Home Blog Page 2615

ससूनसाठी अधिष्ठाता नियुक्त करा -भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

0
पुणे, ता. २७ ः पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदासाठी अनुभवी, सक्षम आणि पूर्ण वेळ अधिकार्‍याची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मु‘यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

सर्वसामान्य रुग्ण उपचारांसाठी ससून रुग्णालयावर अवलंबून असतात. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ससून रुग्णालयावरील ताण वाढलेला आहे. ससूनच्या नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या ठिकाणी दाखल केलेल्या अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सक्षम अधिकार्‍याची तातडीने गरज असल्याचे मुळीक यांनी पत्रात म्हटले आहे.

डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर ससूनमधील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी यांचे मनोधैर्य खचले आहे. या सर्वांनी या विषयीच्या भावना कृतीतून आणि पत्र लिहून सरकारकडे व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घ्यावा असे आवाहन मुळीक यांनी केले आहे. 

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गुरुवार, दिनांक १६ एप्रिल रोजी राज्य शासनाने बदली केली. सध्या त्यांचा पदभार रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.

पुणे महानगरपालिकेची 350 आरोग्य पथके झोपडपट्टी भागात आरोग्य तपासणी करणार

0

– विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे दि.27 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टी व दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी 350 पथके तयार केली असून या माध्यमातून गतीने आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे शहरामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक व ज्यांना इतर विकार आहेत जसे की, डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा अश्या वेगवेगळ्या विकारांमुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि असे विकार असणा-या व्यक्ती कोरोनाबाधित होवून तो रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकारातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्या आहेत,त्या भागात 350 पथके पाठविण्यात येत आहे. या पथकाकडे पल्सऑक्सीमीटर, थर्मोस्कॅनर देण्यात आले आहेत. या माध्यमातून विविध विकार असलेल्या रुग्णांचा तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची ऑक्सीजन सर्क्यलेशन लेव्हल, त्यांचे विकार नियंत्रणात आहेत की नाही, आणि त्यांना संभाव्य कोविड रोग होत असेल तर त्यांना वेगळे करुन त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याबाबतची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे.
पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेअंतर्गत आपल्या घरातील ज्येष्ठ तसेच इतर काही विकार असणा-या व्यक्तीला तपासून वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या घरात वेगळ्या रुममध्ये ठेवणे किंवा मनपाने सोय केलेल्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कोरोना या रोगावर मात करण्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. 60 ते 70 टक्के लोकांना हा रोग जीवघेणा ठरत नाही, मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत या मोहिमेअंतर्गत त्यांची तपासणी करुन घ्यावी , असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
0000000

रस्त्यावरची मुकी जनावरे राहू नयेत उपाशी – नगरसेवक उमेश गायकवाड :१००० किलो डॉग फूड ,२४ स्वयंसेवकांसोबत घेणार त्यांची दक्षता.

0

नगरसेवक उमेश गायकवाड आणि रेसेक्यू  चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम 

पुणे- कोरोनाशी शासन ,महापालिका आपापल्या स्तरावर लढा देत असताना कोरेगाव पार्क घोरपडी परिसरातील नगरसेवक उमेश गायकवाड  यांनी आपल्या प्रभागात कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या  मदतीने गरजूंना अन्न पुरविण्याचा उपक्रम विविध मार्गे सुरु ठेवला आहे याचाच भाग म्हणून त्यांनी रस्त्यावरची मोकाट जनावरे देखील उपाशी राहू नयेत म्हणून १ लक्ष रुपये चे १००० किलो फिडेल चिकन सॅसेज हे खरेदी केले आहे जे रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीने२४ स्वयंसेवकांमार्फत रस्त्यावरील प्राण्यांपर्यंत पोहोचविले जाते आहे.

