मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मुंबई भाजपचे सरचिटणीस मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात माझगाव न्यायलयाने मलिक यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावरील जामीन मंजूर केला आहे. यासोबतच, कोर्टाने नवाब मलिक यांना 5000 रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत.
भाजपचे मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात माझगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. कंबोज यांनी मलिकांच्या विरोधात 100 कोटींचा दावा केला आहे. या प्रकरणात कोर्टाने गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, सोमवारी सुनावणी झाली आणि मलिकांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 डिसेंबर रोजी होणार आहे.
मलिकांनी म्हटले होते ‘मुंबईतील क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात मास्टरमाइंड‘
मुंबईतील क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात एनससीबीने 3 ऑक्टोबर रोजी धाड टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काहींना अटक केली होती. तेव्हापासूनच नवाब मलिक यांनी एनसीबीच्या विरोधात एकानंतर एक आरोपांची मालिकाच सुरू केली. “आर्यन खानला अटक नाही तर त्याचे अपहरण करण्यात आले आणि खंडणी मागण्यात आली. या संपूर्ण कटकारस्थानाचे मुख्य सूत्रधार मोहित कंबोज आहेत.” असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदांमधून केला होता. याच प्रकरणी मोहित कंबोज यांनी मलिकांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाच्या अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला.आर्यन खानच्या अटकेनंतर चर्चेत आलेले मोहित कंबोज मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. सोशल मीडियावर त्यांनी स्वतःला भाजप कार्यकर्ता म्हटले आहे. पण, गेल्या काही वर्षांमध्ये ते भाजपमध्ये विविध पदांवर होते. 2016 ते 2019 पर्यंत त्यांनी भाजपच्या मुंबई युवा शाखेचे अध्यक्ष पद भूषविले होते. ऑगस्ट 2019 पासून ते मुंबईत भाजप सरचिटणीस आहेत.
नवी दिल्ली-संसदेच्या कामकाजाला १२ वाजता पुन्हा सुरुवात करण्यात आली असून, कृषी नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आज मोठा गदारोळ झाला. त्यानंतर राज्यसभेचे सभागृह देखील स्थगित करण्यात आले होते. त्यापूर्वी लोकसभेचे सभागृह १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.
संसदेचे अधिवेशनात पहिल्याच दिवशी झालेल्या गोंधळामुळे कामकाज स्थगित केल्यानंतर काँग्रेसने सरकारच्या विरोधात सभागृहाबाहेर आंदोलन सूरू केलं आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे देखील उपस्थित होते. काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी कृषी कायद्यांच्या मुद्यावरून सरकारविरोधात निदर्शने केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सूरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाची सुरूवात गदारोळाने झाली. त्यानंतर सभागृहाचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज १२ पर्यंत स्थगित केलं. विरोधकांनी गदारोळ सूरू करताच सभापतींनी सर्व खासदारांना संसदेच्या प्रतिष्ठेचा मान ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र तरी देखील विरोधक शांत होत नसल्याचे पाहता त्यांनी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधताना अधिवेशनादरम्यान सर्व खासदारांना गदारोळ न करण्याचं आवाहन केलं होतं. संसदेच्या या अधिवेशनात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. जगभारत सध्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे भीती निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदींनी देखील सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
पुणे-प्रदर्शनीय रणगाड्याचे उद्घाटन, निबंध स्पर्धा, नामवंत चित्रकारांचे पेंटिंग्ज प्रदर्शन, 1971 च्या युद्धातील छायाचित्रांचे प्रदर्शन,व्याख्यान, देशभक्तीच्या चित्रपटांची क्लिपिंग, 75 फूट लांब तीन रंगांच्या पडद्यावर स्वाक्षरी मोहीम, युद्धस्मारक ठिकाणीपुष्पचक्र अर्पण, शंभर फूट लांब पाण्याच्या पडद्यावर 20 मिनिटांच्या थ्रीडी लेझर चित्रफितीचे उद्घाटन असे भरगच्च कार्यक्रमआणि परमवीर चक्र सन्मानाचे मानकरी सुभेदार संजयकुमार आणि अनेक आजी-माजी लष्करी अधिकारी यांच्या उपस्थितीतपुण्यात 3 ते 16 डिसेंबर 2021 या काळात ‘सुवर्ण विजय द्विसप्ताह’ साजरा केला जाणार आहे. 3 ते 16 डिसेंबर 1971 या काळात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून बांगलादेशाची स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्मिती केली त्यास यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून या ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून हे कार्यक्रम होत असून, उद्घाटन व समारोप कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचा सहयोग लाभला आहे, अशी माहिती आबा बागुल यांनी दिली.
या ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे उद्घाटन शिवदर्शन येथील कै. वसंतराव बागुल उद्यानात शुक्रवार, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रदर्शनीय टी-55 रणगाड्याच्या उद्घाटनाने होईल. भारतीय सैन्यदलाने हा रणगाडा पुणे महानगरपालिकेस भेट दिला आहे. याचे उद्घाटन लेफ्ट. जन. डी. बी. शेकटकर (निवृत्त) (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम) यांच्या शुभहस्ते होणार असून याचे अध्यक्षस्थान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ भूषविणार आहेत. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार व माजी आमदार मोहन जोशी हे प्रमुख पाहुणे असणार असून, मनपा आयुक्त विक्रमकुमार, सन्माननीय खासदार,आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवक, मनपा अधिकारी व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. पुणे महानगरपालिकेतर्फे हा कार्यक्रम सादर होईल. घनश्याम सावंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. हा प्रदर्शनीय रणगाडा त्यानंतर नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला जाईल.
हा टी-55 रणगाडा सोव्हिएत युनियनमध्ये 1963 मध्ये निर्माण करण्यात आला असून, 1965 व 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात या बॅटल टँकने मोठी कामगिरी बजावली आहे. सन 2010 मध्ये भारतीय सैन्यातून या रणगाड्याची निवृत्ती झाली. याची लांबी 6200 एमएम, रुंदी 3270 एमएम, उंची 2350 एमएम, ट्रॅक स्पेसिंग 2640 एमएम आणि वजन 36000 किलो एवढे आह 3 डिसेंबर रोजी वरील कार्यक्रमानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन येथे 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धातील निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लेफ्ट. जन. डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांच्या हस्ते संपन्न होईल. या फोटो प्रदर्शनात 2 फूट बाय 3 फूट आकाराची एकूण सुमारे शंभर छायाचित्रे असून, हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत दि. 3 डिसेंबरपासून 18 डिसेंबरपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असेल. तसेच याच कलादालनात या कार्यक्रमाच्या निमित्ताने 36 एलईडी टीव्ही बसवून बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच देशभक्तीच्या हिंदी व मराठी युद्धविषयक चित्रपटांतील निवडक क्लिपिंग्ज यावर दाखवल्या जाणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फिल्म डिव्हिजन यांचा सहयोग यासाठी लाभला आहे. 1971 चे युद्ध सार्या देशाने आकाशवाणी व वृत्तपत्रांतून अनुभवले. ब्लॅक आउट, सायरन असे शब्द नागरिकांच्या जीवनाचा अंग बनले. त्या युद्धकाळातील आठवणींवर आधारित ‘1971 चे युद्ध’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये 500 शब्दांपर्यंत हे निबंध आबा बागुल यांचे शिवदर्शन येथील कार्यालय येथे समक्ष अथवा ppwalimbe@gmail.com या संकेतस्थळावर 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत नाव, पत्ता व फोन क्रमांकासह पाठवावेत. या निबंध स्पर्धेमध्ये ज्यांना 1971 च्या युद्धाच्या आठवणी माहीत असतील त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आबा बागुल यांनी केले आहे. यासाठी ज्येष्ठ पत्रकारांची परीक्षक समिती नेमण्यात आली असून, याचे बक्षीस वितरण व चित्रकारांचा सत्कार 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न पं. भीमसेन जोशी ऑडिटोरियम येथे लेफ्ट. जन. राजेंद्र रामराव निंभोरकर (निवृत्त) (पीव्हीएसएम, यूएसएम, एव्हीएसएम, एसएम, बार-2, व्हीएसएम) यांच्या हस्ते संपन्न होईल. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहतील. या ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहात रविवार दि. 5 डिसेंबर रोजी संभाजी उद्यान येथील पदपथावर, जंगली महाराज रस्ता येथे सकाळी 7 वाजल्यापासून पुण्यातील सुमारे 25 नामवंत चित्रकार ‘पंतप्रधान इंदिरा गांधी व 1971 चे युद्ध’ या विषयावर प्रत्यक्ष पेंटिंग्ज (चित्र) काढणार असून, ही पेंटिंग्ज प्रत्यक्ष साकारताना बघण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. याचे उद्घाटन ब्रिगेडियर अजित आपटे व व्यंगचित्रकार चारुहास पंडित करणार आहेत. याचे प्रदर्शन 6 डिसेंबरपासून 18 डिसेंबरपर्यंत भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन, बागुल उद्यान, शिवदर्शन येथे सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असेल. या ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहात अन्य कार्यक्रमांमध्ये 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घोरपडी येथील युद्धस्मारकास दक्षिण महाराष्ट्र व गोवा विभागाचे जीओसी इन सी मेजर जनरल आय. जे. सिंग व आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 फुटी लांब तीन रंगांच्या पडद्यावर‘एक स्वाक्षरी शहीद जवानांच्या अभिवादनासाठी’ हा कार्यक्रम संपन्न होणार असून, याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार व डॉ. कुमार सप्तर्षी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिर आवारात संपन्न होईल. दि. 16 डिसेंबर रोजी या ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाची सांगता समारंभपूर्वक केली जाईल. पुणे महानगरपालिकेतर्फे हा कार्यक्रम सादर होणार असून, शिवदर्शन येथील वसंतराव बागुल उद्यान येथे साकारलेल्या भव्य कारंज्याच्या आधारे तयार होणार्या 100 फूट लांब व 20 फूट उंच पाण्याच्या पडद्यावर 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित थ्रीडी लेझर चित्रफितीचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास 1999 च्या कारगिल युद्धात परमवीर चक्र सन्मानाचे मानकरी सुभेदार संजयकुमार उपस्थित राहणार असून, अनेक मान्यवर नेते व निवृत्त लष्करी अधिकारी या प्रसंगी उपस्थित राहतील. देशातील अशा पद्धतीने पाण्याच्या पडद्यावर सादर होणारी ही पहिलीच थ्रीडी लेझर चित्रफीत असेल. पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पेनूत साकारणार्या या ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे नियोजन गेले सहा महिने चालू असून, हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी तसेच नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, सागर आरोळे इत्यादी विशेष प्रयत्न करीत आहेत.
महसूल गुप्तचर संचालनालयाने देशात तस्करी होत असलेल्या आयफोनचा साठा पकडला आहे.
अचूक गुप्तचर माहितीच्या आधारावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी 26.11.2021 रोजी दोन मालाची तपासणी केली. हा माल हॉंगकाँगहून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACC), आला होता. आयात मालाच्या दस्तऐवजांमध्ये हा माल “मेमरी कार्ड” म्हणून जाहीर करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्ष तपासणीत असे दिसून आले की मालामध्ये खालील वस्तू होत्या-
Description
Quantity
iPhone 13 Pro
2,245
iPhone 13 Pro Max
1,401
Google Pixel 6 pro
12
Apple Smart Watch
1
अशा प्रकारे, रोखलेल्या मालामध्ये एकूण 3,646 (तीन हजार सहाशे सेहेचाळीस) आयफोन-13 मोबाईल फोन सापडले. कागदपत्रात नमूद न केलेले वर उल्लेख केलेले मोबाईल फोन आणि ऍपल स्मार्ट घड्याळ,या वस्तू सीमा शुल्क कायदा, 1962 अंतर्गत जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे रु. 42.86 कोटी रुपये होती तथापि मालाचे घोषित मूल्य फक्त 80 लाख रुपये होते.
आयफोन 13 मॉडेल सप्टेंबर 2021 पासून भारतात विक्रीसाठी आले, ज्याची मूळ किंमत रु. 70,000/- रुपये होती आणि काही उच्च श्रेणीतील मॉडेल्सची किंमत 1,80,000 रुपये होती. भारतात मोबाईल फोन्सच्या आयातीवर 44% प्रभावी सीमाशुल्क लागू होते.
तस्कर आयफोन 13 सारख्या नवीनतम उत्पादनांसाठी त्यांचे तस्करीचे नेटवर्क किती लवकर प्रस्थापित करतात हे या अत्याधुनिक मॉडेल्सच्या फोनच्या इतक्या मोठ्या प्रमाणावरील तस्करीच्या प्रयत्नातून आढळून येते. या शोधामुळे एक गंभीर आयात फसवणूक उघडकीस आली आहे, ज्यामुळे लक्षणीय महसूल परिणाम दर्शवणाऱ्या तस्करीच्या अनन्य आणि अत्याधुनिक पद्धती शोधून त्यांचा मुकाबला करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. देशाच्या आर्थिक सीमांचे रक्षक म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालय तस्करीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे
निराशेच्या जीवघेण्या थंडीत आशेचा दीप लावण्याची प्रेरणा देणाऱ्या, झेकोस्लावियाचा दिग्दर्शक व्हॅक्लाव्ह कद्रन्का यांच्या ‘सेव्हिंग वन हू इज डेड’ चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार
मराठी चित्रपट ‘गोदावरी’ ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार; निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी अभिनेता जितेंद्र भिकुलाल जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा रौप्य मयूर पुरस्कार तर दिग्दर्शक निखिल महाजन यांना विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार
दिग्दर्शक रॉड्रिगो डी ऑलिव्हेराच्या ‘द फर्स्ट फॉलन’ मधील भूमिकेसाठी ब्राझिलियन अभिनेत्री रेनाटा कार्व्हालोला आणि निखिल महाजनच्या ‘गोदावरी’ चित्रपटाला विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार, संयुक्तरित्या जाहीर
आपल्या अभिनयाने, सर्व ज्यूरी सदस्यांना खिळवून ठेवणाऱ्या स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना हिला शार्लोटच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार
1984 या वर्षीच्या रशियातील गुंतागुंतीच्या घडामोडी आणि भ्रष्ट समाजाच्या प्रभावी कथनासाठी रशियन दिग्दर्शक रोमन वास्यानोव्हच्या ‘द डॉर्म’ ला, स्पेशल मेन्शन म्हणजेच’ विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त.
दिग्दर्शक मारी अलेसेंद्रिनीचा ‘झाहोरी’ हा धर्म आणि वसाहतवादावर प्रकाश टाकणारा आणि पॅटागोनियाच्या मूळ स्थानिक लोकांना अत्यंत उमदेपणे सन्मान देणाऱ्या चित्रपटाची, 52 व्या इफ्फीमध्ये पदार्पणातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
स्पॅनिश चित्रपट ‘द वेल्थ ऑफ द वर्ल्ड’ द्वारे पदार्पण करणारे दिग्दर्शक सायमन फॅरिओल यांना पदार्पणातील स्पर्धा गटात विशेष उल्लेखनीय चित्रपट सन्मान
पणजी, 28 नोव्हेंबर 2021
गोव्याची राजधानी पणजी इथे गेले नऊ दिवस चाललेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीची आज रंगतदार आणि दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत,यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित, या महोत्सवाच्या विविध स्पर्धा विभागाचे ज्युरी आणि भारतीय तसेच परदेशी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचे “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपट क्षेत्राबरोबरच संस्कृती आणि सामाजिकदृष्टीने महत्वपूर्ण कलात्मक कार्यामध्ये प्रसून जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरव करण्यात आला.‘रिंग वॉन्डरींग’ हा चित्रपट फॅंटसी म्हणजेच कल्पनाविलास आणि मांगा या जपानी कॉमिक्स-प्रेरित वास्तवतेचा अत्यंत सुरेख मेळ आहे”
जपानमधील एक कामगार आणि मांगा या जपानी कॉमिक्स कलेचा हौशी कलाकार, एकदिवस काही हाडांचा शोध सुरु करतो, त्याची कलाकृति पूर्ण करण्यासाठी, या हाडांची त्याला गरज असते. मात्र, दिवसअखेर त्याचा शोध संपतो त्यावेळी, त्याच्या हातात युद्धग्रस्त जपानमधील स्मृति लागतात. युद्धाच्या या स्मृति देशाच्या सामाजिक सदसद्विवेकाने आणि सामाईक इतिहासाच्या पडद्याआड लपून गेल्या असतात. जपानी दिग्दर्शक मासाकाझू कानेको यांच्या ‘रिंग वॉन्डरींग’ या चित्रपटाची यंदाच्या 52 व्या इफ्फीमध्ये म्हणजेच, भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, सूवर्ण मयूर या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. युद्धग्रस्त काळानंतर विस्मृतीत गेलेल्या भूतकाळात दडलेल्या हजारो आत्म्यांना समर्पित असा हा चित्रपट आहे.
या चित्रपटाचे कौतुक करताना, महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटाच्या ज्युरीने 2021 च्या ‘रिंग वॉन्डरींग’ या चित्रपटाचे वर्णन, ‘कल्पनारम्य आणि मांगा -प्रेरित वास्तवाचा सुंदर संयोग असे केले आहे”. हा चित्रपट आजच्या जपानी समाजात प्रतिध्वनीत होत असलेल्या, भूतकाळाचे प्रतिबिंब आहे. या गुंतागुंतीच्या, बहुआयामी आणि देशासाठी वेदनादायक आघातांचे कथन या चित्रपटात अत्यंत संयतपणे करण्यात आले आहे, असे निरीक्षण ज्यूरी सदस्यांनी नोंदवले. दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हीच्या दर्जेदार हाताळणी मुळे हा चित्रपट एक समाधानकारक अनुभव देणारा ठरला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या चित्रपटात, युद्धाच्या काळातील आठवणी जिवंत करण्याचा प्रयत्न केला असला तरी हा चित्रपट युद्धपट नाही; त्याऐवजी, तो मानवी नातेसंबंधांवर केंद्रित आहे. सहज समजणाऱ्या गोष्टींपलीकडच्या सूक्ष्म जाणिवा जागृत करण्याचे काम हा चित्रपट करतो.
इफ्फीमध्ये रजत मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला झेक दिग्दर्शक वाक्लॅव काद्रंका यांचा चित्रपट – ‘सेव्हिंग वन हू इज डेड’
आयुष्यात आपण ज्यावेळी सर्वात कठीण परिस्थितीतून आणि आव्हानात्मक काळातून जात असतो, त्यावेळीही आपण आशा कधीच सोडू नये आणि आपण मुक्तीची ठिणगी पेटती ठेवली पाहिजे, असे संदेश देणारा हा चित्रपट आहे. निराशेच्या थंडीमध्ये आशेची मेणबत्ती पेटवणारा हा चित्रपट आहे. दिग्दर्शकाचे वडील कोमामध्ये गेल्यानंतर ते वाचण्याची शक्यता आता नाही, असे डॉक्टरांनी सांगितलेले असतानाही दिग्दर्शक आणि त्यांच्या आईने अत्यंत कुशलतेने आणि आत्मविश्वासाने जे प्रयत्न केले, त्याची ही कथा आहे.
या चित्रपटाचे परीक्षकांनी खूप कौतुक केले आहे. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केलेली धडपड अनेक अडथळे पार करीत यशस्वी होते. एका संधीप्रकाशात अडकलेल्या आईची आणि तिच्या मुलाची ही कथा जीवन आणि मृत्यूच्या कल्पनांना जोडणारी आहे‘कद्रन्का’ चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली.
मराठी चित्रपट गोदावरी ठरला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी
मराठी चित्रपट अभिनेते जीतेंद्र भिकूलाल जोशी यांना सर्वोत्तम कलाकार (पुरूष) म्हणून रजत मयूर पुरस्कार घोषित झाला. जीतेंद्र जोशी यांना ‘गोदावरी’ चित्रपटामध्ये दिवंगत मराठी कलाकार आणि चित्रपट निर्माते निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबरोबरच निखील महाजन यांचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि दिग्दर्शक रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांच्या ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटात भूमिका साकारणारे ब्राझिलचे अभिनेते रेनाटा कार्व्हालो यांना परीक्षकांचा सुवर्ण मयूर विशेष पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. जेव्हा हा पुरस्कार एखाद्या चित्रपटाला जाहीर होतो तेव्हा तो त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देण्यात येतो.
‘गोदावरी हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे”
अभिनेते जीतेंद्र जोशी
मराठी अभिनेते जीतेंद्र जोशी यांनी निखिल महाजन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटामध्ये निशिकांत कामत या पात्राची गुंतागुंतीची भूमिका ज्या कौशल्याने साकारली आहे त्याविषयी आतरराष्ट्रीय परीक्षकांनी असे मत नोंदवले आहे की, त्रस्त झालेल्या निशिकांतचे आणि त्याच्या लालबुंद डोळ्यांचे चित्रण एकाचवेळी अतिशय प्रभावी आणि शोकपूर्ण केले आहे. चित्रपटात हे पात्र एकूणच अतिशय गुंतागुंतीचे असतानाही कलाकाराने चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या रागातून वाहणारे अश्रू परिणामकारक ठरतात, असे कौतुक परीक्षकांनी केले आहे.
जितेंद्र भिकुलाल जोशी यांना सूवर्ण मयूर, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख यावेळी देण्यात आले.
निखील महाजन यांचा गोदावरी हा चित्रपट एका माणसाची त्याच्या गोदावरीशी असलेल्या नात्याने दिलेली प्रेरणा आणि प्रोत्साहन यातून पुरातन परंपरा आणि संस्कृती जपण्याची तात्विक आस दर्शवितो. या नदीचे 2020 मधील रूप दाखवून तिची भक्ती करणाऱ्यांचे वंशज शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपटाचे परीक्षकांनी पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. “गोदावरी हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे आणि बदलत्या काळात नद्या कशा प्रकारे विद्रूप होतात हे दाखविणारा एक मार्ग आहे” या पवित्र नदीमधील अतिप्रमाणात झालेल्या प्रदूषणामुळे तिचे पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे हे दाखविताना चित्रपटातील नायक संताप आणि अंतर्गत वादळाचा अनुभव घेतो, या चित्रपटातील प्रमुख पात्राचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनांच्या माध्यमातून त्याची मनस्थिती अत्यंत समर्थपणे मंडळी आहे असे निरीक्षण परीक्षकांनी नोंदविले.
1980 च्या दशकात ब्राझीलमध्ये लैंगिक अल्पसंख्याकांनी भोगलेल्या दुःख आणि भेदभावाच्या आतापर्यंत समोर न आलेल्या कथा मांडण्याचा दिग्दर्शक रॉड्रिगो डी ऑलिव्हेरा यांचा उत्कट आणि धाडसी प्रयत्न म्हणजे ‘द फर्स्ट फॉलन’. चित्रपट हे जसे भूतकाळाचे एक चित्र आहे तसेच वर्तमानाचेही आहे. ब्राझिलियन अभिनेत्री आणि सहाय्यक दिग्दर्शिकेला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. परीक्षकांच्या मते,तिचे या चित्रपटासाठीचे योगदान अभिनयापेक्षा अधिक आहे. समाजातील परिस्थिती आणि काळाची गुंतागुंत अतिशय प्रामाणिकपणे साकारल्याबद्दल परीक्षक तिचे तिचे कौतुक करतात.
स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना यांना त्यांच्या शार्लोट हे पात्र रंगवताना सहानुभूती आणि नैराश्य सारख्याच प्रमाणात दर्शविणारे आकर्षक सादरीकरण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार जाहीर झाला आहे.
52 व्या इफ्फी मध्ये स्पॅनिश चित्रपट सृष्टीतील प्रख्यात कलाकार अँजेला मोलिना यांना सुवर्ण मयूर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दिग्दर्शक सिमॉन फ्रँको यांच्या शार्लोट या समानतादर्शक चित्रपटातील प्रमुख भूमिकेबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. या चित्रपटात मोलिना यांनी स्वप्नांतील भविष्यकाळ घडविण्यापायी भूतकाळाची वर्तमानकाळाशी सरमिसळ करण्यासाठी आयुष्य बदलून टाकणाऱ्या स्वप्नाळू प्रवासाला स्वीकारणाऱ्या गतकाळातील अभिनेत्रीची अत्यंत वास्तव भूमिका वठविली आहे.
अँजेला मोलिना यांनी साकारलेली भूमिका वयोवृद्ध प्रख्यात अभिनेत्रीची आहे जी परिस्थिती हाताळण्यात कुशल आहे आणि मनातून असुरक्षित देखील आहे असे निरीक्षण या भूमिकेबद्दल बोलताना परीक्षकांनी नोंदविले. “हे पात्र रंगवताना त्यांनी सहानुभूती आणि नैराश्य सारख्याच प्रमाणात दर्शविणारे आकर्षक सादरीकरण केले आहे आणि कॅमेऱ्यासमोरचा त्यांचा वावर अत्यंत मनमोहक असून त्याने सर्व परीक्षकांना संमोहित केले.”
मोलिनाला सूवर्ण मयूर, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख यावेळी प्रदान करण्यात आले.
1984 च्या युएसएसआरच्या (सोविएट रशियाच्या) गुंतागुंतीच्या आणि भ्रष्ट समाजाच्या प्रभावी कथनासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार ‘द डॉर्मला’ प्रदान करण्यात आला.
व्यवस्था आणि विद्यार्थी वसतिगृह चालवणाऱ्या व्यक्ती भ्रष्ट असूनही सन्मानाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या मित्रांच्या गटाला झालेला त्रास दिग्दर्शक रोमन व्हेजिएनोव यांचा रशियन चित्रपट ‘द डॉर्म’ (The DORM / Obschaga) हा चित्रपट दर्शवतो. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटाच्या परीक्षकांचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला. 1984 च्या तत्कालीन रशियामधील एका विद्यापीठाच्या संकुलातील वसतिगृहात राहणाऱ्या काही तरुणांच्या नजरेतून क्लिष्ट आणि भ्रष्ट समाजाचे चित्रण उत्तम प्रकारे केलेले असल्याचे परीक्षकांचे मत आहे.
पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट/ अर्जेंटिना: जहोरी
झहोरी ही एका निडर तरुण मुलीची कथा आहे जी तिचे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शाळा आणि पालकांविरुद्ध बंड करते. दिग्दर्शक मारी अलेझाड्रिनी यांना या चित्रपटासाठी इफ्फी 52 मध्ये पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट गटातला पुरस्कार मिळाला . जहोरी हे घोड्याचे नाव असून जंगलात जाण्याची आणि मुक्त होण्याची इच्छा आहे. या सुंदर छायाचित्रित चित्रपटात एका बंडखोर मुलाची भावना व्यक्त केली आहे. गंभीर पण कधी कधी विनोदी आणि मार्मिक असा हा चित्रपट धर्म आणि वसाहतवादावर टीका करतो आणि मूळ स्थानिक लोकांप्रति आदर व्यक्त करतो, असे परीक्षकांनी म्हटले आहे.
पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट : वेल्थ ऑफ द वर्ल्ड/ चिली- “युद्धाची निरर्थकता अत्यंत वास्तव स्वरुपात दर्शविणारा ‘द वेल्थ ऑफ द वर्ल्ड’ पाहणे हा अत्यंत थक्क करणारा अनुभव आहे”
सैनिकी शिक्षण घेतलेला शेतकरी आणि त्याचा सहकारी सैनिक यांची चिलीच्या स्वातंत्र्य युद्धाच्या आघाडीवारीन घरी येण्याबद्दलची 1814 मध्ये घडलेली कथा सांगणाऱ्या या चित्रपटाने परीक्षकांची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळविली आहे. ‘द वेल्थ ऑफ द वर्ल्ड’/ ला रिक्वेझा देल मुंडो या दिग्दर्शक आणि अभिनेत्री सिमॉन फरिओल यांच्या ‘द वेल्थ ऑफ द वर्ल्ड’/ ला रिक्वेझा देल मुंडो या पहिल्याच स्पॅनिश चित्रपटाला परीक्षकांकडून पदार्पणातील चित्रपटासाठीचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात युद्धाची निरर्थकता दाली-प्रेरित पद्धतीने अत्यंत वास्तव स्वरुपात दर्शविणारे चित्रण केले आहे अशी टिप्पणी परीक्षकांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, ला रिक्वेझा देल मुंडो हा दिग्दर्शिकेचा पहिलाच चित्रपट थक्क करणारा अनुभव देतो
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील परीक्षक मंडळ अध्यक्ष आणि इराणी चित्रपट निर्माते राख्शान म्हणाले की विविध देशांतून आलेल्या वैविध्यपूर्ण चित्रपटांचे परीक्षण करणे हा अत्यंत विस्मयकारक अनुभव होता. चित्रपटामध्ये प्रेक्षकांना मुळापासून हलवून सोडण्याचे आणि त्यांच्या हृदयाला इतक्या खोलवर स्पर्श करण्याचे सामर्थ्य असते? चित्रपट प्रेक्षकांना आश्चर्यकारक अनुभव देतो? आपल्या सामायिक मानवी परिस्थितीच्या संकल्पना किंवा नवी परिमाणे खुली करते का? चित्रपटाच्या विषयाला विचारात न घेता माध्यम आणि कलात्मक प्रतिभा या साधनांचा परिणामकारक पद्धतीने वापर करून चित्रपटाची कथा प्रभावीपणे मांडता येते का? अशा काही उत्कृष्टतेच्या परिमाणांचा कस लावून परीक्षक मंडळातील ख्यातनाम परीक्षकांनी आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्राच्या उत्कृष्ट चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली आहे अशी माहिती कोलंबिया चे दिग्दर्शकआणि परीक्षक मंडळाचे सदस्य सीरो ग्वेरा यांनी दिली.
परीक्षक मंडळाचे अध्यक्ष बानीएटमाद यांच्यासह परीक्षक मंडळाच्या सदस्यांमध्ये ब्रिटीश चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्टीफन वूल, कोलंबियाचे चित्रपट निर्माते सीरो ग्वेरा, श्रीलंकेचे चित्रपट निर्माते विमुक्ती जयसुंदरा आणि भारतीय तसेच ओडीयन चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक नीला मधाब पांडा यांचा समावेश होता.
पुणे, दि. 28 : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्यप्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी आमदार पंकज भुजबळ, दिप्ती चौधरी, कमल ढोले पाटील, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले, राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा जपण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.
