Home Blog Page 2949

साध्वी प्रज्ञासिंहच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

0

पुणे-दहशतवाद्यांनी हेमंत करकरे यांना मारून माझे सुतक संपवले’ असे वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन केले. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चेतन तुपे म्हणाले, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने भाजपचा विकृत आणि घाणेरडा चेहरा जनतेसमोर आला आहे. भाजपवाल्यानी आजवर सत्तेसाठी नीच पातळी गाठली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनीही आता त्यात उडी घेतली आहे. शहिदांना कंसवधाची उपमा देणाऱ्या भाजपला अजमल कसाब हा श्रीकृष्ण वाटतो का? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला द्यावे, अशी मागणी तुपे यांनी यावेळी केली.मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना भोपाळ येथून लोकसभा निवडणुकीचे तिकीटही दिले आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याने देशभरात खळबळ माजली असून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होत आहे

 

 

 

 

महायुतीचा महिला मेळावा, डॉक्टरांचा मेळावा,वकिलांचा मेळावा संपन्न

पुणे-पंतप्रधान मोदी यांना  विरोधासाठी विरोध करणे हा एकमेव अजेंडा विरोधकांचा आहे . याखेरीज त्याच्याकडे बोलण्यासारखे काही उरले नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे. कसबा विधानसभा मतदार संघ आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने महायुतीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर जंगली महाराज रस्त्यावरील प्रचार कार्यालयात डॉक्टरांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला उपस्थित राहून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या शुभेच्छा स्विकारल्या.विजया रहाटकर यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षात देशाची कशी प्रगती झाली आहे व पुन्हा देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदी का आवश्यक आहेत हे सांगितले. मी माझ्या भाषणात गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पुणे शहर आणि जिल्ह्याचा विकास मी पालकमंत्री म्हणून कसा केला याची विस्तृत माहिती सांगितली.यावेळी डॉ. शरद बुटाला, डॉ.मानसी जाधव,डॉ अभिजित सोनावणे,मनीषा सोनावणे,डॉ विजय घोगरे, डॉ गणेश वाघ, डॉ.शैलेश पुणतांबेकर, डॉ.करमरकर यांच्यासह डॉक्टरांच्या विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महिला मेळाव्यास आरपीआयच्या राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले , महापौर मुक्ताताई टिळक , भाजपच्या महिला शहर प्रमुख शशिकला मेंगडे , युवा नेत्या स्वरदा बापट, शिवसेनेच्या नेत्या तृष्णा विश्वासराव , वैशाली नाईक , संगीता आठवले , त्याचप्रमाणे भाजप , शिवसेना ,आरपीआय आणि अन्य घटक पक्षाच्या महिला पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. मेळाव्यास महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. 
विरोधकांकडे धोरण नाही आणि नेता नाही असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या , जनतेसमोर मांडण्यासाठी त्याच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्याचा केवळ विरोधासाठी विरोध आहे. विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही .  म्हणूनच देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे. हे सरकार सक्षम आणि मजबूत असावे यासाठी बहुमताने सरकारला निवडून द्या  केवळ पुण्यात नाही तर राज्यात आणि देशात जास्तीतजास्त जागा आपणास मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयन्त करा असे आवाहन त्यांनी केले. महिलांसाठी सरकारने अनेकविध योजना आणल्या आहेत त्याची माहिती घरोघरी पोचवा असे त्या म्हणाल्या. 
आरपीआयच्या नेत्या आठवले ताई म्हणाल्या , समाजातील गरीब, शेतकरी , कष्टकरी, अशा विविध घटकासाठी सरकारने योजना आणल्या आहेत त्याची ही माहिती महिलांनी स्वतः करून घ्या आणि इतरांना सांगावी . राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणा असे त्यांनी सांगितले. 
महापौर टिळक यांनी सांगितले की , गेल्या पांच वर्षात मोदी सरकारने केवळ महिला सक्षमीकरणासाठी योजना आणल्या नाहीत तर जगात देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारला आपणाला संधी  द्यायची आहे. 
दरम्यान न्यायालयातील  वकिलांशी गिरीश बापट यांनी संवाद साधला .पुणे सत्र न्यायालयाशी निगडित रस्ता , पाणी अशा प्रश्नांवर आम्ही तोडगा काढला असला तरी इतरही काही मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत.बांधकाम विभाग, महानगरपालिका, राज्य शासन यांच्या समन्वयातून मी या समस्या मार्गी लावेन, असे आश्वासनं  त्यांनी यावेळी दिले. तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपण सक्रीय प्रयत्न करण्याचे आवाहनही केले. यावेळी ॲड. एस.के जैन, ॲड. एन.डी पाटील,ॲड.शिरीष शिंदे, ॲड.सत्यजित तुपे, ॲड. राणी कांबळे,ॲड. इशानी जोशी, ॲड.अनिरुद्ध पायगुडे, ॲड.पांडुरंग ढोरे, ॲड.पंडित धुमाळ,ॲड. अमर जाधव, ॲड.सी.व्ही जोशी, ॲड. जावेद खान आदी उपस्थित होते.

