मुंबई, दि. 10: नामवंत अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, श्री. कर्नाड हे एक बहुपेडी व्यक्तिमत्व होते. साहित्य, चित्रपट, रंगभूमी यासह वैचारिक क्षेत्रातही त्यांचा समर्थ वावर होता. विशेषत: एक महान रंगकर्मी म्हणून त्यांचे भारतीय नाट्यक्षेत्रातील योगदान सदैव स्मरणीय असेल. ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, साहित्य अकादमी, संगीत अकादमी यांच्यासह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार व नागरी सन्मानांनी झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचे महत्व विशद करणारा आहे. ययाति, तुघलक, नागमंडल, हयवदन यासारखी नाटके आणि उत्सव या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. भारतीय पौराणिक कथांना समकालीन प्रश्नांशी जोडत त्यावर भाष्य करणारे त्यांचे लेखन केवळ समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे नव्हते तर ते विचारप्रवाहित करणारे होते. भारतीय नाट्यक्षेत्राची पुनर्रचना करणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रणी घेतले जाते. ऑक्सफर्डसारख्या नामांकित विद्यापीठाचे स्कॉलर असलेल्या कर्नाड यांचा विविध सामाजिक विषयांचा मोठा अभ्यास होता.
माथेरान येथे जन्मलेल्या कर्नाड यांचा महाराष्ट्राशी अनोखा ऋणानुबंध असल्याने मराठी चित्रपटसृष्टी – रंगभूमी तसेच साहित्य क्षेत्राशीही त्यांचा निकटचा संबंध होता. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटातील त्यांची भूमिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहिल.
कला, साहित्य आणि वैचारिक क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्वाचा अस्त – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
सामाजिक जाण असलेला परखड विचारवंत काळाच्या पडद्याआड! गिरीश कर्नाड यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली
- मुंबई-
प्रख्यात अभिनेते, नाटककार व साहित्यिक गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे सामाजिक जाण असलेला परखड विचारवंत काळाच्या पडद्याआड गेल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
गिरीश कर्नाड हे एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व होते. अभिनय, नाटक आणि साहित्य या तीनही क्षेत्रात त्यांनी राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा उत्तुंग कामगिरी केली. पद्मभूषण, पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण कमळ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपती सुवर्ण पदक, संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. एकाच व्यक्तीला असे विविध क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळण्याची उदाहरणे अपवादानेच आढळून येतात. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचेअशोक चव्हाण यांनी कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले. केवळ एक कलावंत म्हणूनच नव्हे तर सामाजिक जाण असलेले अभ्यासू, परखड विचारवंत म्हणून सुद्धा गिरीश कर्नाड कायम स्मरणात राहतील, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
गिरीश कर्नाड यांच्या जाण्याने कला, साहित्य आणि वैचारिक क्षेत्रात पोकळी – खासदार गिरीश बापट
पुणे : प्रख्यात विचारवंत,नामवंत अभिनेते-दिग्दर्शक, लेखक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
श्री. कर्नाड हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. साहित्य, चित्रपट, रंगभूमी यासह वैचारिक क्षेत्रातही त्यांचे विशेष स्थान होते. कन्नड बरोबर मराठी चित्रपट तसेच नाटकांमधूनही त्यांनी काम केले. ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, साहित्य अकादमी, संगीत अकादमी यांच्यासह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. ययाति, तुघलक, नागमंडल, हयवदन यासारखी नाटके आणि उत्सव या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी केलेली भरीव कामगिरी सदैव समरणात राहील. अशा या बहूआयामी व्यक्तीमत्वास माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