नगरसेवक गायकवाड यांनी या प्रकरणी सांगितले कि,  लॉक डाऊन मुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत जेव्हा माणसांना अन्न टंचाई भासत आहे त्यावेळी आपल्या प्रभागातील १०,००० कुटुंबांना रेशन पुरवले आहे आणि पुरवत आहेत,   प्रभागातील प्रत्येक गरजू घरात रेशन तर पुरवलेच एवढं नव्हे तर प्रभागातील रस्त्यांवरील मुक्या प्राण्यांसाठी (कुत्रे – मांजर) अन्न पुरवण्याचा संकल्प  केला आहे. पुणे शहरातील ते एकमेव असे नगरसेवक असतील ज्यांनी हे चालू केले आहे. असे रेसेक्यू ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
नगरसेवक उमेश गायकवाड मित्र परिवारातर्फे १ लक्ष रुपये चे १००० किलो फिडेल चिकन सॅसेज रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीने खरेदी केले असून, २४ स्वयंसेवकां मार्फत ते विभागणी करून ते दिले जाणार आहे. रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक नेहा पंचमीया मॅडम, मंजिरी पटवर्धन मॅडम तसेच  खोडू इराणी आज उपस्थित होते.रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांचा सहकार्याने ते विविध भागात पुरवले जाणार आहे.
बोट क्लब रोड, रुबी हॉल परिसर,  नेलोर रोड, कोरेगाव पार्क मधील सर्व लेन, नॉर्थ मेन रोड, वेस्टीन हॉटेल पासून ताडी-गुत्ता चौक, पिंगळे वस्ती, शिर्के कंपनी रोड, बी. टी कवडे रोड, घोरपडी परिसरामध्ये पुरवले जाणार आहे.

गर्दी कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ वाढवा : महापौर मुरलीधर मोहोळ

0

पुणे शहर पोलिसांकडे मागणी

पुणे (प्रतिनिधी) :शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत असावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. त्यावर तातडीने निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून याबाबत आजच निर्णय होणार असल्याचे समजते आहे.

कोरोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शहर पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील दुकाने, भाजी विक्री यांची वेळ सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. परंतु वेळेअभावी नागरिकांची मोठ्या प्रमाणात दुकानासमोर गर्दी होत आहे, दुकानासमोर रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही. जर दुकानांची वेळ दोन तासांनी वाढवली तर दुकानदार, नागरिक व तसेच पोलीस प्रशासनावरील ताण कमी होईल. यासाठी दुकानांची वेळ दोन तासांनी वाढवून सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत करावी, अशी मागणी महापौर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशंम आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्याकडे केली आहे.

पोलीस प्रशासनाने दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीबाबत अनुकूल प्रतिसाद देत लवकरच या बाबतचा रीतसर आदेश काढत अंमलबजावणी केली जाईल, अशी सकारात्मक भूमिका पोलिसांनी घेतल्याचे महापौर मोहोळ यांनी म्हटले आहे.

भाजपच्या राघवेंद्रबाप्पू मानकर यांच्याकडून 2020 जणांना धान्य वाटप

0

सेवा हैं यज्ञकुंड…

काव्याच्या या ओळींनी जीवन समर्पित करणारे संस्कार स्वीकारून राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी स्वखर्चाने २०२० धान्य किट पक्षाच्या वतीने मोफत वाटपाचा संकल्प सोडला आहे. ज्याचा शुभारंभ आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला.

