पुणे:“ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे वैभव हे अद्वितीय आहे. आळंदी येथे घाटाची निर्मिती करणारे डॉ. विश्वनाथ कराड यांच्यामुळे वारकर्यांची खूप मोठी सोय झाली. पुढे ही त्यांच्या हातून येथे मोठा कायापालट होईल. आळंदी नगरपरिषदेकडून त्यांच्या सर्व कार्यांना शुभेच्छा असेल.”असे विचार आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.वैजयंताताई अशोक उमरगेकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.या सोहळ्याला ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त श्री.योगेश देसाई, श्री तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री.नितीन महाराज मोरे, अशोक उमरगेकर, सौ. हेमलता काळोखे, विठ्ठल काळोखे, रमेश काळोखे, बाळासाहेब काळोखे, बबनराव कुर्हाडे पाटील, ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे यांचे पूत्र ह.भ.प. चिदंबरम महाराज साखरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा.स्वाती कराड-चाटे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी सौ.उषा विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, केंद्रे महाराज संस्थांचे प्रमुख ह.भ.प.श्री. विष्णु महाराज केंद्रे हे उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ कोणतेही सामाजिक कार्य करतांना नागरिकांचा विरोध होतच असतो. परंतू आपले लक्ष विचलित करुन नये असा सल्ला मला तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या सूत्रानुसार आळंदी येथे घाटाची निर्मिती झाली. ईश्वर कृपेने बद्रिनाथ येथे ६३ दिवसात माता सरस्वती मंदिराची निर्मिती झाली. माऊलीच्या आशीर्वादाने आळंदी-देहू आज जगाच्या नकाशावर आले आहे. त्यामुळे वारकरी परंपरा संपूर्ण जगात पोहचली आहे.”
ह.भ.प.श्री. विष्णु महाराज केंद्रे म्हणाले,“ कोणतेही कार्य करतांना अहंकार येऊ देऊ नका. ज्ञान आणि निष्ठेने कार्य करणारे डॉ. कराड यांनी बद्रिनाथ येथे दिव्य भव्य मंदिर उभे केले. विज्ञान आणि अध्यात्माची जोड देऊन त्यांनी जगाला नवी ओळख करुन दिली आहे. तसेच माऊलींचा संदेश आणि तत्त्वज्ञान जगभर पसरविण्याचे कार्य ते करीत आहेत.”
हेमलता काळोखे म्हणाल्या,“कोरोना काळामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ती आज वारकर्यांच्या उपस्थितीने भरुन निघाली आहे. माऊलींच्या आशीर्वादानेच ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. ”
ह.भ.प.चिदंबर महाराज म्हणाले,“विवेकपूर्ण ज्ञान संपदेसाठी अध्ययन हेच सर्वात महत्वाचे आहे. माऊलींनीही अध्ययनावर भर देऊन शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहचविण्याचे कार्य केले. जेथे संपत्ती आणि दया असते तेच विभूती असते आणि हे डॉ. कराड यांच्या रुपाने मिळाले आहेत.”
प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या,“आळंदी देहू परिसर विकास समितीची स्थापना झाल्यानंतर येथे घाटाची निर्मिती झाली आहे. तसेच, लोक शिक्षणपर कार्यक्रम चालवून येथे येणार्या वारकर्यांना मार्गदर्शन केले जाते. कोरोनाच्या काळानंतर पुन्हा ही भूमी वारकर्यांच्या चैतन्य ऊर्जेने भरलेली आहे. आता पुन्हा नवी उमेद मिळत आहे.”
नितीन महाराज मोरे व भानुदास महाराज यांनी ही आपले विचार मांडले. त्यानंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
श्री.शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.
संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे वैभव अद्वितिय -नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर
येत्या 1 जानेवारीपासून राज्यभरात ऑनलाईन बांधकाम परवानगी
पुणे दि. 27: घर खरेदी करू इच्छिणारे सर्वसामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक, विकासक, वास्तुविशारद आदी बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्वच घटकांना राज्य शासनाने तयार केलेल्या ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ अर्थात ‘युनिफाईड-डीसीपीआर’मुळे दिलासा मिळेल, असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
राज्याचा नगरविकास विभाग आणि पुणे मेट्रो क्रेडाई (कॉन्फेडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) यांच्यासमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगररचना संचालक एन.आर. शेंडे, संचालक सुधाकर नानगुरे, अविनाश पाटील, क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, महाराष्ट्र अध्यक्ष सुनील फुरडे, क्रेडाई पुणे मेट्रो अध्यक्ष अनिल फरांदे, क्रेडाईचे महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजीव पारेख, नगररचना सहसंचालक सुनील मरळे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. शिंदे म्हणाले, घर आणि बांधकाम प्रकल्पांसाठी लागणाऱ्या परवानग्या, मिळण्यासाठीची अवघड प्रक्रिया सुलभ करण्यासह गतीने परवानग्या मिळाव्यात यादृष्टीने शासनाने युडीसीपीआर नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) गणनेच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
150 स्क्वेअर मीटरचे घर स्वत:ला राहण्यासाठी बांधू इच्छिणाऱ्या नागरिकांना केवळ बांधकाम परवाना देणाऱ्या प्राधिकरणाला कागदपत्रांसह कळवण्याची तरतूद केली असून प्राधिकरणाकडून कोणत्याही परवानगीची गरज ठेवली नाही. तसेच 150 ते 300 स्क्वेअर मीटर पर्यंच्या बांधकामासाठी प्राधिकरणाला आवश्क कागदपत्रांची पूर्तता करुन बांधकामाबाबत कळवल्यास 10 दिवसात बांधकाम परवाना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेऊन अशा अनेक तरतुदी केल्या आहेत.
1 जानेवारीपासून ऑनलाईन बांधकाम परवानगी
काही महानगरनगरपालिका तसेच नगरपालिकांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा तयार केली असून येत्या 1 जानेवारीपासून मुंबई महानगरपालिका आणि इको- सेन्सिटीव्ह झोन वगळता संपूर्ण राज्यात अशा प्रकारची व्यवस्था सुरू केली जाणार आहे.
जुन्या बांधकाम प्रकल्पांचा पुनर्विकास करण्यासाठी अधिक एफएसआय देण्याची तरतूद करण्यात आली असून त्याचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. बांधकाम व्यवसायिकांच्या प्रकल्पांनाही त्यामुळे चालना मिळणार आहे.
रिअल इस्टेट हा शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रोजगार पुरवणारा व्यवसाय आहे. कोरोना कालावधीमध्ये या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला होता. परंतु त्याला उभारी देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात तसेच इतर निर्णय घेतल्याने घर खरेदीला चालना मिळून हा व्यवसाय संकटातून बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न शासनाने केला आहे. युडीसीपीआरमध्ये केलेल्या तरतुदींचा लाभ बांधकाम व्यावसायिकांना होणार असल्याने त्यांनी तो शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत अर्थात घर खरेदीदारांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.
राज्यात समृद्धी महामार्ग, मुंबई- गोवा मार्ग, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर जगातील सर्वाधिक रुंदीच्या नवीन बोगद्याचे काम अशी रस्ते वाहतुकीला गती देणारी कामे सुरू असून रस्त्यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई, पुणे येथे मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा त्रास आणि वेळ कमी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.
राज्याने तयार केलेला युडीसीपीआर हा आदर्शवत झाला असून इतर राज्येदेखील याची अभ्यासासाठी मागणी करत आहेत. आज अनावरण केलेली युडीसीपीआर-एफएक्यू (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) ही पुस्तिका ‘युनिफाईड-डीसीपीआर’ची माहिती सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात नगररचना संचालक श्री. शेंडे युडीसीपीआर-एफएक्यू पुस्तिकेतील महत्त्वाच्या बाबींचे संगणकीय सादरीकरण केले. क्रेडाईचे सतीश मगर तसेच राजीव पारीख आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रत्येक जिल्ह्यात संगणक आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण देणार -अजित निंबाळकर
पुणे दि.27- खाजगी क्षेत्रातही युवक-युवतींनी यशस्वी होण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले संगणक आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यात देऊन सारथी संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल, असे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळा आणि सारथी संस्थेतर्फे आयोजित संघ लोकसेवा आयोग परीक्षा-2020 यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच विद्यावाचस्पती पदवीधारकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाला माजी अपर मुख्य सचिव नानासाहेब पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, संचालक उमाकांत दांगट, श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित होते.
श्री.निंबाळकर म्हणाले, संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या लेखी परीक्षेची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. मात्र शासकीय सेवेसोबत खाजगी क्षेत्रातही यश संपादन करण्याची युवकांची क्षमता आहे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी सारथीचे कार्य अधिक विस्तारण्याचे नियोजन आहे. युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
संघ लोकसेवा आयोग परीक्षा-2020 मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आपण जनसेवक आहोत याची जाणिव ठेवीत संविधान आणि देशाविषयी निष्ठा बाळगून काम करावे. कायद्याचा अभ्यास करण्यासोबत लोकप्रतिनिधींचा सन्मानदेखील ठेवावा. त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी करून घ्यावा. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात वरिष्ठांसोबत कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून मिळणारे प्रशिक्षण अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
श्री.पाटील म्हणाले, युवकांनी ज्ञान, क्षमता आणि महत्वाकांक्षेच्या आधारे यश खेचून आणावे. त्यासाठी सारथी संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा त्यांनी लाभ घ्यावा. शेती क्षेत्रातील अडचणी लक्षात घेता शिक्षणाच्या साह्याने इतर क्षेत्रात यश मिळविण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करावे. शिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षि शाहू महाराज यांचा दृष्टीकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच युपीएससी परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कमी कालावधीत विद्यावाचस्पती पदवी मिळविणाऱ्या सारथीच्या छात्रवृत्तीधारकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना स्पर्धा परीक्षेतील यशात सारथी संस्थेचे महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात श्री.काकडे म्हणाले, संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सारथीचे 22 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. मराठा आणि कुणबी समाजातील 705 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी फेलोशिप देण्यात आली असून एका वर्षात 21 कोटी वितरीत करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाला सारथीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, पीएचडी मार्गदर्शक उपस्थित होते
संविधान दिनानिमित्त सभागृह नेते गणेश बिडकरांच्या विविध उपक्रमांना तुडूंब प्रतिसाद
पुणे-भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांना खाऊचे वाटप तसेच विधी सेवा माहिती प्रदर्शन घेण्यात आले. महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

करोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडणारे स्वच्छता कर्मचारी, पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे, निलेश आल्हाट, रीना आल्हाट यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. प्रभागातील मंगळवार पेठ मधील जुना बाजार गाडीतळ येथील तथागत भगवान गौतम बुद्धनगरच्या कमानीला कायमस्वरूपी साजेशी विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. गेले अनेक वर्षांपासून हे काम प्रलंबित होते. हे काम पूर्ण झाल्याचा विशेष आनंद असल्याच्या भावना सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केल्या.

संविधानाने वाचन करून त्याचे आचरण करण्याची शपथ घेण्यात आली. स्मृतिचिन्ह तसेच राज्य घटनेची प्रत देऊन ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. लहान मुलांना खाऊ वाटप देखील यावेळी करण्यात आले.

संकटं जितकी गंभीर.. तितका महाराष्ट्र खंबीर…-उपमुख्यमंत्री अजित पवार
आर्थिक घडी विस्कटली नाही…
विकासकामे थांबली नाहीत..
विकासाची प्रक्रिया निरंतर सुरुच…
-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 27 :- “महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा, आकांशा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला. कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम रहावं. नागरिकांमध्ये एकता, समता, बंधुतेची भावना वाढावी. सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढेही निष्ठेनं काम करीत राहील. दोन वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या सर्वांचं मी मन:पूर्वक आभार मानतो. सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त सर्वांचे आभार मानले असून राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार मानताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील सत्तास्थापनेला आज दोन वर्षे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आलं. या दोन वर्षांच्या काळात राज्यावर कोरोना, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळासारखी अनेक नैसर्गिक संकटं आली. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली. त्याचा उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. संकटं किती मोठी असली तरी महाराष्ट्र कधी खचला नाही. कुणापुढे झुकला नाही. संकटं जितकी गंभीर.. तितका महाराष्ट्र खंबीर… हा इतिहास आहे. महाविकास आघाडी सरकारनं ती परंपरा कायम राखली. महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसू दिली नाही. प्रत्येक संकटाचा यशस्वी मुकाबला करण्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारनंही कायम ठेवली. राज्यातील प्रत्येकाला सोबत, विश्वासात घेऊन सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं, एकजुटीनं राज्यावरच्या संकटावर मात केली. प्रत्येक महाराष्ट्रवासियाला याचा अभिमान आहे.
राज्यावरचं कोरोना संकट अभूतपूर्व असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, फार्मासिस्ट, सफाई कामगार, पोलिस, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनं जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरोधी लढ्यात अमूल्य योगदान दिलं आहे. या कोरोनायोद्ध्यांचं उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले असून कोरोनायोद्ध्यांचा त्याग महाराष्ट्र कायम लक्षात ठेवील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोरोना संकटांच्या बरोबरीनं राज्यासमोर आर्थिक आव्हानंही उभं राहिली. या आव्हानांचा सामना करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, राज्यातली विकासकामे थांबणार नाहीत. विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरु राहील याची संपूर्ण काळजी घेण्यात आली. रस्ते, रेल्वे, मेट्रो, कोस्टलरोड, उड्डाणपूलांसारख्या पायाभूत प्रकल्पाची कामे गतीमान करण्यात आली. पायाभूत प्रकल्प निर्मितीबरोबरंच नागरिकांचं रोजचं जगणं सुसह्य होईल यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. धोरणं आखून अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी बांधिल असल्याचा पुनरुच्चार केला. शेतकरी कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, आमदार स्थानिक निधीत वाढ, आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत, आरोग्य सेवेचे सक्षमीकरण, शिवभोजन थाळी, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी भरीव निधी अशा अनेक निर्णयांची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुतळा जयंतीदिनी अनावरण करण्याचे नियोजन करा
पुणे, दि. 27: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाला आणि इमारतीला साजेसा असा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा. सावित्रीबाईंच्या येणाऱ्या जयंतीदिनी 3 जानेवारी रोजी या पुतळ्याचे अनावरण होईल अशा पद्धतीने सर्व काम पूर्ण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याबाबत सर्किट हाऊसमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील स्मारके समितीची आणि महानगरपालिकेच्या वारसा स्थळ (हेरिटेज) समितीची ना-हरकत देऊन तात्काळ या कामास सुरुवात करावी. हेरिटेज समितीकडून पुतळ्याच्या कामास ना- हरकत देण्याबाबत हेरिटेज समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांना त्यांनी दूरध्वनीवरुन सूचना दिल्या. त्यावर येत्या 8 डिसेंबर रोजी समितीची बैठक असून यामध्ये या स्मारकाबाबत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ ना-हरकत दिली जाईल असे श्री. दळवी यांनी सांगितले.
यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांनी स्मारकाविषयी माहिती दिली. पुतळा बसवण्याच्या जागेची विद्यापीठ प्रशासनाबरोबर संयुक्त पाहणी केली आहे. त्यानुसार मुख्य इमारतीसमोर पुतळा बसवणे उत्तम ठरणार आहे असे लक्षात आले आहे. कात्रज येथील परदेशी स्टुडीओमध्ये पुतळा बनवण्याचे काम सुरू असून आज त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. जयंतीदिनी हा पुतळा बसवण्यात यावा असे श्री. भुजबळ म्हणाले.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या, ना-हरकत देण्याबाबत मंत्री उदय सामंत आणि प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांना सूचना दिल्या. पुतळा विद्यापीठाच्या संरक्षित जागेत असल्याने त्यासाठी मानकांमध्ये आवश्यक ती शिथीलता द्यावी, असेही श्री. भुजबळ यांनी सूचवले.
बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. हरी नरके, विद्यापीठाचे प्रबंधक डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.
भिडेवाड्यात आद्य मुलींची शाळा उभारण्याचे नियोजन : मंत्री छगन भुजबळ
फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे दि. 27: राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्या. मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करणे तसेच या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्यावतीने सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
पुणे येथील राष्ट्रीय स्मारक असलेल्या फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाबाबत आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी फुलेवाडा आणि स्मारकाचे विस्तारीकरण लवकरच भूसंपादन करण्यात यावे अशा सूचना दिल्या. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येईल असे आयुक्त आणि जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा : छगन भुजबळ
1848 साली भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यानुसार येथे सावित्रीबाई फुले मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केल्या.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या इमारतीत असलेले वाणिज्यिक गाळेधारक तसेच रहिवासी यांच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा असे सांगितले. यासंदर्भात न्यायप्रविष्ट प्रकरणात सहमतीने तोडगा काढता येईल. या वाड्यात शाळेच्या रुपाने एक चांगले स्मारक उभे राहील यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.
बैठकीस भिडेवाड्यातील गाळेधारक दुकानदार तसेच रहिवास्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका, जंबो कोविड सेंटरचे इन्फ्रास्ट्रक्चर काढू नये -आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे : कोरोना साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन कोरोना व्हायरस ओमिक्रॉन व्हेरिएंट या नव्याने आढळलेल्या धोकादायक विषाणुबाबत प्रशासनाने सतर्कता बाळगावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.कोरोनाच्या नव्या विषाणुचा धोका लक्षात घेता शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटरचे इन्फ्रास्ट्रक्चर काढू नये ,असेही शिरोळे यांनी सांगितले.
कोविड-१९च्या अनुषंगाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कार्यवाहीचा आढावा घेण्याकरिता उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी बैठक झाली. त्यात सहभागी होऊन आमदार शिरोळे यांनी विविध मुद्दे मांडले.कोरोनामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा नागरिकांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांपर्यत पोहोचण्यासाठी मृत व्यक्तिंची यादी शासनाने लोकप्रतिनिधींनाही द्यावी, त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्यास शासनास मदत होईल, असे आमदार शिरोळे यांनी सुचविले.पुण्यातील कोरोना कंट्रोल मॉडेलचे डॉक्युमेंटेशन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आ. शिरोळे यांनी दिली.
मेट्रो, उड्डाणपूल कामामुळे
वाहतूक कोंडी होऊ देऊ नका
हिंजवडी मेट्रो मार्ग आणि पुणे विद्यापीठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कळविली आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू होत असताना त्या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कामाशी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी असे पत्र आमदार शिरोळे यांनी दि. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी पालकमंत्री पवार यांना दिले होते. या पत्राची दखल घेऊन आज शनिवारी पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. वाहतूक नियोजन आराखड्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, नियमित बैठका घेऊन अडचणी सोडवल्या जाव्यात अशी सूचना आ. शिरोळे यांनी केली. सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक नियोजन काटेकोरपणे होईल, असे सांगितले.
“अवयवदान म्हणजे समाजाचे ऋण फेडण्यासाठी निसर्गाने दिलेली आणखी एक संधी आहे”: डॉ. भारती पवार
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021
“जिवंतपणी रक्तदान आणि मरण पावल्यावर अवयवदान : हे आपल्या जीवनाचे बोधवाक्य असले पाहिजे”: असे उद्गार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब विकास मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज 12 व्या भारतीय अवयवदान दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत काढले.
मृत दात्याकडून मिळालेल्या अवयवाच्या रोपणानंतर एका रुग्णाला मिळालेली नव्या जीवनाची भेट साजरी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन करून केंद्रीय मंत्र्यांनी देशातील अवयव दात्यांपेक्षा अवयव रोपणासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली असताना, अवयव दानाला प्रोत्साहन दिले. जवळच्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अत्यंत दुःखद प्रसंगी मृत व्यक्तीच्या अवयव दानासाठी परवानगी देणाऱ्या कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
अवयव दानाचे महत्त्व सांगताना डॉ. मांडवीय म्हणाले की आपल्या संस्कृतीमध्ये शुभ आणि लाभ या संकल्पनांवर भर देण्यात आला आहे, कारण आपल्याकडे व्यक्तीचे स्वास्थ्य समाजाच्या लाभासाठी उपयोगात येते. अवयवदानासारख्या उदात्त कारणासाठी साजऱ्या होत असलेल्या 12 व्या भारतीय अवयवदान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे हा मी माझा सन्मान समजतो. मृत दाते आणि त्यांच्या कुटुंबांनी समाजाप्रती दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ 2010 या वर्षीपासून भारतीय अवयव दान दिन साजरा करण्यात येतो.
सर्व लोकांनी केवळ त्यांचे अवयव दान करून थांबता कामा नये तर सध्या आपल्या देशात प्रत्यारोपणासाठी अवयवांची जी कमतरता आहे ती लक्षात घेऊन अवयवदानाबाबत जनजागृती करावी आणि इतरांना यासाठी पुढे येण्याकरिता प्रोत्साहित करावे अशी आग्रही विनंती मांडवीय यांनी केली. या संदर्भातील अधिक उत्तम समन्वयासाठी समाजातील सर्व घटक, संवेदनशील नागरिक, सरकार आणि माध्यमांचे प्रतिनिधी यांनी देखील अवयव दानाबाबत सर्व सामन्यांच्या मनात असलेली साशंकता दूर करून देशभरातील अवयव दानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सक्रीय भूमिका स्विकारायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्य पातळीवरील एसओटीटीओ प्रादेशिक पातळीवरील आरओटीटीओ आणि राष्ट्रीय पातळीवरील एनओटीटीओ या संघटनांच्या माध्यमातून अवयव दान, संकलन आणि बदल यासठी उभारण्यात आलेल्या जाळ्याच्या कामगिरीबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “मला हे सांगायला अत्यंत अभिमान वाटतो आहे की आपल्या देशात दर वर्षी होणाऱ्या अवयव रोपण शस्त्रक्रियांच्या प्रमाणात वाढ झाली असून 2013 मध्ये अशा 4990 शस्त्रक्रिया झाल्या होत्या त्यात वाढ होईन 2019 मध्ये 12,746 शस्त्रक्रिया झाल्या. अवयव दान आणि प्रत्यारोपण संदत्भातील जागतिक निरीक्षण संस्थेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारत आता अवयवदानाच्या बाबतीत अमेरिका आणि चीन यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे, अवयव दानाचा दर देखील 2012-13 च्या तुलनेत चार पटीने वाढला आहे. मात्र अजूनही प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींची संख्या आणि मृत्यूनंतर अवयव दान करण्यासाठी संमती दिलेल्या लोकांची संख्या यामध्ये मोठी दरी आहे. तसेच, कोविड-19 महामारीतून आपण लवकरच बाहेर पडू असे वाटत असले तरी या महामारीने अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाच्या घटनांवर प्रतिकूल परिणाम केला आहे.”
एखाद्या व्यक्तीला अवयवाची गरज असते तेव्हा ती व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांनी अनुभवलेली असहाय्यता आणि अवयव दान होऊन त्याचे प्रत्यारोपण झाल्यानंतर त्यांना लाभलेला आनंद यांचे वर्णन करण्यासाठी डॉ.भारती पवार यांनी त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांचा उपयोग केला.त्या म्हणाल्या की हे महान कार्य, आपल्या धर्मग्रंथांमध्ये वर्णिलेल्या ‘अमर्त्य’ या संकल्पनेपेक्षा कमी नाही. “अवयवदान म्हणजे निसर्गाने परोपकार करण्यासाठी आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी निसर्गाने दिलेली आणखी एक संधी आहे” असे मत डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.
आपल्या देशातील प्रत्यारोपण व्यावसायिकांच्या आदर्श कामगिरीचा गौरव करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी पारितोषिकांचे वितरण केले. महाराष्ट्राच्या एसटीटीओ अर्थात राज्य अवयव आणि उटी प्रत्यारोपण संघटनेला सर्वाधिक मृत दात्यांच्या अवयवांचे प्रत्यारोपण केल्याबद्दलचे पारितोषिक मिळाले तर आरटीटीओ अर्थात प्रादेशिक अवयव आणि उटी प्रत्यारोपण संघटनेला पश्चिम विभागासाठीचा उत्तम कामगिरीचा पुरस्कार मिळाला.
अवयव दान आणि प्रत्यारोपणासाठी उत्तम समन्वय राखणाऱ्या रुग्णालयांना देखील सन्मानित करण्यात आले.
अवयव दानाविषयी जागृती करण्याचा भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या भित्तीपत्रिका स्पर्धा घेऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.


मृत्युनंतर गरजूंना अवयव दान करण्यासाठी डॉ.मांडवीय यांच्या नेतृत्वाखाली प्रतिज्ञा घेतली गेली.
आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक डॉ. सुनील कुमार तसेच आरोग्य मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असलेली हवा देखील आपले आरोग्य आणि स्वास्थ्य ठरविते याचे स्मरण कोविडने आपल्याला करून दिले’: उपराष्ट्रपती
इमारतींच्या अंतर्भागात अधिक उत्तम वायुवीजन आणि सूर्यप्रकाश खेळावा यासाठी स्थापत्यशास्त्राचा पुनर्विचार करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021
उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज इमारतींच्या अंतर्भागात अधिक उत्तम वायुविजन आणि सूर्यप्रकाश खेळेल याची सुनिश्चिती करण्यासाठी घरांचे नियोजन आणि बांधकाम यासंबंधीच्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असलेली हवा देखील आपले आरोग्य आणि स्वास्थ्य ठरविते याचे स्मरण कोविड महामारीने आपल्याला करून दिले आहे.
यासाठी, विषाणु अनेक तासांपर्यंत हवेत तरंगत रहात असल्यामुळे सामान्य श्वसनक्रिया आणि बोलणे यामुळे देखील हवेवाटे विषाणुसंसर्ग होतो हे सिध्द करणाऱ्या संशोधन अभ्यासाचा उपराष्ट्रपतींनी संदर्भ दिला. गर्दी होऊ शकणाऱ्या जागांमधील अपुरे वायुविजन तेथील स्थिर हवेमध्ये असणाऱ्या व्यक्तींना मोढ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका निर्माण करते अशी टिप्पणी त्यांनी केली.
या संदर्भात त्यांनी पुरेसे वायुवीजन आणि नैसर्गिक प्रकाश असणाऱ्या राहण्याच्या आणि काम करण्याच्या ठिकाणांची निर्मिती करण्याचे आवाहन केले आणि हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचे आवाहन वैद्यकीय समुदायाला केले.
उपराष्ट्रपती निवासातून आभासी पद्धतीने ब्राँकस 2021 या आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपी पल्मनॉलॉजी या विषयावरील दुसऱ्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन करताना नायडू यांनी महामारीनंतर लोक श्वसन\विषयक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत असे निरीक्षण नोंदविले. तंबाखूच्या सेवनामुळे होत असलेल्या फुफ्फुस आणि घशाच्या कर्करोगाबाबत माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार आणि नागरी संस्था अशा दोघांनीही प्रभावी काम करायला हवे असे ते म्हणाले.
देशातील मुख्य शहरांमध्ये खासकरून थंडीच्या महिन्यांमध्ये घसरत चाललेल्या हवेच्या दर्जाबाबत नायडू यांनी चिंता केली. हवामान बदल आणि वाहनांमुळे होत असलेले प्रदूषण या दोन घटकांना यासाठीचे मुख्य सहभागी घटक आहेत याकडे निर्देश करत शाश्वततेच्या दृष्टीकोनातून विचार करत विकासाबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनाचा गंभीरपणे पुनर्विचार होण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. प्रत्येकाने आपापल्या जीवनशैलीचे मूल्यमापन करून शक्य तितक्या पातळीपर्यंत कार्बन पदचिन्हे कमी करण्याचा प्रयत्न करायचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
पल्मनॉलॉजीच्या क्षेत्रातील रोबोटिक्स आणि कॉनफोकल मायक्रोस्कोपी तंत्रज्ञानासारख्या आधुनिक शोधांचा उल्लेख करत नायडू म्हणाले की भारतात अनेक आधुनिक रोग चिकित्सा आणि उपचार प्रक्रिया प्रचलित आहेत आणि भारत हा जगातील सर्वात लोकप्रिय आरोग्य पर्यटनाचे ठिकाण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा उभारण्याच्या गरजेवर देखील उपराष्ट्रपतींनी भर दिला आणि यासंदर्भात खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्याच्या ग्रामीण भागातील सुविधा केंद्रांमध्ये सटेलाईट केंद्रे उभारून सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. “भारतातील गावांमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य’सुविधा पुरविण्यासाठी देशाच्या माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील पारंपरिक क्षमतांचा पुरेपूर वापर व्हायला हवा,” ते म्हणाले. सामान्य माणसाचा आरोग्यासंदर्भात होणारा खर्च कमी करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना परवडणारी आणि मिळू शकणारी आरोग्यसेवा निर्माण करण्याची विनंती त्यांनी आरोग्य सुविधा उद्योगांतील सर्व भागधारकांन केली.
देशभर वेगाने सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमुळे भारत लवकरच महामारीने निर्माण केलेल्या आव्हानांवर मात करेल असा विश्वास व्यक्त करत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रित येऊन संघभावनेने काम केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
श्वसनविषयक आजारांसह भारतात निर्माण होऊ पाहणारे असंसर्गजन्य आजारांचे आव्हान लक्षात घेऊन उपराष्ट्रपतींनी युवकांना आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवन’ शैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
“हालचाल न करण्याच्या सवयी, आरोग्य बिघडविणारे अन्न टाळा आणि योगा किंवा सायकलिंग सारखा शारीरिक व्यायाम नियमितपणे करा”, असे ते म्हणाले.
ब्राँकस 2021 परिषदेचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सह व्यवस्थापक डॉ.हरी किशन गोनुगुन्तला, ब्राँकॉलॉजी आणि हस्तक्षेपी पल्मनॉलॉजी विषयक युरोपियन संघटनेचे अध्यक्ष प्र.मोहमद मुनव्वर, यशोदा रुग्णालय गटाचे संचालक डॉ.पवन गोरुकंटी, अनेक डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक आणि इतरांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
स्व. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी जागतिक दर्जाची व्हावी !
पुणे- राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबीयांची पुण्यातील पर्वती येथील घरी जाऊन आज भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी, “मला असं वाटतं की तमाम शिवप्रेमींचं हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारी देखील आहे की, एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे.” असं बोलून दाखवलं.पुरंदरे कुटुंबीयांच्या भेटीनंतर फडणवीसांशी माध्यमांनी संवाद साधत बाबासाहेब पुरंदरेंच्या मनातील शिवसृष्टीबाबत प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांची सेवा करत करत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि विशेषता युवकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि आता ते निघून गेल्यानंतर, त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं की अतिशय उत्तम प्रकारची शिवसृष्टी तयार झाली पाहिजे. ते त्यांनी हाती घेतलेलं काम हे अपूर्ण आहे, हे कोणा एका व्यक्तीचं काम नाही, यासाठी संपूर्ण समाजाला उभं राहावं लागेल. आम्ही लोक आपल्यापरीने ही शिवसृष्टी पूर्ण करण्याकरिता जी काही आमच्यापरीने मदत करता येईल, ती निश्चितपणे करू. पण मला असं वाटतं की तमाम शिवप्रेमींचं हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारी देखील आहे की, एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे.”
ओमिक्रोन व्हेरिएंटनं चिंता वाढवली, राज्यात निर्बंध लागणार ? अजित पवार काय म्हणाले….
पुणे-करोनाचा प्रादुर्भाव आत्ता कुठे कमी होत असल्याची चिन्हे दिसत असतानाच आता करोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या करोनाच्या ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. भारतातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था असलेल्या एम्सने गंभीर इशारा दिला आहे. राज्यात देखील हा नवीन व्हेरिएंट रोखण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक घेतील, असे देखील त्यांनी सांगितले.परदेशातील येणाऱ्या विमानांबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात करोना आढावा बैठकीत बोलत होते. अजित पवार म्हणाले, “आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. उद्या पंतप्रधान देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. राज्यात नवीन व्हेरिएंट आला तर काही बंधन आणावी लागतील अशी स्थिती आहे. सध्या पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी ५० टक्के उपस्थितीचे बंधन हटवण्यात आले आहे. आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करत आहोत. तसेच १ डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.”
जम्बो कोविड सेंटर बाबत ३१ डिसेंबर ला निर्णय घेऊ – तोवर सुरूच
“पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर ३१ डिसेंबर पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तसेच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवला नियमांचे पालन करून परवानगी असणार आहे. विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत केंद्र सरकार जी नियमावली तयार करेल तिचे पालन केले जाईल.”, अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली.
तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील
एसटी संपाबाबत अजित पवार म्हणाले, “कुठलीच गोष्ट तुटेपर्यंत तानायची नसते. एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करत असताना प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा विचार करावा लागेल. बाकीच्या राज्यात मिळणाऱ्या पगाराच्या जवळपास एसटी कर्मचाऱ्यांना आणलं आहे. ते नोकरीला लागले तेव्हा सरकारी नोकरीत लागले नव्हते. आता हा विषय संपवला पाहिजे. सरकार एक दोन पावले पुढे आले असून त्यांनी देखील पुढे आल पाहिजे.”
पुण्यातील चित्रपटगृह येत्या एक डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू
पुण्यातील चित्रपटगृह, सांस्कृतिक केंद्र आणि नाट्यगृहांना येत्या एक डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र या ठिकाणी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून जिल्ह्यातील पहिली ते सातवीच्या शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मागील काही दिवसांपासून 50 टक्के क्षमतेने सुरू असणारे शहरातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नव्या व्हेरिएंटच्या मुकाबल्यासाठी सज्ज- दरम्यान शहरातील निर्बंध हटवले जात असते तरी कोरोनाच्या नव्या व्हेंरिएंटसाठी आपण सज्ज असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो हॉस्पिटलबाबत 31 डिसेंबर रोजी परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.परदेशातील येणाऱ्या विमानांबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. पवार म्हणाले, “आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. द्या पंतप्रधान देशाती मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. राज्यात नवीन व्हेरिएंट आला तर काही बंधन आणावी लागतील अशी स्थिती आहे. सध्या पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी ५० टक्के उपस्थितीचे बंधन हटवण्यात आले आहे. आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करत आहोत. तसेच १ डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.” विमानतळावरील तपासणी बंद- इतर राज्यातून विमानाने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची यापुढे विमानतळावर कोरोना बाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार नसल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही पुण्यात पोहोचलेल्या प्रवाशाला विमानतळावरही तपासणीसाठी दोन ते अडीच तास रांगेत थांबावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत होता. हे सर्व टाळण्यासाठी बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार असल्याचेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बाबतीत केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन केले जाईल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.. ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडिचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश संबधितांना आज दिले असे ते म्हणाले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंचर पोलीस ठाण्यासह खेड तालुक्यातील विकास कामांचा आढावा
पुणे दि. २७: मंचर पोलीस ठाणे आणि खेड राजगुरूनगर येथील प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे आदी विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे आयोजित बैठकीत घेतला.
मंचर (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाणे तसेच खेड तालुक्यातील राजगुरूनगर प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे, निमगाव खंडोबा मंदिर येथे रज्जू हवाई मार्ग (रोप वे) तसेच रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता आणि निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. खेड प्रशासकीय इमारतीसाठीच्या जागेबाबतची तांत्रिक अडचण त्वरित सोडवण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रशासकीय इमारत आणि पोलीस ठाण्यांच्या इमारतींच्या आराखड्यांचे सविस्तर संगणकीय सादरीकरण वास्तुविशारदांनी केले.
श्री. पवार म्हणाले, इमारती दर्शनीय दृष्टीकोनातून सुंदर आणि नागरिकांना आपल्या कामांच्यादृष्टीने आश्वासक वाटली पाहिजे. सर्व इमारतींमध्ये भरपूर हवा खेळती राहण्यासह नैसर्गिक प्रकाशव्यवस्था असावी. संपूर्ण इमारतीची विजेची गरज सौरऊर्जेद्वारे भागली पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन करावे. उद्वाहकांची व्यवस्था असली तरी प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांची जास्त ये- जा असणारी प्रांत, तहसील, दुय्यय निबंधक, भूमी अभिलेख आदी कार्यालये पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर ठेवावीत जेणेकरून ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्यांना मजले चढण्याचा त्रास होता कामा नये.
बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज!
कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन
रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा
मुंबई, दि. २७ – दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करुन त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही नगरविकासमंत्र्यांनी आज दिले.
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-१९ चा नवा घातक व्हेरियंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब असली तरी यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात, सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही, कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा, सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट तातडीने करुन घेण्याच्या सूचनाही यावेळी श्री. शिंदे यांनी दिल्या. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत, रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सामान्य नागरिकांकडून मास्क वापरण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले असून अनावश्यक गर्दीवर देखील नियंत्रण आणण्याची गरज आहे. शारीरिक अंतराची मर्यादा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या दृष्टीने सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी जनजागृती करण्याच्या सूचना देऊन प्रसंगी क्लिन अप मार्शल सारखे उपक्रम राबवून महापालिका, नगरपालिका स्तरावर मास्कची सक्ती करण्याचे निर्देशही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या १० देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अति जोखमीच्या देशातून गेल्या १४ दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घेण्याच्याही सूचना श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या प्रमुखांनी आपल्या अखत्यारितील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना द्या. सर्व यंत्रणांची तपासणी करुन घेण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार असून त्यांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात येणार नाही असे सांगून दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसे कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांग़ितले. व्हेन्टिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरता येईल यादृष्टीने ते सज्ज करुन ठेवण्यात येणार असल्याचेही श्री. काकाणी यांनी सांगितले. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार असल्याचेही श्री. काकाणी यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर दर दिवसाआड करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
पुण्यात 1 डिसेंबर पासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार
- कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे दि.27: जिल्ह्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने येत्या 1 डिसेंबरपासून कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी आणि चित्रपटगृह तसेच नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षक क्षमतेलाही परवानगी देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यातील कोविड परिस्थीती नियंत्रणात असल्याने 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात येईल. मात्र कोविडचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याने नागरिकांना मास्क घालणे आणि कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. जगातील इतर देशात पसरणाऱ्या नव्या कोविड व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात यावी.
कोविड लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांनाच विमान प्रवासाची अनुमती असल्याने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पुणे विमानतळावर तपासणी करण्यात येऊ नये. नवा व्हेरीयंट आढळलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात येईल. नुकतेच झालेले सण-उत्सव आणि नव्या व्हेरियंटचा धोका पाहता जम्बो कोविड हॉस्पिटलबाबत डिसेंबरअखेर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
लस न घेणाऱ्या नागरिकांच्या प्रबोधनावर भर द्यावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना टाळण्यासाठी व आपत्कालीन परिस्थीत तातडीने कार्यवाही करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण द्यावे, असेही अजित पवार म्हणाले.
विभागीय आयुक्त श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्याने कोविड लसीकरणाचा 1 कोटी 30 लक्षचा टप्पा पार केला असून लसीरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 431 गावात 100 टक्के पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणात वाढ झाल्याने रुग्णसंख्या व मृत्यूच्या संख्येत घट झालेली आहे. 97 टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा तर 62 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 1.6 पर्यंत कमी झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीस आमदार सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, दिलीप मोहिते, अशोक पवार, सुनिल कांबळे, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