गिरीश कर्नाड यांच्या निधनाने साहित्य आणि अभिनयकलेचा संगम असणारे व्यक्तिमत्व हरपले – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई – ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीतील कसदार अभिनेते; विचारवंत ;लेखक ; नाटककार ; साहित्य आणि अभिनय कलेचा संगम असणारे समृद्ध संपन्न व्यक्तीमत्व हरपले आहे आशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत गिरीश कर्नाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
दिवंगत गिरीश कर्नाड हे वास्तववादी विचारवंत होते.साहित्यिक लेखक म्हणून तसेच अभिनेते दिग्दर्शक म्हणून ही त्यांनी खूप भरीव कामगिरी केली आहे. मानवतावादी समतावादी विचार त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले. त्यांच्या कलाकृतीतून भारतीय सिनेमा आणि साहित्य क्षेत्र समृद्ध करण्याचा त्यांचा कायम प्रयत्न होता. त्यांचा अभिनय सिनेरसिकांच्या मनात कायम घर करून आहे. चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.गिरीश कर्नाड यांना पद्मश्री ; पद्मभूषण किताबाने गौरविण्यात आले होते.तसेच ज्ञानपीठ पुरस्कार आदी अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टी आणि साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशी शोकभवना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
खिडकी (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)
मेरे सामने वाली खिडकी में, एक चाँद सा टुकडा रहता है… मस्ती चॅनेलवर ‘पडोसन’ चित्रपटातील सुनील दत्त-सायरा बानोवर चित्रित केलेलं गाणं सुरू होतं. समोर मोठ्या खिडकीत सायरा बानो…दोन दरवाजे आणि त्याला दोन पार्टीशनमध्ये असलेले झुळझुळीत पडदे आणि ती खिडकी ! 1968 साली प्रदर्शित झालेल्या पडोसन मधील खिडकीवरील हे सुपर डुपर हिट गाणे. तर त्या आधी म्हणजेच 1951 मध्ये अशाच एका खिडकीवरील गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. ते गाणे होते ‘अलबेला’ चित्रपटातील …
-शाम ढले खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो,
घडी घडी खिडकी में खडी, तुम तीर चलाना छोड दो…भगवान आणि गीता बालीवर चित्रित झालेलं हे गाणं… खिडकीवरील ही दोन्ही रेकॉर्ड ब्रेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत
त्या काळी बहुतेक घराला अशाच म्हणजे दरवाजे असलेल्या काचेच्या चौकटीतल्या खिडक्या होत्या. मग तो बंगला असो वा चाळीतले घर. बंगला असेल तर त्याला झुळझुळीत पडदे आणि चाळीतील खिडकीला जुन्या साडीचे पडदे, पण स्टाईल मात्र एकच होती-दोन पार्टीशन असलेले पडदे. खिडकीच्या दोन्ही बाजूला हुक लावायचे आणि त्या हुकना स्प्रिंग लावून त्यामध्ये ते पडदे लावले जायचे. चाळीतल्या घराला किमान दोन तरी खिडक्या असायच्याच, एक स्वयंपाकघराला आणि आणि एक हॉलला.
स्वयंपाकघराच्या खिडकीशी गृहिणीचे खास असे नाते जोडलेले असायचे. स्वयंपाक करता करता खिडकीतून आत येणारी हवा आल्हादायक असायची. खिडकीजवळ रेडिओ ठेवला जायचा…कारण का तर आवाज नीट ऐकू यावा आणि खरखर होऊ नये म्हणून. सकाळच्या बातम्यांपासून ते विविध भारतीवरील कार्यक्रम ऐकत कामं चालायची. रोजच्या वेळेला कावळा पोळीच्या तुकड्यासाठी खिडकीवर येऊन बसून काव काव करायचा. मग ती गृहिणी हमखास त्याला पोळीचा तुकडा द्यायची आणि म्हणायची सुद्धा…आज अजून काव काव ऐकू कशी आली नाही याचाच विचार करत होते. तिचा आणि कावळे दादा मधील हा रोजचा संवाद… खिडकीशी असलेले जिव्हाळयाचे नाते ‘लंच बॉक्स’ या चित्रपटात मार्मिकपणे दाखवले गेले आहे. इला व तिच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आंटी या दोघींचा खिडकीतून चालणारा संवाद आणि टोपलीला दोरी बांधून त्यामधून वस्तूंची देवाणघेवाण.
घरातल्या लहान मुलांना कडेवर घेऊन आयाबाया खिडकीत येणाऱ्या चिऊ-काऊ दाखवत त्यांना गोष्टी सांगत. चिऊ-काऊचा घास भरविण्याचा रोजचा परिपाठ असे. रात्री त्याच खिडकीमधून चांदोबाचे दर्शन व्हायचे आणि वाऱ्याची थंडगार झुळूक यायची. खिडकी सदैव उघडीच. पावसाळ्यातच काय ती बंद व्हायची आणि तीही मोठा पाऊस आला तरच. नाहीतर खिडकीतून येणारा पावसाचा शिडकावा तितकाच रोमहर्षक असायचा. आणि खिडकीत उभं राहून पावसाची वाट तितक्याच आतुरतेने पाहिली जायची. काळे ढग जमू लागले की खिडकीची काही दुरुस्ती असेल तर तीही केली जायची.
