Home Blog Page 2200

हज 2022 साठी आतापर्यंत 20,000 हून अधिक नागरिकांचे अर्ज दाखल

0

मुंबई, 25 नोव्हेंबर 2021

हज अनुदान रद्द करणे, मुस्लिम महिलांना “मेहरम” (पुरुष साथीदार) शिवाय हजला जाण्यावरील निर्बंध उठवणे, 100 टक्के डिजिटल/ऑनलाइन हज प्रक्रिया यासारख्या प्रभावी आणि दूरदर्शी सुधारणांनी भारतीय मुस्लिमांसाठी “हज यात्रा सुलभ करणे ” हे सुनिश्चित करण्यात आले आहे.  केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईतील हज हाऊस येथे हज 2022 च्या तयारीसंदर्भात भारतीय हज समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या  बैठकीनंतर ही माहिती दिली. हज 2022 ची संपूर्ण प्रक्रिया 100 टक्के डिजिटल/ऑनलाइन असेल, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय हज समितीचे पोर्टल; हज समूह आयोजकांसाठी पोर्टल ज्यात समूह आयोजक  आणि त्यांचे पॅकेज इत्यादी सर्व तपशील असतील; डिजिटल आरोग्य ओळखपत्र;”ई-मसिहा” आरोग्य सुविधा; मक्का-मदीनामधील निवास/वाहतुकीसंबंधी सर्व माहिती प्रदान करणारे  “ई-सामान  प्री-टॅगिंग” आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज “हज मोबाईल ॲप” ने भारतीय यात्रेकरूंसाठी पारदर्शक, परवडणारी आणि आरामदायी हज यात्रा सुनिश्चित केली आहे, असे मंत्री म्हणाले

हज 2022 दरम्यान कोरोना प्रतिबंधासाठी नियम लक्षात घेऊन, हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया ही दोन मात्रा घेऊन पूर्ण झालेले कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि भारत आणि सौदी अरेबिया सरकारने ठरवले निकष आणि मार्गदर्शक तत्वांच्या अनुसार केली जाईल. 

1 नोव्हेंबरपासून हज साठी अर्ज दाखल करण्याची  प्रक्रिया सुरू झाली आहे.हज 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे. नागरिक हजसाठी ऑनलाइन आणि “हज मोबाईल अॅप” द्वारे अर्ज करत आहेत. हे अॅप “हज अॅप इन युवर हँड” या घोषवाक्यासह  अद्ययावत  करण्यात आले आहे.अॅपमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये असून  वारंवार विचारले जाणारे प्रश्न, अर्ज भरण्यासाठी माहिती, अर्जदारांना अर्ज  भरण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने माहिती देणाऱ्या चित्रफितीं यात समाविष्ट आहेत

आतापर्यंत 20,000हून अधिक लोकांनी हज 2022 यात्रेसाठी अर्ज केला असून त्यामध्ये “मेहरम” श्रेणीशिवाय हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या 90 महिलांचा समावेश आहे.याआधी 2020 आणि 2021 या वर्षींच्या हज यात्रेसाठी 3000 हून अधिक महिलांनी “मेहरम” म्हणजे पुरुष सहकाऱ्याविना या श्रेणीअंतर्गत अर्ज केले होते.जर त्या महिलांना 2022 साली देखील यात्रा करायची असेल तर त्यासाठी त्यांचे आधीचे अर्ज पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय इतर महिला देखील “मेहरम” श्रेणीशिवाय हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज करू शकतात. “मेहरम” श्रेणीशिवाय यात्रा करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांना लॉटरी पद्धतीतून सूट देण्यात आली आहे.  

केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की हज 2022 च्या यात्रेकरूंना यात्रा प्रवेश करण्यासाठी पूर्वीच्या 21 ऐवजी आता 10 प्रवासी बिंदू  व्यवस्था करण्यात आली आहे. अहमदाबाद, बेंगळूरु, कोचीन,दिल्ली,गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता,लखनौ, मुंबई आणि श्रीनगर या 10 शहरांतून हज 2022 यात्रा प्रवास सुरु होईल.

अहमदाबादचा प्रवेश बिंदू संपूर्ण गुजरातेतील यात्रेकरूंसाठी असेल. तसेच बेंगळूरु प्रवेश बिंदू संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील चित्तूर साठी असेल. कोचीन प्रवेश बिंदू केरळ, लक्षद्वीप, पुदुचेरी, तामीळनाडू आणि अंदमान-निकोबार या भागांसाठी असेल. दिल्लीचा प्रवेशबिंदू दिल्ली, पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश,चंदीगड, उत्तराखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील पश्चिमी जिल्ह्यांसाठी असेल, गुवाहाटी प्रवेश बिंदू आसाम, मेघालय, मणिपूर,अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि नागालँड साठी असेल, हैदराबाद हे स्थानक आंध्रप्रदेश आणि तेलंगणासाठी असेल, कोलकाता प्रवेश बिंदू, पश्चिम बंगाल, ओदिशा,त्रिपुरा,झारखंड आणि बिहारच्या यात्रेकरूंसाठी असेल, लखनौ हे स्थानक उत्तरप्रदेशच्या पश्चिमी भागाखेरीज उर्वरित भागासाठी असेल, मुंबई हा बिंदू महाराष्ट्र, गोवा,मध्यप्रदेश, छत्तीसगड, दमण-दीव तसेच दादरा आणि नगर हवेली यांसाठी असेल तर श्रीनगर हे ठिकाण,संपूर्ण जम्मू-काश्मीर,केह-लडाख आणि कारगिल क्षेत्रासाठी असेल.

हज यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात यात्रेकरू पाठविणारा आपला देश हा इंडोनेशियाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

निर्मला सीतारामन यांच्या हस्ते, जेएनपीटी इथल्या केंद्रीकृत पार्किंग प्लाझा मध्येच सीमाशुल्क तपासणी सुविधा कार्यालयाचे भूमिपूजन

0

मुंबई, 25 नोव्हेंबर 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यांतर्गत रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा येथील सीमाशुल्क विभागाच्या कामांची पाहणी केली.

सीमाशुल्क क्लियरन्स प्रक्रिया आणि त्यात सीमाशुल्क विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत अलीकडेच  राबवलेल्या उपक्रमांची माहिती अर्थमंत्र्यांना देण्यात आली. गेल्या काही काळात, सीबीआयसीने तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या कार्यपद्धतीत अनेक बदल केले आहेत. यात, आयातीसाठी आवश्यक कागदपत्रे आधीच ऑनलाइन पद्धतीने सादर करणे, ई-संचित च्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक  पद्धतीने सादर करण्याची सुविधा, मालाची ऑनलाइन नोंदणी, तसेच सीमा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याची व्यवस्था, सीमाशुल्क कागदपत्रांचे डिजिटलीकरण, आणि आयातीचे स्वयंचलित क्लियरन्स इत्यादी.

या सर्व सुधारणांना जोड म्हणून, सीबीआयसी ने लॉजिस्टीक साखळी सुधारण्यासाठी देखील सक्रियपणे उपाययोजना कल्या आहेत. यात, उत्तम अशी एक्स रे स्कॅनर व्यवस्था , आणि आरएफआयडी टॅग, आणि कंटेनर्स ट्रॅकिंग व्यवस्था यांचा समावेश आहे. सीबीआयसी ने केलेल्या या सुधारणा/उपक्रमांमुळे उद्योगपूरक वातावरण निर्मिती, अनुपालनाचा भार कमी होणे तसेच एकूणच माल सोडवण्याच्या प्रक्रियेत ववेळेची बचत होत आहे.

अर्थमंत्र्यांनी व्यापार सुलभीकरणाच्या क्षेत्रात सीमाशुल्क विभागाने उचललेल्या विविध कामांचा आढावा  घेतला. आयात निर्यात कागदपत्रांच्या छाननीची दैनंदिन प्रलंबित प्रकरणं शून्यावर यावीत आणि मालाच्या पाठवणीची आणि स्वीकृतीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी प्रशासन बळकट करावं आणि विविध प्रक्रियांमध्ये समन्वय वाढवावा, अशा सूचना सीतारामन यांनी केल्या. निर्यात प्रोत्साहन योजनांच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेवरही त्यांनी भर दिला उदा: RoDTEP (निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर माफी) आणि RoSCTL (राज्य आणि केंद्रीय कर आणि शुल्काची सवलत) आणि देय परतावा /ड्रॉबॅक वेळेवर निकाली काढणे.

अर्थमंत्र्यांनी अधिका-यांना धोकादायक वस्तूंच्या मंजुरी प्रक्रियेला गती देण्यास सांगितले आणि आयात केल्याच्या तीन महिन्यांच्या आत अशा वस्तूंची मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही न्यायिक प्रक्रिया, असल्यास ती पूर्ण करण्याची सूचना केली. अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी प्रसिद्धी देण्यास सांगितले.

अर्थमंत्र्यांनी न्हावा शेवामधील जहाजे, माल आणि जमिनीच्या बाजूने मालाचे कंटेनर एकावर एक ठेवण्याची व्यवस्था आणि वाहतूकविषयक पायाभूत सुविधांची सविस्तर पाहणी केली. तसेच महसूल, सुरक्षा  आणि विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीमाशुल्क अधिकारी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

यावेळी अर्थमंत्र्यांनी मध्यवर्ती पार्किंग प्लाझामधील ऑन व्हील कस्टम्स एक्स्पोर्ट क्लिअरन्स प्रक्रियेची पाहणी केली आणि या विशेष एकीकृत व्यवस्थेची दखल घेतली. ई-सील्ड कंटेनर्सच्या क्लिअरन्ससाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे आणि या ठिकाणी न्हावा शेवाच्या 50 टक्के टीईयूंची हाताळणी केली जाते. यावेळी सीतारामन यांना डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी (DPD) लॉजिस्टिक्स प्रोग्रामबद्दल माहिती देण्यात आली ज्यामध्ये न्हावा शेवा येथे 60% आयात TEU समाविष्ट आहे आणि बंदरावर कस्टम क्लिअर्ड कार्गो डिलिव्हरी करण्यासाठी आणि त्याद्वारे वाहतूक आणि इतर खर्चात बचत करण्यासाठी नोंदणीकृत आयतदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या सुविधेचे भूमिपूजन आज वित्तमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

न्हावा शेवाने अणुउर्जा नियामक मंडळाकडून परिचालक परवाने मिळवण्यासाठी आपल्याच मनुष्यबळाला प्रशिक्षण देऊन तातडीने तीन नवे फिरते कंटेनर स्कॅनर तैनात केल्याबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देण्यात आली.

अलीकडेच सुविधा केंद्रात मनुष्यबळ तैनात केल्यामुळे 24×7 पाळ्यांमध्ये काम करणारी प्रणाली कार्यरत झाली आहे. आता आयात होणाऱ्या मालासाठी ओओसी आदेशाकरता सुटीच्या तासांमध्येही थांबावे लागत नाही याबद्दल अर्थमंत्र्यांनी प्रशंसा केली.

करदाते आणि नागरिकांच्या सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत ते जाणून घेण्यासाठी आणि अलीकडेच ‘तुरंत कस्टम्स’ प्रोग्रामच्या कक्षेअंतर्गत सीमाशुल्क प्रक्रियांमध्ये झालेल्या बदलांची माहिती देण्यासाठी त्यांची भेट घ्यावी अशी सूचना, यावेळी अर्थमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली.

येत्या 25 जानेवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवसानिमित्त केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने देशव्यापी जनजागृती आणि जन संपर्क विषयक कार्यक्रम आयोजित करावेत, अशी सूचना सीतारामन यांनी केली. यात या विभागाशी संबंधित विविध घटक, जसे की निर्यातदार, आयातदार, आणि सीमाशुल्क विभागाचे मध्यस्थ यांच्याशी संपर्क करावा. या जनसंपर्क अभियानाची दोन प्रमुख उद्दिष्टे असावीत, एक म्हणजे हितसंबंधी गटांमध्ये सीमाशुल्क विभागाकडून  उद्योग पूरक वातावरणनिर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या सुधारणांविषयी  जनजागृती करणे, आणि दुसरा या विभागाकडून सर्व हितसंबंधी गटांच्या असलेल्या अपेक्षा आणि त्यांना येणाऱ्या समस्यांविषयी जाणून घेत त्यांची जलद सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणे.

न्हावा शेवा कस्टम्स, आयात शुल्काच्या संकलनातून राष्ट्रीय महसुलाच्या सुमारे 20% महसुलाची निर्मिती करतो. या बंदरातील 85 टक्के माल कंटेनरच्या स्वरुपात असतो. वर्षाला 70 लाख टीईयूंची हाताळणी करण्याची या बंदराची क्षमता आहे.

महसूल सचिव  तरुण बजाज, @cbic_india चे अध्यक्ष श एम अजित कुमार आणि सीमाशुल्क विभागाचे मुख्य आयुक्त @jnchcustoms एम के सिंह देखील अर्थमंत्री @nsitharaman यांच्या आढावा बैठकीला @JNPort ओल्ड कस्टम हाऊस इथे उपस्थित होते.

महापौरांचे आदेश डावलणे गंभीर: खेमनारांची बदली करा – उज्वल केसकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0

पुणे -भर सभागृहात महापौरांनी दिलेले कायदेशीर आदेश न पाळता कारभार करणे हे गंभीर असून या प्रकरणी ताबडतोब अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली करावी अशी मागणी महापालिकेतील माजी विपक्षनेते उज्वल केसकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. १ कोटी ची बोगस बिलांची फाईल करून महापालिकेला १ कोटीला गंडा घालण्याचा जो प्रकार झाला त्यात ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत , ते ते अधिकारी निर्दोष साबित होत नाहीत तोवर त्यांच्याकडून कार्यभार काढून घ्यावा म्हणजे च त्यांना निलंबित करावे असे आदेश महापौरांनी भ सभागृहात देऊनही तसे महापालिका प्रशासनाने केले नाही .उलट अतिरिक्त आयुक्त यांनी चौकशी समिती बसवली आणि त्या चौकशी समितीचा अहवाल आणि त्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर त्या अधिकार्‍याचे काय करायचे याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले, ही चुकीची प्रथा आहे आणि म्ह्पौरांच्या आदेशाचा अवमान करणारी आहे .

महापौरांनी सभागृहात मध्ये दिलेला आदेश कायदेशीर असताना त्याकडे दुर्लक्ष करून चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे खेमनार यांच्या कारभाराबाबत शंका निर्माण होत असल्याने त्यांना तातडीने पुण्यातून बदली करून अन्यत्र हलविणे गरजेचे आहे असे केसकर यांनी म्हटले आहे .

परमबीर सिंह यांनी मुंबई हल्ल्याचा गुन्हेगार कसाबचा फोन लपवला होता- निवृत्त एसीपी पठाण यांचा आरोप

0

मुंबई-महाराष्ट्र पोलिसचे निवृत्त एसीपी समशेर खान पठाण यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पठाण यांनी परमबीरवर 26/11 चा सर्वात मोठा गुन्हेगार अजमल अमीर कसाबला मदत केल्याचा आरोप केला आहे. परमबीर यांनी कसाबकडून सापडलेला फोन आपल्याजवळ ठेवला होता आणि तपास अधिकाऱ्यांच्या हवाली केला नाही, असे पठाण यांनी सांगितले. हा तोच फोन होता ज्यावरून कसाबला पाकिस्तानकडून सूचना मिळत होत्या.एवढेच नाही तर कसाब आणि त्याच्या हँडलर्ससोबत आलेल्या आणखी काही दहशतवाद्यांना मदत केल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोपही परमबीर सिंहवर केला आहे. पठाण यांनी मुंबईच्या विद्यमान पोलीस आयुक्तांना चार पानी तक्रार पाठवली आहे.समशेर खान यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या तक्रार पत्रात संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार उल्लेख केला आहे. ते म्हणाले की 2007 ते 2011 दरम्यान ते पायधुनी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्याचा बॅचमेट एनआर माळी डीबी मार्ग पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होता. दोघांचे कार्यक्षेत्र मुंबई झोन-२ मध्ये येते.

पठाण यांनी पुढे सांगितले की, २६/११ च्या दिवशी अजमल अमीर कसाबला गिरगाव चौपाटी परिसरात पकडण्यात आले. ही बाब मला कळताच मी माझे सहकारी एन.आर.माळी यांच्याशी फोनवर बोललो. संभाषणादरम्यान माळीने मला सांगितले की, अजमल कसाबकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. त्याचवेळी त्यांनी मला सांगितले की, एटीएसचे तत्कालीन प्रमुख परमबीर सिंह यांच्यासह अनेक मोठे अधिकारी येथे आले आहेत. माळीच्या म्हणण्यानुसार, हा फोन कॉन्स्टेबल कांबळे यांच्याकडे होता आणि तो एटीएस प्रमुख परमबीर सिंह यांनी काढून घेतला आणि आपल्याजवळ ठेवला.मोबाईल फोन या खटल्याचा सर्वात महत्त्वाचा पुरावा होता. या फोनवरूनच कसाबला पाकिस्तानकडून सूचना मिळत होत्या. या फोन कॉलमुळे त्याच्या पाकिस्तान आणि भारतातील हस्तकांचे संबंध उघड होऊ शकतात. त्यामुळे या घटनेनंतर काही दिवसांनी मी पुन्हा माळी यांच्याशी बोलून या प्रकरणी आणखी काही तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

232 दिवसांनी अचानक प्रकट झाले परमबीर….

0

मुंबई-232 दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे डीजी होमगार्ड परमबीर सिंह गुरुवारी अचानक मुंबईत प्रकट झाले. त्यांनी प्रथम गुन्हे शाखेचे कार्यालय गाठून डीसीपी नीलोत्पल यांच्यासमोर जबाब नोंदवला. सिंह यांच्याविरुद्ध गोरेगावमध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहे. याप्रकरणी सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते, काही दिवसांपूर्वी त्यांना फरार घोषितही करण्यात आले होते.बुधवारी चंदीगडमध्ये अचानक त्यांचा फोन ऑन झाला होता. तेव्हापासून परमबीर लवकरच मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यापूर्वी परमबीर सिंह यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती.

लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह; पुण्यातील धक्कादायक घटना

0

पुणे-

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेयसीचा खून करून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचा मृतदेह हा दिघीमधील एका लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामधील ३० वर्षीय आरोपी प्रकाश ठोसरने आधी प्रेयसीचा खून करून नंतर आत्महत्या केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून मयत प्रकाश ठोसर आणि ३० वर्षीय विवाहित महिलेचे प्रेमसंबंध होते. ते दोघे दिघी परिसरातील एका लॉजमध्ये नेहमी भेटायचे. हे दोघे अनेकदा रात्री मुक्कामी यायचे आणि सकाळी निघून जायचे असं पोलिसांनी सांगितले आहे.

काल रात्री हे दोघे लॉजवर आले होते. त्यानंतर आज सकाळी चेक आऊट कऱण्याचा वेळ झाला तरी या दोघांनी रूमचा दरवाजा उघडला नसल्याचं तेथील कामगाराने दरवाजा ठोठावला. मात्र, बऱ्याच वेळानंतर देखील ते दरवाजा उघडत नसल्याने याची माहिती दिघी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लॉजवर येऊन दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केला तेव्हा प्रकाशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर खाली जमीनीवर ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे दोघांच्याही शरीरावर कपडे नव्हते.

प्रथमदर्शनी प्रकाशने विवाहित प्रेयसीचा खून करून आत्महत्या केली असल्याचा अंदाज दिघी पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत. 

नागरिक दुरुस्ती कायद्याचे (CAA) ओड़िआ भाषेमध्ये अनुवादित पुस्तिकांचे अनावरण

0

भाजप मुंबई अध्यक्ष यांच्या हस्ते पुस्तिकांचे अनावरण

मुंबई-भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात आला. पण या कायद्याची अपुरी महिती घेत अनेक संभ्रम निर्माण करत भारतात अशांतता पसरवण्यात आली. या कायद्या संदर्भात अपप्रचार थांबवण्याकरीता नागरिकत्व दुरुस्ती कायदा नेमका काय आहे. हे ओडिया समाजाला कळावा याकरीता मुंबई ओड़िया सेलचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत पाढ़ी जी यांनी या कायद्याचे ओडिया भाषेत भाषांतर केले आहे.या पुस्तिकाचे अनावरण भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते दादर येथील वसंत स्मृती मुंबई भाजपा कार्यालयात करण्यात आले. यावेळी मुंबई ओड़िया सेलचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत पाढ़ी, सरचिटणीस श्री. सूरज चौधरी, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष सौ.पुष्पांजली पात्रो, विजय प्रहरराज, सुधाकर चंद तसेच पदाधिकारी, कार्यक्रर्ते उपस्थित होते.

भारतीय सैन्यदल, पोलीस, अग्निशमन दल व पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत

0

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे घोषणा ; केजी ते पदव्युत्तर शिक्षणात सवलत लागू

पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या वतीने भारतीय सैन्य दल, पोलीस दल, अग्निशमन दल आणि पत्रकार यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. केजी ते पदव्युत्तर शिक्षणात सर्वच इयत्तांमध्ये ही सवलत देण्यात येणार आहे. कोविड काळात आणि त्याव्यतिरीक्त देखील इतर काळात केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने ही सवलत देण्यात येत आहे. इन्स्टिट्यूटला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देखील सर्व शाखांमध्ये ही सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती जाधवर ग्रुप आफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.

प्लेग्रुप ते दहावीपर्यंत शाळा, आर्ट्स कॉमर्स सायन्स जुनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, इंजिनियरिंग डिग्री डिप्लोमा कॉलेज, बी.एड अँड डी. एड कॉलेज, एमबीए मॅनेजमेंट कॉलेज, नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेज आदींच्या शाखेमध्ये ५०% सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे मानाजी नगर न-हे धायरी येथे दोन आणि वडगाव बुद्रुक, आंबेगाव, भोर, उस्मानाबाद असे एकूण सहा कॅम्पस आहेत.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, भारतीय सैन्य दल, पोलीस दल, अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकार हे आपल्या कामाच्या माध्यमातून समाजसेवाच करीत असतात. देशाचे रक्षण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे रक्षण करून त्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम यांच्यामार्फत होत असते. त्यामुळे त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी स्विकारत त्यांना सर्व प्रकारच्या शिक्षण ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच हॉस्टेल शुल्कात देखील ही सवलत देण्यात येणार आहे. तरी या सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणा-यांनी ९०७५३४४२७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशी

0

मुंबई, दि 25 : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

0

मुंबई दि 25: आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्वजण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली  फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रीमंडळास दिली.

कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.

00000

1 डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू!

0

मुंबई, दि. 25 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवीपासून तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत तसेच पीडियाट्रिक टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन सुरक्षितपणे शाळा सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.

टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यातील हा तिसरा टप्पा आहे. या कालावधीत सुरक्षित वातावरणात शिक्षण सुरू राहण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शाळा आणि शिक्षकांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर यापुढेही कोविड-19 संदर्भातील दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. काही विद्यार्थी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येतील, त्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे ही आपली प्राथमिकता असेल, असे त्या म्हणाल्या. याबाबत सातत्याने मार्गदर्शक सूचना करणाऱ्या टास्क फोर्सचेही प्रा.गायकवाड यांनी आभार व्यक्त केले आहेत.

०००००

मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीमध्ये नेमके काय म्हटले?

  1. शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
  2. शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
  3. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
  4. कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
  5. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरू करावेत.
  6. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
  7. संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

कोरोनाचा वेग मंदावला असला तरीही गाफील राहू नका
दरम्यान, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरीही ती सौम्य राहील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच सांगितले. यासोबतच, कोरोना रुग्णांचा वेग मंदावला असला तरीही गाफील राहू नका. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असा सल्ला देखील आरोग्य मंत्र्यांनी दिला.

यशवंतराव चव्‍हाण यांच्या पुण्यतिथी दिनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आदरांजली

0

पुणे-

महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्‍हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष रमेश बागवे व ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्‍हाण यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास काँग्रेस भवन येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

     यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतरावजी चव्‍हाण यांनी आपल्या संघटनात्मक कौशल्याने काँग्रेस पक्षाचे व देशाचे नाव आतंरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी औद्योगिक विकास केला व शेतीपूरक निर्णय घेतले. पुण्यात त्यांनी अनेक उद्योगपतींना आपले कारखाने स्थापन करण्यास सांगितले. त्यामुळे भारत फोर्ज बी.जी. शिर्के व पिंपरी चिंचवडमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले कारखाने स्थापन करून स्थानिक लोकांना रोजगार दिले. १९६९ च्या अखिल भारतीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनामध्ये ते म्हणाले की, मी मावळत्या सूर्याला नमस्कार करून सांगू इच्छितो की, महाराष्ट्र हा विचारांची पूजा असलेले राज्य आहे. त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती झाली. केंद्रात त्यांनी उपपंतप्रधान, गृह, अर्थ व संरक्षण खाते सांभाळले. १९६५ ला पाकिस्तान विरूध्द भारताचे युध्द झाले त्यावेळी त्यांनी सीमेवर जाऊन जवानांना भेटून त्यांचे मनोधैर्य वाढविले. अशा या थोर स्वातंत्र्य सेनानीस त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.’’

     यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचीही भाषणे झाली.

     यावेळी कमल व्‍यवहारे, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, सोनाली मारणे, जयंत किराड, बाळासाहेब अमराळे, प्रकाश पवार, प्रविण करपे, अनुप बेगी, सुरेश कांबळे, गोरख पळसकर, योगेश भोकरे, गणेश शेडगे, सेल्वराज ॲन्थोनी, विठ्ठल गायकवाड, कान्होजी जेधे, राधिका मखामले, कल्पना उनवणे, शारदा वीर, ज्योती परदेशी, अविनाश अडसूळ, दिलीप लोळगे, ॲड.सुरेश बोराटे,  आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रचारासाठी पालिकेच्या पैशांची उधळपट्टी-आयुक्तांनी खरेदी थांबवावी; कॉंग्रेसचा इशारा

0

पुणे – महापालिकेच्या खर्चातून कचऱ्यासाठीच्या पिशव्या, बकेट, बाकडी, ढकलगाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, हा निर्णय म्हणजे नगरसेवकांच्या निवडणूक प्रचारासाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याने या वस्तूंची खरेदी आयुक्तांनी थांबवावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र किराड व संजय बालगुडे यांनी दिला आहे.

     महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन त्यात बकेट, पिशव्या आणि ढकलगाडी यांचा वापर नगरसेवक प्रचारासाठी करतील असे नमुद करण्यात आले आहे. याकरिता, या वस्तूंची खरेदी तूर्त थांबवावी. निवडणुकीनंतर महापालिकेच्या अंदाजपत्रकात रितसर तरतूद करुन या वस्तूंची खरेदी केली जावी आणि मार्च महिन्यात त्यांचे वाटप करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

     वस्तू खरेदी करुन त्यावर नगरसेवक आपापली नावे लिहून त्या वस्तूंचे वाटप करतात हा प्रचाराचाच एक भाग होईल. अवघ्या चार महिन्यांत निवडणुका होणार असल्याने नागरिकांकडून कररुपाने मिळालेल्या पैशातून सुमारे १६ कोटी रुपयांची उधळपट्टी होईल हे गैर आहे. आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अनागोंदी आळा घालावा. शिवाय, बदललेल्या प्रभाग रचना लक्षात घेऊन वस्तुंचे वाटप होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातूनही गोंधळ उडेल, नगरसेवकांसाठी असलेल्या निधीतून ढकलगाडी खरेदी करण्यास सक्त विरोध राहील. ढकला गाड्यांवरही नगरसेवकांची नावे लिहून प्रचार साधला जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

     आयुक्तांनी विशेष अधिकार वापरुन ही खरेदी थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

कितीही चौकशा लावा आम्ही घाबरत नाही, केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करतेय! शरद पवार

0

सातारा -ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार नाही तिथे केंद्र सरकार ईडी, सीबीआय अशा विविध केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे काम करत आहे. केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असून, त्याद्वारे स्थानिक सरकारचा उपमर्द करण्याचे काम सुरू आहे. पण त्यांना किती चौकशा लावायच्या त्या लावू द्या, अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र केले आहे.

महाबळेश्वर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केले. पुढे ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल. तसेच पुढील निवडणुकीत सर्व जर एकत्र लढले, तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येईल. असे स्पष्ट इशारा पवारांनी भाजपला दिला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे नेहमी राज्यातील तीन पक्षाचे असलेल्या महाविकास आघाडीवर नेहमी टीका करत असतात. त्यावर देखील पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, चंद्रकात पाटील म्हणतात की, हे सरकार दोन दिवसात पडेल. नंतर ते दोन महिन्यात पडेल, तर नंतर हे सरकार एक वर्षात पडेल अशी भविष्यवाणी चंद्रकात पाटील नेहमी वर्तवत असतात, असे सांगतानाच ते जर ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल. असा टोला देखील पवारांनी चंद्रकात पाटलांना लगावला आहे.

अव्वल राहण्याच्या शर्यतीत आपण मानवी समस्यांकडे डोळेझाक करत आहोत: महादेवन

0

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 (शरद लोणकर )-

‘बिटरस्वीट’ सुगुणा आणि तिच्या सहकारी महिला ऊसतोडणी मजुरांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कष्टांची कथा आहे. या महिला अशा परिस्थितीत अडकल्या आहेत की त्या ती टाळू शकत नाहीत, त्यातून त्या सुटू शकत नाहीत.

“ही भारताच्या साखर निर्मिती मागच्या वेदनांची कथा आहे. आपण जी साखर वापरतो ती खऱ्या आयुष्यात किती कडू असू शकते, हे या कथेतून कळते” असे चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी सांगितले. आज गोव्यात 52 व्या इफ्फीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रातील बीडमधल्या गावातील महिला ऊसतोडणी मजुरांची वेदना महादेवन यांनी यावेळी मांडली. ब्राझीलला मागे टाकत ऊस निर्यातीत भारताचा क्रमांक एक बनवण्याच्या शर्यतीत, रोजची भाजीभाकरी मिळवण्याच्या संघर्षापायी महिला ऊसतोडणी मजुरांना अनेक भयानक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

“ऊसतोडणीचा कालावधी वर्षातील फक्त सहा महिने असतो आणि त्यांना उर्वरित वर्ष तोडणीच्या काळात मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर जगावे लागते. त्यामुळे महिला मजुरांना एक दिवसही सुट्टी घेणे परवडत नाही. परंतु दुर्दैवाने मासिक पाळीमुळे त्यांना दर महिन्याला 3 ते 4 दिवस गमवावे लागतात. हे नुकसान टाळण्यासाठी, बीड गावात सुमारे 10 वर्षांपूर्वी एक विचित्र प्रथा सुरू झाली,” महादेवन सांगत होते.

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या भागांतून स्थलांतरित झालेले भोंदू आणि पात्रता नसलेले स्त्रीरोगतज्ज्ञ बीडमध्ये आले आणि पैसे कमावण्यासाठी या महिलांना ‘हिस्टेरेक्टॉमी’ची – गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊ लागले. महिलांना हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले की त्यांच्या सर्व समस्यांपासून त्यांची सुटका होईल, जसे की मासिक पाळीत दर महिन्याला होणाऱ्या वेदना, त्या दिवसांत वेतन कमी होणे आणि गर्भाशयातील गाठींची संभाव्य वाढ आणि इतर वैद्यकीय समस्या, यापासून त्यांची सुटका होऊ शकते.

“या भयंकर प्रथेचा परिणाम म्हणून आज चित्रपटातील नायिकेसारख्या तरुण मुलींवर या शस्त्रक्रिया होत आहे. जगण्यासाठी माणसाला कुठल्या थराचा संघर्ष करावा लागतो, त्याची ही कथा आहे. जैविक चक्रच अनैसर्गिकरित्या बदलून टाकण्याची ही कथा पूर्णपणे हादरवून टाकते”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या हृदयद्रावक घटनांवर सरकार आणि नागरी समाजाच्या प्रतिसादाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की एका आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थेने महाराष्ट्रातील काही स्वयंसेवी संस्था आणि कायदा करणाऱ्यांसमोर त्यांच्या टीमची मुलाखत घेतली. परंतु बलाढ्य साखर सम्राटांच्या ताकदीपुढे त्यांनी यावर काही करावेसे वाटत असतानाही असहायता व्यक्त केली.

“चित्रपटात आम्ही दाखवले आहे की एक सरकारी अधिकारी समस्यांची चौकशी करत आहे, परंतु उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने या क्षेत्रातील रोजगार गमावण्याच्या भीतीने कोणतीही महिला पुढे येत नाही. स्वेच्छेने त्या हे करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भयावह सत्यामुळे कायदे करणारे आणि सामाजिक कार्यकर्ते हा मुद्दा हाताळण्यात हतबल ठरतात. प्रभावी साखरसाम्राट हादेखील एक अडथळा आहे”,  महादेवन म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देत ​​असताना, आपण नेहमीच मानवी पैलू जपले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात अव्वल होण्याच्या शर्यतीत, आम्ही मानवी समस्यांकडे दुर्लक्ष करत आहोत.”

एका अग्रगण्य दैनिकात ‘बीड, गर्भ नसलेल्या स्त्रियांचे गाव’ या शीर्षकाची बातमी वाचली. त्यापासून या चित्रपटासाठी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील इफफी 52 मध्ये पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या माध्यम संवादाला चित्रपटाचे निर्माते सुचंदा चॅटर्जी आणि शुभा शेट्टीदेखील उपस्थित होते.

चित्रपटाबद्दल:

22 वर्षीय सगुणा अनेक ऊसतोडणी मजुरांसोबत बीडमधील उसाच्या शेतात काम करण्यासाठी येते. कठोर परिश्रम करण्याचा आणि वडिलांचे कर्ज फेडण्यास मदत करण्याचा तिचा निर्धार आहे. मासिक पाळीच्या कारणास्तव ती तीन दिवस काम करत नाही, तेव्हा तिला मोठा दंड आकारला जातो. तिचे काम थांबू नये म्हणून तिला हिस्टरेक्टॉमी करण्याचा सल्लाही दिला जातो. हा नियम सगळ्यांसाठी आहे हे कळल्यावर तिला धक्काच बसतो. ही अशी परिस्थिती आहे की सगुणा आणि तिच्या सहकारी महिला मजूर टाळू शकत नाहीत किंवा त्यातून सुटू शकत नाहीत.

दिग्दर्शकाबद्दल: अनंत नारायण महादेवन हे हिंदी, मराठी, मल्याळम आणि तमिळ चित्रपट आणि टीव्ही शोचे पटकथा लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्या ‘मी सिंधुताई सपकाळ’ (2010) ला अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.

कलाकार-

निर्माता: क्वेस्ट फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड

पटकथा : अनंत नारायण महादेवन
डीओपी: अल्फोन्सो रॉय

संपादन: अनंत नारायण महादेवन, कुश त्रिपाठी

कलाकार: अक्षया गुरव, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे