनांचे शोधनियोजन साध्य होईल, ज्यामुळे पालक कंपनीच्या पातळीवर भविष्यातील धोरणात्मक व अविकसित संधींसाठी आर्थिक लवचिकता निर्माण होईल. याशिवाय, ही हालचाल नवप्रवर्तनाला गती देईल आणि प्रवासी वाहनांतील इंटिरिअर्सकडे वाढलेल्या कलामुळे दर वाहनात आमची मूल्यवर्धन क्षमता वाढवेल.”

IAC इंडिया चे देशभरात पाच उत्पादन प्रकल्प आहेत. यापैकी दोन प्रकल्प चाकण, पुणे येथे आणि प्रत्येकी एक मानेसर, नाशिक आणि बंगलोर येथे आहेत. पुण्यातील अत्याधुनिक इंजिनीअरिंग सेंटरमध्ये उत्पादन डिझाइन व इंजिनीअरिंग, डायमेन्शनल इंजिनीअरिंग, उत्पादन विकास, प्रोग्राम मॅनेजमेंट आणि टूलिंग डेव्हलपमेंट या क्षेत्रांतील कौशल्य आहे. या इंजिनीअरिंग सेंटरमध्ये ३३० अभियंते आणि डिझायनर्सचा अनुभवसंपन्न संघ आहे, जो देशी-विदेशी ग्राहकांच्या टूल डेव्हलपमेंट गरजांची पूर्तता करतो.

ही व्यवहार प्रक्रिया नेहमीच्या अटींच्या पूर्णतेच्या अधीन असून ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ल्युमॅक्सने यापूर्वी मार्च २०२३ मध्ये IAC इंडिया मधील ७५% हिस्सा विकत घेतला होता. वरील व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, IAC इंडिया ही LATL ची पूर्ण मालकीची उपकंपनी होईल. LATL कायदेशीर व नियामक अटींच्या अधीन राहून IAC इंडिया ला ल्युमॅक्समध्ये विलीनीकरण करण्याच्या शक्यतेचा अभ्यास करेल, जेणेकरून दोन्ही कंपन्यांमधील समन्वय साधता येईल.

या व्यवहारासाठी KPMG कॉर्पोरेट फायनान्स यांनी एकमेव आर्थिक सल्लागार म्हणून भूमिका बजावली तर सिरिल अमरचंद मंगलदास हे LATL चे कायदेशीर सल्लागार होते.

आंतरजातीय विवाह योजना’ बंद करणे हा एकात्मिक समाजावर प्रहार:विचारवेध असोसिएशन

पुणे :केंद्र सरकारची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना  बंद करणे हा सामाजिक अन्याय असून ही योजना पूर्ववत सुरू ठेवावी,अशी मागणी ‘विचारवेध असोसिएशन’च्या वतीने समन्वयक अनिकेत साळवे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.  ‘विचारवेध असोसिएशन’ तर्फे जाती अंत ,आंतरजातीय विवाहा ला प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाते.त्यामुळे असोसिएशनने यासंदर्भात मत व्यक्त करून केंद्र सरकारला या योजनेबाबत सकारात्मक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जात-धर्माच्या भिंती पार करून विवाह करण्याचं प्रमाण भारतात आजही केवळ 5% इतकं कमी आहे. असे असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने २०१४-१५ पासून ही योजना सुरू होती. परंतु, कुठलेही कारण न देता ही योजना बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना योजना बंद झाल्याचे थेट पत्रच दिले जात आहे.हे अनाकलनीय आहे,असे अनिकेत साळवे यांनी म्हटले आहे.

जातीय भेदभाव नष्ट व्हावा  या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने २०१४-१५ पासून ही योजना सुरू होती. परंतु, कुठलेही कारण न देता ही योजना बंद करण्यात आली..समाजात घट्ट असणारी जात. अनेक वेळा आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्याला कुटुंबियांच्या व समाजाच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. त्यात जर एक जोडीदार अनुसूचित जाती/जमातीतील असेल तर हा विरोध अधिकच प्रखर असतो. अशा वेळी त्या जोडप्याला एक आधार असणारी आंतरजातीय विवाह योजना केंद्र सरकार तडकाफडकी बंद का करत आहे? केंद्र सरकारला या योजनेचं महत्त्व समजत नाही का? की डॉ.बाबासाहेबांचे विचार पायदळी तुडवण्याचा त्याचा मनसुबा आहे का ? असा सवाल विचारवेध असोसिएशनने केला आहे 

युद्ध विराम म्हणताय मग विजयाचा जल्लोष कसा करताय ?मोदींना अमित ठाकरेंनी पत्र पाठवून विचारला प्रश्न

पाकविरोधात विजय मिळवला नाही.केवळ यु्द्धविराम केलाय …

मुंबई-पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी ऑपरेशन पाकवरील कथित विजयावर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या सत्ताधारी भाजपसह सर्वच सत्ताधारी पक्षांना खडेबोल सुनावलेत. याविषयी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे.आपण पाकविरोधात विजय मिळवला नाही. त्याच्याशी केवळ यु्द्धविराम झाला आहे. त्यामु्ळे देशभरात सुरू असणारा जल्लोष मनाला वेदना देणारा आहे, अशी खंत अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांच्या या पत्रावर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

खाली वाचा अमित ठाकरे यांचे पत्र जसेच्या तसे

प्रति,
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी,
सस्नेह जय महाराष्ट्र,
आपल्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत, याबद्दल आपले आभार.
सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचं लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झालं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं आहे.
आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जात आहे. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहत आहे. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे.
या पार्श्वभूमीवर, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.
या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत. वास्तविक, या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे, आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे.
त्यासोबतच, सध्याच्या घटनाक्रमाचा विचार करता, देशात काही गंभीर बाबींविषयी अजूनही अनिश्चितता आहे. उदाहरणार्थ, पहलगाममध्ये घडलेला क्रूर दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये २६ निरपराध पर्यटकांनी आपला जीव गमावला, हा अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे. याशिवाय, भारत-पाकिस्तान सीमारेषेवर गेल्या काही दिवसांत आपल्या काही नागरिकांनी आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावले आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा, समाजात या संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं हे अधिक योग्य ठरेल.
तसेच, जरी सध्या युद्धविराम जाहीर झाला असला, तरी पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन करणे, आणि त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरायला हवा.
मा. मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. आणि म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा.
आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, हीच अपेक्षा.
आपला नम्र,
अमित राज ठाकरे
(नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

भरत नाट्य संशोधन मंदिर:अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई

पुणे : भरत नाट्य संशोधन मंदिराची वार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे यांची तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री देसाई यांची निवड झाली आहे. सुमारे 131 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराची निवडणूक बिनविरोध होण्याची सलग दुसरी वेळ आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिराची सर्वसाधारण सभा आणि वार्षिक निवडणूक आज (दि. 18) भरत नाट्य मंदिर येथे झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोहन मुळ्ये यांनी काम पाहिले. सन 2025-2026 या वर्षासाठी पदाधिकारी निवड झाली आहे. कार्यकारिणीत अध्यक्ष – पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष – भाग्यश्री देसाई, विश्वस्त – अनिवाश ओगले, कार्याध्यक्ष – अभय जबडे, कार्योपाध्यक्ष – चारुलता पाटणकर, कार्यवाह – संजय डोळे, सहकार्यवाह – राजेंद्र उत्तुरकर, खजिनदार – अविनाश बेलसरे, नियामक मंडळ सदस्य – शंतनू खुर्जेकर, श्याम भुर्के, भक्ती पागे, कार्यकारी मंडळ सदस्य – प्रचिती सुरू-कुलकर्णी, विश्वास पांगारकर, राजन कुलकर्णी, प्रियांका गोगटे, अंतर्गत आयव्यय – अपर्णा पेंडसे यांचा समावेश आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिराचे पदाधिकारी रसिकांसाठी आणि संस्थेसाठी राबवित असलेल्या उपक्रमांबद्दल सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रसिकांच्या मागणीनुसार गेल्यावर्षी दिवाळीत संगीत नाट्य महोत्सव सुरू करण्यात आला. नुकताच वासंतिक नाट्य महोत्सवही रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला. भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

  • पांडुरंग मुखडे, अध्यक्ष

हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात अटक

पुणे : दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी रविवारी दिली.

पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गौरव कुमार (वडिलांचे नाव – दिनेश कुमार) याच्या संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला अडवण्यात आले.

सखोल पडताळणी आणि निगराणीच्या प्रक्रियेनंतर, दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने १८ मे रोजी रात्री ८:४० वाजता पुणे शहरातील खराडी परिसरात आरोपीला ताब्यात घेतले.

शोध मोहिमेदरम्यान, आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक हवाई दलाचा कॉम्बॅट पँट, एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रॅक सूट अप्पर समाविष्ट आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम १६८ अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणाम तपासले जात आहेत. अधिक तपशील लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मुंबई विमानतळावर पाच कोटींचे सोने केले जप्त

सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विभाग -3 येथील सीएसएमआय विमानतळ आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी 17 मे 2025 रोजी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एकूण 5.75 किलो सोनं जप्त केलं असून त्याची अंदाजे किंमत  5.10 कोटी रुपये इतकी आहे. हे सोनं संबंधित व्यक्तींच्या आतील कपड्यांमध्ये व जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेले होते. या प्रकरणांमध्ये 2 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

प्रकरण 1: (17.05.2025)

एका प्रतिक्षा कक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला, तो कर्मचारी मार्गाने प्रस्थान क्षेत्रातून जात असताना अडवण्यात आले. त्याच्या आतील कपड्यांमध्ये लपवलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली 6 पाकिटे हस्तगत करण्यात आली , ज्याचे निव्वळ वजन 2800 ग्रॅम (संपूर्ण वजन 2947 ग्रॅम) असून अंदाजे किंमत 2.48 कोटी रुपये आहे.  हे सोनं त्याला एका विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

प्रकरण 2: (17.05.2025)

एक कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला, तो प्रस्थान क्षेत्रातील कर्मचारी बाहेर पडण्याच्या ठिकाणी जात असताना अडवण्यात आले. त्याच्या अंगावरील जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली 6 पाकिटे  हस्तगत करण्यात आली, ज्याचे निव्वळ वजन 2950 ग्रॅम (संपूर्ण वजन 3073 ग्रॅम) असून अंदाजे किंमत ₹2.62 कोटी आहे, . हे सोनं त्याला   विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात एका ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

जगबुडी नदीत मोटार कोसळली:मुंबई-गोवा महामार्गावर कार नदीत कोसळली; 5 ठार, चालक गंभीर जखमी

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळील जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट नदीच्या 100 ते 150 फूट खोल पात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने कार नदीबाहेर काढण्यात आली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा वरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. पोलिसांनी कारचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढले. कार पूर्णपणे नष्ट झाली होती.

सोमवारी सकाळी 5.15 वाजता रेकॉर्ड झालेल्या एका व्हिडिओमध्ये हा संपूर्ण प्रकार दिसून येतो. या व्हिडिओमध्ये क्रेनने कार बाहेर काढताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी झालेली स्पष्ट दिसते. घटनास्थळी शोककळा पसरली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून देवरुखकडे जाणारी ही कार जगबुडी नदीच्या पुलावर आली असताना अचानक पुलाची कठडा तोडून नदीत कोसळली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. तपासानंतरच खरी माहिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ही कार विवेक श्रीराम मोरे यांच्या मालकीची असून, कारमधून खालील प्रवासी प्रवास करत होते: मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत, विवेक श्रीराम मोरे, परमेश पराडकर या प्रवाशांपैकी मेघा पराडकर, सौरभ पराडकर, मिताली मोरे, निहार मोरे व श्रेयस सावंत यांचा मृत्यू झाला आहे. तर कारचा चालक विवेक मोरे व परमेश पराडकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने नदीत कोसळलेली कार वर खेचण्यात आली. कारची अवस्था पाहून अपघाताच्या भीषणतेचा अंदाज येत होता. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी दरवाजे फोडावे लागले.