Home Blog Page 2201

वसंतराव देशपांडे यांची अफाट प्रतिभा समजून घेणं सामान्यांच्या कुवतीपालिकडचे-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी

0

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 (शरद लोणकर )

जर तुम्ही महाराष्ट्रात मोठे झाला असाल आणि तुम्हाला शास्त्रीय संगीत अथवा संगीत नाटकांबद्दल आकर्षण असेल तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अवलिया पंडित वसंतराव देशपांडे यांचे नाव तुम्हांला नक्कीच नवीन नसेल. 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागात चित्रपट श्रेणीमध्ये सादर होत असलेला “मी वसंतराव” हा चित्रपट अभिजात संगीतातील या महान कलाकाराच्या घडणीचा प्रवास दाखवितो आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील आणि जगातील चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील जाणकारांना प्रेरित करण्याचे वचन निभावतो.या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 24 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले की, या चित्रपटात भिन्न भिन्न प्रेक्षकांना भावण्याची क्षमता आहे. “चित्रपटाची कथा व्यक्तिगतरित्या वसंतराव देशपांडे यांची असली तरीही त्यामध्ये कलाकार होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी सार्वत्रिक ओढ आहे.” जगभरातील चित्रपटांमधून संपूर्ण लांबीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या मानाच्या सुवर्ण मयूर पारितोषिकासाठीच्या स्पर्धेत असलेला हा चित्रपट, प्रख्यात होण्याआधी वसंतरावांच्या जीवनात काय घडले याचे वर्णन करतो. महाराष्ट्रात, विदर्भातील एका खेड्यात जन्मलेल्या आणि नंतर नागपूर येथे त्यांच्या आईकडून एकहाती जोपासना झालेल्या वसंतरावांचे जीवन म्हणजे त्यांच्या आयुष्याला आणि संगीत साधनेला आकार देणाऱ्या उत्कंठावर्धक घटनांचा कॅनव्हास आहे. त्यांचे जीवन घडविणाऱ्या घटनांमध्ये या महान कलाकाराची पु.ल.देशपांडे आणि बेगम अख्तर यांच्या अनोख्या मैत्रीचा, भारतीय सैन्यातील नोकरी, लाहोरमध्ये घेतलेले संगीत शिक्षण, 1962 च्या युद्धात भारत-चीन सीमेवर त्यांची झालेली नेमणूक आणि त्यांना मोठी ख्याती मिळवून देणारी कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकात केलेली भूमिका यांचा समावेश आहे.

“मी वसंतराव” या चित्रपटात वसंतरावांची भूमिका त्यांचेच नातू आणि प्रमुख समकालीन शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी वठविली आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना, दिग्दर्शक म्हणाले: “राहुल देशपांडे यांच्यासोबत मी काम केले आहे आणि आम्ही एकत्रपणे संगीत नाटकांना पुनरुज्जीवित केले. व्यावसायिक अभिनेता नसूनही त्यांनी ही भूमिका अत्यंत समर्थपणे केली आहे.”

वसंतराव देशपांडे यांची अफाट प्रतिभा समजून घेणं सामान्यांच्या कुवतीपालिकडचे असल्यामुळे या चित्रपटाची कथा तयार करण्यास दोन वर्षे लागली असे धर्माधिकारी यांनी सांगितले. “वसंतराव यांनी त्यांच्या आयुष्यात जे निर्णय घेतले त्याची कारणमीमांसा मला जाणून घ्यायची होती. जरी ते त्यांच्या काळातील सर्वोत्तम गायकांपैकी एक होते तरीही सुरुवातीच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे त्यावेळी त्यांनी गाण्याची आवड न जोपासण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ते ओळखी वाढवण्यात देखील फारसे उत्सुक नसत हे सत्य आम्ही चित्रपटात दाखविले आहे.”

त्यांच्या जीवनाच्या नंतरच्या टप्प्यात घडलेल्या दोन घटनांचा देखील आम्ही चित्रपटात समावेश केला आहे असे त्यांनी सांगितले. चित्रपटाची पोहोच आणि इफ्फीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत बोलताना निपुण धर्माधिकारी म्हणाले, “जेव्हा काल हा चित्रपट येथे प्रदर्शित झाला तेव्हा अगदी अमराठी प्रेक्षकांनी देखील आमच्याकडे येऊन सांगितले कि चित्रपटात साकारलेल्या भूमिकांशी ते स्वतःला जोडून घेऊ शकले. हा चित्रपट त्यांच्या भाषेतून पाहायला त्यांना आवडेल असे या प्रेक्षकांनी सांगितले. ते कसं शक्य होईल हे माहित नाही पण चित्रपट ही कालातीत कला असल्याने हा चित्रपट शेवटी प्रेक्षकांना जाऊन भिडेलच अशी मला आशा आहे.” 

निपुण धर्माधिकारी हे मराठी लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. संगीत नाटकांना पुनरुज्जीवन आणि पाच अंकी नाटकांची निर्मिती यासाठी ते प्रसिध्द आहेत.

मीरा आणि आदिराज यांची लग्नगाठ बांधली जाणार!

0

,२४ ते ३० नोव्हेंबर मीरा आणि आदिराज यांचा विवाह सप्ताह ‘अजूनही बरसात आहे’ रात्री ८.०० वा. सोनी मराठी वाहिनीवर!

 सोनी मराठी वाहिनीवरील ‘अजुनही बरसात आहे’ ह्या मालिकेनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंय. डॉ. मीरा आणि डॉ. आदिराज अर्थातच मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

                     अनेक वर्षांनंतर अचानक भेटलेले हे दोघं आणि मग त्यांची पुन्हा सुरू झालेली प्रेमकहाणी आता लग्नाचं रूप घेणार आहे. कॉलेजमध्ये असताना मीरा आणि आदिराज यांची भेट एका प्रसंगात अचानक होते. भेटीचं रूपांतर मैत्रीत आणि कालांतराने प्रेमात होतं. पण काही कारणानी त्यांचं ब्रेकअप होतं आणि १० वर्षांनंतर ते पुन्हा भेटतात. पुन्हा भेटल्यावर त्यांच्यात सातत्याने वाद होतात. पण आदिराजचा भाचा मल्हार आणि मीराची बहीण मनस्विनी यांच्या प्रेमकहाणीमुळे आदिराज आणि मीरा यांना एकमेकांशी बोलून त्या दोघांना मदत करणं भाग पडतं. या सगळ्यांत त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मनातलं प्रेम ओठांवर येतं. आदिराज आणि मीरा त्यांचं प्रेम एकमेकांकडे व्यक्तं करतात आणि आता लवकरच ते कायमचे एकमेकांचे होणार आहेत.

                     प्रेक्षकांना ही प्रेमकहाणी आवडते आहे आणि ते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने  वाट बघत होते, त्या मीरा आणि आदिराज यांचं लग्न लवकरच पार पडणार आहे. अनेक संकटं, दुरावा, भांडणं या सगळ्यावर मात करून हा विवाह सोहळा येत्या ३० नोव्हेंबर रोजी सोनी मराठी वाहिनीवर संपन्न होणार आहे.

                       २४ नोव्हेंबरपासून #Adira यांचा विवाहसप्ताह सुरू होणार असून प्रेक्षकांना मीरा आणि आदिराज यांच्या लग्नसमारंभातले क्षण, अर्थातच मेहंदी, संगीत, हळद हे सगळं अनुभवता येणार आहे. २४ ते ३० नोव्हेंबर मीरा आणि आदिराज यांचा विवाह सप्ताह पहायला मिळणार आहे!

‘पावनखिंड’ ३१ डिसेंबरला रुपेरी पडद्यावर

0

पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती. प्रेक्षकांची ही आतुरता आता संपणार आहे, येत्या ३१ डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची ही विजयगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे. ए.ए.फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. ‘पावनखिंडीचा’ थरार दर्शविणारे चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं पावनखिंड नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पावनखिंड चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. शिवराज अष्टका’तील पावनखिंड हे तिसरं पुष्प आहे. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार असून मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि उत्तम सादरीकरण यामुळे पावनखिंडची शौर्यगाथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.

सरकारची भूमिका सकारात्मक पण अंतिम निर्णय कर्मचारीच घेतील- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. २४ नोव्हेंबर – एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाबद्दल सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्यांचे मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो.परंतु एसटीच्या संपाबाबचा अंतिम निर्णय हा कर्मचारीच घेतील अशी प्रतिक्रिया विधनपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, राज्य सरकारने कबूल केले की विलीनीकरणाच्या संदर्भात समितीचा निर्णय आल्यावर त्याबाबत भूमिका घेण्याची मानसिकता दाखवली आहे. कारण न्यायालयाने समिती केली आहे. त्यादृष्टीने परिवहन मंत्री अनिल परब यांनी सकारात्मक भाष्य केले आहे.
हा कर्मचाऱ्यांचा लढा आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांच्या आंदोलनाला पाठिब्यांची भूमिका घेतली होती, हे आंदोलन भाजपाचे नव्हतं, परंतु शंभर टक्के भाजपने या आंदोलनाला ताकद दिली, ही वस्तुस्थिती आहे आणि मी पहिल्या दिवसापासून आपण या आंदोलनाचा साक्षीदार व घटक आहे. पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे की, आंदोलन कर्मचाऱ्यांचे आहे. या आंदोलनाची दिशा व हे आंदोलन कशा पद्धतीने होईल, कुठे थांबेल हे कर्मचारी सांगतील तसे होईल. म्हणूनच आज चर्चेला जात असताना केवळ गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत गेले नाहीत तर त्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी गेले होते असेही दरेकर यांनी सांगितले.

खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. २४:- सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंबधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (व्हिसीद्वारे), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, डॉ. ज्ञानेश्वर टाले, दामूअण्णा इंगोले, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे अप्पर मुख्‍य सचिव मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार व पणन सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले कृषी विभागाचे आयुक्त धिरज कुमार (व्हिसीद्वारे), सहकार आयुक्त अनिल कवडे (व्हिसीद्वारे), पणन विभागाचे संचालक सुनिल पवार (व्हिसीद्वारे) यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील अतिवृष्टी बाधितांना राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप सुरु आहे, त्याला गती देण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलेले अनुदान तसेच आर्थिक मदत कोणत्याही परिस्थितीत बँकांनी रोखू नये. सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात येतील. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह ‘सीएसआर’ फंडातून मदत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. कृषीपंपांना दिवसा सुरळीत आणि पुरेसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सौरपंपाची योजना आणली आहे, ही योजना अधिक सक्षमपणे राबविण्यात यावी. कर्जमाफीला पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी सकारात्मक मार्ग काढल्याबद्दल शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

देशातील प्राथमिक आरोग्य सेवेच्या सुधारणेसाठी 300 दशलक्ष डॉलर्स चे कर्ज

0

महाराष्ट्रासह 13 राज्यांसाठी आहे हे कर्ज

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021

भारत सरकार आणि आशियाई विकास बँकेने (ADB) देशातील सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा  बळकट करवून तिची व्याप्ती वाढवण्यासाठी 300 दशलक्ष डॉलर्स चे कर्ज  काल मंजूर केले. याचा उपयोग देशातील महाराष्ट्रासह 13 राज्यांना होणार असून त्यात 25 कोटी 60 लाख  शहरी रहिवाशांना होणार असून त्यात  5 कोटी  10 लाख  झोपडपट्टी वासियांचा समावेश आहे. 

भारत सरकारतर्फे अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव रजत कुमार मिश्रा यांनी या सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा  बळकट करवून शहरी भागात साथरोगाविरोधातील तयारी वाढवण्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.  आशियाई विकास बँकेच्या भारतीय निवासी मिशनचे राष्ट्रीय संचालक ताकेओ कोनिशी यांनी या करारावर बँकेतर्फे स्वाक्षऱ्या केल्या.

आयुष्मान भारत- आरोग्य व निरामय जीवन केंद्रे  आणि  प्रधानमंत्री आयुष्मान भारत- पायाभूत आरोग्य सुविधा मिशन ( PM-ABHIM ) या  भारत सरकारच्या महत्वाच्या आरोग्य उपक्रमांना या करारामुळे पाठबळ  मिळणार असल्याचे मिश्रा यांनी स्वाक्षऱ्या केल्यानंतर सांगितले. शहरी भागातील असुरक्षित वातावरणात राहणाऱ्या जनतेला या योजनांमुळे गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

भारतीय जनतेला सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी 2018 मध्ये आयुष्मान भारत कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. कोविड महामारीमुळे देशाच्या आरोग्य सेवेवर अधिक ताण येऊ लागल्यामुळे सरकारने नंतर PM-ASBY  प्रधानमंत्री आयुष्मान भारत हि योजना सुरु केली , जिचे नाव ऑक्टोबर 2021 मध्ये बदलून प्रधानमंत्री आयुष्मान भारत- पायाभूत आरोग्य सुविधा मिशन PM-ABHIM करण्यात आले. एकूण आरोग्यसेवेला बळकटी देऊन भविष्यात येणाऱ्या महामारी सदृश्य संकटांसाठी  सज्ज राहणे हा यामागचा हेतू होता.

कोविड सोडून इतर रोगांसाठी देखील उत्तम सेवा उपलब्ध करून देणे  ही बाब या कोविड  महामारीनंतर भारताच्या आरोग्य सेवेपुढे असलेल्या अनेक आव्हानांमध्ये सर्वात महत्वाची आहे, असे कोनिशी  यावेळी म्हणाले. हा कार्यक्रम देशभरातील 13 राज्यांमध्ये राबवला जाणार आहे . यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम , छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान,तामिळनाडू, तेलंगण आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. महामारीवरची उपाययोजना करण्यासोबतच या कार्यक्रमाद्वारे शहरी आरोग्य व निरामय जीवन केंद्रांच्या मार्फत असंसर्गजन्य रोगांवर आणि सर्व समुदायापर्यंत पोचणाऱ्या इतर अनेक प्राथमिक आरोग्य सेवांचे एक सर्वसमावेशक पॅकेज देणे हेही उद्दिष्ट असेल.

या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक मदतीसाठी आशियाई विकास बँकेच्या गरिबी निर्मूलन विषयक जपान निधीतून 2  दशलक्ष डॉलर्स चे अनुदान  देण्यात येणार आहे. याद्वारे कार्यक्रम राबवणे, समन्वय, क्षमता विकास, नवोन्मेष, ज्ञानाचा प्रसार आणि आरोग्य सेवेत सुधारित पद्धतींचा समावेश करणे यासाठी मदत पुरवली जाईल.

केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे उद्यापासून राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

0

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021

केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे उद्यापासून दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. जयपूरमधील सांगानेर येथील झालना डोंगरी आणि कुमारप्पा राष्ट्रीय हँडमेड पेपर संस्था येथे केव्हीआयसी दुकानाचा आढावा घेतील. तसेच युथ आयकॉन पुरस्कार 2021 देखील प्रदान करतील. 26 नोव्हेंबर 2021 रोजी जयपूर येथे ते पत्रकारांना संबोधित करतील.

कुमारप्पा राष्ट्रीय हँडमेड पेपर संस्था ही केव्हीआयसीची एक आघाडीची संस्था आहे जी 1991 मध्ये यूएनडीपीच्या सहाय्याने स्थापन करण्यात आली होती. या संस्थेने स्थानिक हस्तनिर्मित पेपर कारखान्यांना संशोधन आणि विकास संबंधी सेवा , सल्लामसलत आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाची संस्थेला मान्यता आहे. उद्योगाच्या आवश्यकतेनुसार ती आठ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत, संस्थेने 2018 मध्ये प्लास्टिक कचऱ्यापासून हाताने कॅरीबॅग बनवण्याचे आणखी एक नवीन संशोधन केले. बाजारासाठी या नाविन्यपूर्ण कॅरीबॅग तयार करण्यासाठी 20 टक्के कच्चा कागद टाकाऊ प्लास्टिकमध्ये मिसळला जातो. संस्थेच्या निसर्ग प्रकल्पातील प्लॅस्टिक पुनर्वापर अंतर्गत. अंदाजे 35 टन प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून सुमारे 40 लाख कॅरीबॅग तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे 1.4 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

संस्थेने पर्यावरण-स्नेही खादी नैसर्गिक रंगही विकसित केला आहे जो या वर्षी 12 जानेवारी रोजी बाजारात आणण्यात आला. या रंगात 25 ते 30 टक्के शेण वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ते बुरशीरहित आणि जीवाणूरोधक बनते. खादी रंग डिस्टेंपर आणि प्लॅस्टिक इमल्शन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि यासारख्या इतर उत्पादनांपेक्षा स्वस्त आहे. संस्थेने व्यावसायिक तत्त्वावर खादी रंगाचे उत्पादन करण्याच्या क्षेत्रात पाच दिवसांचे प्रशिक्षण सुरू केले असून, आतापर्यंत सुमारे 900 लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. संस्थेने सुमारे 20,000 लिटर खादी नैसर्गिक रंगाचे उत्पादन केले आहे, तर राष्ट्रीय स्तरावर विक्रीसाठी 16 डीलर्सची निवड करण्यात आली आहे.संशोधन आणि विकास उपक्रम सुरू ठेवत, संस्थेने अलीकडेच शेणापासून काढलेल्या जिवाणू रोधक घटकांसह कापड विकसित केले आहे, जे लवकरच बाजारात आणले जाईल.

1990च्या दशकानंतरचा सोव्हिएत युक्रेनचे दर्शन मला या चित्रपटाच्या माध्यमातून घडवायचे होते- ‘-हायनो’चे दिग्दर्शक ओलेह सेन्टसोव्ह

0

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 (शरद लोणकर )

‘‘माझा चित्रपट खूप हिंसक आणि निष्ठूरही आहे. मला या चित्रपटाच्या माध्यमातून 1990च्या दशकानंतर ज्या पद्धतीने युक्रेनमध्ये जंगली जीवन जगले जात होते, त्याचे चित्रण करायचे होते,’’ असे मनोगत ‘-हायनो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओलेह सेन्टसोव्ह यांनी आज व्यक्त केले. 52 व्या इफ्फीमध्ये जागतिक पॅनोरमा चित्रपटांच्या विभागामध्ये  ‘-हायनो’चे प्रदर्शन झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ओलेह बोलत होते.

‘‘मी आधी स्वतःच बरेच काही शिकलो आणि नंतर खूप उशिराने चित्रपट निर्मितीकडे वळलो. आयुष्य छोटसे आहे आणि मला चित्रपट बनवत जगायची इच्छा आहे, असेही ओलेह यावेळी म्हणाले. त्यांच्या‘-हायनो’ चित्रपटाचा 52व्या इफ्फीमध्ये काल अशियाई प्रिमियर झाला. हा चित्रपट याआधी व्हेनिस चित्रपट महोत्सव 2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.‘-हायनो’ चित्रपटाच्या टीमचा एक भाग असणा-या वेरोनिका वेल्च यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सोव्हिएत महासंघाचे पतन हा विषय स्थानिक असल्यामुळे जगभराल्या प्रेक्षकांना हा चित्रपट कसा समजेल, याचा आम्हाला अंदाज नव्हता. परंतु कला लोकांना जोडते. मानवी आयुष्यात आपल्या समोर येणारे पर्याय आणि आपल्या सभोवतालचे वातावरण यांचा मेळ घालण्याचे काम सगळीकडे आणि सर्वांना करावे लागते. त्याचबरोबर त्या परिस्थितीवर आपले किती नियंत्रण आहे, हा प्रश्नही नेहमीच सर्वांपुढे असतो.’’

‘-हायनो’ मध्ये हिंसाचाराचा अतिरेक झाल्याचे दिसून येते, याविषयी बोलताना ओलेह म्हणाले, ‘‘ वास्तविक गुन्हेगारीवरील सिनेमा-नाटकांचा मला तिटकारा आहे. हिंसाचाराचा मी तिरस्कारही करतो. परंतु हा चित्रपट वास्तववादी असावा, अशी माझी इच्छा होती.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘आजच्या पिढीला नव्वदीच्या दशकामध्ये युक्रेनमधले जीवन कसे होते, हे दाखविण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला आहे.’’वेरोनिका वेल्च पुढे म्हणाल्या, ‘‘आजच्या तरूणांना समाज माध्यमातून जे दिसते तेच जीवन वास्तविक नाही आणि आपल्याला सभ्य जीवन जगता यावे यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे, हे या चित्रपटातून तरूणांना शिकविण्याचा प्रयत्न केला आहे.’’

सिनेमाविषयी –

ही एक भुरट्या चोराची कथा आहे.  ‘-हायनो’ असे टोपणनाव धारण करणारा तरूण 1990 दशकामध्ये युक्रेनच्या गुन्हेगारी जगतामध्ये झपाट्याने वर चढत गेला. गेंड्यांकडे फक्त अतिशक्ती असते. आणि ते तितकेच क्रूरही असतात. त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते. अखेर त्याची या दुष्टचक्रातून सुटका होवून मुक्ती मिळेल का? अशी संधी मिळेल का? याचे चित्रण केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

0

मुंबई, दि. 24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई शहर जिल्ह्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी पासून सुरु झाली आहे.

राज्यातील मुंबई वगळुन इतर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत ऑफलाईन प्रवेश आवेदन पत्र प्राप्त करुन त्यासोबत जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती, 2 पासपोर्ट फोटो इत्यादी जोडून आवेदनपत्र सादर करण्यात यावे.

वसतिगृहाचे नाव, पत्ता व गृहपाल संपर्क क्रमांक  पुढीलप्रमाणे आहे.मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बी.डी.डी.चाळ, वरळी-118, मुंबई-400018, संपर्क क्र. 8830316553 ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी-116, बी.डी.डी.चाळ, वरळी-116, मुंबई-400018, संपर्क क्र. 8830316553 ; संत मिराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, वरळी-116, बी.डी.डी.चाळ, वरळी-116, मुंबई-400018, संपर्क क्र.9987790430 असे  पत्रकाद्वारे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर मेट्रो क्रिकेट क्लब, डेक्कन जिमखाना संघाचे विजय

0
  • डेक्कन जिमखानाच्या अथर्व वणवे, आर्यन्स क्रिकेट अकादमीच्या तेजस तोलसणकर यांची शतकी खेळी   