मोदी फक्त घोषणा करतात आणि फसवतात- हर्षवर्धन पाटील

पुणे-कॉँग्रेसची खरी ताकद सर्वसामान्य जनता आहे. कॉंग्रेस पक्ष हा गुणवत्तेवर चालतो आणि ती गुणवत्ताmम्हणजे घरेलू कामगार महिला आहे. राहुल गांधींनी तुमच्यासाठी महिना सहा हजार रुपये उत्पन्नाची हमीदेणारी ‘न्याय’ योजना जाहीर केली आहे. त्यामुळे ‘न्याय’ योजना अंमलात आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे सरकार येणे आवश्यक असून मोहन जोशी यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. मोदी फक्त घोषणा करतात आणि फसवतात त्याउलट राहुल गांधी घोषणा करतात आणि त्या पूर्णही करतात, असा टोला त्यांनी मोदींना लगावला.
कोंग्रेस-राष्ट्रवादी कोंग्रेस आणि मित्र पक्षांचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय मजदूर संघ आणि पुणे शहर असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने घरेलू कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, पुणे शहर असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष एस.के. पळसे, सीताराम चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. देशात आणि राज्यात कोंग्रेसचे सरकार आले तर युतीच्या सरकारने घरेलू कामगारांसाठी बंद केलेली पेन्शन योजना पुन्हा सुरू करू असे
आश्वासनही हर्षवर्धन पाटील यांनी घरेलू कामगार महिलांना दिले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यात कोंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना आम्ही घरेलू कामगारांसाठी पेन्शन योजना केली होती. दुर्दैवाने २०१४ ला आमचे सरकार गेले आणि भाजप सरकारने ही योजना बंद केली. तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे डब्यात, घरात ठेवता. मात्र, अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. कष्टाने मिळालेला आपलाच पैसा बँकेत भरण्यासाठी रांगा लागल्या.त्यात १०० पेक्षा जास्त जणांचे प्राण गेले. ज्यांच्याकडे काळा पैसा होता ते मात्र मागच्या दाराने येवून त्यांचे पैसे बँकेत भरले. आता मोदींना आणि भाजपला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.
राहुल गांधींनी गरिबांसाठी न्याय योजना आणली आहे. सरासरी ५ माणसांचे कुटुंबाला वर्षाला ७२,०००/- रुपये पाच वर्षे मिळणार आहेत. राहुल गांधींनी छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये सरकार आल्यावर दहा दिवसात कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. सरकार आल्यावर दोन दिवसात त्याची अंमलबजावणी केली. नरेंद्र मोदींनी तुम्हाला २०१४ ला अनेक आश्वासने दिली होती त्यापैकि एकही आश्वसनाची पूर्तता त्यांनी केली नाही. मोदी फक्त घोषणा करतात आणि फसवतात त्याउलट राहुल गांधी घोषणा करतात आणि त्या पूर्णही करतात. २०१४ ला घरात जावून टीव्ही लावला की मोदींचा चेहरा दिसायचा आता ते दिसले की चॅनेल बदला म्हणतात. आता देशाची व राज्याची हवा बदलली आहे. मोदी सरकार आंधळे, बहिरे आणि बधिर सरकारआहे. हे सरकार बद्ल्ण्यासाठी मोहन जोशी यांच्या पाठीमागे उभे राहा. घरेलू कामगार महिलेने रोज शंभर घरांमध्ये जावून मोहन जोशी यांना निवडून आणण्याचे आवाहन करा असे त्यांनी संगितले. सोनल पटेल म्हणाल्या, ‘न्याय योजना’ ही कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मात्र, जेव्हा कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल तेव्हाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही योजना समजून घेवून दुसर्‍यालाही समजून सांगा. आत्तापर्यंतच्या योजना या सेवा आणि वस्तूंच्या स्वरुपात होत्या. त्याची मर्जी ही सरकारची असायची. मात्र, न्याय योजनेच्या माध्यमातून तुमच्या हातात ७२ हजार रुपये पडणार आहेत. ते तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे खर्च करू शकणार आहात असे त्यांनी सांगितले.
एस. के. पळसे यांनी प्रास्ताविक केले तर सीताराम चव्हाण यांनी आभार मानले.

महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंचाचा मोहन जोशी यांना पाठींबा

पुणे -जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीला महाराष्ट्रीयन, उत्तर भारतीय एकता मंच तर्फे जाहिर पाठींबा देण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक २०१९ च्या निवडणुकीत आम्ही पुणे,बारामती, मावळ, शिरूर मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देत आहोत. अशा आशयाचे पत्रक महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंचाच्या वतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांना देण्यात आले आहे.

या एकता मंचच्या अध्यक्षा श्रीमती संगीता तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंचतर्फे MUBEM व्यापारी असोसिएशन, MUBEM पेंटर असोसिएशन, MUBEM अॅल्युमिनियम स्लायडिंग विंडो असोसिएशन, MUBEM कारपेंटर असोसिएशनआणि महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंच (MUBEM) चे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते हे कॉंग्रेसच्या पुण्याचे उमेदवार मोहनदादा जोशी यांना पूर्णपणे पाठींबा देत आहोत.याप्रसंगी कन्हैयालाल साहनी, रविंद्र दुबे, सतीश दिक्षित, भगवानदास नीसार, पंडित मिश्रा, ब्रिजकिशोरमिश्रा, कैलास साहनी, जे पी यादव, शिवधानी तिवारी, रामप्रताप गुप्ता, अर्जुनसिंग ठाकूर, महेंद्र निसार, दिनानाथ निसार, नवीनद्र जयरचाल, सीमा सावंत, पूजा आनंद, अनिता मुनोत, शोभा पन्नीकर, सुनिता नेमुर उपस्थित होते.

पाणीटंचाई आणि शिरोळेंना डावलणे,यामागे गिरीश बापटांचे राजकारण -अरविंद शिंदे ,प्रशांत जगतापांचा आरोप(व्हिडीओ)

0

पुणे, -पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नियोजनशून्य कारभारामुळेच पुणे शहराचा पाणी-प्रश्न बिकट झाला असा आरोप पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंदशिंदे यांनी केला असून या लोकसभा निवडणुकीत पुण्यातील नागरिक अशा नियोजनशून्य
उमेदवाराला निवडून देणार काय? असा सवाल केला आहे. तर अनिल शिरोळे यांची उमेदवारी का डावलली ? समाज म्हणून कि निष्क्रिय म्हणून याचे उत्तर द्यावे असा सवाल माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे.

पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी, पुण्यातील पाणीपुरवठ्याबाबत पुणे महापालिकेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेतले. पाणी-पुरवठ्याबाबत कसलेही नियोजन केले नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आणि आता तर उन्हाळ्यात पाण्याअभावी नजीकच्या काळातच पुण्याला दोन-तीन दिवसाआड पाणी पुरवठा होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.
पुणे महापालिका आणि राज्याचे सिंचन खाते यांच्यात समन्वय नसल्याने शहरात कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया गेले, महापौरांसारख्या जबाबदार पदाधिकाऱ्याला पाणीपुरवठ्यासाठी  उपोषणाचे नाटक करावे लागले शिवाय संबंधित समितीतून बाहेर पडावे लागले हे बापट यांच्या
भोंगळ आणि भ्रष्टाचारी कारभाराचेच प्रत्यंतर आहे असे सांगून शिंदे म्हणाले, धरण-साठ्यातील पाण्याचे नियोजन न केल्यामुळे नजीकच्या काळात पुणेकरांना भीषण पाणी-टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे अशा नियोजनशून्य उमेदवाराला निवडून द्यायचे काय? हाच महत्वाचा
प्रश्न आज पुणेकर नागरिकांना पडला असेल असेही ते म्हणाले. पालकमंत्री गिरीश बापट जे काही करतात त्यामुळे पुण्याचे नुकसानच होते त्यामुळे पुण्याचे यापूर्वीचे खासदार अनिल शिरोळे हे निष्क्रिय होते तेच बरे होते अशी सार्वत्रिक भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे असा टोलाही
अरविंद शिंदे यांनी शेवटी लगावला.

