Home Blog Page 2973

दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा पुरवाव्‍यात -विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर

0

पुणे- दिव्‍यांग मतदारांना (पीपल विथ डिसअॅबिलीटी- पीडब्ल्‍यूडी) मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा उपलब्‍ध राहतील, याची खात्री करण्‍याच्‍या सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्‍या पूर्वतयारीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह उपस्थित होत्‍या.

            विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर जिल्‍हानिहाय निवडणूक तयारीचा आढावा घेतला. बैठकीत निवडणुकीशी संबंधित सर्व विषयांची माहिती, जिल्‍हा प्रशासनाची तयारी त्‍यांनी जाणून घेतली. ‘एकही मतदार सुटता कामा नये’, हे यंदाच्‍या निवडणुकीचे ब्रीदवाक्‍य असून सर्व पात्र मतदारांबाबत विशेषत: दिव्‍यांग मतदारांबाबत अधिक जागृत राहण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले. मतदान केंद्रांवर पिण्‍याचे पाणी, स्‍वच्‍छतागृह, रॅम्‍प, वीजेची सोय, दिव्‍यांग मतदारांना मतदान कक्षात जातांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती सुविधा उपलब्‍ध राहावी,असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

            निवडणूक काळात दारुचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, याकडे लक्ष वेधून डॉ. म्‍हैसेकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी जागरुक राहून कारवाई करावी, असे सांगितले. भरारी पथकासह इतर पथकांमध्‍ये समन्‍वय ठेवण्‍यावरही त्‍यांनी भर दिला. मतदान यंत्रआणि व्‍हीव्‍हीपॅटबाबत पोलीस विभागासह सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्‍ये प्रात्‍यक्षिके दाखवून जनजागृती करावी, शंकानिरसन करावे, अशा सूचना त्‍यांनी दिल्‍या. सी-व्‍हीजील अॅपवर येणा-या तक्रारींबाबत ताबडतोब कार्यवाही करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी आदेश मिळाल्‍यावर कार्यवाही करण्‍यापेक्षा सक्रिय राहून कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

            जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या सर्वच विभागांना आचार संहितेचे पालन करणे बंधनकारक असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. आदर्श आचार संहिता देशभर लागू असून रेल्‍वे, डाक विभाग, कृषी,बँका यांच्‍यासह शासकीय- निमशासकीय संस्‍थांनी आचार संहितेचे पालन करणे आवश्‍यक आहे. आचार संहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कार्यवाही होईल, असेही त्‍यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार-सर्वात जास्त मतदार ठाण्यात तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक

0

 

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची सर्वाधिक आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये सात लाख 35 हजार 597 एवढ्या महिला मतदारांची संख्या आहे. ठाणे मतदार संघात राज्यात सर्वाधिक सुमारे 23 लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून 12 लाख 60 हजारांहून अधिक पुरूष मतदारांची संख्या आहे.

राज्यात दि. 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. राज्यात चार कोटी 57 लाखांहून अधिक पुरूष मतदार असून चार कोटी सोळा लाखाहून अधिक महिला मतदार आहेत.

नऊ मतदारसंघ राखीव

नंदूरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

नागपूर, शिरूर,पुणे, बारामतीत 20 लाखांहून अधिक मतदार

मावळ मतदारसंघात सुमारे 22 लाखांहून अधिक, शिरूर 21 लाखांहून अधिक, नागपूर 21 लाखांहून अधिक, पुणे आणि बारामती प्रत्येकी 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

मुंबईतील मुंबई-उत्तर मतदारसंघात 16 लाखांहून अधिक मतदार असून मुंबई-उत्तर दक्षिण मतदारसंघात 16 लाख 98 हजार मतदार आहेत. तर मुंबई-उत्तर पूर्व मतदारसंघात 15 लाख 58 हजार मतदार आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात 16 लाख 48 हजार आणि मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात 14 लाख 15 हजार एवढे मतदार आहेत.

मतदारसंघनिहाय एकूण मतदारांची संख्या (सुमारे) : नंदूरबार-18 लाख 50 हजार, धुळे-18 लाख 74 हजार, जळगाव-19 लाख 10 हजार, रावेर-17 लाख 60 हजार, बुलढाणा-17 लाख 46 हजार, अकोला-18 लाख 54 हजार, अमरावती-18 लाख 12 हजार, वर्धा-17 लाख 23 हजार, रामटेक-18 लाख 97 हजार, भंडारा-गोंदिया-17 लाख 91 हजार, गडचिरोली-चिमूर-15 लाख 68 हजार, चंद्रपूर-18 लाख 90 हजार, यवतमाळ-वाशिम-18 लाख 90 हजार, हिंगोली-17 लाख 16 हजार, नांदेड-17 लाख, परभणी-19 लाख 70 हजार, जालना-18 लाख 43 हजार, औरंगाबाद-18 लाख 57 हजार, दिंडोरी-17 लाख, नाशिक-18 लाख 51 हजार, पालघर-18 लाख 13 हजार, भिवंडी-18 लाख 58 हजार, कल्याण-19 लाख 27 हजार, रायगड-16 लाख 37 हजार, अहमदनगर-18 लाख 31 हजार, शिर्डी-15 लाख 61 हजार, बीड-20 लाख 28 हजार, उस्मानाबाद-18 लाख 71 हजार, लातूर-18 लाख 60 हजार, सोलापूर-18 लाख 20 हजार, माढा-18 लाख 86 हजार, सांगली-17 लाख 92 हजार, सातारा-18 लाख 23 हजार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-14 लाख 40 हजार, कोल्हापूर-18 लाख 68 हजार आणि हातकणंगले-17 लाख 65 हजार.

 

झी युवावरील मालिकांमध्येही होणार, होळीच्या विविध रंगांची उधळण!!!

0

होळी म्हणजे जुने वादविवाद सोडून देऊन, रंगांची उधळण करण्याचा सण आहे. आपण विविध सण व उत्सव साजरे करत असतांना, मालिकांमध्येही हे सण साजरे होणे आता प्रेक्षकांसाठी नवीन नाही. निरनिराळ्या विषयांवर आधारित असलेल्या मालिकांमध्ये अग्रेसर असलेली झी युवा ही वाहिनी या होळीच्या उत्सवातही कुठेही मागे नाही. झी युवाच्या वेगवेगळ्या मालिकांमधून होळीचे आगळेवेगळे रंग आपल्याला पाहता येणार आहेत. ‘तू अशी जवळी राहा’, ‘वर्तुळ’ या मालिकांमध्ये मानवी स्वभावाचे व धुळवडीचे आगळे रंग पाहायला मिळतील. काही मालिकांमधील पात्रे, होळीच्या निमित्ताने कटकारस्थान रचताना दिसतील; तर काही मालिकांमधून धुळवडीचा रोमँटिक रंगदेखील पाहता येईल. ही होळी, या पात्रांच्या येणाऱ्या आयुष्यातील रंग कसे बदलते, हे पाहणे मनोरंजक ठरेल. एकंदरच एक रंगीबिरंगी होळी अनुभवण्याची संधी झी युवाच्या प्रेक्षकांना मिळणार आहे.

‘तू अशी जवळी राहा’ मालिकेतील राजवीर आणि मनवा यांचा रोमान्स धुळवडीच्या निमित्ताने रंगेल. रंग खेळण्याची इच्छा नसलेला राजवीर, मनवामुळे होळीच्या रंगामंध्ये कसा रंगून जातो, हे पाहायला विसरू नका.२२ मार्च ला संध्याकाळी ७ वाजता तर रात्री ९ वाजता लागणाऱ्या ‘वर्तुळ’ या मालिकेत सुद्धा होळीची धमाल अनुभवता येईल. तेजससाठी सोहाची होणारी चिडचिड, धुळवडीच्या दिवशी मीनाक्षीला कळणार असलेले विक्रमचे खरे रंग यांचा मिलाफ असलेली रंगांची उधळण पाहता येईल. प्रेम, राग, कपट अशा विविध रंगांनी भरलेले ही मालिकांमधील होळी पाहायला विसरू नका; फक्त आपल्या लाडक्या झी युवावर!!!! झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.

भाजपच्या बापटांना शह देण्यासाठी कॉंग्रेसकडून अरविंद शिंदे …

 
पुणे-भाजपच्या गिरीश बापटांची उमेदवारी निश्चित होत असताना दुसरीकडे कॉंग्रेस ने बापटांना लढत देण्यासाठी महापालिकेतील गट नेते अरविंद शिंदे यांची निवड केल्याचे वृत्त हाथी आले आहे . ‘अरविंद शिंदेंचे नाव आघाडीवर, पण संजय काकडेंसाठी दरवाजे खुले ‘ या शीर्षकाखाली २२ नोव्हेंबर २०१८  रोजी ‘मायमराठी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते .
२२ नोव्हेंबर २०१८ रोजी मायमराठी ने प्रसिद्ध केलेले वृत्त
आता हे दरवाजे खुले असतानाही काकडे यांना माघारी वळविण्यात भाजपचे अंतर्गत राजकारण यशस्वी झाल्याचे मानले जाते आहे.पुणे जातीयवादापासून दूर राहणारे शहर आहे असे मानले तर, हि लढत ब्राम्हण विरुद्ध मराठा अशी होणार नाही, तर ती पक्षाची धोरणे ,नरेंद्र मोदी आणि गांधी घराणे ,तसेच उमेदवारांची कार्यपद्धती अशा मुद्द्यांवर होण्याची शक्यता वर्तविली  जाते आहे.
पुणे लोकसभेसाठी अद्याप दोन्ही पक्षांनी अधिकृतरित्या आपापले उमेदवार जाहीर केलेले नाहीत पण रोजच्या बदलत्या राजकीय वातावरणाची चाहूल मात्र लागते आहे. सलून वाल्यापासून ते सोने चांदी विक्री करणाऱ्या सराफा पर्यंत वेगवेगळ्या मंदिरांपासून ते थेट अजमेरच्या दर्ग्या पर्यंत पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत यश मिळावे या साठी गेली वर्षभर राबलेल्या काकडे यांनी, घेतलेली मेहनत आता बापटांच्या पथ्यावर पडणार काय ? हा खरा प्रश्न आहे .
बापट विरुद्ध अरविंद शिंदे अशी सरळ लढत होईल असे मानले तर १९९८ च्या सुरेश कलमाडी विरुद्ध विठ्ठल तुपे पा. अशा लढतीची आठवण कार्यकर्त्यांना होऊ शकेल . सध्या बापटांच्या पाठीशी भाजप सेना युतीच्या 100 हून अधिक नगरसेवकांची फौज उभी राहील .आणि सात  हि आमदार त्यांच्या पाठीशी राहतील तर शिंदे यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा आधार मिळणार आहे.या दोन्ही पक्षांचे मिळून महापालिकेत ५० नगरसेवक आहेत .आमदार मात्र कोणी नाही .कॉंग्रेसचे विठ्ठल तुपे आणि विकास आघाडीचे सुरेश कलमाडी यांच्यात झालेल्या लढतीत तुपे पाटील 1 लाख ७० हजार मतांनी विजयी झाले होते .तेव्हा हि कॉंग्रेस ची महापालिकेतील नगरसेवकांची संख्या अत्यल्प होती. भाजप सेना आणि विकास आघाडीचे सुमारे ७० नगरसेवक कलमाडींच्या पाठीशी होते तर कॉंग्रेस चे अवघे 9 ते 10 नगरसेवक विठ्ठल तुपे पाटील यांच्या पाठीशी असताना पाटलांनी हा घवघवीत विजय मिळविला होता . याची पुनरावृत्ती आता होऊ शकेल काय  यावर मंथन होऊ शकणार आहे
बॅरीस्टर विठ्ठलराव गाडगीळ ,अण्णा जोशी अशा ब्राम्हण समाजाच्या खासदारांनंतर बऱ्याच कालावाधीनंतर प्रथमच ब्राम्हण समाजातील बापट लोकसभेच्या रिंगणात आले आहेत. हा समाज एकसंघ त्यांच्या पाठीशी राहील आणि या शिवाय अन्य समाजातील मतदार वळतील अशी मंडळी पक्षाने त्यांच्या सोबत दिली आहेत .मात्र  बापटांची एक खासियत अशी हि आहे कि त्यांनी कायम वरिष्ठ स्तरावरील नागरिकांशी आपला सुसंवाद ठेवला.हि मंडळी निश्चित त्यांच्या पाठीशी राहतील . पण सामान्य मतदार ,सामान्य माणूस ते आपल्याकडे आता तरी आकर्षित करतील काय ? केलाच तर कशा पद्धतीने करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर अरविंद शंदे  यांचा संपर्क जास्तीत जास्त बहुसमावेशक असा आहे .त्यांना निवडणुकीसाठी मिळणारी रसद तशी बापटांच्या तुलनेत लक्षवेधी नाही . महापालिकेच्या सभागृहात भाजपचे बहुमत असतानाही त्यांनी प्रकर्षाने मांडलेली आपली मते ,विशेष हतोटीने करवून घेतलेली विकास कामे, चव्हाट्यावर आणलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे ,आणि हि प्रकरणे  रोखण्यासाठी केलेल्या कौशल्यपूर्ण यशस्वी हालचाली हि अरविंद शिंदेंची खासियत बहुसंख्य लोकप्रतिनिधी ,माध्यमे आणि काही प्रमाणात पुणेकर जाणून आहेत .राहुल गांधी ,प्रियांका गांधी यांच्या प्रत्येकी रॅली सह एक एक सभा तरी त्यांना विजया साठी घेणे आवश्यक ठरणार आहे .रमेश बागवे  यांचे कट्टर समर्थक ,अविनाश बागवेंचे पालिकेतील सहकारी अशी ओळख असल्याने बहुजन दलित वर्ग त्यांच्या पाठीशी राहील असे दिसते आहे.

सिस्काने दाखल केली पॉवर व्हॉल्ट 200 पॉवरबँक

मुंबई– सिस्का अॅक्सेसरीज या मोबाइल अॅक्सेसरीजमधील आघाडीच्या आणि वायरलेस स्पीकर, वायरलेस हेडसेट, ब्लुटूथ इअरफोन, कार चार्जर्स व विविध प्रकारच्या पॉवरबँक उपलब्ध करणाऱ्या कंपनीने सिस्का पॉवर व्हॉल्ट 200 पॉवरबँक दाखल केल्याचे आज जाहीर केले आहे. ही पॉवरबँक फ्लिपकार्ट या भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स साइटवर 16 मार्च रोजी, 1299 रुपये या सुरुवातीच्या किमतीला उपलब्ध केली जाणार आहे. सिस्का पॉवर व्हॉल्ट 200 ही बहुपयोगी पॉवरबँक असून ती काळ्या व पांढऱ्या रंगामध्ये मिळेल आणि त्यामध्ये मोठी ग्रेड A+ 20000 mAh लिथिअम पॉलिमर बॅटरी आहे.

सिस्का व फ्लिपकार्ट यांची सक्षम भागीदारी निर्माण झाली असून, सिस्का समूह फ्लिपकार्टद्वारे आपल्या मोबाइल अॅक्सेसरीजची आणि पर्सनल केअर उत्पादनांची विक्री करते. या भागीदारीमुळे सिस्काला ऑनलाइन सक्षम व्यवसाया उभारण्यासाठी मदत होणार आहे. कारण, लिथिअम पॉलिमर पॉवरबँक या अत्याधुनिक पॉवरबँक असून त्यामुळे या श्रेणीला ऑनलाइन वाढ साधणे शक्य होणार आहे.

यानिमित्त बोलताना, सिस्का समूहाचे कार्यकारी संचालक गुरूमुख उत्तमचंदानी यांनी सांगितले, “‘सिस्का पॉवर व्हॉल्ट 200 पॉवरबँक या आमच्या महत्त्वाच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी फ्लिपकार्टशी भागीदारी करताना अतिशय आनंद होत आहे. कोणतेही नवे उत्पादन दाखल करण्यापूर्वी आम्ही सिस्कामध्ये सखोल संशोधन करतो. त्यासाठी आमच्याकडे सुसज्ज व प्रगत संशोधन व विकास प्रयोगशाळाही उपलब्ध आहे. सिस्काच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडणारे प्रत्येक उत्पादन हे गुणवत्ता व विश्वासार्हता या बाबतीत कठोर चाचण्या केलेले असते. तसेच, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत असल्याने व तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत असल्याने, पॉवरबँक क्षेत्र झपाट्याने वाढते आहे.

फ्लिपकार्टमधील इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीजचे संचालक राकेश कृष्णन यांनी सांगितले, “ग्राहकांच्या गरजांना अनुसरून असलेली नवी इलेक्ट्रॉनिक्स त्यांना उपलब्ध करून देणे, हे फ्लिपकार्टमध्ये आमचे उद्दिष्ट आहे. आटोपशीर, पोर्टेबल व जलद पॉवरबँक हवी असणाऱ्या टेक-सॅव्ही ग्राहकांसाठी सिस्काची नवी पॉवर व्हॉल्ट 200 पॉवरबँक हे आदर्श उत्पादन आहे. सिस्का या देशातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडबरोबर असलेली आमची भागीदारी कायम राखताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही एकत्रितपणे ग्राहकांना सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत.”

सिस्का पॉवर व्हॉल्ट 200 पॉवरबँकची वैशिष्ट्ये:

हाय डेन्सिटी पॉलिमर सेल चार्जिंगसाठी दीर्घकाळ वापर करता यावा, या हेतूने सिस्का पॉवर व्हॉल्ट 200 पॉवरबँकमध्ये ग्रेड A+ 20000mAh हाय-डेन्सिटी लिथिअम पॉलिमर बॅटरी वापरली आहे.

विशेष करंट शंट या उत्पादनामध्ये विशेष करंट शंटिंग सिस्टीम असून, त्यामुळे कनेक्टेड डिव्हाइस टप्प्याटप्प्याने चार्ज केले जाते. पॉवरबँक स्वतः चार्ज होत असताना व त्याच वेळी इतर उपकरणांना ऊर्जा देत असताना, बिल्ट-इन इंटलिजंट सर्किट कंट्रोल करंट शंट करू शकते. यामुळे, एकाच वेळी एकाहून अधिक उपकरणे चार्ज करणे, तसेच सर्व उपकरणे एकसारख्या प्रकारे व जलद वेगाने चार्ज होत असल्याची खात्री केली जाते.

ओव्हरचार्जिंग व डिस्चार्ज यापासून संरक्षण बिल्ट-इन ओव्हरचार्जिंग व डिस्चार्ज सिस्टीममुळे पॉवर व्हॉल्ट 200च्या बॅटरीमधून चार्जिंग नाहीसे होणार नाही किंवा त्यावर ताण येणार नाही, याची काळजी घेतली जाते. यामुळे, पॉवरबँकमध्ये साठवलेली ऊर्जा कार्यक्षमपणे वापरली जाते आणि प्रत्येक चार्जनुसार त्याचा वापर वाढत जातो.

इंटलिजंट मल्टि-प्रोटेक्शन सर्किट्सपॉवर व्हॉल्ट 200 चार्ज होत असताना, तसेच त्यातील रिचार्ज अन्य उपकरणांमध्ये जात असताना,  त्यातील इंटलिजंट सर्किट सिस्टीम संरक्षण करते.

दीर्घ टिकणारी बॅटरी सिस्का पॉवर व्हॉल्ट 200 मुळे तुम्हाला 500 पटींपर्यंत चार्ज / डिस्चार्ज सायकल मिळतील. पल्स विड्थच्या मॉड्युलेशनमुळे बदल करून, बॅटरी दीर्घ काळ टिकावी म्हणून, रिचार्जिंगसाठीच्या विजेचा वापर पॉवरबँक कमी करू शकेल.

बॅटरी लेव्हल इंडिकेटरपॉवर व्हॉल्ट 200 वरील डिजिटल डिस्प्लेमुळे तुम्हाला पॉवरबँक नेमकी किती चार्ज आहे, ते पाहण्यासाठी मदत होते. त्यासाठी टक्केवारी दाखवली जाईल. यामुळे, पॉवरबँक केव्हा रिचार्ज करायची आहे, हे आधीच समजू शकेल.

मल्टिपल कनेक्टर्स व मल्टि-डिव्हाइस कम्पॅटेबिलिटी पॉवर व्हॉल्ट 200 मध्ये 2 स्टँडर्ड यूएसबी, इनपुटसाठी एक मायक्रो यूएसबी आणि इनपुट व आउटपुट यासाठी एक यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. हे उत्पादन लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, गेमिंग कन्सोल, आयपॉड, एमपी3/एमपी4 प्लेअर्स, टॅब्लेट, पीडीए, ब्लुटूथ स्पीकर, हेडफोन, अँड्रॉइड किंवा आयफोन अशा विविध उत्पादनांसाठी साजेसे आहे.

6 महिने वॉरंटी पॉवर व्हॉल्ट 200 ला सदोष उत्पादनाच्या संदर्भात 6 महिने वॉरंटी मिळते. उत्पादन खरेदी केल्याच्या तारखेपासून वॉरंटी सुरू होईल.

सिस्का समूह एलईडी दिवे, पर्सनल केअर अप्लायन्सेस, मोबाइल अॅक्सेसरीज, वायर्स व केबल आणि स्मार्ट होम प्रोडक्ट्स अशी विविध उत्पादने पुरवणारा आघाडीचा एफएमसीजी समूह असून, ही उत्पादने इतरांच्या तुलनेत कमालीची आघाडीवर आहेत. ग्राहकांच्या सातत्याने बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी सातत्याने नवी व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान-प्रणित उत्पादने सादर करत असते.

सिस्का अॅक्सेसरीजविषयी

आज, जगभर सर्वजण एकमेकाशी जोडले गेलेले आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये उपकरणांचे स्थान अविभाज्य बनले आहे. सिस्का अॅक्सेसरीजने अधिकाधिक चांगला अनुभव देण्यासाठी विशेष अशा आधुनिक अॅक्सेसरीज निर्माण केल्या आहेत. वायरलेस स्पीकर्सपासून हेड सेटपर्यंत, सिस्का अॅक्सेसरीज आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च गुणवत्तेच्या बाबतीतील नवीन्य व सुलभ वापर उपलब्ध करते. सिस्का अॅक्सेसरीज उत्पादने अत्यंत दर्जेदार आहेत व माफक दरामध्ये मिळतात. सिस्का अॅक्सेसरीज जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड व ई-कॉमर्स सुविधांवर उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्टविषयी

फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ असून नोंदणीकृत ग्राहकवर्ग 15 कोटीहून अधिक आहे. 2007 मध्ये दाखल करण्यात आलेल्या फ्लिपकार्टने लाखो ग्राहक, विक्रेते, मर्चंट व लहान व्यवसाय यांना भारतातील ई-कॉमर्स क्रांतीचा एक भाग बनण्यासाठी सक्षम केले आहे. 100,000 हून अधिक नोंदणीकृत विक्रेते असणाऱ्या फ्लिपकार्टकडे स्मार्टफोन, पुस्तके, मीडिया, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, फॅशन व लाइफस्टाइल अशा 80+ श्रेणींमध्ये 8 कोटीहून अधिक उत्पादने आहेत. फ्लिपकार्ट कॅश ऑन डिलेव्हरी, नो कॉस्ट ईएमआय व इझी रिटन्स अशा ग्राहक-केंद्री नावीन्यपूर्ण सेवांची प्रवर्तक म्हणून ओळखली जाते. या सेवांमुळे लाखो ग्राहकांना ऑनलाइन खरेदी सहजशक्य व किफायतशीर झाली आहे.

तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत खार जिमखाना संघाचा सलग तिसरा विजय

0

पुणे,- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत खार जिमखाना संघाने अनुक्रमे फायर बॉल व क्यू क्लब किलर्स या संघांचा पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात पहिल्या सामन्यात खार जिमखाना संघाने फायर बॉल संघाचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात खार जिमखानाच्या स्पर्श फेरवानी याने फायर बॉल संघाच्या नितीन भोसलेचा 42-06, 69-16, 57-12 असा तर, खार जिमखानाच्या रिषभ ठक्करने पियुश लिंबाडचा 39-15, 62-16, 52-22 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.खार जिमखानाच्या ईशप्रित चड्डा सामन्यास उपस्थित राहू न शकल्यामुळे फायर बॉलच्या अमेय काळेकरला पुढे चाल देण्यात आली. ब गटात विग्नेश संघवी, दिनेश महाटनी, सुरज राठी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पूना क्लब अ संघाने डेक्कन रुकीज संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून शानदार सुरुवात केली.

ड गटात क्यू क्लब वॉरियर्स संघाने एसआरके मास्टर्स संघाचा 2-1 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. विजयी संघाकडून अल्तमेश सैफी, शाहबाज खान यांनी सुरेख कामगिरी केली. फ गटात आकाश पाडाळीकर, सतीश कराड यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर क्यू मास्टर्स अ संघाने डेक्कन प्रोफेशनल्स संघाचा 2-1असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. इ गटाच्या लढतीत डेक्कन रायनोज संघाने ठाणे टायगर्सला 2-1 असे पराभूत केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी:
गट अ: खार जिमखाना वि.वि.फायर बॉल 2-1(स्पर्श फेरवानी वि.वि.नितीन भोसले 42-06, 69-16, 57-12; ईशप्रित चड्डा पुढे चाल वि.अमेय काळेकर; रिषभ ठक्कर वि.वि.पियुश लिंबाड 39-15, 62-16, 52-22);

गट अ: खार जिमखाना वि.वि.क्यू क्लब किलर्स 2-1(रिषभ ठक्कर वि.वि.अमरदीप घोडके 28-40, 65-10, 35-31, 51-43; स्पर्श फेरवानी वि.वि.प्रसाद पराडे 45-07, 72-22, 42-15; ईशप्रित चड्डा पुढे चाल वि.विशाल रजनी);

गट ब: आरसीबीसी वि.वि.पीवायसी जायंट्स 2-1(जॉनी केन वि.वि.रोहित नारगोलकर 42-05, 72-38, 37-18; वेदांत जोशी वि.वि.अरुण बर्वे 41-29, 39-67, 32-55, 65-40, 35-20; आशिष पटेल पराभूत वि.सलील देशपांडे 10-49, 16-64, 01-47);

गट ब: पूना क्लब अ वि.वि.डेक्कन रुकीज 3-0(विग्नेश संघवी वि.वि.आश्विन पळणीतकर 50-08, 78-28, 40-25; दिनेश महाटनी वि.वि.उदय पुंडे 11-37, 55-48, 39-23, 67-49; सुरज राठी वि.वि.राजेंद्र आढाव 34-23, 51-44, 54-09);

गट इ: डेक्कन रायनोज वि.वि.ठाणे टायगर्स 2-1(विठ्ठल ढमाले वि.वि.कुणाल रोकडे 48-07, 70-46, 14-40, 68-31; संतोष धर्माधिकारी वि.वि.जयेश चौधरी 33-15, 28-68, 21-34, 64-16, 46-14; प्रशांत पवार पराभूत वि.जीत ठाकूर 36-08, 42-49, 05-50, 24-74);

गट ड: क्यू क्लब वॉरियर्स वि.वि.एसआरके मास्टर्स 2-1(अल्तमेश सैफी वि.वि.वाहीद बुर्खपोश 39-22, 70-69, 33-08; विरेन शर्मा पराभूत वि.मोहम्मद सलमान 24-30, 09-100(50), 16-36; शाहबाज खान वि.वि.कृष्णराज अरकोट 26-49, 57-25, 43-01, 55-33);

गट फ: क्यू मास्टर्स अ वि.वि.डेक्कन प्रोफेशनल्स 2-1(आकाश पाडाळीकर वि.वि.समर खंडेलवाल 10-44, 58-44, 28-39, 64-33, 38-09; सतीश कराड वि.वि.सुशील ढोंसाळे 46-20, 61-10, 33-22; सिद्धार्थ टेंबे पराभूत वि.अरांता सँचेस 23-50, 54-16, 31-38, 67-69).

बापटांना आव्हान देणारा उमेदवार कोण ?

पुणे-भाजपकडून आतापर्यंत तरी गिरीश बापट यांची उमेदवारी निश्चितीची खात्री मिळते आहे आणि बापटांनी त्यांच्या परीने प्रचार हि सुरु केला आहे, पण बापटांना खरे आव्हान होते ते, सामान्यांत मिसळणाऱ्या संजय काकडे यांचे . पण काकडे वर्षा बंगल्यावर गेले आणि तिथून कॉग्रेसच्या गोटातून हुतुतू सुरु झाली असावी असे दिसते आहे. नाही तर एव्हाना काकडे यांचा पक्षप्रवेश होवून बापटांना त्यांनी तगडे आव्हान ही पुढे उभे केले असते .पण निष्ठा कि व्यवहार्यता यातून बाहेर पडलेल्या कॉंग्रेसपुढे संदिग्ध्तेचे वातावरण निर्माण करण्यात भाजपला यश आले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून काकडे यांचे नाव कॉंग्रेसच्या गोटातून दूर होत चालल्याचे समजते आहे . तर दुसरीकडे प्रचारास कमी अवधी राहिल्याने ओरडा सुरु झाला आहे . अशा कैचीत कॉंग्रेसची मान अडकविण्यात भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना सध्या तरी यश आले आहे.या पार्श्वभूमीवर आता अरविंद शिंदे कि मोहन जोशी या नावात लढत सुरु झाल्याचे दिसते आहे .
पुण्यातून कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी लढत होईल असे मानले जाते .भाजपची उमेदवारी बापटांसारख्या जुन्या, मातब्बर नेत्याला दिली गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उमेदवारी निश्चित होताच बापटांनी सर्वप्रथम बड्या बड्या लोकांसाठी गेट टुगेदर ठेवले .नगरसेवक हि त्यात होते .आता कॉंग्रेसचीच उमेदवारी लटकून पडली आहे. बापटांना शह देण्यासाठी मराठा उमेदवार ,तरुण उमेदवार ,महापालिकेचे सभागृह अभ्यासू पद्धतीने गाजवणारा उमेदवार म्हणून शिंदे यांचे नाव आघाडीवर असू शकते .तर ज्येष्ठ,निष्ठावंत म्हणून मोहन जोशी यांचे नाव घेतले जाते . अभय छाजेड देखील रेस मध्ये आहेतच .राष्ट्रवादीने प्रवीण गायकवाड यांचे नाव पुण्याच्या उमेदवारीसाठी पुढे केले असले तरी एव्हाना ते हि मागे पडले आहे. त्यामुळे आजमितीला तरी शिंदे कि जोशी यावर कॉंग्रेस ची गाडी अडून पडली असावी असे दिसते आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे स्वतः या रेस मध्ये नाहीत पण जर त्यांना उमेदवारी मिळाली तर ते देखील बापटांना शह देवू शकतात असे चित्र आहे…..

शंभर हून अधिक नगरसेवकांचे बळ बापटांच्या पाठीशी ? …पहा फोटो …

 

(राजकारणात अखेरच्या क्षणापर्यंत कधी काय होईल सांगता येत नाही , पक्षाची दोघा-दोघांना अधिकृत उमेदवारी ऐनवेळी दिल्याचे प्रकार हि यापूर्वी दिसून आलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत पक्ष अधिकृत उमेदवारी देत नाही तोपर्यंत राजकीय वर्तुळातील वातावरणाच्या या बातम्या वाचकांनी आपपल्या परीने विचारात घ्याव्यात.mymarathi.net)

 

गिरीश बापटच पुणे लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार…

0

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावावर ४ दिवसांपूर्वीच शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे .त्यानंतर बापट यांनी पुण्यात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या निवडक लोकांशी एका बड्या हॉटेलात स्नेहभोजन कार्यक्रम केल्याचे कळते.  येणाऱ्या दोन दिवसांत बापटांच्या  नावाची घोषणा होण्याची चिन्हे आहेत.विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना टाळून बापटांच्या नावाला  राज्याच्या निवड मंडळातील पक्षनेत्यांनी कौल दिल्याची माहिती येथे मिळते आहे.याबाबत शिरोळे यांना संपर्क करूनही ते आता यावर बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते.मात्र अशीच स्थिती २०१४ ला हि झाली होती त्यावेळीही बापटांनी सर्व तयारी केली होती आणि ऐन वेळी शिरोळे यांना उमेदवारी दिली गेली .आता शिरोळे यांचा पर्फोर्मान्स पाहूनचं त्यांना नाकरले जातेय असा दावा केला जातोय .

राज्यातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे पक्षाच्या मुख्य कार्यालयात बैठक नुकतीच झाली. बरेच तास ही बैठक चालली. राज्यातील बहुतांश मतदारसंघातील उमेदवार या नेत्यांनी बैठकीत निश्चित केल्याचे सांगण्यात आले.खुद्द बापट या दिवशी दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांच्याशी या समितीने चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुपारी चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यांचा क्रमांक रात्री उशिरा आला. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तेथेच त्यांना उमेदवारीसाठी `ग्रीन सिग्नल` मिळाला.बापट यांच्या नावाचा विशेष आग्रह नितीन गडकरी यांनी धरल्याचे समजते. बापट यांचे नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यापूर्वी सर्व संबंधितांना विश्वासात घेण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.प्रदेश भाजपने तब्बल सहा नावे पुण्यासाठी सुचविली होती. त्यात बापट, विद्यमान खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले हे नेहमीच्या चर्चेतील नावे होतीच. तसेच नवीन चेहरा म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचेही नाव सुचविले होते. इतर दोन नावे मात्र आश्चर्य व्यक्त करावी, अशी होती. त्यात निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांचा समावेश होता. मुळे यांची वरिष्ठ भाजप नेत्यांकडे उठबस गेल्या महिन्यांत उठबस वाढली होती. त्याचाच परिणाम म्हणून मुळे यांचे नाव यादीत होते.

दुसरे नाव हडपसर येथील भाजप नेते विकास रासकर यांचे होते. रासकर हे खरेतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदार आहेत. तरीही त्यांचे नाव पुण्याच्या यादीत होते.  खुद्द रासकर हे पुणे नव्हे तर शिरूरमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. शिरूर हा शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी बारामतीसाठी आग्रह धरला आहे. तरीही त्यांचे नाव पुण्याच्या यादीत होते.या साऱ्या नावांतून बापट यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. बापट यांनी 1996 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात ते काॅंग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांच्याविरोधात पराभूत झाले होते. ते 2014 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून लोकसभेवर जाण्याच इच्छुक होते. तेथे त्यांना डावलून शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. आता बापट यांची जुनी इच्छा पूर्ण करण्याचे पक्षाने ठरविल्याचे दिसून येते आहे.

(राजकारणात अखेरच्या क्षणापर्यंत कधी काय होईल सांगता येत नाही , पक्षाची दोघा-दोघांना अधिकृत उमेदवारी ऐनवेळी दिल्याचे प्रकार हि यापूर्वी दिसून आलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत पक्ष अधिकृत उमेदवारी देत नाही तोपर्यंत राजकीय वर्तुळातील वातावरणाच्या या बातम्या वाचकांनी आपपल्या परीने विचारात घ्याव्यात.mymarathi.net)

गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाच्या नोंदणी व प्रशिक्षण वर्गाला सुरुवात

0

नव्या बॅचची सुरुवात ४ एप्रिल पासून

  • समर कॅम्प व वार्षिक प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी येत्या २३ व २४ मार्च रोजी
  • गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचे प्रशिक्षण केंद्र हे डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शास्त्री नगर, येरवडा, पुणे येथे
  • प्रशिक्षण ४ एप्रिल पासून सुरु होणार
  • पूर्व नोंदणीसाठी संपर्क साधा : व्हाट्सअप क्रमांक- ९११२२९५५६६

पुण्यातील जागतिक दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या उद्येशानी गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाची सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे नामांकित खेळाडू असलेले गॅरी कर्स्टन यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पहिले आहे. विश्वचषक २०११ मध्ये भारतीय क्रिकेट संघच्या विजयामध्ये यांचा देखील मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाच्या जबाबदारी नंतर कर्स्टन यांनी आपले लक्ष कोचिंगच्या क्षेत्राकडे वळवले आहे.

गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाच्या समर कॅम्प व वार्षिक प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी येत्या २३ व २४ मार्च रोजी करण्यात येणार आहे.  त्याचे प्रशिक्षण ४ एप्रिल पासून सुरु होणार आहे. समर कॅम्प, वार्षिक प्रशिक्षण, शनिवार- रविवार प्रशिक्षण, वैयक्तिक प्रशिक्षण व सांघिक प्रशिक्षण याची नाव नोंदणी या दरम्यान करण्यात येणार आहे. या क्रिकेट प्रशिक्षणामध्ये ४ वर्षापुढील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचे प्रशिक्षण केंद्र हे डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शास्त्री नगर, येरवडा, पुणे येथे असणार आहे.

यावेळी गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO), श्री. आनंद मित्तल व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर(COO), मुख्य प्रशिक्षक श्री. रायन व्हॅन निकर्कं उपस्थित होते.  याप्रशिक्षणा मध्ये प्रशिक्षक म्हणून उपेन्द्र कुलकर्णी व महेश हटकर यांचा समावेश असणारा आहे.

याप्रसंगी बोलताना श्री. आनंद मित्तल म्हणाले की “ पुणे व पुण्याच्या जवळील शहरांमध्ये अनेक उत्तम खेळाडू आहेत. यातील अनेकांनी राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्तरावर आपली कीर्ती स्थापित केली आहे. असेच खेळाडूना अंतराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन घडवण्याचा गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचा महत्वाचा उद्येश आहे.” तसेच ते म्हणाले की “एका वेळी १ हजार खेळाडू क्रिकेट प्रशिक्षण घेऊ शकतील इतक्या क्षमतेचे मैदान येथे उपलब्ध आहे.”

श्री. रायन व्हॅन निकर्कं  म्हणाले की, “आमच्याकडे अनेक सुप्रसिद्ध प्रशिक्षण कार्यक्रम व उत्तम प्रशिक्षक पद्धती आहेत. आम्ही भारतातील तरुण खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षक देण्यासाठी येथे आहोत. तसेच आम्ही आमच्या प्रशिक्षकांना जगभरातील क्रिकेटचे आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान देण्यासाठी गुंतवूक करत आहोत. प्रत्येक खेळाडूवर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न असतो.“ असे ते म्हणाले.

प्रशिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे

  • रायन व्हॅन निकर्कं यांच्या कडून वैयक्तिक प्रशिक्षण:- हे सत्र सोमवार ते शुक्रवार असणार आहे. यात दुपारी ४ ते संध्याकाळी ७ या वेळेत प्रत्येकी एका तासाच्या ३ बॅच घेतल्या जातील.
  • समर कॅम्प:- हे सत्र सोमवार ते शुक्रवार असणार आहे. यात सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते ७ यावेळेत प्रत्येकी दीड तासाच्या ४ बॅच घेतल्या जातील. यामध्ये प्रत्येक सत्रात १५० खेळाडू नाव नोंदणी करू शकतात. याचा पहिला कॅम्प एप्रिल मध्ये तर दुसरा मे महिन्यात असणार आहे.
  • शनिवार- रविवार (विकेंड) प्रशिक्षण:- सहा महिन्याचा कालावधी असलेले हे सत्र शनिवार ते रविवार असणार आहे. यात सकाळी ७ ते ९ व दुपारी ४ ते ६ यावेळेत प्रत्येकी दोन तासाच्या २ बॅच घेतल्या जातील.
  • वार्षिक प्रशिक्षण व सहामाई प्रशिक्षण:- हे सत्र सोमवार ते शुक्रवार असणार आहे. यात दुपारी ४ ते संध्याकाळी ८.३० या वेळेत प्रत्येकी दीड तासाच्या ३ बॅच घेतल्या जातील.

खेळाडू ,दिव्यांगांचे प्रशिक्षक ,सामाजिक कार्यकर्त्यांचा होणार गौरव

0
डॉ .कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत ४ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन 
पुणे :’म्हाळूपार्वती प्रतिष्ठान’ च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त  आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभागी झालेले पुण्यातील दिव्यांग खेळाडू ,दिव्यांग खेळाडूंचे  प्रशिक्षक ,सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे .
‘युक्रांद ‘चे संस्थापक ,माजी आमदार डॉ .कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत ४ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम पंडित भीमसेन जोशी कलादालन ,औंध ,पुणे येथे ४ एप्रिल ४ वाजता होणार आहे .
प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . कार्य्रक्रमाच्या नियोजनासाठी प्रतिष्ठानची नुकतीच  बैठक झाली . या बैठकीला निलेश निकम ,प्रकाश निकम ,पूनम हेंद्रे ,डॉ . संजय जोशी ,विलास निकम ,बबन निकम ,शैलेश हेंद्रे ,विशाल सुर्वे ,बाळासाहेब हेंद्रे ,अतुल जोशी ,श्रद्धा जोशी उपस्थित होते .
कार्यक्रमाला डॉ कुमार सप्तर्षी ,माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार ,अभिनेते प्रसाद सुर्वे ,मिलिंद शंभरकर (समाज कल्याण विभागाचे आयुक्त ),नितीन ढगे (अपंग कल्याण विभागाचे उपायुक्त ),दत्ता साने (विरोधी पक्षनेते ,पिंपरी -चिंचवड मनपा ),राजेंद्र गोळे (जिल्हा अधीक्षक ,भूमी अभिलेख विभाग ) हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .
 याच कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्यरत  शाळांना बॅटरी वरील ध्वनिक्षेपण यंत्रणा ,खेळाडूंना मोबाईल संच ,ट्रॅक सूट ,बॅग ,प्रथमोपचार पेटी ,सन्मानचिन्ह असा संच भेट दिला जाणार आहे .

अजित दादांची मावळातून झुंज ..पक्षासाठी आणि मुलासाठीही …

0

पुणे -कोणाच्या मुलाने काय व्हावे हे खरे तर समाजाने ठरविण्याचे काम नाही .हे ठरवितात ते ,तो मुलगा आणि त्याचा पिता ,माता … आता अजितदादा पवार यांचा पुत्र पार्थ राजकीय करिअरला प्रारंभ करतोय आणि अर्थात पित्याच्या दृष्टीने मुलाची भरारी त्याला मिळणारे मार्ग योग्य कसे असतील ,तो फसणार कसा नाही या सर्व बाबी महत्त्वाच्याच असणार ..अशीच झुंज प्रत्येकाला द्यावी लागते आणि आता ती अजित पवारांनाही द्यायची आहे . मावळात जिथे १० वर्षे शिवसेनेचे खासदार आहे,राष्ट्रवादीचा पराभव झालेला आहे तिथून आपल्या मुलाच्या करिअरची आणि पक्षाला ताकद देण्याची शर्थ अजित पवारांना करावी लागते आहे. म्हणजेच एका दगडात २ पक्षी मारण्याची किमया जणू ते साधू पाहत आहेत . शिवसेनेच्या ताब्यातून मावळ काढून घेणे आणि पार्थ च्या करिअरची सुरुवात यशस्वीरीत्या सुरु करणे. यात त्यांना यश किती येणार ते निकालानंतरच समजणार आहे. 

काय सांगतो मावळचा कल?

2009

गजानन बाबर (शिवसेना) 3,64,857
आझम पानसरे (राष्ट्रवादी) 2,84,238

2014

श्रीरंग बारणे (शिवसेना) 5,12,226
लक्ष्मण जगताप (शेकाप) 3,54,829

मावळ लाेकसभा मतदारसंघात पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी ३ विधानसभा मतदारसंघांचा समावेश हाेताे. यापैकी २ आमदार शिवसेनेचे, ३ भाजपचे तर एक राष्ट्रवादीचा अाहे. १० वर्षांपासून येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे. पुनर्रचनेनंतर मावळ मतदारसंघात २००९ मध्ये गजानन बाबर तर २०१४ मध्ये श्रीरंग बारणे यांनी येथील प्रतिनिधित्व केले. यंदाही बारणे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार हे निश्चित. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी या वेळी मावळ मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची करत आपले पुत्र पार्थ यास निवडणुकीत उतरवले आहे. उमेदवार पार्थ असला तरी ही लढत अजित पवार विराेधात शिवसेना अशीच हाेईल, यात शंका नाही.

राज्यात युती सरकार सत्तारूढ हाेईपर्यंत पिंपरी-चिंचवड परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हाेता. मात्र भाजपने त्याला सुरुंग लावत पुणे व पिंपरीची महापालिका ताब्यात घेतली. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते व २०१४ मध्ये भाजपत आलेले लक्ष्मण जगताप चिंचवडचे आमदार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात २५ वर्षांपासून भाजपचाच आमदार निवडून येत आहे. सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय भेगडे येथील प्रतिनिधित्व करतात. पनवेलमध्ये २००९ पासून भाजपचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत. २ टर्मपासून कर्जत राष्ट्रवादीकडे आहे. उरणमध्ये शिवसेनेचे मनाेहर भाेईर आमदार आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मानणारा माेठा वर्ग आहे. त्यातही घाटाखालच्या रायगड जिल्ह्यात शेकापला मानणारा माेठा वर्ग आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून लाेकसभा लढवली हाेती. त्यांना साडेतीन लाखांवर मते पडली हाेती. शेकापची ही ताकद पार्थच्या पाठीशी उभी राहिल्यास हा मतदारसंघ ताब्यात आणणे शक्य आहे.

 

सुप्रिया सुळेंंना टक्कर देणारी भेटेना….

0
पुणे- जिंकून येणाऱ्या ,किंवा यशाची खात्री असणाऱ्या मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्राचारात आघाडी घेतली आहे,बारामती आणि शिरूर,मावळ  या  मतदार संघातून राष्ट्रवादीला विजयाची पूर्ण आशा आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मुख्य किल्ल्याला सुरुंग लावण्याचा इरादा ठेवणाऱ्या भाजपला मात्र येथे कोणाला उमेदवारी द्यावी हे काही सुचेना असे चित्र दिसते आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढायचे म्हणजे बळीचा बकरा व्हायचे असेच मानले जाते आहे .पण हि रिस्क कोण कशासाठी घेणार हा खरा प्रश्न आहे यामुळे  पुणे आम्हाला द्या नाही तर बारामतीवर हल्ला करू अशा तहाच्या डरकाळ्या हवेतच विरत आहेत .केवळ सुप्रियाच्या विरोधात लढलेला उमेदवार म्हणून नाव होईल अशा अर्थाने मात्र काही इच्छुक जरूर आहेत .
               पुणे आम्हाला द्या म्हणजे पुण्यात उमेदवार कच्चा ,लेचापेचा द्या तसे करायला कॉंग्रेसला भाग पाडा ,म्हणजे आम्ही बारामती ला तसा उमेदवार देऊ अशी तहाची डरकाळी हि निव्वळ ढोंगी ठरताना दिसते आहे . जिथे सुप्रियाच्या विरोधात उमेदवारच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे . तर एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव हि भाजपच्या नेत्यांनी याबाबत खेळून पाहिला आहे . अर्थात खेळला जातो आहे. पुण्यातील ताकद्वानाला बाजूला करण्यासाठी त्यांच्या घरातील अन्य व्यक्तीला बारामतीला उमेदवारी देवून इतिहास घडवू अशी स्वप्ने दाखविली जात आहेत . पण हे राजकीय डावपेच साऱ्यांच्याच लक्षात येत आहेत.
          रंजना कुल ,अर्चना पाटील,राणी भोसले  यासह  पुण्यातील एका उद्योजकाच्या पत्नीचे नाव बारामतीतून भाजपच्या वतीने चर्चेत आहे.आता नेमके भाजप सुप्रियाच्या विरोधात कोणाला उतरविणार कि नवा चेहरा आणणार हे लवकरच दिसेल . एकीकडे सुप्रियाच्या प्रचाराला कित्येक महिन्यांपासून प्रारंभ झाला आहे. स्वतः सर्व नागरिक कार्यकर्ते यांच्यात मिसळणाऱ्या सुप्रीयांना तोंड देणे तेवढे सोपे नाही पण तरीही रिंगणात’बकरा ‘होण्यासाठी  येतेय तरी कोण याबाबत थोडीफार उत्सुकता दिसून येते आहे .
        बारामती सह मावळ आणि शिरूरमधील उमेदवार हि राष्ट्रवादीने घोषित करून प्रचाराला प्रारंभ केला आहे. खासदार शिवाजीराव आढळराव हे १५ वर्षे खासदार आहेत . आता त्यांना शह देण्यासाठी प्रखर वकृत्व असलेला तरुण अभिनेता सेनेतुनच फोडून राष्ट्रवादीने त्यांना इथे शह दिला आहे. आढळराव यांचे दिवस भरलेत असेच आता राष्ट्रवादीचे तरी  कार्यकर्ते बोलत आहेत . किती वर्षे खासदारकी द्यायची आता जरा नव्या जोमाला संधी देण्याची गरज नाही काय ? असा प्रश्न घेवून येथे प्रचार सुरु झाला आहे.  शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. मावळात पार्थ अजित पवार यांनाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. पवार घराण्यातील हा नवा तरुण चेहरा राजकारणात उतरला आहे. ज्याला शिवसेनेच्या विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी लढत द्यायची आहे . अजित पवारांसाठी बारामती सह मावळ हि प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे . हे दोन गड तर त्यांना जिंकायचे आहेतच म्हणूनच त्यांनी शिरूर  मधून अमोल कोल्हे सारखा चेहरा दिला आहे.विद्यमान खासदार आढळराव आणि बारणे हे चेहरे आता घिसे -पिटे पुराने चेहरे झालेत ,नव्या तरुणाईला त्यांचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादीने इथून पुढे केले आहे. बारामती तर त्यांचा गड आहेच . आणि भाजप बारामतीवर हल्ला करता येईल काय अशा कुचकामी विषयावर वेळ घालवत आहे. भाजप सेनेच्या आढळरावांनी आपला प्रचार सुरु केला असला तरी अद्याप अन्यत्र प्रचाराच्या पातळीवर सामसूम आहे . आणि आता प्रचारासाठी केवळ  महिना उरला असताना हि सामसूम भाजपच्या तथाकथीत उमेदवारांना कठीण जाणार आहे. 

तुमच्यासारखे चौकीदार असतील तर महिला असुरक्षित-रेणुका शहाणे

0

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मी चौकीदार मोहिमेला समर्थन देणाऱ्या एम. जे. अकबर यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या #MainBhiChowkidar चळवळीला पत्रकार एम.जे.अकबर यांनी पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेल्या #metoo मोहिमेवेळी एम.जे.अकबर यांच्याविरोधात अनेक महिला सहकाऱ्यांनी आवाज उठवला होता.

म्हणूनच अकबर यांनी पंतप्रधानांच्या चौकीदार चळवळीला पाठिंबा देताच, अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

रेणुका यांच्या या ट्वीटला 11हजार नेटिझन्सनी लाईक केलं आहे. त्याचवेळी 3.4 हजार नेटिझन्सनी रीट्वीट केलं आहे.

रेणुका यांच्या या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदींची विचारधारा मानणाऱ्या एका व्यक्तीने प्रत्युत्तर दिलं.

शशी थरुर, दिग्विजय सिंह अशा नेत्यांचा समावेश असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात तुम्हाला सुरक्षित वाटत असेल तर भवरी देवी आणि सुनंदा पुष्कर होण्यापासून देव तुमचं रक्षण होवो अशा शब्दांत संजीव सिन्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

”पण त्यांनी स्वत:ला चौकीदार असल्याचं घोषित केलेलं नाही” असं प्रत्युत्तर रेणुका यांनी दिलं. हे लिहिताना त्यांनी #AkalKiKami हा हॅशटॅग वापरला आहे.

निव्वळ कायद्याने काहीही होत नाही. सत्तेचा दुरुपयोग करून कायद्यातून पळवाट काढली जाऊ शकते. हे प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती आहे असं रेणुका यांनी ट्वीट केलं होतं.

चोर स्वत:ला चौकीदार घोषित करतो…? असा सवाल नेटिझनने केला. रेणुका यांनी ‘अगदी आरामात’ असं त्याला प्रत्युत्तर दिलं.

त्यांनीही चौकीदार मोहिमेला पाठिंबा दिला असता तर मी नक्कीच बोलले असते असं ट्वीट रेणुका यांनी केलं आहे.

तुम्ही प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवता आणि समाजाला खडबडून जागे करता म्हणजे तुम्ही पण या देशातील जागरूक चौकीदार आहात…. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पण अभिमानाने म्हणा- #MainBhiChowkidar असं ट्वीट संदीपआबा गिड्डे-पाटील यांनी केलं. त्याला रेणुका यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं.

कुठल्याही हॅशटॅगमुळे मी ना तर माझं नाव बदलेन ना तुम्हाला एखादी गोष्ट ऐकायची आहे म्हणून मी म्हणेन. मी माझ्या स्वत:ची बुद्धी वापरून जर काही म्हणायचंच झालं तर अभिमानाने म्हणेन की मी एक जागरूक आई आणि अभिनेत्री आहे आणि एक कर्तव्यनिष्ठ नागरिक आहे. तुमचं चालू द्या. धन्यवाद असं रेणुका यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

पंकजा मुंडेंच्या घरात दारूची फॅक्ट्री असल्याचा धक्कादायक आरोप धनंजय मुंडेंनी केलाय…

0

बीड- ‘आमच्या बहीणाबाईच्या घरात सर्व सत्ता आहेत. खासदारकी त्यांच्या घरात, आमदारकी त्यांच्या घरात, राज्याचे मंत्रीपद त्यांच्याच घरात, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, वैद्यनाथ बँक आणि सहकारी साखर कारखाना त्यांच्यात घरात, दारूची फॅक्टरी त्यांच्याच घरात’ असा गंभीर आरोप पंकजा मुंडेंवर केलाय. माजलगावमध्ये कार्यकर्ता मेळावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे यांची उपस्थिती होती.

बीड जिल्ह्यातील जनतेने एकाच घरात सगळ्या सत्ता दिल्या. पण ही सत्ता उपभोगणाऱ्यांनी जनतेला काय दिलं असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थिती केला. ‘साधा ऊसतोड मजुरांचा प्रश्नच सोडवू शकले नाहीत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच्या नावाने गोपीनाथ गडावरून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ऊसतोड मजूर महामंडळाचं काय झालं ?’ असे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले.

‘पंकजा मुंडे मंत्री मंडळात आहेत. एखादं महामंडळ जर रद्द करायचं तर मंत्री मंडळाची बैठक घेवून तो विषय रद्द करायचा असतो. महामंडळ रद्द करायच्या बैठकीत स्वत:च्या वडिलांच्या नावाने काढलेलं ऊसतोड मजूर महामंडळ रद्द करताना मंत्री म्हणून मुंडे साहेबांच्या वारसाची सही असेल तर कीती दुर्दैव आहे.’ असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना केला.

 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
गोवा – माजी संरक्षण मंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आहे. याच्या 63 व्या वर्षी दीर्घ आजाराने पर्रिकरांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. कर्करोगाशी त्यांची लढाई अखेर अपयशी ठरली. भारतीय राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्त्व अशी पर्रिकरांची ओळख होती.

त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाला होता. पर्रीकरांना झोपुन राहण्यास सांगण्यात आलो होते. मागील पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. पण शनिवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरू झाले. गेल्या, कित्येक दिवसांपासून पर्रीकरांची सुरू असलेली मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोककळा पसरली आहे.

शांत व निगर्वी व्यक्तीमत्व हरपले – गिरीश बापट

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहरजी पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अतीव दुःख झाले. संरक्षण मंत्री असताना त्यांनी देशहिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गोव्याचा विकास तर केलाच पण पुण्याच्या विकासात ही त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याच्या विमानतळाचा विस्तारीकरणाचा निर्णय असो वा पुण्यातील विविध विकास कामांसबंधी लागणाऱ्या लष्कराच्या परवानग्या देण्याचा निर्णय असो, अगदी विनाविलंब त्यांनी निर्णय घेतले. त्यांची जशी साधी राहणी होती तसेच त्यांचे विचार उच्च होते. पर्रिकर हा भाजपाचा अभ्यासू चेहरा होता.   गंभीर आजारी असतानाही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या आणि गोव्यातील जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले. अशा या झुंजार व्यक्तीमत्वास माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

मनोहर पर्रिकरांचा प्रवास
13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतूनच झाले. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार होते.

मनोहर पर्रिकर यांनी सुरूवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले. तरूण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारमात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला.

1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडूण गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.

2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर मनोहर पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री झाले. त्यासाठी उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर गेले. मात्र, गोव्यात राजकीय त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्याने, पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. पण, याच काळात त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले, आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.