Home Blog Page 2402

आता रिपब्लिक ग्रुपचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंटही पोलिसांच्या तावडीत..फेक टीआरपी केस

0

मुंबई-फेक टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या AVP (असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट) घनश्याम ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. फेक टीआरपी प्रकरणात पोलिसांनी रिपब्लिकच्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्याची ही पहिली वेळ आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी घनश्याम यांची 30 तास चौकशी केली होती.

अर्णब प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी, अँकरचे पत्र

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीला अटक केल्यानंतर तेथील एका सूत्रसंचालकाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एसए बोबडे यांना पत्र लिहिले आहे. अर्णबला तालोजा जेलमध्ये कुख्यात गुन्हेगारांसोबत ठेवण्यात आले आहे असा दावा त्यांनी केला. सोबतच, सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीची दखल घ्यावी अशी विनंती त्यामध्ये करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, अर्णब गोस्वामीला मुंबई हायकोर्टाने सोमवारी पुन्हा जामीन नकारला. अर्णबला 4 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ पुस्तकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

0

मुंबई, दि. 9 : माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबुक पेजवरील नोंदी, निरीक्षणे, स्फुट लेख व अभिप्राय यांचे संकलन असलेल्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.

कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लेखक राजेंद्र दर्डा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सुंदर मराठी भाषेतून लिहिलेल्या आपल्या पुस्तकामध्ये राजेंद्र दर्डा यांनी अधूनमधून हिन्दी भाषेतील पंक्तींची चवदार फोडणी दिल्यामुळे ‘माझी भिंत’ पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे.

महाराष्ट्रात आठ शतकांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी योग सामर्थ्याने भिंत चालविल्याचा उल्लेख आहे. समाजमाध्यमांच्या आजच्या युगात राजेंद्र दर्डा यांनी देखील आपली ‘आभासी भिंत’ यापुढेही सुरु ठेवावी.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, समाजमाध्यम हे दुधारी शस्त्र असून त्याचा चांगला वापर कसा होऊ शकतो याचे ‘माझी भिंत’ हे उदाहरण आहे.

कोरोना काळात लोकांमध्ये एक अदृश्य भिंत तयार झाली आहे. राजेंद्र दर्डा यांची ‘माझी भिंत’ ही अदृश्य भिंत तोडण्याचे व माणसे जोडण्याचे काम करीत आहे असे निरीक्षण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नोंदविले.

राजेंद्र दर्डा अतिशय हुशार व प्रश्नांची जाण असणाऱ्या सहकाऱ्यांपैकी असून ‘माझी भिंत’ हे जग न फिरलेल्‍यांना जगभ्रमंतीचा आनंद देणारे पुस्तक ठरेल, असे जयंत पाटील यांनी संगितले.

लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले तर राजेंद्र दर्डा यांनी पुस्तकासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी लोकमतच्या ‘दीपोत्सव’ व ‘दीपभव’ या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले. देवेंद्र दर्डा यांनी आभार मानले तर लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

पुण्यात फटाके ,आतिशबाजी वर तीव्र बंधने..कोरोना वाढू नये म्हणूनच.. विक्रमकुमार

0

पुणे- शहरातील महापालिकेच्या मालकीची सार्वजनिक रस्ते, ठिकाणे शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे याठिकाणी फटाके उडविण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. तसेच कमी आवाजाचे इकोफ्रेंडली फटाके उडवा किंवा शक्यतो फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे. परंतु कोरोनाकाळातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

फटाक्यांमुळे वायूप्रदुषण आणि ध्वनीप्रदुषण होते. याचे दुष्परिणाम अनेक दिवस दिसून येतात. त्यामुळे शक्य तो कमी धुराचे आणि आवाज होणार नाही, अशा इकोफ्रेंडली फटाक्यांचा वापर करावा, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात सॅनिटायजरचा वापर शक्य तो टाळावा. सॅनिटायजर आग पकडत असल्यामुळे सॅनिटायजरचा वापर करु नये. त्याऐवजी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. नियमीतपणे हात धुवावेत.

दिवाळी सणामध्ये सार्वजनिक दिवाळी फराळ आणि दिवाळी पहाट यांना कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कचा वापर न करणे, विना परवाना कार्यक्रमांचे आयोजन केल्यास पोलीस आणि महापालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडण्यास आतशबाजी करण्यास बंदी

0

केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलझडी, अनार फोडण्यास अनुमती

कोविड’च्या पार्श्वभूमीवर सजगतेने व सतर्क राहून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

‘प्रकाशाचा आणि आनंदाचा सण’ अशी ओळख असणारी ‘दीपावली’ आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ‘कोविड – १९’ च्या पार्श्वभूमीवर साजऱया होणाऱया यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी ‘कोविड’ विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे सातत्याने व अहोरात्र पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वस्तरीय प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या ‘कोविड’ नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसत असले, तरीही ‘कोविड’ची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे आपण सर्वांनीच अधिकाधिक काळजी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी शारीरिक दुरीकरण कटाक्षाने पाळणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क परिधान करणे आणि वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे या बाबींचा अवलंब करावयाचा आहे. तसेच नियंत्रित स्वरुपात दिवाळी साजरी करताना शक्यतो एकमेकांच्या घरी जाणे टाळावयाचे आहे. तसेच फटाक्यांच्या धुराचा ‘कोविड – १९’ बाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करणे यावर बंदी घालण्यात येत आहे.

त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ आठवणीने ठेवायचा आहे. जेणेकरुन घरात येणा-या प्रत्येक व्यक्तिला हात – पाय – चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल, अशी मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे. तसेच सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, अशीही मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे.

वरील अनुषंगाने व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहून दिवाळीचा आनंद घेता यावा, यासाठी जारी करण्यात येत असलेले नियम व मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत :

फटाके फोडणे/आतशबाजीबाबत

• ‘कोविड – १९’ बाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते; ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.

• हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत.

वरील दोन्ही बाबत नियमभंग करणाऱयांवर महानगरपालिका व पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.

• तथापि, दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी / झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, शारीरिक दुरीकरण पाळणे व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे.

• ‘कोविड’च्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतशबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. सदर प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली अगर कुपी आपल्याजवळ बाळगू नये.

• वरील संदर्भानुसार सदरप्रसंगी खबरदारीची उपाययोजना म्हणून हात स्वच्छ करताना सॅनिटायजरऐवजी साबण व पाण्याने हात सुयोग्यप्रकारे व नियमितपणे धुण्यास प्राधान्य द्यावे.

• वर नमूद केल्यानुसार केवळ दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी लहान मुले फुलझडी अगर अनार फटाके फोडणार असल्यास ती पालकांच्या / मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे बंधनकारक आहे. तसेच अशावेळी पाण्याने भरलेली मोठी बादली, साबण व सुती रुमाल अगर पंचा सोबत असावा.

‘कोविड’विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी

• ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला यंदाचा दिवाळसण साजरा करताना शारीरिक दुरीकरण पाळणे, वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे आणि घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी सुयोग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

• यंदाच्या दिवाळीत दरवाजाजवळ रांगोळी काढताना अगर दिवे लावताना त्यासोबतच आठवणीने पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजाजवळ ठेवावयाचा आहे. जेणेकरुन, घरात प्रवेश करणाऱया प्रत्येक व्यक्तिला सुयोग्यप्रकारे हात – पाय – चेहरा धुवूनच घरात प्रवेश करता येईल.

• यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करावयाची असल्याने दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रिकरण (Social Gathering) टाळावे.

• दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या / नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे वा दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) द्याव्यात.

• वरीलनुसार भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.

• अपवादात्मक प्रसंगी एखाद्या घरी जाणे आवश्यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय व चेहरा इत्यादी व्यवस्थितपणे साबण लावून धुवून घ्यावा. त्यानंतर ओले हात – पाय पुसण्यासाठी ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच घरात प्रवेश करताना व प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.

• दिवाळीकरिता काही खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी व कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे.

शरद पवार आणि कुटुंबीय यंदा दिवाळी करणार नाही

0

मुंबई, दि. ९ नोव्हेंबर – लोकनेते शरद पवार व पवार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया, असं विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबियांच्या वतीने राज्यातील जनतेला व हितचिंतक बंधु-भगिनींना करण्यात आले आहे.

खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबियांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले असून बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामुहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबिय बारामतीत येऊन बारामतीकरांसह एकत्रितपणे दिवाळी साजरा करतात. पाडव्याला राज्यभरातून लाखो सहकारी, हितचिंतक बंधु-भगिनी बारामतीत येऊन पवार कुटुंबियांना भेटतात. दिवाळीच्या शुभेच्छा देतात. हा कार्यक्रम सर्वांचा आनंद, उत्साह वाढवणारा असतो. आस्था, आपुलकी, स्नेहपूर्ण वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमाची ओढ आपल्या सर्वांनाच असते. परंतु, कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामुहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडीत करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचं दु:ख निश्चितच आहे. परंतु, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याने, कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करीत समस्त पवार कुटुंबियांनी राज्यातील जनतेला संयुक्त निवेदनाद्वारे दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 5 : एकुण 14 हजार 419 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 4 लाख 80 हजार 687 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 12 हजार 111 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.09 :- पुणे विभागातील 4 लाख 80 हजार 687 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 12 हजार 111 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 5 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 419 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 28 हजार 89 रुग्णांपैकी 3 लाख 9 हजार 310 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 792 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.28 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 787 रुग्णांपैकी 43 हजार 698 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 479 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 4 रुग्णांपैकी 38 हजार 338 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 165आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 747 रुग्णांपैकी 43 हजार 240 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 842 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 484 रुग्णांपैकी 46 हजार 101 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 727 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 656 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 772 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 523, सातारा जिल्ह्यात 33, सोलापूर जिल्ह्यात 144, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापूर जिल्ह्यात 40 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 65 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 582 ,सातारा जिल्हयामध्ये 60, सोलापूर जिल्हयामध्ये 213, सांगली जिल्हयामध्ये 164 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 46 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 25 लाख 8 हजार 122 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 12 हजार 111 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 8 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

मनसेच्या रुपाली पाटलांनी घेतली खासदार उदयनराजे भोसले यांची भेट

0

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मनसेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा रुपाली पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या अगोदर मनसेने आपला महिला उमेदवार मैदानात उतरून त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. उमेदवारी घोषित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी साताऱ्यात जाऊन रुपाली पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपा नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली.

विधानसभा निवडणुकांवेळी मनसेने कसबा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावरून कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर्गत नाराजी उमटली होती. त्यानंतर, पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन पदवीधर मतदार संघात लढण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली होती. सर्वच राजकीय पक्षांकडून पदवीधर मतदार नोंदणी जोरदार सुरू करण्यात आली आहे. मनसे या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत नव्हती. परंतु, शनिवारी पाटील यांची उमेदवारी घोषित करून मनसेने आव्हान निर्माण केले आहे. पदवीधरसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. पुणे विभागाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून उर्वरित विभागांची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, ही सदिच्छा भेट असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलंय. मात्र, रुपाली पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचं स्पष्ट होतंय. रुपाली पाटील यांना भाजपाच्या संग्राम देशमुख यांचं आव्हान आहे. तर, महाविकास आघाडीही एकत्रच निवडणूक लढवणार असून त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आला नाही.

अर्णब गोस्वामी प्रकरणात राज्यपालांची उडी; थेट गृहमंत्र्यांनाच फोन

0

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटकेत असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. गोस्वामी यांच्या अटकेने राज्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच जुंपली आहे. आता या वादात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. यासंदर्भात राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. भगत सिंह कोश्यारी यांनी याआधी घेतलेल्या भूमिकांमुळे राज्य सरकार काहीसं अडचणीत आलं होतं. आता अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात झालेल्या कारवाईवरुन राज्यपालांनी आता थेट गृहमंत्र्यांनाच फोन केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे. तसेच, गोस्वामी यांची सुरक्षा तसंच आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. अर्णब यांना कुटुंबीयांशी बोलू द्यावं, भेटू द्यावं अशी सूचनाही केली.

तथापि, “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली.” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. अन्वय नाईक आम्ह्त्या प्रकरणात गोस्वामी अटकेत असून सध्या ते तळोजा कारागृहात आहेत. अटके केल्यानंतर सुरवातीला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील नगरपालिका शाळेतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते.याचदरम्यान, न्यायालयीन कोठडीत असताना शुक्रवारी अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्णब गोस्वामी हे सोशल मीडियावर लाईव्ह असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल फोन कसा पोहोचला? याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री आता स्वतःला अटक करून घेणार का ? -चंद्रकांत पाटील

0

पुणे – मागील तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर आता विरोधी पक्ष भाजप देखील आक्रमक झाले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यांनी यासंदर्भात ट्विटरवर ट्विट केले आहे. ते म्हणतात, गेल्या कित्येक महिन्यांपासून जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर असलेल्या कर्तव्यनिष्ठ एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन या राज्य सरकारने अजूनही थकवून ठेवले आहे. आधीच आर्थिक परिस्थिती ढासळली असताना वेळेवर वेतन नाही, तर कुटुंबाला पोसायचं कसं? या चिंतेमुळे राज्यातील अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत.

यावेळी एका आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याने राज्य सरकारचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करून तेच आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं. जुन्या गोष्टी उकरून काढून पत्रकार अर्णब गोस्वामींना तुरुंगात डांबणारे मुख्यमंत्री स्वतःचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आल्यानंतर स्वतःला अटक करवून घेणार आहेत का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला आहे.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणतात, याच उत्तर त्यांनीच द्यावं. त्यात आपले परिवहन मंत्री अनिल परब जे या गोष्टींवर कधीही काही बोलत नाहीत, मात्र इतर विषयांवर माथेफोडी करण्यासाठी त्यांना वेळ असतो. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, मात्र आता मुख्यमंत्री कारवाई करणार की नाही? असा प्रश्न त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारला आहे.

पुढे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला निष्काळजी असं संबोधलं आहे, ते म्हणतात, मुळात गोस्वामी यांच्या अटकेमुळे राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकार जनतेनंतर, शेतकऱ्यांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्याही जीवावर उठले आहे. त्यामुळे त्यांचा हा निष्काळजीपणा आता त्यांनाच भोवणार आहे. अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.

बालविवाह प्रतिबंध नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित

0

मुंबई, दि. 9 : बालविवाह (प्रतिबंध) नियम 2008 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड. निर्मला सामंत  प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत दिले.

बालविवाह (प्रतिबंध) नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत आयोजित बैठकीस महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, उपायुक्त रवी पाटील, उपायुक्त तथा बालसंरक्षण कार्यक्रम व्यवस्थापक मनिषा बिरासीस, युनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालविवाह प्रतिबंध नियम 2008 ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी नियमातील तरतुदींचा नव्याने आढावा घेत त्यातील त्रुटी काढण्यासह सुधारणा कराव्या लागतील. यासाठी ही समिती नेमण्यात नेमण्यात येत आहे. समितीने नियमामध्ये आवश्यक त्या बदलांच्या अनुषंगाने अभ्यास करुन सुधारित नियमाचा मसुदा तातडीने शासनास सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही 10 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये रमा सरोद, डॉ.आशा बाजपेयी, डॉ.जया सागडे, ‘मासूम’च्या संस्था संचालक डॉ.मनिषा गुप्ते, विधायक भारतीचे संतोष शिंदे, सोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशनचे निशिध कुमार, युनिसेफच्या अल्पा वोरा, उपायुक्त (बालविकास) रवी पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी (बुलढाणा) दिवेश मराठे हे सदस्य आहेत.

आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित करु नका: दिल्ली हायकोर्टाचा प्रसारमाध्यमांना सल्ला

0

नवी दिल्ली – आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित करू नये किंवा सोशल मीडियाच्या हेडलाइन्समध्ये पोस्ट करू नये अशा सूचना दिल्ली हायकोर्टाने वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांना केल्या आहेत .न्यायमूर्ती राजीव शाकधर यांच्या खंडपीठाने या सूचना केल्या आहेत

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मीडिया ट्रायल करणा-या दोन न्यूज चॅनेल विरोधात बॉलिवूडच्या 34 बॉलिवूड निर्माते आणि प्रोडक्शन हाऊसनी दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. बॉलिवूडविरोधात अतिशय बेजबाबदार आणि अपमानास्पद टीका टिप्पणी केल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी झाली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 डिसेंबर रोजी होणार आहे.कोर्टाने अनेक मीडिया हाऊस आणि त्यातील पत्रकारांना नोटिस जारी करुन उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यात रिपब्लिक टीव्हीचे एक्झिक्युटिव्ह एडिटर अर्णब गोस्वामी आणि टाइम्स नाऊच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर नविका कुमार यांचा समावेश आहे.

राजकुमारी डायना यांच्या मृत्यूचे उदाहरण कोर्टाने दिले
कोर्टाने यावेळी ब्रिटीश राजकन्या डायना यांचे उदाहरण दिले. डायनाचा मृत्यू 1997 मध्ये झाला होता. कोर्टाने म्हटले की, “राजकुमारी डायना प्रकरणात त्यांचा मृत्यू मीडियापासून दूर पळत असताना झाला होता. आपण या मार्गाने जाऊ शकत नाही.” फोटोग्राफरच्या नजरेतून बचाव करत असताना राजकुमारी डायना यांची कार एका पोलला धडकली होती आणि यातच 31 ऑगस्ट 1997 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

ऑक्टोबर महिन्यात दाखल करण्यात आली होती याचिका
ऑक्टोबर महिन्यात 4 फिल्म असोसिएशन आणि 34 निर्मात्यांनी काही वृत्तवाहिनी आणि त्यातील पत्रकारांविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी,
प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊचे राहुल शिवशंकर आणि नविका कुमार यांच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली होती. सिनेमा क्षेत्रातील कलाकारांच्या विरोधातील मीडिया ट्रायल चालवण्यात येऊ नये, तसेच त्यांच्या वैयक्तिक आणि गोपनियतेच्या हक्काला धक्का पोहोचवू नये, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांमध्ये या चार एसोसिएशन

1. द प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया 2. द सिने एंड टीव्ही आर्टिस्ट्स एसोसिएशन 3. द फिल्म एंड टीव्ही प्रोड्यूसर्स काउंसिल 4. स्क्रीन-राइटर्स एसोसिएशन

आणि या 34 प्रोडक्शन हाऊसचा समावेश

  • यशराज फिल्म्स
  • धर्मा प्रोडक्शन्स
  • आमिर खान प्रोडक्शन्स
  • सलमान खान वेंचर्स
  • सोहेल खान प्रोडक्शन्स
  • रोहित शेट्टी पिक्चर्स
  • रेड चिलीज एंटरटेनमेंट
  • रिलायंस बिग एंटरटेनमेंट
  • राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स
  • नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट
  • कबीर खान फिल्म्स
  • अजय देवगण फिल्म्स
  • केप ऑफ गुड फिल्म्स
  • अरबाज खान प्रोडक्शन्स
  • आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स
  • अनिल कपूर फिल्म एंड कम्युनिकेशन नेटवर्क
  • एक्सेल एंटरटेनमेंट
  • विनोद चोप्रा फिल्म्स
  • विशाल भारद्वाज फिल्म्स
  • रॉय-कपूर प्रोडक्शन्स
  • एड-लॅब्स फिल्म्स
  • आंदोलन फिल्म्स
  • बीएसके नेटवर्क एंड एंटरटेनमेंट
  • क्लीन स्लेट फिल्म्स
  • एमी एंटरटेनमेंट एंड मोशन पिक्चर्स
  • फिल्म-क्राफ्ट प्रोडक्शन्स
  • होप प्रोडक्शन्स
  • लव फिल्म्स
  • मॅकगुफिन पिक्चर्स
  • वन इंडिया स्टोरीज
  • आर एस एंटरटेनमेंट
  • रियल लाइफ प्रोडक्शन्स
  • सिखया एंटरटेनमेंट
  • टाइगर बेबी डिजिटल

सुशांतच्या आत्महत्येनंतर काही न्यूज चॅनेलने मीडिया ट्रायल सुरु केले होते. यात अनेकांना आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये खूप घाण आहे आणि ती साफ केली पाहिजे. बॉलिवूड ही जगातील सर्वात वाईट इंडस्ट्री आहे. ड्रग्ज घेण्यात अनेक मोठे कलाकार आघाडीवर आहेत, अशा प्रकारचा आरोप न्यूज चॅनेलकडून करण्यात आला होता.

14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणावरुन बॉलिवूड चर्चेत आले. बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये कसे हमखास ड्रग्ज घेतले जाते, हे सांगण्यात आले. तसेच यात अनेक कलाकारांची नावे न्यूज चॅनेलकडून घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर काही न्यूज चॅनेलविरोधात बॉलिवूड एकवटले.

हे तात्पुरते संकट आहे. लवकरच ते दूर होईल– परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

0

मुंबई, दि.9 : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांच्या थकित असलेल्या वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन व दिवाळी सणानिमित्त देण्यात येणारा अग्रीम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल अशी माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. परब म्हणाले, हे तात्पुरते संकट आहे. लवकरच ते दूर होईल. आपल्या कुटुंबावर संकट येऊ देऊ नका. काळ जरी कठीण असला तरी, कर्मचाऱ्यांनी  आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक अवाहनही परिवहनमंत्री  श्री. परब यांनी केले  .

श्री. परब म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या  उर्वरित २ महिन्याच्या वेतनापैकीसुद्धा एक महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, बाकी  एक महिन्याचे वेतनही कर्मचाऱ्यांना लवकर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकित रक्कम वाढत गेली. आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकित राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल.  कर्मचाऱ्यांचे वेतन व अनुषंगिक खर्चासंदर्भात मदतीसाठी शासनाकडे विनंती करण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. परब यांनी सांगितले.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून संग्राम देशमुख

0

राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी राज्यातील तीन पदवीधर व एका शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपानं चार जणांची नावं जाहीर केली आहे. यात पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना संधी देण्यात आली आहे.

राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांच्या निडणुकांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून, आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर २ जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) १ तारखेला मतदान होणार आहे. यापैकी चार जागांवर भाजपाकडून उमेदवारा जाहीर करण्यात आले आहेत.

भाजपाने पुणे मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन रामदास धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण आणि नागपूरमधून अनिल सोले यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपला. तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त राहिली. एकूण पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा रिक्त आहेत. तर शिक्षक मतदरासंघातून अमरावती विभागातून श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागातून दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळसुद्धा जुलै महिन्यात संपला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून अमरावती आणि पुणे विभागाच्या दोन जागा रिक्त आहेत.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्याने समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न होताना दिसत आहेत.

तर नागपुरात गडकरी समर्थक अनिल सोले यांचे तिकीट कापून महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे फडणीसांचे पारडे जड होणार आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि दिवाळी बोनस जाहीर

0

जळगावमध्ये एसटी कंडक्टरने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाकरे सरकारने लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एक महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे. त्यात या महिन्याचा पगार तासाभरात केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी पत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पत्रक जारी केले आहे.

दिवाळीमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सज्ज राहा

0

प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचे निर्देश

पुणे : दिवाळी सणामध्ये सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी सज्ज राहण्यासोबतच वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. यासोबतच नवीन वीजजोडणीच्या कामांना वेग देऊन पेडपेडींग असणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजजोडण्या दिवाळीपूर्वी कार्यान्वित कराव्यात असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक वीजयंत्रणा आणि घरगुती विद्युत उपकरणांपासून सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

      पुणे प्रादेशिक विभागातील अधिकाऱ्यांसोबत नुकतीच व्हीडीओ काँन्फरसिंगद्वारे बैठक झाली. यामध्ये दिवाळीच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अभियंता व कर्मचाऱ्यांनी सज्ज व सतर्क राहण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी दिल्या आहेत.

सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन – महावितरणची विजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून सतर्क राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. या विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशदिवा लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सूलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर वातीचे दिवे लावावेत असे आवाहन करण्यात आले आहे.