  • अनिल शिरोळे यांची उमेदवारी का डावलली ? बहुजन म्हणून कि निष्क्रिय म्हणून-बापट साहेब उत्तर द्या

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पुण्यात झालेल्या सरदार वंशजांच्या मेळाव्यात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज हे निधर्मी राजे होते असे मोठ्या अभिमानाने सांगितले मात्र त्यांचा भारतीय जनता पक्ष खरोखरच निधर्मी पक्ष आहे याचे त्यांनी मतदानापूर्वी उत्तर द्यावे असे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. तसेच सर्वच सरदार वंशजांनी भाजपाला पाठिंबा दिलेला नाही असा दावाही त्यांनी यावेळी
केला.  पुण्याचे यापूर्वीचे खासदार अनिल शिरोळे हेही सरदार घराण्यातील आहेत मात्र यावेळी त्यांना ते बहुजन समाजाचे असल्याने की ते निष्क्रिय असल्यामुळे भाजपने उमेदवारी नाकारली याचाही बापट यांनी खुलासा करावा असे ते म्हणाले.  प्रशांत जगताप यांनी यावेळी गिरीश बापट यांच्याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले व त्याबाबत त्यांनी खुलासेवार उत्तरे द्यावीत असे आवाहन केले. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट
आणि जेम्स लेन प्रकरणात बापट यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटचे समर्थन केले याचा अर्थ जेम्स लेन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंबधी केलेले लेखन बापट यांना मान्य आहे की याचा बापट यांनी खुलासा करावा अशी त्यांनी मागणी केली. लालमहाल प्रकरणातील दादोजी कोंडदेव
पुतळा तोडफोड प्रकरणात आरोपी असलेल्या फक्त भाजप नगरसेवकांवरील गुन्हे मागे घेतले मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांवरील गुन्हे मात्र कायम ठेवले बापट यांनी हा पक्षपात का केला याचाही खुलासा करावा असे ते म्हणाले.  कोथरूडच्या भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यात निघालेल्या मराठा मूक मोर्च्यांची ‘निव्वळ स्टंटबाजी’अशी संभावना केली तसेच त्यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, गिरीश बापट यांच्या उमेदवारीमुळे पुण्यात आता ‘ब्राह्मणराज्य’ आले आहे अशी मल्लिनाथी केली त्यांचे हे मत बापट यांना मान्य आहे काय? याचा त्यांनी खुलासा करावा असे त्यांनी सांगितले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्याबाहेर शिवसृष्टी उभारण्यास राज्य शासनाने तीनशे कोटींचा निधी मंजूर केला मात्र आता त्याच्या बाजूलाच थीम पार्क उभारण्यात येत आहे त्यामुळे शिवसृष्टीचे महत्व कमी होणार नाही काय? याचेही बापट यांनी मतदानापूर्वी उत्तर द्यावे असे जगताप यांनी म्हटले आहे.

मुळावर घाव घालण्यासाठी मी बारामतीत : अमित शहा (व्हिडीओ)

0

पुणे : बारामतीमध्ये प्रचाराला येणे माझ्या नियोजनात नव्हते.पण काहींना ही ‘नुरी’ लढत वाटत होती. बारामतीत मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या सगळ्या अफवा आहेत. घाव करायचा तर तो मुळावरच अशा शब्दांत ही लढत मैत्रीपूर्ण नसल्याचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बारामतीत स्पष्ट केले.
बारामतीमध्ये युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काकडे, विजय शिवतारे, रासपचे महादेव जानकर,आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, राहुल कुल,बाबुराव पाचर्णे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शाह म्हणाले, बारामतीमध्ये प्रचाराला येणे माझ्या नियोजनात नव्हते.पण काहींना ही ‘नुरी’ लढत वाटत होती.पण असे काहीही नाही. या लढतीत कोणतीही तडजोड नसून बारामतीत भाजपाच येणार आहे.यातून महाराष्ट्रात चांगला संदेश जाईल असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, पवार, राहुल गांधी,मायावती, उमर आणि फारुख अब्दुल्ला हे एकत्र बसले. कारण त्यांना भारत आणि काश्मीर यांचे वेगवेगळे पंतप्रधान करायची इच्छा आहे.परंतु,आम्ही जिवंत असेपर्यंत काश्मीरला भारतापासून वेगळं होऊ देणार नाही.आम्ही जेएनयूमध्ये देश विरोधी बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले.तर राहुल गांधी त्यांना भाषास्वातंत्र्य आहे म्हणत भेटायला गेले. मी त्यांना सांगू इच्छितो,राहुल बाबा तुम्हाला देशद्रोह्यांशी ईलू ईलू करायची असेल तर करा, आम्ही करणार नाही.
अमित शहांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे-
• बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण नाही, अशा अफवा होत्या म्हणूनच सभेचे नियोजन नसतानाही कार्यकर्त्यांना बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे.
• घाव घालताना मुळावरच घालायचा म्हणूनच बारामतीची जागा जिंकण्यासाठीच ही लढाई आहे.
• देशातील घराणेशाही संपविण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी सुरु केले आहे.
• नरेंद्र मोदी यांनी गरीबी पाहिली व अनुभवली आहे, त्या मुळे तेच खऱ्या अर्थाने गरीबी दूर करु शकतात, पाच पिढ्या व 55 वर्षे राजकारण करणाऱ्या गांधी परिवाराला गरीबी हटविणे जमणार नाही.
• देशात 50 वर्षे सातत्याने सत्तेत व केंद्रात दहा वर्षे मंत्री असलेल्या शरद पवार यांनी बारामती, पुणे व राज्याचा काय विकास केला हे सांगावे, भाजप युवा मोर्चाचा युवक पवारांशी चौकात चर्चा करायला तयार आहे.
• मनमोहनसिंगांच्या काळात शेतकऱ्यांना 1 लाख 15 हजार कोटींचे अर्थसहाय्य दिले गेले, मोदींनी हाच आकडा 4 लाख 38 हजार कोटींपर्यंत नेऊन ठेवला.
• प्रगतीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचा शरद पवारांनी विकास केला की त्याला खाली खेचले असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला.
• जे कुटुंबाचे भले करण्याच्या मागे आहेत ते देशाचे भले करु शकणार नाहीत म्हणून मोदींचे हात बळकट करा असे आवाहन शहांनी केेले.
• पवार कृषीमंत्री असताना कच्ची साखर आयात करत होते, मोदींनी आयात थांबविली त्याचा उसउत्पादकांना फायदा झाला, इथेनॉलचे दरही वाढवून दिल्याने कारखानदारी बळकट झाली.
• लोकसभेची निवडणूक संपली की पुरंदर विमानतळाचे काम प्राधान्याने मार्गी लावण्याची विजय शिवतारे यांना अमित शहा यांची ग्वाही दिली.
• आम्ही न मागताही पाच वर्षांचा हिशेब दिला आहे, शरद पवार आपण काय केल याचा हिशेब द्यावा असेही शहा म्हणाले.
• बारामतीकर आपण मतदार आहात, मतदार म्हणून आपण पवारांना विकासाचा हिशोब मागायला नको का असा प्रश्न शहांनी उपस्थित केला.
• मनमोहनसिंगाचा उल्लेख मौनीबाबा करत मोदी सरकारने घुसखोरी थांबवून देश सुरक्षित केला, मनमोहनसिंगांनी घुसखोरी व हल्ले होताना उफ देखील निघाले नाही अशी टीका.
• दहशतवाद्यांबरोबर चर्चेचा आग्रह राहुल गांधी व शरद पवार करतात हे योग्य आहे का असा बारामतीकरांना अमित शहांचा सवाल.
• गोळी आली तर गोळ्याने आम्ही उत्तर देऊ, ईट का जबाब पत्थर से देऊ, देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.
• देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे कॉंग्रेसने जाहीर केले आहे, आम्ही सत्तेवर येताच एक एक घुसखोर शोधून त्याला देशाबाहेर घालविण्याचे काम करु.
• राहुल गांधी व शरद पवार या देशाचे संरक्षण करु शकतात का, असा बारामतीकरांना अमित शहांचा जाहीर सवाल.
• गेल्या वेळेस महादेव जानकरांना कमळ चिन्ह न देण्याची चूक यंदा सुधारली आहे, कांचन कुल खासदार झाल्यास त्याचा हिशेब आपण पाच वर्षानी येऊन देऊ अशी ग्वाही.

