Home Blog Page 2607

4 मे 2020 पासून सुरु होणाऱ्या दोन आठवड्यांच्या लॉकडाऊन दरम्यान ऑरेंज झोनमधील व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींबद्दल स्पष्टीकरण

0

देशातील कोविड -19 ची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन उपायांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर 4 मे 2020 पासून लॉकडाऊनला आणखी दोन आठवड्यांसाठी मुदतवाढ देण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने काल दिला.

ऑरेंज झोनमधील व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी  (कृपया https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1620095) मध्ये दिलेल्या ऑरेंज झोनमधील परवानगी असलेल्या कृतींचा संबंधित परिच्छेद पहा) स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे:

देशभरात प्रतिबंध असलेल्या क्रियांच्या व्यतिरिक्त, ऑरेंज झोनमध्ये, जिल्ह्यात आणि आंतर-जिल्ह्यात  बसगाड्या चालवण्यास प्रतिबंध आहे.

इतर दोन क्रियांना निर्बंधासह परवानगी दिली गेली आहे:

फक्त एक ड्रायव्हर आणि दोन प्रवासी या तत्वावर टॅक्सी आणि कॅब चालकांना परवानगी आहे,

व्यक्ती आणि वाहनांच्या आंतर-जिल्हा वाहतुकीमध्ये  केवळ परवानगी असलेल्या क्रियेसाठी चार चाकी वाहनांमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त जास्तीत जास्त दोन प्रवासी, प्रवास करू शकतात.

ऑरेंज झोनमध्ये इतर सर्व क्रियांना कोणत्याही निर्बंधांशिवाय परवानगी आहे.

तथापि, राज्ये / केंद्रशासित प्रदेश त्यांचे मूल्यांकन आणि प्राधान्य यावर आधारित निर्णय घेऊन याहूनही कमी कामांनाच फक्त  परवानगी देऊ शकतात.

 

मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा

0

मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा पुढीलप्रमाणे –

1. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.

2. असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.

3. मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे.

4. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-19 प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून  पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

5. कृपया अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही कुठेही धावाधाव करू नये. राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोना संपुर्ण नष्ट होत नाही, तोपर्यंत नियमांचे पालन करावे लागेल-4 मे पासून अर्ध्या देशातील कामकाज पुर्ववत होईल: जावडेकर

0

नवी दिल्ली. केंद्र सरकारने आज(शनिवार) कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. सुचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘वाईट वेळ निघून केली आहे, पण जोपर्यंत व्हायरस संपुर्ण नष्ट होत नाही, तोपर्यंत नियमांचे पालन  करावे लागेल. हे संक्रमण चीनमधून आले आहे, पण अद्याप याचे औषध मिळाले नाही. औषध मिळेपर्यंत आपल्याला व्हायरससोबतच जगावे लागेल. मास्क लावणे, सतत हात धुणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, हे सर्वांसाठी गरजेचे आहे.’

जावडेकर पुढे म्हणाले की, लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत मिळाली आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात 4 मे पासून अर्ध्या देशातील कामकाज पुर्ववत होईल. कोरोनावर आमचे व्यवस्थापन इतर देशांपेक्षा खूप चांगले आहे. सर्व परिसरांना झोनमध्ये विभागले असल्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे.

विरोधकांच्या आरोपांवर जावडेकर म्हमाले की, ‘विरोधक दिशाहीन आहेत. त्यांच्याकडे बोलण्यास कोणताच मुद्दा उरलेला नाही. सध्या ते चांगली चर्चाही करत नाहीयेत आणि सल्लादेखील देत नाहीयेत. ते आधी ज्या मुद्द्यांवर सहमती दर्शवत होते, आता त्यांवरच आरोप करत आहेत.’ पश्चिम बंगाल सरकारच्या आरोपांवर जावडेकर म्हणाले की, तिथे काही लोकांना भारत आणि बंगालदरम्यान युद्ध करण्याचे ठरवले आहे. पण, आम्हाला यात काहीच रस नाही. आम्हाला त्या राज्याची मदत करायची आहे, तेथील समस्या दूर करायची आहे.

जावडेकर यांनी सांगितल्यानुसार, भारताकडे सध्या खूप मोठी संधी आहे. या संधीचा फायदा देशाने घ्यायला हवा. आम्ही सर्व मोठ्या कंपन्याचे स्वागत करतो. मागील सहा वर्षात देशात मोबाइल फॅक्ट्र्यांची संख्या दोन वरुन 150 वर पोहचली आहे. आम्ही पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स आणि वेंटीलेटरदेखील बनवत आहोत.

उत्तर प्रदेशचे 847 मजूर विशेष रेल्वेने घराकडे रवाना

0

परप्रांतीय मजुरांना निरोप देताना पालकमंत्री छगन भुजबळ भावुक

नाशिक दि. 2 मे  : परप्रांतीय मजुरांची नाशिकच्या प्रशासनाने कुटूंबाप्रमाणे काळजी घेतली. गेला दीड महिना सर्व यंत्रणा या मजुरांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी झटत होती. त्यामुळेच तर आज रेल्वे सुटतांना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. गाडी सुटतांना या प्रवाशांनी महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र, अशा घोषणा देवून एकप्रकारे नाशिकच्या प्रशासनालाच धन्यवाद दिले, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. या प्रवाशांना निरोप देताना पालकमंत्री देखील भावूक झाले होते.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरांतून पायी उत्तर प्रदेशकडे निघालेल्या या मजुरांना इगतपुरी, नाशिक येथे थांबवून निवारागृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व मजुरांना आज विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशला रवाना करण्यात आले. या गाडीला निरोप देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते,  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते.

नाशिक शहरातील विविध निवारागृहात गेल्या दीड महिन्यापासून थांबून असलेल्या उत्तर प्रदेश येथील 847 कामगार, मजूरांना शनिवारी सकाळी नाशिक येथून विशेष रेल्वेने उत्तर प्रदेश लखनऊला रवाना करण्यात आले. यामध्ये मुंबई, नालासोपारा, कल्याण, नेरूळ येथील मजूर होते.

श्री.भुजबळ म्हणाले, मुंबई येथून पायी चालत आलेल्या या परप्रांतीय मजुरांमध्ये लिंबू पाण्याचा व्यवसाय करणारे, दूध विक्रेते, वडापावचे व्यावसायिक होते. लॉकडाऊन जाहीर होताच हे सगळे पायीच गावाकडे निघाले होते. मात्र त्यांना नाशिक आणि इगतपुरी येथील निवारागृहात थांबवून तेथे त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. गेल्या दीड महिन्यात त्यांना दोन वेळेचे जेवण, चहा, नाश्ता अस सगळे पुरविले जात होते. या सर्वांची वेळोवळी आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये जे अजूनही कोरोना संशयित वाटत होते, त्यांना नाशिक येथेच थांबविण्यात असून त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत. उर्वरितांना आज या विशेष रेल्वेने सोडण्यात येत आहे. गाडीतही त्यांना सुरक्षित वावर ठेवत बसविण्यात आले आहे. सोबत दोन वेळेचे जेवण, पिण्याचे पुरेसे पाणी देण्यात आले आहे.

कौतुकाची थाप

गेला दीड महिना जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, आरोग्य यंत्रणा यांनी या परप्रांतीय मजूरांची खूप काळजी घेतली, अशा शब्दात पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले.

हे संकट लवकर दू होवो

या सर्व परप्रांतियांच्या चेहऱ्यावर आज घरी जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणजे रेल्वे सुटली तेव्हा त्यांनी मोठमोठ्याने महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. आपण अपेक्षा करू हा कोरोना लवकरच महाराष्ट्रातून, भारतातून आणि संपूर्ण जगातून नाहीसा होईल, असा आशावादही पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.

आत्मविश्वास दुणावला : सूरज मांढरे

नाशिक मधून आज उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. 847 नागरिकांना घेऊन जाणाऱ्या गाडीत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, जेवण, बिस्कि‍टे सर्व काही देऊन ही गाडी निघाली आहे. रेल्वे सुटल्यावर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद असा जयघोष केला. म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकू याबद्दलचा आत्मविश्वास आज दुणावला असल्याचे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले.

पुणे विभागात 46 हजार 931 क्विंटल अन्नधान्याची तर 11 हजार 186 क्विंटल भाजीपाल्याची आवक

-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे, दि.2 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 46 हजार 931 क्विंटल अन्नधान्याची तर 11 हजार 186 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 5 हजार 217 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 21 हजार 154 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागात 1 मे 2020 रोजी 100.098 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.646 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 40 हजार 993 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 12 हजार 793 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 158 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 255 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 481 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 40 हजार 993 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 12 हजार 793 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता अधिका-यांची नियुक्ती

-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे दि.2 : – आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेअन्वये विस्थापित कामगार यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांचे प्रवासाकरीता आदेश निगर्मित केले आहेत. या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आले आहे तसेच अधिकारी, कर्मचा-यांची आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे ( मो.नं.9423043030) व तहसिलदार, संजय गांधी योजना,पुणे शहर श्रीमती रोहिणी आखाडे ( मो.नं. 9226373191),अव्वल कारकून ( महसूल शाखा) कैलास बांडे, लिपीक (महसूल) अंकुश गायकवाड, लिपिक, (संजय गांधी योजना) तहसिल कार्यालय श्रीमती आफरीन शेख यांचेकडे पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये, जिल्हयात जाणा-या स्थलांतरित कामगारांसाठी त्या-त्या संबंधित राज्य, जिल्हयाकडून परवानगी घेणे तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झालेबाबतची खात्री करणे, परवानगी पत्र तयार करुन घेणे. व त्यांना संबंधित त्या-त्या राज्यामध्ये, जिल्हयामध्ये पाठविण्याची व्यवस्था करणे तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे
उपजिल्हाधिकारी भूसंपादन निता सावंत ( मो.नं. 9421118446),तहसिलदार ( महसूल शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय विवेक जाधव ( मो.नं.9421215678), अव्वल कारकून ( महसूल शाखा) योगेश कुंभार, अव्वल कारकून ( महसूल शाखा) श्रीमती सारिका चौधरी, लिपिक ( महसूल शाखा) शशिकांत वाघ यांचेकडे पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये, जिल्हयात जाणा-या स्थलांतरित, विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटनासाठी त्या-त्या संबंधित राज्य, जिल्हयाकडून परवानगी घेणे तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झालेबाबतची खात्री करणे. परवानगी पत्र तयार करुन घेणे. व त्यांना संबंधित त्या-त्या राज्यामध्ये, जिल्हयामध्ये पाठविण्याची व्यवस्था करणे तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे
उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय (स्वागत शाखा) अमृत नाटेकर ( मो.नं. 9834468894/ 9422616033), तहसिलदार,जिल्हाधिकारी कार्यालय ( पुनर्वसन शाखा) श्रीमती स्मिता पवार, अव्वल कारकून ( स्वागत शाखा) आदेश दुनाखे, अव्वल कारकून (पुनर्वसन शाखा) संतोष भालेरे, लिपीक (पुनर्वसन शाखा) यांचेकडे बाहेरच्या राज्यातून, जिल्हयातून पुणे जिल्हयात येणा-या स्थलांतरित विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक यांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे, तसेच संबंधितांना त्यांचे रहिवास ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करावी, तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे
उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.3 श्रीमंत पाटोळे (मो. नं. 9075748361), तहसिलदार (पुनर्वसन शाखा) बालाजी सोमवंशी ( मो.नं.8308127992), अव्वल कारकून ( पुनर्वसन शाखा) जितेंद्र पाटील, लिपीक (पुनर्वसन शाखा) मिलींद पोळ, मंडल अधिकारी ( भूसंपादन क्र.3) राजेंद्र वाघ यांच्याकडे बाहेरच्या जिल्हयातून पुणे जिल्हयात येणा-या स्थलांतरित कामगार ( परराज्यात / जिल्हयात येणारे) यांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे, तसेच संबंधितांना त्यांचे रहिवास ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करावी, तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A व B ( SOP) प्रमाणे कार्यवाही करणे .
संजय पवार, उपजिल्हाधिकारी (मो.9850032095), सहाय्यक श्रीमती विमल डोलारे, , श्रीमती शुभद्रा पंडीत, अ.का.सर्वसाधारण शाखा, श्रीमती छाया सानप, लिपिक, सर्वसाधारण शाखा, श्रीमती सरिता नेहरकर, लिपिक, लेखा शाखा यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांचेशी समन्वय साधून कोरोना या संसर्ग आजाराचा पुणे जिल्हयामध्ये जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे. सर्व शासकीय , निमशासकीय आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण संबंधित यंत्रणेकडून देण्यात आले आहे. किंवा कसे याबाबतची खात्री करुन अहवाल नियंत्रण कक्षास सादर करणे. कंटेनमेंट प्लॅनचा काळजीपूर्वक अभ्यास करुन आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी समन्वय करुन यासंदर्भात समन्वय अधिकारी यांची क्षमता बांधणी करणे. विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक व स्थलांतरित कामगार, इतर व्यक्ती इतर राज्यात, जिल्हयात वैयक्तीक स्वत:च्या वाहनाने जाणा-या व्यक्तींकरिता पासेस देण्याची कार्यवाही करणे. माहिती नियंत्रण कक्षाला कळविणेत यावी.
नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी श्री. हिम्मत खरोड, (मो. 9422072572). सहाय्यक अधिकारी व कर्मचारी श्रीमती रुपाली रेडेकर, तहसिलदार निवडणूक शाखा, श्रीमती नेहा चाबुकस्वार, नायब तहसिलदार, श्री. योगेश ब्रम्हे, अ.का., श्री.सचिन कोकाटे, अ.का., श्रीमती पुजा नाईक, अ.का., श्रीमती शितल शिंदे, लिपिक, श्री. संदिप पवार, लिपिक शासन आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1, दिनांक 17.04.2020 प्रमाणे सर्व प्रकारचे पासेस देणे. पुणे जिल्हयात व इतर ठिकाणावरुन पास बाबत दुरध्वनी व ई-मेलव्दारे येणा-या तक्रारी व विचारणा करणा-या नागरिकांना मार्गदर्शन करणे. दररोज अहवाल नियंत्रण कक्षास सादर करणे. तसेच अत्यावश्यक व वैद्यकीय व्यक्तींना पास देण्याची कार्यवाही करणे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संजीव भोर (मो. 9422221114), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड श्री. विनोद सकरे, (मो. 8605837070) उपरोक्त नोडल अधिकारी यांना विद्यार्थी यात्रेकरु, पर्यटक व स्थलांतरित कामगार, इतर व्यक्ती (परराज्यात, जिल्हयात येणारे व जाणारे) यांची प्रवास मार्गनिहाय वाहतूक व्यवस्था करणेकरिता नोडल अधिकारी यांचेशी समन्वय साधून कार्यवाही करणे बाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राम यांनी नुकताच याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.
0000

लाॕकडाउन ने काय दिले काय घेतले…(लेखिका- विद्या घटवाई)

0

 

कोरोना मुळे अपरिहार्य असलेला ,”लाॕकडाउन”  हा सध्याचा परवलीचा शब्द झालेला आहे.काही दिवसांपूर्वी कोणालाच हा शब्द माहित नव्हता.पण आज प्रत्येकाच्या ओठावर हे एकच नाव आहे. आणि का असणार नाही. समस्त जगासाठी भयंकर डोकेदुखी ठरलेल्या या जीवघेण्या आजारावर आत्ता या क्षणाला तरी कसलेही औषध आपल्याकोणाकडे नाहीए.वैश्विक महामारी म्हणून घोषित केलेल्या आजाराने जगाला जागच्या जागी खिळवून ठेवले आहे.भारतात साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली असली तरी चीन मध्ये जानेवारीतच याचा रुग्ण समोर आला होता.त्या पाठोपाठ इटली,अमेरिका रुग्ण सापडत राहिले. या आजाराची माहिती होताच त्याच्या व्याप्तीचा अंदाज घेत असतानाच या रोगाने परदेशात माणसे कायं शहरेच गिळंकृत करायला सुरुवात केली.इतका याचा प्रसार झटकन होत होता. आणि हस्तांदोलनातून,एकमेकांना स्पर्श करण्यातून श्वासवाटे याचा प्रादूर्भाव होत असल्याने गर्दी प्रामुख्याने टाळले जाणे भाग होते. आणि त्यामुळेच ,”लाॕकडाउन” या शब्दाचा वापर करण्यात आला. आज याच लाॕकडाउन ची आपल्यवर टांगती तलवार आहे.

कोविड 19 वर ठोस औषध नसल्यने त्याचा झटपट प्रसार रोखणे हाच उपाय मानून प्रत्येकाला घरी थांबण्यास सांगाण्यात आले.आणि लोकांना याची अंमलबाजावणी करता यावी यासाठी खबरदरी म्हणून सरकारने,”लाॕकडाउन” जाहीर केले.कुठेही,कशासाठीही घराबाहेर जाऊ नका. जेणेकरुन या आजाराच प्रसार होणार नाही. असे पंतप्रधानांनी लोकांना आवाहन केले.जीवनावश्यक जे जे असेल ते लोकांना घराजवळ उपलब्ध करुन देण्यात आले. या दरम्यान संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली.

परंतु एखादी गोष्ट दुसऱ्याने सांगितल्यावर वर आपण समजूच असे नसते.किंवा एखादा निर्णय सरकार दरबारी जाहीर करण सोप असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्याचा फज्जा कसा उडतो हे या लाॕकडाउन मुळे जवळून पाहता येतंय. घरी राहणं हे प्रत्येकाच्या खरंतरं हिताचे आहे.शिवाय कुटुंबातील एक व्यक्ती जर बाधित असेल तरः त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा धोका /रिस्क वाढते.त्यादृष्टीने त्याने/तिने घरीच थांबणे आवश्यक आहे. तरीपण लोकांची बाहेर गर्दी का होते आहे?सरकार कडून वारंवार करण्यात येणार्या आवाहनाला लोक का हरताळ फासतं आहेत?याची उत्तरे शोधणे गरजाचे आहे.

लाँकडाउन साठी लोक मनातून तयार नव्हते. कारण आजाराची व्याप्ती लोकांना तितकीशी कळाली नव्हती. रोजगार ही प्रमुख गोष्ट होती आणि राहणार आहे. आपण कामावर गेलो नाही तर नोकरी जाईल या भितीने लोक बाहेर पडत राहिले. यावर सरकारने आवश्यक असा फतवा काढला आणि लाॕकडाउन कडक झाले.पण ज्यांची हातावरची पोट आहेत त्यांचे अतोनात हाल झाले.घरी बसले तर पोटाला
कोण देणार?तेव्हा मला घराबाहेर पडलेच पाहिजे.असे समजून ही लोक बाहेर येऊ लागली.भूक माणसाला बसू देत नाही ना..पण तोवर बाहेर सगळंच ठप्प झाले असल्याने उपासमारीची वेळ या लोकांवर आली. आपल्या इतिहासात प्रथमच सर्व धर्मियांची मंदिरे,प्रार्थना स्थळे लोकांसाठी बंद करण्यात आली. आणि जनतेत असंतोष वाढू लागला.यामध्ये अतोनात नुकसान आपल्या बळीराजाचेही झाले. अतोनात कष्टाने कमावलेल्या पीकाला भाव नसल्याने,वाहतूक बंद असल्याने पीक जागच्या जागी सडून गेलं.समस्त जगाची क्षुधा शांत करणार्यांवर उपासमारीची वेळ आली.

प्रत्येकाचा रोजगार ठप्प झाल्याने परिणामी देशाचे आर्थिक गणित ठप्प झाले.म्हणजे च देशाची इकाॕनामी अघोषित काळांसाठी बंद पडली. आर्थिक चक्र जागच्या जागी थांबले.याचा परिपाक म्हणजे आर्थिक मंदी तोंडासमोर स्पष्ट दिसते आहे.

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य क्षेत्रावर ही कमालीचा ताण आलायं. पुरेसे व्हेटिंलिटर्स,बेडस आणि बाकीच्या वैद्यकीय सोयी सुविधा आपल्याकडे इतक्या संख्येने उपलब्ध नसल्याने उपचारात अडचणी येत आहेत. या दुर्धर आजाराशी प्रत्यक्ष सामना करायला डाॕक्टर,नर्स याची संख्या कमी पडते आहे.
आणि या सगळ्याच्या सततच्या विचाराने नैराश्य,नकारात्मकता वाढली. याला लागून मानसिक आजार वाढले. त्यामुळे अस किती दिवस चालणार? पुढे कायं होणार हाच प्रत्येकाच्या प्रश्न आहे.. …

वाईटातून चांगले घडतच असते गरज असते तसे पाहण्यची.. या आजाराने माणसाला सर्वप्रथम त्याच्या मर्यादा कळल्या. त्याच्या अहंकाराला आळा बसला. माणुसकी हेच वैश्विक सत्य आहे हे पुन्हा एकदा पटले. जीवनाश्यक दुसरे काही नाही. जान आहे तो जहाँ हे,हे लोक समजून चुकले. आणि माणूस “ध्याना “च्या मार्गाला लागला. स्वच्छतेचे महत्व प्रत्तेकाला पटले. सतत घरात राहिल्लाने एकमेकां मधले अंतर संपुष्टात आले. घरात एकत्र राहत असून ही मनाने लांब गेलेल्यांसाठी ही पर्वणीच ठरली. धकाधकीच्या जीवनाची सवय झाल्याने साध ,सोपं ,हलक – फुलके जगण आपण विसरलो होते त्याची गरज आणि जाणीव झाली. हळूहळू का होईना लोक या वातावरणाला अंगवळणी पडले. आणि घरी राहूनही लोकं आपआपला आनंद शोधू लागले.

गर्दी जवळजवळ नाहीशी झाल्याने पर्यावरणात कमालीचा सुखद बदल स्पष्ट ‘ दिसतो आहे. सकाळ संध्याकाळी पक्षांचा किलबिलाट कानांना सुखावतो आहे. चिमणी व इतर दुर्मिळ पक्षी यांचा मुक्त वावर आपल्याला दिसतो आहे तो यामुळेंच. नद्यांचे प्रदूषण थांबले असून त्या स्वच्छ दिसत आहेत. हजारो कोटी रुपये खर्चून सुध्दा नद्यांचे प्रदूषण कमी होत नव्हते ते या केवळ लाॕकडाउन ने झाले. हे मान्य करावेच लागेल.घरात येणारा कामगार वर्ग येऊ शकणार नसल्याने सर्वानी घराची जबाबदारी वाटून घेतल्याने एकट्या स्त्री वर येणारी कामे कमी झाली. एकत्र कुटुंब पध्दती आपण विसरलो होतो त्याचाच आज एकमेकांना आधार होतो आहे. आपण युध्दजन्य परिस्थिती फक्त ऐकली होती. पण आज प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. पुरवून खाणे या चा अर्थ् आणि महती आज कळते आहे.एकूणच भारतीय परंपरेची महती या आजाराने पुढे आली. मग ती हात जोडून नमस्कार करणे असो की हव्यास न करता पुरवून खाणे असो किंवा बाहेरुन आले की हातपाय धूवून घेणं असो.भारतीय असल्याचा अभिमान प्रत्येकाच्या मनात जागा झाला. यापूर्वी कुटुंबामध्ये जितकी डोकी तितकी मते असे होते आता मात्र एकाच्या निर्णयवर कुटुंब हमी भरतयं. असंख्य सल्लागार आणि कोर्सेस यांच्या प्रयत्नातून ही साध्य न होणारा घराचे घरपणं,एकोपा हा या लाॕकडाउनमुळेच वाढला हे मान्य करावेच लागेल. आणि आपण माणूस आहोत याच प्रत्येकाला भान आले.
© विद्या घटवाई

राजस्थान हुन 74 विद्यार्थी पोहोचले पुण्यात ( व्हिडिओ)

 

पुणे- राजस्थान मधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले

पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोवीड-19ची (कोरोना) संबंधित लक्षणे अथवा आजारी म्हणून कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनगटावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून
घरी पाठवण्यात आले. चौदा दिवसांत आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या आणि लॉकडाऊन मुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील
विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी धुळे आगाराच्या 70 बसेस पाठविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 4 बसेस होत्या. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उप मुख्य मंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हाधिकारी अमृत
नाटेकर, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी समन्वय साधून या विद्यार्थ्यांना पुण्यात सुखरूप परत आणले. आज सकाळी धुळे आगाराच्या चारही बसेस निर्जंतुकीकरण करून धुळ्याकडे रवाना करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

कलंदर ॠषी —- ( लेखिका – विद्या घटवाई )

ॠषी कपूर आज आपल्यात नाही.वयाच्या 67 व्या वर्षी अनंताच्या प्रवासाला निघून गेला.यावर आजिबात विश्वास बसत नाही.हरहुन्नरी सदाबहार , दिलखुलास आणि मिश्किल असा ॠषी कपूर आज एकदम खामोश झालायं.. आणि त्याला हे असं पाहून जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए वाला काहीसं फिल होतयं. बैचेन होतयं. तस सिने स्टार मंडळीशी आपला काय संबंध असतो?दोन घटका मनोरंजन हा त्यांचाही आणि आपलाही हेतू असतो.पण या दोन घटकांमध्येच काही जण मनावर खोलवर ठसले जातात.आणि कायमचे आपले होऊन जातात.भले रोज आपण त्यांना पाहत नसू परंतु समोर त्याचा एखाद्या सीन चालू आहे आणि आपण न पाहता निघून जातोयं असं होत नाही.ऋषी कपूर त्यातलाच एक होता.

दि ग्रेट राज कपूर यांचे मोठे अपत्य म्हणजे चिंटू उर्फ ॠषी .जन्मापासूनच भाग्याची साथ लाभल्यानेच सर्वार्थांने बलाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. शिवाय राजबिंडे रुप ही होतंच दिमतीला. सिने क्षेत्रात यायला त्यावेळी एवढं पुरेसे होतं
सिने क्षेत्रातली त्याची सुरुवात ,”मेरा नाम जोकर “मध्ये बालकलाकार म्हणून झाली. त्याबद्दल त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.,”मेरा नाम जोकर” चे सपशेल अपयश पुसायला घरकी मुर्गी दाल बराबर या उक्तीनुसार राज कपूर ने आपल्य” चिंटू ला उभा केला.आणि ,”बाॕबी” ने इतिहास घडवत ॠषी कपूर ला जबरदस्त यशाची चव /सुपर डुपर हिट चाखायला दिली.वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ॠषी कपूर उत्कृष्ट नट म्हणून नावारुपाला आला. आणि अर्थातच त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

देखणं रुपा बरोबरच,संगिताचा कान,लयीत मुरलेला त्याचा पदन्यास आणि अभिनयाचा पिढीजात वारस्याला ॠषी प्रामाणिकपणे पुढे नेत राहिला. फस्ट डान्सर, गिटारिष्ट या किताबा बरोबरच साधारण तीस नवोदित नायिकांनी ॠषी कपूर सोबत सिनेमात पहिल्यांदा पदार्पण केल्याचा विक्रम ही ॠषी कपूर नावावर नोंद आहे.

बाॕबी नंतर जहरिला इन्सान, राजा,, खेल खेल में, रफू चक्कर, जिंदादिल, लैला मजनू, कभी कभी, अमार अकबर अँथनी, हम किसी से कम नही, दुसरा आदमी, बदलते रिश्ते, आ’पके दिवाने, प्रेम रोग ,जमानेको दिखाना है, एक चादर मैलिसी ,सागर नगिना, नसीब , घर घर कहानी,विजय,घराना,चाँदनी ,अजूबा
हिना, दिवाना, बोल राधा बोल, दामिनी , साहिबा, गुरुदेव , याराना , दरार, प्रेम ग्रंथ , ये हे जलवा , फना , दिल्ली 6 लव्ह आज कल , दो दुणे चार , पटियाँला हाऊस , अग्निपथ , हाऊसफूल, स्टुडंट आॕफ दी ईयर, औरंगजेब, डी डे , चष्मे बहाद्दूर, शुध्द देसी रोमान्स, बेशरम , कपूर अँड सन्स , 102 नाॕट आऊट , मुल्क आणि 2019 मधला द बाॕडी हा त्याचा अखेरचा चित्रपट.

हे त्याने केलेल्या सिनेमापैंकी काही निवडक सिनेमे. यातही सुरुवातीच्या काळातल्या सिनेमांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे प्रेमवीराची भूमिका.चाॕकलेट बाॕय हे बिरुद ही म्हणूनच त्याला,मिळाले. होय ॠषी कपूर ने बहुतांशी सिनेमांमध्ये चाॕकलेट बाॕय या वन लायनर खालीच भूमिका साकारल्या आहेत. आणि म्हणूनच आख्या सिनेक्षेत्रांमध्ये त्याच्या ताकदीचा रोमँटिक होरो कोणी साकारुच शकले नाही. ती त्याचीच खासियत होती. स्वतः ॠषी ने या टिपिकल भूमिका करताना जाणीवपूर्वक बदल केला असला तरी बाज तोच राहिला. आणि तीच त्याची इमेज बनली. मुख्य म्हणजे प्रेक्षकांना ही त्याच्या अशाच भूमिका आवडत असत.

या इमेज मधून बाहेर पडण्यासाठी म्हणून त्याने काही वेगवेगळे सिनेमे ही केलेत. अगदी एक चादर मैलीसी,दामिनी,मुल्क,आणि अग्निपथ. पण त्याला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. उदा. दामिनी मध्ये दामिनी अर्थातच मिनाक्षी शेषाद्री आणि मोठ मोठ्यांने बोलणारा सनी देवल भाव खाऊन गेले. प्रेक्षकांनी मला नजरअंदाज केलं. अशी खंत ॠषी कपूर ने वेळोवेळी बोलून दाखावली आहे.

सिनेमा समजून उमजून करताना त्याने स्वतः मध्ये केलेले जाणीवपूर्वक बदल दिसून येतात. इथे एक चादर मैलीसी चा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. पण या कडे समीक्षकच पाहू शकले. जनता जनार्दन ला हे असले काही पचनी पडत नाही. परिणामी प्रगल्भता सिध्द करुनही अपेक्षित असलेले वैविध्यपूर्ण रोल ॠषी कपूर च्या वाट्याला त्याकाळी आलेच नाहीत. या शिवाय त्याच्या देखण्या रुपाला विशेषतः चेहर्याला मर्यादा होत्या. आणि हे स्वतः त्याने मान्य ही केलं. याच राजबिंड्या रुपाने त्याला ठराविक भूमिकांमध्येच ठेवले. तो कधीच गरीब,भिकारी हा वाटू शकला नसता.

याशिवाय 80 चे दशक हा अमिताभ चा एरा होता. एकापाठोपाठ एक सलग हिट देणार्या अँग्री यंग मॕन चा ॲक्शन चा जमाना होता.
अधूनमधून विनोद खन्ना ही असायचा..पण सगळेच करतात म्हणून किंवा जमानाच स्टंट चा आहे म्हणून ॠषी ने बळेच मारधोडपट सिनेमे केले नाहीत. अगदी जरुरीपुरते हाणामार्या केल्या.स्वतःला जे जमेल,पचेल आणि मुख्य म्हणजे शोभेल तेच त्याने केले. या ही काळात त्याने हिट सिनेमे दिले. काळाची गरज ओळखत मल्टिस्टारर सिनेमे ही केलेत. पण त्याला कुणी कामाच्या बाबतीत मागे टाकलेयं अस कधीच झालं नाही. कारण त्याच्या वाट्याला येणार काम तो चोख करीत होता.
ॠषी कपूर च्या यशामध्ये त्यावर चित्रित केलेल्या गाण्यांचाही मोठा वाटा आहे. समकालीन गीतकार,संगीतकार आणि गायकांनाही त्याला रोमँटिंक हिरो म्हणून सादर करताना उच्चतम असेच दिलयं.आणि या सर्वाच्या मेहनतीला ॠषी कपूर ने आपल्या बहारदार सादरीकरणाने न्याय दिलायं.

नाहीम्हणायला इथे टिकून राहण्याकरीता जे जे जमेल ते ते त्याने स्वतःला सांभाळत केले.
पण गळ्यापर्यतची स्पर्धा आणि नवनवीन येणारे चेहरे त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. तरीही सिनेमा सोडून
ॠषी कपूर ने दुसरे काही ही केल्याचे आठवत नाही. स्वतःच्या मर्यादा व्यवस्थित ओळखून असल्याने सिनेमा या पहिल्या वाहिल्या खानदानी प्रेमावरच तो ठाम राहिला. ही मोठी गोष्ट आहे. सिनेमाच्या प्रेमापोटीच ॠषी कपूर ने स्वतःमध्ये काळानुरुप बदल केले. आणि दुसर्या इनिंग मधूये त्याला वैविध्यपूर्ण भूमिका मिळू लागल्या आणि तो संधीचे सोने करत राहिला. प्रेम रोग मधला त्याचा अगदी बेसिक प्रश्न तो थेट तिलाच विचारतो – सारे इन्सान जब एक जैसे है तो कोई एक ही क्यू दिल को भाता हे मनोरमा? बोलो ना ? अग्निपथ मधला ,”रौफ लाला” हे प्रेक्षकांसकट स्वतः ॠषी कपूर ला ही सरप्राईज होते. हा रौफ लाला बघताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मुल्क मधला ॲड.मुरादअली महंमद आठवा. अतिशय संयमी आणि सुलझलेला भारतीय पाकिस्तानी ॠषी कपूर ने पूर्ण ताकदीनिशी उभा केलायं. हे एखादा मुरलेला कसलेला अभिनेताच करुं जाणे.सिनेमाचे सगळे संदर्भ बदलत जात असले तरी त्याची सिनेमावरची निष्ठा कधीच बदलली नाही. जवळजवळ चार दशकांहून अधिक कारकीर्दीच्या या रंगतदार प्रवासाबद्दल त्याने कायमच समाधान आणि आनंद व्यक्त केलायं. त्याच्याशी संबंधित लोकांबद्यादल त्तूयाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. यातून त्यांचे तृप्त व्यक्तीमत्व दिसून येते. सिनेमा व्यतिरिक्त त्याचा समाजातील अत्यंत सभ्य ,शालीन वावर त्याच्या फँन्स ना सुखावणारे असायचा.

काही वर्षापूर्वी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये विशेष वार्तालापांत बोलताना त्यांना जवळून अनुभवता आले.तेव्हा सिनेमा विषयीची त्यांची तळमळ स्पष्ट कळत होती.

गेल्या दोन वर्षापासून त्याला ल्युकेमियाँने पछाडलेले असले ,तरी उपचारादरम्यान ही आता काम मिळेल का?या विचारात तो असायचा. गंभीर राहणे हा त्याचा स्वभाव नव्हताच मुळी. स्वभावातील मिश्किल पणामुळेच तो शेवटच्या श्वासापर्यंत तरोताजा राहिला.
त्याच्या समाधानीवृत्तीमुळे ॠषी कपूर
“खुल्लमखुल्ला ” या त्याच्या आत्मचरित्रात अस म्हणतो की अत्यंत प्रसिध्द बापाचा मुलगा आणि एका प्रसिध्द मुलाचा बाप म्हणून या घडीला समाधानी आहे

जीवन के दिन छोटे सही हम भी बडे दिलवाले..कल की हमे फुरसत कहाँ सोचे तो हम मतवालें..यात्याच्यावर चित्रित झालेल्या पंक्तीप्रमाणेच जगलेल्या
ॠषी कपूर ला माझा अलविदा.
© विद्या घटवाई

कोणत्या झोन मध्ये काय सुरु, काय बंद …

0

नवी दिल्ली : करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता केंद्र सरकारनं दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर (३ मे) आणखीन दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केलीय. म्हणजेच आता १७ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. यावेळी, ग्रीन झोनमधील भागांना काही सूटही देण्यात आलीय. त्यानंतर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये कोणत्या गोष्टी सुरू राहतील आणि कोणत्या गोष्टींना बंदी असेल, हे जाणून घेणं नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. केंद्रानुसार, १३० जिल्हे रेड झोनमध्ये, २८४ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर ३१९ जिल्हे ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आले आहेत.

प्रवासासाठी बंदी

गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान हवाई उड्डाण, रेल्वे सेवा आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची परवानगी नाही. इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना केवळ सरकारकडून व्यवस्था करण्यात आलेल्या बसची आणि विशेष रेल्वेचीच मदत घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या मजुरांना घेऊन जाण्यासाठी होणारा खर्च रेल्वे राज्य सरकारकडून वसूल करणार आहे.

शाळा, हॉटेल, पूजा स्थळं बंद
सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कुणीही घराबाहेर पडण्याला बंदी असेल. तसंच गर्भवती महिला, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती आणि १० वर्षांहून लहान मुलांनी घराबाहेर पडू नये.

सोबतच या दरम्यान शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांचं संचालनही बंद असेल. याशिवाय रेस्टॉरंट, हॉटेल, पूजा स्थळ आणि लोकांनी एकत्र जमण्याला बंदी सुरूच राहील.

औषधांच्या दुकानं

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधली औषधांची दुकानं मात्र सुरूच राहणार आहेत. कंटेन्मेंट भागात मात्र औषधांची दुकानंही बंद राहतील. परंतु, औषधं घेतानाही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे.

रेड झोन

काय बंद : सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅब बंद राहतील. रेड झोनमध्ये न्हावी आणि सलूनही बंद राहतील.

काय सुरू : ग्रामीण भागात सर्व प्रकारचं औद्योगिक आणि उत्पादन कार्य, मनरेगाची कामं, फूड प्रोसेसिंग युनिट, विट भट्ट्या सुरू राहतील. याशिवाय शेती काम, पशुपालन, मत्स्य पालन यांनाही परवानगी देण्यात आलीय. शहरी भागात शॉपिंग मॉलसोडून इतर दुकानं सुरू राहतील.

ग्रीन झोन

ग्रीन झोनमध्ये बस सेवा सुरू केली जाऊ शकेल. परंतु, बसची क्षमता ५० टक्क्यांहून अधिक राहणार नाही. त्यामुळे ५० आसनी बसमध्ये केवळ २५ प्रवासीच प्रवास करू शकतील. त्याच पद्धतीने डेपोमध्येही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत. या जिल्ह्यांत न्हावी, सलून यांसहीत अन्य महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू पुरवणाऱ्या संस्थांनाही ४ मेपासून सूट मिळू शकेल. सिनेमा हॉल, मॉल, जिम, स्पोर्टस कॉम्प्लेक्स इत्यादी बंद राहतील.

तसंच गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार पान आणि दारुच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आलीय. परंतु, एका वेळी पाच जणांहून अधिकांना गर्दी करण्याची परवानगी नाही.

कोवीड तपासणीसाठी येणाऱ्यांना विभागीय आयुक्त डाॕ.म्हैसेकर यांचे आवाहन

0

 

पुणे, दि. 1: कोविड तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी सोबत आवाश्यक साहित्य आवर्जून आणावे असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

डॉ. म्हैसेकर पुढे म्हणतात, रुग्णालयात येणाऱ्यां व्यक्तींच्या घशामधील किंवा नाकामधील द्रव्यांचा नमुना तपासणी करीता घेण्यात येते. तपासणीसाठी येतांना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. मास्क न घालता या केद्रांचा जवळपास फिरु नये. तपासणी दरम्यान तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींकरीता केंद्रामध्ये ट्रीपल लेअर मास्क ठेवण्यात आले असून त्या मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.
तपासणी केंद्रावर येतांना किमान दोन दिवसाचे मुक्कामाचे साहित्य सोबत आणावे. त्याबरोबर स्वत:चे कपडे, तसेच आवश्यकतेनुसार पांघरण्यासाठी आणि आंथरण्यासाठी चादर किंवा शाल सोबत घेऊन यावे
ज्या व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार असेल त्यांनी किमान दोन दिवस पुरेल इतके औषधे सोबत आणावे. आवश्यक त्या प्रसंगी संपर्क साधता येईल, त्या व्यक्तीचे नाव व भ्रमणध्वनी बरोबर ठेवावे. मोबाईल वापरत असाल तर त्यांचा चार्जर सोबत घेवून यावे. या सर्व वस्तू सोबत आणत असाल तर वस्तू सांभाळण्याची जबाबदारी ज्यांची त्यांची राहील. आपल्याकडे जर स्मार्टफोन असेल तर केंद्राच्या आरोग्य विभागाचे आरोग्य सेतू ॲप डॉऊनलोड करावे, असे आवाहनही श्री म्हैसेकर यांनी केले आहे.

राज्यात आज १००८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण ११ हजार ५०६

0

मुंबई, दि. १: राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधित १००८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण  ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ५३ हजार १२५ नमुन्यांपैकी १ लाख ४० हजार ५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११ हजार ५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ४८५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्गमधील १, भिवंडी महानगरपालिकेतील १, ठाणे मनपामधील १, नांदेड मधील १,औरंगाबाद मनपामधील १ तर १ मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय उत्तर  प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १८ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर ११  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे.  या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८  टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका : ७८१२ (२९५)

ठाणे : ५१ (२)

ठाणे मनपा : ४३८ (७)

नवी मुंबई मनपा : १९३ (३)

कल्याण डोंबिवली मनपा : १७९ (३)

उल्हासनगर मनपा : ३

भिवंडी निजामपूर मनपा : १७ (१)

मीरा भाईंदर मनपा : १३५ (२)

पालघर : ४४ (१)

वसई विरार मनपा : १३५ (३)

रायगड : २६ (१)

पनवेल मनपा : ४८ (२)

ठाणे मंडळ एकूण : ९०८१ (३२०)

नाशिक : ६

नाशिक मनपा : ३५

नाशिक मनपा : ३५

मालेगाव मनपा :  २०१ (१२)

अहमदनगर : २६ (२)

अहमदनगर मनपा : १६

धुळे : ८(२)

धुळे मनपा : १८ (१)

जळगाव : ३४ (११)

जळगाव मनपा : १० (१)

नंदूरबार : ११ (१)

नाशिक मंडळ एकूण : ३६५ (३०)

पुणे :६८ (४)

पुणे मनपा : ११७६ (९२)

पिंपरी चिंचवड मनपा : ७२ (३)

सोलापूर : ७

सोलापूर मनपा : १०१ (६)

सातारा : ३२ (२)

पुणे मंडळ एकूण : १४५६ (१०७)

कोल्हापूर : ९

कोल्हापूर मनपा : ६

सांगली : २९

सांगली मिरज कुपवाड मनपा :१ (१)

सिंधुदुर्ग : २ (१)

रत्नागिरी : ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण : ५५ (३)

औरंगाबाद :२

औरंगाबाद मनपा : १५९ (८)

जालना : ३

हिंगोली : २२

परभणी: १ (१)

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: १८९ (९)

लातूर: १२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ४

लातूर मंडळ एकूण: २० (२)

अकोला: १२ (१)

अकोला मनपा: २७

अमरावती: २

अमरावती मनपा: २६ (७)

यवतमाळ: ७९

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: १६९ (९)

नागपूर: ६

नागपूर मनपा: १३३ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १४४ (२)

इतर राज्ये: २७ (३)

एकूण:  ११,५०६  (४८५)

( टीप – ही माहिती कोरोना पोर्टलवरील ‘आयसीएमआर’ने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. )

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७९२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ८४९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ४५.३४ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

 

कोरोना नियंत्रणात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे शीघ्र गतीने काही ठोस उपापययोजनांची आवश्यकता -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचे प्रतिपादन

0

मुंबई दि. १ मे – कोरोनो च्या संकटापासून मुक्त होण्याच्या दृष्टीने केवळ भावनिक आवाहन व सहानभूतीची विधाने करुन चालणार नाही तर कोरोनो आटोक्यात आणण्यासाठी शीघ्र गतीने काही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केले. झूम व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनो रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कोरोनोचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र व केरळ मधील रुग्णसंख्या समान होती पण आज महाराष्ट्रामध्ये कोरोना रोखण्याच्या दृष्टीने ठोस व प्रभावशाली नियोजनाच्या अभावामुळे महाराष्ट्र कोरोनो मुळे अधिक धोक्यात आला आहे. डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचारी यांना आवश्यक पीपीई व अन्य साहित्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात आला नाही. पोलिसांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे, त्यांना संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अनेक रुग्णालये आजही बंद आहेत. भाजीपाला मंडईमधील गर्दी रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळे मुंबईसह ठिकठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला आहे, अश्या अनेक त्रुटी दरेकर यांनी सरकारच्या निर्दशनास आणून दिल्या.
मुंबई सह मालेगाव, औरंगाबाद आदी भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ते आटोक्यात आणण्यासाठी आपण अन्य राज्यांपेक्षा कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून देताना दरेकर यांनी सांगितले की, केरळ व महाराष्ट्रात १५ मार्च रोजी कोरोनाचे २४ रुग्ण होते. पण आज ३० एप्रिल अखेर केरळ मध्ये त्यांच्याकडे ४९७ रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात हाच आकडा १० हजार ४९८ इतका झाला आहे, आपण जवळपास १० हजार ने पुढे गेलो आहोत . कोरोना रोखण्यासाठी केरळ सरकारने प्रभावी उपाययोजना केल्या. अर्थसंकल्पाच्या तुलनेत आरोग्यावर त्यांनी सुमारे ५.५ टक्के इतका खर्च केला आहे तर आपण फक्त ४ टक्के खर्च केले. त्यांच्याकडे मृतांचा आकडा केवळ ४ असून आपल्याकडे ४३२ म़ृत पावले आहेत. ९ मार्च रोजी केरळ ने कोरोनाला रोखण्यासठी २७ मोठ्या रुग्णालयांमध्ये ४० खाटांचे विलिगीकरण कक्ष तातडीने तयार केले व २० हजार कोटीचे पॅकेज १९ मार्चला दिले. अश्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राने घेतली असती तर राज्यात कोरोनोचे वाढते प्रमाण निश्चितच कमी झाले असते, असेही दरेकर यांनी नमूद केले. पण आम्ही सरकारच्या या त्रुटींवर बोट ठेवले तर विरोधक राजकीय भाषा वापरत आहेत अश्या प्रकारचे वातावरण तयार करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपालांच्या शिफारशींवरुन केंद्रिय निवडणुक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे लोकशाही व घटना श्रेष्ठ असल्याचे दाखवुन दिले. तसेच राजकीय प्रभावात न येता राज्यपाल संविधानाला अनुसरुन निर्णय घेतात हे अधोरेखित झाले असेही त्यांनी सांगितले.
कोरोनोची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केले, पण प्रत्यक्षात मात्र रुग्णालयात जाणा-या रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्ण ७-८ तास येऊन बसतात पण त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत नाही व त्यांच्यावर उपचारही केले जात नाहीत. शेकडोंच्या संख्येने रुग्ण उपचाराअभावी मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचारी सुरक्षित नाहीत, त्यांच्यामध्ये कोरोनाची बाधा होत आहे. असे असताना मुख्यमंत्री कोरोनोच्या या लढ्यात जास्तीत जास्त नर्स व डॉक्टर्स ने सहभागी होण्याचे आवाहन करित आहेत. असेही त्यांनी सांगितले.
पोलिस हे देव माणूस आहेत असे केवळ बोलून चालणार नाही असे सांगताना ते म्हणाले की, पोलिसांवर सुरक्षेचा ताण असताना त्यांच्यावर हल्ले वाढत आहेत, ते सुरक्षित नाहीत. पोलिसांनाही कोरोना होत आहे. त्यामुळे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे असेही त्यांनी सांगितले.
गेले आठ दिवस सोशल मिडियामधून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही विकृत प्रवृत्ती राजकीय पाठबळ घेऊन घाणेरडे कमेन्टस करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचा आम्ही धिक्कार करित आहोत. राज्यभर जनताही या विषयी नापंसती व्यक्त करीत आहेत, कारण देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील एक लोकाभिमुख नेते आहेत. सुसंस्कृत, निश्कलंक व चारित्र्यसंपन्न नेते आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन करणे व आपले कोरोनामधील अपयश झाकण्यासाठी अश्या प्रकारचा उपदव्याप काही मंडळी येथे करित आहेत. त्यामुळे यासंदर्भात कायदयाने न्याय मिळाला नाही तर जशास तसे उत्तर देण्याचे प्रयत्न सुध्दा भाजपच्या माध्यमातून करण्यात येईल असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
झुंबड टाळा अन्यथा कारवाई करावी लागेल या मुख्यंमंत्र्याच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, मुंबईत वांद्रे झालेली गर्दी, महापालिका मंडई मध्ये होत असलेली गर्दी, दोन दिवसांपूर्वी कुर्ल्यामध्ये परराज्यातील जाणा-या मजूरांचे फॉर्म्स वितरित करण्यासाठी काही मंडळीनी काऊंटर्स उघडले होते, त्यासाठी हजारोंची गर्दी जमा झाली होती. भविष्यात असे प्रकारण रोखले पाहिजे, त्यामुळे अश्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे व गर्दी टाळण्यासाठी कडकोट उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.
तसेच शेतकरी व कृषीमालाला कोणतेही बंधन नसल्याचे सांगण्यात आले तरीही अनेक शेतीमळे जाळले व तोडले जात आहेत. शेतमाल पडून आहे, सडत आहे, त्याला मार्केटिंग नाही. शेतकरी उद्धवस्त झाला आहे. त्यामुळे बंधने हटवून चालणार नाही, त्यांचा शेतीमाल व फळे तसेच कोकणातील आंबा यांची विक्रीची व्यवस्था सरकारने केली पाहिजे, अशी सूचनाही दरेकर यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रात पुण्यासह 14 रेड झोन

0

नवी दिल्ली – गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नव्या यादीनुसार महाराष्ट्रात पुण्यासह 14 रेड झोन जाहीर केले आहेत. या यादीत पुण्यासह मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगरांचा समावेश आहे.

ऑरेंज झोनमध्ये रायगड, अमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार,कोल्हापूर, हिंगोली,रत्नागिरी, जालना,नांदेड,चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, बुलढाणा, बीड, या जिल्ह्यांचा समावेश आहे. ग्रीन झोन मध्ये उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
रेड झोन’मध्ये लॉक डाऊन पूर्वीप्रमाणेच कडक राहण्याची शक्यता आहे. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही व्यवहार सुरू करता येणार आहेत.

केंद्र सरकारची मोठी घोषणा, 17 मे पर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ

नवी दिल्ली –

देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समिक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता. त्यावेळी सर्व राज्यांकडून त्यांनी माहिती घेतली होती. तसंच काही अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी विनंतीही केली होती. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत ३ मे पर्यंत यात वाढ करण्यात आली होती. आता दोन पुन्हा एकदा दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. ४ मेपासून पुढील दोन आठवडे हा लॉकडाउन लागू असणार आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून लॉकडाउनचा कालावधी वाढवणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही  सवलती देण्यात येतील. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.