मुंबई, दि. 17 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका :18 जानेवारीला मतदान-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करणार
अनधिकृत बाईक (दुचाकी), टॅक्सी सेवा त्वरीत बंद करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई
पुणे दि.१७: अनधिकृत व बेकायदेशीर रित्या सुरु असणारी बाईक (दुचाकी), टॅक्सी सेवा त्वरीत बंद करावी, यापुढे अशी सेवा सुरू असल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांनी कळविले आहे.
दुचाकी/टॅक्सी खाजगी संवर्गात नोंद झालेली वाहने भाडे तत्वावर वापरल्यास परवाना शर्तीचे तसेच नोंदणी नियमांचे उल्लंघन होते. अशा सेवेचा लाभ घेताना संबंधीत प्रवाशांस कोणतेही लाभ (अपघातानंतर विमा संरक्षण) मिळणार नाही. सदर कंपन्या अनधिकृतपणे केवळ ऑनलाइन संकेतस्थळ किंवा ॲपच्या आधारे कंपनी चालवित आहेत. अशी सेवा पुरवणारे चालक विना हेल्मेट प्रवास करत असून वाहतूक नियम व रस्ता सुरक्षिततेला ही बाब धरून नाही.
मोटार वाहन कायदा १९८८ नुसार वापरात येणारी वाहने भाडोत्री परिवहन संवर्गात नोंद असणे आवश्यक आहे. कंपनी नोंद करताना विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणे बंधनकारक आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर सदर व्यवसाय सुरू करता येतो.
जीव धोक्यात घालून सदर कंपनाच्या वेबसाइट तसेच ॲपद्वारे अनधिकृत व बेकायदेशीररित्या पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घेऊ नये. तसेच आपली दुचाकी वाहने बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या या सेवेकरिता उपलब्ध करून देऊ नये. मोटार वाहन कायदा कलम ६६ / ९९२अ प्रमाणे विना परवाना प्रवाशांची वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येईल असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी कळविले आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ; अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक
पुणे, दि.१७ : १० किंवा १० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सर्व खासगी संस्था, कंपन्या, आस्थापना आदी ठिकाणी शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयाच्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अन्वये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा वार्षिक अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, २९/२, गुलमर्ग पार्क को. ऑप. हौ. सोसायटी, तिसरा मजला, विजय बेकरीजवळ, सोमवार पेठ, पुणे ४११०११ येथे सादर करावा. अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन केल्याचा अहवाल सादर न करणाऱ्या आस्थापनेकडून अधिनियमाच्या कलम २६ (क) प्रमाणे रक्कम ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
स्थापन केलेल्या समितीमधील अध्यक्ष, सदस्य यांची नावे व दूरध्वनी क्रमांक असलेला फलक कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावण्यात यावा. समिती स्थापन करण्यासाठीची माहिती या अधिनियमाच्या कलम ४(२) व महिला व बाल विकास विभागाच्या १९ जून २०१४ च्या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे. अंतर्गत तक्रार निवारण समितीचा वार्षिक अहवाल विहित नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयास वेळेत सादर करावा.
छळाची तक्रार ‘शी बॉक्स’ प्रणालीवर करण्याची सुविधा
कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी छळ होत असल्यास अधिनियमांतर्गत लैंगिक छळ इलेक्ट्रॉनिक बॉक्स (शीबॉक्स- एसएचई बॉक्स) या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर आपली तक्रार नोंद करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी केले आहे.
जिल्हा स्तरावरील स्थानिक समिती गठित
अधिनियमातील तरतुदीनुसार पुणे जिल्ह्यासाठीची स्थानिक समिती नुकतीच पुर्नगठीत करण्यात आलेली असून या समितीमध्ये अॅड. शारदा वाडेकर यांची अध्यक्षपदी तर प्रीती करमरकर, अॅड. विशाल जाधव आणि दिपाली गाटेकर यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. दहा पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कामाच्या ठिकाणी किंवा जिथे नियोक्त्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार आहे अशा तक्रारी स्थानिक समिती हाताळते. अशा स्वरुपाची कुणाची तक्रार असल्यास ती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात पाठवावी. या कायद्याअंतर्गत जिल्हा पातळीवरील अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूमिसंपादन क्र. 26) स्नेहल भोसले यांची नेमणूक झाली आहे, असेही श्रीमती कांबळे यांनी कळविले आहे.
सैनिकांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
- 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीचे लोकार्पण.