डॉ. पाटणकर यांना ‘ट्रायकॉन’मध्ये उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक

0
पुणे : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘ट्रायकॉन २०१९’ या केशव्याधींवरील जागतिक परिषदेत पुण्यातील डॉ. स्नेहल पाटणकर यांना उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाले. आयुर्वेदात पहिल्यांदाच अशा पध्दतीची परिषद भरवण्यात आली होती. देशभरातील डॉक्टर, संशोधक, प्राध्यापक आणि आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांचा शोधनिबंध सादर करण्याची संधी देण्यात आली होती. या परिषदेत १८४ शोधनिबंध सादर झाले.  ‘केशविकारांचे आधुनिक उपकरणांद्वारे व आयुर्वेदीय पद्धतीने निदान व विश्लेषण’ या विषयावर डॉ. पाटणकर यांनी शोधनिबंध सादर केला.
 
आयुष मंत्रालयातील संयुक्त सल्लागार डॉ. डी. सी. कटोच यांच्या हस्ते डॉ. पाटणकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.बलदेव कुमार, दिनेश कुमार, वैद्य देवेंद्र त्रिगुणा,डॉ. मुकेश अग्रवाल, अनुराधा अग्रवाल आदी उपस्थित होते. जागतिक स्तरावरील परिषदेत केशव्यांधीवर आयुर्वेदाच्या माध्यमातून कसे उपचार करता येतील, यावर माझा शोधनिबंध होता. त्याला उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला असल्याचे डॉ. स्नेहल पाटणकर यांनी सांगितले.

पीएमआरडीएच्या ६६ हजार कोटीच्या आराखड्याने पुणेकरांची होईल वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता-गिरीश बापट

पुणे-
शहर आणि परिसराचा वेगाने होणारा विकास पाहता भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ६६ हजार कोटी रुपयांचा सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता होईल, नागरिकांचा वेळ वाचेल, इंधनाचा अपव्यय होणार नाही, मानसिक त्रास कमी होईल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किफायतशीर व सुरक्षित होईल असा विश्‍वास महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
 
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ औंध-खडकी-बोपोडी परिसरात प्रचार ङ्गेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. बापट बोलत होते. आमदार विजय काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, कार्तिकी हिवरकर, परशुराम वाडेकर, मधुकर मुसळे, अमित मुरकुटे, मुकेश गवळी, चिंतन शहा, अनिल भिसे, सोनाली भोसले, आण्णा आठवले, उमेश गवळी, रवी सोनावणे, मोहन गवळी सहभागी झाले होते.
 
औंध येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. स्पायसर कॉलेज, भाऊ पाटील रस्ता, एलफीन्स्टन मार्ग, बोपोडी,आकाशदीप सोसायटी, राम मंदिर, दर्गा वसाहत, गवळी वाडा, खडकी बाजार, खडकी स्टेशन, खडकी चौपाटी या परिसरात प्रचार फेरीचे नागरिकांना उत्साहात स्वागत केले.
 बापट म्हणाले, ‘पीएमआरडीएच्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचा विस्तार हडपसरपर्यंत करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या मार्गांच्या विस्तार करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागांत मेट्रो मार्गांचे जाळे उभारण्यात येणार आहे. लाइट रेल्वे, पुणे रेल्वे स्टेशनवरचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी मार्गांची रचना यांसह अने मु‘य रस्त्यांचे रूंदीकरण, उड्डाणपूल, ग‘ेड सेपरेटर, बीआरटीचे सक्षमीकरण, रिंग रोड, एचसीएमटीआर, पीएमपीचे सक्षमीकरण, एक हजार बसेसची खरेदी, विमानतळांना जोडणारे मार्ग आदी प्रकल्पांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी हा आराखडा करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार आहे.’
बापट पुढे म्हणाले, ‘शहरातील वाहतुकीच्या प्रश्‍नांबाबत आणि वाहतूक सुधारणेसाठी गेल्या ३४ वर्षांत १३ आराखडे करण्यात आले. परंतु सत्ताधारी कॉंग‘ेसच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे सर्वच आराखडे कागदावरच राहीले. युतीने सत्तेत आल्यानंतर पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे. मेट्रोच्या कामाला गती, ई बसेसची खरेदी, एचसीएमटीआर प्रकल्पाला गती, विविध ठिकाणी उड्डाणपूल, रिंग रोड, मोठ्या रस्त्यांची विकासकामे सुरू झाली आहेत. या प्रकल्पांना आगामी काळात अधिक गती देणार आहोत.’
बापट पुढे म्हणाले, ‘शहराबाहेरील १२८ किलोमीटरचा बाह्य रस्ता, शहरातील ६० महत्त्वाच्या रस्त्यांना आणि उपनगरांना जोडणारा ३६ किलोमीटरचा एचसीएमटीआर प्रकल्प, अकरा हजार कोटी रुपये खर्च करून पिंपरी स्वारगेट व वना ज रामवाडी मेट्रो प्रकल्प, सहा हजार कोटी रूपयांचा हिंजवडी शिवाजीनगर २३ किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प, पुणे मुंबई अंतर ३४ मिलिटात कापण्यासाठी हायपरलूप प्रकल्प, दोन्ही मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, शहर परिसरात ११० किलोमीटरचे बीआरटीचे जाळे, बससेवा सक्षमीकरणासाठी ५०० ई बसेस आणि ८४० सीएनजी बसेस पीएमपीच्या ताफ्यात वाढविणे, पब्लिक बायसिकल शेअरिंग, पुरंदर येथे येत्या पाच वर्षांत छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचा मानस आहे.’
काश्मिरी पंडितांचा महायुतीला पाठिंबा
पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट (पुणे), श्रीरंग बारणे (मावळ), शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर) आणि कांचन कुल (बारामती) यांना काश्मिरी पंडितांनी पाठिंबा जाहीर केला असल्याचे पत्र आशुतोष राझदान यांनी दिले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सर्वाधिक  फटका काश्मिरी पंडितांना बसला. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सुरक्षित भारताचे वचन दिले आहे. घटनेतील ३७० आणि ३५-अ या कलमांबाबत भाजपने सुस्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही भाजपसह घटक पक्षांच्या महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कोपरा सभा व चाय पे चर्चा या कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले आहे. असे राझदान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विमानतळाचा मुद्दा सुळेंच्या अंगलट येण्याची शक्यता

सासवड -पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. विमानतळ बारामतीला हलवण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाधित गावातील लोकांना दिल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सासवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा सासवड (ता. पुरंदर) येथे पार पडली. यावेळी हा मुद्दा उपस्थित करून राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी थेट उपस्थित जनसमुदायाला साद घालत  ‘आपले विमानतळ बारामतीला जाऊ द्यायचे का’ असा खडा सवाल केला.  त्यावर उपस्थितांनी ‘नाही, नाही अशा जोरदार घोषणा देत पवार कुटुंबियांच्या या भूमिकेला विरोध दर्शवला.

                खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कार्यअहवालात विमानतळाला पाठींबा दर्शवित बाधितांना जास्तीत जास्त पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे बाधित गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला होता. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सुप्रिया सुळे यांना पारगाव येथे नेत कसाबसा समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही. तालुक्यातील इतर गावात हा अस्मितेचा मुद्दा होऊन सुळे यांना याचा फटका बसणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. बारामतीला पाणी पळवण्याच्या मुद्द्यावर आधीच पुरंदर तालुक्यात खदखद असताना आणखी विमानतळ हलवण्याचा विषय समोर आल्याने तालुक्यात रोष निर्माण झाला असल्याचे समजते.

                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात विमानतळाच्या मुद्द्यावर विस्तृत विवेचन केले. २० वर्षापासून विमानतळ इथे करणार, तिथे करणार अशा केवळ घोषणा आघाडी सरकारने केल्या. त्यांच्या बगलबच्च्यांनी जमिनीचे भाव वाढवून पैसे कमवायचे आणि नंतर विमानतळ दुसरीकडे हलवायचे असा कार्यक्रम अनेक वर्ष राबवला. आवश्यक परवानग्या सुद्धा घेतल्या नाहीत. परंतु युती सरकारने पुरंदरची जागा एकदा निर्धारित केल्यावर आम्ही सर्व परवानग्या तर घेतल्याच शिवाय कंपनीची स्थापना करून आर्थिक तरतूदही केली. हे करत असताना बाधित गावांचे कुठलेही नुकसान आणि जोर-जबरदस्ती करणार नसल्याचा आपला शब्द असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे एकूणच पुरंदर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. 

जर गुजरातचा विकास झालाय, तर असंख्य गुजराती महाराष्ट्रात का येतात?- राज ठाकरे

0

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचा विकास झाला म्हणता मग गुजराती माणसं महाराष्ट्रात का येतात, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. मोदींनी 2014 मध्ये देशाला गुजरात मॉडेल दाखवलं. गुजरातमधला विकास दाखवला. गुजरातचा इतकाच विकास झाला असेल, तर मग तिथली असंख्य गुजराती माणसं महाराष्ट्रात कशासाठी येतात?, असा प्रश्न राज यांनी विचारला. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर तुम्हाला गुलाम बनवून टाकतील. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुन्हा राजकीय क्षितिजावर दिसू नयेत यासाठी मतदान करा. मोदी पुन्हा सत्तेत आले तर पत्रकार लिहू शकणार नाहीत. बोलू शकणार नाहीत. देशाला हुकूमशाही पाहिजे की, लोकशाही हे ठरवण्याची ही निवडणूक आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगळीचा पुण्यातील सभेत समचार घेतला.

देशानं अनेक पंतप्रधान पाहिले. मात्र बाहेरच्या देशातील पंतप्रधानांना, अध्यक्षांना स्वत:च्या राज्यात नेणारा पंतप्रधान देशानं पहिल्यांदा पाहिला, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे पंतप्रधान मोदींवर बरसले. भारतभेटीवर आलेल्या प्रत्येक अध्यक्षांना, पंतप्रधानांना मोदी फक्त आणि फक्त गुजरातमध्ये का नेतात, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडूत का नेत नाहीत, असे प्रश्न राज यांनी विचारले. मोदी जगभर फिरले. इतक्या देशांना भेटी दिल्या. त्यातून किती गुंतवणूक आणली, याची आकडेवारी त्यांनी द्यावी, असं आव्हान राज यांनी दिलं.

गुजरातचा विकास आणि बुलेट ट्रेनवरुनदेखील राज ठाकरेंनी मोदींवर शरसंधान साधलं.मोदींना शेतकरी, जवान कोणाबद्दलही आस्था नाही. नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळे देश रसातळाला जाईल असे राज म्हणाले. बुलेट ट्रेन आणली. या ट्रेनचा उपयोग काय? अहमदाबादला जाऊन काय ढोकळा खायचा?

यावेळी राज यांनी मोदींचा एक व्हिडीओदेखील दाखवला. ‘मुंबई आर्थिक राजधानी आहे. गुजरात व्यापार केंद्र आहे. त्यामुळे इथून व्यवसाय जाणार असेल तर तो गुजरातला जाईल. पुण्याला जाणार नाही. कारण लक्ष्मी आणि सरस्वती वेगळ्या आहेत,’ असं त्या व्हिडीओत मोदी म्हणाले होते. यावर बोलताना मराठी माणसानं त्या बुलेट ट्रेनचं करायचं काय, मराठी माणसाला बुलेट ट्रेनचा काय उपयोग, असे प्रश्न राज यांनी विचारले.

मोदी गुजरातचा विकास केल्याचा दावा करतात. मग गुजरातमधील असंख्य माणसं महाराष्ट्रात  का येतात, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात उद्योग संस्कृती रुजली आहे. इथलं वातावरण त्यासाठी अनुकूल आहे, असा विश्वास गुजराती माणसांना वाटतो म्हणून ते इथे येतात, असं म्हणत राज यांनी मोदींच्या गुजरातच्या मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 

नरेंद्र मोदींच्या काळात पैसे बुडवणाऱ्यांची यादी माझ्याकडे आहे. विजय मल्ल्या पैसे द्यायला तयार होता. पण त्याला पळून जायला लावलं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारवर केला.

देशातील बँकांचा पैसा, जो तुमचा आमचा पैसा होता ते घेऊन विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, निरव मोदी, निलेश पारेख, नितीन संदेरसा, चेतन संदेरसा, रितेश जैन, सभ्या सेठ विक्रम कोठारी हे देशाबाहेर पळून गेले. हे सगळे नरेंद्र मोदींच्या काळात निघून गेले, असा प्रहार राज ठाकरेंनी मोदींवर केला.अर्थव्यवस्थेची सगळी वाट लावून ठेवलीय या लोकांनी. यांना देशाचं कही देणंघेणं नाही. असं जोरदार टीकास्त्र राज यांनी मोदींवर सोडलं.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

🔸 खडकवासला भागातून येताना जाताना माझ्या रमेश वांजळेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझा वाघ गेला. आज ते असायला पाहिजे होते.

