Home Blog Page 2610

विधान परिषद निवडणुकीला केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी, २१ मे ला निवडणूक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच अखेर संपुष्टाता आला आहे. कारण विधान परिषद निवडणुकीला केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी दिली आहे. 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानेच याबाबतची माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.

.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची सूचना निवडणूक आयोगाला करावी, असे पत्र गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले. हे पत्र घेऊन गुरुवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर राज्यपालांना भेटले. त्यापाठोपाठ राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषद निवडणुकीची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी सूचना केली आहे.

निवडणूक कशासाठी?

राज्यपाल सदस्याच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली तरीही त्या आमदारकीची मुदत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे नव्याने नियुक्तीऐवजी रिक्त जागांसाठी निवडणूक घेऊनच मुख्यमंत्र्यांनी रीतसर विधिमंडळाचे सदस्य व्हावे, असा मतप्रवाह होता.

कोरोना विरुद्ध च्या लढ़यात प्रत्येकाने दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल

0

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

बीड : उद्या शुक्रवार दि. १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना मी वंदन करतो; सध्या कोरोना या वैश्विक महामारीविरुद्ध सबंध महाराष्ट्र लढतो आहे. या लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्राचा इतिहास कायम स्मरणात ठेवेल अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला आज जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे न होऊ देत, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यासाठी अनेक हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले, त्या सर्व हुतात्म्यांना नमन करून कामगार चळवळीमध्ये योगदान दिलेल्या सर्वांना नतमस्तक होऊन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो, असे श्री. मुंडेंनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

कोरोना विरुद्ध सगळे जग लढत आहे. महाराष्ट्राची लढाई निर्णायक टप्प्यात आली असून रुग्णांचा आकडा आता १० हजारच्या पार जातोय, या परिस्थितीत राज्य शासन आवश्यक सर्व उपाययोजना करत असून, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यासह सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. समाजातील अनेक संस्था व अन्य घटक शासनाच्या बरोबरीने गरजूंना अन्न – धान्यासह विविध प्रकारची मदत करत आहेत. एवढेच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटक शासकीय सूचनांचे पालन करत आपापल्या परीने कोरोनाविरुद्ध लढत आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने दिलेले हे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल; महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र निर्मितीसाठी लढा दिलेल्या सर्वांसमोर नतमस्तक होऊन राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बीड जिल्ह्याचा ‘शून्य’ कायम राखण्याचे आवाहन

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसला तरी या पुढील काही दिवस आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यावी लागणार असून, आपलेच बांधव म्हणून परत आलेले ऊसतोड कामगार यांचीही काळजी करावी काळजी घ्यावी. बीडचा ‘शून्य’ अबाधित ठेवण्याच्या या लढ्यात प्रत्येक जिल्हावासीयांनी योगदान द्यावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे

 

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरुध्द समाजमाध्यमांवर अंससदीय, अश्लिल पोस्ट टाकणा-यांना अटक करा -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

