पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून काम करू पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी कनेक्टिंग ट्रस्टतर्फे जस्ट बिंग सेंटर पुणेच्या सहकार्याने माइंडफुलनेस बेस्ड अॅक्टिव्ह लिसनिंग (एमबीएएल) प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. १५ जून ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत १०० तासांहून अधिक कालावधीचे हे प्रशिक्षण आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी दिली.
विक्रमसिंह पवार म्हणाले, “भावनिक ताणतणाव, मानसिक आजारांना कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी, तसेच नैराश्य व आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करून मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्ट ही सामाजिक संस्था गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहे. पूर्णतः निःशुल्क सेवा देणारे चार प्रकल्प संस्थेचे प्रशिक्षित स्वयंसेवक राबवतात. आत्महत्या केलेल्या व्यक्तीविषयी हळहळ व्यक्त होतेच; पण त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांविषयी कणवही येते. सामान्य नागरिक म्हणून आपल्या मनात अशा व्यक्तींना, कुटुंबाना भावनिक आधार देण्याचा विचार येतो. अशा स्वयंसेवक होऊ इच्छिणाऱ्या गृहिणी, विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, निवृत्त लोक संस्थेसोबत स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. त्यांना हे काम करताना योग्य प्रशिक्षणाची गरज असते. ज्यामध्ये सल्ला न देता सुहृद भावनेने ऐकून घेणे (ऍक्टिव्ह लिसनिंग) याचे प्रशिक्षण दिले जाते. हे एक अनुभवात्मक प्रशिक्षण असून, त्यामध्ये स्वयंसेवकांना आवश्यक कौशल्ये आणि दृष्टिकोन दिला जातो. स्वयंसेवकांना स्वतःसाठी हा एक परिवर्तनकारी अनुभव असतो.”
“स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी, तसेच प्रशिक्षण वर्गात सहभाग नोंदवण्यासाठी व त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी ९८३४४०६०३३ वर संपर्क साधावा. तसेच कनेक्टिंग ट्रस्टतर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्व प्रकल्पाविषयी आणि सेवांविषयी अधिक माहितीसाठी www.connectingngo.org वेबसाइटला भेट द्यावी,” असे आवाहनही पवार यांनी केले.
ज्यांना मानसिक ताणतणाव आहे. मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. ज्यांचा घरात आत्महत्या झाली आहे किंवा आत्महत्येमुळे जे व्यक्ती बाधित आहेत. अशांना भावनिक आधार दिला जातो. त्याचबरोबर समाजातील विविध घटकांसोबत सातत्याने जनजागृती केली जाते. शाळकरी मुलांसाठी विशेष प्रकल्पांतर्गत त्यांचा वर्गामध्ये समवयस्क भावनिक आधार प्रणाली निर्माण करण्याचे कार्य केले जाते.
– विक्रमसिंह पवार, प्रकल्प समन्वयक, कनेक्टिंग ट्रस्ट