Home Blog Page 2198

मेट्रो मार्गिका-3 प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे, दि. 27:- ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडिचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-3 च्या कामासाठी कराव्या लागणाऱ्या वाहतूक नियोजनाचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आढावा घेतला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार दिलीप मोहीते, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सार्वजनिक-खासगी सहभाग असलेल्या या मेट्रो मार्गिकेचे काम गतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचा प्रत्येक आठवड्याला आपण आढावा घेणार असून पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.

मेट्रो मार्गिकेच्या कामात कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही तसेच काम सुरू असताना कुठेही अपघात होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यापुर्वी करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याबाबत सबंधित विभागाने अमंलबजावणीचे नियोजन गतीने पूर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना वाहतुकीबाबत अडचण येणार नाही असे नियोजन करावे. नियोजन करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घ्याव्यात.

भुयारी मार्ग ते भुजबळ चौकादरम्यान सर्व्हीस रस्ता दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरीत पूर्ण करावे. भूमकर चौकातून कस्तुरी चौकात जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण पिंपरी चिंचवड महापालिकेने लवकर करावे. विप्रो सर्कल जवळील ग्लोबल होम्स सॉव्हरियन रस्ता ते प्राईड रस्यािंचे काम करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पीएमआरडीचे आयुक्त सुहास दिवसे यांनी ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-3 कामाबाबत तसेच वाहतुक व्यवस्थेच्या आराखड्याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे संपादन ‘भू-संपादन व पुनर्वसन कायदा 2013’चा अवलंब करण्यात आला आहे. मेट्रो कार डेपो, राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी लागणारी सुमारे 98 टक्के जमीन प्राधिकरणाने संपादित केली आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व परवानग्या व लायसन्स प्राप्त करून घेण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच इतके भू-संपादन व विहित सर्व परवानग्या प्राप्त करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे.

या मेट्रो मार्गिकेची लांबी 23.2 किलोमीटर असून या मार्गिकेत 23 स्टेशन्स प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेट्रो रेल धोरण 2017’ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरच राज्य सरकारचे 20 टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य लाभणार आहे. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करणेसाठी वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीला पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पीएमआरडीचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह मेट्रो तसेच एमआयडीसी व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सुखमय जीवन जगण्यासाठी वर्तमानकाळात जगा-डॉ. दिलिप पटवर्धन

0

२६वीं तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या दुसर्‍या सत्रात

पुणे,दि.२६ नोव्हेंबर:“आजकालच्या वाढत जाणार्‍या घटस्फोटाला थांबविण्यासाठी पती-पत्नीच्या नात्यामध्ये संवाद, स्पर्श, सहवास, स्वातंत्र्य आणि सन्मान या पाच गोष्टी असणे अत्यंत महत्वाचे आहे. ताण तणावातून मुक्त होऊन सुखमय जीवन जगण्यासाठी वर्तमानकाळात जगायला शिका.” असा सल्ला  सांगली येथील नंदादीप आय हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. दिलिप पटवर्धन यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २६व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी डीडी सह्याद्रीचे माजी संचालक मुकेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड होते.
तसेच, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये आणि डॉ. गोविंद पालकर, डॉ. बी.एस.कुचेकर, डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
डॉ. दिलिप पटवर्धन म्हणाले,“जीवनात ताण असेल तर मानवाची कार्यक्षमता वाढते हे सत्य आहे. कोणत्याही परिस्थितीत सदैव सकारात्मक विचार केल्यास मानव कधीही दुखी होऊ शकणार नाही. वर्तमानकाळात जगणे, चेहर्‍यावर सदैव हास्य ठेवणे आणि कौतुक करणे हे जीवन जगण्याची सर्वात मोठी कला आहे. तणाव घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत आनंद निर्माण करावा, सुख हे बाहेर नाही तर ते अंर्तमनात शोधावे. भूतकाळात घडलेल्या चुका सुधारून वर्तमानकाळात बदल करा व आयुष्य सुकर करा.”
“सुंदर जीवनासाठी आपण कोणाकडूनही अती अपेक्षा करू नये. येणार्‍या वस्तूस्थितीचा स्विकार करा आणि त्याला योग्य आकार दया. अहंकारापासून मुक्त झाल्यावर जीवनाचा खरा आनंद काय असतो हे कळते. जीवनात ४ ‘वा’ या गोष्टींचा उपयोग करा, त्यात वाचवा, वाढवा, वापरा आणि वाटा. म्हणजेच आपल्या जवळील ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते सर्वांना दया.”
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार कमी करण्यासाठी अध्यात्म गरजेचे आहे. सामाजिक शांतीसाठी अध्यात्माची गरज आहे. स्वत्व, स्वाभिमान आणि स्वधर्म जागृत करण्याचे कार्य या व्याख्यानमालेतून करण्याचा प्रयत्न आहे.”
मुकेश शर्मा म्हणाले,“ईश्‍वराला कोणीही शोधू शकत नाही, पण त्याचा अनुभव घेऊ शकतात. धर्म हे जीवनाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी असते. धर्मातून सदैव सकारात्मक ऊर्जा मिळते. धर्मातून जीवन जगण्याची नवी दृष्टी मिळल्याने आम्हाला सृष्टी ही चांगली दिसायला लागते. विज्ञानाने मानवाचे जीवन सुखमय केले आहे. परंतू ते अंर्तमनापर्यंत पोहोचलेले नाही. पण अध्यात्म मानवाच्या अंर्तमनात पोहोचले आहे. त्यामुळेच अध्यात्म हे विज्ञानाच्या पुढे गेले आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ भारतीय संतांचा विचार संपूर्ण जगात पोहोचविण्यासाठी एमआयटी शिक्षण संस्था शिक्षणाबरोबरच हे कार्य करीत आहेे. धर्माच्या माध्यमातून मानवी जीवनाला वेगळे वळण दिले जाते. त्यामुळेच प्रत्येक वेळी जीवनात संतुलन आवश्यक आहे. मी पणा, अहंकार आणि इच्छा या गोष्टी आल्या की आपल्या अपेक्षा भंग होतात. मानवाच्या मनात विलिनता आली तरच तो आनंदी होईल.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.
डॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.

“आपल्याला हल्ली शांतता आणि प्रेम या गोष्टींचा विसर पडला आहे-सेतारे एस्कंदरी

0

सेतारे एस्कंदरी, 52 व्या IFFI मधील जागतिक चित्रपट पॅनोरमातील ‘द सन ऑफ दॅट मून’ या चित्रपटाची दिग्दर्शक

पणजी, 26 नोव्‍हेंबर 2021 

या चित्रपटात एका विधवा स्त्रीचे अपार दुःख आणि त्यातून निर्माण झालेली मूक राहण्याची तीव्र इच्छा दिसते. या परिस्थितीत तिच्या बालपणीच्या मित्राचा तिच्या आयुष्यात प्रवेश होतो आणि तिच्या अंधारलेल्या हृदयात पुन्हा एकदा प्रेमाची ज्योत फुलते.बलोचि चित्रपट ‘द सन ऑफ दॅट मून’ हा सेतारे एस्कंदरी यांचा दिग्दर्शिका म्हणून पहिला चित्रपट आहे. विधवा बीबनच्या अंतर्मनातील खळबळ आणि परंपरावादी समाजाचा  तिच्या बालमित्राबद्दल असलेल्या प्रेमभावनेला विरोध या चित्रपटातून दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला आहे.बलोची भाषेत या चित्रपटाचे नाव आहे ‘खोरशिद- ए आन माह’ . सध्या गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  या चित्रपटाचे जागतिक प्रीमियर पार पडले. या चित्रपटाचे कथानक दक्षिण पूर्व इराणमधील सीस्तान आणि बलुचिस्तान मध्ये घडते. महोत्सवातील जागतिक पॅनोरमा विभागात तो सादर झाला आहे.

या चित्रपटात इराणी स्त्रियांचे अतिसामान्य जीवन आणि  इराणी संस्कृतीची आजवर अंधारात असलेली बाजू दाखवण्याचा प्रयत्न इस्कंदारी यांनी केला आहे. काल २५ नोव्हेम्बर २०२१ रोजी झालेल्या एका वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी या चित्रपटामागील प्रेरणेबद्दल सांगितले.

आपल्या जीवनातील हरवलेल्या प्रेम आणि शांततेच्या भावना पुन्हा एकदा जागृत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित  केली . “सध्याचे जग हिंसा आणि तिरस्काराने ग्रासलेले आहे, आपलयाला शांतता आणि प्रेम या भावनांचा जणू  विसर पडला आहे. या चित्रपटाच्या द्वारे मला प्रेम या भावनेची ताकद दर्शवायची होती आणि त्याचबरोबर स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री हक्कांचा पुरस्कारही  करायचा होता.”चित्रपटाच्या नावाबद्दल इस्कंदारी म्हणाल्या, “इराणी संस्कृतीत पुरुषाला सूर्य तर स्त्रीला चंद्र मानले आहे. ही नावे अनुक्रमे  प्रकाश आणि अंधाराचे प्रतिनिधित्व करतात. या चित्रपटात पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे जीवन कसे अंधःकारमय असते ते दाखवले आहे. म्हणून हे नाव या चित्रपटासाठी निवडले आहे.”