भाजपच्या वतीने पोलिस उपायुक्तांना निवेदन सादर
मुंबई दि. ३० एप्रिल- कोरोनोच्या संकटामुळे आज महाराष्ट्रासह देश अडचणीत आला आहे. या संकटाच्या सामना आज सर्वच जण एकत्रितपणे करित आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. तरीही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीला सामाजिक माध्यमांमध्ये असंदीय शब्दात टीका केली जात आहे. घाणेरडी, अश्लिल व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. ही टीका अत्यंत हीन दर्जाची आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तसेच राज्याच्या राजकारणातील लोकाभिमुख सुसंस्कृत व निश्कलंक नेतृत्व आहे, परंतु याचे भान न ठेवता काही भाड्याच्या एजन्सी व काही विकृत मानसिकता असणारे हा गलिच्छ प्रकार करित आहेत, त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व फेसबुक पोस्ट व कमेन्ट टाकणा-या या समाजकंटकाविरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आज विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका शिष्टमंडळाने आज पोलिस उपायुक्तांकडे करण्यात आली. मुंबई पोलिस आयुक्तांच्या नावे देण्यात आलेले हे निवेदन तातडीने पोलिस आयुक्तांकडे पाठविण्याची सूचना दरेकर यांनी यावेळी उपायुक्त स्वामी यांना केली.
दहिसर पूर्व येथे पोलिस उपायुक्त परिमंडळ १२ चे पोलिस उपायुक्त श्री. स्वामी यांची आज भाजपच्या आमदारांनी भेट घेतली. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पोलिस उपायुक्त स्वामी यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, आमदार मनिषा चौधरी, आमदार सुनिल राणे, भाजपा उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या विरुध्द समाजमाध्यमांमध्ये सुरु असलेली असंसदीय टीका बंद होईल अशी आमची अपेक्षा होती, पण तरीही हीन दर्जाची टीका सुरु राहिल्यामुळे आज आम्ही ही तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याने समाजमाध्यमांवर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याच्या विरुध्द तातडीने कारवाई करण्याची तत्परता पोलिंसाकडून दाखविली जात आहे. जर कायदा सर्वांना समान असेल तर फडणवीस यांच्याविरुध्द पोस्ट टाकणा-या विकृत प्रवृतीविरुध्द आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी फडणवीस यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेल्या काही आक्षेपार्ह पोस्ट पोलिस उपायुक्तांकडे सादर करण्यात आल्या. याप्रकरणी तातडीने पोलिसांच्या सायबर विभागाकडून चौकशी करण्यात यावी व या प्रकरणातील समाजकंटकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावी अशी आग्रही मागणी दरेकर यांनी यावेळी केली.
आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत, परंतु आमचा संयम दुर्बलता समजू नये अन्यथा भाजप चे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील असा इशाराही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी दिला.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांनी स्थलांतरणासाठी घाई करु नये-जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

0
  • कामगारांनी आहे त्या ठिकाणी सुरक्षित रहावे
  • कुठल्याही अफवांना बळी पडू नका
  • जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतरच स्थलांतरणास परवानगी

    पुणे दि 30: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांनी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने कार्यपध्दती निश्चित केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. तथापी स्थलांतरणासाठी इच्छूकांनी जाण्यासाठी घाई करु नये तसेच घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

सद्यस्थितीत कुठल्याही बसेस अथवा रेल्वे सुरु करण्यात येणार नाहीत. त्यामुळे कामगार व नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये. तसेच घराबाहेर न पडता आहे त्या ठिकाणीच सुरक्षित राहावे. जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांची व व्यक्तींची प्रशासनाच्या वतीने माहिती घेऊन स्थलांतरणासाठी इच्छुकांची यादी तयार करण्यात येणार आहे. हे कामगार ज्या राज्यात जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्या राज्याशी राज्य शासनामार्फत संपर्क साधून त्यांना संबंधित राज्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतरच स्थलांतरनाची कार्यवाही सुरु केली जाईल. कामगारांच्या सर्व तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तक्रार असल्यास दुरध्वनी क्र.020-26111061 अथवा 020-26123371 अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच dcegspune1@gmail.com व controlroompune@gmail.com या इमेलवर तक्रारी स्विकारल्या जातील. याशिवाय तालुका नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिली.

राज्यात ६९ लाख १६ हजार ७२२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

0

मुंबई, दि.३० :  राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून  एप्रिल २०२० मध्ये    राज्यातील १ कोटी ५६ लाख २ हजार ४३४ शिधापत्रिका धारकांना तब्बल ६९ लाख १६ हजार ७२२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे २० लाख ५६ हजार १६५ क्विंटल गहू, १५ लाख ८७ हजार ६६३ क्विंटल तांदूळ, तर  १९ हजार ७४३ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे ८ लाख ४५ हजार ४४२ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. ३ एप्रिलपासून एकूण १ कोटी ३६ लाख ९५ हजार ५२४ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ६ कोटी २१ लाख १२ हजार ८६३ लोकसंख्येला ३१ लाख ०५ हजार ६४० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६ APL केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.२४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आजपर्यंत  १ लाख ६७ हजार २५० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १० हजार ४९८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

राज्यात कोरोनाबाधित १७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई, दि. ३० : राज्यात आज कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर १३  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.  या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ७०६१ (२९०)

ठाणे: ४८ (२)

ठाणे मनपा: ४१२ (६)

नवी मुंबई मनपा: १७४ (३)

कल्याण डोंबिवली मनपा: १६३ (३)

उल्हासनगर मनपा: ३

भिवंडी निजामपूर मनपा: १७

मीरा भाईंदर मनपा: १२६ (२)

पालघर: ४१ (१)

वसई विरार मनपा: १२८ (३)

रायगड: २४

पनवेल मनपा: ४१ (२)

ठाणे मंडळ एकूण: ८२४४ (३१३)

नाशिक: ६

नाशिक मनपा: २०

मालेगाव मनपा:  १७१ (१२)

अहमदनगर: २६ (२)

अहमदनगर मनपा: १६

धुळे: ८(२)

धुळे मनपा: १७ (१)

जळगाव: ३० (८)

जळगाव मनपा: १० (१)

नंदूरबार: ११ (१)

नाशिक मंडळ एकूण: ३१५ (२७)

पुणे:६३ (३)

पुणे मनपा: १११३ (८२)

पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)

सोलापूर: ७

सोलापूर मनपा: ९२ (६)

सातारा: ३२ (२)

पुणे मंडळ एकूण: १३७९ (९६)

कोल्हापूर: ९

कोल्हापूर मनपा: ५

सांगली: २८

सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)

सिंधुदुर्ग: २

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ५३ (२)

औरंगाबाद:२

औरंगाबाद मनपा: १२९ (७)

जालना: २

हिंगोली: १५

परभणी: ०

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: १५० (७)

लातूर: १२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ३

लातूर मंडळ एकूण: १९ (१)

अकोला: १२ (१)

अकोला मनपा: २७

अमरावती: २

अमरावती मनपा: २६ (७)

यवतमाळ: ७९

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: १६९ (९)

नागपूर: ६

नागपूर मनपा: १३२ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १४३ (२)

इतर राज्ये: २६ (२)

एकूण: १०,४९८  (४५९)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७३३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ९२ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ४२.११ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या- खासदार वंदना चव्हाण यांच्या सूचना

0
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतली दखल़, कार्यवाहीचे दिले आश्वासन 
पुणे-

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असताना, त्यांच्यात काही त्रुटी राहत आहेत. त्यामुळे प्रशासकीय सुसूत्रीकरण चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्यासमवेत आज पुणे शहरातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेताना अनेक उपाययोजना सुचविल्या. प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिक, लोकप्रतिनिधींना नेमकी माहिती मिळावी, यासाठी पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. तसेच सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, गरज भासल्यास त्यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांना केली.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पुढील गोष्टींवर चर्चा झाली  

1) विलगीकरण कक्षांत मूलभूत सुविधांची कमतरता व योग्य यंत्रणेचा अभाव यामुळे उद्भवणारया गंभीर समस्यां विभागीय आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिल्या. तेथील खोल्या व स्वच्छतागृहांची अस्वच्छता असून, टेस्टिंग यंत्रणा, टेस्टिंग अहवाल येण्यामध्येही दिरंगाई होत आहे. या मध्ये तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे सांगितले.

2) न्याहारी, जेवण, चहाच्या निमित्ताने बाधित आणि संशयित काही वेळ एकत्र  येण्याचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे घाबरून रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. तसेच संशयित रुग्ण येथे येण्यास टाळाटाळ करू शकतील. त्यातून नव्या समस्या उदभवू शकतात, असे विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

3) विलगीकरण केंद्रात संशयितांना देण्यात आलेल्या बिछान्यावर बेडशीट नसल्याचे दिसून आले आहे. तसेच बिछान्याच्या निर्जंतुकीरणाची व्यवस्था नसल्याने रुग्ण धास्तावतात. त्यामुळे येथे संशयित आणताना त्याला स्वतःचे बेडशीट व त्याच्या बीपी, डायबेटीसच्या दैनंदिन औषधाच्या गोळ्या आणि स्वतःच्या गरजेच्या वस्तू आणाव्यात, अशी सूचना करावी.

4) कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी महापालिकेबरोबर काम करू इच्छिणाऱया डॉक्टर तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आवश्यक ते किटही देण्यात यावेत.

5) शिक्षक, समूह संघटिका करीत असलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून संशयित शोधण्यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच त्यांच्या आरोग्यासाठी सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज, शक्य असल्यास PPE कीट पुरविण्यात यावे. जागेवरच तपासणी करण्यासाठी Thermoscanner, Oxymeter उपलब्ध करून द्यावेत.
6) खासगी पॅथ लॅबमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महापालिका यंत्रणेस पाठविण्यास बंधनकारक करण्यात यावे.