🔸 पूर्वी पुणे, मुंबई ही शहरं खूपच सुंदर होती, पण प्रगतीच्या नावाखाली ती विस्कटत जातात. हे जगभरात होतं फक्त ती शहरं प्रगती करून देखील टुमदार होतात. आपली शहरं मात्र बकाल होत जातात.

🔸 आपली शहरं नुसती वाढत जात आहेत, त्याला आकार नाही उरला. वाढत्या शहरांमध्ये पुरेसं पार्किंग नाही, कॉलेजेस नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत.

🔸 ही शहरं छान राहावीत म्हणून धोरण आखायचं असतं आणि हे धोरण ठरवणारे लोकप्रतिनिधी असतात त्यांना निवडणून देण्यासाठीची ही निवडणूक आहे.

🔸 ५ वर्षांपूर्वी तुम्हाला नरेंद्र मोदींनी अनेक स्वप्न दाखवली, पण आज ५ वर्षानंतर निवडणुकांच्या तोंडावर मोदी त्या स्वप्नांवर बोलायला तयार नाहीत. त्यांना निवडणुकीचा प्रचार दुसरीकडे न्यायचा नाही. त्यांना शहीद जवानांच्या जीवावर मतं मागायची आहेत.

🔸 काल त्यांनी माढ्यात कहर केला, त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले ‘मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत’. मग गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेंव्हा तुम्ही गप्प का होता? मोदींच्या गुजरात मध्ये, उना मध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेंव्हा ते गप्प का होते?

🔸 उना मध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावलं, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग माझे अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्ट मध्ये आहेत असं तुम्हीच सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय?

🔸 जर गोमांस निर्यात करणारे तुमचे मित्र असू शकतात तर मग गो-हत्येच्या नावावर ५०, ६० लोकं मारले गेले तेंव्हा तुम्ही का गप्प बसलात?

🔸 बलात्कार हा बलात्कार असतो, अशा घटनांचं राजकारण करायचं नसतं, असं मोदी सत्तेत आल्यावर म्हणाले. मग सत्तेत येण्याच्या आधी निर्भयाच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना घडली, अशा घटनांचं राजकरण करून तुम्ही का मतं मागत होतात? २०१२ साली बलात्काराच्या घटना २४९२२ होत्या तर २०१६ ला हा आकडा ३८८११ आहे आणि २०१७ नंतरचा आकडा बाहेर येऊ दिला जात नाही आहे.

🔸 तुम्ही काहीतरी वेगळं करणार म्हणून तुम्हाला सत्ता दिली, पण तुम्ही सत्तेत आल्यावर आधी पेक्षा देश रसातळाला गेला. देश पाण्यासाठी तडफडतोय, तरुणांना नोकऱ्या हव्यात आणि अशा वेळेला तुम्ही पुतळ्यांवर ४००० कोटी खर्च करत होतात. ह्या देशाला खरंच पुतळ्यांची गरज आहे का?

🔸 डोकलामच्या वेळेला असं वातावरण निर्माण केलं की कधीही युद्ध होईल, मग चीनवर, चीनच्या वस्तूंवर बंदी आणा, मग एवढं होतं तर मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनवून आणला?

🔸 सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगतात, ह्या देशाची लोकशाही धोक्यात आहे हे सांगतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ह्या सरकारच्या दबावाला कंटाळून राजीनामे देऊन निघून गेले. असं भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडलं नाही.

🔸 रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह मधले ३ लाख कोटी रुपये, तेंव्हाचे गव्हर्नर उर्जित पटेल ह्यांच्याकडे सरकारने मागितले. त्यांनी नकार दिला, शेवटी सरकारच्या दबावाला कंटाळून ते निघून गेले. पुढे मर्जीतला गव्हर्नर बसवून त्यांच्याकरवी रिझर्व्ह बँकेला २७ ते २८ हजार कोटी रुपये द्यायला लावले.

🔸 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अट्टहास का? बरं ह्यावर मोदी म्हणाले होते की मुंबई-पुणे बुलेट ट्रेन काय कामाची? बिझनेससाठी अहमदाबादलाच जावं लागतं. पुण्यात जायचं असेल तर फक्त शिक्षणासाठी. बरं तुमचं असं मत असेल तर मला सांगा गुजराती बांधवांना व्यापारासाठी महाराष्ट्रात का यावंसं वाटतंय?

🔸 जे जे राष्ट्राध्यक्ष आले त्यांचं त्यांचं स्वागत मोदींनी गुजरात मध्ये का केलं? त्यांना फक्त गुजरातमध्येच का नेता? देशातील इतर राज्यात का नाही नेलं? मोदी तुम्ही एवढे जगभर फिरलात, काय साध्य केलं तुमच्या परदेश दौऱ्यानी? काय मिळालं देशाला?

🔸 स्वच्छ भारतच्या नावाखाली इतका कर गोळा केलात, कुठे आहे तो पैसा? खरंच भारत स्वच्छ झाला का? त्या रामदेव बाबांच्या नादी लागून योगा दिवस साजरा केला? हे बाबा आहेत कुठे? त्यांचा व्यवसाय ५ वर्षात इतका कसा फोफावला?

🔸 जगातलं सगळ्यात आलिशान असं राजकीय पक्षाचं कार्यालय भारतीय जनता पक्षाने दिल्लीत सत्तेत आल्यावर उभारलं, त्यासाठी पैसे कुठून आणले?

🔸 देशातील बँकांचा पैसा, जो तुमचा आमचा पैसा होता ते घेऊन विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, निरव मोदी, निलेश पारेख, नितीन संदेरसा, चेतन संदेरसा, रितेश जैन, सभ्या सेठ, विक्रम कोठारी हे देशाबाहेर पळून गेले, नरेंद्र मोदींच्या काळात निघून गेले.

🔸 मला कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकवायचं नाहीये पण मोदींनीच ती वेळ आणली आहे. वर्षातून एकदा तुम्ही घरी आईला भेटायला जाणार आणि ते देखील मीडिया घेऊन? आज तुम्ही पंतप्रधान झालात, का नाही आईला स्वतःसोबत रहायला नेत. त्या माउलीचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला.

🔸 नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. त्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना देखील दूर ठेवायला हवं. तुम्हीच आता सारासार विचार करून निर्णय घ्या.

 

मोदी सरकारला सत्तेवरून घालवावेच लागेल-खासदार वंदना चव्हाण

पुणे-डोक्यावर देश बचाव लिहिलेल्या टोप्या घालून, ‘;देश बचाव, संविधान बचाव’देश बचाव, लोकशाही
बचाव’ आणि मोदी हटाव, देश बचावचा नारा देत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या खासदार ,
आमदार, माजी आमदार, माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी
मंडईच्या टिळक पुतळ्या जवळ निदर्शने केली. गेली पाच वर्षे खोटे बोलून जनतेच्या डोळ्यात धूळफेक
करणार्‍या मोदी सरकारला सत्तेवरून घालवावेच लागेच असा निर्धार खासदार वंदना चव्हाण यांनी
व्यक्त केला.