पुणे,दि.16:भारत-पाकिस्तानातील 1971 च्या युद्धावर आधारित थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात येणारा सैनिकांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यानात पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित तयार करण्यात आलेल्या थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चौधरी, उपमहापौर सुनीता वाडेकर, महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, गटनेते आबा बागुल उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले, इतिहास जिवंत करण्याचे काम या थ्रीडी शोच्या माध्यमातून झाले आहे. शहीद जवानांमुळे आपण सुखद जीवन जगत आहोत. या शूरवीरांना अभिवादन करणारा आजचा दिवस आहे. शौर्याचा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. ते काम आज या माध्यमातून होत आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, 1971 च्या विजयाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, यामुळे संपूर्ण देशात आज विजयोत्सव साजरा केला जात आहे. 1971 च्या युद्धात सैनिकांनी केलेली कामगिरी देश कधीही विसरू शकत नाही. पुण्यातील वसंतराव बागुल उद्यानातील लेझर शो च्या माध्यमातून युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना वाढेल, असे ते म्हणाले.
श्री. आबा बागुल यांनी प्रास्ताविक करताना पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी मल्टिमीडिया लेझर शोबाबत माहिती दिली. चित्रफीत पुणे महापालिकेतर्फे कै. वसंतराव बागुल उद्यानात रोज सायंकाळी दाखवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, निवृत्त ब्रिगेडियर प्रकाश घोगले, निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल पी. के. बत्रा (निवृत्त), कर्नल सदानंद साळुंखे (निवृत्त), कर्नल सुहास नेने (निवृत्त) यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी सैन्य दलातील सेवा निवृत्त अधिकारी, नागरिक, युवक, उपस्थित होते.
बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगीच्या निर्णयाचे आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून स्वागत
पुणे-बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा जणू श्वास आहे. या शर्यती थांबल्यामुळे तो श्वासच कोंडला होता. सुप्रीम कोर्टाने शर्यतींना परवानगी दिल्यामुळे तो जणू मोकळा झाला आहे. अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच यासाठी सुप्रीम कोर्टात बैलगाडा संघटनांच्या वतीने लढणारे आ. महेश लांडगे, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आदींचे अभिनंदन केले.
आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी देऊन यावरील बंदी आज सुप्रीम कोर्टाने उठवली. याचा आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष होत आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राची ग्रामीण मानसिकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याने मी सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानतो. सन २०११ मध्ये बैलांना संरक्षित प्राणी म्हणून ग्राह्य धरले गेल्याने बैलगाडा शर्यतीवर बंदी आली. प्रकाश जावडेकर यांनी बैल या प्राण्यास संरक्षित प्राणी यादीतून बाहेर काढले होते. पण दुर्दैवाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र यांसह अनेक राज्यांमध्ये याविरोधात तीव्र आंदोलने झाली. तमिळनाडू सरकारने या आंदोलनानंतर त्यांच्या विधीमंडळात कायदा करुन, संपूर्ण राज्यात लागू केला. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात कायदा केला गेला.
ते पुढे म्हणाले की, ” देवेंद्रच्या काळातील कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पण हा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्याने यावर निर्णयाची सर्वच प्रतिक्षा करत होते. सुप्रीम कोर्टाने आज या शर्यतीला सशर्त परवानगी दिल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. या विषयासाठी भारतीय जनता पक्षाचे आ. महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आदींनी प्रचंड परिश्रम घेतले. या तिघांचेही मनापासून अभिनंदन करतो!”
पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक धोरण – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. 16 : वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. त्यानुसार राज्यात 2030 पर्यंत बहुतांश वाहने इलेक्ट्रिक वाहने असतील. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलीटीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आणि ग्राहकांना अनुदान देण्याची नव्या धोरणात तरतूद आहे. या धोरणास विविध ऑटोमोबाईल कंपन्यांकडून प्रतिसाद लाभत आहे. मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा चालविल्या जातात. येत्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक रिक्षा धावतील. यासाठी रिक्षा संघटना पुढाकार घेईल. कंपनीने देखील यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.महिंद्रा कंपनीने ट्रिओ नावाची इलेक्ट्रिक रिक्षा बाजारात आणली आहे. या रिक्षाची किंमत दोन लाख रुपये इतकी असेल. प्रत्येक किलोमीटरमागे केवळ पन्नास पैसे खर्च येणार आहे. इंधनापोटी लागणारा खर्च वाचत असल्याने रिक्षा मालकाला पाच वर्षात दोन लाख रुपयांपर्यंतची बचत याद्वारे होणार आहे.यावेळी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलीटी लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते. ट्रिओ रिक्षाचे अनावरण झाल्यानंतर स्वत: उद्योगमंत्र्यांनी रिक्षा चालवली आणि वाहना विषयी माहिती जाणून घेतली.
इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मीतीत महाराष्ट्राने घ्यावी जगात आघाडी -म्हणाले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
पुणे, दि.१६: जगाला आज हरित ऊर्जेची गरज असून प्रदूषण रोखणे आणि त्या माध्यमातून हवामान बदलाचा सामना करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, हायड्रोजन सेल आदी पर्यावरणपूरक बाबींच्या उत्पादनामध्ये देशातच नव्हे तर जगात आघाडी घेण्यासाठी या क्षेत्रातील उद्योगांनी पुढे यावे असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
पुणे महानगरपालिका आणि ‘रॉकी माऊंटन इन्स्टिट्यूट’ (आरएमआय) तसेच आरएमआय इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुणे सिटी इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सेलरेटर’ कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, आरएमआय इंडियाच्या वरिष्ठ प्राध्यापक अक्षिमा घाटे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, हवामान बदल हे संपूर्ण जगापुढील आव्हान आहे. गेल्या 11 महिन्यात देशाच्या पश्चिम किनारपट्टीला 3 मोठ्या चक्रीवादळांना सामोरे गेलो आहोत. त्यामुळे आपल्याला हवामान बदलांना सक्षमपणे सामोरे जात पर्यावरणाचे जतन करायचे आहे. त्यासाठी आपल्याला ऊर्जेच्या नैसर्गिक पर्यायांचा वापर आणि परिवहनक्षेत्रात कार्बनचे उत्सर्जन कमी करायचे आहे. हे आव्हान असले तरी यामध्ये खूप संधीदेखील दिसत असून त्याचा लाभ घ्यायचा आहे. महाराष्ट्र शासनाने या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट असे इलेक्ट्रिक वाहन धोरण (ई.व्ही. पॉलीसी) बनवले आहे.
इलेक्ट्रिक वाहने निर्मिती, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. राज्य शासनाचे ई.व्ही. धोरण देशातील एक उत्कृष्ट आणि आकर्षक धोरण असल्याचे उद्गार नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी काढले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, चार्जिंग स्टेशन उभारणी क्षेत्रातील उद्योग, संस्थांना पाठबळ देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून धोरणात आवश्यक तसे बदल करण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला यासंदर्भातील कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित केली जात आहेत. या क्षेत्रातील उद्योगांच्या मागण्यांबाबत सकारात्मकपणे काम केले जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
आशिष कुमार सिंह म्हणाले, शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. पुणे महानगर पालिकेच्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागांची निश्चिती करावी. ‘फेम’ पॉलिसी अंतर्गत केंद्र शासनाकडून इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगाला अनुदान दिले जाते त्याचा लाभ ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करावा. या क्षेत्रातील उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण डॅशबोर्ड तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
विक्रम कुमार म्हणाले, पुणे हे सर्वाधिक दुचाकींची संख्या असलेले शहर आहे. पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेला पुणे महानगर परिवहन उपक्रम बळकट करायचा आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक बसेसची संख्या सध्याच्या 150 वरून येत्या मार्चपर्यंत 650 वर नेण्यात येणार आहे. त्यातून खासगी कंपन्यांनाही इलेक्ट्रिक वाहने भाड्याने देण्यात येणार आहेत. ईव्ही उद्योगाला चालना देण्यासाठी महानगरपालिकेने खास ईव्ही कक्ष स्थापन केला आहे. चार्जिंग स्टेशन उभी करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मिळकर करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी निर्मिती, चार्जिंग स्टेशन या क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी या क्षेत्रापुढील समस्या उपस्थितांसमोर मांडल्या.
कार्यक्रमादरम्यान एआरएआय आणि पुणे महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार झाला. यानुसार एआरएआयकडून पुणे महानगरपालिकेला 10 ईव्ही चार्जर्स मोफत देण्यात येणार आहेत.
पहिला मोठा व निर्णायक विजय 1971 च्या युद्धात मिळाला : पृथ्वीराज चव्हाण
पुणे : भारताने 1965 साली पहिल्यांदा राष्ट्र म्हणून युद्ध केले आणि जिंकलेही. मात्र, बांगलादेशाच्या निर्मितीवेळी 1971 साली भारतीय सैन्याने मिळवलेला विजय हा पहिला सर्वांत मोठा व निर्णायक होता. हा वियज भारतीय सैन्यासह देशातील प्रत्येक घटकाचा व एकजुटीचा होता, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केले.