रक्तदान शिबिरात घ्यायची दक्षता, गर्भवतींच्या आरोग्याची काळजी, रुग्णवाहिकांची कमतरता आदी मुद्द्यांवरही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सर्व मुद्द्यांची नोंद घेतली असून या बाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी आमदार चेतन तुपे, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे हे देखील या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

नगरसेवकाच्या २ लहान मुलांच्या वाढदिवसाची रक्कम पोलीस वेल्फेअर फंडास

0

लहानग्यांच्या वाढदिवसाची रक्कम पोलीस वेल्फेअर फंडास 

पुणे-कोरेगाव घोरपडी भागातल्या भाजप नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या दोन्ही म्हणजे ७ वर्षे वयाच्या आरुष आणि २ वर्षे वयाच्या आर्निक या दोघांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम टाळून या कार्यक्रमाच्या खर्चाची रक्कम रुपये १ लाख हि पोलीस वेल्फेअर फंडास देण्यात आली आहे. आपल्या मुलांनीच याबाबत निर्णय घेतला आणि आपण त्याची सत्वर अंमलबजावणी केली असे गायकवाड यांनी सांगितले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सदरचा निधी चा धनादेश पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांच्याकडे  देऊन ती रक्कम  जमा केली आहे. असेही ते म्हणाले .कालच्या दि.२७ एप्रिल रोजी चि.आर्णिकचा वाढ दिवस होता  तर दि.१४ मे रोजी चि.आरुषचा वाढदिवस आहे.

आरुष व आर्णिक यांच्याकडून व्हिडीओ संदेश त्यांनी पाठविला आहे.

 

 

 

ऋषी कपूर अनंतात विलीन….

0

मुंबई  . ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर मुंबईतील मरिन लाईन्सच्या चंदनवाडी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पत्नी नीतू सिंग, मुलगा रणबीर कपूर यांच्यासह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आलिया भट, करीना कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, अनिल अंबानी, रिमा जैन, आदर जैन यावेळी उपस्थित होते. ब-याच काळापासून कर्करोगाशी झुंज देणारे ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी 8:45 वाजता मुंबईत निधन झाले. अखेरच्या क्षणी त्यांच्याजवळ त्यांची पत्नी नीतू सिंग आणि मुलगा रणवीर उपस्थित होता. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी ऋषी यांनी रणबीरला त्यांच्याजवळ बेडवर बसण्यास सांगितले होते. त्यांची थोरली मुलगी रिद्धिमा कपूर साहनी दिल्लीला असते, तिला मुंबईला जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. खासगी विमानाने संध्याकाळी  रिद्धिमा दिल्लीहून मुंबईत पोहोचणार आहे.

चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांतील मार्गदर्शक दुवा निखळला;कला क्षेत्राची हानी

0

ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या स्थलांतरणासाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती

0

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती

पुणे दि 30: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार असून विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या अनुषंगाने योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील अडकलेल्या कामगारांची व व्यक्तींची माहिती घेऊन स्थलांतरणासाठी इच्छुकांची यादी तयार केली जाईल. राज्य शासनामार्फत संबंधित राज्याशी संपर्क साधून त्यांना त्या-त्या राज्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होईल. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाईल. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नसलेल्यांनाच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल.
ज्यांना परत जावयाचे आहे, त्या व्यक्तींना वाहनांची व्यवस्था स्वत: करावी लागेल. या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा निश्चित मार्ग व कालावधी नमूद असलेला ट्रान्झीट पास वाहनांकडे सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यात सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे आवश्यक आहे. प्रथम वाहतुकीला वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. तसेच वाहनात देखील सोशल डिस्टंन्सिंग पाळूनच नागरिकांची बसण्याची व्यवस्था केली जाईल. महाराष्ट्र राज्या बाहेर अडकलेल्या नागरिकांना जिल्हयात प्रवेश देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त समन्वय ठेवून निर्णय घेतील. परराज्यातून प्रवेश करणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन कालावधीत राहावे लागेल.
सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. यानंतर सबंधित जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार या नागरिकांना घरी किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल, असेही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या ताकदीनं लढलो त्याच ताकदीनं ‘कोरोना’विरुद्‌ध लढू व जिंकू… -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

0

मुंबई, दि. ३० :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्रानं ज्या ताकदीनं लढवला त्याच ताकदीनं आज ‘कोरोना’विरुद्ध लढू आणि जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरुन संघर्ष केला होता, यावेळी प्रत्येकानं आपापल्या घरातंच थांबूनंच कोरोनाविरुद्ध लढायचं आहे, कोरोनाला हरवायचं आहे. त्यासाठी घराबाहेर पडू नका, रस्त्यावर येऊ नका, घरातंच रहा, सुरक्षित रहा, असं आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला केलं आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी संवाद साधताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांचं बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात लढलेल्या, योगदान दिलेल्या राज्याच्या सुपुत्रांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा यंदा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आहे. हा दिनाचा सोहळा राज्यभर दिमाखदारपणे साजरा व्हावा असा आपला प्रयत्न, निर्धार, नियोजन होतं, परंतु कोरोना संकटामुळे गर्दी टाळायची आहे. त्यासाठी महाराष्ट्र दिनाचा सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत, मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच महाराष्ट्र दिन साजरा करावा. घरी थांबावं लागत असलं तरी नागरिकांच्या आनंद, उत्साहात कुठलीही कमी असणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राज्याच्या जडणघडणीत अनेकांचं योगदान राहिलं आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांपर्यंत सर्वांनीच महाराष्ट्राच्या प्रगतीत योगदान दिलं आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलिस, सैनिक, डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, खेळाडू, कलावंत, साहित्यिक, अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजचा महाराष्ट्र घडल्याचं स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सध्या राज्यावर कोरोनाचं महासंकट आहे. या संकटाचा मुकाबला आपले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, होमगार्ड, सफाई कामगार, महापालिका, नगरपालिकांचे कर्मचारी, आशा वर्कर, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न व नागरी पुरवठा, औषध प्रशासन विभाग, अन्य स्थानिक स्वराज संस्थांचे, शासनाच्या अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून करत आहेत. जोखीम पत्करुन कर्तव्य पार पाडत असलेल्या या सर्वांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे. या कोरोना योद्ध्यांचं कार्य, त्याग महाराष्ट्र विसरणार नाही, असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या लढाईत अनेक उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, खाजगी, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती आपापल्या परीनं योगदान, सहभाग देत आहेत.  त्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले आहेत.

महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्रानं प्रत्येक संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. 1967चा कोयना भूकंप, 1972चा दुष्काळ, 1993चा किल्लारी भूकंप, 2005ची अतिवृष्टी, महापूरासारख्या संकटांचा महाराष्ट्रानं यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्र कोरोनावरही लवकर विजय मिळवेल, असेही ते म्हणाले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशात पहिलं पाऊन महाराष्ट्रानं टाकलं. सार्वजनिक वाहतुकीवर बंदी, टाळेबंदीसारखे निर्णय महाराष्ट्रानं सर्वप्रथम घेतले. आर्थिक हानीचा विचार न करता नागरिकांचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिलं. आज परराज्यातील साडेसहा लाख मजूरांच्या निवास, भोजन, वैद्यकीय सेवेची व्यवस्था शासकीय यंत्रणांमार्फत केली जात आहे.  तितक्याच जणांची व्यवस्था खाजगी, स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे. कोरोनाच्या संकटाविरोधात राज्याचं शासन, प्रशासन, संपूर्ण जनता आज एकजुटीनं लढत आहे, हे चित्र आशादायी आणि विजयाची खात्री देणारं असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

टाळेबंदीचा निर्णय कटू, त्रासदायक असला तरी नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी तो आवश्यक होता, म्हणून घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेनंही त्या निर्णयाला प्रतिसाद देत टाळेबंदीचं मनापासून पालन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. बाहेर दबा धरुन बसलेल्या कोरोनाला स्वत:च्या घरात नेऊ नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा, अशी आवाहनवजा विनंतीही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

कोरोनावर प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरु आहेत. महाराष्ट्रातही त्याचं संशोधन सुरु आहे. या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गडचिरोली शहरातील गरजूंना दररोज ५ रू.मध्ये फिरत्या गाडीतून जेवणाची व्यवस्था

0

गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोर-गरीब, गरजूंना सकाळी नास्ता व रात्रीचे जेवण मील ऑन व्हील योजनेतून ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मधून एकूण जमा रकमेच्या ३० टक्के निधी कोविड-१९ करिता खर्च करण्याचे आदेश केंद्र तसेच राज्य शासनाने नुकतेच प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर गडचिरोली शहरातील गरजू लोकांसाठी जेवणाचे २५० पार्सल दररोज गरजूंना गाडीतून शहरात पोहचविले जात आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी गडचिरोली नगरपरिषदेला निधी वर्ग करण्यात आला आहे. नगरपरिषदेकडून हे काम महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली द्वारा संचलित अन्नपूर्णा माय खानावळ, सखी लोकसंचलित साधन केंद्रामार्फत अन्न शिजवून व पॅकींग करून दिले जात आहे.

शहरात आश्रयास असलेले मजूर, गरीब, भिक्षेकरी, छोटे व्यावसायिक, जवळील भागातून भाजीपाला घेवून आलेले शेतकरी, दवाखान्यातील रुग्णांचे नातेवाईक इत्यादींना अल्पदरात जेवणाची सोय यातून होणार आहे. ज्यांच्याकडे ५ रूपये सूद्धा नाहीत त्यांनाही मोफत यामधून जेवणाची पार्सल दिले जात आहे. सकाळी अन्नपूर्णा आपल्या दारी मधून नास्ता, दुपारी शिवभोजन केंद्रावर जेवण व पुन्हा सायंकाळी अन्नपूर्णा आपल्या दारी मधून जेवण अशा पध्दतीने दररोज तीन वेळ अन्न पुरविण्याचे काम गडाचिरोली प्रशासनाकडून केले जात आहे.

गरजूंनी या वेळेला या ठिकाणी सकस आहाराचा लाभ घ्यावा –

सकाळचा नास्ता : रूपये ५ मध्ये : वेळ स.८ ते स.९:३० ठिकाण – जिल्हा क्रीडांगण – शेतकरी बाजार, हनुमान वार्ड, कारगिल चौक, गोकूळनगर, वृद्धाश्रम व इंदिरानगर या ठिकाणी

दुपारचे जेवण : रूपये ५ मध्ये : वेळ स. ११.०० ते दु. ३.०० ठिकाण – कात्रटवार कॉम्प्लेक्स, चामोर्शी रोड, शिवभोजन केंद्र, गडचिरोली.

सायंकाळचे जेवण : रूपये ५ मध्ये : वेळ सायं.६.३० ते सायं. ७:३० ठिकाण – हनुमान वार्ड, कारगिल चौक, गोकूळनगर, वृद्धाश्रम व इंदिरानगर या ठिकाणी

यानुसार शहरात एकुण ७५० थाळी नास्ता व जेवण दररोज गरजूंना पुरविण्यात येत आहे.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामधून या योजनेची अंमलबजावणी नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे. शहरातील विविध वार्डात वस्तीस्तरीय संघ यांनी गरजू व गरीब कुटुंबांची यादी तयार केली आहे. माविमचे क्षेत्रिय समन्वयक, सहयोगिनी व नगर परिषदचे शहर अभियान व्यवस्थापक लाभार्थ्यांची पडताळणी करीत आहेत.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचा पुढाकार : गडचिरोली जिल्ह्यात असलेला मोठा मजूर वर्ग व संचारबंदीमुळे आलेली परिस्थिती यातून कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी या योजनेला प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली. जिल्हा खनिज प्रतिष्ठाणमधून वीस लक्ष मंजूर करण्यात आली. यातील पहिला हप्ता रूपये ५ लक्ष गरपरिषदेला वर्ग करण्यात आले आहेत. दि. २५ एप्रिलपासून ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. आता दि. २५ एप्रिल ते ५ जून पर्यंत दररोज सकाळी २५० नास्ता व सायंकाळी २५० जेवण या पद्धतीने अन्नपूर्णा आपल्या दारी “मील ऑन व्हील” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेमार्फत माविम कार्यालयात झाला शुभारंभ : प्रायोगिक तत्वावर यशस्वी झालेल्या या उपक्रमाचा शुभारंभ महिला आर्थिक विकास महामंडळ येथे नगराध्यक्षा योगिता पिपरे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी संजय ओव्हळ, माविमच्या व्यवस्थापक कांता मिश्रा, नगरसेवक प्रमोद पिपरे व माविमच्या बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.

सकस व रूचकर जेवण : दोन चपात्या, १५० ग्रॅम भात, १०० ग्रॅम भाजी व १ वाटी वरण हे एका पार्सल जेवणात समाविष्ट करण्यात आले आहे. हे जेवण तयार करताना आवश्यक स्वच्छता व काळजी घेतली जात आहे. पॅकिंग करताना आवश्यक स्वच्छता ठेवूनच केली जाते तसेच सदर पॅकिंग बंदिस्त स्वरूपात गरजूंपर्यंत पोहचविले जाते.

जिल्हाधिकारी, दीपक सिंगला : केंद्र व राज्य शासनाच्या सूचना मिळाल्यानंतर सदर निधी जिल्ह्यातील गरजूंसाठी वापर करण्याकरिता फिरत्या गाडीतून ‘मील ऑन व्हील’ योजना तयार करण्यात आली. प्रायोगिक तत्वावर सुरू केल्यानंतर ती यशस्वी झाली. शहरातील गरजू लोकांनी या सकस भोजनाचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करीत आहे. यासाठी नाममात्र शुल्क ५ रूपये ठेवण्यात आले आहे. फारच गरीब व पैसे नसलेल्या गरजूंना आपण मोफत भोजन वितरित करत आहोत. ही योजना पुढिल ४० दिवस सुरू ठेवण्यात येणार असून गरजेनुसार त्यातील २५० जेवणांच्या थाळीच्या संख्येत वाढही करण्यात येणार आहे.

एनएबीएल मान्यताप्राप्त कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा असलेले स्वारातीम हे भारतातील पहिले विद्यापीठ

0

पालकमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

नांदेड, दि. 29 :-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनल अॅक्रेडीशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मान्यता मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी केले.

श्री. चव्हाण यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळेस भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही प्रयोगशाळेसाठी एनएबीएलची मान्यता असणे ही आवश्यक बाब आहे. हे मूल्यांकन आणि मान्यतेचा काळ हा कमीत कमी सहा महिन्याचा असतो, पण विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेतील समितीतर्फे फक्त तीन आठवड्यात ही मान्यता मिळविली आहे. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रो.संजय मोरे, डॉ.सुप्रिया यमेकर, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांची प्रमुख भूमिका होती.

दि. 25 आणि 26 एप्रिल रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचे मूल्यांकन दिल्ली येथील समितीमार्फत करण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसात या प्रयोगशाळेमध्ये कोरोना स्वॅब नमुने तपासण्यात आलेले नाहीत.

नांदेड येथील कोरोना स्वॅबचे नमुने यापूर्वी पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी जात होते. त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी अहवाल येण्यासाठी लागत असे. अशोकराव चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, डॉ.गजानन झोरे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अगदी तीन आठवड्यात या प्रयोगशाळेची उभारणी झाली. सध्या दररोज सरासरी १०० च्यावर हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमधून कोरोना स्वॅबचे नमुने येत आहेत. नमुने कमी असल्यामुळे सध्या मॅन्युअल पद्धतीने काम चालू आहे. एक शिफ्ट ही सहा ते सात तासांची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त २५० नमुन्यांची तपासणी करण्यात येते. दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचा अहवाल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देता येतो. दुपारनंतर आलेल्या नमुन्यांचा अहवाल हा दुसऱ्या दिवशी देण्यात येतो, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

या प्रयोगशाळेमध्ये विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील पीएच.डी. आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून आणि स्वच्छेने काम करीत आहेत. यामध्ये व्यंकटेश जाधव, डॉ.सुजाता इंगळे, मनोज रामपुरी, पियुष वालुकर, नेहा भुरे, काजल भोसले, आनंद पवार, दिशा बसवे यांचा समावेश आहे.

पुणे विभागात आज काय आहे कोरोनाची स्थिती (व्हिडीओ)

0

पुणे दि. 30:पुणेविभागातील कोरोनाच्या संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच्या स्थितीबाबत ची  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

ऐका त्यांच्याच तोंडून …

पुणेविभागातील 305कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे.  तर ॲक्टिव्ह रुग्ण 1 हजार 504 आहेत. विभागात कोरोना बाधित एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 738 बाधित रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 43 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 81 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 30 बाधित रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात 13 बाधित रुग्ण आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत.  तर 268 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण 1 हजार 383 असून कोरोना बाधित 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण  19 हजार 23 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212  नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.