पुणे, दि.24 नोव्हेंबर  2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी  फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत संकेत पांडे(64धावा व 3-37) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मेट्रो क्रिकेट क्लब संघाने आर्यन्स क्रिकेट अकादमी संघावर पहिल्या डावाच्या 3धावांच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. तर, दुसऱ्या सामन्यात अथर्व वणवे याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावाच्या 91 धावांच्या अधिक्याच्या जोरावर नॉर्थ झोन संघावर विजय मिळवला. 
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत तीन दिवसीय लढतीत तिसऱ्या दिवशी आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाच्या 31.1षटकात 5बाद 134धावापासून खेळास आज सुरुवात झाली. तत्पूर्वी काल पहिल्या डावात  मेट्रो क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 50.5षटकात सर्वबाद 230धावा केल्या.  याच्या उत्तरात आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव  51.2 षटकात 227 धावावर संपुष्टात आला. यामध्ये तेजस तोलसणकरने एकाबाजूने लढताना 129चेंडूत 16चौकार व 1षटकाराच्या मदतीने 101धावांची शतकी खेळी केली. तेजसला हार्दिक कुरंगळेने 15 धावा काढून साथ दिली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 71 चेंडूत 54 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.  मेट्रो क्रिकेट क्लबच्या गुरवीर सिंग सैनी(3-23), संकीत पांडे(3-37) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात  3धावांची आघाडी मिळवून दिली. 
दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरलेल्या मेट्रो क्रिकेट क्लब संघाने 53 षटकात 5बाद 206धावा केल्या. यात संकीत पांडे 64, वरद खाणीवाले 54, निशांत नगरकर नाबाद 37, प्रशम नाबाद 21यांनी धावा केल्या.  त्यामुळे या अनिर्णित सामन्यात मेट्रो क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर आर्यन्सविरुद्ध विजय मिळवला. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा संकीत पांडे सामनावीर ठरला.
डेक्कन जिमखाना मैदानावरील सामन्यात तिसऱ्या दिवशी नॉर्थ झोन संघाच्या आज 38षटकात 1बाद 102धावापासून पुढे खेळ सुरु झाला. प्रथम फलंदाजी करताना  72 षटकात 9बाद 254धावा केल्या. यात मुकेश जट 57, प्रसन्ना निळे 51, तेजस पवार 49, अनिकेत इंद्रजीत नाबाद 21, कृष्णा अगरवाल 17, तन्मय शिरोडे 16, पवन सानप 13 यांनी धावा केल्या. डेक्कन जिमखानाकडून हितेन बनसोडे(4-95), आयुश काब्रा(3-65), यश बोरामणी 1-27) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाने 70षटकात 8बाद 345धावा केल्या. यात अथर्व वणवेने संयमी खेळी करत 134चेंडूत 11चौकारांच्या मदतीने 109धावांची खेळी केली. अथर्व व यश बोरामणी(68धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 78चेंडूत 88धावांची भागीदारी केली. त्यानंतर अथर्वने प्रकाश चौधरी(नाबाद 69धावा)च्या साथीत 118चेंडूत 89 धावांची भागीदारी करून संघाला 91 धावांची पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. नॉर्थ झोनकडून तन्मय शिरोडेने 86धावात 4गडी तर, तेजस पवारने 81धावात 3 गडी बाद केले.  त्यामुळे या अनिर्णित सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर  नॉर्थ झोनविरुद्ध विजय मिळवला. अथर्व वणवे सामनावीर ठरला.
वीरांगना मैदानावरील सामन्यात पहिल्या दिवशी केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने 90षटकात 7बाद 335धावा केल्या. यात वरद मोदक नाबाद 45धावा, रिषी अग्रहार नाबाद 0धावांवर खेळत आहे. दोन्ही संघातील अजून दोन दिवसाचा खेळ शिल्लक आहे.      निकाल: पीवायसी मैदान: पहिला डाव: मेट्रो क्रिकेट क्लब:  50.5षटकात सर्वबाद 230 धावा वि.आर्यन्स क्रिकेट अकादमी: 51.2 षटकात सर्वबाद 227 धावा(तेजस तोलसणकर 101(129,16×4,1×6), प्रमोद नारळे 24, अमन मुल्ला 18, हार्दिक कुरंगळे 15, तनय सांघवी 14, गुरवीर सिंग सैनी 3-23, संकीत पांडे 3-37, रेहान खान 2-54, नरेंद्र पाटील 1-29, स्वराज वाबळे 1-34); मेट्रो क्रिकेट क्लब संघाकडे पहिल्या डावात 3धावांची आघाडी;दुसरा डाव: मेट्रो क्रिकेट क्लब:53 षटकात 5बाद 206धावा(संकीत पांडे 64(51,11×4,2×6), वरद खाणीवाले 54(83,10×4), निशांत नगरकर नाबाद 37(68,3×4,3×6), प्रशम नाबाद 21, निलय नेवसकर 2-27)  वि. आर्यन्स क्रिकेट अकादमी; सामना अनिर्णित; सामनावीर-संकीत पांडे; मेट्रो क्रिकेट क्लब पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजयी; 
डेक्कन जिमखाना मैदान: पहिला डाव: नॉर्थ झोन: 72 षटकात 9बाद 254धावा(मुकेश जट 57(149,7×4), प्रसन्ना निळे 51(112,8×4), तेजस पवार 49(54,7×4,1×6), अनिकेत इंद्रजीत नाबाद 21, कृष्णा अगरवाल 17, तन्मय शिरोडे 16, पवन सानप 13, हितेन बनसोडे 4-95, आयुश काब्रा 3-65, यश बोरामणी 1-27) वि.डेक्कन जिमखाना: 70षटकात 8बाद 345धावा(अथर्व वणवे 109(134,11×4), यश बोरामणी 68(66,8×4,1×6), अभिषेक ताटे 36(33,7×4), अनिष 33, प्रकाश चौधरी नाबाद 69(91,7×4,1×6), ओंकार साळुंखे नाबाद 17, तन्मय शिरोडे 4-86, तेजस पवार 3-81, लवकेश देशमुख 1-45); सामना अनिर्णित; सामनावीर-अथर्व वणवे; डेक्कन जिमखाना संघ पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजयी;  
वीरांगणा मैदान: पहिला डाव: केदार जाधव क्रिकेट अकादमी: 90षटकात 7बाद 335धावा(अभिमन्यू जाधव 92(110,16×4), दिग्विजय जाधव 85(136,13×4), अक्षय झोरे 54(75,4×4), वरद मोदक नाबाद 45(103,4×4), रिषी अग्रहार नाबाद 0,  अक्षय चव्हाण 24, यश दुबे 4-88, सौरभ डांगे 2-30) वि.विजय क्रिकेट क्लब: . 

एमएसएलटीए तर्फे मार्च महिन्यापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, 1 राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन

0

पुणे, 24 नोव्हेंबर, 2021:  देशातील अग्रगण्य क्रीडा संघटनांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व अखिल भारतीय टेनिस संघटना यांच्या संलग्नतेने राज्यभरात एकूण 1लाख 25हजार डॉलर हुन अधिक रकमेच्या 6 आंतरराष्ट्रीय स्पर्धा 21 नोव्हेंबर 2021 ते 22 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, पुण्यात 2 आयटीएफ कुमार गटाच्या टेनिस स्पर्धा आणि सोलापूर, पुणे, नवी मुंबई व नागपूर ठिकाणी 4 महिला आयटीएफ मानांकन स्पर्धा येत्या महिन्यात आयोजित करण्याचा पुढाकार घेतला आहे. या स्पर्धांमुळे राज्यातील तसेच भारतातील खेळाडूंना महत्वाचे आयटीएफ गुण मिळवण्याची, तसेच जागतिक स्तरावर आपली अधिक प्रगती करण्यास मदत मिळणार आहे. साधारणपणे या सर्व स्पर्धांच्या आयोजनासाठी  एकूण   1लाख 25हजार डॉलर(सुमारे 93लाख) खर्च होणार आहे. 
तसेच, या 2 कुमार आयटीएफ स्पर्धांमध्ये गद्रे मरीन आयटीएफ ग्रेड 3 आणि आर्यन पंप्स आशियाई कुमार स्पर्धांचा समावेश असून याचे आयोजन  एमएसएलटीए आणि डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने करण्यात येणार आहे.  
सोलापूर जिल्हा टेनिस संघटनेच्या वतीने 15000डॉलर आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा, डेक्कन जिमखानाच्या वतीने 25000डॉलर एनइसीसी आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा, नवी मुंबई स्पोर्ट्स संघटनेच्या वतीने 25000डॉलर आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा आणि नागपूर जिल्हा टेनिस संघटनेच्या वतीने 25000डॉलर आयटीएफ महिला टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय एमएसएलटीए तर्फे डिसेंबरमध्ये औरंगाबाद येथे क्ले  कोर्टवर 14 राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले. 
अय्यर पुढे म्हणाले की, या स्पर्धांना अखिल भारतीय टेनिस संघटना आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा पाठिंबा लाभला आहे. राज्यांतील चार वेगवेगळ्या शहरात एकाच वर्षात अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणारी एमएसएलटीए ही देशांतील एकमेव संघटना आहे, यात शंका नाही. यावरूनच आपल्या राज्यात टेनिससाठी उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची कल्पना दिसून येते. या स्पर्धांच्या आयोजनामुळे राज्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळणार असून राज्यातील 40हुन अधिक खेळाडू आणि देशातील 120 हुन अधिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर एकेरी व दुहेरी गटात खेळण्याची आणि आयटीएफ गुण कमावून जागतिक क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे.  

दुबई वर्ल्ड एक्सपोमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण

0

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची अबुधाबी फिल्म कमिशनला भेट

अत्याधुनीक तंत्रज्ञानाचे आदान प्रदान व महाराष्ट्रातील गुंतवणुकी बाबत चर्चा

मुंबई, दि. २४:दुबई येथे सध्या वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळया पध्दतीने सादर करण्यात आले आहे. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांची भेट घेऊन उभय देशादरम्यान चित्रपट निर्मितीत लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करण्या संदर्भात, तसेच या क्षेत्रात महाराष्ट्रात गूंतवणूक करण्या बाबत चर्चा केली.

दुबई सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दुबई वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे. चित्रपट, विविध प्रकारच्या मालिका, वेब सिरीज यांच्या चित्रीकरणसाठी सुलभ पध्दतीने ज्या सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत त्यांची माहिती जागतिक पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या अनुषंगानेच आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशन येथे भेट दिली. तेथील कमिशनर हन्स फारकीन यांच्याशी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मीती व्यवसाय संदर्भाने चर्चा केली. मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी नव्याने उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली. अबुधाबी फिल्म कमिशन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, या संदर्भाने महाराष्ट्रात दुबई येथून गुंतवणूक व्हावी या बाबतही चर्चा झाली.

अबुधाबी सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे अध्यक्ष मोहम्मद-खलिफा-अल-मुबारक यांचीही अमित देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली. दोन्ही देशांना उपयुक्त ठरेल या पद्धतीने मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळ सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आणि दादसाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांच्यासह विस्टास मिडीया अबुधाबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंत्तीखाब चौगुले, अबुधाबी फिल्म कमिशनचे व्हाईस प्रेसिडेंट संजय रैना हेही सहभागी झाले होते.

अबुधाबी येथे चित्रीकरण झालेल्या एक था टायगर, विक्रम वेध या चित्रपटांच्या सेटला अमित देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी चित्रीकरणाच्या आधुनिक व्यवस्था व कार्यपद्धतीचा अनुभव घेतला, अशा प्रकारच्या द्ययावत माहितीचे अदान-प्रदान झाले तर भविष्यात दोन्ही देश या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करू शकतील अशी भावना श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली

छत्तीसगढचे ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव

0

२८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण

पुणे दि. २४ नोव्हेंबर :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. तात्याराव लहाने, प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या कार्यकाळ समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. ओबीसींची स्वतंत्र जनगणना सुरु करणारे देशातील छत्तीसगढ हे प्रथम राज्य असून त्याची यशस्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून केली जात आहे. त्यांनी राजकीय कार्यासोबत आपल्या कार्यातून महात्मा जोतीराव फुले यांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन २०२१ चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.

या समता पुरस्कार सोहळ्यास सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व फुले प्रेमी, समता सैनिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी केले आहे.

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान, आचारसंहिता लागू

0

मुंबई, दि. 24  : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे: ठाणे-मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड-खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी-मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग-कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, पुणे-देहू (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, धुळे-साक्री, नंदुरबार-धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, अहमदनगर-अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, जळगाव-बोदवड,औरंगाबाद-सोयगाव, जालना-बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी-पालम, बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर-जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद-वाशी, लोहारा बु., नांदेड-नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली-सेनगाव, औंढा-नागनाथ, अमरावती-भातकुली, तिवसा, बुलडाणा-संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ-महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम-मानोरा, नागपूर- हिंगणा, कुही, वर्धा-कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा-मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली, चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा, गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.

पोटनिवडणुकांसाठीही मतदान

विविध जिल्ह्यातील सात नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. शिरोळ (6 अ), नागभीड (4 अ), जत (5 ब), सिल्लोड (12 अ), फुलंब्री (2 आणि 8), वानाडोंगरी ( 6 अ) आणि ढाणकी (12 आण 13) या नगरपरिषद/ नगरपंचायतींतील सदस्यपदांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवडणुका होत आहे.

उन्हाळी हंगामासाठी महाबीजकडून सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम

0

पुणे, दि. 24 : रब्बी, उन्हाळी 2021-22 हंगामामध्ये महाबीजकडून राज्यात सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे उत्पादित होणारे पात्र बियाणे महाबीजकडून बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात येणार आहे.

खरीप 2021 हंगामात महाबीज व्यवस्थापनामार्फत सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला होता. सोयाबीन पीक परिपक्वता अवस्थेत असताना मराठवाडा व विदर्भात सप्टेंबरमधे झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन बिजोत्पादनावर विपरीत परीणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील खरीप 2022 हंगामात सोयाबीन प्रमाणित बियाणे पुरवठा करण्यावर मर्यादा येणार असल्याने राज्यात सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात फुले संगम व फुले किमया वाणांचा प्रत्येकी 500 हेक्टर व 100 हेक्टरचा प्रमाणित बियाणे बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्त्रोत बियाणे डिसेंबर 2021 अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे. कृषी विद्यापिठाच्या शिफारशीनुसार 30 जानेवारीपूर्वी पेरणीचे नियोजन आहे. बिजोत्पादक शेतकऱ्यांकडे अंदाजे एप्रिल व  मे महिन्यात उत्पादित झालेले पात्र बियाणे महाबीजकडून बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी बिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. बी. बोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कृषी क्षेत्र अधिकारी महाबीज पुणे (9890712967/800556884) किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.