इराणी जनतेला भारतीय चित्रपट फारच प्रिय आहेत असे त्यांनी सांगितल्यामुळे उपस्थित प्रतिनिधी आनंदित झाले.

इराणच्या खोरासान प्रांतात जन्मलेल्या सेतारे इस्कंदारी या पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी  नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर आपल्या  कामाचा  ठसा उमटवला आहे. इराणमधील नाट्यक्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या अली रफी यांच्या ‘दे ट्रूप’ या संस्थेत त्या कार्यरत होत्या. त्या दूरचित्रवाणीवरील  तसेच रंगमंचीय नाटकांचे दिग्दर्शनही करतात. ‘द सन ऑफ दॅट मून’ हा दिग्दर्शक या नात्याने त्यांचा पहिला चित्रपट आहे. 

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या लोककलांचे दमदार सादरीकरण

0

नवी दिल्ली, 26 : राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात आज आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमात भुपाळी, जात्यावरील ओवी, भारूड, गौळण, लावणी, कोळीनृत्य आदि महाराष्ट्राच्या समृध्द लोककलांचे दमदार सादरीकरण झाले. राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाने  उपस्थितांची  मने जिकंली.

येथील प्रगती मैदानावर 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात आज अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त शामलाल गोयल यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दिन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन  झाले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र, महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ.निधी पांडे, अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक संध्या पवार,  महाव्यवस्थापक विजय कपाटे  उपस्थित  होते.भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळव्यात दररोज सायंकाळी ‘ खुल्या सभागृहात’ व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमांतर्गत व्यापार मेळाव्याच्या १२ व्या दिवशी आज ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला.

नाशिक येथील पिनॅक इव्हेंट्स ॲड मॅनेजमेंट प्रस्तुत सप्तसुर संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्र लोक कला दर्शन’ कार्यक्रमाचे सादरीकरण केले. भुपाळीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पहाटे घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायिल्या जाणाऱ्या ओवींचे सादरीकरण झाले.  मंगळागौर सणाची झलकच यावेळी रंगमंचावर बघायला मिळाली. यावेळी मंगळागौरीचे विविध गाणे गात त्यावर कलाकारांनी ठेका धरला. नारळी पोर्णिमेचा सण व कोळी बांधवांचा उत्साह दर्शविणारे कोळीगितांचे सादरीकरणही  झाले. ‘मला दादला नको ग बाई …’ हे संत एकनाथांचे प्रसिध्द भारूडही यावेळी सादर झाले.  लावणी ,गौळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.

राज्यातील आदिवासी जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, वाघ्या-मुरळी आदींनी रसिकांच्या टाळया मिळविल्या. विविध लोककला व लोकनृत्यांच्या आविष्काराने सजलेल्या या  कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे  प्रति‍बिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त  प्रतिसाद लाभला.

‘दक्षिण शक्ती’ युद्धसरावाचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुखांनी दिली जैसलमेरला भेट

0

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2021

लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या दोन दिवसांच्या जैसलमेर (राजस्थान) दौऱ्याची आज सांगता झाली. या दौऱ्यात लष्कर प्रमुखांनी भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडने घेतलेल्या  ‘दक्षिण शक्ती ‘ युद्ध सरावाचा आढावा घेतला. एकाहून अधिक ठिकाणी मोहिमा राबवताना लष्कराच्या शक्तीचा एकत्रित वापर करणे आणि संघर्ष सुरु असलेल्या संपूर्ण क्षेत्रात देशाचे लष्करी उद्देश पूर्ण करणे हा या सरावाचा उद्देश होता.

गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या या सरावात, भारतीय लष्कराच्या विविध घटक आणि विभागांनी भाग घेतला. याचा भाग म्हणून युद्धभूमी सदृश वातारणात लष्कराच्या विविध पलटण, यांत्रिक कवायती आणि हवाई ट्रूप्स यांनी रणनीतिक आणि सैन्य कारवाई करत भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सराव केला. यात बहुमुखी आणि पूर्णपणे देशी बनावटीच्या प्रगत हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर (शस्त्र प्रणाली बसविलेले), स्वार्न ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे एकत्रित कार्य आणि गुप्तवार्ता   रेकी यंत्रणांचा एकत्रीत वापर करण्यात आला. 

या सरावात विशेष हेलीबोर्न मोहिमा, स्वार्न ड्रोन आणि एएलएच हाताळणी आणि त्याला सुसंगत जमिनीवरील ट्रूप्सच्या कारवाया याचे जबरदस्त प्रदर्शन याचा देखील सराव करण्यात आला. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत लष्करात सामील करण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या उपकरणांची क्षमता चाचणी करून वापर केल्याबद्दल लास्कर प्रमुखांनी सदर्न कमांडचे अभिनंदन केले.

‘भविष्यातील युद्धे’ लढण्यासाठी सतत विकसित होणाऱ्या रणनीती, तंत्रज्ञान आणि पद्धतीची गरज, तसेच मानवचालीत आणि मानवरहित प्रणालीच्या सुधारणांवर त्यांनी भर दिला.

या सरावात सहभागी झालेल्या सर्वांची सिद्धता आणि मोहिमांसाठी असलेली तयारी यासाठी लष्कर प्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले आणि देशाच्या संरक्षणासाठी सदैव जागृत राहण्यास प्रोत्साहन दिले.

संविधानाने जगण्याचे भान दिले-डॉ. कुमार सप्तर्षी

0

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संविधान दिनानिमित्त 75 संस्थांचा सत्कार:

पुणेः- संविधान अस्तित्वात येण्याच्या आधी भारतात राजेशाही होती. त्यामुळे लहरी कायदा अस्तित्वात होता. परंतु, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संविधान अस्तित्वात आल्यानंतर सर्वांना समान अधिकार मिळाले. स्त्री-पुरूष, गरिब-श्रीमंत आदी सर्व भेदांच्या श्रृंखला गळून पडल्या. भारतीयत्व रूजत जाऊन सगळ्यांना जगण्याचे भान आले, असे मत महात्मा गांधी स्मारक निधी गांधी भवनचे अध्यक्ष डाॅ.कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संविधान दिनानिमित्ताने संवाद पुणे आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलेल्या 75 संस्थांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी डॉ. सप्तर्षी बोलत होते. महात्मा गांधीचे पुस्तक, स्मृती छायाचित्र, गांधीचे छायाचित्र असलेला मग, खादीची शबनम अशा भेटवस्तू देऊन हा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोय़ल, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, महाराष्ट्र कला प्रसारणी संभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले की, भारतीय आधुनिकतेचा ध्यास धरत वाटचाल करीत आहेत. परंतु, इथल्या समाज आणि कुटुंब व्यवस्थेमुळे हा सापशिडीचा खेळ ठरत आहे. वैचारिक प्रगतीच्या एका उच्च टप्प्यावर पोहोचल्यानंतर सापशिडीतील हा साप आपल्याला गिळंकृत करून परत पूर्वपदावर आणूनठेवत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जी राजकीय व्यवस्था आणि चौकट अपेक्षित होती, ती दिसून येत नाही. अलीकडील सर्व राजकीय पक्ष म्हणजे केवळ निवडणूक राबविणारी यंत्रणा असे झालेले आहेत. कुठलाही राजकीय पक्ष कोणत्याही विचारसरणीचा असला तरी आपल्या विचारसरणीच्या जोरावर देश कसा बांधला जाईल, देश प्रगतीपथावर कसा जाईल याबाबत कार्यशाळा आणि चर्चासत्रही होत नाहीत. राजकीय पक्षांनी ही जबाबदारी झटकल्यामुळे ओघाने ही जबाबदारी जनतेवर आल्याने म्हणून संविधानदिन साजरे करावे लागतात. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर हळुहळू राजकीय पक्ष नामशेष होत चालले आहेत. जातीच्याच कुंपणावर अडकवून ठेवल्याने जनता गरूड होऊन अवकाशात झेप घेण्या ऐवजी कोंबडी होऊन जागच्या जागी उडण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहे. कुठल्याही देशाच्या जडणघडणीत देशाची संस्थात्मक बांधणी आवश्यक असते. भारताची प्रगल्भ लोकशाही व्यवस्था पाहता जगाला आजही आश्चर्य वाटते. परंतु, आपल्या देशाची संस्थात्मक बांधणी ही देशाच्या लोकशाहीचा गाभा आहे.

