Home Blog Page 303

छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ

मुंबई, दि. २०:  महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीपदाची शपथ दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग ,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य विकास, रोजगार  उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, तसेच मंत्री  छगन भुजबळ यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी मंत्री भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

मंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय

जन्म: १५ ऑक्टोबर १९४७.

जन्म ठिकाण: नाशिक.

शिक्षण: एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर).

ज्ञात भाषा:  मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती :  विवाहित, पत्नी श्रीमती मीना.

अपत्ये:  एकूण १ (एक मुलगा)

व्यवसाय: शेती.

पक्ष:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ: ११९ – येवला, जिल्हा-नाशिक.

इतर माहिती: संस्थापक-अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई, माजी विश्वस्त, व्हि.जे. टी.आय. संस्था, मुंबई, विश्वस्त, नायर रुग्णालय, विश्वस्त, प्रिन्स आगा खान रुग्णालय, मुंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार, ५ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई भेटीदरम्यान महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचा ‘स्लेव्हरी’ हा अनुवादीत ग्रंथ भेट दिला. माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट, १९८५ ‘दैवत’ व १९९० ‘नवरा बायको’ या मराठी चित्रपटांची निर्मिती; १९७३ सदस्य, १९७३-८४ विरोधी पक्षनेते, १९८५ व १९९१ महापौर, मुंबई महानगरपालिका; याकाळात गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, मुंबई शहराचे सौंदर्यकरण, चौकांचे सुशोभिकरण, हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण केले; १९९१ अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, १९९१ पर्यंत शिवसेनेत विविध पदावर कार्य; १९९१ नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत; जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; संस्थापक-सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; १९८५-९०, १९९०-९५, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा १९९६-२००२ व २००२-२००४ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषदः डिसेंबर १९९१ ते मार्च १९९३ महसूल खात्याचे मंत्री; मार्च १९९३ ते मार्च १९९५ गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री; १९९६-१९९९ विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानपरिषदः ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री, नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००३ मुंबई शहराचे पालकमंत्री; जानेवारी २००३ ते डिसेंबर २००३ उपमुख्यमंत्री व गृह मंत्री; नोव्हेंबर २००४ ते ऑक्टोबर २००९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री; या काळात दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाची वास्तु उभी केली, ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवडः जानेवारी २०२० मध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री, नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

छंद : क्रिकेट, चित्रपट, वाचन व प्रवास

परदेश प्रवास : १९८० आणि १९८६ मध्ये अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलैंड आणि रशिया या देशाचा अभ्यास दौरा; १९९१ मध्ये ओसाका, जपान येथे जागतिक महापौर परिषदेसाठीच्या शिष्टमंडळासमवेत सहभाग, ऑक्टोबर २००० मध्ये फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड, दुबई, मस्कत, अबुधाबी, कॅनडा, फ्रान्स, नेदरलँड, बेल्झिअम व स्विर्त्झलँड इत्यादी देशांचा अभ्यास दौरा, याच दौऱ्यात लंडनमधील स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चाः २८ मे २००१ ते १८ जून २००१ या काळात न्यूयॉर्क, जिनिव्हा, लंडन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा तसेच ऑस्ट्रिया, स्वीडन, नॉर्वे, स्पेन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.

ऑगस्ट 1991 मध्ये अनेक आमदार सोबत घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करून काँग्रेसमध्ये प्रवेश.
त्यावेळी तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री ॲड. बी. डी. झुटे यांच्या आकस्मित निधनामुळे रिक्त झालेले अन्न व नागरी नागरी पुरवठा मंत्री पद भुजबळ यांना देण्यात आले.
महात्मा फुले समता परिषद परिषदेची स्थापना केली. यातून वंचित, उपेक्षित दलित, मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यासह देशभर लाखोंचे मेळावे घेतले. महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार, १९९४ मध्ये पुण्यातील महात्मा फुले पेठ (गंजपेठ) येथील महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करून तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एस. पी. कॉलेज येथे लाखो अनुयायांच्या उपस्थितीत “समताभूमी” स्मारक राष्ट्राला लोकार्पण केले. तेंव्हा पासून दरवर्षी समताभुमी येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिवशी (२८ नोव्हेंबर) देशभरातून लाखो लोक महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी येतात. यानंतर देशभर जयपुर देशातील अनेक ठिकाणी ओबीसी समाजाचे लाखोंचे मिळावे घेऊन देशभर ओबीसी समाजाचे प्रश्न मांडून संघटन उभारले.

भाजपचे गांधी विरोधी सोशल वॉर पुन्हा सुरु, राहुल गांधींचा चेहरा मिक्स करत मीर जाफर संबोधले

भाजपने केंद्रात सत्ता मिळविण्यापूर्वी सोशल मिडिया वरून सोनिया गांधी यांच्यासह तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच अण्णा हजारे यांची प्रचंड मोठ्ठी बदनामी करत आणि अशीच मिक्स छायाचित्रे बनवून , ती व्हायरल केल्याचा काल सर्वांना आठवत असेल, कॉंग्रेस ने कधी ज्या बदनामीचा मुकाबला करण्याचाही प्रयत्न केला नाही . अशाच पद्धतीने मिडिया वॉर आता राहुल गांधीं विरोधात सुरु झाले आहे कि काय असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे ,भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींचे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत. पहिल्यामध्ये, राहुल आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांचे चेहरे एकत्र केले आहेत. यासोबतच दोघांची विचारधारा एकच असल्याचे म्हटले आहे.

मंगळवारी मालवीय यांनी या पोस्टरसह लिहिले- राहुल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदनही केले नाही. ते वारंवार विचारतात की आपण किती विमाने गमावली. पण, राहुल यांनी कधीही विचारले नाही की या युद्धात भारतीय सैन्याने किती पाकिस्तानी विमाने पाडली किंवा किती विमानतळ उद्ध्वस्त झाले.

यासोबतच, मालवीय यांनी राहुल यांना आजच्या काळातील मीर जाफर असे संबोधणारे आणखी एक पोस्टर रिलीज केले आहे. खरंतर, मुघल सेनापती मीर जाफर हा इंग्रजांचा मित्र होता.

या पोस्टरमध्ये राहुल पाकिस्तान सीमेवर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पाठीवर बसले आहेत. ते भारतीय सीमेकडे पाहत आहेत आणि विचारत आहेत की आपण किती विमाने गमावली? खाली शाहबाज म्हणतात, मोठ्याने विचारा.

राहुल सतत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना त्रास देत आहेत. ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे, ज्यामुळे हवाई दलाचे नुकसान झाले. यासोबतच परराष्ट्रमंत्र्यांचा एक व्हिडिओही शेअर केला जात आहे.
मीर जाफर कोण होता?

मीर जाफर हा एक मुघल सेनापती होता. जो भारतीय इतिहासात विश्वासघाताचे प्रतीक मानला जातो. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत तो इंग्रजांशी सामील झाला आणि नवाब सिराज-उद-दौलाचा विश्वासघात केला. मीर जाफरने ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीशी एक गुप्त करार केला, ज्यामुळे सिराज-उद-दौलाचा पराभव झाला आणि भारतात ब्रिटीश सत्तेचा पाया रचला गेला. नंतर इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले.

पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’ – राष्ट्रभक्तीची उत्स्फूर्त अभिव्यक्ती

पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज सोमवार, 19 मे रोजी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’चे आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक आहिल्यादेवी स्मारक येथून शंखनादन व हनुमान चालीसा पठाण करून या सिंदूर यात्रेची सुरुवात होऊन परत तिथेच समारोप सभा झाली.

मातालहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

लहान मोठ्या रणरागिणींकडून लाठीकाठी चे प्रदर्शन करण्यात आले,
महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा ताई फरांदे म्हणाल्या , ही सिंदूर यात्रा आपल्या मातृ शक्तीचा प्रतीक आहे ज्या भगिनींनी पहेलगाम हल्ल्यामध्ये आपले कुंकू गमावले आपल्या भारतीय सैन्यातील कुशल स्त्रीशक्तीने दुश्मनावर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले आहे त्यामुळेच आपली ही सिंदूर यात्रा तमाम स्त्री शक्ती साठी समर्पित आहे.

मेजर देशपांडे यांच्या प्रतिकात्मक संदेशात स्त्री शक्तीची महानता नमूद करण्यात आली. त्यांचे दोन्हीही पुत्र सैन्यात असून त्यांना त्याचा खूप अभिमान आहे.

या सिंदूर यात्रेत भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा अध्यक्ष सौ हर्षदाताई फरांदे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे,भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस प्रियांका शेंडगे शिंदे, गायत्री खडके, भावना शेळके, आरती कोंढरे, स्वाती मोहोळ यांच्या सह विविध संघटन
नांच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते व पुणेकर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार.

राज्य सरकार सर्वदर्म समभाव मानत असेल तर फुले चित्रपट करमुक्त करावा.

मुंबई, दि. १९ मे २०२५
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान केला. हे देश व राज्याला सहन न होणारे आहे, सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे?, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष सरन्यायाधीश, यांचा एक विशेष प्रोटोकॉल असतो, त्यांच्या दौऱ्याची माहिती आधिच दिलेली असते पण आम्हाला माहिती नव्हती असे अधिकारी सांगत आहेत हे पटणारे नाही. सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारने महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली आहे. सरन्यायाधीश त्यावर गमतीने बोलले, पण तो प्रशासनाला इशारा आहे तो सरकारला कळला नसेल. सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांच्या महाराष्ट्रात अपमान केला आहे का? का मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते? हे समजले पाहिजे. शिव, शाहू, फुले आंबेकरांच्या राज्यातून एक आंबेडकरी विचाराचा व्यक्ती सरन्यायाधीश झाला त्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही याचे गांभिर्य नाही का? असेही नाना पटोले म्हणाले.

राज्य सरकार सर्वधर्म समभाव मानत असेल तर महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. या आधी सरकारने राज्यात अनेक चित्रपट टॅक्स फ्री केले आहेत पण फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत वेगळी भूमिका का ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि. १९ मे – “दहावी नंतर अभियंता होण्याचा मार्ग खुला करणाऱ्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया येत्या २० मे २०२५ पासून सुरू होत आहे,” अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून, अल्पकालावधीत तांत्रिक कौशल्य मिळवून रोजगार किंवा उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण महत्त्वाचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षमतांनी सज्ज करणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांमध्ये १०० टक्के प्रवेश सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. विद्यार्थ्यांना या शाखेकडे आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत.दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वास्तुकला विषयक तीन वर्ष कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमामार्फत विद्यार्थी तंत्रज्ञ, अभियंता व यशस्वी उद्योजक होऊ शकतात.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशील, वेळापत्रक, नाव नोंदणी व अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
0000

BCCI सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचाच आहे. – पृथ्वीराज चव्हाण

ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून ईव्हीएम, ऑल पार्टी डेलीगेशन, आशिया कप, पाकिस्तानशी संबंधित जलविवाद अशा सर्व मुद्द्यांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, देशाने युद्धकाळातही पारदर्शिकता राखली आहे. 1965 मध्ये नेहरू, 1971 मध्ये इंदिरा गांधी आणि कारगिल युद्धाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी संसदेस नियमित माहिती देत असत. आज पंतप्रधान ना जनतेसमोर येतात, ना प्रेस कॉन्फरन्स घेतात, ना संसदेचे अधिवेशन बोलवतात. भारत सरकारचे पीओके संदर्भात स्पष्ट धोरण असले पाहिजे, पण ते दिसत नाही.

यापुढे बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, ‘वन नेशन-वन इलेक्शन’चा फायदा जरी दाखवला जात असला तरी, पण ब्रिटीश संसदीय पद्धतीत कधीही लोकसभा किंवा विधानसभा भंग होऊ शकते. त्यांनी सांगितले, ‘मी स्वतः 1996, 1998 आणि 1999 मध्ये तीन वर्षांत तीनदा लोकसभा निवडणुका लढल्या आहेत. याचा अर्थ लोकसभा कोणत्याही वेळी भंग होऊ शकते, आणि त्यानंतर उपलब्ध कार्यकाळासाठी वेगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील.

तसेच पुढे आरोप करताना ते म्हणाले कि, केंद्र सरकार अमेरिका-प्रणालीप्रमाणे निवडणूक प्रक्रिया भारतात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यावर कॉंग्रेस विरोध करते. यासह त्यांनी ईव्हीएम वर पूर्णपणे बंदी आणण्याची मागणी पुनः केली आणि म्हणाले, ‘जगभर ईव्हीएम विरोध होत आहे, परंतु केंद्र सरकार अद्यापही EVM हटविण्याची भूमिका घेत नाही.

मध्य प्रदेश चे मंत्री विजय शहा यांच्याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, पीएम मोदींनी मनात आणले तर एका तासात विजय शहा याचे मंत्रीपद काढू शकतात, पण मोदी असं करताना दिसत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मंत्र्यामध्ये आदिवासी वोट बँक दिसत आहे. पण विजय शहा यांनी ऑपेरेशन सिंदूर मधील भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अत्यंत चुकीची प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर कोर्टाने ताशेरे ओढले असताना सुद्धा या मंत्र्याला पाठीशी घातले जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे.

तिरंगा यात्रा ही सैनिकांचे मनोबल वाढविणारी मानवंदना: उदय सामंत

मुंबई : हा जल्लोष नाही, तिरंगा यात्रा काढून अख्खा देश सैनिकांसोबत आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीला आम्ही मानवंदना देत आहोत. भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन मानवंदना देण्याचा निर्णय घेतला तर त्यात गैर काही नाही. जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे. तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा एक विधायक रॅली काढली जात आहे, असे उदय सामंत म्हणाले.
पाकिस्तानसोबतच्या युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, थोडा संयम बाळगावा, विजय रॅली ज्या निघत आहेत त्या टाळाव्यात, अशी विनंती अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे. आपण पाकविरोधात विजय मिळवला नाही. त्याच्याशी केवळ यु्द्धविराम झाला आहे. त्यामु्ळे देशभरात सुरू असणारा जल्लोष मनाला वेदना देणारा आहे, अशी खंत अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. यावरून आता सत्ताधाऱ्यांकडून अमित ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे.

हा अमित ठाकरेंचा बालिशपणा-गिरीष महाजन


मुंबई :अमित ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेले पत्र प्रसिद्धीसाठीचे पत्र असून हा बालिशपणा आहे, असा टोला गिरीष महाजन यांनी लगावला. संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आपण काय केले म्हणून? तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? असा सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. संपूर्ण जगाने पाहिले, आमच्या सैन्याने काय केले आणि तुम्हाला आता काय त्याचा रिझल्ट पाहिजे, हा संपूर्ण बालिशपणा चालला आहे. प्रसिद्धीसाठी असे पत्र लोक का लिहितात? मला काही कळत नाही, असे पत्र लिहिण्याची काहीच आवश्यकता नाहीये, असे गिरीष महाजन म्हणाले.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे : “एकत्र निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत चर्चा करताना वस्तुनिष्ठ भूमिका आवश्यक”

मुंबई, दि. १९ मे – संविधान (१२९वे सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (सुधारना) विधेयक, २०२४ या अनुषंगाने आयोजित संयुक्त समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित विषयांवर व्यापक व मुद्देसूद चर्चा झाली. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रातील बाबींवर चर्चा करताना दिशाभूल करणारी विधाने करण्याऐवजी वस्तुनिष्ठतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने संवाद साधणे अपेक्षित आहे.”

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्यास निवडणूक खर्चात बचत होईल आणि आचारसंहितेमुळे थांबणारी विकासकामे सुरळीत पार पाडता येतील. या दृष्टीने समितीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे.”

महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण सक्षम उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी विधेयकातील प्रस्ताव महत्त्वाचे ठरणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही अभ्यासपूर्ण मते मांडल्याचा उल्लेख त्यांनी केला.

डॉ. गोऱ्हे यांनी बॅलट पेपरबाबत व्यक्त होणाऱ्या मतांवरही भाष्य करत सांगितले की, “ही मागणी मागे पडलेल्यांकडून होते आहे. निवडणूक व्यवस्थेवर अविश्वास व्यक्त करण्याऐवजी कार्यक्षमतेत सुधारणा कशी करता येईल यावर भर द्यायला हवा.”

तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांपासून १०० दिवसांच्या आत घेण्याची तरतूद अधोरेखित करत, संबंधित कायद्यांच्या प्रती सर्व सदस्यांना पुरवण्यात आल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. “चुकीची माहिती प्रसारित होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी,” असेही त्यांनी सूचित केले.

राहुल गांधींकडून सेनेचा अपमान वा सेनेवर अविश्वास कसा ? ते फडणवीसांनी सांगावे !पदा’ चे भान राखून जबाबदारीने बोला..! _काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

काँग्रेसची तिरंग्याप्रती आत्मियता स्वातंत्र्य लढ्यापासून… २००५ नंतरची नव्हे..!‘भारतीय सैन्या’ प्रती कृतज्ञता’ व श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचा फडणवीसां कडून राजकीय आखाडा..!

पुणे दि १९ –
नागपूर येथील ‘भारतीय सैन्याप्रती’ कृतज्ञता व गौरवपर निघालेल्या भाजपच्या ‘तिरंगा रॅलीच्या समारोप प्रसंगी ‘सैन्यातील शहीद जवानांना व हल्ल्यातील मृत नागरिकांना’ श्रद्धांजली वहाण्याच्या कार्यक्रमात बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली सभेचे संकेत व गांभीर्य पायदळी तुडवून त्यांचा राजकीय आखाडा केला व काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे वर आधारहीन राजकीय आरोप करण्याचा निंद्य व दुर्दैवी प्रयत्न केल्याचा निषेध व्यक्त करून, काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “विरोधी पक्ष नेते राहूलजी गांधी यांनी सेनेचा अपमान कश्या प्रकारे केला” ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीसांनी, आपण संविधानीक पदा’ चे भान राखून जबाबदारीने बोलावे नाहक आधारहीन, तथ्य – हीन, खोटे व बालीश आरोप करू नयेत व आपल्या मुख्यमंत्री पदाचे गांभीर्य जपावे असे ही राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
आपल्या ‘प्रसिद्धी निवेदनात’ ते म्हणाले की,
पहेलगाम हल्ल्या नंतर काँग्रेस कार्यकारिणी ची बैठक घेऊन, विरोधी पक्षासह केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची, देशाच्या ऐक्याप्रती निग्रहाची व सामंजस्याची भुमिका राहुल गांधी यांनी घेतली.
मात्र, ‘दहशतवादी केंद्रांवरील सेनेच्या हल्लयांची’ विदेश मंत्र्यांकडून… ‘पाकिस्तानाला पुर्व सुचना’ देणे हे कोणते नैतिक वा मुत्सद्दी शहाणपण आहे (?) याचा जाब स्वपक्षाच्या केंद्र सरकार’ला फडणवीसांनी अगोदर विचारावा व ही सरकार पुरस्कृत देशद्रोहाची कृती आहे काय (?) हे देखील तपासावे..!
देशाप्रती समर्पित ‘भारतीय सेनेच्या ‘ध्येयवादी जीवनाच्या करीअर’ला ४ वर्षांच्या अग्निवीर योजनेच्या ठेकेदारीत अडकवण्या विरोधात, काँग्रेसनेते राहूल गांधी यांच्या लढ्याचे श्रेय मनात बोचत असल्याने भाजप नेत्यांची राहुलजी विरोधात तथ्य वा आधारहीन टिका करण्याचा प्रयत्न निंदनीय आहे.
२०१४ नंतरचा अनुभव लक्षात घेऊनच देशातील जनतेने काँग्रेस पक्षाची भुमिका, वाटचाल पाहून काँग्रेसच्या संसदेतील जागा दुप्पट वाढवून राहुलजी गांधी यांना संविधानीक ‘विरोधी पक्षनेते’ पदी बसवले याचे ऊचीत भान देखील भाजप नेत्यांनी ठेवावे.
काँग्रेस पक्षाची तिरंग्याप्रती आत्मियता स्वातंत्र्य लढ्यापासूनची आहे ती २००५ नंतरची नव्हे अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.

ग्राहक हितासाठी “दुरुस्ती अधिकार चळवळ” आवश्यक !

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने “मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दुरुस्ती योग्यता निर्देशांकाची” चौकट (framework) तयार करण्यासाठी समिती नेमली होती. त्याचा अहवाल नुकताच केंद्र सरकारला सादर करण्यात आला. मोबाईल व विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती क्षमता मोजण्याचे या निर्देशांकाचे उद्दिष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी व्यापक, बळकट ” दुरुस्ती अधिकार चळवळ” उभारणे आवश्यक वाटते. या समस्येचा धांडोळा.

विविध घरगुती उपकरणांची दुरुस्ती योग्यता वाढवण्यासाठी व इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी भारत सरकारने “दुरुस्ती अधिकार” उपक्रम सुरु केला आहे. मोबाईल, विविध इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे, सायकली, दुचाकी किंवा चार चाकी वाहने,यांची देखभाल, दुरुस्ती करणे ही महत्त्वाची गोष्ट असून त्याबाबत ग्राहकांमध्ये जागृती किंवा प्रबोधन करण्याचे काम केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे केले जाते. या अधिकारामुळे ग्राहकांनी त्यांची उत्पादने टाकून देण्याऐवजी दुरुस्त करणे सोपे व्हावे हा उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून ‘दुरुस्ती योग्यता निर्देशांक’ तयार केला आहे. एखाद्या उत्पादनाची दुरुस्ती किती सहजतेने करता येते, त्याची दुरुस्ती करावी का बदलावे त्याचे मूल्यांकन निर्देशांकामुळे करता येते. एखाद्या उत्पादनाचे डिझाईन किंवा रचना सुलभ दुरुस्ती करण्यासाठी किती चांगली आहे ते पाहिले जाते. तसेच त्या उत्पादनाचे सुटे भाग बाजारात किती सहजपणे उपलब्ध होतात, दुरुस्ती करण्यासाठी ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी दस्तऐवजीकरण (मॅन्युअल) केलेले आहे किंवा कसे, दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली साधने किंवा हत्यारे यांची उपलब्धता बाजारात आहे किंवा कसे या गोष्टींचा सर्वांगिण अभ्यास करून निर्देशांक ठरवला जातो. उपकरणांच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्देशांक विकसित करण्यात आला असून त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कचरा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पूर्वीच्या काळी घरामध्ये कोणतीही उपकरणे घेतली तर ती वर्षानुवर्षे विना तक्रार चांगली सेवा देत असत. त्यात क्वचितच दुरुस्तीचा प्रश्न येत असे. गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये जी नवीन उत्पादने आपण घरी आणतो, वापरतो तेव्हा अनेक वेळा त्याची उत्पादन गुणवत्ता चांगली नसल्याचे किंवा तकलादू स्वरूपाची असल्याचे जाणवते. त्याचे सुटे भाग बदलणे किंवा काही किरकोळ दुरुस्ती असो त्यासाठी संबंधित उत्पादक कंपन्यांच्या सेवा केंद्रांमध्ये जाणे, दुरुस्तीसाठी देणे, यासाठी अनेकदा ग्राहकांचा वेळ, पैसा खर्च होतो. अमेरिका, युरोप, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये “देखभाल दुरुस्ती अधिकार ‘ अस्तित्वात आहेत. ग्राहकांमध्ये वस्तू दुरुस्त करण्याची, त्याचा पुनर्वापर जाणीव वाढवण्यावर भर दिला जातो. उपकरणांच्या डिझाईन मधील दोष किंवा ” Planned 0bsolescence” या संकल्पनेला हा दुरुस्ती अधिकार विरोध करतो. अनेकदा उत्पादक जाणून-बुजून त्यांची उत्पादने, उपकरणे कमी टिकाऊ बनवतात. उपकरणाची देखभाल दुरुस्ती करणे ग्राहकांना परवडत नाही. त्यामुळे वारंवार नवीन खरेदी करणे भाग पडते. ग्राहकांमध्ये सातत्याने जागरूकता निर्माण केली तर अनेक उपकरणे घरी दुरुस्त करणे, याचा फेरवापर करणे शक्य होऊ शकते.

या दृष्टीकोनातून भारतात हा दुरुस्ती अधिकार जास्त बळकट किंवा व्यापक करण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना दैनंदीन व्यावहारिक शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. परंतु आपल्या शिक्षण पद्धतीत बहुतेक शाळा, महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे शिक्षण मिळत नसल्याचे आढळते. हे प्रशिक्षण दिल्यामुळे प्रत्येक घरामध्ये उपकरणांची दुरुस्ती करणे, देखभाल करणे लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांना सहज शक्य होऊ शकते. कुटुंबीयांनी त्यांच्या घरातील लहान मुलांना उपकरणे, वस्तू याच्यामध्ये विज्ञान शास्त्र किंवा त्याची जडणघडण कशी झाली आहे ते समजून सांगितले, त्याला हाताळायला दिले तर त्यात किरकोळ दुरुस्ती करणे अजिबात अवघड होणार नाही. मोबाईल नादुरुस्त झाला तर तो अडगळीत टाकून नवीन आणतो. सहजगत्या त्यात दुरुस्ती करता येत असेल तर ती केली पाहिजे. मिक्सर, वॉशिंग मशीन किंवा अन्य घरगुती उपकरणे हाताळताना महिला, मुलांच्या मदतीने ते दुरुस्त करणे सहज शक्य आहे. अलीकडच्या काळात देखभाल दुरुस्तीची कामे घराघरांमध्ये केली जात नाहीत असे सर्वसाधारणपणे आढळते.

एका पाहणीनुसार अनेक मोठे उत्पादक त्यांच्या उपकरण किंवा वाहनांमध्ये धातूंचा वापर लक्षणीयरित्या कमी करत असून त्या ऐवजी हलक्या वजनाच्या प्लास्टिकचा वापर करतात. अनेकदा त्याचे सुटे भाग बदलणे अपरिहार्य असते. त्याच्या किंमती जास्त असतात. उत्पादक नेहमीच त्यांचे उखळ पांढरे करून घेतात. यामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाढती समस्या ही कोणी लक्षात घेताना दिसत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने याबाबतचे एक पोर्टल सुरू केलेले आहे. त्यामध्ये ग्राहकाचा देखभाल दुरुस्तीचा हक्क अधोरेखित केलेला आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादने व सुट्या भागांच्या निर्मितीबाबत मक्तेदारी निर्माण केलेली आहे. अनेकदा ग्राहकांच्या हिताचा कोणताही विचार त्यात केला जात नाही. ग्राहक न्यायालय देशांमध्ये सर्वत्र असूनही प्रत्यक्षात ग्राहकांना सेवा व उत्पादनांच्या बाबतीत मनस्ताप सहन करायला लागतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

केंद्र सरकारच्या योग्यता निर्देशांक समितीमध्ये उत्पादकांचे व उद्योग प्रतिनिधींचे बहुमत होते. ग्राहक चळवळींचे प्रतिनिधी या समितीत होते. परंतु ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या शिफारशींचे रूपांतर केंद्र शासन कायद्यात कशा स्वरूपात करणार आहे ते पाहणे अभ्यासपूर्ण ठरेल.

लेखक: प्रा.नंदकुमार काकिर्डे (लेखक पुणेस्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

पुणे बाल पुस्तक जत्रेला गुरुवारपासून प्रारंभ

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता उद्घाटन

पुणे : मुलांना वाचनाची गोडी लावण्यासोबत इतिहास, कला, साहित्य व संस्कृतीची माहिती सांगणाऱ्या; तसेच विविध प्रयोगशील उपक्रमांतून मुलांचे मनोरंजन करत कल्पकता-कुतूहल-उत्सुकतेचा आनंद देणाऱ्या भव्य पुणे बाल पुस्तक जत्रेला येत्या गुरुवारपासून (२२ मे) गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे सुरुवात होणार आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता पुणे बाल पुस्तक जत्रेचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर, खडकी शिक्षण संस्था आणि कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लेखिका संगीता बर्वे, लेखक-चित्रकार-प्रकाशक ल. म. कडू आणि बाल साहित्यकार राजीव तांबे हे उपस्थित राहणार आहेत, असे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने पुणे बाल पुस्तक जत्रा या विनामूल्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात दर्जा लाभलेल्या मराठी भाषेत समृद्ध बाल साहित्य आहे. या पुस्तकांची माहिती मुलांना देऊन भविष्यातील चांगले वाचक घडविण्याचा प्रयत्न या जत्रेतून केला जाणार आहे. मुलांचे लेखन-वाचन-आकलन कौशल्य वाढविणारी ही प्रक्रिया हसत-खेळत करण्यावर जत्रेचा भर आहे. त्यासाठी बाळगोपाळांसमवेत पालक आणि शिक्षकांसाठीही नावीन्यपूर्ण कार्यक्रम, उपक्रम, परिसंवाद व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, खाऊगल्लीत मुलांना चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे, असेही राजेश पांडे यांनी सांगितले.

वाचा, खेळा, करा धम्माल

‘पुणे बाल पुस्तक जत्रेत भव्य पुस्तक प्रदर्शनांसोबत बाल साहित्य लेखन स्पर्धा, कविसंमेलन, जादूचे व बाहुल्यांचे खेळ, पथनाट्य, विमान विज्ञान कार्यशाळा अशा विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल आहे. अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या मुलांसमवेत पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट देऊन साहित्य संस्कृतीच्या अभिनव बालमेळ्याचा अनुभव घ्यावा,’ असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.

बालपणीचे खेळ विनामूल्य खेळण्याची संधी

‘आपले अंगण’ या उपक्रमात मुलामुलींना विटी दांडू, चाक फिरवणे, भोवरा फिरवणे, भातुकली असे १६ प्रकारचे जुने खेळ विनामूल्य खेळण्याची संधी मिळणार आहे. या खेळांशी संबंधित साहित्य तेथे विक्रीसाठी उपलब्ध असेल. या उपक्रमाची झलक जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात आज (मंगळवार, २० मे) दुपारी ४ वाजता बाल साहित्यकार राजीव तांबे, कवी संदीप खरे, अभिनेते प्रवीण तरडे, माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मिलिंद भोई, अभिनेत्री पूर्वा शिंदे, तेजस्विनी लोणारी अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पाहता येणार आहे. हे सर्व मान्यवर अंगणातल्या खेळांचा अनुभव घेत ‘आम्ही खेळलो, तुम्ही या खेळायला’ या असा संदेश देणार आहेत. त्यानंतर हा उपक्रम २२ ते २५ मे या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य.अनुभवता येणार आहे. या निमित्ताने जुन्या खेळांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. रेवा पांडे यांनी हे पुस्तक संकलित केले आहे. त्यासाठी अनिल बेलकर यांनी सहकार्य केले आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन उद्या (बुधवारी २१ मे) होईल,’ अशी माहिती ‘संवाद पुणे’चे सुनील महाजन यांनी दिली.

संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी संस्कृती टिकेल- पंडित विद्यासागर

: बहुरंग आयोजित 18व्या आदिवासी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : आदिवासी समाजासंदर्भातील संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी समाज, त्यांची संस्कृती टिकण्यासाठी मदत होईल, असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले. विद्यापीठांमधील भाषा विभाग, ललित कला केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, बोलीभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बहुरंग, पुणेतर्फे दोन दिवसीय 18व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाचे उद्घाटन आज (दि. 19) पंडित विद्यासागर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महोत्सव पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. बहुरंग, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी, आदिवासी संस्कृती अभ्यासक ग. श. पंडित मंचावर होते. माडीया गोंड लोक शिरस्त्राण म्हणून वापरत असलेले ‌‘शीरमोर‌’ हे यंदाच्या महोत्सवाचे बोधचिन्ह आहे. राज्य शासनाअंतर्गत असलेला सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंडित विद्यासागर म्हणाले, विस्थापन, मुलभूत सुविधा, आर्थिक प्रश्न, आरोग्य, शिक्षण हे आदिवासी समाजासमोरील मुख्य प्रश्न आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याविषयी दोन प्रवाह आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणल्यास त्यांची संस्कृती कशी टिकणार, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात न आणल्यास त्यांचा विकास कसा साधणार असे प्रश्न उपस्थित केले जातात. आदिवासी प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून उपाययोजना राबविल्या जाऊ शकतात.

आदिवासी समाजाची ओळख पुसण्याचाच प्रयत्न..

प्रास्ताविकात डॉ. कुंडलिक केदारी म्हणाले, देश-विदेशातील आदिवासी जमातींची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, वेगळेपणा, बोलीभाषा, चालीरिती, जीवनशैली, धार्मिक कार्ये, देवदेवता, रूढी-परंपरा तसेच कला, संगीत, नृत्य, नाट्य या विषयी माहिती व्हावी या उद्देशाने दरवर्षी आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. शासनस्तरावर आदिवासी विभाग आहेत पण आदिवासी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी या विभागाकडून कुठल्याही उपाययोजना राबविल्या जात नाहीत. मात्र आदिवासींची ओळख पुसण्याचाच प्रयत्न या विभागाद्वारे होत असल्याबद्दल डॉ. केदारी यांनी खंत व्यक्त केली.

उद्घाटन समारंभानंतर विविध लघुपट दाखविण्यात आले. महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपट निर्मात्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. ग. श. पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण देशमुख यांनी केले तर आभार धीरज केदारी यांनी मानले.

“रेफ्री आणि कोच साठी रोलबॉल फेडरेशन चे प्रशिक्षण शिबीर संपन्न” – पंच आणि प्रशिक्षक खेळाचा आत्मा – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रूप तर्फे खेळाडूंना वॉटर डिस्पेन्सर व स्पीकर सेट भेट – संदीप खर्डेकर.

पुणे-वर्षभर रोलबॉल च्या विविध वयोगटातील खेळाडूंच्या शहर, जिल्हा, राज्य, विभाग, व राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्पर्धा देशात सुरु असतात, ह्या स्पर्धांसाठी पंच आणि प्रशिक्षक हे दोघेही महत्वाचे असतात असे रोलबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.शिबिराच्या समारोप समारंभात ते बोलत होते.यावेळी रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे,मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, इराणी कॅफे चे मालक अलिभाई इराणी,पदाधिकारी आनंद यादव, अशोक काळे, चेतन भांडवलकर, दादासाहेब भोरे, प्रमोद काळे, शैलेंद्र पोतनीस व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षक हा गुरु समान असतो आणि त्याने उत्तमोत्तम खेळाडू घडवायचे असतात तर निष्पक्ष पंच हा कुठल्याही खेळाची आत्मा असतो. निरपेक्ष पणे स्पर्धेदरम्यान मैदानावर न्याय देणारा पंच आणि खेळाडूंचे गुण दोष हेरून त्यांना प्रोत्साहित करणारा प्रशिक्षक हे दोघेही महत्वाचे असतात असेही संदीप खर्डेकर म्हणाले.

रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे रोलबॉल खेळाचा प्रचार आणि प्रसार सतत सुरु असतो व खेळाडूंसाठी सातत्याने नवीन कोच व स्पर्धेसाठी नवीन पंच (रेफ्री) तयार करण्याची प्रक्रिया सुरु असते, त्यालाच अनुसरून देशभरातून आलेल्या पंच व प्रशिक्षक यांचे प्रशिक्षण शिबीर पुण्यातील बालेवाडी येथील रोलबॉल स्टेडियम येथे पार पडले असे या खेळाचे जनक राजू दाभाडे यांनी सांगितले. खेळातील तज्ज्ञ व्यक्तींनी चार दिवस सुरु असलेल्या शिबिरात मार्गदर्शन केले व प्रशिक्षण दिले असेही त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच ज्युनियर विश्वकप स्पर्धा केनिया येथे होणार असून ( 17 वर्षाखालील ) आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यासाठी उत्तम पंच व प्रशिक्षक तयार करण्याचे कार्य सुरु असल्याचेही सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खेळाडूंच्या सोयीसाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुपच्या वतीने रोलबॉल स्टेडियम साठी स्पीकर सेट आणि थंड व गरम पाण्याची व्यवस्था असणारा वॉटर डिस्पेन्सर भेट देण्यात येत असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.ग्लोबल ग्रूप ह्या वर्षी खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असून सर्वतोपरी मदत देणार असल्याचे संचालक संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी यांनी स्पष्ट केले.
लवकरच पुणे मनपा आणि स्मार्ट सिटी प्रकलपांतर्गत मां. बालेवाडी येथील स्टेडियम आच्छादित करण्यात येणार असून त्यामुळे बारा महिने खेळाडूंना खेळाचा आनंद लुटता येईल. त्यादृष्टीने बजेट मध्ये तरतूद करण्यात आली असून लवकरच हे काम सुरु होईल असेही रोलबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या कामाकरीता ३१ मे अखेर प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १९: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामांसाठी संबंधित विभागाने ३१ मे अखेर प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्ताव सादर करावे. विभागाने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत किमान एक नाविन्यपूर्ण उपक्रम मंजूरीकरीता सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी ३१ मे पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन डिसेंबरअखेर कामे पूर्ण करावीत. कामाबाबत प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्ताव सादर करताना खरेदीचे प्रस्ताव वगळून सादर करावे. जिल्ह्यात विज्ञान प्रयोगशाळा (सायन्स लॅब) करण्याकरीता कार्यवाही करा. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी केंद्रांसाठी शाळेच्या परिसरात जागा उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न करावे. जिल्ह्यातील कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन झाल्याची खात्री करुन घ्यावी. सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा विचारात घेवून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद यांच्या आराखड्यानुसार जलसंधारणाची कामे सुचवावी.

जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर कामाचा आढावा घेतला जाणार असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध कामे करण्याकरिता प्रयत्न करावे.

जिल्हा नियोजन समितीत मंजूर करण्यात आलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर भरावी. सदरचे संकेतस्थळावरील माहिती लोकप्रतिनिधीसहित सर्वसामान्य नागरिकांना भविष्यात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभाग प्रमुखाने संकेतस्थळावर अचूक माहिती भरावी. कामाच्या ठिकाणी कामाबाबत माहिती देणारे माहिती फलक लावावे,असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले.