Home Blog Page 2154

राज कपूरच्या महत्वाकांक्षी ‘मेरा नाम जोकर ‘ला एकावन्न वर्षे

0

राज कपूरच्या यशस्वी रुपेरी वाटचालीतील महत्वाकांक्षी आणि बहुचर्चित म्युझिकल प्रेमकथा असलेल्या ‘मेरा नाम जोकर ‘ ( रिलीज १८ डिसेंबर १९७०) च्या प्रदर्शनास यशस्वी एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग थीमनुसार सहा वर्षे सुरु होते. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि संकलक राज कपूरच्या आर. के. फिल्म या प्रतिष्ठित बॅनरखालील हा सर्वाधिक बहुचर्चित चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन के. ए. अब्बास यांचे आहे तर शैलेन्द्र, हसरत जयपुरी, नीरज, प्रेम धवन, शैली शैलेन्द्र आणि इंदिवर यांच्या गीताना शंकर जयकिशन यांचे संगीत आहे. जीना यहां मरना यहां इसके सीवा जाना कहां, कहता है जोकर सारा जमाना, जाने कहा गये वो दिन, ऐ भाई जरा देख के चलो, दाग न लग जाए ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटात राज कपूर, मनोजकुमार, सिम्मी, अचला सचदेव, ऋषि कपूर, धर्मेंद्र, दारा सिंग, पद्मिनी, केईना रबिआनकिना, राजेंद्रकुमार, ओम प्रकाश, आगा, राजेन्द्रनाथ, सुंदर, मुक्री, मारुती, पोल्सन, फजल खान इत्यादींच्या भूमिका आहेत.सुरुवातीला या चित्रपटाची लांबी ४ तास आणि ४३ मिनिटे ( दोन मध्यंतर) अशी इतकी होती. हा चित्रपट प्रदर्शित करताना तो ४ तास ९ मिनिटे ( दोन मध्यंतर ) अशा अवधीने पडद्यावर आला. पण फस्ट डे फर्स्ट शोपासूनच तो पडला पडला अशी जोरदार आवई उठली आणि मग त्याची लांबी कमी करुन ती १७८ मिनिटे ( एक मध्यंतर) अशी करण्यात आली.

महावितरणच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे बिले भरली तरच कंपनी टिकेल

0

शेतक—यांनी दोन चालू वीज बिले भरून सहकार्य करावे
उर्जामंत्री डॉ. नितिन राउत यांचे प्रतिपादन

औरंगाबाद, दि. 17 डिसेंबर 2021     महावितरण कंपनी एक ग्राहक आहे.  महावितरण कंपनी वीज निर्मिती कंपनीसह खाजगी वीज निर्मिती कडून वीज विकत घेवून सर्वस्तरातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा करते. अतिव्रष्टी, कोरोना व सतत वाढत असलेल्या थकबाकीमुळे 71,000 कोटी रूपयांचे महावितरण कंपनीवर थकबाकी झाली आहे. कर्जाचे हप्ते, व्याज, विकत घेतलेल्या विजेचे पैसे दिले तरच वीज विकत घेवून वीज पुरवठा करणे शक्य आहे. त्यासाठी शेतक—यांनी चालू दोन वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे उर्जामंत्री ना. डॉ नितिन राउत यांनी केले. 
     महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात विभागातील लोकप्रतिनिधी सोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी आ. हरिभाउ बागडे, आ. प्रशांत बंब, आ. उदयसिंह राजपुत, शहर कॉंग्रेस अध्यक्ष हिशाम उस्मानी, महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले, महापारेषण कंपनीचे संचालक प्रकल्प नसिर कादरी,  औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री भुजंग खंदारे यांची उपस्थिती होती.
     उर्जामंत्री डॉ नितिन राउत पुढे बोलतांना म्हणाले की, महावितरण कंपनी  महानिर्मिती कंपन्यांसह इतर खाजगी कंपन्यांकडून  करार पध्दतीने वीज विकत घेते. या विकत घेतलेल्या विजेचे दरमहा पैसे अदा करावे लागते. तसेच  ओला दुष्काळ, सतत वाढत गेलेली विजेची थकबाकी, कोरोनामुळे वाढलेली थकबाकीमुळे थकबाकीचा डोंगर  वाढतच  गेला. यामुळे राज्यात विजेची 71,000  कोटी रूपयांची थकबाकी झाली आहे.  बॅंकांच्या कर्जाचे हप्ते व व्याज, केंद्राकडून पावर  एक्सचेंजमधून  घेतलेल्या विजेचे पैसे, रोहित्र दुरूस्तीसाठी नेमलेल्या एजन्सींचे पैसे दयावे लागते. अन्यथा वीज मिळणार नाही. परिणामी  वीज पुरवठा करणे अशक्य झाले आहे. शेतक—यांना वीज बिलात सवलत देण्यासाठी  कृषी धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात वसूल झालेल्या बिलातून त्या भागातील वीज पायाभूत सुविधा निर्मितीसाठी वापर करण्यात येणार आहे.  कंपनी आर्थिकद्रष्टया टिकली तरच सर्वस्तरातील वीज ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणे शक्य होईल. त्यासाठी शेतक—यांनी चालू दोन वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
   या वेळी   शेतक—यांकडून  चालू एक बिल भरून घेण्यासंबंधी लोकप्रतिनिधींनी मागणी केली. राज्याकडून शेतीपंपांच्या वीज बिलासाठी विशेष आर्थिक मदत दिली तर सवलत देता येईल. अन्यथा कंपनी चालवयाची असेल तर किमान चालू दोन वीज बिले भरून घेणे आवश्यक असल्याचे उर्जामंत्री डॉ. नितिन राउत यांनी प्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले. नादुरूस्त रोहित्र वाहतूक करून बसविण्याची जबाबदारी ही महावितरणची आहे. यासाठी कोणीही पैसे देण्याची गरज नाही. याबाबत तक्रार असेल तर त्याची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.   काही ठिकाणी 33 केव्ही उपकेंद्रासह इतर कामे वेळेत  कंत्राटदारांकडून पूर्ण झाले नाही. याप्रकरणी चौकशी करून सदर कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. कन्नड व नागद येथील अभियंत्यांची रिक्त पदे भरण्यासंबंधी सूचना अधिका—यांना देण्यात आल्या. सोयगाव मतदार संघात सुरळित वीज पुरवठयासाठी 132 केव्ही उपकेंद्र निर्मितीच्या सूचनाही अधिका—यांना देण्यात आल्या. सोयगाव मतदार संघात सोलार वीज निर्मितीमुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी क्रॉस लाईनला इंन्सुलेटर कंडक्टर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. गंगापूर विभागाचे विभाजनासाठी ग्राहक संख्या आणि उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाले तर करता येईल. काही शेतक—यांकडे मोठया प्रमाणात थकबाकी आहे. यासाठी त्यांना वीज बिल भरण्यासाठी हप्त्याची सवलतही देण्यात आल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. ज्या भागात पोल वाकले आहेत, तारा लोबंकळत आहेत, रोहित्र झुकले आहे. डीपी बॉक्स उघडया आहेत. अशा ठिकाणची  कामे करण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना देण्यात आल्या.    याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांनी मराठवाडयातील वीज थकबाकी व कृषी धोरणानुसार देण्यात आलेली थकबाकी विषयी माहिती विषद करून कृषी धोरणात वसूल झालेला 247 कोटी रूपयांचा महसूल त्या त्या जिल्हयाच्या वीज विषयक पायाभूत सुविधाकरिता खर्च करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

0

मुंबई, दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत तीन शासकीय वसतिगृह, वरळी येथे कार्यरत आहेत.  या वसतिगृहातील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन मुंबई शहरचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, बी.डी.डी.चाळ-118, वरळी, मुंबई-18 या वसतिगृहाकरिता एकूण 95 जागा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, बी.डी.डी.चाळ-116, वरळी, मुंबई-18  या वसतिगृहाकरिता 33 जागा, संत मिराबाई मुलींची शासकीय वसतिगृह, वरळी, बी.डी.डी.चाळ-116, वरळी, मुंबई-18 करिता एकूण ८१ जागा आहेत.

ज्या प्रवर्गासाठी जागा रिक्त आहेत अशाच प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात वसतिगृहातून विनामुल्य प्रवेश अर्ज प्राप्त करुन घेऊन परिपूर्ण अर्ज भरुन वसतिगृहात जमा करणे आवश्यक आहे. वसतिगृह प्रवेश अर्ज तिन्ही वसतिगृहांमध्ये तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर कार्यालय, चेंबूर, मुंबई येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.

शासकीय वसतिगृहाचे सन 2021-22 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या व  बी.ए. / बी. कॉम./बी.एससी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एमए/एम.कॉम/एम.एस.सी.असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रमाकरिता (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021  इतका आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी पहिली निवड यादी अंतिम करुन प्रसिद्ध करण्यात येईल, पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 05 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. 13 जानेवारी 2022 रोजी दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास 20 जानेवारी 2022 रोजी स्पॉट ॲडमिशन देण्यात येईल.

व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 असा आहे. 06 जानेवारी 2022 रोजी पहिली निवड यादी अंतिम करुन प्रसिद्ध करण्यात येईल, पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12 जानेवारी 2022 पर्यंत आहेत. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 20 जानेवारी  2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.  दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 25 जानेवारी 2022 रोजी प्रवेश देण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास 01 फेब्रुवारी 2022 रोजी स्पॉट ॲडमिशन देण्यात येईल.

पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास दिलेल्या मुदतीपर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देऊन त्यास तत्काळ त्याच दिवशी वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल.अधिक माहितीसाठी गृहपाल संजय कदम (भ्रमणध्वनी क्र.8830316553) व श्री.जामनेकर (भ्रमणध्वनी क्र.8652717887)  यांना संपर्क साधावा.

सामाजिक न्याय विभागाच्या या कल्याणकारी योजनेचा लाभ वंचित घटकांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मुंबई उपनगरातील शासकीय वसतिगृहांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 17 : मुंबई उपनगर जिल्ह्यात सहायक आयुक्त समाज कल्याण अंतर्गत चार शासकीय वसतिगृह असून या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याची, भोजनाची मोफत सुविधा असून विद्यार्थ्यांना मासिक निर्वाहभत्ता, स्टेशनरी रक्कम देण्यात येते. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण, सहायक आयुक्त यांनी केले आहे.

मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) या वसतिगृहामध्ये केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात १०० विद्यार्थी मंजूर क्षमता असून 45 रिक्त जागा आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, कांदिवली (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) मध्ये केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहाकरिता मंजूर विद्यार्थी क्षमता १०० असून ७० रिक्त जागा आहेत.

महात्मा जोतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृह, जोगेश्वरी या वसतिगृहामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहाकरिता १५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून ९२ रिक्त जागा आहेत.

संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर या वसतिगृहामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता असलेले वसतिगृहातल्या असून १५० विद्यार्थी संख्या मंजूर असून ११० रिक्त जागा आहेत, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी दिली आहे.

जरा केजरीवालांकडे शिकवणी लावा म्हणजे कळेल वीज मोफत कशी देता येते – आपचा उर्जामंत्री राऊतांना टोला

0

पुणे-

आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे. आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज कशी फुकट देऊ? असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हंटले आहे.वीजबिल सवलतीची आश्वासने देताना बुद्धीभ्रंश झाला होता का? केजरीवाल कर्ज काढून नव्हे तर भ्रष्टाचार रोखून वीज बिल सवलत देत आहेत . जरा या मंत्रायंनी केजारीवालान्कडे शिकवणी लाऊन प्रथम शिकावे वीज कशी मोफत देता येते . असा टोला पुण्यातील आप ने असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना लगावला आहे .

आप चे मुकुंद किर्दत यांनी असे म्हटले आहे कि,’महामारीमुळे जनतेवर ही कर्ज काढून वीजबिल भरायची वेळ आली आहे दुसरीकडे सत्तेतील शिवसेनेने सवलतीचे आश्वासन वचननाम्यात दिले होते स्वतः राऊत यांनी दिवाळीत वीजबिल सवलतीचे आश्वासन दिले होते. तेव्हा या वस्तुस्थिती बाबत बुद्धीभ्रंश झाला होता का? असा हल्ला आम आदमी पार्टीने महाविकास आघाडीवर केला आहे.दिल्लीत केजरीवाल कर्ज काढून नव्हे तर भ्रष्टाचार रोखून जनतेला ही वीजबिल सवलत देत आहेत हे यावरून जनतेने काय ते ओळखून घ्यावे अशी तिरकस टिपण्णी आप ने केली आहे.

“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही”, नितीन राऊतांचं वक्तव्य

0

मुंबई -राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे. आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज कशी फुकट देऊ? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला. दुसरीकडे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. आम्ही वीज फुकट मागत नाही, मात्र थकबाकीसाठी महावितरण शेतकऱ्यांना ब्लॅक मेल करीत आहे, असा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय. तसेच चालू बिल भरण्यास शेतकरी तयार आहेत, असं असताना वीज कापली तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा बंब यांनी दिला.  “आधीच अतिवृष्टी झालीय. शासनाने त्याच्या मोबदल्यात ५-७ हजार रुपये दिलेत. त्यातही आता महावितरण बिल भरण्याची सक्ती करत आहे. पैसे नसताना बिल कसं भरायचं”, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. लोक मुदत देण्याची मागणी करत आहे. यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले, “वीज कुणालाही फुकटात मिळणार नाही. वीजेचा वापर करत असाल तर वीजेचं बिल तुम्हाला भरावंच लागेल. महावितरण वीज फुकटात विकत घेत नाही किंवा त्यांना कुणी फुकटात वीज देत नाही. वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांना कोळसा घ्यावा लागतो. त्यांना बँकांचं कर्ज घ्यावं लागतं. त्यांना पैसा द्यावा लागतो.”

आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धा सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे– क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया

0

                                           

            पुणे, दि. १७: एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन द्वारा आयोजित आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियासह आशिया खंडातील १२ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिल्या.

            शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आज क्रीडा आयुक्त श्री. बकोरिया यांनी आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धेच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा व युवक सेवा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, विभागीय माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर, एशियन चषक महिला फुटबॉल स्पर्धा प्रकल्प संचालक अंकुश अरोरा, यांच्यासह पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व अन्य संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            स्पर्धेच्या पूर्व तयारी कामकाजाचा सविस्तर आढावा घेवून श्री. बकोरिया म्हणाले,  पुणे, नवी मुंबई व मुंबई या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. फुटबॉल क्रीडा प्रकारातील आशिया खंडातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडातील भारत, चीन,थायलंड, चायनीझ तैपेई, फिलीपीन्स, इराण, इंडोनेशिया, जपान, कोरिया, व्हिएतनाम, म्यानमार या एकूण १२ देशांचा सहभाग आहे. एकूण २७ सामने होणार आहेत. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या फिफाद्वारा आयोजित होणाऱ्या जागतिक महिला करंडक फुटबॉल स्पर्धांसाठी या महिला आशियाई स्पर्धेतून प्रथम ५ संघांची निवड करण्यात येणार आहे.

आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धेच्या नियोजनात सर्व विभागांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व कामे योग्य नियोजन करुन समन्वयाने  वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना श्री. बकोरिया यांनी दिल्या.

  बैठकीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, कोविड चाचण्या घेण्याबाबत सुविधा, रस्ते कामे व सुशोभिकरण, पाणी व्यवस्था, अग्नीशामक यंत्रणा, स्पर्धा प्रसिदधी, विद्युत व्यवस्था, नोडल अधिकारी नियुक्ती आदींसह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

लोकअदालतीमध्ये दीड कोटींच्या वीजबिलांसंबंधी प्रकरणे निकाली

0

पुणे, दि. १७ डिसेंबर २०२१महावितरणच्या पुणे परिमंडलामधील १ कोटी ६९ लाख ५१ हजार ९४१ रुपयांच्या थकीत वीजबिलासंबंधी न्यायप्रविष्ट असलेली २८५ प्रकरणे नुकत्याच झालेल्या येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघाली आहेत. तडजोडीअखेर ही सर्व रक्कम संबंधीत ग्राहकांकडून भरण्यात येत आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने आयोजित नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे परिमंडलातील थकती वीजबिलाबाबत न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये गणेशखिंड मंडलमधील सर्वाधिक ८४ लाख ७७ हजार २५० रुपयांची १६१ प्रकरणे, रास्तापेठ मंडलमधील ८४ लाख ७४ हजार ६९१ रुपयांची १२४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या कामकाजामध्ये महावितरणकडून विधी सल्लागार सत्यजित पवार, सहायक विधी अधिकारी ज्योत्स्ना सोनोने, समीर चव्हाण, कनिष्ठ विधी अधिकारी गणेश सातपुते तसेच अभियंता, अधिकारी, वित्त व लेखा विभागातील सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

दोन कारखान्यांमध्ये २५ लाखांची वीजचोरी उघड

0

पुणे, दि. १७ डिसेंबर २०२१: वीजमीटरमध्ये फेरफार करून दोन कारखान्यांमधील १ लाख ५२ हजार ५२३ युनिटची म्हणजे २५ लाख १३ हजार रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकांनी नुकतीच उघडकीस आणली आहे. वीजचोरीच्या दोन्ही प्रकरणांमध्ये वीजचोरी व दंडाचे एकूण ४४ लाख ५३ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. तसेच संबंधीतांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, की जाधववाडी (ता. हवेली) येथील एच.एस. एंटरप्रायजेस व सलीम प्लास्टीक या दोन्ही औद्योगिक ग्राहकांनी वीजजोडणीसाठी मंजूर केलेल्या जोडभारापेक्षा अधिक वीज वापर केल्याचे तसेच मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. यामध्ये एच.एस. एंटरप्रायजेसमध्ये ९ लाख ५५ हजारांची वीजचोरी निदर्शनास आली. या ग्राहकास वीजचोरी व दंड असे एकूण २१ लाख २५ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. अशाच प्रकारची १५ लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी सलीम प्लास्टीकमध्ये आढळून आली. त्यास वीजचोरी व दंड असे एकूण २३ लाख २८ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. या दोन्ही वीजचोरी प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्र उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र रडे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी नंदकुमार जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक खेडकर आदींनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक, शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका

0

पुणे –

पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकारणाच्या संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाकडून प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर आहे. राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रीतीश देशमुख यांच्या घरझडतीमध्ये सायबर पोलिसांच्या हाती 2020 मध्ये टीईटी परीक्षेत अपात्र काही विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे लागली होती. दरम्यान, टीईटी परीक्षेशी निगडित असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची पोलिसांनी चौकशी केली होती.

प्रत्येक विद्यार्थ्याकडून घ्यायचे 50 हजार ते एक लाख!

राज्य सरकारच्या परीक्षा पेपरफुटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. तुकारामकडून कोट्यधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या घोटाळ्यात कुणाला किती कोटी मिळाले याची माहिती सुद्धा पोलिसांनी जारी केली.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकारणाच्या संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाकडून प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर आहे.

4 कोटी 20 लाख रुपयांचा घोटाळा

पोलिसांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण घोटाळ्यात 4 कोटी 20 लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे लोक 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पैसे घेत होते. यातील तुकाराम सुपेकडून तब्बल 88 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. यासोबतच, तुकाराम सुपेकडूनच 5 तोळे दागिने आणि 5.5 लाखांची एफडी असलेली कागदपत्रे सुद्धा सापडली.

प्रत्येकाचा वाटा ठरलेला, कुणाला किती कोटी?

उल्लेखनीय बाब म्हणजे, जवळपास सव्वा चार कोटींच्या गैरव्यवहारात प्रत्येकाचा वाटा देखील ठरलेला होता. त्यानुसारच तुकाराम सुपेला तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये मिळणार अशी डील झाली होती. तर यातील दुसरा एक आरोपी प्रितीश देशमुखला 1 कोटी 25 लाख रुपये आणि अभिषेक सावरीकरला सुद्धा 1.25 कोटी रुपये मिळतील अशी डील झाली होती. यापैकीच 80 लाखांचा रोकड सुपेकडून जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे तर्फे इयत्ता 5 वी आणि 8 वी शिक्षवृत्ती परीक्षा, शिक्षक पात्रतपा परीक्षा, टायपिंग व शॉर्ट हँड परीक्षा, ईसीबी शिष्यवृत्ती परीक्षा, खात्याअंतर्गत सेवा परीक्षा, डि. एल. ई. डी इ. परीक्षांचे आयोजन खासगी कंत्राटी कंपन्यांमार्फत शिक्षण विभागाकडून केले जाते. त्यासाठी 2019 मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहिरातूनुसार 19 जानेवारी 2020 रोजी ही पात्रता परिक्षा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीस कंत्राट दिले होते.

या कंपनीचा महाराष्ट्रातील संचाकल प्रितीश देशमुख याच्यावर ही सर्व जबाबदारी होती. याचाच फायदा घेत त्याने तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांना विश्वास घेतले आणि वेगवेगळ्या एजंटांना मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना पात्र करुन देण्याच्या बदल्या पैसे वसूल केले. नंतर परीक्षा निकालाच्या प्रक्रिये दरम्यान फेरफार करुन त्यांना पात्र करण्यात आले.

“नद्या शहरी जीवनाच्या पुन्हा केंद्रस्थानी आणल्या पाहिजेत. यामुळे आपल्या शहरांना नवसंजीवनी मिळेल”: पंतप्रधान

0

पंतप्रधानांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे केले उद्घाटन

नवी दिल्‍ली, 17 डिसेंबर 2021

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन केले.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यावेळी उपस्थित होते.