आज करोनाच्या वैश्विक संकटाशी आपण सगळेच दोन हात करत आहोत. केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे मनपा पुणे जिल्हा परिषद तसेच सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्स सगळ्यांनी या युध्दात उडी घेतली आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, कार्यकर्ते, गणपती मंडळे सगळेच आपल शहर राज्य आणि देश वाचवायला पुढे सरसावले आहेत.
राघवेंद्र बाप्पू मानकर यांनीही या संकटाशी सामना करण्यात  पाहिल्या दिवसा पासून कामाला सुरुवात केली आहे.  पुणे मनपा विलगीकरणं कक्षातील नागरिकांना सकाळच्या चहा नाष्ट्या पासून रात्रीचे जेवण असो, पोलिस बांधवांना चहा जेवण असो, पहाटे स्वच्छता कर्मचारी भगिनींना चहा नाष्टा असो, लॉक डाऊन साठी बॅरिगेटिंग असो किंवा येरवडा कारागृहातील सुरक्षा यंत्रणेला मास्क आणि सेनिटायझर पुरवणे असो जी मदत मागितली गेली ती  पूर्ण करण्याचा यत्न केला .
आता या पुढे लॉक डाऊन अजुन काटेकोर पणें पाळणे अत्यावश्यक झाले आहे कारण वाढणार आकडा. त्यामुळे सर्व किराणा दुकाने ठराविक वेळेत उघडी असणार आहेत परंतु अश्या काळात बरेच असे लोक असतील की ज्यांच्याकडे दुकानं उघडी असून पण समान खरेदी साठी पैसे नसतील. म्हणून राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्या कडून भारतीय जनता पक्ष यंत्रणेतून २०२० धान्य किट शहरातील गरजू कुटुंब आणि महत्वाचं म्हणजे शिक्षण आणि नोकरी साठी शहरात वास्तव्यास असणारा युवा वर्ग यांच्या साठी तयार करून प्रशासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि पालन करत वाटण्यात येणार आहेत. आज या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला.

मालेगावात तिघे झाले कोरोनामुक्त….

0

मालेगाव- येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन कोरोना बाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून आज घरी सोडण्यात आले, मालेगाव शहरातून प्रथमच एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांचा आरोग्य प्रशासनावरील विश्वास वाढुन नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

मन्सुरा हॉस्पिटल मधून कोरोनामुक्त झालेल्या तीनही रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, इन्सिडन्ट कमांडट तथा उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, डॉ.सुशिलकुमार शिंदे, डॉ.अरुण पवार, महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय काथेपुरी, माजी आमदार रशीद शेख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.भुसे म्हणाले, तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून रुग्णालयातील डॉक्टरांची टीम, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. रुग्णालयातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, इतर सर्व कोरोना रुग्णही या रुग्णांप्रमाणे लवकरच बरे होतील, असा विश्वास व्यक्त करत मंत्री श्री.भुसे म्हणाले, मालेगाव मधील रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी वेळेवर रुग्ण दवाखान्यात आले, तर त्यांना बरे करण्याची पूर्ण क्षमता आपल्या आरोग्य प्रशासनात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अथवा गैरसमज न ठेवता आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने दवाखान्याशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले.

मालेगाव येथील कोरोनामुक्त झालेले हे रुग्ण अनुक्रमे 7 व 9 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने योग्य उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात मोठे यश संपादन केले आहे. त्या रुग्णांचा अनुक्रमे 21 व 23 रोजी करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा 24 तासानंतर घेण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीतही त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज ते कोरोनामुक्त घोषित करुन घरी सोडण्यात आले. यात प्रामुख्याने मालेगाव येथील मदिनाबाद परिसरातील 35 वर्षीय महिला व खुशामदपुरा परिसरातील 45 वर्षीय महिला तर चांदवड येथील 27 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे.

शहरातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याच्या बातमीने काही अंशी दिलासा मिळाला आहे. या यशाने हुरळून न जाता मोठ्या संख्येने दाखल रुग्णांमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आणि आपण याच प्रमाणे कसोटीने संपुर्ण जबाबदारी पार पाडल्यास शहरातून कोरोनाला हद्दपार करण्यात नक्की यश मिळेल असे घटना व्यवस्थापक डॉ.आशिया यांनी सांगितले. तर नागरिकांनी देखील प्रतिबंधात्मक आदेशाचे व प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरोनामुक्त रुग्णांची बोलकी प्रतिक्रिया

राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले सर्व निर्णय योग्य घेतले आहेत. त्यांच्या सुचनेनुसार सर्वांनी आप-आपल्या घरात थांबणेच योग्य असल्याची प्रतिक्रीया देतांना चांदवड येथील रहिवाशी आणि मन्सुरा हॉस्पिटल, मालेगाव येथुन कोरोनामुक्त झालेल्या 27 वर्षीय युवकाने म्हटले की, आई वडीलांचा आशिर्वाद व मनातील पॉझिटीव्ह विचारामुळे मला यातून बरे होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.  हा आजार घाबरण्यासारखा नाही, यातून बरे होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती आणि मनाची सकारात्मकता गरजेची आहे. मालेगावच्या नागरिकांना संदेश देतांना, ज्या रुग्णांना थोडे जरी आजाराची लक्षणे दिसत असली तरी तात्काळ रुग्णालयात जावे. प्रशासन सगळे व्यवस्थित हाताळत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर कोरोनामुक्त झालेल्या महिलांनी प्रतिक्रिया देतांना सामान्य रुग्णालयातील डॉ.महाले यांच्या टीम कडून खुप चांगल्याप्रकारे उपचार व सुविधा मिळाली असून त्यांचे त्यांनी आभार मानले. त्यानंतर जीवन हॉस्पिटल व मन्सुरा हॉस्पिटल या ठिकाणी स्थलांतरीत केल्यानंतर तेथेही चांगला अनुभव व चांगल्या सुविधा मिळाल्याचा अनुभव त्यांनी यावेळी कथन केला. माझा सात वर्षाचा मुलगा याठिकाणी आजही दाखल आहे, आणि त्याला सोडून जातांना मला खुप दु:ख होत असल्याची भावना व्यक्त करत असा प्रसंग कुणावरही येवू नये यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे व प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

पुणे विभागात कोरोना बाधित 1 हजार 363 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

0

विभागात 213 कोरोना बाधित रुग्ण बरे

विभागामधील 52 लाख 79 हजार 124 घरांचे सर्वेक्षण पूर्ण
 1 कोटी 98 लाख 80 हजार 41 व्यक्तींची तपासणी

पुणे दि.26:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 363 झाली असून विभागात 213 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 हजार 66 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 46 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 1 हजार 363 बाधित रुग्ण असून 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 230 बाधीत रुग्ण असून 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 61 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 हजार 838 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 13 हजार 975 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 806 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 12 हजार 614 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 363 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 52 लाख 79 हजार 124 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 98 लाख 80 हजार 41 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 101 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

0000

राज्यात आज ४४० नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ८०६८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. २६ : आज राज्यात कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील १२, पुणे महानगरपालिका येथे ३, जळगाव येथे २, सोलापूर शहरात १, तर लातूर येथे १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी) मुंबई महानगरपालिका: ५४०७ (२०४), ठाणे: ७३८ (१४), पालघर: १४१ (४), रायगड: ५७ (१) मुंबई मंडळ एकूण: ६३४३ (२२३), नाशिक: १३१ (१२), अहमदनगर: ३६ (२), धुळे: २५ (३), जळगाव: १९ (४), नंदूरबार: ११ (१) नाशिक मंडळ एकूण: २२२ (२२), पुणे: १०५२ (७६), सोलापूर: ४७ (५), सातारा: २९ (२) पुणे मंडळ एकूण: ११२८ (८३), कोल्हापूर: १०, सांगली: २७ (१), सिंधुदुर्ग: १, रत्नागिरी: ८ (१) कोल्हापूर मंडळ एकूण: ४६ (२), औरंगाबाद: ५० (५), जालना: २, हिंगोली: ८, परभणी: १ औरंगाबाद मंडळ एकूण: ६१ (५), लातूर: ९ (१), उस्मानाबाद: ३, बीड: १, नांदेड: १ लातूर मंडळ एकूण: १४ (१), अकोला: २९ (१), अमरावती: २० (१), यवतमाळ: ४८

बुलढाणा: २१ (१), वाशिम: १ अकोला मंडळ एकूण: ११९ (३), नागपूर: १०७ (१), वर्धा: ०, भंडारा: ०, गोंदिया: १, चंद्रपूर: २, गडचिरोली: ० नागपूर मंडळ एकूण: ११० (१), इतर राज्ये: २५ (२), एकूण: ८०६८  (३४२).

