Home Blog Page 2130

क्रीडामंत्री सुनील केदार यांची आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट

0

पुणे, दि. 7: क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला (एएसआय) भेट दिली आणि तेथील विविध क्रीडा सुविधांची माहिती घेतली.

याप्रसंगी ‘एएसआय’चे कमांडन्ट कर्नल देवराज गील यांनी त्यांचे स्वागत केले. राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, लेफ्टनंट कर्नल दलजीत यावेळी उपस्थित होते.

कर्नल गील आणि लेफ्टनंट कर्नल दलजीत यांनी येथील विविध क्रीडा सुविधांची माहिती मंत्री श्री. केदार यांना दिली. भारोत्तोलन, बॉक्सिंग, धनुर्विद्या, वॉटर डायव्हिंग, अॅथलेटिक्स मधील विविध क्रीडाप्रकार, जलतरण, तलवारबाजी, कुस्ती, क्रीडा विज्ञानशाखा आदी ठिकाणांना भेट देऊन त्यांनी माहिती घेतली. उंचीच्या ठिकाणावर ऑक्सिजनच्या कमतरतेचा शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ नये यासाठी हायपॉक्सिक चेंबरमध्ये खेळाडूंची करून घेण्यात येणारी तयारी, खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आदी अनेक बाबींची माहिती ‘एएसआय’ च्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

श्री. केदार म्हणाले, येथून घडणारे खेळाडू देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे आहेत. या खेळाडूंनी ऑलिम्पिक्स, जागतिक स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धांमधील विविध क्रीडाप्रकारात उच्च दर्जाची कामगिरी करून पदके मिळवून दिली आहेत. या सुविधांची माहिती राज्यात स्थापन होणाऱ्या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात विविध अभ्यासक्रम आणि क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठी उपयुक्त ठरू शकेल. त्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या नियामक परिषदेचे सदस्य निलेश कुलकर्णी, माजी ऑलिम्पिक खेळाडू मालव श्रॉफ आदी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील भरती तब्बल दीड वर्षे रखडवली -संतप्त ‘आप’ ने केला भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीचा आरोप

0


डॉक्टर मनपात सेवेला यायला तयार आहेत पण पुणे मनपा नियुक्ती देत नाही!
१७७ पैकी केवळ ८१ पदे भरली तर ९६ रिक्त..

अनेक प्रवर्गाच्या प्रारुप याद्या जाहीर होऊन ८ महिने ते दीड वर्ष झाले पण अजून नियुक्त्या नाहीत!
कोरोनाशी अशी लढणार का पुणे महानगरपालिका?
पुणे -महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कायम आस्थापनेवरील विविध संवर्गातील डाॅक्टरांच्या रिक्त पदभरती  प्रक्रियेस केवळ भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीमुळे विलंब होत असून नियुक्त्या कोणाला द्यायच्या याद्या तयार करूनही दीड वर्षे प्रत्यक्षात नियुक्त्या दिल्या नाहीत
यामागे भार्ष्टाचार हेच कारण दडलेले आहे असा आरोप करत किमान कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना तरी …जनाची नाही तर मनाची बाळगा … लोकांना मास्क लावा सांगणारे अनेक बंधने लादणाऱ्यांंचा हा कारभार म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान … असाच असल्याचा आरोप आज आप चे प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी केला आहे.

आज त्यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांसह अनेकांना याबाबत निवेदने दिली ते म्हणाले ,’कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून त्यादृष्टीने प्रशासन तयारी करत आहे तसेच शिवाजीनगर येथील पीपीपी तत्त्वावरील जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा सुरु करणार असल्याचे काल वृत्तपत्रातून समजले. पण पुणे मनपाची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी महत्वाची असलेली डॉक्टर भरती मात्र गेली दीड वर्षे रखडली आहे.कोविड साथीच्या आपत्तीचा इष्टापत्ती म्हणून करुन आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची संधी होती. पण दुर्दैवाने याबाबत फारसे काही केले गेले नाही. वर्ष 2020 च्या सुरुवातीलाच आम आदमी पक्षाने पुणे मनपाच्या आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली होती तसेच जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्याच्या अगोदर सध्या पुरेशा वापरात नसलेल्या पुणे मनपाच्या अनेक रुग्णालयांच्या इमारतीचा, साधनसामुग्रीचा दर्जा वाढवून ती रुग्णालये प्राधान्याने वापरात आणण्याचा आग्रह धरला होता. यामध्ये बिंदू माधव ठाकरे रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, वीरमाता जिजाऊ रुग्णालय, गाडीखाना दवाखान्याची जुनी इमारत, कर्णे दवाखाना यासारख्या अनेक ठिकाणच्या रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे बंद असलेला मेडिकल आयसीयू अद्यापही सुरु नाही. याबाबत कोविड लाटेत देखील आम आदमी पक्षाने आंदोलने केली होती. पण याबाबत पुणे महानगरपालिका उदासीन दिसून येते. खाजगीकरण, पीपीपी तत्त्वावर रुग्णालय चालवायला देणे, खाजगी हॉस्पिटलची बिले भरणे, त्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणे, टक्केवारीचे राजकारण, डॉक्टर भरती करण्याअगोदरच केवळ बिल्डिंग बांधणे आणि उपकरणे खरेदी करणे यामध्येच महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रस आहे. 
पुणे महानगरपालिकेची डॉक्टर भरती देखील अशाच भ्रष्ट कारभाराच्या जंजाळामध्ये अडकली आहे. डॉक्टर भरती करून आरोग्य व्यवस्था सुधारणे ऐवजी वशिल्याचे लोक या भरतीमध्ये कसे घुसवता येतील आणि त्यासाठी चालू असलेली भरती प्रक्रिया प्रचंड काळ लांबवत ठेवून योग्य उमेदवारांना कसे डावलता येईल याचं कुटील राजकारण पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये चालू आहे. एका बाजूला पुणे महानगरपालिका दावा करते की आम्हाला हवे असलेले पात्र डॉक्टर भेटत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला पात्र व्यक्तींनी अर्ज करून देखील त्यांची भरती दीड ते दोन वर्षे केली जात नाही.
पुणे महापालिकेमार्फत आरोग्य विभागात वर्ग 1 च्या 120 व वर्ग 2 च्या 57 अशा एकूण 32  संवर्गाच्या 177  डाॅक्टरांची/वैद्यकीय अधिकारी पदांची कायम आस्थापनेवरील सरळसेवा भरतीची जाहीरात दि 17 एप्रिल 2020 रोजी प्रसिद्ध झाली होती. सदर पदांकरीता अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना  सन 2020 च्या मे महिन्यात कागदपत्रांच्या छाननीकरीता उमेदवारांना बोलावण्यात आलेले होते . तदनंतर सदर पदांच्या  प्रारूप यादी  जुलै 2020 मधे प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या.सदर प्रारूप यादीवर काही हरकती असल्यास 2 दिवसांत आॅनलाईन हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. परंतु, जाहिरातीतील 177  पदांपैकी फक्त 81 उमेदवारांना पदस्थापना मिळालेली आहे, अजूनही 96 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.  यातील 3  संवर्गाच्या  म्हणजेच दंतशल्यचिकित्सक – (6 पदे), भौतिकोपचार तज्ञ- (9 पदे), आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी (9 पदे) एकूण 24 पदांच्या प्रारुप यादी बनवून देखील गेली दीड वर्षे अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मागील दीड वर्षापासून निवड प्रक्रिया का पूर्ण  झालेली नाही?  योग्य पात्रता असलेले डॉक्टर पुणे मनपात सेवा देण्यासाठी तयार असताना, छाननीमध्ये ते पात्र होऊन प्रारुप यादी प्रसिद्ध होऊन दीड वर्षे होऊन देखील अंतिम यादी का जाहीर केली जात नाही? यासाठी कर्मचारी निवड समितीची बैठक मागील दीड वर्षापासून का झालेली नाही? भ्रष्टाचार, आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी आणि राजकीय लागेबांधे असणाऱ्या उमेदवारांना घेण्यासाठीच ही प्रक्रिया मुद्दाम रखडवली गेली आहे.
कोरोना सारख्या गंभीर संकटात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत होण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित झालेली आहे. तसेच सध्या ओमायक्राॅनच्या रूपात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही आरोग्य विभागाच्या अत्यावश्यक सेवेतील पदभरती लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सदर रखडलेल्या या डाॅक्टरांच्या पदभरती बाबत आपण लक्ष घालून, योग्य ती कार्यवाही करावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.अशी मागणी आप च्या वतीने विजय कुंभार आणि दो. अभिजित मोरे आणि पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांना दिली अब्रुनुकसानीची नोटीस

0

मुंबई-भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यातील वाद कोर्टाच्या पायऱ्या चढू लागला आहे. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस संतापल्याचे दिसतेय. विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या की, ‘रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरे झाले. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती. कमीत कमी रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाही. हे मला भाजपच्या लोकांना सांगावं वाटतं’. या विधानानंतर आता अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे.