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयास 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीचे लोकार्पण गुरुवारी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सोनल पटेल, एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल पी. के. बत्रा (निवृत्त), कर्नल सदानंद साळुंखे (निवृत्त), कर्नल सुहास नेने (निवृत्त) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे महापालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून व पुणे महापालिकेच्या सहयोगातून साकारलेल्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उपमहापौर सुनीता वाडेकर, महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार दिप्ती चवधरी, अ. भा. काँग्रेसच्या सचिव सोनल पटेल, राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार, राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला, तसेच एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल पी. के. बत्रा (निवृत्त), कर्नल सदानंद साळुंखे (निवृत्त), कर्नल सुहास नेने (निवृत्त) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवदर्शन परिसरातील कै. वसंतराव बागुल उद्यानात झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती
प्रारंभी देशाचे रक्षण करताना शहीद झालेले जवान आणि नुकतेच अपघातात निधन पावलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत व त्यांच्या सोबतच्या जवानांना श्रद्धांजली व मानवंदना अर्पित करण्यात आली. तसेच 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान इंदिरा गांधी, तेव्हाचे जनरल सॅम माणेकशॉ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर या कार्यक्रमाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर बटण दाबून थ्रीडी मल्टीमीडिया लेझर चित्रफितीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले.
यावेळी एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त), कर्नल बी. पी. पात्रा (निवृत्त) आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
वीस मिनिटांची ही चित्रफीत दाखविली गेल्यानंतर पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. 1971 चे युद्ध त्यावेळी टीव्ही नसल्याने आपण बघू शकलो नाही. तरुण पिढीला याबद्दल खूपच अल्प माहिती आहे. त्यामुळेच आपल्या देशाचा इतिहास व संरक्षण दलाचे रोमहर्षक विजय याची माहिती या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे सांगून 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजय व बांगलादेशची निर्मिती याचे हे देशातील पहिले आगळे वेगळे स्मारकच तयार झाले आहे, असे ते म्हणाले. ही चित्रफीत पुणे महापालिकेतर्फे कै. वसंतराव बागुल उद्यानात रोज सायंकाळी दाखवली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
याप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 1971 च्या विजयाला आज पंन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, यामुळे संपूर्ण देशात आज विजयोत्सव साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज पुणे महापालिकेकडून अंगावर शहारे आणणारा हा कार्यक्रम आज घेतला.
1965 साली पहिल्यांदा आपण राष्ट्र म्हणून लढलो. या युद्धात भारताला विजय मिळाला, मात्र 1971 चा विजय हा आपला पहिला मोठा निर्नायक विजय होता. हा विजय भारतातील सर्वच घटकाचा होता. या विजयानंतर भारताचे व इंदिरा गांधी यांचे जगात महत्व वाढले. या युद्धाने ’रॅ’ या परकीय गुप्तहेर संस्थेचा जन्म झाला. चौदा दिवसात मिळवलेला हा विजय देशातील तिनही दलाची भूमीका व नेतृत्वाचा महत्वाची होती.
या विजयानिमित्त आबा बागुल यांनी दहा दिवस विविध उपक्रम व नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतले. यासाठी आबांचे कौतुक करणे गरजेचे आहे. सर्व पक्षनेते व अधिकार्यांना सोबत घेवून आबांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम घेतला.
या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये राष्ट्र प्रमाची भावना निर्माण होईल. सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळेल, यात शंका नाही, असेही चव्हाण म्हणाले.
याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, इतिहास जिवंत करण्याचे काम या पाण्यावरील थ्रीडी शोच्या माध्यमातून झाले आहे. शहीद जवानांमुळे आपण सुखद जीवन जगत आहोत. या शूरवीरांना अभिवादन करणारा आजचा दिवस आहे. इंदिरा गांधी यांचे नेतृत्व वाखाणण्याजोगे आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. ते काम आज आबा बागुल महापालिकेच्या माध्यमातून करत आहेत.
उल्हास पवार याप्रसंगी म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत निर्णायक लढ्याची घोषणा केली, आणि पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्कारली. त्यावेळी भारतीय सैन्याने दाखवलेले शौर्य व कामगिरी उत्तुंग होती. प्रत्यक्ष त्या लढ्यात भाग घेतलेले शूरवीर आज आपल्यासोबत आहेत, हे आपले भाग्य आहे. लढाईतील चित्र आज या शोच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. युद्ध आले की आपण सैन्याचे कौतुक करतो, आणि इतर वेळी आपण त्यांना विसरतो, हे दुदैव आहे.
सत्काराला उत्तर देताना एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, 1971 च्या युद्धावेळी सबंध देश एकजूट होऊन आमच्या पाठीमागे उभा होता. देशातील नागरिकांनी दिलेले प्रोत्साहन आम्हाला बळ देते. यशवंतराव चव्हाण यांनी उत्तम समन्वय घडवून आणला. तीनही दलांत समन्वय होता, या समन्वयामुळे 1971 चे युद्ध आपण जिंकले. सैन्यात केवळ भारतीय ही एकच जात, पंथ व धर्म असतो.