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी प्राचीन वाराणसी शहरातील नजीकच्या काळातील घडामोडींचा उल्लेख केला.  काशीचा विकास हा संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरू शकतो, या त्यांच्या विधानाची आठवण त्यांनी करून दिली.  

आपल्या देशातील बहुतेक शहरे ही पारंपारिक शहरे आहेत, जी पारंपारिक पद्धतीने विकसित झाली आहेत असे पंतप्रधान म्हणाले. आधुनिकीकरणाच्या या युगात या शहरांचा पुरातन वारसाही तितकाच महत्त्वाचा आहे.  ही शहरे आपल्याला वारसा आणि स्थानिक कौशल्ये कशी जपायची हे शिकवू शकतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.  विद्यमान वास्तू नष्ट करणे हा मार्ग नसून पुनरुज्जीवन आणि जतन करण्यावर भर द्यायला हवा. आधुनिक काळाच्या गरजेनुसार हे केले पाहिजे, असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.  

स्वच्छतेसाठी शहरांमध्ये निरोगी स्पर्धेचे आवाहन पंतप्रधानांनी केले. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांसह स्वच्छतेसाठी सर्वोत्तम प्रयत्न करणाऱ्या शहरांचीही दखल घेण्यासाठी नवीन श्रेणी असू शकतात का यावर विचार केला पाहिजे असे सांगत, स्वच्छतेबरोबरच शहरांच्या सुशोभिकरणाचाही त्यांनी आग्रह धरला.  यासंदर्भात त्यांनी महापौरांना त्यांच्या शहरातील प्रभागांमध्ये निरोगी स्पर्धा भावना निर्माण करण्यास सांगितले.

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’शी संबंधित कार्यक्रम जसे की स्वातंत्र्य संग्रामाच्या संकल्पनेवर आधारित ‘रांगोळी’ स्पर्धा, स्वातंत्र्य लढ्यावरील गीतगायन स्पर्धा आणि ओव्यांची, अंगाईगीतांची स्पर्धा, असे कार्यक्रम त्यांनी महापौरांना राबवण्यास सांगितले. पंतप्रधान आपल्या भाषणात आणि मन की बातमधे याचा सतत आग्रह धरतात.

महापौरांनी शहरांचे वाढदिवस शोधून साजरे करावेत, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली.  नद्या असलेल्या शहरांनी नदी उत्सव साजरा केला पाहिजे.  लोकांनी नद्यांचा अभिमान बाळगावा आणि त्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत यासाठी नद्यांचे वैभव वाढवण्याची, त्याचे महत्व सर्वदूर सांगण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  “नद्या शहरी जीवनाच्या पुन्हा केंद्रस्थानी आणल्या पाहिजेत.  यामुळे आपल्या शहरांना नवसंजीवनी मिळेल” असे पंतप्रधान म्हणाले. एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक निर्मूलनाच्या विरोधातील मोहिमेला पुनरुज्जीवित करण्याचे त्यांनी महापौरांना सांगितले.  कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचे मार्ग शोधावेत.  “आपले शहर देखील स्वच्छ आणि निरोगी असावे, हा आपला प्रयत्न असावा”, असे ते म्हणाले. 

महापौरांनी त्यांच्या शहरातील पथदिवे आणि घरांमध्ये एलईडी बल्बचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल याची खातरजमा करावी, हे काम युद्धपातळीवर करावे असे त्यांनी सांगितले. सध्याच्या योजनांचा नव्या उपयोगांसाठी वापर करून त्या पुढे नेण्याचा विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. महापौरांनी शहरातील एनसीसी युनिट्सशी संपर्क साधून शहरातील पुतळे स्वच्छ करण्यासाठी गट तयार करावेत, तसेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ च्या पार्श्वभूमीवर थोर व्यक्तिमत्त्वांवर व्याख्याने आयोजित करावीत असे त्यांनी सांगितले.  

त्याचप्रमाणे महापौर त्यांच्या शहरातील एखादे ठिकाण निवडू शकतात आणि पीपीपीच्या धर्तीवर आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने एक स्मारक तयार उभारु शकतात असे पंतप्रधान म्हणाले.

‘एक जिल्हा एक उत्पादन’ कार्यक्रमाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी महापौरांना त्यांच्या शहरांची, विशिष्ट ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. शहरातील काही विशिष्ट उत्पादन किंवा ठिकाणाद्वारे जे  प्रसिद्ध झाले आहेत याचा त्यात समावेश असावा.

पंतप्रधानांनी त्यांना शहरी जीवनातील विविध पैलूंबाबत लोकाभिमुख विचार विकसित करण्यास सांगितले.  सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  त्यांनी महापौरांना सुगम्य भारत अभियान- सुलभ भारत अभियानानुसार त्यांच्या शहरातील प्रत्येक सुविधा दिव्यांगांसाठी अनुकूल असल्याची खातरजमा करण्यास सांगितले.

“आपली शहरे ही आपल्या अर्थव्यवस्थेची प्रेरक शक्ती आहेत.  आपण शहरांना चैतन्यदायी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनवले पाहिजे” असे ते म्हणाले.  आर्थिक उलाढालींना आमंत्रण देणारी आणि प्रोत्साहन देणारी परिसंस्था निर्माण करण्यासाठी सर्व सुविधा एकाच वेळी विकसित होणारी सर्वांगीण व्यवस्था तयार करण्यास त्यांनी त्यांना सांगितले.

आपल्या विकासाच्या मॉडेलमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सक्षम करण्याच्या गरजेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.  “रस्त्यावरील विक्रेते (फेरीवाला)  हे आपल्या प्रवासाचा एक भाग आहेत, त्यांचा त्रास आपण प्रत्येक क्षणी पाहतो. त्यांच्यासाठी आपण पंतप्रधान स्वानिधी योजना आणली आहे.  ही योजना खूप चांगली आहे.  तुमच्या शहरात त्यांची यादी बनवा आणि त्यांना मोबाईल फोनचे व्यवहार करायला शिकवा.  यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने बँक वित्तपुरवठा सुलभ होईल”, असे पंतप्रधान म्हणाले.  ते म्हणाले की महामारीच्या काळात त्यांचे महत्त्व अगदी स्पष्टपणे समोर आले.

काशीच्या विकासासाठी महापौरांनी त्यांच्या अनुभवातून सूचना कराव्यात,  “मी तुमच्या सूचनांसाठी कृतज्ञ राहीन आणि मी तुमचा पहिला विद्यार्थी होईन” अशी विनंती करून पंतप्रधानांनी समारोप केला.

सरदार पटेल अहमदाबादचे महापौर होते आणि देश आजही त्यांचे स्मरण करतो, असे पंतप्रधान म्हणाले.  महापौर पद हे अर्थपूर्ण राजकीय कारकीर्दीसाठी एक महत्वपूर्ण पायरी ठरू शकते जिथे तुम्ही या देशातील लोकांची सेवा करू शकता”, असेही पंतप्रधान म्हणाले.

आगामी 2-3 वर्षात 7 लाख कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांच्या उभारणीचे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे उद्दिष्ट

0

मुंबई, 17 डिसेंबर 2021

केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी यांनी गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीचे धाडस करण्याचे आवाहन केले आहे. या क्षेत्रात महामार्ग, मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्क, रस्त्याशेजारील सुविधा, रोपवेज, भांडारगृह विभाग आणि इतर बऱ्याच सुविधांसह विविध प्रकारच्या सुविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीच्या संधी आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते आज मुंबईत महामार्ग, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स या विषयावरील राष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये बोलत होते. रस्ते क्षेत्रात मिळणारा अंतर्गत परतावा अतिशय उच्च आहे आणि म्हणूनच्या त्याच्या आर्थिक व्यवहार्यतेबाबत कुणी चिंता करण्याचं कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी जमीन अधिग्रहणविषयक मुद्यांमुळे प्रकल्प रखडले जायचे. मात्र, जोपर्यंत जमिनीचे अधिग्रहण 90 टक्के पूर्ण होत नाही आणि पर्यावरणविषयक मंजुरी मिळत नाहीत तोपर्यंत हे प्रकल्प द्यायचे नाहीत, असा आम्ही निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. रस्तेविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाने उचललेल्या विविध पावलांचे त्यांनी दाखले दिले. “तुमचा विश्वास 110 टक्के राखा’ असे त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले.

भारतमाला कार्यक्रमांतर्गत सुरू होणाऱ्या प्रकल्पांच्या अनेक फायद्यांची त्यांनी माहिती दिली. दिल्ली ते मुंबई हा रस्तेमार्गाने 48 तासात होणारा प्रवास एका वर्षात 12 तासात होईल, असे ते म्हणाले. मल्टीमोडल पायाभूत सुविधा प्रकल्प यामुळे लॉजिस्टिक्स खर्चात कपात होईल, उत्पादनाला चालना मिळेल निर्यातीत वाढ होईल आणि अर्थव्यवस्थेत वृद्धी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय रस्ते विकास कार्यक्रमाचा भारतमाला प्रकल्प हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासासोबत मालवाहतुकीच्या आणि प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या सुविधांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे.

आगामी 2-3 वर्षात 7 लाख कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांच्या उभारणीचे रस्तेवाहतूक मंत्रालयाचे उद्दिष्ट असल्याची माहिती या परिषदेत देण्यात आली.

या परिषदेत केंद्रीय मंत्र्यांनी सरकारच्या निरुपयोगी वाहनतोड धोरणाच्या फायद्यांची देखील माहिती दिली. यामुळे प्रदूषणात कपात होईल, कर महसुलात सुधारणा होईल आणि रोजगार निर्मिती देखील होईल, असे ते म्हणाले. ही शंभर टक्के यशाची हमी देणारी स्थिती असेल ज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे.

“स्वेच्छेने वाहन- ताफा आधुनिकीकरण धोरण” हे वापरयोग्य नसलेली आणि प्रदूषण करणारी वाहने मोडीत काढण्यासाठी तयार करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
या धोरणांतर्गत पुढील पाच वर्षात वापरयोग्य नसलेली खराब वाहने मोडीत काढण्यासाठी निर्माण होणारी मोठी मागणी लक्षात घेऊन देशभरात 50 ते 70 नोंदणीकृत वाहनतोडणी सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येईल.

भारतातील वाहन उद्योगाचे आकारमान 7.5 लाख कोटी रुपयांचे आहे आणि पुढील पाच वर्षात ते 15 लाख कोटी रुपये इतके दुप्पट होईल, असे गडकरी म्हणाले.

यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातही माहिती दिली. आम्ही फ्लेक्स इंजिनसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत आहोत. पुढील दोन तीन वर्षात आपल्या देशातील वाहने इलेक्ट्रिक वाहनात रुपांतरित होतील, असे त्यांनी सांगितले.

या वाहनांच्या वापराचा खर्च सध्याच्या पेट्रोल वाहनांप्रमाणेच किंवा त्यापेक्षा कमी असेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाविषयी देखील आपले विचार मांडले आणि ज्या ठिकाणी आधीपासूनच इथेनॉल पुरवणारी तीन केंद्रे आहेत त्या पुण्यामध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षा सुरू करण्याची महाराष्ट्राच्या वाहतूक विभागाला सूचना केली. पर्यायी इंधनाच्या वापरामुळे देखील वाहनतोड उद्योगाला मदत होईल, असे ते म्हणाले.

मालमत्ता मुद्रीकरणाच्या आराखड्याविषयी देखील त्यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारला उच्च परतावा देणाऱ्या मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाचे उदाहरण दिले. या प्रकल्पासाठी रिलायन्सने 3600 कोटी रुपये खर्चाचा अंदाज दिला होता. मात्र, आम्ही हा प्रकल्प एमएसआरडीसीच्या माध्यमातून 1600 कोटी रुपये खर्चात उभारण्याचा निर्णय घेतला. नंतर या प्रकल्पाने महाराष्ट्र सरकारला 3000 कोटी रुपये दिले आणि अलीकडेच या प्रकल्पाचे पुन्हा एकदा 8000 कोटी रुपयांचे मुद्रीकरण झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.

एकात्मिक योजना आणि सर्व पायाभूत सुविधांच्या समन्वित अंमलबजावणीला गतीशक्ती कार्यक्रमाद्वारे चालना मिळत असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरीधर आरामने सचिवांनी दिली. “आम्ही पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील अडथळे समजून घेण्यासाठी सायंटिफिक लॉजिस्टिक इफेक्टिवनेस स्टडीज अर्थात शास्त्रीय वाहतूक कार्यक्षमता अध्ययन करत आहोत. अडथळे दूर करण्यासाठी NHAI ने देशभरात 120 गर्दीची ठिकाणे निवडली आहेत; शहरातील गर्दी कमी करण्यासाठी रिंग रोड आणि बायपास बांधले जात आहेत. सर्व राज्यांच्या राजधान्यांना किमान चार पदरी राष्ट्रीय महामार्गांनी जोडल्यानंतर आता आम्ही देशाच्या सर्व महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांना जोडणारा द्रुतगती मार्ग तयार करण्याचा विचार करत आहोत, असे ते म्हणाले.

सुधारित धोरणे आणि निर्णय घेण्यामुळे परिणामांमध्ये मूर्त सुधारणा कशी झाली हे सचिवांनी स्पष्ट केले. “कंत्राटदारांचे काम सुलभ करण्यासाठी वाद उत्पन्न होणाऱ्या आणि कंत्राटदारांना त्रास आणि तोटा सहन कराव्या लागणाऱ्या सर्व तरतुदी आम्ही मोडीत काढल्या. NHAI ने कंत्राटदार आणि लाभार्थी कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसह बैठका घेतल्या आणि प्रामाणिक संवादाच्या आधारे महामार्ग बांधणीतील समस्यांचे निराकरण करण्यात आले. यामुळे गेल्या वर्षी विक्रमी 37 किलोमीटर प्रतिदिन रस्ते बांधण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

पीएम गति शक्ती राष्ट्रीय योजनेंतर्गत एकात्मिक पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार NHAI अनेक सुविधा आणि संलग्न पायाभूत सुविधा विकसित करत आहे, असे NHAI च्या अध्यक्ष, अलका उपाध्याय यांनी सांगितले.  “NHAI ने आता वेगळ्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्गांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची कल्पना केली आहे. बहुआयामी लॉजिस्टिक पार्क, रोपवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत वाहतूक, फायबर केबल्स आणि राष्ट्रीय महामार्गांवरील इतर पायाभूत सुविधांद्वारे संलग्न महामार्ग उपक्रमांच्या विकासावर भर दिला जाणार आहे. भारतमाला प्रकल्पाचा एक भाग म्हणून जवळपास 8,400 अत्याधुनिक ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग बांधले जात आहेत. हे कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलून टाकतील आणि अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठण्यात गतिमान करतील, असे त्या म्हणाल्या.

मुंबईतील आजच्या या राष्ट्रीय परिषदेमध्ये संभाव्य गुंतवणूकदार, उद्योजक आणि तज्ञ उपस्थित होते.

टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

0

मुंबई, दि. 17- टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून या समितीद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.

जिंकण्यापेक्षा खिलाडूवृत्तीने खेळ खेळावा भारताची महिला क्रिकेटपटू पूनम राऊत यांचा सल्ला

0

एमआयटी डब्ल्यूपीयूत
‘समिट-२०२१’ क्रीडास्पर्धेचे उद्घाटन

पुणे, दि. १७ डिसेंबर: “अपयश ही यशाची पहिली पायरी आहेे. त्यामुळे जीवनात जे अपयश येते त्यात खचून न जाता काही तरी नवीन शिकत रहावे. कोणत्याही खेळामध्ये जिंकण्याचे लक्ष न ठेवता खिलाडूवृत्तीने खेळ खेळून त्याचा आनंद घ्या. त्यामुळे यश हे आपोआप तुमच्या मागे धावत येईल.” असा सल्ला भारताची महिला क्रिकेटपटू पूूनम राऊत यांनी खेळाडूंना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या राष्ट्रीय पातळीवरील आंतर-अभियांत्रिकी ‘समिट-२०२१’ या क्रीडास्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड हे होते.
माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. एस.एस.दराडे-पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण,  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, क्रीडा संचालक प्रा. डॉ.पी.जी.धनवे, विलास कथुरे व पद्माकर फड हे उपस्थित होते.
या समारंभात कबड्डी क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल कबड्डी कोच व महाराणा प्रताप संघाचे संस्थापक सदस्य शरदआण्णा चव्हाण यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा महर्षि पुरस्कार आणि माजी क्रिकेट कोच उमेश पटवाल यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा आचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र व पदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पूनम राउत म्हणाल्या,“इंजिनियरच्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये आपली चमक दाखवून देशाचे भविष्य उज्ज्वल करावे. कोणताही खेळ असो त्यामध्ये १०० टक्के समर्पण भावनेने उतरवावे.  खेळामध्ये सतत चढ-उतार येत असतो, त्यामुळे खचून न जाता त्यातून काही तरी शिकावे व पुुन्हा जोमाने कार्य करावे.”
आपला अनुभव सांगताना पूनम राउत म्हणाल्या,“ क्रिकेटची प्रचंड आवड असल्याने १० व्या वर्षापासून मुलांबरोबर क्रिकेट खेळत होते. शाळेत व शाळा सुटल्यानंतर दिवसभर मैदानात असे. शेवटी वडिलांच्या प्रेरणेने प्रशिक्षक संजय गायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. आई वडिलांच्या आशिर्वादाने पुढे भारताच्या टीममध्ये खेळून देशाचे नाव लैकिक वाढविण्याचा मला अभिमान वाटतो. जीवनात मला पुस्तकांपेक्षा क्रिकेट ने खूप काही शिकविले.”
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा.कराड म्हणाले,“ विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये चारित्र्य आणि शिस्त गरजेची आहे. संत ज्ञानेश्‍वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकांनंद यांनी वयाच्या १६ वर्षी अद्वितीय कार्य केले. त्या वयातीलऊर्जा लक्षात घेऊन प्रत्येक कार्याबद्दल श्रध्दा आणि निष्ठा ठेवावी. स्वामी विवेकानंद म्हणत असे युवकांनी खेळाच्या मैदानात उतरावे. खिलाडूवृत्तीच्या माध्यमातून राष्ट्र निर्मिती होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शरीराने तंदुरूस्त, मनाने सतर्क, अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत आणि कुशाग्र बुध्दीमत्ता असणे आवश्यक आहे. संपत्ती आणि पैशांपेक्षा काय महत्वाचे आहे हे युवकांनी ओळखावे. तसेच, भारतीय संस्कृती विसरू नये.”
शरदआण्णा चव्हाण म्हणाले,“डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या नेतृत्वातील एमआयटी संस्थेने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याचे कार्य करीत आहे. त्यांनी संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांचे संस्कार घेऊन नवी पिढी निर्माण करीत आहेत. त्यांनी आळंदीचा कायापालट करुन वारकर्‍यांसाठी संजीवनी देण्याचे कार्य केले आहे. तसेच कार्य खेळामध्ये सुद्धा करीत आहेत.”
उमेश पटवाल म्हणाले,“कठीण परिश्रम, प्रामाणिकता आणि लक्ष निर्धारित करुन कोणत्याही खेळामध्ये सर्मपित झाल्यास यश आपोआपच मिळते. विद्यार्थ्यांनी खेळतांना संघ भावना व खिलाडूवृत्तीने खेळावे.”
समिट २०२१या स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण ९७ संघाच्या माध्यमातून १,५०० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
 डॉ. आर.एम.चिटणीस यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत करून समिट २०२१ला शुभेच्छा दिल्या.
रोहित पाटील यांनी स्पोर्टस रिपोर्ट वाचून दाखविला.
वेदांत रावल, ईश्‍वरी पाटील व श्री पात्रा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात दत्तजयंतीनिमित्त दत्तजन्म सोहळा, महाआरती शनिवारी

0

पुणे : कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तजयंतीनिमित्त शनिवार, दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटे ६ पासून मंदिर खुले राहणार असून संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्तजयंतीनिमित्त दत्तजन्म सोहळा, महाआरती आणि मोजक्या विश्वस्त व पदाधिका-यांची उपस्थितीत पायी नगरप्रदक्षिणा होणार आहे. दत्तमंदिराला विविधरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी ६ वाजता ट्रस्टचे खजिनदार राजू बलकवडे, हेमलता बलकवडे यांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण व वर्षा चव्हाण, ट्रस्टचे उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, दीपक पोकळे व विद्या पोकळे यांच्या हस्ते श्री दत्तयाग होईल. दुपारी १२.३० वाजता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ पुणेचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, प्र-कुलगुरु भाग्यश्री पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते माध्यान्य आरती होणार आहे.

दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी ५ वाजता असून सायंकाळी ६ वाजता दत्तजन्म सोहळा पार पडेल. त्यानंतर पालखी नगरप्रदक्षिणेऐवजी विश्वस्त व पदाधिका-यांच्या उपस्थितीत पायी नगरप्रदक्षिणा होणार आहे. उत्सव आरती रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या तुरुंग सुधारसेवा विभागाचे महानिरीक्षक अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी व अश्विनी कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.

दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२४ वे वर्ष आहे. तसेच भाविकांच्या स्वहस्ते अभिषेकाची सुविधा सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत उत्सव मंडपात करण्यात आली आहे. कोविड प्रतिबंधक अनुरूप व्यवहाराच्या शासकीय नियमावलीनुसार मुखपट्टी अनिवार्य असेल. उत्सव मंडपाचे निर्जंतुकीकरण, अभ्यागतांचे प्रवेशद्वारावर तापमान मापन, इ. कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल.