Home Blog Page 2571

विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0

मुंबई, दि. २५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री.सामंत म्हणाले, अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल महोदय आणि शासनास सादर करावा, अशा सूचना आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढे पाठवायचे की कसे, यावरही चर्चा करण्यात आली. हा निर्णय घेत असताना एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुढे अडचणी येऊ नयेत असाच निर्णय घेण्यात येईल. त्याच बरोबर शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जावरही याचा काही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि मानसिक स्थितीचा पूर्णपणे विचार करून वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवत विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतला जाईल, असेही श्री.सामंत यांनी संगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील असंख्य महाविद्यालये, विद्यापीठाच्या इमारती, वसतिगृह हे  क्वारंटाइनसाठी दिलेली आहेत. त्यामुळे या इमारती वापरासाठी कधी खुल्या होतील, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. अशा स्थितीमध्ये परीक्षा घेणे कितपत शक्य होईल, यावर चर्चा झाली.

आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ.अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे  कुलगुरू सहभागी झाले होते.

कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्याबाबत पाठपुरावा करू – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0

अमरावती दि.२५ : रतन इंडिया व औद्योगिक वसाहतीतील इतरही कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले. रतन इंडिया व इतर अशा १३ कंत्राटदार कामगार बांधवांनी त्यांच्या प्रश्नांबाबत आज पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांना निवेदन दिले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

लॉकडाऊनच्या काळात कंपनीने कंत्राट कर्मचा-यांची कपात केली. उच्च शिक्षित व्यक्तीलाही हेतूपुरस्सर अकुशल काम दिले जात आहे. समान काम करूनही स्थानिकांना कमी वेतन दिले जाते. कामगारांना देय असलेले इतर लाभ मिळत नाहीत. मूळ कंपनी कर्मचा-यांना मिळणा-या लाभात व कंत्राटी कामगारांच्या लाभात तफावत असते. प्रत्यक्षात एकच काम करावे लागते. कंत्राटदार आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांवर अन्याय होत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल, अशी तक्रार या कामगार बांधवांनी निवेदनात केली आहे.

सध्याच्या संकटकाळात सर्वच क्षेत्रांपुढे अनेक आव्हाने आहेत. मात्र, शासन खंबीरपणे जनतेच्या पाठीशी आहे. कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.श्रीकांत ठाकरे, विक्रम हरणे, अतुल भोजने, सूरज कुलसंगे, भूषण भगत, निनाद चिकटे, प्रफुल्ल डोंगरे, विक्रम हरणे, रवींद्र इंगोले, भूषण गजभिये यांच्यासह अनेक कंत्राटी कामगारांच्या निवेदनावर सह्या आहेत.

इंटरनेटचा सदुपयोग व्यवसाय, ज्ञान वृद्धीसाठी करावा सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास नको – गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

0

मुंबई, दि. २५ : इंटरनेट हे माहिती मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे साधन असून  त्याचा उपयोग ज्ञान, व्यवसाय वृद्धीसाठी करावा. कोणाच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अथवा समाजातील शांती आणि एकता बिघडविण्यासाठी करू नये, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

सायबर गुन्ह्यांबाबत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. आजच्या तारखेला अंदाजे ४० कोटी भारतीय इंटरनेटचा वापर करतात. लॉकडाऊनच्या काळात हा वापर व्यावसायिक कारणांसाठी होणे स्वाभाविक आहे, उदाहरणार्थ work from home, video conferencing, website surfing इत्यादीसाठी, त्या व्यतिरिक्त इंटरनेटचा वापर मनोरंजनासाठी अर्थात सिनेमा किंवा web series बघण्यासाठी सुद्धा होत आहे. इंटरनेटचा वापर online payment व E -Commerce साठी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. Internet च्या या वाढत्या उपयोगामुळे Cyber Criminal व Hacker सामान्य लोकांना फसविण्यासाठी व त्यांना लुटण्यासाठी नवीन क्लृप्त्या लढवत असतात.

यासंदर्भात हल्लीच एक माहिती प्रकाशात आली होती, ज्यामध्ये प्रख्यात German कंपनी Mont Blanc यांची हुबेहूब अशी खोटी Website बनवली गेली. या Website वर महागड्या वस्तूंची खरेदी अगदी कमी किमतीत करता येईल असे आमिश ग्राहकांना दाखवले गेले. बरीच लोकं यात फसली व त्यांना वस्तू तर मिळाल्या नाहीतच, वरून त्यांचे पैसे सुद्धा गेले. महाराष्ट्र सायबर विभाग, लोकांना अशा फसव्या वेबसाईटस् ओळखण्यात मदत करते आणि अशा websites पासून सावधान राहण्यास वेळोवेळी सूचना सुद्धा देते. अशा प्रकारच्या खोट्या पण हूबेहूब दिसणाऱ्या website मार्फत फसवणूक करण्याच्या पद्धतीला Phishing Attack असे म्हणतात.

हॅकर्स पासून सावधान

काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानी hackers ने भारताच्या आरोग्य सेतू app ची खोटी प्रत बनवून आपल्या देशातल्या सरकारी अधिकारी व आर्मीच्या अधिकाऱ्यांना त्याची link पाठवली, व त्यांना ते app download करण्यास सांगितले. मुळात हे app नसून एक virus program आहे जो फोनमधील आर्थिक, वैयक्तिक आणि गोपनीय सरकारी माहिती अशा प्रकारे संपूर्ण Data चोरू शकतो. महाराष्ट्र सायबर विभागाने जनतेला सूचना दिल्या आहेत की अनोळखी links मधून app  download करू नये व ॲप Google व Apple यांच्या अधिकृत Playstore वरूनच Download करावे.

महाराष्ट्र सायबर विभागाने Child Pornography सारखे गंभीर सायबर गुन्हे, महाराष्ट्रात थांबविण्याकरिता जवळजवळ १३६ गुन्हे दाखल केले. यात त्यांनी ४० हून अधिक सायबर-गुन्हेगारांना अटक केली.

यात  महाराष्ट्र सायबरचा हेतू असा आहे की, समाजाला अशा गंभीर गुन्ह्यांपासून मुक्त करून, समाजातील लहान मुलांचे यौन शोषण (sexual exploitation) पासून संरक्षण करता येईल. महाराष्ट्र सायबर विभाग हा child pornography  विरुद्ध “Operation Blackface” नावाची एक प्रशंसनीय मोहीम सध्या राबवत आहे.

dark net

आजकाल इंटरनेट चा एक छुपा भाग ज्याला “dark net” असे म्हणतात, याचा सायबर गुन्हेगारांद्वारे दुरुपयोग केला जात आहे. सामान्य इंटरनेट ज्यात आपण google, facebook, youtube, instagram इत्यादी वापरतो त्यापासून Dark Net, पूर्णतः वेगळा व छुपा आहे. सायबर गुन्हेगार या “dark net” मध्ये जाऊन वेबसाईट बनवतात ज्यात COVID वर चमत्कारिक उपाय, खोटी औषधे व covid पासून बऱ्या झालेल्या व्यक्तींचे plasma therapy साठी लागणारे रक्त,  अशा सर्व गोष्टी अतिशय महाग दारात “bitcoin” च्या माध्यमाने विकल्या जातील असा दावा केला जातो.  Darknet वरच्या Crime Syndicates ची तपासणी महाराष्ट्र सायबर विभाग करत आहे व जनतेला या अशा सर्व गोष्टींपासून सावधान राहण्याची सूचना देत आहे.

सायबर विभागाचे लक्ष

सायबर विभाग,  facebook, Instagram, tiktok, twitter यासारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लक्ष ठेवत आहेत. या प्लॅटफॉर्म वर जर कोणी fake news, communally sensitive news, hate mails, defamatory posts टाकली तर तो IT Act व IPC अंतर्गत गुन्हा आहे, म्हणून जनतेने जवाबदार Netizen व्हायला हवे. महाराष्ट्र पोलीस यांनी गेल्या २ महिन्यात ४०० पेक्षा जास्त अशा fake news व hate posts विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

उपरोक्त सर्व बाबींचा विचार राज्यातील नागरिक, सुज्ञ पालक, मुले, व्यावसायिकांनी करावा, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

00000

दिवसभरात 49 हजार 373 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

0

मुंबई, दि. 25 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजूरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 6,196 अनुज्ञप्ती सुरू आहेत. आज दिवसभरात 49 हजार 373 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 24 हजार 615 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. राज्यात दि. 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु. 1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.

दि.24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्रात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. काल दि.24 मे, 2020 रोजी राज्यात 33 गुन्हे नोंदविण्यात आले असून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 10 लाख 15 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.24 मार्च, 2020 पासून दि.24 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 6,260  गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,935 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 621 वाहने जप्त करण्यात आली असून 16 कोटी 89 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३  व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  commstateexcise@gmail.com ई-मेल आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुंबई पालिका रुग्णालय डॉक्टरांशी संवाद

0

मुंबई, दि. २३ : मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सर्व अविरत ही लढाई लढत आहात आणि त्यामुळेच आपण निश्चितपणे कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबवू शकतो असा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, डीन, डॉक्टर्स यांच्याशी आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली. यावेळी प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी, टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन उपसंचालक डॉ.तात्याराव लहाने देखील सहभागी होते.

फिल्ड हॉस्पिटल

मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे आपण या वैद्यकीय आणीबाणीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले सर्व निदेश व प्रोटोकॉल काटेकोर पाळत आहोत तसेच प्लाझ्मा थेरपी, प्लस ऑक्सिमीटरचा उपयोग या माध्यमातून उपचारामध्ये सहाय्यभूत ठरेल अशी पाऊले उचलत आहोत.

पुढील काळासाठी आपण फिल्ड हॉस्पिटल उभारणीवर भर दिला पाहिजे तसेच सुसज्ज कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोरोना विषयक वैद्यकीय सेवा व सुविधांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत विविध ठिकाणी आयसीयू व आयसोलेशन बेड्सची सुविधा आपण निर्माण केली आहे. या सुविधांचा उपयोग करण्याची वेळ येऊ नये परंतू आपले नियोजन चांगले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, येणाऱ्या पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू सारख्या आजारांमुळे रुग्ण वाढतील. त्यावरही तातडीने उपचार करावे लागतील यादृष्टीने पालिकेने तयारी ठेवावी.

मला तुमच्याकडे पाहून हुरूप येतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ही साथ ओसरल्यावर तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात यात काही शंकाच नाही.

000

देशांतर्गत विमान सेवेतील प्रवाशांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शिका जारी

0

प्रवाशांना १४ दिवस घरीच राहणे बंधनकारक

मुंबई, दि. २५ : देशांतर्गत विमान सेवा मर्यादित प्रमाणात आजपासून सुरु करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका आज निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि या प्रवाशांनी १४ दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) राहणे बंधनकारक असून या कालावधीत आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्यांच्या वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. तथापी, हा प्रवास विमानतळ ते कंटेनमेंट झोन किंवा कंटेनमेंट झोन ते विमानतळ असा करता येणार नाही, ही बाब या मार्गदर्शिकेत स्पष्ट करण्यात आली आहे.

राज्यात या मार्गदर्शिकेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी विमानतळ असलेल्या संबंधित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमित करण्यात आले.

प्रवाशांची नावे, त्यांच्या आगमनाचा दिवस आणि वेळ, मोबाईल क्रमांक, पत्ते इत्यादी सविस्तर माहिती संबंधित एअरलाईन्स आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधीत नोडल अधिकाऱ्यास उपलब्ध करुन द्यावयाची आहे. आदी विविध सूचना मार्गदर्शिकेद्वारे देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाने यासंदर्भात काल मार्गदर्शिका प्रसारित केली. ही मार्गदर्शिका हवाई मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल. जे प्रवासी राज्यात कमी कालावधीसाठी येणार आहेत (एक आठवड्यापेक्षा कमी) आणि त्यांचे पुढील प्रवासाचे किंवा परतीचे नियोजन आहे, त्यांनी याची संपूर्ण माहिती दिल्यास त्यांना गृह विलगीकरणातून सवलत देण्यात येईल. तथापि, या प्रवाशांना कंटेनमेंट झोनमध्ये परवानगी नसेल. प्रवाशांनी प्रवासादरम्यान काय करावे आणि काय करु नये यासंदर्भातील माहिती सेवा पुरवठा एजन्सींनी प्रवाशांना तिकीटासोबत देणे बंधनकारक आहे. सर्व प्रवाशांनी आरोग्यसेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. प्रवाशांनी या ॲपवरिल संबंधित घोषणापत्र भरावे. कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात विमानात तसेच विमानतळांवर उद्घोषणा करण्यात याव्यात. तसेच प्रवाशांकडून विमानतळावर तसेच विमानत चढ-उतार करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. प्रवाशांनी राज्यातील विमानतळावर उतरल्यानंतर स्वयंघोषणापत्र भरुन सादर करावयाचे आहे. विमानतळावर तपासणीसाठी पुरेसे वैद्यकीय पथक कार्यरत असेल याची काळजी नोडल अधिकारी यांनी घ्यायची आहे. विमानतळाचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असून साबण, सॅनिटायजर यांची उपलब्धता करण्यात यावी. प्रवास सुरु होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची थर्मल तपासणी होईल याची काळजी विमानतळ प्राधिकरणाने घ्यायची आहे. लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश देण्यात येईल. सर्व प्रवासी, एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करावा. आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येईल. यामध्ये ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील त्यांना नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेण्यात येईल आणि केंद्र शासनाच्या यासंदर्भातील मार्गदर्शिकेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

‘आमची परवानगी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात यायचं नाही…’ राज ठाकरेंचा योगी अदित्यनाथ यांना इशारा

मुंबई. या कोरोना महामारी आणि लॉकडाउनदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचे असल्यास, आमची परवानगी घ्यावी लागेल,’ असे योगी म्हणाले होते. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना महाराष्ट्रात येता येणार नाही’, असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

 

सध्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे हजारोंच्या संख्येने प्रवासी मजुरांचे पलायन सुरू आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यातील मजूर आपापल्या राज्यात जात आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी, उत्तर प्रदेशातील कामगारांना काम द्यायचे असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर मनसेकडूनही समाचार घेण्यात आला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन राज ठाकरे म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं.’

‘तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा. तसंच ते जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्यानं आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही ह्याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी, महाराष्ट्रानं आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी…’, असे राज ठाकरेंकडून सांगण्यता आले आहे.

कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

0

१. बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (१००० बेड्सची जम्बो सुविधा). याचठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही

२. महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु. ६०० बेड्सची सुविधा यात १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड १९ ची मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.

 

३. नेसको गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठीरेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात

३१ मे पर्यंत एसएससीआय वरळी, महालक्ष्मी, वांद्रे व नेसको, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत

प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली.

स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था

मुंबईतील खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून होणार त्यामुळे कोणत्या ठिकाणी खाटा उपलब्ध आहेत ते लगेच कळेल. खाटांचा डाटा रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये. प्रत्येक बेडला युनिक आयडी. डिस्चार्ज धोरणाची कडक अंमलबजावणी

रुग्णालयांची स्वच्छता, जेवण व इतर अनुषंगिक बाबींतून डीन यांची जबाबदारी कमी केली. आरोग्य उपचारांवर अधिक लक्ष देता येणे शक्य.

रुग्णवाहिका १०० वरून ४५० वर. या सेवेसाठी देखील मोबाईल ॲप

केइएम, नायर, सायन, जेजे, सेंट जॉर्ज आणि बीएमसी पेरिफेरल रुग्णालये यांची जबाबदारी ५ आयएएस अधिकाऱ्यांकडे. प्रत्येक रुग्णालयात वॉर रूम, सीसीटीव्ही

मनपातर्फे दररोज ७ लाख अन्नाची पाकिटे वाटप.

मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक

१९१६ हेल्पलाईनवर आत्तापर्यंत ६५ हजार कॉल्स.

‘नागरिकांच्या आरोग्याची चिंता करा…’; मधल्या सीटवर प्रवाशांना बसवण्यावरुन सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

0

नवी दिल्ली. परदेशातून भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू असलेल्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये मधली सीट रिकामी ठेवण्यावरुन सुप्रीम कोर्टाने सोमवारी अर्जंट सुनावनी ठेवली. चीफ जस्टिस एस. ए. बोबडे यांच्या बेंचने याप्रकरणी सरकारला फटाकारले आहे. न्यायालयाचे म्हणने आहे की, “दोन नियम चालणार नाहीत. विमानाबाहेर तुम्ही सहा फुटांचे अंतर ठेवायचे म्हणता आणि विमानात खांद्याला खांदा चिटकून बसण्याची परवानगी देत आहात. सरकारने विमान कंपन्यांऐवजी प्रवाशांच्या आरोग्याची चिंता करावी.”

एअर इंडियाला 6 जूननंतर बॉम्बे हायकोर्टच्या आदेशाचे पालन करावे लागेल

बॉम्बे हायकोर्टने सरकारी एअरलाइन एअर इंडियाला मागच्याच आठवड्यात आदेश दिला होता की, ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत परदेशातून भारतीयांना आणताना विमानातील मधली सीट रिकामी ठेवली जावी. एअर इंडिया आणि सरकारने हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आवाहन दिले. परंतू, सुप्रीम कोर्टाने एअर इंडियाला 6 जूनपर्यंत मधल्या सीटवर प्रवाशांना बसवण्याची परवानगी दिली आहे, पण त्यानंतर बॉम्बे हायकोर्टाचा अंतिम निर्णयाचे पालन करावे लागेल.’

बॉम्बे हायकोर्टात 2 जूनला पुढील सुनावनी

सुप्रीम कोर्टाने बॉम्बे हायकोर्टाने म्हटले आहे की, सर्वांचे मत जाणून अंतिम निर्णय देण्यात यावा. यासोबतच विमान कंपनीला सूचना दिली की, आदेशाचे पालन करावे लागेल. तसेच, जोपर्यंत प्रकरण कोर्टात पेंडींग आहे, तोपर्यंत नागरी उड्डयन महानिदेशालय (डीजीसीए) कमर्शियल विचाराऐवजी नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत विचार करावा. बॉम्बे हायकोर्टात याप्रकरणाची पुढी सुनावनी 2 जूला आहे.

आज २४३६ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.२५ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११८६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आज एका दिवसात राज्यभरातून ११८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक ९०० रुग्ण मुंबई मंडळात सोडण्यात आले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ५०१, ठाणे ३३७, पालघर १६, रायगड ४६, नाशिक ४, जळगाव, ३, पुणे १०९, सोलापूर २, कोल्हापूर ३, सांगली ३, रत्नागिरी ९, औरंगाबाद ९४, जालना २, हिंगोली १, लातूर १०, उस्मानाबाद २, अकोला १७, अमरावती ४ आणि नागपूर २३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ७८ हजार ५५५ नमुन्यांपैकी ५२ हजार ६६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३० हजार २४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ४७९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १६९५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित ६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे  शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापूरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४२ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर २९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ४७ जणांमध्ये (७८ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३१,९७२ (१०२६)

ठाणे: ४५७ (४)

ठाणे मनपा: २७३९ (३८)

नवी मुंबई मनपा: २०६८ (३२)

कल्याण डोंबिवली मनपा: ९४१ (८)

उल्हासनगर मनपा: १८० (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ९८ (३)

मीरा भाईंदर मनपा: ४७५ (५)

पालघर:१२०  (३)

वसई विरार मनपा: ५९७ (१५)

रायगड: ४३१ (५)

पनवेल मनपा: ३६० (१२)

ठाणे मंडळ एकूण: ४०,४३८ (११५४)

नाशिक: १२३

नाशिक मनपा: १२९ (२)

मालेगाव मनपा: ७२१ (४४)

अहमदनगर: ५७ (५)

अहमदनगर मनपा: २०

धुळे: २३ (३)

धुळे मनपा: ९५ (६)

जळगाव: ३०१ (३६)

जळगाव मनपा: ११७ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १६१८ (१०३)

पुणे: ३६० (७)

पुणे मनपा: ५३१९ (२६०)

पिंपरी चिंचवड मनपा: ३१७ (७)

सोलापूर: २४ (२)

सोलापूर मनपा:५९९ (४०)

सातारा: ३१४ (५)

पुणे मंडळ एकूण: ६९३३ (३२१)

कोल्हापूर:२४४ (१)

कोल्हापूर मनपा: २३

सांगली: ७२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १६७ (४)

कोल्हापूर मंडळ एकूण: ५२७ (६)

औरंगाबाद:२६

औरंगाबाद मनपा: १२६३ (४८)

जालना: ६३

हिंगोली: १३२

परभणी: १८ (१)

परभणी  मनपा: ६

औरंगाबाद मंडळ एकूण: १५०८ (४९)

लातूर: ७४ (३)

लातूर मनपा: ८

उस्मानाबाद: ३७

बीड: ३२

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (५)

लातूर मंडळ एकूण: २४९ (८)

अकोला: ३६ (२)

अकोला मनपा: ३८४ (१५)

अमरावती: १५ (२)

अमरावती मनपा:  १६७ (१२)

यवतमाळ: ११५

बुलढाणा:४१ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:७६६ (३४)

नागपूर: ७

नागपूर मनपा: ४६८ (७)

वर्धा: ६ (१)

भंडारा: १४

गोंदिया: ४३

चंद्रपूर:  १५

चंद्रपूर मनपा: ९

गडचिरोली: १५

नागपूर मंडळ एकूण:  ५७७ (८)

इतर राज्ये: ५१ (१२)

एकूण:  ५२ हजार ६६७  (१६९५)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १०० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय.सी.एम.आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २३९१ कंटेनमेंट झोन आहेत. आज एकूण १६ हजार १०६ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.०१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

लॉकडाऊनने बंदिस्त झालेल्या झोपडपट्टीतील गरीबांसाठी महापालिकेच्या किट वाटपात ‘गोलमाल’

  • भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात महापालिकेचेच सर्वाधिक अन्नधान्य किट पाठविल्याचा आरोप 

पुणे- शहरात कोरोनाचे संकट असताना ,कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागांत महापालिकेतर्फे अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येत आहे. ज्या भागांत कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत.जिथे लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे, आणि जे अत्यंत गरीब आहेत अशा झोपडपट्टीत च  हे किट वाटप करणे ठरले  असताना काही पदाधिकारी यांच्याच प्रभागात मोठ्या प्रमाणात किट वाटप झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तर आपल्या शिवदर्शन भागात ११०० कीट वाटपाचे ठरले आणि आलेल्या २०० कीट वाटप न करता ते वाटप झाल्याची नोंद महापालिका अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप केला आहे. अजून ९०० कीट येणे बाकी असल्याचे अधिकारी सांगतात असे म्हटले आहे. तर दुसरीकडे नितीन कदम  बाळासाहेब भामरे,तुषार भामरे यांनी ,’ महापालिकेने वाटलेल्या कीट मधून काही वस्तू गायब करून कीट वाटल्याचा आरोप केला आहे. 

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी म्हटले आहे कि, काल पर्वती दर्शन भागात अन्नधान्य वाटप करताना सदर अन्नधान्य किट वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार दिसून आला आहे.प्रत्येक किट मध्ये पुणे महानगरपालिका ने दिलेल्या यादीपैकी प्रत्येक किट मध्ये प्रत्येकी १ लिटर तेल पिशवी नसल्याचे आढळून आले आहे.महानगरपालिकेने यादी जाहीर केली असताना सूद्धा किमान १ लिटर प्रत्येक व्यक्तीगणिक म्हणजे केवळ पर्वती दर्शन भागातच जवळपास ८०० ते ९०० लिटर तेलाची अफरातफर केली गेली आहेआज अडचणींच्या काळात नागरिकांच्या हक्काच्या जिवनावश्यक गोष्टींमध्ये केला गेलेला प्रकार निंदनीय आहे.आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रं:२९ च्या वतिने सदर घटनेचा निषेध करतो.तसेच ह्या गोष्टीची महिनगरपालिकेने दखल त्वरीत घ्यावी,अशी विनंती करतो.तसेच नागरिकांना जर अन्नधान्य किट मिळत असेल तर दिलेल्या यादीप्रमाणे अगोदर तपासून घ्यावी.तसेच काही त्रुटी आढळल्यास निःसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधावा .

दरम्यान महापालिकेचे आशिष महाडदळकर(सहायक आयुक्त) यांनी असे म्हटले आहे कि,ड्यूटीवरील कर्मचारी बदलल्याने त्यांच्याकडून चुकून एक लिटरच तेल कीटमध्ये टाकले गेले. हा प्रकार एकाच लॉटबाबत घडला. ही चूक लक्षात आल्यावर दोन लिटर तेल कीटमध्ये जाईल याची दक्षता घेतली गेली आहे. तसेच ज्यांना एक लिटर तेल दिले गेले आहे त्यांना आणखी एक लिटर तेल पोहचविण्यात आले आहे. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नसून वाटप सुरळीत सुरु झाले आहे.

 

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 3 हजार 435

पुणे विभागातील 3 हजार 442 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-विभागात एकूण संख्या झाली 7 हजार 218 -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 25 :- पुणे विभागातील 3 हजार 442 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 218 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 435 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 212 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयात 5 हजार 899 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 998 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 623 आहे. कोरोनाबाधित एकूण 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 395 बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 283, सातारा जिल्ह्यात 31, सोलापूर जिल्ह्यात 20, सांगली जिल्ह्यात 6 तर कोल्हापूर जिल्ह्यात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयात 309 कोरोना बाधीत रुग्ण असून 120 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 182 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयात 590 कोरोना बाधीत रुग्ण असून 265 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 273 आहे. कोरोना बाधित एकूण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयात 79 कोरोना बाधीत रुग्ण असून 46 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयात 341 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 326 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 72 हजार 855 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 64 हजार 607 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 8 हजार 288 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 57 हजार 280 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 7 हजार 218 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि.25 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

मुस्लीम समाजाचे योगदान अतुलनीय

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इचलकरंजीतील मुस्लीम समाजाची प्रशंसा

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) – कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून  कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची रुपये 36 लाखांची रक्कम कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी दिली. या रकमेतून इंदिरा गांधी असामान्य रुग्णालयात 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे. रमजान ईदचे औचित्य साधून याचे लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे संवाद साधताना म्हणाले, इचलकरंजीतील मुस्लिम समाजाने याद्वारे एक मोठा आदर्श देशासमोर ठेवला आहे. आत्तापर्यंत आपण सर्वांनी मिळून कोरोनाला धैर्याने आणि संयमाने रोखून ठेवले आहे. इथून पुढे लोकसहभाग गरजेचा आहे. सण कसा साजरा करायचा याचे उत्तम उदाहरण मुस्लिम समाजाने सर्वांना दाखवून दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुस्लिम समाजाच्या कार्याचे कौतुक करून रुग्णालय सर्वच सुविधांनी सुसज्ज करण्याचे आश्‍वासन दिले.

प्रारंभी सलीम अत्तार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार राजू आवळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, तहसिलदार प्रदिप उबाळे आदी उपस्थित होते.

अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी कैश बागवान, रफिक मुजावर, इरफान बागवान, अजीज खान, कुतबुद्दीन मोमीन, सलीम अत्तार, तौफिक मुजावर, अबु पानारी, इम्रान मकानदार, तौफिक हिप्परगी, फिरोज जमखाने, आयुब गजबरवाडी, समीर शेख, दिलावर मोमीन, फिरोज बागवान, फारूक मकानदार, डॉ.जावेद बागवान, डॉ.राहमतुल्लाह खान, डॉ.अर्शद बोरगावे, डॉ.हिदायतुल्लाह पठाण, इम्तियाज म्हैशाळे यांचे  सहकार्य लाभले.

मुख्यसभा नाही तर नाही,पक्ष निहाय बैठका तरी बोलवा – विशाल तांबे (व्हिडीओ)

पुणे- गेली अडीच तीन महिने झाले , नगरसेवकांच्या ,जनतेच्या प्रश्नांना मुख्य सभे सारखे मिळणारे व्यासपीठ बंद झाले आहे. मग किमान ज्या त्या पक्षाच्या पातळीवर आयुक्तांनी पक्ष निहाय बैठका तरी बोलावून आपणा कोरोनाशी लढत देताना कशा पद्धतीने लढा दिला पाहिजे यावर सविस्तर चर्चा करायला हवी असे मत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी व्यक्त केले आहे . आणि याबाबत ची लेखी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. पुण्यात नगरसेवक ,प्रशासन सारेच आपापल्या पातळीवर चांगले काम करत आहेत तरीही कोरोनाशी लढाई मुश्कील असल्याचेच दिसते आहे . या परिस्थितीत दशा जाणून दिशा ठरविण्यासाठी तरी प्रशासनाने नाही मुख्य सभा तर किमान पक्षीय पातळीवर बैठक बोलाविली पाहिजे. कोरोनाला संपविण्यासाठी तपास ,शोध आणि कारवाई म्हणजे उपचार याच पद्धतीवर भर द्यायचा आहे .पण या पद्धतीने फाईट करण्यासाठी आपल्याला स्वॅब घेणारी आणि तपासणारी यंत्रणा भक्कम करावी लागेल शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तीच कोरोनाशी २ हाथ करावे लागतील असे सांगून अखेरीस तांबे यांनी पिंपरी महापालिके प्रमाणे पुणे महापालिकेने देखील सलून आणि पार्लर ला नियम अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी देखील  केली आहे. नेमके तांबे यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ऐका आणि पहा ….

अशोक चव्हाण रुग्णालयात दाखल

0

मुंबई- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चव्हाण यांच्यावर नांदेडमध्येच उपचार सुरु असल्याची माहिती आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सरकारची चिंता वाढली आहे. अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना कोरोनासोबतची राज्याची लढाई यापुढे अधिक बिकट होणार असून, आता रुग्णांच्या संख्येचा जीवघेणा गुणाकार होईल.

मात्र, घाबरून जाऊ नका, सरकारकडून आरोग्यसेवा निर्माण केली जात आहे, असे सांगताना आता कोरोनासोबत जगण्याची सवय करून घ्या, असा सल्ला दिला होता.
लॉकडाऊन एकदम उठवणे चुकीचे असून, हळूहळू शिथिल केला जाईल. मात्र, गर्दी झाली तर परत सगळे बंद करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने पुढच्या 15 दिवसांत देशातील संसर्गाचे चित्र स्पष्ट होईल. राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येईल, इतपत सगळे सुरळीत करण्याची आमची इच्छा आहे. मात्र, हे करताना कोरोनाला टाळावे लागणार आहे, असे ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊनचा प्रत्येकालाच कंटाळा आला असला, तरी एकदम लॉकडाऊन करण्यासारखेच तो एकदम उठवणेही चुकीचे असल्याने हळूहळू सगळे सुरू केले जाईल. मात्र, गर्दी झाली तर पुन्हा सगळे बंद करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. उद्योगधंदे-व्यवसाय सुरू केल्यावर शिस्त पाळली गेली नाही, तर मात्र हे सगळे पुन्हा बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असेही उद्धव यांनी नमूद केले.