यावेळी बोलताना डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, आज ज्या संस्थांचा सत्कार करण्यात आला, तो त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून करण्यात आला आहे. पुणे शहरात संस्थात्मक जाळे विणले गेले आहे. सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांना या संस्था म्हणजे प्रत्यक्ष कार्य प्रयोगशाळा आहेत. पुस्तकांच्या परीघाबाहेर काय चालले आहे, हे या संस्थांमधून जाणून घेता येते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नाळ समाजाशी जोडली जाण्याकरीता विद्यापीठाने अशा 400-500 सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार केलेले आहेत.

कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. संदिप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ईटकर यांनी आभार मानले. यानिमित्त यावेळी माॅं तुझे सलाम हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर

0

मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतची शासन अधिसूचना दि.२६ नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे.

ही नियुक्ती श्री. निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मदतीने राजकीय षड्यंत्र

0

निवडणूक आयोगाने बळी पडू नये

सोयीची प्रभागरचना करण्याचा डाव

पुणे- प्रभाग रचना पूर्ण करू शकत नाही असे प्रशासनाकडून सांगविणे ,हे निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मदतीने रचलेले राजकीय षड्यंत्र असून त्यास राज्य निवडणूक आयोगाने बळी पडू नये असे आवाहन महापालिकेतील माजी विपक्ष्नेते उज्वल केसकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केले आहे.

या पत्रात केसकर यांनी असे म्हटले आहे कि,’निवडणूक आयोग हि राज्यघटनेच्या “243k” या कलमाद्वारे “महानगरपालिका” नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकृत संस्था आहे.आज पुणे महानगरपालिका विहित मुदतीत म्हणजे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू शकत नाही असे कारण देऊन पंधरा दिवसाची मुदत मागितली आहे असे वृत्त पसरविले आहे , खरं म्हणजे हे एक राजकीय षड्यंत्र आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ताधाऱ्यांना सध्याचे वातावरण निवडणुकीसाठी अनुकूल नाही म्हणून निवडणूक पुढे ढकलण्यासाठी ही केलेली एक चाल आहे असे आमचे म्हणणे आहे वास्तविक आपण दिलेल्या सूचनेचा नीट अभ्यास केल्यास पुणे महानगरपालिकेकडे असलेले अद्ययावत तंत्रज्ञान तंत्रज्ञ याचा विचार केला असता, हे काम विहित दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते असे असताना आम्हाला हे काम विहित मुदतीत पूर्ण करता येणार नाही असे सांगणे म्हणजे कुठेतरी राजकीय दबाव आहे असे स्पष्ट होते.
आम्ही घेतलेल्या माहितीनुसार महा विकास आघाडीतील घटक पक्ष “एकत्र न येता” प्रत्येक जण आपल्याला सोयीची कुठली “प्रभाग” रचना आहे त्याचे “नकाशे” बनवून ते अधिकाऱ्यांना देत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कसे बसवायचे असा संभ्रम या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे असे कळते एक पक्ष ज्यांच्याकडे पालक मंत्री पद आहे दुसरा पक्ष ज्यांच्याकडे नगर विकास खाते आहे आणि तिसरा पक्ष आमच्या पाठिंब्यामुळेच हे सरकार आहे असे सांगतात त्यामुळे नेमकं कुणाचं ऐकायचं असा प्रश्न महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे आणि म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी मुदतवाढ मागून घ्यायची आणि कुणाचाच वाईटपणा घ्यायचा नाही असे त्यांचे धोरण दिसते.
वास्तविक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे काम गुप्तपणे केले पाहिजे ते “कुणाला कळता” कामा नये अशा आपल्या स्पष्ट सूचना असताना हा “गोंधळ” उडलेला आहे.
आम्ही आपल्या गाईडलाईन प्रमाणे प्रभाग रचना कशी होऊ शकेल याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
जर आमच्या सारख्या तांत्रिक ज्ञान असणाऱ्या सामान्य नागरिकाला ही सगळी रचना चार पाच दिवसांमध्ये करता येऊ शकते हा विश्वास वाटतो, तर ज्यांच्याकडे याचं नॉलेज आहे, तंत्रज्ञआहेत, तंत्रज्ञान आहे, त्यांना हा कालावधी का पुरत नाही हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. यानिमित्ताने आमची आपणाकडे मागणी आहे की आपण “राज्य निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी” म्हणून एखाद्या नि:पक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे काम करणे त्यांना फार अवघड का वाटते.
आम्ही आपल्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वाचा अवलंब करून एक प्रभाग रचनेचा नकाशा आपल्या कार्यालयात सादर करू. मुदतवाढ देऊन निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नांना कृपया आपण वेळीच ओळखून याबाबत त्वरित पावले उचलून, योग्य ती कारवाई करून वेळेतच निवडणुका होतील, याची खबरदारी घ्यावी आणि राज्यघटनेने आपणाकडे सोपवलेले दायित्व आपण योग्य रीतीने निभवावे अशी आमची आपणास विनंती आहे आपण वेळ दिल्यास आम्ही आपल्याकडे आमच्या बुद्धीप्रमाणे तसेच आपल्या सूचनेचे मार्गदर्शक सूचनाचे पालन करून केलेला नकाशा सादर करू. परंतु पुणे महानगर पालिके सारख्या सर्व तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला हे काम वेळेत करता येणार नाही हे सांगणे खरोखर चुकीचे वाटते.वेळेवर निवडणुका होतील यासाठीची पावले उचलायची ती उचलावीत अशीमागणी या पत्रातून उज्वल केसकर यांनी केली आहे.

सॅलीसबरी पार्क उद्यान पुण्यातील क्रमांक एकचे उद्यान ठरेल : खा.गिरीश बापट

0

पुणे-नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी उद्याने आवश्यक आहेत. पुणे महानगरपलिके ने आरोग्याचा विचार करूनच उद्याने विकसित केलेली आहेत. पुण्यातील उद्यानांमध्ये सॅलीसबरी पार्क हे क्रमांक एकचे उद्यान ठरले आहे. तसेच या उद्यानाने पुण्याच्या विकासात हातभार लावला आहे. असे गौरवउदगार पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी येथे काढले आहेत. पुणे महानगरपलिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक श्रीनाथ यशवंत भिमाले यांच्या प्रयत्नातून त्यांच्या प्रभातील सर्व्हे नंबर ४३८, सॅलीसबरी पार्क येथे अत्याधुनिक पद्धतीचे उद्यान साकारण्यात आले आहे.

बोनसाय पद्धतीचे वृक्ष, आकर्षक विद्युत रोषणाई, अम्फी थीएटर, सेल्फी पोइंत, पगोडा, विविधरंगी फुलांची वृक्षे या सर्व बाबी या उद्यानाची खास वैशिष्ट्ये आहेत. भिमाले यांच्या वाढदिवसानिमित्त या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडला. त्याच सोबत लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांनी श्रीनाथ भिमाले यांच्या जीवनावर तयार केलेले गाणे “बोले तैसा चाले, श्रीनाथ भाऊ भिमाले” या लोकगीताचे अनावरण देखील गिरीश बापट यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी ऑन-लाईन शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सौ.सुनीता वाडेकर, पुणे महानगरपलिकाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, भाजपा संघटक सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सुनील कांबळे, माजी नगरसेविका सौ.वंदना ताई भिमाले आदी मान्यवर उपस्थित होते. खा.बापट म्हणाले, भिमाले यांनी पालिकेच्या माध्यमातून सुंदर गार्डन तयार केले आहे. ह्या उद्यानाचा लाभ पुणे शहरातील नागरिकाने घ्यावा. याठिकाणी नागरिकांनी मोर्निंग वॉक साठी यावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा प्रवक्ते डॉ.श्रीपाद ढेकणे यांनी केले.

‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावं लागतंय…नवाब मालिकांचा राणेंना टोला

0

मुंबई- राज्यात येत्या मार्चमध्ये भाजपची सत्ता येणार आहे असे भाकित नारायण राणेंनी वर्तवले. त्यावर प्रतिक्रिया देताना, “काही लोकांकडे 23 वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावं लागतंय…” असा टोला नवाब मलिकांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी असे म्हटले आहे कि, महाराष्ट्रात सरकार महाविकास आघाडीचे स्थापित झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी महिना-दोन महिन्याला सरकार पडणार अशा भविष्यवाण्या सुरू केल्या होत्या. यानंतर भाकिते वर्तवण्याची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली. झोपेतून उठताच या दिवशी सरकार पडणार, या दिवशी भाजपची सत्ता येणार अशी विधाने ते करू लागले. आता हीच जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घेतलेली दिसते.याबाबत मलिक यांनी ट्वीट करूनही प्रतिक्रिया नोंदविली आहे.

भविष्यवाण्या करून, शाप देऊन , नवसाने सरकार पडणार असे कुणी समजत असेल तर हा त्यांचा निव्वळ गैरसमज आहे. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार आहे.असेही मलिक यांनी म्हटले आहे.

भारतीय सर्कसचा जन्मदिन साजरा

0


पुणे-
करोना संकटाच्या दीड वर्षात केंद्र सरकार व राज्य सरकारने सर्कस उद्योगाला मोलाची मदत केली. याबद्दल सारे सर्कस चालक कलावंत व स्टाफ ऋणी आहे अशा भावना रॅम्बो सर्कसचे चालक सुजित दिलीप यांनी आज व्यक्त केल्या. पुण्यातील मुंढवा रेल्वे ओव्हरब्रीजच्या जवळील मैदानात रॅम्बो सर्कसचा मुक्काम असून, भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांच्या तैलचित्रास पुष्पांजली अर्पण केल्यावर ते बोलत होते. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सर्कसच्या मागे सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगून लखनौ, वृंदावन आणि दिल्ली येथे 15 दिवसांचे कॅम्पस् आयोजित करण्यास मदत केली. हे सर्व कॅम्पस् हाऊसफुल झाले. वृंदावनच्या शोचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. तसेच महाराष्ट्रातही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सर्कस उद्योगाला मोठा आधार दिला. याबद्दल आम्ही केंद्र व राज्य सरकारचे आभारी आहोत असे ते म्हणाले.
26 नोव्हेंबर 1882 रोजी मुंबईच्या बोरीबंदर येथे विष्णुपंत छत्रे यांनी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. आज भारतीय सर्कसचा जन्मदिन मानून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्कस मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रवीण तरवडे, सचिव बाळासाहेब शिंदे, दामू धोत्रे यांचे पणतू आनंद धोत्रे, वाजिद, राजू मॅनेजर, सर्कस विदूषक व सर्कस कलावंत उपस्थित होते.
प्रारंभी ‘सर्कस विश्व’चे लेखक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी या दिवसाचे महत्त्व व इतिहास सांगून सर्वांचे स्वागत केले. सर्कसला ‘लोकाश्रय आहे, आता राजाश्रय’ पाहिजे अशा भावना प्रवीण तरवडे यांनी व्यक्त केल्या. ‘भारतीय सर्कस उद्योग आर्थिक संकटात असून, ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी शासनाने मदत करावी, असे बाळासाहेब शिंदे म्हणाले. सर्कस चालू ठेवल्याबद्दल रॅम्बो सर्कसचे संस्थापक  पी. टी. दिलीप आणि त्यांचे चिरंजीव सुजित दिलीप यांच्याबद्दल आनंद धोत्रे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्रेक्षकांच्या वतीने राजीव जोगदेव यांनी सर्कस कलावंतांचे कौतुक केले. प्रारंभी विदूषक व सर्व सर्कस कलावंतांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. सर्वांनी विष्णुपंत छत्रे यांच्या तैलचित्रास पुष्पांजली अर्पण केली. श्रुती तिवारी यांनी आभार मानले. सर्व कलावंतांना यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले.

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये सानुग्रह सहाय्य – मंत्री विजय वडेट्टीवार

0

मुंबई, दि. 26 :- सर्वोच्च न्यायालयाने  दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार )  इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसनमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            राज्य शासनाने  मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना  तयार   केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात  जमा  होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावली आहे तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड-१९ चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात  येणार आहे. हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड -१९ मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल.पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोव्हिड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.

        या कामासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवड्यातच विकसित करण्यात येणार आहे. त्या वेब पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच संपूर्ण या योजनेची तपशीलवार कार्यपध्दतीची माहिती असेल. हे वेब पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे याबाबत  आपल्या स्तरावर याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी तसेच याबाबत  प्रसिद्धी करावी. जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवर देतील आणि सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  स्थानिक प्रशासनाने करावे. याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे. यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.                                                      

राज्यात मार्च पर्यंत भाजपची सत्ता येणार! नारायण राणे यांचा दावा

0

जयपूर-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मते, महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. येत्या मार्च पर्यंत महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे.भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनंतर आता नारायण राणे यांनी राज्यात भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे.मार्च पर्यंत राज्यात भाजपची सत्ता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला अपेक्षित बदल दिसायला लागतील. सरकार पाडणे असो वा सरकार स्थापित करणे… या सर्व गोष्टी खूप सीक्रेट असतात. तरीही ही माझ्या मनातली गोष्ट असल्याने ती मी तुमच्यासमोर मांडत आहे. असे नारायण राणे म्हणाले आहेत.

नारायण राणे म्हणाले,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्च पर्यंत राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे सांगितले आहे. हीच गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नाही. मी त्यावर काहीही बोलणार नाही. परंतु, महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे नारायण राणेंनी सांगितले आहे.

धुळ्यात अमरिश पटेल ,कोल्हापुरात सतेज पाटील बिनविरोध

0

मुंबई–विधान परिषदेच्या 6 पैकी 4 जागांवर बिनविरोध निकाल लागणार आहेत. यात मुंबईतील दोन जागा आणि कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार मतदारसंघ यांचा समावेश आहे. तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा या दोन जागांचे निकाल अजूनही बाकी आहेत. यामध्ये नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे रविंद्र भोयर यांच्यात लढत आहे.धुळे-नंदुरबार विधान परिषद जागेवर आमदार अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांच्यासह अन्य चौघा जणांनी माघार घेतल्यामुळे ही बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अमरिश पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीने तळोदाचे नगरसेवक गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती.कोल्हापुरात राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपच्या अमल महाडिकांसह, शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता. मात्र, काँग्रेस आणि भाजपमध्ये बिनविरोध करण्यावर एकमत झाले. धुळे-नंदूरबारमधून काँग्रेसने माघार घेण्याची भूमिका घेतल्यानंतर भाजपने अमल महाडिकांचा अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली. धनंजय महाडिकांच्या सूचनेुनसार अमल महाडिक आणि शौमिका महाडिकांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

संविधान दिनाचा जागर घरोघरी व्हावा: खोब्रागडे

0

कॅटलिस्ट फाऊंडेशनतर्फे संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

पुणे ता. २६ : “नागरिकांवर अन्याय अत्याचार होऊ द्यायचे नसतील तर त्यांना संविधानाने दिलेले अधिकार माहीत व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर प्रशासनात काम करणाऱ्या प्रत्येकाला संविधानानुसार कर्तव्याची जाणीव ठेवायलाच पाहिजे. यासाठी संविधान दिनाचा जागर घरोघरी झाला पाहिजे, असे मत संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड खोब्रागडे यांनी येथे व्यक्त केले.

कॅटलिस्ट फाऊंडेशन व भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने, पीएमपीएलचे अध्यक्ष प्रकाश ढोरे यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त ई. झेड खोब्रागडे यांचे ऑनलाइन व्याख्यान घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

खोब्रागडे म्हणाले, “संविधानाने देशातील विषमता संपुष्टात आणली. तसेच प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार प्रदान केले. आपल्या देशाचा अभिमान असणाऱ्या या संविधानाचे महत्व लहान वयातच मुलांमध्ये रुजावे, या उद्देशाने मी २००५ पासून जिल्हा परिषदेच्या शाळेत संविधान प्रास्ताविका वाचनाचा उपक्रम सुरू केला. त्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना संविधान प्रास्ताविका शाळेच्या पुस्तकात छापण्याची कल्पना सुचवली. २००८ मध्ये राज्यात संविधान दिनाचा कार्यक्रम सुरू झाला. नागपूरमधील आरबीआय चौकाला नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे संविधान चौक नाव देण्यात आले. नंतर येथे संविधान प्रास्ताविका लावण्यात आली. देशातील हा पहिला संविधान चौक आहे. मात्र २००८ नंतर राज्याने हा कार्यक्रम व्यवस्थित सुरू ठेवला नाही, हे खेदाने म्हणावे लागेल.

ते पुढे म्हणाले की, केवळ हा एक विशेष दिवस म्हणून साजरा होता कामा नये. याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी गावागावात संविधान साहित्य संमेलन, पुस्तक मेळावे, निबंध स्पर्धा घेतल्या गेल्या पाहिजे. ज्यायोगे उस्फूर्तपणे नागरिक यात सहभागी होतील, लेखन करतील, मुक्तपणे चर्चा करतील. परिणामी, या संविधानास अपेक्षित असणारा उल्लेखनीय व आशादायी बदल समाजात घडण्यास आरंभ होईल.

आजचे औचित्य साधून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत दिवसाचा शुभारंभ केला. माझ्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना असून हा एक सकारात्मकतेकडे नेणारा बदल आहे, असेही खोब्रागडे यांनीआवर्जून नमूद केले. ऑनलाइन माध्यमातून सहभागी झालेल्या नागरिकांसाठी खोब्रागडे यांचे व्याख्यान मार्गदर्शनपर व प्रेरणादायी ठरले.
संविधान प्रास्ताविका,
पुस्तकांचे वाटप

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर सुनील माने तसेच पीएमपीएलचे अध्यक्ष प्रकाश ढोरे यांच्या वतीने औंध रोड, बोपोडी येथील नागरिक, सोसायट्या, विविध धार्मिक स्थळे, तसेच विविध तरुण मंडळे यांना संविधान प्रस्ताविका व संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले.