Home Blog Page 2199

शैक्षणिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांबाबत सविस्तर माहिती व्हावी – शिक्षणमंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड

0

मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच या संविधानातील मूल्य माहिती होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले.

शालेय अभ्यासक्रमात संविधानिक मूल्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ हत्तीअंबिरे हे प्रत्यक्ष तर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, सध्या विद्यार्थ्यांना पहिली पासून मूल्यवर्धन अभ्यासक्रमांतर्गत विविध उपक्रमांद्वारे संविधानिक मूल्य शिकविली जातात. तथापि विद्यार्थ्यांना संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये, स्वातंत्र्य, एकता, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांसह भारतीय संविधानाची सविस्तर माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी इयत्ता आणि विद्यार्थ्यांचे वय विचारात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुनर्रचित अभ्यासक्रम आराखडा निर्मितीच्या अनुषंगाने अभ्यासक्रमामध्ये याबाबींचा सविस्तर समावेश होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण आयुक्त आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सारासार चर्चा करून तातडीने अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी हा योग्य काळ -अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किशनराव कराड

0

मुंबई, 26 नोव्हेंबर 2021-

भारतीय अर्थव्यवस्था आता वेगाने उसळी घेत आहे, महामारीमुळे थंडावलेल्या व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर आता व्यापारांचा विस्तार होतो आहे आणि देशातून होत असलेली निर्यात आता नवा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. “या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी हाच योग्य काळ आहे” असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किशनराव कराड यांनी व्यक्त केले आहे. भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाने मुंबई येथे आयोजित केलेल्या “निर्यातीसाठीच्या बँकिंग समुदायाच्या बैठकी’त ते आज बोलत होते.

2021-22 या वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यांमध्ये देशातून झालेल्या निर्यातीने 233 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यातीत 54% वाढ झाली आहे अशी माहिती डॉ.कराड यांनी दिली. अभियांत्रिकी आस्थापना, मौल्यवान रत्ने आणि जवाहीर, रसायने, औषधे, वस्त्रोद्योग आणि कृषी उत्पादनांचा या निर्यातीत मोठा वाटा आहे.

निर्यात प्रक्रियेत बँकांची भूमिका महत्त्वाची

“निर्यात प्रक्रियेत बँकांची भूमिका महत्त्वाची आहे” असे सांगून केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाले, “आपल्या देशातील बँका निर्यातदारांना मदत करण्यासाठी सदैव तयार आहेत.”

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँका, खासगी क्षेत्रातील 22 बँका, 46 परदेशी बँका, 56 प्रादेशिक ग्रामीण बँका, 1485 नागरी सहकारी बँका आणि 96,000 ग्रामीण सहकारी बँकांच्या मजबूत जाळ्यामुळे देशातील बँकिंग व्यवस्थेच्या चित्रात लक्षणीय सुधारणा झाली आहे अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. सरकारच्या महत्त्वाच्या योजना राबविण्यात बँकांनी फार महत्त्वाची भूमिका पार पडली आहे असे ते म्हणाले. “विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक समावेशन, डिजिटल कर्जपुरवठा आणि आर्थिक नेतृत्व यामध्ये उल्लेखनीय भूमिका निभावली,” असे डॉ.कराड यांनी सांगितले.

सरकारच्या आर्थिक विभागांनी घेतलेले निर्णय,  वेगवान प्रकल्प अंमलबजावणी, पायाभूत सुविधांवरील अधिक खर्च आणि आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान यामुळे बँकिंग क्षेत्राची वेगाने वाढ होत आहे याची त्यांनी नोंद घेतली.

केंद्र सरकारची निर्यात-केन्द्री धोरणे

“केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन  योजनेने महामारीच्या काळात निर्यातीत वाढ करण्यात मोठे योगदान दिले असे मला वाटते,” केंद्रीय मंत्री म्हणाले.

डॉ.कराड पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने जाहीर केलेली, आपत्कालीन कर्जरेखा हमी योजना (ECLGS)  विविध उद्योगांसाठी महत्त्वाची ठरली आहे. “उद्योजकांनी केलेल्या मागणीला मान देऊन महामारीमुळे झालेल्या प्रतिकूल परिणामांवर मात करण्यात मदत व्हावी म्हणून सरकारने 4.5 लाख कोटी रुपयांची आपत्कालीन कर्जरेखा हमी योजना (ECLGS)  31 मार्च, 2022 पर्यंत सुरु ठेवण्यास मंजुरी दिली आहे. यातील 2.9 लाख कोटी रुपयांचा निधी विविध बँकांनी मंजूर केला आहे.” अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ.कराड यांनी दिली.

त्यांनी निर्यातदारांना आठवण करून दिली की, 6 ऑगस्ट 2021 रोजी निर्यात प्रोत्साहन परिषद आणि चेंबर्स ऑफ कॉमर्सला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की निर्यातदारांनी आपल्या अर्थव्यवस्थेचे इंजिन बनले पाहिजे.  हे नमूद करत डॉ. कराड म्हणाले, “आपण  एकत्र बसून निर्यातदारांचे प्रश्न सोडवू”. निर्यात प्रोत्साहन परिषदा , बँका आणि इतर संबंधितांसोबत जानेवारी महिन्यात एक  संयुक्त बैठक घेवून  या प्रश्नावर चर्चा केली  जाईल, असे त्यांनी सांगितले. भारतीय निर्यात संघटना महासंघाचे प्रादेशिक अध्यक्ष  नंदकिशोर कागलीवाल म्हणाले, “भारतात आपल्याकडे  तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात निर्यातीसाठी अपार क्षमता असून सामान्य कर्ज पुरवठा असलेली परिसंस्था आवश्यक  आहे ”.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये युको बँकेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय बँकिंग संघटनेचे  अध्यक्ष अतुल कुमार गोयल, कॅनरा बँकेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एल व्ही  प्रभाकर, बँक ऑफ बडोदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक  संजीव चढ्ढा, ईसीजीसी लि .  चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम सेंथिलनाथन, एफईडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी सिंधवानी ,  रिझर्व्ह बँकेच्या परकीय चलन विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. एस. अमर यांचा समावेश होता. एम एस एम ई क्षेत्रातील  आणि अन्य असे १५० हून अधिक निर्यातदार या परिषदेला उपस्थित होते

27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम घोषित-प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील

0

पुणे, दि. 26 : राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला. या टप्प्यात 27 हजार  138 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

            प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोविड-19 परिस्थितीमुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. शासनाने या निवडणुकांवरील स्थगिती उठवून या निवडणूका 1 सप्टेंबरपासून घेण्याबाबत शासन निर्णय जारी केला. त्यानुसार प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण एकूण 45 हजार 409 सहकारी संस्थांचा 6 टप्प्यांचा समावेश असलेला ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला आहे. प्राधिकरणाने सप्टेंबरपासून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे 4 हजार 362 व 12 हजार 729 अशा एकूण 17 हजार 91 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत.

            आता तिसऱ्या टप्प्यात 27 हजार 138 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केलेले असून त्यामध्ये 18 हजार 310 कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा तर उर्वरित 8 हजार 828 सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाने, इतर पतसंस्था, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दुग्ध संस्था आदींचा समावेश आहे.

            प्राधिकरणाने राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी 16 बँकाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तर शासनाने नाशिक, नागपूर, सोलापूर, बुलढाणा आणि उस्मानाबाद अशा पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूका निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर पुढे ढकललेल्या आहेत. रायगड तसेच जालना या दोन 2022 या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने अद्याप सुरू केलेल्या नाहीत.

            गोंदीया, भंडारा, चंद्रपूर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तर वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसंदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश पारीत केलेले आहेत. याशिवाय पुणे, मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूकीची बाब न्यायप्रविष्ठ असून त्यात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

            कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकींच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल होत्या. या अनुषंगाने न्यायालयाने कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यापूर्वी राज्यातील निवडणूकीस पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूका तातडीने घ्याव्यात असे आदेश 18 नोव्हेंबर 2021 रोजी दिले. त्यानुसार आता प्राधिकरणाने निवडणूकीस पात्र 266 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सुरु केलेली निवडणूक प्रक्रिया रद्द केली असून तिसऱ्या टप्प्यात 27 हजार 138 सहकारी संस्थांची निवडणूक प्रकिया घोषित केली आहे.

            या संस्थांच्या निवडणूका घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असल्यामुळे शासनाच्या इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आहेत. या संस्थांच्या निवडणूका मुदतीत पार पाडण्याच्यादृष्टीने निवडणूकीस पात्र संस्थांनी प्रारुप मतदार यादी व आवश्यक निवडणूक निधी संबंधीत जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

            महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकांचे संचलन, अधीक्षण व निर्देशन करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपवलेली आहे. यामध्ये 250 व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था वगळण्यात आलेल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा

0
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने संविधान शिल्पकारांना मानवंदना.
  • संविधानात एकात्मतेचा अखंड जागर

मुंबई :- “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहोत. याच कारणामुळे यंदाचा “संविधान दिन” आणखी औचित्यपूर्ण, विशेष महत्त्वाचा आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर हा दिन साजरा करताना जगातील एक सार्वभौम आणि बलशाली प्रजासत्ताकाची निर्मिती करताना ‘नागरिक’ केंद्रबिंदू मानून, त्यांच्या अधिकार-हक्काला, हिताला संविधानात सर्वोच्च स्थान देण्यासाठी आपले ज्ञान, विद्वत्ता पणाला लावण्याचे अपूर्व योगदान देणाऱ्या संविधानाच्या शिल्पकारांना या निमित्ताने मानवंदना देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार महाराष्ट्र सुपुत्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह घटना समितीच्या सदस्यांना अभिवादन करतानाच मुख्यमंत्री श्री. ठाकरे संदेशात म्हणतात, भारतीय संविधान जगात मार्गदर्शक असे मानले जाते. संविधानाची उद्देशिका स्वयंस्पष्ट आहे. नागरिकांना हक्क बहाल करतानाच, त्यांना अधिकारांची जाण- त्यांचे भान राहील असा समतोल आपल्या संविधानात आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यातून राष्ट्रीय एकात्मता या मुल्यांचा अखंड जागर करणारे हे संविधान भारतीय नागरिकांनी आजच्या दिवशी स्वतः ला समर्पित केले आहे. त्याच आधारावर आपली आतापर्यंतची  सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचाल सुरू झाली आहे, ती आणखी लोकाभिमुख व्हावी. विकासाचे प्रत्येक पाऊल, योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचावी यासाठी आपण कटीबद्ध होऊया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, त्याची अमृत फळं सर्वच जनमानसाला चाखायला मिळावित यासाठी संविधानातील मार्गदर्शक तत्वांबाबत जागरूक राहुया. त्यांचा अंगिकार करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील वीर शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

0

मुंबई :- मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना प्रकट करून वीर शहीदांसह तसेच हा हल्ला परतवून लावण्यासाठी निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबईवरील हल्ला हा दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता, अशी निर्भत्सनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुंबईवरील हल्ला हा भारताच्या आर्थिक राजधानीवरील हल्ला होता. देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न मुंबईकरांनी उधळून लावला. त्यामध्ये मुंबई पोलीसांनी शौर्याची परिसीमा गाठली. केवळ मराठीच नव्हे तर, संबंध भारतीय मनोधैर्य एकवटले. वीर जवान तुकाराम ओंबळे यांनी निशस्त्र असतानाही क्रूरकर्मा दहशतवाद्याला जेरबंद करण्यासाठी बलिदान पत्करले. पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी गोळ्या झेलून, अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या शौर्य, धैर्य आणि समर्पणासमोर नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भ्याड हल्ल्यांना भीक न घालण्याची, आव्हानांवर मात करण्याचे मनोधैर्य आणखी उंचावेल ते  पुढच्या पिढ्यांमध्ये विकसित व्हावे यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया. हेच या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आणि निष्पाप बळींना अभिवादन ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उत्तम आरोग्य सेवेसाठी समिती प्रयत्नशील – आदिती तटकरे

0

मुंबई, दि. 25 :  तदर्थ संयुक्त समितीच्या सूचनेनुसार धर्मादाय खाजगी रूग्णालयांमध्ये समिती सदस्यांची नावे, उपलब्ध बेडसंख्या, योजनेची माहिती रुग्णालयांच्या प्रवेशद्वारी दर्शनी भागात लावण्यात आली आहे. यामुळे योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रूग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होत आहे. जास्तीत-जास्त गरीब रूग्णांना वैद्यकीय सहाय्य मिळण्याच्या दृष्टीने समिती सकारात्मक कार्यवाही करीत असल्याचे विधि व न्याय राज्यमंत्री तथा समिती प्रमुख कु. आदिती तटकरे यांनी सांगितले.

या बैठकीस आमदार ॲड.अशोक पवार, आमदार बालाजी किणीकर, आमदार अजय चौधरी, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजू पारवे, आमदार राहूल कुल, आमदार अबू आझमी आदी समिती सदस्य तसेच विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे, सह धर्मादाय आयुक्त आर.यू. मालवणकर, सह धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई नि. सु. पवार, धर्मादाय उपायुक्त एस.एन. रोकडे, सह संचालक आरोग्य सेवा मुंबई डॉ. उल्हास मारुलकर आदी यावेळी उपस्थित होते.

धर्मादाय खाजगी रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दृबल घटकांना वैद्यकीय सेवा देण्याबाबत तपासणी करण्यासंदर्भात तदर्थ समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. याबैठकीत समितीच्या प्रमुख राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी कामाचा आढावा घेतला.

उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार धर्मादाय खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी त्या रुग्णालयास मिळणाऱ्या दरमहा एकूण मिळकतीच्या 2 टक्के रक्कम निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयास या समिती सदस्यांमार्फत वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. त्यानुसार या योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांनी पात्र रुग्णांस आरोग्य सेवा दिल्याचा तपशिलवार अहवाल, रुग्णालयाचा लेखापरिक्षण अहवाल समितीस वेळोवेळी सादर करणे, रुग्णालयातील मेडीकल तथा बाह्य रुग्ण विभागामार्फत होणारे उत्पन्न रुग्णालयाच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट असणे, समितीच्या विविध मागण्या व आवश्यकतांनुसार आरोग्य मंत्री यांचेसमवेत समितीची बैठक आयोजित करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी उपस्थित समिती सदस्यांनी धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड व रेशन कार्ड याखेरीज अन्य प्रकारे उत्पन्नाची पडताळणी करण्यात येत असल्याबाबत माहिती बैठकीत समोर मांडली. योजनेंतर्गत खर्च केलेली रक्कम व शिल्लक रक्कम, पात्र उमेदवारांना सहज या योजनेंतर्गत आरोग्य सुविधा मिळाव्या. त्यासाठी समितीसदस्यांनी या रुग्णालयांना भेटी देणे आदी सूक्ष्म नियोजनातून जास्तीत- जास्त रुग्णांना याचा लाभ देण्यासाठी धर्मादाय कार्यालयामार्फत रुग्णालयांना सूचित करण्यात यावे, असे मत मांडले.

धर्मादाय अंतर्गत गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागीय स्तरावर समितीची स्थापना करण्यात यावी. त्या समितीमध्ये समन्वयासाठी अनुभवी डॉक्टरांचा समावेश असावा. तसेच  सरकारी रुग्णालयांनी या योजनेंतर्गत वैद्यकीय सेवा देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव समितीमार्फत देण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्री यांच्या समवेत समितीच्या विविध विषयांवर आधारित बैठकीचे आयोजन करण्यात लवकरच करण्यात येईल, असे विधि व न्याय राज्यमंत्री तथा  समितीप्रमुख कु. तटकरे म्हणाल्या.

ठाकरे सरकार घरात लपले, तेव्हा कोरोनाच्या कडेलोटातून केंद्राने सावरले!माधव भांडारी यांची टीका

  • महाराष्ट्रातील कोरोना अपयशाचा भाजपकडून पंचनामा

पुणे-जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने कोरोनाकाळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि  ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटल्याने कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रसिद्धी प्रमुख संजय मयेकर,शहर सहप्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

कोरोना साह्य निधीच्या नावाने लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले, मात्र त्यापैकी जेमतेम २५ टक्के निधीचाच विनियोग केल्याची कबुली सरकारनेच दिली आहे. उर्वरित सहाशे कोटींचा निधी वापराविना पडून आहे, आणि कोरोनाचा फटका बसलेली जनता मात्र, आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त आहे. ऊठसूठ पीएम केअर फंडावर डोळा ठेवून मदतीची याचना करणाऱ्या ठाकरे सरकारने हा पैसा दडवून कशासाठी ठेवला याची लोकायुक्तामार्फत चौकशी व्हावी , अशी मागणीही त्यांनी केली .

कोरोनाकाळात तर मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जोरदार स्पर्धाच सुरू होती. भ्रष्ट कारभारामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यू, सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वाधिक संसर्गदर आणि सर्वाधिक लुबाडणूक झाली व हजारो लोकांना नाहक प्राण गमवावे लागले. केंद्र सरकारकडून वेळोवेळी कानपिचक्या मिळूनही भ्रष्टाचार सुरूच राहिल्याने महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली व सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्याने मात्र संधीची चांदी करून घेतली. प्रत्येक अपयशावर पांघरुण घालत केंद्र सरकारकडे बोटे दाखविणाऱ्या ठाकरे सरकारला या काळात गरीबांसाठी मिळालेली मदतही लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यात अपयश आल्यामुळे असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली, असा आरोप श्री.भांडारी यांनी केला. कोविडकाळात मंत्रालयातून पळ काढून घरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडून संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली. या अपयशास ‘मी जबाबदार’ असे नागरिकांकडून वदवून घेताना, स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षितता सांभाळत ‘माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी’, असा बेजबाबदार बाणाही दाखविला, असा टोला माधव भांडारी यांनी मारला.

