Home Blog Page 301

‘ऑपरेशन सिंदूर’ – पराक्रम अभूतपूर्व ‘ या विषयावर वर शनिवारी दिनांक २४ मे रोजी व्याख्यान.

  • – एअर मार्शल प्रदीप बापट(निवृत्त), विंग कमांडर अविनाश मुठाळ(निवृत्त) ह्यांचे मार्गदर्शन.

पुणे
केशव माधव न्यास च्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ चे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी दिनांक २४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता पटवर्धन बाग येथील ‘सेवा भवन’ सभागृहात करण्यात आले आहे.’ऑपरेशन सिंदुर ‘ वर अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष व परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) व विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव माधव चे अध्यक्ष नंदाजी भागवत असणार आहेत.

भारतीय सैन्याच्या शौर्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे.
ह्या व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केशव माधव चे सचिव अरविंद देशपांडे ह्यांनी केले आहे.

विश्रांतवाडी महावितरणच्या लकी ड्रॉ बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन; ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्याचे आवाहन

पुणे-:- महावितरणच्या वतीने विश्रांतवाडी उपविभागीय कार्यालयात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ योजनेत बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. या वेळी उपस्थित असलेल्या उपकार्यकारी अभियंता यांनी अधिकाधिक ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या लकी ड्रॉमध्ये रथीसन व्ही एन (लोहगाव ) यांना प्रथम पारितोषिक मिळाले. प्रवीण बाळासाहेब मोझे (लोहगाव ) व बिस्मिल्हाबी सरफोरद्दीन शेख (कलवड ) यांना द्वितीय पारितोषिक, तर चेतन चंद्रकांत गायकवाड (धानोरी ) व मायादेवी किशोर आढाव (लोहगाव ) यांना तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. प्रथम व द्वितीय पारितोषिक विजेत्यांना स्मार्टफोन, तर तृतीय पारितोषिक विजेत्यांना स्मार्ट वॉच देण्यात आले.

या वेळी विश्रांतवाडी उपविभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता सरांगधर केनेकर , सहाय्यक अभियंता राहुल बेंद्रे , उपव्यवस्थापक महेश क्षीरसागर , ज्ञानेश्वर शेळके , आणि सहाय्यक लेखापाल प्रशांत उदबत्ते उपस्थित होते.

अति कार्यकारी अभियंता श्री केनेकर यांनी सौरऊर्जेचा वापर व वीज बचतीचे महत्त्वाची माहिती उपस्थिती त्यांना देऊन महावितरणच्या सौर प्रकल्पांच्या अनुदान योजनांची माहितीही दिली. सहाय्यक लेखापाल प्रशांत उदबत्ते यांनी ग्राहकांना महावितरणच्या डिजिटल सेवा आणि ऑनलाइन वीज बिल भरण्याचे फायदे स्पष्ट करत त्याचा वापर करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक राहुल बेंद्रे यांनी करून आभार मानले.

फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी: वैष्णवी हगवणे प्रकरणी अदिती तटकरेंचे निर्देश

महिला आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर कारवाई करू

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यात कसपटे कुटुंबाने जे काही सहन केले आहे तसेच अजून ज्या कोणत्या बाबी तक्रारीत नमूद करायच्या राहिल्या असतील त्या बाबींचा समावेश करत या केसला अजून कसे मजबूत करता येईल ते बघता येईल. परंतु त्या आधी दोन आरोपी जे फरार आहेत त्यांना तातडीने पोलिसांनी अटक करावी.

पुढे बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही केस स्ट्रॉंग झाली पाहिजे. त्यासाठी आणखी काही विटनेस असतील किंवा जे इतर लोक असतील की ज्यांना असा अनुभव आला असेल त्यांनी त्यांच्या बाबी समाविष्ट करायला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा कशी करता येईल या दृष्टीने शासनाच्या आणि पोलिसांकडून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन तटकरे यांनी दिले आहे.

हगवणे यांच्या मोठ्या सुनेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. परंतु काही कारवाई केली गेली नाही. यावर अदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मोठ्या सुनेने जर महिला आयोगाकडे तक्रार केली असेल आणि आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर त्या संदर्भात सुद्धा योग्य ती कारवाई केली जाईल. कारण कदाचित तेव्हा 6 महिन्यांपूर्वी दक्षता घेतली असती तर एक जिने तक्रार केली आहे तिलाही न्याय मिळाला असता आणि तिचेही अनुभव समोर आले असते. वैष्णवीचे अनुभव आणि मोठ्या सुनेचे अनुभव जवळपास सारखेच आहेत. परंतु मोठ्या सुनेला नवऱ्याची साथ असल्यामुळे सुदैवाने ती सुखरूप आहे. परंतु तक्रार दाखल करूनही दखल घेतली नसेल तर निश्चितच कारवाई केली जाईल.

सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले,’ED सर्व मर्यादा ओलांडल्या:देशाच्या संघराज्य रचनेचे उल्लंघन केले

तामिळनाडू दारू घोटाळ्याची चौकशी थांबवण्याचे निर्देश
नवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ती देशाच्या संघराज्य रचनेचे उल्लंघन करत आहे. तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) आणि तामिळनाडू सरकार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.

मार्चमध्ये TASMAC मुख्यालयावर छापा टाकल्यानंतर, एजन्सीने म्हटले होते की त्यांना १,००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार आढळला आहे. कॉर्पोरेट पोस्टिंग, वाहतूक आणि बार परवाना निविदांशी संबंधित डेटा सापडला आहे. निश्चित किमतीपेक्षा जास्त किमतीत दारूची फसवणूक केल्याचे पुरावे देखील आहेत.

न्यायालयाने एजन्सीला तपास आणि छापे थांबवण्याचे निर्देशही दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठासमोर होती.

तामिळनाडू सरकारची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, २०१४ ते २०२१ या काळात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये राज्याने दारू दुकानदारांविरुद्ध ४१ एफआयआर नोंदवले आहेत. ईडीने २०२५ मध्ये टीएएसएएमएसी मुख्यालयावर छापा टाकला. त्यांनी अधिकाऱ्यांचे फोन आणि उपकरणे घेतली आणि सर्वकाही क्लोन केले.

यावर, सीजेआयने ईडीकडून उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एसव्ही राजू यांना विचारले की, टीएएसएमएसीविरुद्ध गुन्हा कसा ठरवला गेला. तुम्ही व्यक्तींविरुद्ध फौजदारी खटला दाखल करू शकता, पण महामंडळाविरुद्ध नाही. तुमची ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे.

राज्य कारवाई करत असेल तर ईडी चौकशीची काय गरज आहे, असा सवाल न्यायालयाने विचारला

तस्मॅकचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, ईडीने अधिकाऱ्यांच्या फोनच्या क्लोन प्रती घेतल्या आहेत. हे त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत आहे.

सिब्बल म्हणाले की, न्यायालयाने ईडीला फोन आणि उपकरणांमधून घेतलेला डेटा वापरण्यापासून रोखावे. यावर सरन्यायाधीश म्हणाले- न्यायालयाने आधीच अंतरिम दिलासा दिला आहे आणि पुढील कोणतेही निर्देश देऊ शकत नाही.

एएसजीने दावा केला की हे १,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण आहे. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, राज्य आधीच कारवाई करत आहे. ईडीने अनावश्यकपणे चौकशी का करावी, प्राथमिक गुन्हा कुठे आहे?\यावर एएसजी म्हणाले की, नेत्यांना मोठ्या फसवणुकीत संरक्षण दिले जात आहे. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे आणि देशाच्या संघराज्य रचनेचे उल्लंघन करत आहे. मग एएसजी म्हणाले की ते सविस्तर उत्तर दाखल करतील.

दहा एकर म्हणजे १०० कोटीची जमीन न हडपण्यासाठी पुण्याच्या पोलीस इन्स्पेक्टर ने घेतले तब्बल 4.5 काेटी

वाघाेली परिसरातील १० एकर जागा अपर्णा वर्मा नावाच्या दुबई येथे राहणाऱ्या महिलेच्या नावावर असून त्याची रेडीरेकनरनुसार किंमत तब्बल १०० काेटी रुपये आहे, तर बाजारमूल्य संबंधित किमतीच्या दुप्पट आहे. सदर जागा हडप करण्यासाठी तत्कालीन चंदननगर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी त्यांचा मेहुणा व साथीदारासह अपर्णा वर्मा नावाच्या महिलेच्या जागी अर्चना पटेकर नावाची महिला उभी करून तीच अर्पणा वर्मा असल्याचे भासवून तिची बनावट कागदपत्रे काढली. या प्रकरणात दुबई येथून पुणे, मुंबईत वारंवार केसेसला न्यायालयात येणे शक्य नसल्याचा गैरफायदा घेत पाेलिस निरीक्षक लांडगे यांच्या टाेळीने तब्बल ७ काेटी रुपये स्वीकारले असल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले आहे. तर, संबंधित दुबईतील महिलेकडून आणखी ११ काेटी रुपयांची मागणी करत दुसराच एक व्यक्ती या जागेवर खरेदीदार म्हणून उभा करत ब्लॅकमेलिंग करण्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पाेलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे पसार झाला असून त्याचा शाेध पाेलिस पथके घेत आहेत.