श्री. बघेल म्हणाले, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले समाजसुधारणेचे कार्य महत्वपूर्ण आहे. समाजातील वंचित, मागास घटकासाठी त्यांनी कार्य केले. महिलांना समाजात सन्मान मिळावा, शेतकरी सुखी व्हावा याबाबतचा त्यांनी केलेले कार्य आजही तेवढेच महत्वपूर्ण ठरते. अशा महापुरुषांच्या नावाने सन्मान होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. बघेल व अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ यांनी फुले वाड्यात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. महात्मा फुले समता पुरस्काराने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा गौरव करण्यात आला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा जागेचे भूमिपूजन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन केले. यावेळी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके,मध्यप्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, बापूसाहेब भुजबळ, मंजिरी धाडगे, नगरसेविका मनीषा लंडकत उपस्थित होते.
पुणे दि. 28: दिवंगत भिमाजीशेठ गडगे यांच्या स्मरणार्थ वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथे बांधण्यात आलेले प्रवेशद्वार हे वडगाव आनंद गावच्या वैभवात भर टाकणारे असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथे दिवंगत गडगे यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या कळमजाईमाता प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या हस्ते आणि आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत आज झाला.
भिमाजीशेठ गडगे यांच्या स्मरणार्थ भव्य असे हे प्रवेशद्वार विघ्नहर कारखान्याचे माजी संचालक सुरेश गडगे आणि कुटुंबीयांनी बांधले आहे. या प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सुरेश गडगे, शांताबाई गडगे, राहुल खोकले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंतराव चौगुले, दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी उपसरपंच संतोष चौगुले, गोमाता दूधसंस्थेचे अध्यक्ष अशोक गडगे, सोसायटी अध्यक्ष पांडुरंग गडगे, कैलास वाळुंज, सुरेश गडगे, जालिंदर गागरे आदी उपस्थित होते. 000
लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा
विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याची देखील निर्देश
‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही
मुंबई दि 28: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. “कुछ नही होता यार” असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा.
करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ अजित देसाई, डॉ खुस्राव्ह बजान, डॉ केदार तोरस्कर, डॉ झहीर अविराणी , डॉ वसंत नागवेकर, डॉ नितीन कर्णिक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.
राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली, यामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या प्रारंभी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
ऑक्सिजन, औषध उपलब्धता तपासा, अग्निसुरक्षा ऑडिट पूर्ण करा
कोविडशी अव्याहतपणे लढत असल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केले. ते म्हणाले की, नवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती. त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे.
मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका
महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे
परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे . त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने , रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे , त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चाचण्या वाढवा, आवश्यक किटस पुरवा
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
लसीकरण करून घ्याच
छोट्या छोट्या गोष्टींनी या विषाणूला प्रतिबंध होऊ शकतो हे लक्षात ठेवा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही डोससह लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ही काळजी घेतलीच पाहिजे
का आहे ओमायक्रॉन घातक?
टास्क फोर्सच्या डॉ शशांक जोशी यांनी बैठकीत या विषाणूविषयी माहिती दिली:
कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे
डेल्टा ची जागा ओमायक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते
दुसऱ्या लाट्स कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत.
हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे
डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल 3 प्लाय मास्क आणि एन 95 प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल
खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच अधिक संधानात बाळगणे गरजेचे
आवश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा
ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी
ओमायक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे – दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या
बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही बैठक बोलविण्यामागे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले. डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून युरोप तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या विषाणूविषयी माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सच्या डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी व डॉ राहुल पंडित यांनी देखील यासंदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
पुणे दि.२८-क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने फुले वाडा येथे अभिवादन करण्यात आले. समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके यांनी महात्मा फुले वाडा पुणे येथे जाऊन महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुणे-राज्यातील ठाकरे सरकारला मी नवे नाव देत आहे, महाविश्वासघातकी आघाडी सरकार, असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहे, राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात देखील जावडेकरांनी केला आहे.
जावडेकारांनी ठाकरे सरकारचे पुन्हा नव्याने नामकरण केले आहे. अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिले, काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली. असे नाव न घेता जावडेकरांनी अनेक मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.राज्यात भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था नाही. गृहमंत्री 6 महिने फरार होते, आणि आता जेलमध्ये ते गेले, असे कोणते राज्य आहे? असा सवाल करत जावडेकरांनी सरकारला धारेवर धरले.
पुणे– महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या दोन वर्षातील भ्रष्टाचार व गोंधळ यामुळे राज्यात प्रशासन कोसळले असून खुलेआम मोगलाई अवतरली आहे. सरकारचे शेतकरी, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, अनुसूचित जाती – जमाती, विद्यार्थी, कामगार अशा कोणाकडेच लक्ष नाही. कोविडसह सर्व विषयात अपयशी ठरलेले हे सरकार संधी मिळाली की लोक फेकून देतील, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे येथे केली. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आघाडी सरकारने केलेली फसवणूक आणि सरकारचे अपयश स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बेफिकीरीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे राज्यातील प्रशासन कोसळले आहे. राज्याच्या एका पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर शंभर कोटी वसुलीचा आरोप केला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने चौकशी सुरू केली. न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि बरेच दिवस ते परागंदा होते. आरोप करणारे पोलीस आयुक्तही परागंदा होते. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत. सचिन वाझे यांना खंडणीवसुलीचा आदेश दिला असा आरोप केला गेला आहे. त्या सचिन वाझे यांना सोळा वर्षांच्या निलंबनानंतर आणि उच्च न्यायालयाची प्रतिकूल टिप्पणी असतानाही परत पोलीस खात्यात सेवेत दाखल करून घेतले. वाझे यांना परत सेवेत घेण्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण गमावले आणि ते पुन्हा लागू होण्यासाठी काहीही हालचाल नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी अध्यादेश काढला तरी त्याला उच्च न्यायालयात आव्हान मिळाले असून अनिश्चितता आहे. सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांच्या एसटीचा संप चालूच आहे. सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अनुसूचित जाती जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा घोळ आहे. शाळा महाविद्यालयांच्या वेळापत्रकाचा गोंधळ आहे. या सरकारचे कोणत्याही समाज घटकाकडे लक्ष नाही आणि कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. गेल्या दोन वर्षात या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयावरून त्यांना न्यायालयाने फटकारले आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री मदत निधीत कोरोनासाठी सहाशे कोटी शिल्लक आहेत पण राज्य सरकार खर्च करत नाही. दुसरीकडे कोरोनाच्या बाबतीत सर्व काही केंद्रावर ढकलले जात आहे. महाविकास आघाडी सरकारला दारुवरचा कर कमी करता येतो तर पेट्रोल डिझेलवरचा का कमी करता येत नाही, असा आमचा सवाल आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा कार्यरत व्हावेत, यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देतो. परंतु, त्यांनी आपला पदभार अन्य कोणाकडे सोपविलेला नाही आणि गेले १९ दिवस मुख्यमंत्रिपदाचे काम ठप्प आहे. गेले दहा महिने विधानसभेला अध्यक्ष नाही. अशा प्रकारे सरकार चालू शकत नाही.
पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे स्वागत करण्यात आले. क्रांतीसूर्य, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान शहराध्यक्ष रमेश बागवे व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव, पश्चिम महाराष्ट्राच्या सहप्रभारी श्रीमती सोनल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री भुपेश बघेल म्हणाले की, ‘‘पुणे हे छत्रपती शिवाजमहाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांची जन्मभूमी आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत पुण्याचे मोठे योगदान आहे. आपण सर्वांनी मला या ऐतिहासिक काँग्रेस भवनमध्ये बोलावून माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या ऐतिहासिक वास्तूला ‘‘यह मकान सच्चे खिदमतगार/सेवको का बना रहे’’ असा शुभसंदेश दिला होता. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आज देशाची प्रगती झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सभासद नोंदणी अभियान देशभर राबविले जात आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी या सभासद नोंदणी अभियानामध्ये भाग घेवून जास्तीत जास्त सभासद नोंदवावे. पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देश मजबूत करण्यासाठी अनेक धाडसी पाऊल उचलले. लाल बहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला. स्व. इंदिराजी गांधी यांनी गरीबी हटावचा नारा दिला आणि देशात हरित क्रांती घडविली. राजीव गांधी, नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीकोनामुळे आज भारत प्रगतशील देश आहे. मोदी सरकारच्या राजवटीत जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. राहुल गांधी यांनी नोटबंदीवर टिका केली होती. त्यांनी सांगितले होते की नोटबंदीमुळे देशाचे फार मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्षाने जी.एस.टी.च्या चूकीच्या पध्दतीने केलेल्या अमंलबजावणीला विरोध केला होता. राहुल गांधींनी मोदी सरकारला कोरोना संसर्ग बद्दल संवेदनशील राहण्यास सांगतिले होते परंतु मोदी सरकारने त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याची किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागली. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची राजवट आहे आणि पंतप्रधान मोदी वाराणसी येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. असे असताना सुध्दा कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्यांचे शव योग्यरितीने अंतसंस्कार न करता गंगेमध्ये फेकून दिले गेले होते ही बाब एक शोकांतिका आहे. खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारी कार्यालय आणि कारखाने मोदी सरकारने विकायला काढलेले आहेत. बेरोजगार व महागाई आज देशातील ज्वलंत समस्या आहे. या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी देशभर आंदोलन करीत आहे. १२ डिसेंबर २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे मोदी सरकारने केलेल्या महागाई विरोधात दिल्लीमध्ये मोठी रॅली आयोजित केली आहे. पक्षाध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांचे हाथ मजबूत करण्यासाठी आपण सर्व काँग्रेसजणांनी काँग्रेस पक्षाचे कार्य समाजातील सर्व घटकांमध्ये पोहचवून मोदी सरकारच्या चूकीची आर्थिक धोरणाबद्दल जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.’’
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘छत्तीसगड मध्ये १५ वर्ष भारतीय जनता पक्षाचे राज्य होते. भुपेशजी बघेल प्रांताध्यक्ष असताना छत्तीसगड राज्यातील सर्व तालुका व शहरात जावून संघटनेची बांधणी केली. जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बेताल कारभाराबद्दल जनजागरण केले. प्रसार माध्यमांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षच सत्तेवर येणार परंतु भुपेशजी बाघेल यांनी त्यांचा अंदाज चुकीचा ठरवला. काँग्रेस पक्षाला छत्तीसगडच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आला.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘भुपेशजी बघेल हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे छत्तीसगड येथे काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांची निघृण हत्या झाली. त्या हत्तेचा निषेध करून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भुपेशजी बघेल उत्तर प्रदेशात गेले. उत्तर प्रदेश सरकारने त्यांना लखीमपुर जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी लखनौ विमानतळावरच उपोषण केले.’’
ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, ‘‘भुपेशजी बघेल यांनी काँग्रेसचा विचार आणि ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहचविले. त्यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार मजबूत आहे. त्यांनी छत्तीसगडच्या जनतेसाठी शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. छत्तीसगडचा विकास हेच त्यांचे ध्येय आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. गांधींना जेव्हा महात्मा म्हणून उपमा दिली त्यावेळी ते म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले हे खरे महात्मा आहेत.’’
त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव, पश्चिम महाराष्ट्राच्या सहप्रभारी श्रीमती. सोनल पटेल म्हणाल्या की, ‘‘भुपेशजी बघेल छत्तीसगड काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष असताना पक्षाची शिबीरे घेतली. शिबीराच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचे ध्येय धोरण आणि विचार प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविले. पक्ष संघटना मजबूत करून त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरूध्द निवडणुकीमध्ये लढा दिला आणि ते यशस्वी ठरले. यातून आपण सर्वांनी हा बोध घेतला पाहिजे की, संघटना मजबूत झाली की सत्ता मिळविण्यास फार सोपे जाते.’’
यावेळी प्रभारी सोनल पटेल, शहराध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, पुजा आनंद, अनिल सोंडकर, रमेश अय्यर, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, शानी नौशाद, मुख्तार शेख, विशाल मलके, सोनाली मारणे, अमिर शेख, भुषन रानभरे, सुरेखा खंडागळे, अनुसया गायकवाड, ॲड. राजश्री अडसूळ, नलिनी दोरगे, पपिता सोनवणे, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, नितीन परतानी, मुन्नाभाई शेख, सुनिल पंडित, घनशाम निम्हण, नारायण पाटोळे,ज्योती अरवेन, मीरा शिंदे, पोर्णिमा बहिरट, शारदा वीर, रजिया बल्लारी, संगिता क्षिरसागर आदींसही असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले तर आभार माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी मानले.
पुणे, ता. २८ – नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे पाश्चिमात्य विचारवंतांच्या प्रभावाखालील आपले शैक्षणिक धोरण भारतीय संस्कृती आणि परंपराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) भाषा विभागाच्या वतीने ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि भारतीय भाषा’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, डॉ. अशोक थोरात, डॉ. सविता केळकर, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी, डॉ. अंबा कुलकर्णी यांनी वेबिनारमध्ये सहभाग घेतला.
कुंटे म्हणाले, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांबरोबर नवीन शैक्षणिक धोरणात कला, साहित्य, क्रीडा आणि भाषेचा प्रामुख्याने विचार केल्याने देशाचा सर्वांगिण विकास होऊ शकेल, त्यासाठी या प्रत्येक क्षेत्राचा सविस्तर विचार करणे आवश्यक आहे.’
कुंटे पुढे म्हणाले, ‘नव्या धोरणाप्रमाणे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या इंग्रजी किंवा अन्य माध्यमांच्या शाळांना त्याप्रमाणे बदल करावे लागणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे भाषांमधील परस्पर संबंध आणि एकात्मता वाढीस लागेल. त्यामुळे देशाच्या सर्वांगिण विकासाबरोबर सांस्कृतिक विकास होऊ शकेल.’
डॉ. पुरोहित यांनी प्रास्ताविक, डॉ. सुनिता निर्मले यांनी सूत्रसंचालन आणि प्रा. विजय दरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
रत्ने आणि दागिन्यांची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यांत दुपटीने वाढून 23.62 अब्ज डॉलर्सवर गेली
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र म्हणून उदयाला येऊ शकतो.
सुरतच्या दागिने निर्मिती संघटनेने (SJMA) आयोजित केलेल्या जेम्स अँड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग शो – 2021 च्या उद्घाटन समारंभात दिलेल्या व्हिडिओ संदेशात गोयल म्हणाले की, सरकारने निर्यात प्रोत्साहनासाठी रत्ने
आणि दागिने क्षेत्राची निवड केली आहे .
“आपण हिऱ्याला पैलू पाडण्यात आणि पॉलिशिंगमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे, आपण सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय हिरे व्यापार केंद्र बनू शकतो,” असे ते म्हणाले.
चालू आर्थिक वर्षात पहिल्या 7 महिन्यांत ऑक्टोबर 21 पर्यंत रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 23.62 अब्ज डॉलर्स होती, जी मागील वर्षी याच कालावधीत 11.69 अब्ज डॉलर्स (+102.09%) होती.
“आपल्या उत्पादकांच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे आपण दुबई-यूएई, अमेरिका , रशिया, सिंगापूर, हाँगकाँग आणि लॅटिन अमेरिका सारख्या बाजारपेठांमध्ये विस्तार करू शकलो ,” असे त्यांनी सांगितले.
गोयल म्हणाले की, सरकारने या क्षेत्राच्या वाढीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सुधारित सुवर्ण मुद्रीकरण योजना, सोन्याच्या आयात शुल्कात कपात आणि अनिवार्य हॉलमार्किंग यांसारख्या विविध उपाययोजना केल्या आहेत.
“आपल्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट कारागीर आहेत , त्यांची सर्जनशीलता मजबूत करणे आणि कारागिरांच्या नियोजनबद्ध कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले, “नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार आणि विद्यमान बाजारपेठांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी आपण दर्जेदार उत्पादने बनवायला हवीत .” असेही गोयल यांनी सांगितले.
मुंबई, दि. 27 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याकाळातील जगातील सर्वश्रेष्ठ संविधान तज्ज्ञ होते. संविधान सभांद्वारे जनतेच्या सूचना स्वीकारण्यात आल्या व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान जनतेला बहाल केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून त्यांचे अनन्यसाधारण योगदान या देशातील जनतेच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासात आहे. आयुष्यभर त्यांनी शोषित, वंचित व उपेक्षित समाजाला न्याय दिला, असे मत ज्येष्ठ विचारवंत व प्राध्यापक हरी नरके यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आयोजित बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथील कार्यक्रमात भारतीय संविधान दिनानिमित्त ‘भारताचे संविधान आणि 21 व्या शतकातील भारताची वाटचाल’ या विषयावर प्राध्यापक हरी नरके बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान नियंत्रक रक्षा लेखा डॉ. राजीव चव्हाण, यशदा प्रकाशन विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, समाजकल्याण सह आयुक्त प्रशांत चव्हाण मान्यवर उपस्थित होते.
प्रा. हरी नरके म्हणाले की, जगातील लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनामध्ये भारताची राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूलतत्त्वे आहेत ती इतर राष्ट्रांच्या घटनेमध्ये त्यांचा अभाव दिसतो. भारतीय राज्यघटना लवचीक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले की, संविधानामुळेच राजकारण, अर्थकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन चालत असते. संविधानाने भारतीयांना न्याय दिला. संविधान हे सुदृढ समाज व्यवस्थेसाठी ऑक्सिजन आहे. आपल्याला पुरोगामी वारसा लाभला असून संविधान जगात सर्वश्रेष्ठ असूनही गेल्या सत्तर वर्षात अनेक समाज बांधव वंचित राहिले आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. तसेच राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्वांगीण विकासासाठी व संपूर्ण जनतेला दिशा देण्याचे काम बार्टी संस्था करत असून बार्टीच्या विविध योजना व उपक्रम, संविधान जनजागृतीचे कार्य बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. वंचित घटकांना न्याय देण्याचे काम बार्टी करत आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान नियंत्रक रक्षा लेखा डॉ.राजीव चव्हाण, डॉ.बबन जोगदंड यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मा.महासंचालक यांनी संविधनाची प्रत भेट देऊन केले.