मृतदेह गुंडाळण्याच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भ्रष्टाचार, पीपीई किटमध्ये भ्रष्टाचार, व्हेंटिलेटर्स आणि रेमडेसीवीरसारख्या औषधांचा काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा, लस वाटपातील वशिलेबाजी व साठेबाजी, दर्जेदार आरोग्य सुविधांचा अभाव, कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला होता, तेव्हा मुख्यमंत्री मात्र  घरात लपून बसले होते. केंद्र सरकारने महाराष्ट्राला गव्हासाठी पावणेदोन हजार कोटी, तांदळासाठी दोन हजार ६२० कोटी, डाळींसाठी १०० कोटी, स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी १२२ कोटी अशी एकूण ४५९२ कोटींची मदत केवळ अन्नधान्यासाठी केली. गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आखली, तसेच राज्यातील ८६ हजारांहून अधिक शेतकरी, विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना थेट मदतीच्या रूपाने तीन हजार ८०० कोटींची रक्कम बँक खात्यांत जमा केली. ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा एक पैसादेखील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही. हा पैसा कुणाच्या खिशात गेला, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी श्री.भांडारी यांनी केली. केंद्राकडून मिळणारी मदत लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यातही ठाकरे सरकारला अपयश आल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली. आपत्ती निवारण निधीतून केंद्राने दिलेल्या दोन हजार कोटींच्या निधीतून कोणत्या उपाययोजना केल्या, याचा हिशेब जनतेस द्या, असे आव्हानही त्यांनी दिले.

कोरोनाकाळात जेव्हा महाराष्ट्रातील जनता आर्थिक संकटामुळे हतबल झाली होती, तेव्हा ठाकरे सरकारचे मंत्री मात्र भ्रष्टाचार आणि खंडणी वसुलीतून कोट्यवधींचा मलिदा उकळत होते. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच जनतेकडे दुर्लक्ष होऊन हजारो मृत्यू ओढवल्याने या अपयशाची जबाबदारी घेऊन दोन वर्षांच्या कारभाराची काळी पत्रिका जारी करावी अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र, गुजरात तसेच दिल्लीत प्राप्तीकर विभागाची धाडसत्रे

0

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

एका शेजारी देशांद्वारे नियंत्रित काही भारतीय कंपन्या आणि त्यांच्या सहयोगी घटकांवर प्राप्तीकर विभागाने 16.11.2021 रोजी धाडी घालत जप्तीची कारवाई केली आहे.

या कंपन्या रसायने, बॉल बेअरिंग्ज, यंत्राचे सुटे भाग आणि इंजेक्शन मोल्डिंग यंत्रणा या व्यवसायात  आहेत. मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद, गांधीधाम तसेच दिल्लीमधील सुमारे 20 ठिकाणी ही धाडसत्रे घालण्यात आली.

या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी कमाई केल्याचे डिजिटल डेटाच्या रूपातले पुरावे सापडले आहेत. ते जप्त केले आहेत.

या कंपन्या हिशेबाच्या  पुस्तकांमध्ये फेरफार करून करचोरी करत असल्याचे आढळून आले आहे. या कंपन्यांनी बोगस कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करून एका शेजारील देशात निधी हस्तांतरित केल्याचे पुराव्यातून समोर आले आहे. वरील कार्यपद्धतीद्वारे मागील 2 वर्षात अंदाजे 20 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. मुंबईतील एका व्यावसायिक कंपनीने या बोगस कंपन्यांच्या निर्मितीमध्ये केवळ मदतच केली नाही तर यांनी त्यांना बनावट संचालकही पुरवल्याचे तपासात समोर आले आहे.

तपासात असेही दिसून आले आहे की हे बोगस संचालक एकतर व्यावसायिक कंपनीचे कर्मचारी/वाहनचालक होते किंवा ते कोणत्याही अर्थाने कंपनीशी संबंधित नव्हते. चौकशी केली असता, त्यांनी मान्य केले की, या कंपन्यांच्या कारभाराची आपल्याला माहिती नव्हती आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कागदपत्रांवर ते स्वाक्षऱ्या करत होते. बँकिंग व्यवहार आणि इतर नियामक आवश्यकतांसाठी त्यांचे पत्ते प्रदान करून परदेशी नागरिकांना मदत करण्यासाठीही व्यावसायिक कंपनीने भूमिका बजावली आहे.

रसायनांचा व्यापार करणाऱ्या अशा कंपन्यांपैकी एकीने कमी कर असलेल्या मार्शल बेटाद्वारे खरेदीचा दावा केल्याचे आढळून आले. कंपनीने प्रत्यक्षात शेजारच्या  देशातील कंपनीकडून 56 कोटी रुपयांची खरेदी केली पण मार्शल बेटाकडूनही तेच बिल दाखवले आहे. तथापि, अशा खरेदीचे पैसे शेजारच्या देशात असलेल्या मार्शल बेट-आधारित कंपनीच्या बँक खात्यात वर्ग केले गेले आहेत. या भारतीय कंपनीचे कर दायित्व कमी करण्यासाठी खोटी खरेदी बिले घेण्यात आणि भारतातील जमीन खरेदीसाठी बेहिशेबी रोकड देखील देण्यात आल्याचे शोध प्रक्रियेदरम्यान पुढे उघड झाले.

झडतीच्या कारवाईत यापूर्वीच सुमारे 66 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. काही कंपन्यांची बँक खाती, एकूण बँक शिलकी सुमारे रु. 28 कोटी, गोठवण्यात आले आहेत.

पुढील तपास सुरू आहे.

महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सीताराम नरके यांची निवड

0

राज्यस्तरीय चौदावे संमेलन २७ नोव्हेंबरला खानवडीला होणार

सासवड, दि. 25 खानवडी (ता.पुरंदर) येथे होणा-या चौदाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाँ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजिंक्यभैय्या टेकवडे असून निमंत्रक सुनीलतात्या धिवार आहेत.

श्री नरके हे साहित्य क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत असून पोलिस खात्यात नोकरी करुन साहित्यात वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे. संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, विजयराव कोलते, सुदामअप्पा इंगळे, दत्ताशेठ झुरुंगे. डाँ दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात ग्रंथपूजन, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

सकाळी १० वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २ वा. समाजसुधारक महात्मा फुले या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक गुलाबराव वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, योगिता कोकरे, डाँ जगदीश शेवते, डाँ बळवंत भोयर सहभागी होणार आहेत. सायंकाळी चार वाजता कवी बाळासाहेब गिरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगणार आहे. कवी जगदीप वनशीव, सुनिता निकम सुत्रसंचलन करणार आहेत. यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा.म.देशमुख, म.भा.चव्हाण, प्रा.गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ सय्यद जब्बार पटेल, डाँ जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, रावसाहेब पवार यांनी भुषविले आहे. संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले करीत आहेत.

उत्तराखंडातील गावामध्ये स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या प्रेम आणि मैत्रीची एक कहाणी म्हणजेच ‘सुनपट’ हा चित्रपट : दिग्दर्शक राहुल रावत

0

पणजी, 25 नोव्‍हेंबर 2021 

आसपासचे लोक जेव्हा आपल्याला सोडून दूर जातात तेव्हा केवळ आपल्यालाच नव्हे तर आणि निसर्ग आणि डोंगरदऱ्यांनाही जो एकटेपणा वाटतो, त्यालाच ‘सुनपट’ असे म्हणतात. उत्सव किंवा जत्रा संपल्यावर रिकाम्या मैदानाकडे पाहून जी पोकळी जाणवते, ती म्हणजेच ‘सुनपट’.  उत्तराखंडातील गावागावांतून माणसं जेव्हा नोकरीच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतरीत झाली , तेव्हा त्या गावांत  हाच एकटेपणा आणि पोकळी जाणवू लागली, याचेच चित्रण दिग्दर्शक राहुल रावत यांनी आपल्या गढवाली  चित्रपट ‘सुनपट’ मध्ये केले आहे. 

उत्तराखंडातील गावांमध्ये पुरेशा रोजगाराच्या संधी नसल्यामुळे  गेल्या अनेक वर्षांपासून माणसे गावे सोडून शहरांकडे धावत आहेत. याच्या मागे अनेक सामाजिक आर्थिक कारणे असतात. मोठ्या प्रमाणावर झालेल्या अशा स्थलांतरामुळे तिथली सुमारे 1500 गावे  ओसाड पडली आहेत, तर  4000 गावांमधून हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढीच माणसे शिल्लक उरली आहेत. यामुळे तिथली संस्कृती, परंपरा आणि समाज आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. माझ्या राज्यात स्थलांतरामुळे काय अनर्थ होत आहे, हे या गोष्टीच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचे होते.” असे रावत म्हणाले. 

हा चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल रावत यांनी सांगितले, की  उत्तराखंडात फिरताना  प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींकडूनच त्यांना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली होती. कलाकारांची निवड झाल्यापासून 20 दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. 

या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक वीरू सिंग बाघेल यांनी चित्रीकरणाबद्दल आपले अनुभव सांगितले. “चित्रीकरणासाठी योग्य प्रकाश आवश्यक होता , त्यासाठी आम्ही सर्वजण सकाळी लवकर उठून चित्रीकरणासाठी बाहेर पडत असू . पहाडांमध्ये योग्य प्रकाश नेहमीच हुलकावणी देत असे, त्यामुळे आम्हाला एका  पहाडावरून दुसऱ्या पहाडावर धावत पळत पोचावे लागत होते. कलाकार आणि तंत्रज्ञ हे सर्वच जण उपकरणे वाहून नेण्यास मदत करत असत. या पूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण फक्त २ एल इ डी दिव्यांच्या मदतीने  पार पडलं आहे. हा एक अतिशय अद्भुत अनुभव होता.” 

या चर्चेच्या वेळी चित्रपटाचे सह निर्माते रोहित रावत यांनी माध्यम प्रतिनिधी आणि प्रेक्षकांसमोर आपले या चित्रीकरणाबद्दलचे अनुभव कथन केले. 

‘सुनपट’ या चित्रपटाचे प्रदर्शन 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘भारतीय पॅनोरमा’ तील ‘कथा बाह्य  चित्रपट’ विभागात करण्यात आले . महोत्सवात दाखवला  जाणारा हा उत्तराखंडचा  पहिलाच चित्रपट आहे. 

चित्रपटाबद्दल काही :

भारतीय पॅनोरमा नॉन फिचर फिल्म विभागात दाखवल्या गेलेल्या ‘सुनपट’ या चित्रपटात १२ वर्षांचा अनुज आणि त्याचा मित्र भारतू यांची गोष्ट रंगवली आहे. अनुजला जी मुलगी आवडत असते ती काय प्रतिसाद देते याचा शोध हे दोघे मित्र घेत असतात. त्या मुलीसमोर आपले प्रेम कशा रीतीने व्यक्त करावे याची योजना ते तयार करताना दिसतात. याच्या पार्श्वभूमीला त्यांच्या गावातील भकासपणा आपल्याला दिसत राहतो. अनेक वर्षे चाललेल्या स्थलांतरामुळे गावातील भावनिक दुरावस्था आपल्याला दिसत राहते. अशा निराश वातावरणात फुलत जाणारे प्रेम आणि  या दोन मुलांची मैत्री यांचीच ही गोष्ट आहे. 