(टीप- या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आय सी एम आर संकेतस्थळावरील माहिती जिल्हावार उपलब्ध असल्याने ती जिल्हावार सादर करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६०४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८६०३  सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३३.७२ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

हॉटस्पॉट शहरांनो ..शिका ..जरा यांच्याकडून ….

0

 गल्लीपासून दिल्लीपर्यंत या बाजाराची चर्चा

वर्धा, दि. 26 :  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याचा प्रयत्न सर्वत्र होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सोबतीला सामाजिक संस्था हातभार लावत आहे. वर्ध्याच्या सामाजिक संस्थानी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनासोबत एक आगळी वेगळी संकल्पना राबवली आहे. केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावरील हा भाजी बाजार सध्या कोरोनाचा लढ्यात मदतगार ठरत आहे.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेतून वर्धा शहरात गोल मार्केट व बजाज चौकात भरणारा भाजी बाजार 15 ठिकाणी स्थलांतरित केला होता. मात्र त्याठिकाणी स्वच्छतेची काळजी राखली जात नसल्याचे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आणि नगर परिषद मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांनी याबाबत सामाजिक संस्थांशी चर्चा केली. चर्चेतून पुढे आलेली आदर्श व सुरक्षित बाजाराची संकल्पना कोरोनाच्या युद्धात महत्त्वाची ठरत आहे.  पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे उत्तम उदाहरण यानिमित्ताने वर्ध्यात पाहायला मिळाले.

प्रशासनाने केसरीमल कन्या शाळेचे मैदान उपलब्ध करून दिले. बाजार उभारण्यासाठी रोटरीने मनुष्यबळ, साहित्य आणि नियोजन करून दिले. नगरपरिषद वर्धा यांनी येथील स्टॉल्सचे वाटप, आणि तेथील साफसफाईची जबाबदारी घेतली. पोलीस प्रशासनाने तेथे होणारी गर्दी नियंत्रित करून प्रत्येक  व्यक्ती रांगेतच येईल यासाठी नियोजन व काम केले.

पैश्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून व्यावसायिक नितीन शिंदे यांच्यासह रोटरीच्या सदस्यांनी खर्चाचा भार उचलला.

असा आहे बाजार

केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर 80 भाजी आणि फळ दुकानाची व्यवस्था करण्यात आली असून आज 60 पेक्षा जास्त दुकाने लागली आहेत. (पुण्याच्या सोसायट्यांत एखाद्याला भाजी विक्रीचा मक्ता देवून तो विकेल तेवढ्या चढ्या दराणे भाजी विक्री होते .येथे तसे नाही .अनेक विक्रेते .एकामागून एक ग्राहक ,एक ग्राहक अनेक विक्रेत्यांकडून हव्या त्या त्या वस्तू खरेदी करू शकतो ..फक्त अट एवढीच एकाचे झाल्या शिवाय दुसरा विक्रेत्यापुढे जात नाही )

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आगळावेगळा प्रयोग करताना बाजारात येणाऱ्याचे स्वागत करण्यासाठी स्वागत कमान, मैदानाच्या मध्यभागी एक डायस तयार करून ग्राहकांना कोरोनापासून सावध करण्यासाठी सिनेमाच्या आधारावर थीम बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये बकेट लिस्ट, डार्लिंग, मुंबई- पुणे मुंबई, गच्ची या सिनेमाच्या थीम वापरून जनजागृतीपर संदेश देण्याचं कामही यावेळी करण्यात येत आहे.

इथे येणाऱ्या नागरिकांना गेटपासून हात स्वच्छ धुण्याची ठीक ठिकाणी सोय, प्रत्येक दुकानासमोर सॅनिटायझरची बॉटल, तापमान पाहता हिरवी चटाई, दोन दुकानातील ठराविक अंतर, दुकासमोर गर्दी टाळत सोशल डिस्टनसिंग ठेऊन बसायला खुर्च्या, भाजी विक्रेत्याना मास्क आणि हॅन्डग्लोज, नागरिकांनी प्लास्टिकचा उपयोग टाळावा म्हणून कापडी पिशव्या अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाजी बाजारातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टळला म्हणायला सध्यातरी हा भाजी बाजार आदर्श ठरत आहे. कारण लोकांची सवय तोडायला गर्दी केल्यास लाऊडस्पीकरवर सूचना देण्याची व्यवस्थाही आहे.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिपचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर, मुख्याधिकारी प्रदीप जगताप, रोटरीचे महेश मोकलकर, पंकज शर्मा, आसिफ जाहिद यांच्या उपस्थितीत बाजारास प्रारंभ झाला.

कोरोना संसर्गात मदत करण्यासाठी सर्वच सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत. रोटरीने सेवाग्राम रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी युनिट तयार करून दिले.  केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भाजी बाजाराला आपण स्वत: भेट दिली. अतियश शिस्तबद्ध आणि भाजी दुकानासमोर  ग्राहकांना बसण्यासाठी दिलेल्या खुर्च्या, प्रत्येक दुकानादाराजवळ सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सामाजिक संस्था व नागरिकांच्या मदतीनेच वर्धा जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यात यश मिळाले असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.

भाजी बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी या भाजीबाजाराच्या उपक्रमाची चांगली मदत होत आहे. वर्धा जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहेच. या बाजारामुळे हिरव्या मॅटमध्ये सावलीत असणारा बाजार हा तापमाना सोबतच कोरोनाला सुद्धा लढा देईल यात शंका नाही.

डॉक्टरांकडून योग्य उपचार आणि दिलेलं मानसिक बळ,कदापी विसरू शकत नाही.

0

पुणे जिल्हयातील 43 वर्षे वय असलेल्या एका रुग्णावर नायडू रुग्णालयात सोळा दिवस उपचार सुरु होते. महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेऊन पुण्यातील हा रुग्ण 16 दिवसांत बरा होऊन घरी गेला. “माझ्यासाठी डॉक्टरांच्या योग्य उपचारामुळेच आणि परिचारकांच्या सेवेमुळे मी कोरोनाच्या महामारीतून बरा झालो,” असे त्याचे भावनिक उद्गार ऐकून डॉक्टरांना देवाची उपमा का देतात, याचा प्रत्यय आला.

व्यवसायाने वाहनचालक असणाऱ्या या रुग्णाचा स्वत:चा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय होता. फिरती व्यवसाय असल्यामुळे मुंबई- पुणे असा नेहमीचाच प्रवास! एके दिवशी दुबईहून मुंबईला आलेल्या प्रवाशांना घेऊन तो पुण्याला परतला. हा प्रवास तीन ते चार तासांचा होता. या प्रवासात त्याचा परदेशातून आलेल्या प्रवाशांशी संपर्क आल्याने कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णावर 16 दिवस वैद्यकीय उपचार करण्यात आले. पण ते घाबरुन जाऊ नयेत, म्हणून डॉक्टरांनी मानसिक बळ दिले.

या रुग्णाचा शेवटचा तपासणी अहवाल 25 मार्च रोजी रात्री 10 वाजता मिळाला. हा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. त्याच्या घरी दोन मुले आणि पत्नी.. बरे झाल्यावर आज घरी सोडणार, ही बातमी समजताच हे ऐकून कुटुंबाला खूप आनंद झाल्याचे या रुग्णाने सांगितले. या रुग्णाला डॉक्टरांनी घरी गेल्यानंतर स्वच्छ हात धुणे, कोणाच्याही संपर्कात न येणे, तोंडाला नेहमी मास्क वापरणे या दक्षता घेण्यास सांगितले.

व्यवसायाने वाहनचालक असणारा हा रुग्ण आध्यात्मिकही होता. यामुळे नायडू रुग्णालयात ॲडमीट केल्यापासून ते घरी सोडेपर्यंत हॉस्पिटलमध्ये वेळ घालविण्यासाठी नित्यनियमाने तो श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पारायण करीत होता. डॉक्टरांनी घ्यावयास सांगितलेली सर्व खबरदारी ते कुटुंबिय घेत आहेत. तसेच घरीही आता दररोज सकाळी कोमट पाणी पिणे व नित्यनियमाने सकाळी एक तास व्यायाम, वेळच्यावेळी जेवण, करत असल्याचे ते सांगतात. तसेच सध्या त्याला लॉकडाऊनमुळे घरीच थांबावे लागत असल्याने घरी देखील वेळेचा सदुपयोग करत नित्य नियमाने सकाळी व संध्याकाळी दोन तास संत तुकाराम महारांजांच्या गाथेचे पारायण करत आहेत.

जनतेला अनुभव सांगताना तो म्हणतो, या आजारातून बरे होण्यासाठी माझ्या आत्मविश्वासाबरोबरच कुटुंबाची मानसिक साथ मिळाली. नियमित व्यायामाने व वेळच्या वेळी संतुलित आहार घेतल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते, तर डॉक्टरांच्या उपचाराने व आपल्या आत्मविश्वासाने कोरोना सारख्या महामारीतून निश्चितच बरे होता येते, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

वृषाली पाटील
माहिती अधिकारी,पुणे

माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक महाराष्ट्राने गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि.२६ : ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक आज महाराष्ट्राने गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे.

कादंबरी, लघुकथा, नाटक, आत्मकथन यासारख्या साहित्य प्रकारात त्यांनी लिलया वावर केला. उपेक्षित वंचित समाजाच्या वेदना आणि व्यथा यांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली. लेखनीवर मनापासून प्रेम करणाऱ्या श्री.तुपे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर गारुड निर्माण केलं.

त्यांच्या लेखणीतून चित्रित झालेली सामाजिक वास्तविकता आणि सचोटी जीवनातील संघर्षावर परखडपणे भाष्य करत असल्याने  ती वाचकांना अंतर्मुख करत असे, असेही श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन

0

पुणे : समाजातील जळजळीत वास्तव, अनुभवांची दाहकता आयुष्यभर लेखणीवाटे साहित्यात उतरवणारे ज्येष्ठ साहित्यिक, ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचे रविवारी सकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षाघाताने आजारी होते. त्यांची पत्नी जिजा यांचे काही महिन्यांपूर्वी पक्षाघाताने निधन झाले. उत्तम तुपे यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे दोन मुले असा परिवार आहे.

उत्तम बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होतीच; पण उतारवयातील त्यांना आणि पत्नीला पक्षघात झाल्याने अडचणींमध्ये आणखीच भर पडली होती. मागील वर्षी प्रसारमध्यमांनी त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे वास्तव समोर आणल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्यांना पाच लाखांची मदत करण्यात आली होती.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका छोट्या खेड्यात तुपे यांचा जन्म झाला. दुष्काळी परिस्थितीमुळे ते सताऱ्यातून पुण्यात स्थलांतरित झाले. त्यांनी आपल्या बहिणीचा आधार घेतला. पुढे त्यांना वामनराव देशपांडे भेटले. तेथे त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचले. तो प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यामधले लेखन बीज अंकुरले. आपल्या आत्याच्या आश्रयाने ते पुण्यात कसेबसे जगले. पडेल ती कामे पत्करली. मोलमजुरी करून दिवस काढले. तुपे यांना योगायोगाने जिवाभावाची मानलेली मीनाताई बहीण भेटली. अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले. कादंबरी, लघुकथा, नाटक आणि आत्मकथन या प्रकारांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. उपेक्षित, वंचित समाजाच्या वेदना-व्यथा त्यांच्या साहित्यातून चित्रित झाल्या.

साहित्य अकादमीपासून अनेक पुरस्करांचे मानकरी ठरलेल्या उत्तम तुपे यांची राज्य सरकाराने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणून देखील निवड केली. कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले. ‘भस्म’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर ‘काट्यावरची पोटं’ या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कार मिळाला. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपे यांनी लिहिलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली.

शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात हेल्पो फौंडेशन ला यश !

0
पुणे:
 
पुरंदर,डहाणू आणि बीड या भागातील शेतमाल शहरात ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लॉक डाऊन मुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यात हेल्पो फौंडेशन (पुणे) या संस्थेला यश आले.पुरंदर च्या महिला शेतकरी गटांचा १ हजार किलो कांदा पडून राहिला होता.डहाणू आणि बीड च्या शेतकऱ्यांच्या भाज्या आणि फळे शहरापर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत होत्या.ग्लोबल फ्युचर्स नेटवर्क,हेल्पो फौंडेशन,मिडीयम एंड स्मॉल एजेन्सी या संस्थांनी प्रशासनाशी बोलून हा शेतमाल महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाजारपेठांमध्ये पाठविण्यात मदत केली.डॉ निहाल मयूर,मिलिंद पाटील,प्रकाश नाडगे,जस्मिन शेख,दीपक बीडकर,निश्चल सलाम,शमीम शेख यांनी मदत केली.

कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारत्मक निर्णय घ्यावा -विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

0

मुंबई दि.२६ एप्रिल :- कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउन करण्यात आले आहे. नेमके यातच आयआयटी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी गेलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी कोटा येथे अडकून पडले आहेत. खानावळ बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत.या विद्यार्थ्यांची खाण्याची योग्य सोय नाही.त्यांची गैरसोय होत आहे. तेथील खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत, ऑनलाइन क्‍लासही होत नाहीत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कोटा येथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे.

राजस्थानी येथील कोटा हे १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः वैद्यकीय व इंजिनिअरिंग क्षेत्रात भवितव्य करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र बनले आहे. सद्य स्थितीत महाराष्ट्रातील तीन हजार मुले व मुली शिक्षण घेण्यासाठी तिथे वास्तव्य करीत आहेत. लॉकडाउनमुळे ही मुले गेल्या दोन महिन्यापासून तेथेच अडकून पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अस्वस्थेतेचे वातावरण असल्याचे श्री.दरेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यातील विद्यार्थी कोटा तेथे शिकण्यासाठी गेले होते. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली. परंतु महाराष्ट्रामध्ये अद्याप अशी व्यवस्था झालेली नाही. एवढेच नव्हे तर जे पालक आपल्या मुला-मुलींना आणण्यास इच्छुक आहेत त्यांनाही पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयातून परवानगी मिळत नसल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कोटा येथे शिकणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी महाराष्ट्रात पुन्हा कसे येतील याबाबत सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी श्री.दरेकर यांनी केली पत्राच्या माध्यमातून केली आहे.

महिनाभरात महाराष्ट्रात सुमारे साडेपंधरा हजार लोकांना अटक ,४७हजार वाहने जप्त ,पावणेतीन कोटीचा दंड

0

मुंबई, दि.२६ : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ७२,६९८ गुन्हे दाखल झाले असून १५,४३४ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ७४ लाख ४३ हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती गृह विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबरवर ७८,४७४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का असून ज्यांनी नियमांचा भंग केला अशा ६१० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०९२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ४७,७८२ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांवर हल्ला प्रकरणे

या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १५० घटनांची नोंद झाली असून यात ४८२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने २० पोलीस अधिकारी व ८७ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन पोलीस अधिकारी व चार कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

0000