सत्काराला उत्तर देताना ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त) म्हणाले की, आम्ही 42 तास लढलो, आम्ही 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान लढलो. या युद्धाच माझ्या टिममधील 38 जवान शहीद झाले. आम्ही पाकिस्तानचा एक अधिकारी आणि 100 जवान मारले.
या चित्रफितीची निर्मिती मोरेश्वर इलेक्ट्रिकल्स आणि गार्डियन मीडिया अँड एन्टरटेनमेंट यांनी केली असून, याचे निर्माते संजय दाबके यांच्यासह 40 तंत्रज्ञांनी सुमारे तीन ते चार महिने प्रयत्नपूर्वक ही चित्रफीत पुणे महापालिकेकरिता तयार केली आहे.
यावेळी कर्नल संभाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संपूर्ण बागुल उद्यानात भारतीय ध्वज तिरंग्याची विद्युत रोषणाई केली होती. भारतीय सैन्य व पोलिस दलाच्या बँड पथकाने यावेळी सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पायगुडे यांनी केले. आभार प्रदर्शन उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी केले. राष्ट्रगीत होऊन हा कार्यक्रम संपला.
कलाकार सौरभ चांदेकर यांनी चित्रातून उलगडली अनोखी मुंबई.
मुंबईत खाकी लॅब येथे अनोखे चित्र प्रदर्शन
मुंबई-कलाकार सौरभ चांदेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील खाकी लॅब येथे भरले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काला घोडा असोसिएशनच्या अध्यक्षा, कलाकार वृंदा मिलर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ” चित्रातून मुंबई” या संकल्पनेतून अनोख्या मुंबईचे दर्शन तुम्हाला पाहता येणार आहे. या अनोख्या प्रदर्शनाबद्दल सांगताना खाकी हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक भरत गोठोसकर म्हणाले कि मी खास करून तरुण मुंबईकरांना प्रोत्साहित करतो कि प्रदर्शनासाठी यावे आणि प्रेरित व्हावे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून २६ डिसेंबर पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाहता येणार आहे. या प्रदर्शनादरम्यान अनेक नाविन्यपूर्ण कार्यशाळा हि आयोजित केल्या आहेत. त्याचबरोबर कलाकार सौरभ चांदेकर चित्रांसबोत आपल्या दर शनिवारी दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळात भेटणार आहेत. मुंबईकर आणि मुंबईला भेट देण्याऱ्या प्रत्यकाने आवर्जून पाहावे असे हे प्रदर्शन आहे. अधिक माहित साठी संपर्क साधा – . दीक्षा अय्यर +91-8097955686 / प्रताप 8828100111 किंवा
khakilab@gmail.com. स्थळ: खाकी लॅब, तिसरा मजला, हरी चेंबर्स, 58/64 शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 400001
पर्यावरण संवर्धनासाठी ,कार्बन न्यूट्रल पुण्याचे उद्दिष्ट – आदित्य ठाकरे
पुणे दि.१६- कार्बन न्यूट्रल पुणेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नाविन्यता (इनोव्हेशन), निधीची उपलब्धता आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर भर द्यावा, असे प्रतिपदान राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर येथे पुणे इंटरनॅशनल सेंटरद्वारा आयोजित ‘कार्बन न्यूट्रल पुणे-२०३०’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पीआयसीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर विकास प्राधिकरण आयुक्त राहुल दिवसे, पीआयसीचे ट्रस्टी प्रा.प्रशांत गिरबने, प्रा.अमिताव मलिक, संचालक अभय वैद्य आदी उपस्थित होते.
श्री.ठाकरे म्हणाले,पर्यावरणपूरक नव्या संकल्पना आणण्याची गरज आहे. शासन अशा कल्पनांना प्रोत्साहन देईल. विद्युत वाहनांसोबत इतरही पर्यावरणस्नेही पर्यायांचा विचार करावा लागेल. कार्बन न्यूट्रलसाठी परिपूर्ण प्रस्ताव आल्यास निधीसाठी आंतरराष्ट्रीय संस्थांशी संपर्क साधता येईल. पर्यावरण संवर्धनाच्या कामासाठी स्थानिक वित्तीय संस्थांचीही मदत घ्यावी.
कार्बन न्यूट्रलचे महत्व सोप्या पद्धतीने आणि तेवढ्याच प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवावे लागेल. लोकप्रतिनिधींनादेखील या कार्यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. क्रेडाई, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यासारख्या मोठ्या संस्थांनाही सहभागी करून घ्यावे लागेल. चळवळीचे स्वरूप आल्याशिवाय उद्दिष्ट गाठता येणार नसल्याने उपक्रमाचे नियोजन करताना लोकसहभागही वाढविणे गरजेचे आहे. कार्बन न्यूट्रलचे उद्दिष्ट वेगाने गाठण्याची महत्वाकांक्षा आणि त्यादिशेने प्रयत्न सुरू ठेवल्यास महाराष्ट्र जगासमोर आदर्श प्रस्थापित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्बन न्यूट्रल पुणे साठी पुणे इंटरनॅशनलसारख्या संस्थांनी आणि महापालिकांनी पुढाकार घ्यावा, शासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
कार्बन न्यूट्रलिटीसाठी निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. राज्यात त्यासाठी महाराष्ट्र पर्यावरण बदल परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. असे करणारे महाराष्ट्र देशातील एकमात्र राज्य आहे. पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न केवळ एका विभागाकडून अपेक्षित नसून त्यासाठी सर्वांचे सहकार्य लागणार आहे. प्रत्येक आठवड्यात पर्यावरण संदर्भातील मुद्द्यांवर चर्चा होण्याच्या दृष्टीने जूनपर्यंत कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
श्री.माशेलकर म्हणाले, माझी वसुंधरा अभियान ही एक क्रांतिकारी कल्पना आहे. कार्बन न्यूट्रल उद्दिष्टासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल. पुणे हे बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचे शहर आहे. त्यामुळे इथे नव्या कल्पना निश्चितपणे पुढे येतील. कामाचा वेग, व्यापकता आणि निरंतरता असणे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक आहे. भारतासाठी भारतात निर्माण झालेले नवे सृजन उपयुक्त ठरेल, त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील.
विक्रम कुमार म्हणाले, पुणे महानगरपालिका ५०० नवी विद्युत बसेस घेत आहे. सौर ऊर्जेसाठी १६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्युत वाहनांचा उपयोग वाढविण्यात येत आहे. कार्बन न्यूट्रलिटीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे.
श्री.पाटील म्हणाले, गेल्या काही महिन्यापासून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिकेच्या आस्थापनांमध्ये सौर ऊर्जेचा उपयोग करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
श्री.दिवसे म्हणाले, कार्बन न्यूट्रल टाऊनशीपबाबत नियोजन करण्यात येत आहे. जैव विविधता उद्यान स्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कार्बन न्यूट्रलिटीसाठी आवश्यक माहितीचे संकलनही करण्यात आले आहे.
प्रा.गिरबने आणि प्रा.मलिक यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले.ईईसीसीचे सिद्धार्थ भागवत यांनी सादारीकरणाद्वारे कार्बन न्यूट्रलिटीबाबत करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.
चित्रनगरीत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 16: महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीमार्फत मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्याचे नियोजन असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
आज मंत्रालयात फिल्मसिटी संदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, अजय सक्सेना, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये मराठीमध्ये आशयघन चित्रपट आलेले आहेत. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने हे सिनेमे पाहण्याची संधी प्रेक्षकांना फिल्मसिटीमार्फत उपलब्ध होणार आहे. लोककलावंताचे वार्षिक संमेलन, महाराष्ट्र महोत्सव, मराठी चित्रपट पुरस्कार, लोकोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि फिल्मसिटी पुढाकार घेणार आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे दरवर्षी एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि कलाकार कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पुढाकार घ्यावा. याशिवाय राज्यातील वेगवेगळया कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची माहिती एका ठिकाणी मिळावी यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
बांधकाम पुर्ण झालेली ई-लर्निंग शाळा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन
पुणे, दि. १६ डिसेंबर – सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरी आदी भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पध्दतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने गेल्या कित्येक वर्षांपासून वडगाव बुद्रुक येथे पुणे महानगरपालिकेच्या ई-लर्निंग शाळेचे बांधकाम पुर्ण होउन अद्यापदेखील ही शाळा सुरु करण्यासाठी उर्वरित बाबींची पुर्तता पालिकेतील सत्ताधार्यांकडून केली जात नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या परिसरातील मुलांचे उज्ज्वल भविष्य त्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याखाली शाळा भरवून अनोखे आंदोलन केले गेले.
२०१३ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या शाळेच्या बांधकासाठीचे बजेट बारा कोटीचे बजेट होते. परंतु बजेट पुरेसे नसल्यामुळे दोन मजले कमी करून तीन मजली इमारत बांधण्यात आली असून काम अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र पालिकेतील सत्ताधार्यांच्या उदासीनतेमुळे या उर्वरित कामांना निधी मिळेनासा झाला आहे. केवळ देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरदचंद्रजी पवार यांचे नाव या ई लर्निंग स्कूलला दिल्यामुळेच भाजपची तिरस्काराची भूमिका स्पष्ट होत आहे. या भागातील सत्ताधारी भाजपचे चार नगरसेवक, महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हे जाणून बुजून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला.
शिवसेनेचे खडकवासला क्षेत्र समन्वयक मनिष जगदाळे म्हणाले, ई-लर्निंग शाळा मुद्दाम बंद ठेऊन सत्ताधारी भाजप बहुजन आणि सामान्य स्थानिक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेत आहे. मात्र सिंहगड रोड परिसरातील विद्यार्थ्यांवर अन्याय करत भाजप कोणता सूड उगावत आहे? असा सवाल जगदाळे यांनी केला आहे.
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पुणे मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, शहरसंघटीका संगीताताई ठोसर, सविताताई मते, नगरसेविका प्राचीताई आल्हाट, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, पल्लवीताई जावळे, श्वेता चव्हाण, युवासेना सहसचिव किरण साळी, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, आनंद गोयल, बाळासाहेब मालुसरे, मनिष जगदाळे, वैभव हनमघर, अनंत घरत, किशोर रजपूत, नंदू येवले, राजेश चव्हाण, दीपक शेडे, संतोष गोपाळ, राजेंद्र शिंदे, उमेश गालिंदे, संदीप गायकवाड, युवराज पारिख, मुकुंद चव्हाण, कल्पनाताई थोरवे, छाया भोसले, स्वाती कथलकर, रुपेश पवार, संजय वाल्हेकर, प्रथमेश भुकन, संतोष सावंत, राजाभाऊ होले, सुरेश घाडगे, महेश पोकळे, शंकरराव हरपळे, बाळासाहेब गरुड, राजेश वाल्हेकर, राहूल जेटके, सनि गवते, अजय परदेशी, मारुती ननावरे, गणेश कामठे, अक्षय माळकर, चंद्रकांत केगार, संदीप गद्रे, विकी धोत्रे, विनोद सातप, आकाश शिंदे, आशिष शिर्के, विजय पालवे, सुरेश कांबळे, योगेश जैन, राज गडुगुळ, नितिन निगडे, गणेश भापकर, श्रृती नाझरकर, अनिता परदेशी, प्रज्ञा लोणकर, कलावती घाणेकर, शर्मिला येवले, सुनिता खंडाळकर, गायत्री गरुड, भावनाताई थोरात, प्रशांत काकडे उपस्थित होते.
दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे विजय दिवस साजरा
पुणे, 16 डिसेंबर 2021
16 डिसेंबर 2021 रोजी “विजय दिवस 2021” साजरा करण्यात आला. हा दिवस 50 वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या शानदार विजयाचे प्रतीक आहे. या “सर्वात मोठ्या विजयामुळे “बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आले आणि भारत एक प्रादेशिक महासत्ता म्हणून उदयाला आला. प्रतिस्पर्ध्यावरील या निर्णायक विजयासह, भारताच्या सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा स्वतःला राष्ट्रीय शक्तीचा एक मजबूत घटक म्हणून सिद्ध केले.
युद्धादरम्यान, दक्षिण कमांडच्या सैन्याने शौर्य गाजवत पाकिस्तानच्या कारवायांपासून देशाच्या सीमांचे रक्षण केले. या युद्धादरम्यान दक्षिण कमांड क्षेत्रात गाजलेल्या लढाया म्हणजे लोंगेवाला आणि परबत अलीच्या लढाया , ज्यात पाकिस्तानी सैन्याचा भारतीय जवानांनी धुव्वा उडवला होता. लेफ्टनंट कर्नल (नंतर ब्रिगेडियर)भवानी सिंग यांच्या नेतृत्वाखाली 10 पैरा कमांडो बटालियनने पाकिस्तानामधल्या छाछरो गावात घुसून केलेला हल्ला ही या युद्धातली शत्रूच्या प्रदेशातकेलेली आणखी एक चित्तथरारक आणि गाजलेली लढाई होती. या लढायांमध्ये भारतीय सैन्याचे शौर्य,दृढनिश्चय आणि पराक्रमाचे सर्वांना दर्शन घडले.या विजय दिवसानिमित्त आज या युद्धात प्रचंड शौर्य गाजवत आपल्या महान राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सर्वोच्च बलिदान देणा-या भारतीय सशस्त्र दलांचे सैनिक, हवाई अधिकारी आणि नौसैनिकांचे स्मरण करत त्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. देशाप्रती आपल्याकर्तव्याचे पालन करताना वीरमरण पत्करणाऱ्या सैनिकांना यावेळी सलाम करण्यात आला. दक्षिण कमांड मुख्यालयातील लष्करी अधिकारी आणि जवान या कार्यक्रमाला उपस्थित होते. या समारंभात दक्षिण कमांड युद्ध स्मारक , पुणे येथे 1971 च्या भारत पाक युद्धातील शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दक्षिण कमांड मुख्यालयाच्या वतीने लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, आर्मी कमांडर, सदर्न कमांड यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर सर्वउपस्थितांनी मौन पाळत या महान राष्ट्राच्या हुतात्म्यांच्या दृढ संकल्पाला आदरांजली वाहिली.
तरुणांनी सैन्यात सहभागी व्हावे-महावीर चक्र विजेते कमांडो नायक दिगेंद्र कुमार उर्फ कोब्रा कमांडो यांचे मत
भारतीय सेनेची विजयगाथा स्वर्णिम विजय दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन
पुणे, ता. १६ डिसेंबर : जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. परंतु मरण असे आले पाहिजे जे जगाने लक्षात ठेवले पाहिजे. देशासाठी पराक्रम करा. तरुणांनी सैन्यात सहभागी व्हावे आणि भारतमातेची सेवा करावी असे आवाहन कारगील युद्धात अतुलनीय पराक्रम आणि जबरदस्त शौर्यामुळे महावीर चक्र मिळवलेले भारतीय पायदळाचे कमांडो नायक दिगेंद्र कुमार उर्फ कोब्रा कमांडो यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या वतीने स्वर्णिम विजय दिनानिमित्त (१६ डिसेंबर) भारतीय सेनेच्या विजयगाथेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी कोब्रा बोलत होते.

प्रदर्शनापूर्वी सकाळी साडेनऊ वाजता ताथवडे उद्यानातील हुतात्मा प्रदीप ताथवडे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पथ संचलन आयोजित करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, एअर चीफ व्हॉईस मार्शल भूषण गोखले, संयोजक योगेश गोगावले, वीरेंद्र महाजनी, बापू पाडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बॅटल ऑफ हिली (ईस्ट पाकिस्तान), बांगलादेशी निर्वासित, बॅटल ऑफ लोंगोवाल, आयटेशन तंगाली (पॅराशूट ड्रॉप), बॅटल ऑफ शकरगड, पाकिस्तान सैन्याची शरणागती, शरणागतीवर स्वाक्षरी, परमवीर चक्र विजेत्यांची माहिती आदी शंभरहून अधिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट दिली.
डीआरडीओ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांचे संयोजन सहकार्य लाभले. त्याबरोबर विविध क्षेत्रांतील संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधींसह सहभागी झाले होते.
पुण्याचे महापौर मोहोळ देशातील महापौरांना सांगणार ‘स्वच्छ भारत मिशन’चा अनुभव !
- केंद्राच्या ‘न्यू अर्बन इंडिया’ परिषदेसाठी महापौर मोहोळ वाराणसीत
पुणे (प्रतिनिधी)-
पुणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करणारे शहर म्हणून पुण्याचा देशात डंका आहे. हा धागा पकडून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे देशातील महापौरांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे शहराने केलेल्या कामगिरीचा अनुभव सांगणार आहेत. निमित्त आहे केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने ‘न्यू अर्बन इंडिया’ अंतर्गत आयोजित केलेल्या देशातील महापौरांच्या परिषदेचे. विशेष म्हणजे देशातील केवळ दोन महापौरांनाच यात अनुभव सांगण्याची संधी मिळाली असून त्यात महापौर मोहोळ यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने वाराणसी येथे ‘न्यू अर्बन इंडिया’ अंतर्गत देशातील महापौरांची परिषद शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी आयोजित केली असून यात देशभरातील महापौरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. शिवाय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वच्छ भारत मिशनवर तर सुरतच्या महापौर हेमाली बोघावाला या ‘अमृत’ योजनेचे सादरीकरण करणार आहेत. या दोन्ही महापौरांची निवड थेट केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने केली आहे.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘देशाच्या महापौरांसह केंद्रीय नगरविकास मंत्र्यांसमोर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पुणे शहराने केलेल्या कामाची माहिती देण्याची संधी मिळाली, हा पुणेकरांचा सन्मान आहे. शिवाय शहर स्वच्छतेसाठी राबणाऱ्या १५ हजारांपेक्षा जास्त स्वच्छ सेवकांचे हे यश असून हा त्यांचाही सन्मान आहे, याचे मनस्वी समाधान आहे. देशातील महापौरांसमोर प्रेझेन्टेशन देणार असून यात पुणे शहराने कशी कामगिरी केली याची सविस्तर माहिती देणार आहे.’
‘भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महापालिकेची सत्ता आली तेव्हा कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता. शिल्लक राहणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. अशातच आम्ही जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया कशी होईल, यासाठी यंत्रणा उभी करण्याकडे विशेष लक्ष दिले. याचेच सकारात्मक परिणाम म्हणून कचरा प्रक्रिया करण्यात पुणे महानगरपालिका स्वयंपूर्ण झाली आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
