पुणे- खुनी ,बलात्कारी,चोर अशा गुन्हेगारांना सुद्धा जागेवर दंड वा शिक्षा करण्याचा अधिकार पोलिसांना नसताना पोलीस चाव्या काढून नागरिकांना जबरीने अडवून हेल्मेट सक्ती आहे दंड भर म्हणून करत असलेली वसुली बेकायदा असून या विरोधात पोलिसांना ..तुम्ही हवे तर खटले भर असे सांगून नागरिक पोलिसांना अडचणीत आणू शकतात असा मार्ग प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी आज हेल्मेट सक्ती विरोधी समिती च्या बैठकीत बोलताना सांगितला. ते म्हणाले असे खटले चालविण्याची यंत्रणा पोलिसांकडे नाही याचवेळी येथे असलेले एक वकील मनाले ,जेवढे पोलीस खटले भरतील तेवढे खटले आपण नागरिकांच्या वतीने मोफत लढवू ..प्रसंगी वकिलांची फौज हि या साठी पुढे येईल …..
पोलीस अधिकारी सरकारचे ऐकत नाही हि सरकारचीच मोठी शोकांतिका – रुपाली पाटील
पुणे- व्यंकटेशम सारखा एक पोलीस आयुक्त मुख्यमंत्री आणि सरकारचे ऐकत नाही हि सरकारची शोकांतिका असून जनतेने नेमके कोणाकडे पहायचे असा सवाल आज येथे हेल्मेट सक्ती विरोधी समितीच्या बैठकीनंतर मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी केला तर ..यांना मनसे स्टाईल आंदोलनाची प्रतीक्षा आहे काय असा सवाल मनसे चे आशिष साबळे यांनी केला .आणि आंदोलनाचा इशाराही दिला . पोलीस आयुक्त जर एवढी मनमानी करत असेल तर त्यांना सरकार काय असतं हे भाजपने दाखवून द्यावं असेही रुपाली पाटील म्हणाल्या …..
हेल्मेट सक्ती रद्द करा अन्यथा ;मुख्यमंत्र्यांना पुणे शहर बंदी ..
पुणे- पुणे शहरातील हेल्मेट सक्ती रद्द करा अन्यथा पुणे शहरात मुख्यमंत्र्यांना शहर बंदी चा जो निर्णय घेतला जातोय त्यात आम्ही हिरारीने भाग घेऊ असा स्पष्ट शब्दात इशारा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी आज हेल्मेट सक्ती विरोधी समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिला तर याच वेळी येथे उपस्थित असलेले महापालिकेतील सभागृहनेते ,भाजपचे वरिष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी आम्ही सक्ती च्या विरोधातच आहोत ,हि आयुक्तांची मनमानी सक्ती उलथवून टाकण्यासाठी आम्ही सर्व जनतेच्या आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या समवेत आहोत मात्र याबाबत राजकारण कोणी करू नये अशी भूमिका स्पष्ट केली . दरम्यान यावेळी महिला वकिलांच्या वतीने अॅड. वैशाली चांदणे यांनी तर डॉक्टरांच्या वतीने डॉ. सुनिता मोरे यांनी हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध करत आपापल्या भावना व्यक्त केल्या .पहा यावेळी कोण काय म्हणाले ……
पोलीस आयुक्तांना समजावून सांगावच लागेल -हेल्मेट सक्ती नको :योगेश गोगावले
पुणे-पुण्यासारख्या दुचाक्यांनी गजबजलेल्या शहरात हेल्मेट सक्ती राबवू नका , जनतेचा क्षोभ लक्षात घ्या असे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना समजावून सांगावेच लागेल असे सांगत आज हेल्मेट सक्ती ला आपला विरोध असल्याचे भाजप चे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी स्पष्ट केले.. पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …
हेल्मेटसक्ती विरोधात भाजपच्या भिमालेंचे पोलीस आयुक्तांवर आता महापालीकास्त्र
पुणे-कायद्याच्या नावाखाली ,वाटमारी करत पुण्यातील दुचाकीस्वारांकडून पैसे उकळणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आता महापालीकास्त्राचा सामना करावा लागणार आहे . ग्राहकचळवळीचे नेते सुर्यकांत पाठक यांनी संदीप खर्डेकर ,अंकुश काकडे ,शांतीलाल सुरतवाला आदी ना समवेत घेऊन आंदोलन सुरु केले मात्र प्रकृतीस्वास्थाभावी पाठक यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले . आता या सर्व प्रकारची महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी गंभीर दाखल घेतली असून … आयएएस अधिकाऱ्यांना माघारी पाठविणाऱ्या भिमाले यांनी आता पुण्याच्या पोलीस कामिशनरांना हेल्मेट सक्तीवरून टार्गेट करण्याचे ठरविले आहे . आज याच पार्श्वभूमीवर त्यांनी चक्क पत्रकार भवन शेजारील ब्लड बँकेच्या आवारात हेल्मेटसक्ती विरोधि समिती च्या बैठकीत संदीप खर्डेकरांसमवेत आपलाही सहभाग नोंदविला .आणि पहिल्यांदा महापालिकेच्या मुख्य सभेतून या हेल्मेट सक्ती विरोधात पोलीस आयुक्तालयावर अस्त्र डागण्यात येतील …आणि नंतर पुढे प्रसंगी सर्व तयारी ठेऊ ..असे सांगत ३ दिवसात हि सक्ती शिथिल करावी लागेल असा आत्मविश्वास हि व्यक्त केला ..पहा आणि ऐका नेमके श्रीनाथ भिमाले काय म्हणाले …
पुण्यात अर्धनग्न मोर्चा
पुणे: सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीच्या सुमारे ३५० प्रकल्पबाधित व खातेदार शेतक-यांनी सोमवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला.तसेच आयुक्तांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा मार्गस्थ झाला. पुढील आठ दिवसात मोर्चा मुंबईत दाखल करण्याचे शेतकरी संघटना किसान मंचचे नियोजन आहे.
खंडाळा एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक १ ,२,३ आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ साठी केसुर्डी,धनगरवाडी,शिवाजीनगर खंडाळा,बावडा,मावशी,मोर्वे ,भादे ,अहिरे या गावातील शेतक-यांच्या तब्बल दोन हजार हेक्टर जमिनीचे संपादन केले जात आहे. मात्र,केवळ ६० हेक्टर जमिनीचे संपादन करण्यास काही शेतक-यांनी संमती दर्शविली आहे. उर्वरित सर्व शेतक-यांचा भूसंपादनाच्या प्रक्रियेस विरोध असून त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष केले जात असल्याने प्रकल्पग्रस्त व खातेदारांनी १२ जानेवारी रोजी पायी अर्धनग्न मोर्चा सुरू केला. सोमवारी सकाळी कात्रज येथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सुमारे तीन तास विभागीय आयुक्तांशी शेतकरी संघटनेची झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे पुण्यातून मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी मोर्चेकरी मार्गस्थ झाले आहेत,असे शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी सांगितले.
जाधव म्हणाले, शासनाने शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या आहेत.तसेच ज्या प्रयोजनासाठी जमिनी स्वीकारल्या त्यासाठी वापर केला जात नाही.एमआयडीसीच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ८५० एकर,दुस-या टप्प्यासाठी केसुर्डी गावची ८३० एकर आणि राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे १०० एकर जमिन सपादित केली आहे. मात्र,तिस-या टप्प्यामधील संपूर्ण सात गावामधील जमिन नीरा देवधर प्रकल्पातील लाभ क्षेत्रात येत असल्याने संबंधित जमिनीवरील मारलेले शिक्के काढण्यात यावेत,असे शिफारस पत्र खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.
भूसंपादनास विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना किसान मंचतर्फे खंडाळा ते मत्रालयापर्यंत मोर्चा काढला जात आहे.विभागीय आयुक्तांनी शेतक-यांच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी अवधी मागितला. तसेच कोणेतेही लेखी आश्वासन दिले नाही. त्यामुळे दररोज ३० ते ४० किलोमिटर दररोज पायी प्रवास करून पुढील आठ दिवसात मोर्चा मंत्रालयावर जावून धडकणार आहे,असेही प्रमोद जाधव यांनी स्पष्ट केले.
चंद्रावर जागा विकत घेण्याच्या मोहापायी पुण्यातल्या महिलेची फसवणूक
पुणे-अनेकदा एखाद्या योजनेत पैसे गुंतवा आणि फायदा मिळवा अशा फसव्या जाहीराती आपण पाहतो. मोहापायी या जाहिरातींना बळी पडून अनेक जण पैसेही गुंतवून मोकळे होतात. मात्र, कालांतराने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते आणि त्यांच्यावर केवळ पश्चातापाचीच वेळ येते. असाच काहीसा पण वेगळा किस्सा पुण्यात घडला आहे. चक्क चंद्रावर जागा विकत देण्याच्या जाहिरातीला बळी पडत एका कुटुंबाने यासाठी पैसेही गुंतवले आणि अखेर फसवणूक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांकडे धाव घेतली.
पुण्यातल्या कोथरूड भागात राहणार्या राधिका दाते-वाईकर या महिलेने चंद्रावर ५० हजार रुपयात एक एकर जागा मिळणार म्हणून २००५ मध्ये एका कंपनीकडे पैसे भरले. मात्र, अद्याप त्यांना ना जागा मिळाली ना भरलेले पैसे. या घटनेला १३ वर्षे झाले असून आता त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी ही बाब माध्यमांसमोर उघड केली. आपली फसवणूक झाली असून संबंधीत कंपनीकडून ५० हजार रुपये परत मिळावेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकाराविषयी वाईकर म्हणाल्या, चंद्रावर जागा मिळेल अशी जाहिरात २००५ मध्ये आपण टीव्हीवर पाहिली होती. ही कंपनी परदेशातील असून त्या कंपनीच्या जाहिरातीवर आपण विश्वास ठेवत बचत करून ठेवलेले सर्व ५० हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून त्या कंपनीला भरले. त्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला तुमची चंद्रावर जागा निश्चित झाल्याचे सांगण्यात आले तसेच याबाबत त्यांच्याशी पत्र व्यवहार देखील झाला होता. त्यानंतर काही महिने त्यांच्याशी बोलणे झाले. पण काही दिवसात हेल्पलाईन नंबर आणि फॅक्स नंबर देखील बंद झाला आहे. आता देखील त्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसून याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, आमचा मुलगा १२ वीमध्ये असल्याने आता त्याच्या पुढील शिक्षणासाठी आम्हाला पैसे पाहिजेत. आम्ही मोहापायी भरलेले हे पैसे मिळाल्यास त्याचे शिक्षण पूर्ण होण्यास आम्हाला मदत होईल.
” साहेब तू सरकार तू… ऐकताना प्रत्यक्ष बाळासाहेब डोळ्यांसमोर अवतरले.” – उद्धव ठाकरे.
मुंबई येथील ताज लँड्स एन्डने उत्सवी रंग रूप धारण केले होते. भगव्या रंगात तो दिवस विलीन झाला होता जेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ती भूमी ठाकरे भूमीत बदलली होती. नऊवारी नेसून, भगवे फेटे बांधलेल्या सुंदर आनंदी अप्सरा, सर्वत्र गुंजणाऱ्या तुतारी आणि नाशिक ढोलच्या गजराने उपस्थितांच्या गर्दीची प्रशंसा करीत आश्चर्यकारक फ्लॅशमॉबने त्यांचे स्वागत करीत होती.
आता जल्लोष तर होणारचं… बाळासाहेब ठाकरें वरील ‘आया रे ठाकरे..’ हे हिंदी गाणे आणि ‘आपले साहेब ठाकरे’ हे आल्हाददायी जोशपूर्ण स्वरांनी स्वरबद्ध केलेले मराठी गाणे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारख्या देशाला तुफानांपासून वाचवतं गरजणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघाच्या व्यक्तित्वाप्रमाणेच जल्लोशपूर्ण, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आहे. सामान्य लोकांचा असामान्य आवाज बनून जगभरात गरजणाऱ्या बाळासाहेबांस समर्पित केलेले ‘साहेब तू…’हे गाणे श्रोत्यांस बाळासाहेबांच्या काळाचे दर्शन घडवंत प्रत्येकाच्या काळजाला भिडते.
एमपी – राज्यसभा, प्रसिद्ध पत्रकार आणि चित्रपट निर्माते, संजय राऊत म्हणतात की, “जेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हे गाणे ऐकले तेव्हा दोघेही त्या गाण्याचा आनंद घेत असताना भावनिक झाले होते. शब्द इतके प्रखर आणि अर्थपूर्ण आहेत त्यामुळे एका क्षणी ते त्या गाण्यात इतके विलीन झाले होते की त्यांच्यासमोरील सर्व काही शून्यात जमा होते. मला तर प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरेचं त्यांच्यासमोर प्रकट झाल्याचा भास होत होता. गाणे जस-जसे पुढे जात होते तस-तसे उद्धव साहेब अधिकाधिक भावनात्मक होत होते. गाणे पूर्ण झाल्यावर ते प्रथम काही बोलले असतील तर ते म्हणजे ‘गाण्यातील शब्दनशब्द प्रभावशाली आणि प्रखर आहेत.’ हे होय.”
संजय राऊत यांनी त्यांच्या सुरवातीच्या टप्प्यात संगीताची मोबाइल रेकॉर्ड केलेली आवृत्ती कशी लपवून दिली होती ही आठवण सर्वांबरोबर शेअर करत शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी वातावरणात हर्षवर्षाव केला. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, “ही गाणी तेव्हाच पूर्णत्वास येतील जेव्हा ही गाणी ऐकल्यावर कोणीही त्याच्या चालीवर ताल धरल्याशिवाय राहणार नाही. ही गाणी अतिशय प्रखर आणि अर्थपूर्ण लिहिली गेलेली आहेत की त्यामुळे मला बाळासाहेबांची उपस्थिती जाणवली.”
अजित अंधारे, सीओओ – वायकॉम १८ स्टुडिओजने घोषित केले की, ‘ठाकरे’ हा चित्रपट मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात जास्त स्क्रीनसह रिलीज होणार आहे. “‘ठाकरे’ हे व्यक्तिमत्व आणि विषयचं अद्वितीय आहे. संजय राऊत यांच्यासह आमचा एकसंध दृष्टीकोन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्मिती क्षेत्रात ‘ठाकरे’ हा आमचा ७५वा तर मराठी चित्रपटांतील १०वा चित्रपट आहे. आम्हाला जीवनपट तयार करणारा कारखाना असे म्हटले जाते पण बाळासाहेबांचा जीवनपट ही एक खूप मोठी जबाबदारी आहे कारण त्यांनी आखलेले मानदंड खूप उच्च आहेत. त्यामुळे या व्यक्तिमत्त्वासाठी सिनेमॅटिक न्याय देणे तितकेसे सोपे नाही. पण ‘ठाकरे’ करण्याचा उत्साहाचं वेगळा!”
कार्निव्हल ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. श्रीकांत भासी म्हणतात, या चित्रपटास जगभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे मिडल ईस्टम-बहरीन, कतार, सौदी अरेबियामध्ये २०० पेक्षा अधिक स्क्रीन्सद्वारे स्वागत प्राप्त झाले आहे. ‘ठाकरे’ २०१८च्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरच्या तुलनेतही मोठा आहे. आमच्याकडे सिंगापूर, मलेशिया सह संपूर्ण आशियामध्ये चीन वगळता 500-600 पेक्षा जास्त स्क्रीन असणार आहेत.”
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी व्यक्त केले की, ‘आया रे ठाकरे’ या गाण्याचे चित्रण पाहून त्याला अधिकाधिक आनंद झाला. शूटच्या पहिल्या दिवशी अमृता नवाझच्या बाजूला उभी असून देखील त्याने ओळखले नाही या मजेशीर आठवणीबद्दल सांगताना अमृता राव म्हणते की, “नवाझ माझ्या बाजूला उभे होते परंतु ६० वर्षांच्या मीनाताईंच्या गेटअप मध्ये त्यांनी मला ओळखले नाही.”
‘ठाकरे’ हा २०१९ मधील सर्वात मोठा चित्रपट असेल, याची घोषणा करून आदित्य ठाकरे यांनी सोहोळ्यातील सर्व उपस्थितांना भावनाविवश केले.
संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या संगीत दिग्दर्शनाने राज्य गाजवणारी गोडजोळी रोहन- रोहन यांनी ही गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. ‘आया रे ठाकरे..’ हे गाणे पद्मश्री सुनील जोगी लिखित व नकाश अझीझ यांच्या आवाजात स्वरबद्ध केलेलं आहे. ‘आपले साहेब ठाकरे’ हे गाणे मंदार चोळकर लिखित व अवधूत गुप्तेच्या आल्हाददायी जोशपूर्ण स्वरांत तर ‘साहेब तू…’ हे मनोज यादव लिखित सुखविंदर सिंग यांच्या मधुर स्वरांनी स्वरबद्ध केलेले आहे. अहमद खान यांनी ‘आया रे ठाकरे ‘ या खास गाण्याची कोरियोग्राफी केली आहे. ‘ठाकरे’ येत्या २५ जानेवारी २०१९ ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.
श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे २५० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
स्वरनिनादतर्फे ‘गंगाधर स्वरोत्सव’ १८ ते २० जानेवारी दरम्यान
विद्युत सुरक्षेचा पुण्यात सुरक्षा रॅलीद्वारे जागर
पुणे : विद्युत अपघात टाळण्यासाठी विजेची घरगुती उपकरणे किंवा सार्वजनिक वीजयंत्रणांपासून सतर्क व सावध राहण्याचा संदेश देण्यासाठी रविवारी (दि. 13) प्रभात फेरी काढून विद्युत सुरक्षेचा जागर करण्यात आला.
राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून आयोजित जिल्ह्यातील विद्युत सुरक्षा सप्ताहाला सुरवात झाली आहे. यानिमित्ताने महावितरणच्या रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार, विद्युत निरीक्षण विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. सु. रा. नलावडे, विद्युत निरीक्षक श्री. चं. तु. थोरात, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर असोशिएशनचे (इकॅम) अध्यक्ष श्री. सुनील गायकवाड, उपाध्यक्ष श्री. मारूती माळी, सचिव श्री. अमर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्युत अपघातातील जीवहानीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होते व कर्मचारी गमावल्याने कंपनीचे तसेच कुटुंबियाचे भरून न येणारे नुकसान होते. विद्युत यंत्रणेपासून सावधानता न बाळगल्याने नागरिकांनाही अनेक कारणांमुळे वीज अपघात होतात. त्यामुळे वीज कर्मचारी असो किंवा सर्वसामान्य नागरिक या सर्वांनी विद्युत यंत्रणेपासून सतर्क राहण्याची काळजी घेतली पाहिजे. विद्युत यंत्रणेत काम करताना जाणते, अजाणतेने झालेली चूक ही जिवावर बेतू शकते. त्यामुळे विद्युत यंत्रणेतील अपघाताचे धोके टाळण्यासाठी स्वतःच्या सुरक्षेबाबत सतर्कता किंवा सावधगिरी बाळगणे यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी प्रमुख वक्त्यांनी केले.
विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन झाल्यानंतर महावितरण, विद्युत निरीक्षक विभाग, इकॅम व औद्योगिक कंपन्या यांच्या संयुक्तपणे सकाळी 9 वाजता विद्युत सुरक्षा रॅली काढण्यात आली. रास्तापेठ, संत कबीर चौक, लक्ष्मी रोड, घोडेपीर व अपोलो टॉकीज या परिसरात जनजागृती करीत निघालेल्या या रॅलीच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी माहिती पत्रक, माहिती पुस्तिकांचे नागरिकांना वितरण करण्यात आले. या रॅलीत सहाय्यक विद्युत निरीक्षक श. ह. सुतार, श्री. ल. डेकाटे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सर्वश्री अंकुर कावळे, दीपक लहामगे, शिवाजी वायफळकर, दिलीप भोळे, मधुकर घुमे, राहुल गवारे, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र म्हंकाळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, इकॅमचे राजेंद्र सिन्नरकर, अशोर पांढरे आदींसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कंपन्या, महाविद्यालयीन विद्यार्थी व सामाजिक संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.
खंबीर व्यक्तिमत्त्व निर्माणासाठी विवेकानंद एक प्रेरणा – ओंकार नाझरकर
‘यशस्वी’ संस्था व विवेकानंद केंद्राच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन साजरा.*
पुणे – प्रचंड वेगवान स्पर्धा, धकाधकीचे जीवन, ढासळत चाललेली नीतीमत्ता अशा अस्वस्थ जीवनशैलीमध्ये सुद्धा खंबीर व्यक्तिमत्त्व निर्माण करता यावे यासाठी युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य समजून घ्यावे, असे आवाहन व्याख्याते ओंकार नाझरकर यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त यशस्वी एज्युकेशन सोसायटी व विवेकानंद केंद्राच्या वतीने संस्थेच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, युवक-युवतींनी करिअरच्या स्पर्धेत मालमत्तेचे ध्येय समोर बाळगतानाच ‘नीतीमत्तेला’ही प्राधान्याने महत्त्व द्यावे, तसेच येणाऱ्या काळात जागतिक स्पर्धेत टिकून रहायचे असेल तर प्रत्येकाने आपण ‘भारतीय’ आहोत ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना जोपासणे आणि त्यानुसार कृती करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी बोलताना ‘यशस्वी’ एज्युकेशन सोसायटीच्या ‘आयआयएमएस’ चे संचालक डॉ. मिलिंद मराठे म्हणाले की, युवकांनी भाषिक कौशल्यात निपुणता आणण्यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. बऱ्याचदा असे दिसून येते की, अभ्यासात व तांत्रिक कौशल्यात उत्तम असूनही केवळ आपले म्हणणे नीट, व्यवस्थितपणे मांडण्याची कला अवगत नसल्याने अनेक युवक-युवती पात्रता असूनही विविध करिअर व रोजगार संधीपासून वंचित राहतात.
यावेळी विवेकानंद केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व सभेची अंतिम फेरी घेण्यात आली तसेच विजेत्यांना प्रमाणपत्र व पुस्तक बक्षीस स्वरुपात प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये दोन गटात वरूण जोशी व स्नेहल आटोळे हे दोन विद्यार्थी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तर सोमोजिता दास व वरूण चव्हाण यांना द्वितीय क्रमांक व कार्तिकी जाधव व पवन वाकेकर यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक रोहित शेणॉय व सुत्रसंचालन प्रिया जोग यांनी तर आभार प्रदर्शन विवेकानंद केंद्राच्या चिंचवड शाखेच्या संचालिका अरुणाताई मराठे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्वी’ एज्युकेशन सोसायटीचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रताप भोसले, विवेकानंद केंद्राचे पदाधिकारी, ‘यशस्वी’ संस्थेचे कर्मचारी, वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पवन शर्मा,शाम वायचळ आदींनी विशेष सहकार्य केले.
कर्तव्य फाउंडेशनतर्फे ससून सर्वोपचार रूग्णालयातील रूग्णांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या भेट
‘विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया’ : प्रभावशाली चरित्र
‘विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया’ हे डॉ. ज्योती धर्माधिकारी लिखीत पुस्तक वाचनात आलं. जगातील 11 महिलांचे चरित्र त्यांनी सहजसोप्या भाषेत शब्दबध्द केलं आहे. सुमारे अडीचशे पानांच्या या पुस्तकाचे प्रकाशक आहेत साकेत प्रकाशन. लेखिका डॉ. धर्माधिकारी या विविध विषयांवर वृत्तपत्रांतून प्रासंगिक, चरित्रपर लेखन करीत असतात. या पुस्तकासाठी त्यांनी विविध देशांतील मानवतेचा मंत्र देणा-या 11 कर्मयोगिनींची निवड केली आहे. जागतिक पर्यावरणाचे नेतृत्व : डॉ. वंगारी मथाई (केनिया), राजकर्मी संन्यासिनी : आंग सान स्यू ची (म्यानमार), आधुनिक ‘सावित्रीबाई’ : मलाला युसूफझाई (पाकिस्तान), राजकीय शास्त्रज्ञ : डॉ. अँजेला मर्केल (जर्मनी), विज्ञानयोगिनी : डॉ. मेरी क्यूरी (पोलंड), मानवता धर्माच्या महामेरु : मदर तेरेसा (भारत), वर्णद्वेषाविरुध्द एल्गार : रोझा पार्क्स (अमेरिका), प्रियदर्शिनी : इंदिरा गांधी (भारत), वृध्दांच्या सन्मानासाठी लढणारी संघर्षव्रती : आयजेन पू (अमेरिका), ‘ओ फॅक्टर’ची जादूगार : ओपरा विनफ्रे (अमेरिका), रीडिफायनिंग वुमनहूड : जेनेटमॉक (होनोलुलू) यांचा त्यामध्ये समावेश आहे. मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम करणा-या या कर्मयोगिनींच्या जीवनातील वाटचाल, संघर्ष आणि त्यांनी मिळवलेले यश वाचतांना वाचक मंत्रमुग्ध होऊन जातो. चपखल आणि काव्यात्मक शीर्षक हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. चरित्रलेखन हा प्रकार वाटतो तितका सोपा नसतो, याची जाणीव असल्यानं लेखिकेनं विविध संदर्भांचा धांडोळा घेतला आहे. व्यक्तिचित्र रेखाटतांना त्या व्यक्तीच्या संघर्षाचा आलेख तटस्थपणे तथापि, अभ्यासूवृत्तीने मांडला आहे. लेखनानिमित्त प्रचंड माहिती गोळा झालेली असली तरी केवळ सनावळ्यांची जंत्री न देता साहित्यिक मूल्य जपत वाचकांना प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत या सर्व कर्मयोगिनींचे चित्र त्या उभे करतात. प्रत्येक चरित्रलेखांसोबत वाचनभंग होणार नाही अशा छायाचित्रांचाही सुयोग्य वापर केलेला आढळून येतो. पुस्तक वाचल्यानंतर वाचकांच्या ज्ञानात निश्चितच भर पडते.
लेखिका डॉ. ज्योती धर्माधिकारी या जालन्याच्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांचे शिक्षण बी. एस्सी. (फीजीक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स), एम.ए. (इंग्रजी), बी. एड. पीएचडी असून अध्यापन कार्याचा सव्वीस वर्षांचा अनुभव आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषद सदस्य असलेल्या डॉ. धर्माधिकारी यांचा ‘प्रिझम’ हा ललित-लेखसंग्रह यापूर्वी प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदानातून प्रकाशित झालेल्या ‘प्रिझम’ला आचार्य भानूकवी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार प्राप्त झाला आहे. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंकांमध्ये ललितलेखन, पुस्तक परीक्षण, समीक्षण याबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदांमध्ये संशोधन पत्रिकांचे वाचन, आकाशवाणी व साहित्य संमेलनामध्ये कथाकथन त्या करत असतात. मराठी साहित्य आणि साहित्यिकांचा इंग्रजी जगताला परिचय करुन देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय इंग्रजी जर्नल्समध्येही सातत्याने लेखन करत असतात. त्यांच्या अनेक कथा,कविता प्रसिध्द झाल्या आहेत.
‘विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया’ या पुस्तकातील सर्व कर्मयोगिनी विशिष्ट ध्येय घेवून जीवन जगलेल्या आहेत. यशापयशाचे चढउतार त्यांनी पाहिले आहेत. लेखिकेने कर्मयोगिनींच्या दु:खाचे अवास्तव वर्णन कुठेही केलेले नाही तसेच गुणवर्णन करतांना त्या वाहवतही गेलेल्या नाहीत. कर्मयोगिनींच्या व्यक्तिमत्वावर सहजतेने त्या प्रकाश टाकतात. 11 सामर्थ्यशाली स्त्रियांपैकी पाच जणींना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. इतर स्त्रियांनाही विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विविध पुरस्कारांपेक्षा त्यांचे कार्य कितीतरी पटीने मोठेआहे, हे सर्वांत महत्त्वाचे म्हणावे लागेल.
लेखिकेने म्हटल्याप्रमाणे गेल्या काही दशकांमध्ये ज्या स्त्रियाआपल्या कर्तृत्वामुळे प्रभावशाली ठरल्या त्यांची जीवनचरित्रे या पुस्तकात मांडली आहेत. वैयक्तिक जीवन, समाज, राजकारण आणि एकंदरीतच मानवतावादी विचारांना दिशा देण्याचे अतुलनीय कार्य करणा-या सा-याच स्त्रियांचे जीवन प्रेरणादायी आहे. म्हणूनच उदात्त हेतूने जगणा-या या स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्याची जडणघडण मराठी वाचकांसाठी उपलब्ध करुन दिल्याचे समाधान आहे.
स्त्रियांनी आज विविध क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. तरीही सामाजिक पातळीवरील त्यांचा संघर्ष संपलेला दिसून येत नाही. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शहरी, ग्रामीण अशा भौगोलिक पातळीवर त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ‘विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया’ या पुस्तकांतील चरित्रवाचनामुळे संघर्षरत महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास वाटतो.
‘विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया’ / डॉ. ज्योती धर्माधिकारी / साकेत प्रकाशन, औरंगाबाद/ पृष्ठे 240/ किंमत: 250 रु. (डॉ. ज्योती धर्माधिकारी – मोबाइल 9420224594)
(राजेंद्र सरग 9423245456 )