दिग्दर्शकाबद्दल काही : 

दिग्दर्शक व निर्माता राहुल रावत यांनी जाहिरातपटाच्या काही प्रथितयश दिग्दर्शकांबरोबर याआधी काम केले आहे. त्यानंतर त्यांनी परसेप्ट पिक्चर्स या कंपनीत लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम केले. नंतर त्यांनी जाहिरातपटांकडून चित्रपट निर्मितीकडे रोख वळवला. चित्रपट हा जनमानसावर अधिक प्रभाव टाकतो , अनेकदा मानवाच्या जीवनाची दिशाही बदलण्याची ताकद या माध्यमात आहे आणि चित्रपटासाठी काम करण्यात अधिक समाधान मिळते हे त्यांच्या लक्षात आले. 

‘बधाई हो’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक अमित शर्मा यांच्या बरोबर काम केले आहे. 

लेखक, दिग्दर्शक, सहनिर्माते , पटकथा लेखक आणि संपादक या नात्याने ‘सुनपट’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. 

पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात

0

पीपीपी’ तत्त्वावरचा देशातला पहिलाच प्रकल्प; तीन वर्षात होणार काम पूर्ण

मुंबई, दि. २५ :- पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचा असणारा माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या तीन वर्षात या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधिच्या विविध प्रकारच्या मान्यतांसह तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचा प्रत्येक आठवड्याला मंत्रालयात विशेष आढावा घेतात. त्यामुळेच हे काम वेगाने मार्गी लागले.

‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’च्या मार्गिका तीनचे काम सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या मान्यता आणि तांत्रिक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात प्रत्येक आठवड्याला या बाबतची विशेष आढावा बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यात आला. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे संपादन ‘भू-संपादन व पुनर्वसन कायदा २०१३’चा अवलंब करण्यात आला आहे. मेट्रो कार डेपो, राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी लागणारी सुमारे ९८ टक्के जमीन प्राधिकरणाने संपादित केली आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व परवानग्या व लायसन्स प्राप्त करून घेण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच इतके भू-संपादन व विहित सर्व परवानग्या प्राप्त करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे.

या मेट्रो मार्गिकेची लांबी २३.२ किलोमीटर असून या मार्गिकेत २३ स्टेशन्स प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेट्रो रेल धोरण २०१७’ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरचं राज्य सरकारचे २० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य लाभणार आहे. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्याला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) व पुणे महानगरपालिका यांची मान्यता घेण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन अभिकरण मे. ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स पुढे आल्या आहेत. त्यांनी ‘पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लि.’ ही विशेष उद्देश संस्था स्थापन केली आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करणेसाठी ट्राफिक डायव्हर्जन प्लॅन तयार करण्यात आला असून, या याबाबत दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पुम्टाच्या बैठकीत याबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

फेरफार नोंदी घेण्यात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर10 लाख नोंदीचा टप्पा पार; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा पुढाकार

0

पुणे, दि.25: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून मंडळस्तरावर आयोजित फेरफार अदालतीद्वारे पुणे जिल्ह्यात तब्बल 10 लाख नोंदी घेण्यात आल्या असून त्यापैकी 9 लाख 73 हजार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात घेण्यात येत असलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून जनतेच्या प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी, फेरफार नोंदी निर्गत करण्याचे काम गतवर्षभरापासून सुरू आहे. 24 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये एकाच दिवसात 3 हजार 361 नोंदी निर्गत करण्यात आल्या.

मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणूका
नोंदी निर्गतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ऑक्टोबर 2020 पासून प्रत्येक मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात 98 मंडळ मुख्यालयात झालेल्या फेरफार अदालतीत शेतकरी, खातेदार यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला.

प्रलंबित 21 हजार 561 नोंदीपैकी ज्या 11 हजार 278 नोंदी 15 दिवसांची मुदत पूर्ण होऊन मंजुरीस उपलब्ध झाल्या आहेत, त्यापैकी 3 हजार 361 नोंदी निर्गत करण्यात आल्या. तसेच नागरिक तसेच खातेदारांना निर्गत नोंदीचे सातबारा व फेरफार वाटप करण्यात आले. उर्वरित 10 हजार 283 नोंदी तलाठी स्तरावर मुदत पूर्ण होण्यावर प्रलंबित आहेत. तलाठी स्तरावरील प्रलंबित नोंदींच्या नोटीसा काढणे व बजावण्याबाबत गतीने प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांच्या फेरफार नोंदी तात्काळ निर्गत करण्यासाठी प्रशासन यापुढेही तत्परतेने कार्यरत राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली आहे.

10 लाख नोंदीचा टप्पा पार
मागील एक वर्षात 3 लाख नोंदी घेत त्या निर्गत करण्यात आल्या आहेत. 2021 मध्ये फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून 24 नोव्हेंबर रोजी 10 लाख नोंदी घेण्याचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला. पुणे जिल्ह्यात संगणकीय प्रणालीमध्ये नोंदी भरण्यास प्रारंभ केल्यापासून एकूण 10 लाख 983 नोंदी झाल्या आहेत. या नोंदीपैकी 9 लाख 73 हजार नोंदी निर्गत असून निर्गतीचे प्रमाण 97.14 टक्के आहे. नोंदी घेण्यात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तालुकानिहाय फेरफार नोंदी निर्गत
24 नोव्हेंबर रोजीच्या फेरफार अदालतीद्वारे हवेली तालुक्यात 315, पुणे शहर 11, पिंपरी चिंचवड 84, शिरुर 270, आंबेगाव 163, जुन्नर 231, बारामती 776, इंदापूर 204, मावळ 241, मुळशी 134, भोर 111, वेल्हा 40, दौंड 194, पुरंदर 170 आणि खेड तालुक्यात 417 अशा एकूण 3 हजार 361 फेरफार नोंदी निर्गतीचे काम पूर्ण करण्यात आले.

जिल्ह्यातील प्रलंबित तक्रार प्रकरणांची संख्या 4 हजार 173 इतकी असून हे कामकाज पूर्ण करुन निर्गत करण्याचे नियोजन आहे. त्याबाबतच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ई-हक्क प्रणालीवर लॉगीन करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in/ संकेतस्थळाचा वापर करावा. नागरिकांनी ई-हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेमध्ये विविध पदांची भरती

0

पुणे, दि. 25 : राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या सर्वसमावेशक प्रशिक्षणासाठी पुणे येथे महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेची (महाराष्ट्रा स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी -एमएसएफडीए) स्थापना केली आहे. या अकादमीमध्ये सहसंचालक तसेच अकादमीअंतर्गत विविध केंद्रांसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकादमीमध्ये सहसंचालक तसेच केंद्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अकादमीच्या बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र (सेंटर फॉर मल्टी डिसीप्लिनरी करिक्युलम ॲण्ड पेडागॉजी) , नेतृत्व विकसन केंद्र (सेंटर फॉर लीडरशिप डेव्हलपमेंट), समावेश आणि विविधता केंद्र (सेंटर फॉर इन्क्लुजन ॲण्ड डायव्हरसिटी), नाविन्यता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र (सेंटर फॉर इन्होवेशन ॲण्ड कटींग एज टेक्नॉलॉजी), संसाधन केंद्र (सेंटर फॉर रिसोर्सेस) आणि  सेंटर फॉर नेटवर्कींग या सहा केंद्रांसाठी केंद्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

एमएसएफडीए बद्दलची माहिती, पदांचे तपशील, नियुक्तीसाठीची पात्रता, निकष आदी माहिती https://rusa.maharashtra.gov.in या संकेतस्थळारील तपशीलवार जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे राज्य प्रकल्प संचालक तथा  एमएसएफडीए चे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक यांनी दिली आहे.

आजच्या समाजामधली आत्मसंतुष्टता दूर करण्यासाठी आपल्याला नाटक आणि सिनेमांची आवश्यकता – दिग्दर्शक अशोक विश्वनाथन

0

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 

सुप्रसिद्ध रंगकर्मी बादल सरकार यांच्यामध्ये  नाट्यलेखन, रंगभूमी कार्यकर्ता, संवाद लेखन, चित्रपट कलाकार, आणि तत्वज्ञानी असे अनेक वादातीत गुण होते. मात्र त्याला योग्य प्रमाणात, मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळाली नाही. ‘बादल सरकार अँड अल्टरनेटिव्ह थिएटर’ हा एक व्दंव्दात्मक, वादविवादात्मक अर्ध-माहितीपट आहे. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मला मिळाली होती, या माहितीपटाच्या माध्यमातून आम्ही या दिग्गज व्यक्तीचे जीवनकार्य पुन्हा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.’’ असे मनोगत  दिग्दर्शक अशोक विश्वनाथन यांनी व्यक्त केले.

गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 52 व्या इफ्फीमध्ये चित्रपट प्रदर्शनाबरोबरच आयोजित करण्यात आलेल्या संवाद कार्यक्रमामध्ये दिग्दर्शक विश्वनाथन बोलत होते.  संपूर्ण जग एकदम जणू हिंसक आणि लढाईचे स्थान बनले आहे. प्रत्येकजण आपआपल्या कोषांमध्ये अडकून पडला असून तिथेच तो व्यग्र आहे, त्यामुळे खरे कौशल्य, ख-या बुद्धिमत्तेची ओळख पटत नाही.

‘‘आज आपण मोठ्या प्रमाणात राजकीयीकरण झालेल्या समाजामध्ये वास्तव्य करीत आहोत. त्यामुळेच तर मध्यम आणि उच्च वर्गामध्ये असलेली आत्मसंतुष्टता दूर करण्यासाठी आपल्याला रंगभूमी आणि सिनेमा यांची अतिशय आवश्यकता आहे.’’असे दिग्दर्शक विश्वनाथन यावेळी म्हणाले

‘‘बादल सरकार म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की, त्यांनी मुख्य प्रवाहाच्या बाहेर खूप मोठे काम केले. त्यांनी कधीच रंगभूमीचा पडदा आणि वाद्यवृंद यांच्या मधल्या भागाचा विचार केला नाही. त्यामुळे माझा चित्रपट या मधल्या भागाच्याही पलिकडे जावून सैद्धांतिक प्रभाव टाकणारा आहे. जणू तो आपल्यामध्येच घडतोय. एका नाटकामध्ये फक्त कलाकार प्रेक्षकांसमोर बोलत असतात. मात्र इथे ते प्रेक्षकांशी संवाद साधतात आणि त्यांना स्पर्श करतात, त्यांना हा चित्रपट अनुभवता येईल, ’’ असे यावेळी दिग्दर्शक विश्वनाथन यांनी सांगितले.

बादल सरकार यांनी सिनेसृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाविषयी अधिक बोलताना दिग्दर्शक म्हणाले, ते काही फक्त बंगाली नाटयलेखक नव्हते. त्यांचे प्रमुख काम पुण्याच्या एफटीआयआयमध्ये झाले. इथे ते शिकवत होते. अमोल पालेकर यांच्यासारख्या लोकांना बादल सरकार यांचा चांगला परिचय होता.

विश्वनाथन म्हणाले, त्यांनी जागतिक रंगभूमीविषयी ज्या गोष्टी आत्तापर्यंत ज्ञात नव्हत्या, त्यांच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटामध्ये मी त्यांचे फक्त कौतुक केले आहे, असे नाही तर, त्यांच्यावर टीका केलेलीही पहायला मिळेल.

या चित्रपटाची कल्पना कशी सूचली, या प्रश्नावर उत्तर देताना विश्वनाथन म्हणाले, ‘‘एफटीआयआयमधले बादल सरकार आणि इतरांबरोबर झालेल्या माझ्या संवादाच्या आधारे मला ही कल्पना खूप पूर्वीच सूचली होती. परंतु मला पूर्व विभागीय परिषद, संस्कृती मंत्रालय यांच्याकडून मदत मिळाल्यानंतरच हा चित्रपट पूर्ण होवू शकला.

बादल सरकार अँड द अल्टरनेटिव्ह थिएटर

(भारतीय पॅनोरमा कथा बाह्य  चित्रपट विभाग)

दिग्दर्शकाविषयी –

अशोक विश्वनाथन हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आहेत. रंगभूमीवर काम करणारे व्यक्ती म्हणून ते परिचित आहेत. त्यांनी एफटीआयआयमधून पदवी घेतली असून कोलकात्याच्या एसआरएफटीआयमध्ये ते प्राध्यापक आहेत. विश्वनाथन यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी 40 नाटके आणि 11 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

निर्माता –

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे पूर्व विभागीय सांस्कृतिक केंद्र. भारताच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा जतन आणि संवर्धन करण्याचे काम करतो.

चित्रपटाविषयी –

प्रसिद्ध नाटककार आणि नाटयदिग्दर्शक बादल सरकार यांच्या कार्याचे मूल्यमापन आणि समीक्षा करणारा हा चित्रपट  आहे. मध्यवर्ती संकल्पना म्हणून त्यांचा प्रवास वापरून, त्याला असलेली जागतिक संदर्भाचा वैकल्पिक रंगमंचाची प्रासंगिकता तसेच प्रभाव यांचा शोध यामध्ये घेण्यात आला आहे. यामध्ये पर्यायी रंगभूमीचा सिद्धांत आणि तालमी यांच्याविषयी तज्ञांमधील वादविवादाचेही दर्शन घडते. एका विशिष्ट  स्तरावर हा वाद संपतो कारण यामधली महान व्यक्ती सर्जनशीलतेचा ध्यास लागल्यामुळे गायब होते. त्यामुळे आपल्याला त्याच्या महत्वावर चर्चा करण्याची वेळ येते.

भूमिका आणि टीम

पटकथा- अशोक विश्वनाथन

डीओपी – सनातनू बॅनर्जी

संपादन – सौनक रॉय

भूमिका – बादल सरकार, पंकज मुन्शी, कमल रॉय.

प्रोजेक्ट-75 मधील चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट

0

मुंबई, 25 नोव्हेंबर 2021

  • भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 75 चा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण
  • आयएनएस वेला ही पाणबुडी पश्चिमी नेव्हल कमांडचा भाग असेल
  • या पाणबुडीमध्ये आधुनिक हेरगिरीविषयक वैशिष्ट्ये आहेत आणि तिच्यावर लांब पल्ल्याची जल क्षेपणास्त्रे तसेच जहाजरोधी क्षेपणास्त्रे बसविलेली आहेत

प्रोजेक्ट-75 च्या सहा पाणबुड्यांच्या मालिकेतील चौथी पाणबुडी, ‘आयएनएस वेला’ 25 नोव्हेंबर 21 रोजी नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे हा औपचारिक सोहळा झाला. फ्रान्सच्या मे. नेव्हल ग्रुपच्या (पूर्वीची डीसीएनएस) सहकार्याने मुंबईतल्या  माझगाव डॉक शिपयार्डस लिमिटेडद्वारे स्कॉर्पिन  श्रेणीतल्या पाणबुड्या बांधल्या जात आहेत. नौदलाच्या ताफ्यात या श्रेणीतली चौथी पाणबुडी समाविष्ट होणे हा आजचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आयएनएस वेला ही  पश्चिम नौदल कमांडच्या पाणबुडीच्या ताफ्याचा भाग असेल आणि शस्त्रागाराचा आणखी एक शक्तिशाली भाग असेल.

संसद सदस्य अरविंद सावंत, पश्चिमी नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हॉईस अडमिरल आर. हरी कुमार, माझगाव जहाजबांधणी गोदीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हॉईस अडमिरल (निवृत्त) नारायण प्रसाद यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी आयएनएस वेला या पाणबुडीच्या नौदल सेवेत दाखल झाल्यानिमित्त आयोजित समारंभात उपस्थित होते. याधीच्या वेला या रशियन बनावटीच्या फॉक्सट्रॉट श्रेणीच्या आणि 2009 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पाणबुडीचा कर्मचारीवर्ग देखील या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून हजर होता.

संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आजच्या समारंभाला  उपस्थित होते. वर्ष 2009 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पूर्वीच्या ‘वेला’ या रशियन वंशाच्या फॉक्सट्रॉट श्रेणीतील पाणबुडीचे सदस्य या वेळी पाहुण्यांमध्ये उपस्थित होते.

स्कॉर्पिन पाणबुड्या अत्यंत शक्तिशाली असून त्यात प्रगत स्टेल्थ (गुप्त) वैशिष्ट्ये आहेत. त्या लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित पाणसुरूंग तसेच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक ‘सोनार’ आणि सेन्सर संच असल्याने त्यांच्यात उत्कृष्ट कार्यान्वयन क्षमता असते. त्यांच्याकडे प्रॉपल्शन मोटर म्हणून प्रगत परमनंट मॅग्नेटिक सिंक्रोनस मोटर (PERMASYN) देखील आहे.

‘वेलाची’ निर्मिती हे नौदलाद्वारे स्वयंनिर्मितीच्या क्षमतांना ‘बिल्डर्स नेव्ही’ म्हणून आपले स्थान मजबूत करण्याच्या दिशेने देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनाची पुष्टी आहे.  तसेच एक प्रमुख जहाज आणि पाणबुडी बिल्डिंग यार्ड म्हणून माझगाव डॉक लिमिटेडच्या क्षमतांचेही द्योतक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘सुवर्ण विजय वर्ष’ या सोहळ्यांसोबत पाणबुडीच्या जलावतारणाचा हा सुवर्णयोग साधला जात आहे.