या गुन्ह्यात आणखी एक धक्कादायक बाब समाेर आली आहे की, संबंधित जागेच्या मालकी हक्कावरून वाद सुरू असताना जमिनीची सर्व कागदपत्रे ही राजेंद्र लांडगे याच्या ताब्यात हाेती. त्यावेळी तत्कालीन सहाय्यक पाेलिस निरीक्षक सिध्दनाथ खांडेकर यांच्या बनावट सहीने ते रजेवर असताना अपर्णा वर्मा यांच्या विरोधात सदर गुन्ह्यातील आराेपी आनंद भगत याच्या नावाने फिर्याद दाखल करून कार्यालयीन टिपणीवर बनावट स्वाक्षरी करत येरवडा सहायक पाेलिस आयुक्त व पाेलिस उपायुक्त परिमंडळ चार यांच्या परवानगीने बाेगस गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा खांडेकर यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून लांडगे याचा शाेध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात तडजाेडीत अपर्णा वर्मा यांनी आनंद भगत यास ५० लाख रुपये, अर्चना पटेकर हिला ५० लाख, लांडगे यांचा मेव्हणा शैलेश ढाेंबरे यास दीड काेटी रुपये तर राजेंद्र लांडगे याला साडेचार काेटी रुपये दिले असल्याची माहिती वर्मा यांनी पाेलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात दाेन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात अपर्णा वर्मा यांचा तक्रार अर्ज, २०२३ मध्ये आनंद भगत याच्या सन २०२३ मधील तक्रारीवरून दाखल झालेला बनावट फसवणुकीचा गुन्हा, सहायक पाेलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर यांची बनावट सही केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. पाेलिस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून लांडगे याचा शाेध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

असले नालायक लोक माझ्या पक्षात नकोत:वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवारांचा संताप

…तर अजित पवारला फासावर लटकवालग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सुनेशी असे वागा?

पुणे-माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्याविषयी बोलताना अजित पवारांनी भाष्य केले आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले, माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून जबाबदारी म्हणून जे काही करायचे आहे ते आम्ही केले आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझा दुरान्वये संबंध नाही, फक्त लग्नाला गेलो म्हणून माझी बदनामी केली गेली. या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. दोघे फरार आहेत. शोधासाठी आणखी पथके वाढवायला सांगितली आहेत. तसेच जर अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकवा. माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा. उगाच बदनामी केली जाते. मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले. स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात असेही विचारले होते. मग माझी का बदनामी करता. गुन्हा नोंद झाला आहे. सीपींना सांगितले कारवाई झाली पाहीजे.

अजित पवार म्हणाले, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता.मी शक्य असेल तर येण्याचा प्रयत्न करतो. मी एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेने वेडेवाकडे केले, तर त्याला अजित पवार काय संबंध आहे. अजित पवारांनी सांगितले का असे कर म्हणून मला तर कळतच नाही. मी घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या सीपींना फोन केला आणि म्हटले कोणी का असेना कारवाई करा. मला कळताच पोलिसांना सांगितले कारवाई करा. ज्या मुलीने आत्महत्या केली, तिचा नवरा, सासू, नणंद आतमध्ये आहे. सगळे अटकेत आहेत. सासरा पळून गेला. तो पण सापडेल, पळून जातो कुठे? यामध्ये अजित पवारांचा काय संबंध? प्रेमापोटी लोक बोलावतात तिथे जावे लागते, नाही गेले तर माणसे रुसतात, लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सुनेशी असे वागा म्हणून, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला पाहिजे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. फडतूस दादा असे म्हणत दानवे यांनी पवारांवर टीका केली आहे. हुंडा या अनिष्ट प्रथेचे उदात्तीकरण करणारा उपमुख्यमंत्री आपण लाडका भाऊ म्हणून घेतल्यावर, दुसरे काय होणार? हुंडाबळी, असे म्हणत दानवे यांनी टीका केली आहे.

वैष्णवीच्या मामे सासऱ्यांवर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप:पोलिस महानिरीक्षक सुपेकरांचा दबाव, अंजली दमानियांचा हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप

0

आयजी जालिंदर सुपेकरांवर 500 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे यांचा त्यांच्या सासरी हुंड्यासाठी छळ झाला होता. या प्रकरणी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार असल्याचे समजते. त्यांना शोधण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. आता यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आयजी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.

वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे आयजी (पोलिस महानिरीक्षक) आहेत. त्यांची माहिती घेतली असून या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे कुटुंबीयांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. जालिंदर सुपेकर या शशांकच्या मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे, एवढेच नाहीतर जळगावमध्ये पीएसआय सादरे जे होते त्यांना, या आयजीनेच त्रास दिल्याचे पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.अंजली दमानिया म्हणाल्या, जालिंदर सुपेकर हे पोलिस महानिरीक्षक असून ते वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. मयुरी जगताप जी हगवणेंची मोठी सून आहे, तिने पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरवेळी देखील हगवणे कुटुंब फरार होते. तेव्हा, वैष्णवीच्या नणंदेने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. म्हणजेच, फरार व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये जाते आणि मयुरीच्या आई आणि भावा विरुद्ध एफआयआर करते, आणि पुन्हा गायब होते. तसेच, तू आमचे काहीही बिघडवू शकत नाही, आमचे हात फार मोठे आहेत, अशी धमकी देते, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. मला असे वाटते की, हे कुटुंब अतिशय विकृत मानसिकतेचे आहे, यामध्ये सरकारने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, वैष्णवीचे सगळ्यात जास्त हाल तिच्या नणंद म्हणजे करिष्मा हगवणे करायच्या आणि त्यांच्यामुळे सासू लता आणि राजेंद्र हगवणे हे दोन्ही सुनांना छळायचे अशी माहिती मिळाली आहे. फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. एवढेच नाही तर दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणस फरार झाली होती. सुनांनाच नाही तर सुशीलला देखील छळले जायचे. ह्या कुटुंबाला खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला हा खालचा फोटो खूप संशयास्पद वाटतोय. हे काहीतरी वेगळे आहे, असे म्हणत अंजली दमानिया यांनी एक फोटीही ट्विट केला आहे. वैष्णवीच्य अंगावरील जखमांपैकी तीन छिद्र असलेली जखम संशयास्पद वाटते. वैष्णवीच्या वडिलांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता, असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

अखेर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबाकडे:अजित पवारांनी साधला वैष्णवीच्या वडिलांशी संवाद; आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री

पुणे-वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात सुशिक्षित कुटुंबात देखील हुंडाबळीचा प्रकार घडल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र हगवणे व कुटुंबीय यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान वैष्णवीचे 9 महिन्यांचे बाळ कुठे आहे असा सवाल उपस्थित झाला होता.

वैष्णवी हगवणे यांचे 9 महिन्यांचे बाळ पुणे येथील कर्वेनगर येथे राहणारे नीलेश चव्हाण यांच्याकडे होते. वारंवार बाळाची मागणी केली असता नीलेश चव्हाण हे बंदुकीला हात लाऊन इथून चालते व्हा, असा दम भरायचे. परंतु आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी पुढाकार घेऊन बाळाचा ताबा मिळवला आहे. आता हे बाळ वैष्णवीच्या घरच्यांकडे म्हणजे कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

आरोपी राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या भावाने माहिती दिल्यानंतर कसपटे कुटुंब वैषणवीच्या बाळाला घ्यायला नीलेश चव्हाण यांच्या घरी गेले. परंतु नीलेश चव्हाणने बाळाला न देता कसपटे कुटुंबीयांना हुसकावून लावले होते. नीलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांकचा मित्र असल्याचे बोलले जात आहे. परंतु हगवणे यांच्या मोठ्या सून मयूरी हगवणे यांनी नीलेश चव्हाण हा शशांकची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचे सांगितले आहे.

वैष्णवीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितलं की, माझ्या भावाला एका अज्ञात व्यक्तीने ते बाळ आणून दिले. बाळाच्या रूपाने आम्ही वैष्णवीला पाहतो आहोत. वैष्णवी म्हणून आम्ही पुढे त्या बाळाचा संभाळ करणार आहोत अशी माहिती अनिल कसपटे यांनी दिली आहे. मला कोणाचाही फोन आला नाही, भावाला फोन आला होता.बाळ कुठे होते ते माहिती नाही, असेही ते म्हणाले. वैष्णवीचे काका मोहन कसपटे ज्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्यांनी माहिती देताना सांगितले की, मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तुम्ही बाणेर हायवेला या माझ्याकडे बाळ आहे. आम्ही त्यांना म्हटले आम्ही पिंरगुटला चाललो आहोत. ते म्हणाले आम्ही बाणेर हायवेजवळ आहे, तिथे या बाळ माझ्या ताब्यात आहे. तिथे गेल्यानंतर बाळ त्यांनी आमच्या ताब्यात दिले आणि ते तिथून निघून गेले. ते कोण होते त्याची कोणतीही माहिती नाही. दोन दिवसांपासून बाळाचा शोध सुरू होता, अशी माहिती मोहन कसपटे यांनी दिली आहे. तर आमचे बाळ आम्हाला मिळाले आहे, त्यामुळे आम्हाला आंनद आहे, असेही ते पुढे म्हणाले आहेत.

वैष्णवी मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. ऑडिओ क्लिप तसेच इतर सर्वच गोष्टी तपासून वैष्णवीला न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. वैष्णवी मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांशी फोनवरून चर्चा केली आहे. मी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करू नका. तसेच आरोपींना सोडणार नाही, असे आश्वासन देखील अजित पवारांनी दिले आहेत. लग्नाच्या वेळी मला कल्पना दिली असती तर मी लग्नच होऊ दिले नसते. मात्र, आता वैष्णवीला न्याय मिळवून देणार. मी आज बारामतीमध्ये आहे पण उद्या किंवा परवा पुण्याला आल्यानंतर मी तुम्हाला भेटने. मी मुलीच्याच बाजूने आहे, पहिल्या दिवशीपासून मी पोलिसांना याबाबत आदेश दिले आहेत. मी तुमच्याच पाठीशी आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेत वैष्णवीला न्याय मिळवून देणार, असेही अजित पवारांनी वैष्णवीच्या वडिलांना सांगितले आहे.

वैष्णवीच्या 8 महिन्यांच्या बाळाचा ताबा हा कायद्याने हगवणे कुटुंबाकडे किंवा कसपटे कुटुंबाकडे असायला हवा. परंतु आता हगवणे कुटुंबातील सदस्य अटकेत आहेत तसेच काही फरार आहेत. त्यामुळे आता बाळाचा ताबा हा वैष्णवीच्या घरी अर्थात कसपटे कुटुंबाकडे असायला हवा.

मुलाच्या लग्नात व्याह्यांकडून ५१ ताेळे साेने, सात किलाे चांदीची ताटे, भांडी, फाॅर्च्युनर गाडी घेतली. नंतर अधिक महिन्यात साेन्याची अंगठी आणि दीड लाखाचा महागडा माेबाइलही घेतला. यानंतरही जमीन खरेदीसाठी माहेरहून २ कोटी रुपये आण म्हणत सुनेचा छळ केला. छळामुळे तिने आत्महत्या केली, अशी ठाण्यात नोंद झाली. पण शवविच्छेदनात गळा दाबल्याची पुष्टी झाली. वैष्णवी शशांक हगवणे असे मृत विवाहितेचे नाव आहे, तर या घटनेतील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा पुणे-मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे, त्याचा मुलगा शशांक हगवणे व इतर तिघे आहेत. पाेलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, नणंद करिश्मा हगवणे व सासू लता हगवणेला अटक केली. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे पसार आहेत.

शशांक-वैष्णवीचा विवाह प्रसिद्ध सनीज वर्ल्ड येथे दाेन वर्षांपूर्वी झाला होता. अनिल कस्पटे यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी लग्नात ५१ ताेळे साेने, सात किलाे चांदीची ताटे, भांडी, फाॅर्च्युनर गाडी, अधिक महिन्यात साेन्याची अंगठी, दीड लाखाचा माेबाइल दिला हाेता, तर दरवेळी मुलगी सासरी आल्यावर एक लाख ते ५० हजार रुपये देत राहिले. परंतु घाेटावडे परिसरात जमीन खरेदीसाठी माहेरहून दाेन काेटी रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी तिचा छळ केला. शेवटी १६ मे राेजी राहत्या घरी तिने गळफास घेतला.उर्वरित. पान ६

राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल : बुधवारी या प्रकरणाची राष्ट्रीय महिला-आयाेगानेही दखल घेतली आहे. आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत पाेलिस महासंचालकांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी फरार सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

वैष्णवीचे शवविच्छेदन पुण्यातील ससूनमध्ये केले. यात डाॅक्टरांना तिच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा मिळून आल्या, तर तिचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट केले. शरीरावर काही ठिकाणी रक्त गोठल्याचे डाग दिसल्याने व्हिसेरा व इतर नमुने प्रयाेगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. त्यामुळे वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असा आरोप वडील अनिल कस्पटे यांनी केला.

पुण्यात धुव्वा धार… मुसळ धारेने झोडपले

पुणे शहरासह जिल्हा आणि राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने धुव्वा केला. दुपारी चारनंतर पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासाभरानंतर ओसरलेल्या पावसाने रात्री आठनंतर पुन्हा जोर धरला.हा पाऊस एवढा जोरदार होता की, शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुठे वीज पडली, कुठे झाडे कोसळली तर कुठे होर्डिंग कोसळलं. अनेक ठिकाणी महावितरणची पंचायत केली अन् पुणेकरांची पावसाने बत्ती गुल केली. महापालिकेचं दरवर्षी प्रमाणे पितळ उघडे केले.

पुण्यातील सिंहगड रोड वरती राजाराम पुलापासून ते वडगाव पर्यंत झालेल्या नवीन उड्डाणपूलावर वाहतूक कोंडी झाली आहे. तास-दीड तासापासून वाहतूक कोंडीमध्ये पुणेकर अडकले आहेत.शहरातील इतर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झालं आहे. वानवडी कोंढवा भागात फुटपाथसह रोडवर पाणीच पाणी झालं आहे. गाड्या बंद पडल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली.शहरातील प्रत्येक पेठेत पाणी साचलं असून लक्ष्मी रस्त्याकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याला तलावाचं स्वरुप प्राप्त झालं आहे.

मुसळधार पावसामुळे कात्रज भागात दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली आहे. कात्रज भागातील माऊली नगर, तसेच कोंढवा परिसरात मुसळधार पावसामुळे दुकानात आणि घरात पाणी शिरले होते.त्यामुळे जागोजागी पाणी साचले आणि रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले.

कात्रज आणि सिंहगड रस्त्यावर वीजेचा मोठा आवाज झाला. हा आवाज झाला तेव्हा माणिक बाग येथील अतिथी हॉटेलच्या वाहन तळाजवळ असलेल्या प्रतीक्षा भागाच्या पत्र्यावर वीज पडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

..येरवडा, कोरेगाव पार्क, धानोरी, टिंगरेनगर, एरंडवणा, देवाची ऊरुळी, बावधन, मुकुंदनगर, काळेपटल, काळेबोराटे नगर, हडपसर आणि फातिमानगर या भागांमध्ये झाडे कोसळल्याच्या १५ घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंदवण्यात आल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नाही.

धनकवडीतील तीन हत्ती चौक आणि इतर काही भागांत संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. काही परिसरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शिवाजीनगर, सदाशिव पेठ, सहकार नगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, खडकवासला, नांदेड सिटी, शिवणे, हडपसर, वाघोली आणि वडगाव शेरी या भागांत विशेषतः अधिक पावसाची नोंद झाली आहे.

कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला:6 जण ठार

मुंबई-कल्याण पूर्व मधील मंगलराघो नगर परिसरात आज दुपारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली. सप्तशृंगी नावाच्या चार मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला आणि थेट तळमजल्यावर आदळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व मधील मंगलराघो नगर परिसरात ही घटना घडली आहे. या भागात असलेल्या सप्तशृंगी नावाची चार मजली इमारतीत आहे. ही इमारत 19 वर्षे जुनी आहे. या इमारतीमध्ये एकूण 25 कुटुंब राहत होते. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू होते. त्यावेळी आज दुपारच्या सुमारास या इमारतीतील स्लॅब अचानक कोसळला आणि थेट तळमजल्यावर आदळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. सुमारे तीन-चार बचाव कार्य चालले. या आठ जणांपैकी 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झालेत. जखमींवर पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांची नावे-नमस्वी श्रीकांत शेलार (वय 2), प्रमिला कालचरण साहू (56), सुनिता निलांचल साहू (38), सुशीला नारायण गुजर (78), व्यंकट भीमा चव्हाण (42), सुजाता मनोज वाडी (38)

जखमींची नावे-विनायक मनोज पाधी (4), शर्विल श्रीकांत शेलार (4), निखील चंद्रशेखर खरात (26), अरूणा वीर नारायण.

दरम्यान, सप्तशृंगी इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर फरशी बसवण्याचे आणि कोबा करण्याचे काम सुरू होते. जितेंद्र गुप्ता आणि व्यंकट चव्हाण हे कोबा करण्याचे काम करत होते. दुपारपर्यंत काम केल्यानंतर जितेंद्र गुप्ता हा जेवण्यासाठी बाहेर गेला. तर व्यंकट चव्हाण हा त्याच ठिकाणी जेवला आणि झोपला. जितेंद्र गुप्ता जेवण करून परत आला, तेव्हा त्याला इमारत कोसळल्याचे दिसल्याने त्याला मोठा धक्का बसला. कारण इमारत कोसळल्यानंतर झालेल्या ढिगाऱ्याखाली अडकून त्याचा मित्र व्यंकट चव्हाणचा मृत्यू झाला होता.

यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांचा गौरव

शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतील तिसऱ्या स्थानाबद्दल मंत्रालयात द‍िला पुरस्कार

पुणे (दि २०) : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री – १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातंर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्कृष्ट कामग‍िरी नोंदवत त‍िसरे स्थान म‍िळवले आहे. या उल्लेखनीय कामग‍िरीबद्दल मंगळवारी (द‍ि.२०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा गौरव केला.

मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खरगे, अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग असीमकुमार गुप्ता यांच्यासह प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री – १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा अंत‍िम न‍िकाल १६ मे २०२५ रोजी जाहीर झाला. यात गुणवत्ता परिषद भारत (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया QCI) यांनी केलेल्या अंतिम मूल्यांकनात पीएमआरडीएने ७६.०२ गुण मिळवत राज्यभरातील ९५ महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय / निमशासकीय संस्था, कंपन्या आदी गटातून त‍िसरा क्रमांक म‍िळवला आहे.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएने सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवत कार्यालयात अपेक्षित सोयी सुविधांसह प्रशासकीय कामकाजातील गतीमानतेला अध‍िक प्राधान्य द‍िले. यात प्रशासकीय कामकाजातील नाविन्यता, लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, अद्ययावत संकेतस्थळ, कार्यालयीन स्वच्छता व सोयी सुविधा अशा काही महत्वांच्या मुद्द्यांची राज्य शासनाने दखल घेतली. दुसऱ्या टप्प्यातील मुख्यमंत्री – १०० दिवस या कार्यक्रमातील कामग‍िरीची नोंद घेत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा आज गौरव करण्यात आला.


मुख्यमंत्री – १०० दिवसाच्या कार्यक्रमात माझ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सामुह‍िक मेहनतीमुळे पीएमआरडीएला हा पुरस्कार म‍िळाला. नागर‍िक केंद्रीत कार्यालयीन सोयी सुव‍िधा आण‍ि लोकाभ‍िमुख प्रशासनावर आमचा अध‍िक भर आहे. याची राज्य शासनाने दखल घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

नटरंग कलागौरव पुरस्काराने नम्रता संभेराव तर नटरंग सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सागर बगाडे यांचा गौरव

पुणे : कलेच्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीस नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या कलागौरव तसेच सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीमत्वांची निवड करण्यात आली आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नटरंग ॲकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध कलांचे प्रशिक्षण देण्याबरोबरच स्व. गिरीश बापट यांचे कार्य पुढे नेले जात आहे, याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या 31व्या स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठानच्या कलागौरव पुरस्काराने लोकप्रिय विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव तर तिसऱ्या स्व. गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने राष्ट्रपती पदक विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांचा आज (दि. 20) गौरव करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. आमदार हेमंत रासने अध्यक्षस्थानी होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, महावस्त्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास नटरंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा स्वरदा बापट, कार्याध्यक्ष जतिन पांडे, विश्वस्त ललित जैन तसेच माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, मनपा उपायुक्त सुनील बल्लाळ, शाहीर परिदषचे अध्यक्ष दादा पासलकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, विजय कडू, राजेश येनपुरे आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभानिमित्त नटरंग कला ॲकॅडमीच्या 150 कलाकारांचा नृत्यरंग हा कार्यक्रम झाला.
कलाक्षेत्रातील नम्रता संभेराव यांच्या कार्याचे कौतुक करून चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, सामाजिक क्षेत्रात सागर बगाडे यांचे कर्तृत्व मोठे आहे. गरजेवर आधारित सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार आहे.
सत्काराला उत्तर देताना नम्रता संभेराव म्हणाल्या, रसिक प्रेक्षकांशिवाय आम्हा कलाकारांचा प्रवास अपूर्ण आहे. कलागौरव पुरस्कराच्या माध्यमातून कलेच्या क्षेत्रात उत्साहाने प्रेरणा घेऊन नव्या जोमाने कार्य करण्यास तयार आहे.
सागर बगाडे म्हणाले, गिरीश बापट यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कराचे मोल मोठे आहे. पुरस्काराचे पावित्र्य ठेवून सामाजिक कार्यातील वाटचाल कायम ठेवणार आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आमदार हेमंत रासने म्हणाले, नटरंग ॲकॅडमीसारख्या संस्था कलेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असल्याने पुण्याची सांस्कृतिक राजधानी ही ओळख कायम आहे. पुरस्कारांसाठी केलेली निवड समर्पक आहे.

स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा -भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

पुणे -आज पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाताना इंटरनेटच्या एका लटकत्या केबलचा तुटलेला भाग अचानक खाली पडल्याने एका नागरिकाला गंभीर दुखापत झाली असून, तो थोडक्यात बचावला. अशा प्रकारच्या घटना केवळ दुर्लक्ष किंवा व्यवस्थेतील निष्काळजीपणाचं लक्षण नसून, नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या आहेत.या बाबत आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने पुणे महानगर पालिकेच्या विद्युत अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन दिले.या शिष्टमंडळात माजी नगरसेविका मानसी देशपांडे, सुशील मेंगडे,विशाल पवार ,प्रतुल जागडे विजय गायकवाड यांचा समावेश होता
विद्युत विभागाच्या श्रीमतीं शेकटकर यांनी महानगरपालिकेच्या वतीने निवेदन स्वीकारले

यावेळी बोलताना शहराध्यक्ष घाटे यांनी म्हणाले,’पुणे शहरातील अनेक भागांमध्ये केबल्स – विशेषतः इंटरनेट व केबल टीव्हीच्या अनधिकृत तारा – बिनधास्तपणे उभारण्यात आलेल्या असून, त्यांची देखभाल किंवा तपासणी केली जात नाही.पुणे शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते, चौक व गल्लीतील केबल्सचे तातडीने तांत्रिक ऑडिट करण्यात यावेअनधिकृतपणे टाकलेल्या किंवा धोकादायक स्थितीत असलेल्या केबल्सची यादी तयार करून त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी.संबंधित कंपन्यांना नोटीस देऊन जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यातील घटना टाळण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना निश्चित करावी.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने PMC तर्फे एक विशेष हेल्पलाईन क्रमांक वा पोर्टल कार्यान्वित करण्यात यावे, जिथे नागरिक अशा धोकादायक केबल्सची माहिती देऊ शकतील.असे घाटे यांनी सांगितले

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष ; कार्यकारी विश्वस्तपदी अ‍ॅड. रजनी उकरंडे ; २०२५-२६ करिता नियुक्ती

पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी सन २०२५-२६ या मंदिराच्या १२८ व्या वर्षाकरीता अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांची निवड झाली. तर कार्यकारी विश्वस्तपदी अ‍ॅड..रजनी उकरंडे, खजिनदारपदी युवराज गाडवे, उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ आणि उप उत्सवप्रमुख म्हणून अक्षय हलवाई यांची नियुक्ती झाली आहे.

यासोबतच डॉ. पराग काळकर, अ‍ॅड.प्रताप परदेशी, राजेंद्र बलकवडे, सुनील रुकारी हे विश्वस्तपदी असणार आहेत. ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विधीनिष्णात पदवीधारक असून गेली ३० वर्षे पुण्यामध्ये वकिली व्यवसाय करीत आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयातील वकील संघटनेचेही ते सदस्य आहेत.

धमार्दाय कायद्यांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. प्रख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थान, श्री महागणपती ट्रस्ट रांजणगाव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच नवी दिल्ली येथील गांधी स्मारक निधी इत्यादी संस्थांचे ते विधी सल्लागार आहेत. तसेच त्यांनी दत्तमंदिर ट्रस्टवर मागील पंचवार्षिक कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष व विश्वस्त म्हणूनही काम केले आहे.

ट्रस्टच्या कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे या विधी क्षेत्रात कार्यरत असून खजिनदार युवराज गाडवे हे काका हलवाई या सुप्रसिद्ध मिठाई दुकान मालिकांचे संचालक आहेत. गाडवे यांनी दत्तमंदिर ट्रस्टवर मागील पंचवार्षिक कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष व विश्वस्त म्हणूनही काम केले आहे. याशिवाय वीरशैव संस्था आदी अनेक सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत. ट्रस्टचे नवनियुक्त उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ हे पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असून उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई हे व्यावसायिक आहेत.

अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम होणार आहेत. मंदिराच्या धार्मिक रितीरिवाजांचे पालन करत असतानाच न्यासाच्या निधीचा अधिकाधिक विनियोग सामाजिक कायार्साठी करण्यात येणार आहे.

आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून काम करू पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी कनेक्टिंग ट्रस्टतर्फे जस्ट बिंग सेंटर पुणेच्या सहकार्याने माइंडफुलनेस बेस्ड अ‍ॅक्टिव्ह लिसनिंग (एमबीएएल) प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. १५ जून ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत १०० तासांहून अधिक कालावधीचे हे प्रशिक्षण आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी दिली.

विक्रमसिंह पवार म्हणाले, “भावनिक ताणतणाव, मानसिक आजारांना कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी, तसेच नैराश्य व आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करून मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्ट ही सामाजिक संस्था गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहे. पूर्णतः निःशुल्क सेवा देणारे चार प्रकल्प संस्थेचे प्रशिक्षित स्वयंसेवक राबवतात. आत्महत्या केलेल्या व्यक्तीविषयी हळहळ व्यक्त होतेच; पण त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांविषयी कणवही येते. सामान्य नागरिक म्हणून आपल्या मनात अशा व्यक्तींना, कुटुंबाना भावनिक आधार देण्याचा विचार येतो. अशा स्वयंसेवक होऊ इच्छिणाऱ्या गृहिणी, विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, निवृत्त लोक संस्थेसोबत स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. त्यांना हे काम करताना योग्य प्रशिक्षणाची गरज असते. ज्यामध्ये सल्ला न देता सुहृद भावनेने ऐकून घेणे (ऍक्टिव्ह लिसनिंग) याचे प्रशिक्षण दिले जाते. हे एक अनुभवात्मक प्रशिक्षण असून, त्यामध्ये स्वयंसेवकांना आवश्यक कौशल्ये आणि दृष्टिकोन दिला जातो. स्वयंसेवकांना स्वतःसाठी हा एक परिवर्तनकारी अनुभव असतो.”

“स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी, तसेच प्रशिक्षण वर्गात सहभाग नोंदवण्यासाठी व त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी ९८३४४०६०३३ वर संपर्क साधावा. तसेच कनेक्टिंग ट्रस्टतर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्व प्रकल्पाविषयी आणि सेवांविषयी अधिक माहितीसाठी www.connectingngo.org वेबसाइटला भेट द्यावी,” असे आवाहनही पवार यांनी केले.

ज्यांना मानसिक ताणतणाव आहे. मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. ज्यांचा घरात आत्महत्या झाली आहे किंवा आत्महत्येमुळे जे व्यक्ती बाधित आहेत. अशांना भावनिक आधार दिला जातो. त्याचबरोबर समाजातील विविध घटकांसोबत सातत्याने जनजागृती केली जाते. शाळकरी मुलांसाठी विशेष प्रकल्पांतर्गत त्यांचा वर्गामध्ये समवयस्क भावनिक आधार प्रणाली निर्माण करण्याचे कार्य केले जाते.

– विक्रमसिंह पवार, प्रकल्प समन्वयक, कनेक्टिंग ट्रस्ट