खासदार वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, उल्हास ढोले पाटील, कमलताई ढोले,
ऍड.अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, प्रशांत जगताप, कमल व्यवहारे, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला,
राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन, दत्तात्रे गायकवाड, रवींद्र धंगेकर, मुकारी अलगुडे, वीरेंद्र किराड,
बाळासाहेब अमराळे, रवी चौधरी, बुवा नलावडे, नीता रजपूत,मुख्तार शेख, लक्ष्मीबाई, कांबळे, जयसिंग
भोसले, डॉ. सुनीता मोरे यांसह शेकडो कार्यकर्ते यावेळी सामील झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्यावतीने ही निदर्शने
करण्यात आली. ‘शेतकर्‍यांचे नुसते नाव, नाही दिला हमीभव’, ‘नोटाबंदीचा फेरा, अर्थव्यवस्थेचे तीन
तेरा’, ‘विकसाचा आव उगा, मॉडेलचा फुटला फुगा’, ‘देश बचावचे नुसतेच नारे, मोदी तोडतात अकलेचे
तारे’, ‘राफेलचा सौदा, अंबानींचा फायदा’, ‘मोदीजींच्या घोषणा हजार, काम थोडे सोंगे फार’, ‘नुसताच
बोलबाला, कर्जमाफी झाली कुणा’, ‘कचर्‍याने भरले रस्ते, स्वछ भारत फोटो पुरते’, ‘परिस्थिती
बिकट, सीबीआयही पोपट’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेवून, घोषणा देत पुढे दगडूशेठ
गणपती मंदिराजवळ समारोप करण्यात आला.
खासदार वंदना चव्हाण म्हणल्या, गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला खोटी आश्वासणे देवून
फसवत आहे. अनेक खोट्या घोषणा आणि काम काहीच नाही अशी या सरकारची ओळख आहे.
कुठल्याही कामात सातत्य नाही. त्यांच्याबद्दल बोलणार्‍यांचा आवाज दाबला जात आहे. घटनेने आणि
संविधानाने दिलेला अधिकारावर हुकुमशाही पद्धतीने गदा आणली जात आहे. कोंग्रेस- राष्ट्रवादी
कॉंग्रेस महाआघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार मोहन जोशी, बारामती मतदार संघातील
उमेदवार सुप्रिया सुळे, मावल मतदार संघातील उमेदवार पार्थ पवार आणि शिरूर मतदार संघातील
उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करून मोदींना सत्तेवरून घालवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी
काँग्रेस व मित्रपक्षांच्या मागे उभे राहा असे आवाहन त्यांनी केले.

ही निवडणूक म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठीची अंतिम लढाई-पृथ्वीराज चव्हाण

पुणे- ही निवडणूक म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठीची अंतिम लढाई आहे. अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशा अनेक भूलथापा देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वानवडी येथे झालेल्या ओ. बी .सी. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

वानवडी परिसरातील काँग्रेस पक्षाचे तरुण नेते व ओ. बी .सी संघटक साहिल केदारी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगीअ.भा.अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष व माजीमंत्री नितीन राऊत , शहर काँग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे , आमदार
अनंतराव गाडगीळ , प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड , पुणे लोकसभा मतदार संघातीलकाँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, नगरसेवक अविनाश बागवे,शिवाजीराव केदारी, शांताराम कुंजीर, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष मोरे, गौतम वानखेडे, स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे आदी उपस्थित होते.

या सरकारने नोटाबंदी आणि जी एस टी च्या माध्यमातून सामान्य जनतेवर सर्जिकल स्ट्राईककेला. असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ ३१%मते पडली होती आणि विरोधकांना ६२% मते मिळालेली मात्र विरोधकांची मते विखुरली गेल्याने
भाजपला सत्ता मिळाली आता या निवडणुकीत भाजपच्या विरोधात विरोधकांची महाआघाडी झालीअसल्याने या आघाडीचा विजय निश्चित आहे.

मोदी सरकारने तसेच फडणवीस सरकारने अनुसूचित जातींच्या अनेक योजनांना कात्री लावलीअसा आरोप करून नितीन राऊत म्हणाले, गेल्या ४ वर्षात अनुसूचित जाती तसेच इतरमागासवर्गीय जनतेमध्ये असुरक्षिततेचे भय निर्माण झाले आहे. मोदी सरकारच्या जातीयवादी
कारभाराला जनता आता कंटाळली असून या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे असेही त्यांनी सांगितले.

मोदी यांच्या राजवटीत जातीयवादी शक्ती फोफावल्या असे सांगून रमेश बागवे म्हणाले,राज्यातील दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर या पैकी कोणीही सुरक्षित नाही. अनेक मंत्र्यांचीभ्रष्टाचाराची प्रकरणे विरोधकांनी उघडकीस आणली असताना मुख्यमंत्री मात्र त्याची चौकशी न करता त्यांना क्लीन चिट देण्याचेच काम करत आहेत. पुणे मतदार संघातील भाजपच्या उमेदवाराच्या भ्रष्टाचाराबद्दल तर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तर दुसऱ्या एका राज्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा राज्यकर्त्यांना बाजूला सारण्याची हीच चांगली संधी आहे असे त्यांनी सांगितले.

आमदार शरद रणपिसे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी याना निवडणून आणण्याचा चंग बांधला आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. यावेळी सुषमा अंधारे, मोरे यांचीही भाषणे झाले. साहिल केदारी यांनी आभार मानले.

त्यावेळेस ते म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला असून आता हे अन्यायकारक सरकार बदलण्याचा निर्धार ओबीसी समाजाने केला आहे. या मेळाव्यातील तरुणांचा जोश आणि त्यांची आग्रही भूमिका यामुळे पुण्यातून भाजपा नक्की हद्दपार होणार असाविश्वास त्यांनी टाळ्यांचा कडकडाटात व्यक्त केला. या मेळाव्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकीचे काम करतांना गोंधळून जाऊ नका- विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर

0

पुणे- निवडणुकीचे काम करतांना गोंधळून जाऊ नका, तुमच्‍या कार्यक्षमतेवर आमचा विश्‍वास आहे, पण तुमचा स्‍वत:वर विश्‍वास असला पाहिजे, अशा शब्‍दांत विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी क्षेत्रीय अधिका-यांचा उत्‍साह वाढवला. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सी-विंगमधील नवीन सभागृहात क्षेत्रीय अधिका-यांचे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. त्‍यावेळी ते बोलत होते. जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, बारामतीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष डुंबरे, निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल, पोलीस ऑब्‍झर्व्‍हर आयुष मनी तिवारी, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील,  समन्‍वय अधिकारी डॉ. ज्‍योत्‍स्‍ना पडियार, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, तज्ञ आशीष चौधरी, उपायुक्‍त निलीमा धायगुडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींची उपस्थिती होती.

विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, निवडणूक सहजतेने घेऊ नका, निवडणुकांचा अनुभव असला तरी यावेळी व्‍हीव्‍हीपॅट यंत्रामुळे त्‍याचे अद्ययावत ज्ञान असणे आवश्‍यक आहे. इव्‍हीएम आणि व्‍हीव्‍हीपॅटची हाताळणी योग्य पध्‍दतीने करा. आपल्‍या सर्वांच्‍या प्रयत्‍नांमुळे निवडणुका शांत वातावरणात पार पडेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, निवडणुकीच्‍या कामावरील कर्मचा-यांना योग्‍य ते प्रशिक्षण देण्‍यात आलेआहे. काही शंकाअसतील तर त्‍याचे आत्‍ताच निराकरण करुन घ्‍या, ऐनवेळी गोंधळ निर्माण व्‍हायला नको. मतदान यंत्रांची हाताळणी करतांना काळजी घेतली पाहिजे.प्रशिक्षणामध्‍ये ज्‍याक्रमाने जोडणी सांगितली आहे, त्‍या पध्‍दतीने झाली पाहिजे. निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी   समन्‍वय अधिकारी डॉ. ज्‍योत्‍स्‍ना पडियार आणि तज्ञ आशीष चौधरी या दोघांनी उपस्थित कर्मचारी-अधिका-यांना मतदान यंत्रांबाबतची पुन्‍हा एकदा माहिती दिली तसेच त्‍यांच्‍या शंकांचे निरसन केले.

गरिबांना अधिक गरीब करणाऱ्या मोदी सरकारला पराभूत करा :मोहन जोशी

पुणे –
गेल्या पाच वर्षात मोदींच्या आर्थिक धोरणामुळे गरीब अधिक गरीब झाले आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. नरेंद्र
मोदींनी श्रीमंत अधिक कसे श्रीमंत होतील, याकडेच अधिक लक्ष दिले. देशातील गरीब मात्र दुर्लक्षित राहिले तसेच दलित
,मागासवर्गीय, आदीवासी, भटके – विमुक्त, अल्पसंख्यांक यांच्यावरही फार मोठे अत्याचार होत राहिले यासाठी नरेंद्र
मोदी सरकार आता सत्तेवरून दूर करून शाहू – फुले –आंबेडकर विचारांचे कॉंग्रेस व मित्र पक्षांचे सरकार केंद्रात
आणायचे आहे. त्याचबरोबर गरिबांना दरमहा किमान सहा हजार असे वर्षाला ७२ हजार रुपये मिळवून देण्यासाठी
कॉंग्रेस पक्षाला विजयी करा ,असे आवाहन कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी
आज सायंकाळी लोहियानगर येथून सुरु झालेल्या रॅलीच्या समारोपानंतर केले. या पदयात्रेत कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते
खासदार हुसेन दलवाई व कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील काहीकाळ सहभागी झाले होते.
आज कसबा विधानसभा मतदारसंघातील रॅलीची सुरुवात लोहियानगर येथून झाली. याप्रसंगी कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस
व मित्र पक्षांचे शेकडो कार्यकर्ते, विविध पक्षांचे झेंडे, रिक्षातून निवेदने आणि देशभक्तीपर गीते आणि कार्यकर्त्यांचे
जयघोषचा नारा यामुळे सारे वातावरण भारावून गेले. लोहियानगर येथून ही रॅली चांदतारा चौक , मासे आळी , रवी
पाटोळे आळी , सहा नंबर कॉलनी , गोकुळ वस्ताद तालीम , स्वामी मठ , कस्तुरी चौक, गंजपेठ पोलीस चौक ,
मोमीनपुरा , विजय कदम चौक, सिंहगड गरेज , दलाल चौक, धनगर आळी , गौरी आळी , बंदिवान मारुती , फुलवाला
चौक, कृष्ण हट्टी चौक , बलवार आळी, दलाल चौक , सिंहगड गगरेज टोवर , शितलादेवी चौक, नाईक हॉस्पिटल ,जैन
मंदिर , सुभानशहा दर्गा , रविवार पेठ, श्रीनाथ चित्रपटगृह , शिवाजी रोड , फडगेट , मामलेदार कचेरी, खडकमाळ आळी
गणपती येथे समारोप झाला.
या पदयात्रेत शहर अध्यक्ष रमेश बागवे ,कमल व्यवहारे , कमल ढोलेपाटील,अरविंद शिंदे ,अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर
, रफिक शेख , विरेंद्र किराड , सुजाता शेट्टी, नीता परदेशी , झुबेर दिल्लीवाला यासह कॉंग्रेस –राष्ट्रवादी व मित्र पक्ष
आघाडीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात पाचपर्यंत ५७.२२ टक्के मतदान

0

– अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानात राज्यातील १० मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.२२ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात आज रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.

दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. बुलडाणा 57.09 टक्के, अकोला 54.45 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली 60.69 टक्के, नांदेड 60.88 टक्के, परभणी 58.50 टक्के, बीड 58.44 टक्के, उस्मानाबाद 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के आणि सोलापूर ‎51.98 टक्के.

दुसऱ्या टप्प्यात राज्यात २० हजार ७१६ मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम बंद पडल्याच्या अत्यल्प घटना घडल्या असून त्या ठिकाणी तात्काळ मतदान यंत्रे बदलून मतदान प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. सुमारे ०.४ टक्के मतदान यंत्रे (बॅलेट युनिट तसेच कंट्रोल युनिट) तर ०.९ टक्के व्हीव्हीपॅट बंद पडल्या होत्या त्या तात्काळ बदलण्यात आल्या. त्यामुळे यंत्रातील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत कोठेही खंड पडला नाही, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

या टप्प्यासाठी १ लाख ८ हजार ५९० कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामकाजासाठी नेमण्‍यात आले होते. त्याशिवाय सुमारे २५ हजार पोलीस व अन्य सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. सर्व मतदारसंघांमध्ये मतदारांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रँप आदी सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय २ हजार १२९ इतक्या मतदान केंद्रावरील कामकाजाचे लाईव्ह वेबकास्टींग तर १ हजार ६४१ मतदान केंद्रावरील संपूर्ण कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. सर्व कर्मचारी महिला असलेली ८७ सखी मतदान केंद्रे होती, अशी माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.

राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत ११९ कोटी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये सुमारे ४४.९९ कोटी रुपये रोकड, सुमारे २२ कोटी ५० लाख रुपये इतक्या किंमतीची दारु, सुमारे ६ कोटी ३८ लाख रुपयांचे अंमली पदार्थ तर ४५ कोटी ४७ लाख रुपये किंमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. सी-व्हिजिल ॲपवर नागरिकांकडून ३ हजार ३३८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी तथ्य असल्याचे आढळून आलेल्या १ हजार ९११ तक्रारींमध्ये योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.