खिडकीत उभं राहून निवांतपणे बाहेरचं जग अनुभवण्याचा विरंगुळा काही औरच होता. मनातल्या गुजगोष्टीही खिडकीपाशी व्हायच्या आणि डोळ्यांतल्या गंगा-जमुनाही वाहून जायच्या. मनात चाललेला विचारांचा गोधळ असो वा भावनांचा कल्लोळ…जणू काही या खिडकीलाच कळायचा.
खिडकी ये सोने ना दे रे, रात भर मुझे जगाए रे…सपनों को, करवटों को, यादों को, उल्झनों को, रात भर फिर जगाए रे… रघु दीक्षित यांच्या गाण्यात त्यांनी तो आर्त भाव मांडला आहे.
अशी ही खिडकी फ्लॅट संस्कृतीत मात्र कुठे तरी गायबच झाली. आता आल्या मोठमोठ्या विंडो. उघडझाप काचेच्या चौकटीतले दरवाजे जाऊन मोठाल्या स्लायडिंग विंडो आणि हुकवर लावलेले पडदे जाऊन मोठे चॅनेल किंवा रॉडमधील डिझाइनर पडदे आले. त्यापुढे बंदिस्त ग्रिलही! आता कावळे दादाची कावकाव नाही आणि चिऊ-काऊची गोष्टही नाही. खिडकी आणि चिऊ-काऊही गोष्टीरूपात पुस्तकात जाऊन बसले. खिडकीतून दिसणारे मोहक दृश्य नाही की चांदोबाचे दर्शनही नाही.
मनातल्या भावनांच्या बंद झालेल्या खिडकीला आता उघडण्यासाठी आर्जव करावा लागेल. ‘रुख’ चित्रपटातील या गाण्याने ती आर्जवता मांडली आहे-
देखो एक तरफ हे सुबह हो चली,
पर अंदर अभी भी राते ना ढली,
अब धूल चटक के भूल जा ना बिसरी,
रूह मोड दे अब तो खोल दे जिंदगी,
खुल जा रे…खुल भी जा ना रे खिडकी…
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068
ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचे निधन
मुंबई – जेष्ठ अभिनेते, लेखक आणि नाटककार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी बंगळुरु येथील राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवस ते आजारी होते. अखरे सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.कर्नाड हे कन्नड भाषिक लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. एक था टायगर, टायगर जिंदा है, चॉक अँड डस्टर, शिवाय यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. तर ययाति, तुघलक. हयवदन ही त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली आहेत. गिरीड कर्नाड यांना दहावेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे.कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तसेच 1998 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
चळवळ्या कार्यकर्ता
वयाची पंच्च्याहत्तरी पार केल्यानंतरही कर्नाड कार्यरत होते. सार्वजनिक कार्यक्रम, चर्चासत्रे व साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर हजेरी लावत होते. आपली मतं ठामपणे मांडत होते. गिरीश कर्नाड यांनी त्यांची मतं वा भूमिका कधीच लपवल्या नाहीत. देशातील वाढती असहिष्णुता व साहित्यिक, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात त्यांनी नीडरपणे आवाज उठवला. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या स्मृतिदिनी ‘मी सुद्धा अर्बन नक्षल’ म्हणत ते एका कार्यक्रमात सहभागी झाले. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चांमध्ये सहभागी झाले होते. देशातील पुरोगामी चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते.
माथेरान ते ऑक्सफर्ड
गिरीश कर्नाड यांचा एकूण प्रवास प्रेरणादायी होता. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान इथं १९ मे १९३८ साली त्यांचा जन्म झाला. कर्नाटक विद्यापीठातून १९५८ साली त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं. पुढं फेलोशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं त्यांनी एमएची पदवी घेतली. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं. अफाट वाचन, चिंतन आणि प्रयोगशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या साहित्य व नाट्यकृतीतून त्यांची ही सर्जकता सतत प्रतिबिंबित होत राहिली.
राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची सर्वानुमते निवड
पुणे (प्रतिनिधी) :
राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची सर्वानुमते आज निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक झाली त्यात ही घोषणा करण्यात आली. पूर्व अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्रे आज सोपवली.
यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘राष्ट्र सेवा दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याजवळ लोकशाही समाजवाद आणि साने गुरुजींच्या विचारांची शिदोरी आहे. सेवा दल कार्यकर्त्यांजवळ प्रगल्भता, कृतीशिलता आणि सभानता ही त्रिगुणसूत्री आहे. या वारशाच्या जोरावर देशातील लोकशाही समाजवाद मानणाऱ्या नागरिकांकडे जाऊन आपण त्यांना सेवा दलाशी जोडूया. समविचारी व्यक्ती, संस्था आणि प्रक्रिया यांची भक्कम एकजूट उभारून आपण फॅसिस्ट शक्तींशी लढूया.
पुण्यात साने गुरुजी स्मारकावर सेवा दल मंडळाची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश परांजपे, विश्वस्त आमदार कपिल पाटील, अंजलीताई आंबेडकर, डॉ. झहीर काझी, सुरेखाताई दळवी, माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा, अरविंद कपोले, भरत लाटकर हे उपस्थितीत होते. निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून झाकीर अत्तार यांनी काम पाहिले.
डॉ. गणेश देवी यांच्याविषयी…
पद्मश्री डॉ. गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत आणि सांस्कृतिक नेते म्हणून प्रसिध्द आहेत. तर दक्षिणायन चळवळीमुळे १३ राज्यं त्यांना आपला माणूस मानतात. भारतातील ७५० भाषांमधील लोक त्यांना आपल्या बोली भाषांना सन्मान आणि अस्मिता देणारा प्रेरक मित्र मानतात. मराठीतील माध्यमं त्यांना ऋषीतुल्य म्हणून गौरवतात. राष्ट्रीय किंवा राजभाषा म्हणून मान्यता नसलेल्या ४० भाषांना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. समूहांची ओळख करुन देणारा भाषा शास्त्रज्ञ गणेश देवी. देशातील लुप्त होणाऱ्या शेकडो वंचित व भटक्या समाजाच्या भाषांना त्यांनी आपल्या कामाने संजीवनी दिली. देशातील ७५० भाषांची नोंद करण्याचं संशोधनाचं ऐतिहासिक काम देवी यांनी त्यांच्या ३००० सहकारी अभ्यासकांच्या साथीने ३ वर्षात पूर्ण केलं.
आदिवासी आणि अनेक वंचित समूहांशी नातं जोडणारा आपला माणूस म्हणजे गणेश देवी. साने गुरुजी आणि सेवा दलावर निस्सिम प्रेम करणारा धडपडणारा विचारवंत कार्यकर्ता म्हणजे गणेश देवी. गांधी आंबेडकर विचारांच्या समन्वयासाठी धडपडणारा दुवा म्हणजे गणेश देवी.
इंग्रजी भाषेचे प्रध्यापक म्हणून बडोदयाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुरेखा देवी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञ आहेत. नोबेल प्रईज निवड समितीच्या केमिस्ट्री विभागात तज्ज्ञ सदस्य म्हणून सुरेखा देवींनी काम केलं आहे. इंग्लंडमधील विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्यापन केले आहे.
पुणे जिल्हयातील भोर हे डॉ. गणेश देवी यांचं जन्मगाव. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात त्याचं उच्च शिक्षण झालं. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लिड्समध्येही काही काळ त्यांनी शिक्षण घेतलं. मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत त्यांनी लेखन केलं. वानप्रस्थ (मराठी) आदिवासी जाने छे (गुजराती) अफ्टर अॅम्नेशिया (इंग्रजी) ही डॉ. गणेश देवी यांची पुस्तकं गाजली. १०० च्या वर त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात आदिवासी संस्कृतीचा अभ्यास आणि संवर्धन करणारं मोलाचं काम डॉ. देवी यांनी केलं. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. साहित्य अकादमीचा देशपातळीवरील मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. देशात नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्येनंतर अस्वस्थ होऊन डॉ. देवी यांनी दक्षिणायन ही चळवळ सुरु केली. त्यात देशभरातील हजारो लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सामिल झाले. विचारवंतांच्या हत्येचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीच्या चळवळीला चालनाही गणेश देवी यांनीच दिली. दक्षिणायन आता देशातली महत्वाची वैचारिक चळवळ बनली आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत
११ व १२ जून रोजी मासेमारांनी समुद्रात जाऊ नये!
मुंबई-
भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील.
हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुरक्षितेसाठी मासेमारांनी ११ व १२ जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी ४८ % महिलांसह २ लाख भारतीय मुस्लिम बांधव हजला जाणार: केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
मुंबई-
यंदा कोणत्याही अनुदानाशिवाय २ लाख एवढ्या विक्रमी संख्येने भारतीय मुस्लिम बांधव हज यात्रेला जाणार असल्याचे केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. देशभरातल्या २१ विविध ठिकाणांहून ५०० हून अधिक उड्डाणे हज साठी उपलब्ध केली जातील असे ते म्हणाले.
ते आज मुंबईत हज हाऊस येथे खासगी सहल संचालकांच्या प्रतिनिधिंबरोबर झालेल्या बैठकीत बोलत होते. 1 लाख 40 हजार हज यात्रेकरू भारतीय हज कमिटीच्या माध्यमातून तर 60 हजार यात्रेकरू खासगी सहल संचालकांच्या माध्यमातून हजला जाणार आहेत असे नक्वी म्हणाले. भारतीय हज कमिटीने ठरवलेल्या दरांनुसारच खासगी सहल संचालकांना १० हजार यात्रेकरूंना हजला न्यावे लागेल असे ते म्हणाले.
हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी -http://haj.nic.in/pto/ (Portal For Haj Group Organisers) हे पोर्टल विकसित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यंदा एकूण ७२५ खासगी सहल संचालक हज यात्रेकरूंना घेऊन जाणार आहेत असं ते म्हणाले.
हज यात्रेकरूंची सुरक्षा आणि उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून याबाबतीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. यंदा ३ खासगी सहल संचालकांना गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे नक्वी म्हणाले. गेल्या वर्षीही अनेकांविरूध्द कठोर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावर्षी मेहराम शिवाय हज यात्रेला जाणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याचे ते म्हणाले. यंदा २३४० मुस्लिम महिला मेहराम शिवाय हजला जाणार आहेत. २ लाख भारतीय हज यात्रेकरूंमध्ये ४८ % महिला आहेत असे ते म्हणाले.
भारताचा हज कोटा २ लाख पर्यंत वाढवण्याच्या सौदी अरेबियाच्या निर्णयामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच उत्तर प्रदेश, प. बंगाल, आंध्रप्रदेश, बिहार सारख्या मोठ्या राज्यातल्या सर्व हज यात्रेकरूंना यंदा हजला जाता येईल असे नक्वी म्हणाले.
हज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन / डिजिटल झाल्यामुळे हज यात्रा अनुदान रद्द करूनही कमी खर्चिक झाली आहे असे ते म्हणाले.
हजसाठी एकूण १४ आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. ४ जुलैपासून हजसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पहिल्या पॅकेजमधील 70 टक्के कामे पूर्ण
पुणे -मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पहिल्या पॅकेजमधील 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, विशेषतः बाणेर भागातील नालेजोडणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल तसेच माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.लवकरच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, खासदार आणि पुण्याचे महापौर यांच्यासह प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट देऊन कामांची पाहणी करतील, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.
या प्रकल्पातील चार नव्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची कोनशिला येत्या दोन महिन्यात, म्हणजेच ऑगस्ट 2019 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत, ठेवली जाईल, अशी घोषणा जावडेकर यांनी केली. ह्या चारही प्रकल्पांना लवकरच अंतिम मंजुरी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यात घेतलेल्या एका बैठकीनंतर जावडेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत, त्यांनी मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीत, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे अधिकारी, राज्य सरकारच्या वन, जलसंपदा आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी, राज्य प्रदूषण मंडळ आणि पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेले सल्लागार उपस्थित होते.
ह्या प्रकल्पाचे काम आता जलदगतीने सुरु झाले असून, त्यामुळे पुणेकरांचे स्वच्छ नदीचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे, प्रकल्पाशी संबंधित सर्व यंत्रणा एकत्र आल्या असून, त्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची कालमर्यादा आखली आहे, ह्या कालमर्यादेत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली, जावडेकर स्वतः दर महिन्याला प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.
हा केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिका यांचा संयुक्त प्रकल्प असून राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत तो कार्यान्वित केला जात आहे, हा प्रकल्प जपानची आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था, जायकाचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जायकाने केवळ ह्या प्रकल्पासाठी कर्ज दिले आहे, मात्र प्रकल्प पूर्ण करणे ही केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिकेचीच जबाबदारी आहे, असे जावडेकर म्हणाले.
तसेच, या प्रकल्पासाठी जायकाने दिलेल्या कर्जाची परतफेड, राज्य सरकार अथवा पुणे महानगरपालिकेला करायची नसून, केंद्र सरकारच हे कर्ज फेडणार आहे, असेही पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ही पुण्याला दिलेली भेट आहे, असे जावडेकर म्हणाले. हा प्रकल्प गेली 10 वर्षे म्हणजेच, 2004-2014 इतक्या दीर्घकाळापासून प्रलंबित होता,मात्र 2014 साली आपण पदाची सूत्रे सांभाळल्यानंतरच, ह्या प्रकल्पाला मंजुरी दिली, अशी माहितीही प्रकाश जावडेकर यांनी दिली.
पार्श्वभूमी:
मुळा-मुठा नदी ही देशातील 35 अत्यंत प्रदूषित अशा मोठ्या नद्यांपैकी एक असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तीचे वर्गीकरण प्राधान्य क्रमांक 1(सर्वोच्च धोकादायक वर्ग) या गटात केले आहे. प्रक्रिया न केलेले घरगुती सांडपाणी नदीमध्ये सोडले गेल्यामुळे तसेच कचरा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे, हा कचरा तसाच नदीत टाकला जात होता, त्यामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढले आहे. शहरात तसेच नदीकिनारी असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची क्षमता कमी असणे, तसेच नदीकिनारी शौच करण्याच्या प्रकारांमुळे नदीतील प्रदूषण वाढले आहे.
भारत सरकार आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य कंपनी जायका यांच्यात, जानेवारी 2016 साली मुळा-मुठा नदी शुद्धीकरणाबाबत एक करार करण्यात आला, त्यावेळचे पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला होता.
ह्या करारानुसार, जपान सरकार केंद्र सरकारला 19.064 अब्ज येनचे सॉफ्ट कर्ज देणार असून त्यावर केवळ 0.30% वार्षिक व्याज आकारले जाणार आहे. ह्या प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिका करेल आणि त्याचा वाटा अनुक्रमे 85:15 असा असेल. ह्यात केंद्र सरकार 841.72 कोटी रुपये तर महानगरपालिका 148.54 कोटी रुपये इतका खर्च करणार आहे. हे कर्ज फेडण्यासाठी जपानने 40 वर्षांचा अवधी दिला असून त्याला 10 वर्षांच्या मुदतवाढीची सुविधा देण्यात आली आहे. हा प्रकल्प जानेवारी 2022 मध्ये पूर्ण होणार आहे.
ह्या प्रकल्पाअंतर्गत, अकरा नवे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधले जाणार असून, त्याच्याशी 113.6 किलोमीटर्सच्या सांडपाणी पाईपलाईन्स टाकल्या जाणार आहेत. ह्या पाईपलाईन्स मधून सध्या असलेल्या चार पंपिंग स्टेशन्समधले सांडपाणी, प्रक्रिया केंद्रांमध्ये आणले जाईल. यामुळे, पुण्यातल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची क्षमता 477 एमएलडी वरुन 873 एमएलडीपर्यंत वाढणार आहे. ही क्षमता 2027 पर्यत पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम असेल.
नवे सांडपाणी प्रक्रिया केंद्र 10 mg/l जैव प्राणवायू मागणी (BOD)च्या प्रवाहांच्या दर्जाचे असणार आहेत. त्याशिवाय, सर्व प्रक्रिया केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षण नियंत्रण आणि देखरेख केंद्र व्यवस्था SCADA उभारली जाणार आहे. उघड्यावर शौचाचा प्रश्न सोडवण्यासाठी, झोपडपट्टी आणि नदीकाठच्या भागात २४ सामुदायिक शौचालये बांधली जात आहेत. त्याशिवाय जनसहभाग आणि जनजागृती उपक्रमातून नदीस्वच्छतेच्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत. जायकाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात आले असून, ते ह्या प्रकल्पाची अंमलबजावणी आणि देखरेख यासाठी मदत करणार आहेत.
ह्या प्रकल्पामुळे मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी होईल आणि त्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल. त्याशिवाय, सांडपाणी प्रकिया केंद्रातील प्रक्रियाकृत सांडपाणी आजूबाजूच्या भागात सिंचनासाठी वापरले जाणार आहे. ह्या प्रकल्पामुळे पुण्याचे सौंदर्य आणि स्वच्छतेतही वाढ होईल.
बायोगैस(मिथेन) आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. हा केवळ पारंपारिक उर्जा स्त्रोत नसेल तर, मिथेनचा वापर उर्जानिर्मितीसाठी झाल्यामुळे कार्बन उत्सर्जनही कमी होण्यास मदत होईल
पावसातही खासदार बापट यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद
जुन्नर तालुक्यात दहावीचा निकाल ८२.१७ टक्के ..पहा कोणत्या शाळेचा किती निकाल ….
7 दिवसांपासून बेपत्ता एएन-32 विमानाची माहिती देणाऱ्याला 5 लाखांचे बक्षिस
नवी दिल्ली- भारतीय वायुसेनेना सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एएन-32 विमानबद्दल माहिती देणाऱ्याला 5 लाख रूपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. शनिवारी पूर्व एअर कमांडचे एअर मार्शल आर.डी. माथुर यांना या गोष्टीची घोषणा केली आहे. एएन-32 ने 3 जूनला असमच्या जोरहाट एअरबेसवरून उडाण घेतली होती. त्यानंतर अरुणाचलच्या मेनचुका एअर फील्डवरून उडत असताना विमानाचा संपर्क तुटला होता, हा परिसर चीनच्या जवळील आहे. विमानात 5 क्रु मेंबर आणि 8 प्रवासी होते.
वायुसेनेने विमानाची माहिती देण्यासाठी वायुसेनेच्या विभागाचे फोन नंबर (0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477) देखील दिले आहेत. त्यांनी सांगितले की, खराब हवामान असूनही लष्कर, वायुसेना, ग्राउंड फोर्स, सी-130जे, हेलिकॉप्टर, आणि नौसेनेचे पी-8आय तपास करत आहेत. सियांग जिल्ह्यातील अंदाजे 2500 वर्ग किलोमीटर क्षेत्राची तपासाणी झाली आहे.
उपग्रहांच्या मदतीने विमानाचा शोध
वायुसेनेने सांगितले की, जमिनीवर तपास करत असलेल्या टीमकडून क्रॅश क्रॅश होऊ शकत असलेल्या जागांबद्दल काही माहिती हाती लागली आहे, त्यामुले हेलिकॉप्टर संबंधित लोकेशेनवर पाठवले पण विमानाचे अवशेष सापडले नाहीत. वायुसेनेच्या सुत्रांनी सांगितले की, इस्रोच्या सॅटेलाइटच्या मदतीने विमानाचा शोध सुरू आहे. त्या उपग्रहांकडून अरुणाचल आणि असमच्या काही भागांवर निगराणी ठेवण्यात येत आहे.
विजय माल्याने पाहिला भारत-ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील सामना
ओव्हल – मद्य व्यवसायिक विजय माल्या आज(9जून)ला भारत-ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील सामना पाहण्यासाठी इंग्लडच्या ओव्हल मैदानात आला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाला-“मी सामना पाहण्यासाठी आलो आहे.” माल्या यापूर्वीही सप्टेंबर 2018 मध्ये भारत-इंग्लंडमध्येफरार झालेला टेस्ट सामना पाहण्यासाठी आला होता. तेव्हा काही भारतीय समर्थकांनी “चोर…चोर…” अशा घोषणा दिल्या होत्या.
माल्याला इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीमला भेटायचे होते, पण तेव्हा इंग्लड सरकारने याची परवानगी दिली नाही. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यानही माल्या भारतचा सामना पाहण्यासाठी गेला होता, त्यावेळी त्याला हुटींगचा सामना करावा लागला होता.
माल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज
आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) मध्ये माल्या रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर टीमचा मालक होता. आता त्याचा मुलगा सिद्धार्थ माल्या सध्या त्या टीमचा मालक आहे. माल्याविरूद्ध फ्रॉड, मनी लॉन्ड्रिंग, फेमाचे उल्लंघन, असे आरोप आहेत. माल्यावर भारतीय बँकांचे 9,000 कोटींचे कर्ज आहे. त्याच्या किंगफिशर एअरलाइंसने बँकांकडून कर्ज घेतले होते. माल्या 2016 मध्ये लंडनला पळून गेला होता. मुंबईच्या विशेष न्यायालयाने(पीएमएलए) त्याला “आतंराष्ट्रीय भगोडा(फरार)” घोषित केले होते. ईडीने त्याची देश आणि परदेशातील सर्व संपत्ती जप्त केली आहे, तसेच लडंनच्या वेस्टमिन्सटर कोर्टात त्याच्या आत्मसमर्पणाचा खटला सुरू आहे.