अमृता फडणवीसांनी लिहिले की, ‘आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण,आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!’ असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे. त्यांनी विद्या चव्हाणांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. हा अब्रुनुकसानीचा दावा असून या बाबतचा खुलासा कोर्टामध्येच करावा असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

वर्क फ्रॉम नेचर, वर्क विथ नेचर संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद; एमटीडीसीच्या पुणे विभागाची सर्वोत्तम कामगिरी

0

मुंबई, दि. 7 : कोरोना संकटाचे परिणाम कमी झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे पुणे विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यामध्ये पुणे विभागातील पर्यटक निवास सरस ठरली आहेत. विभागाने राबविलेल्या नवनवीन संकल्पना, कोरोना रोखण्यासाठी राबविलेल्या उपाययोजना, पर्यटकांना दिलेल्या सर्वोत्तम सुविधा यामुळे या विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांनी पुन्हापुन्हा भेट दिली, अशी माहिती एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली.

महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यामध्ये माळशेज घाट पर्यटक निवासास एप्रिल ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेले पर्यटक निवास म्हणून प्रमाणित करण्यात आले. विष्णू गाडेकर हे या पर्यटक निवासाचे व्यवस्थापक आहेत. महाबळेश्वर पर्यटक निवासास नोव्हेंबरमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम पर्यटक निवास म्हणून गौरविण्यात आले. सुहास पारखी हे या पर्यटक निवासाचे व्यवस्थापक आहेत. पानशेत पर्यटक निवासास एप्रिल ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेले पर्यटक निवास म्हणून गौरविण्यात आले. गणेश मोरे हे या पर्यटक निवासाचे व्यवस्थापक आहेत. सर्वोत्तम कामगिरीबद्दल या सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुणे विभागातील पर्यटक निवासांमध्ये राबविण्यात आलेल्या वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या अभिनव संकल्पनांमुळे महामंडळाच्या पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती वेबसाईट, फेसबुक आणि व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात आली.

पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या अव्याहतपणे सुरु असलेल्या उपाययोजना, उपहारगृहे आणि अनुषंगिक बाबींची काटेकोरपणे केलेली स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण तसेच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सिमीटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्था, पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा यामुळे महामंडळाची पर्यटक निवासे पर्यटकांना आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री पटली आहे. त्यामुळे डिसेंबर, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना प्राधान्य देत पर्यटकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

वर्क फ्रॉम नेचर, मातीच्या भांड्यातील जेवण, अनुभवात्मक पर्यटनांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना आणि खाद्यपदार्थांना दिलेले प्राधान्य यामुळे पर्यटकांना आपल्या पर्यटनाचे प्रसंग संस्मरणीय करता आले. त्यामुळे पर्यटकांनीही  निसर्गाचे आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेत, शासकीय नियमांचे पालन करीत पर्यटनाचा, नववर्ष स्वागताचा आनंद घेतला. आगामी कालावधीत अनुभवात्मक पर्यटनाबरोबरच वेगवेगळ्या अभिनव संकल्पना राबवून पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नरत आहे, असे श्री. हरणे यांनी सांगितले.

आयसोलेशनचा कालावधी आता 14 ऐवजी 7 दिवसांचा

0

कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना आता 14 दिवसांऐवजी केवळ 7 दिवस त्यांच्या घरी आयसोलेट किंवा क्वारंटाइन राहावे लागेल. इतकेच नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण देखील 94% वरून 93% करण्यात आले आहे.अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत हा तिसरा मोठा देश आहे ज्याने आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे. देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी दररोज येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली. एका अंदाजानुसार, यापैकी सुमारे 60% रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. ओमायक्रॉनच्या बहुतेक रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसतात, परंतु डेल्टा प्रकाराच्या तुलनेत तो 30 पट वेगाने पसरतो.

नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, ज्या दिवशी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्या दिवसापासून 7 दिवसांच्या आयसोलेशन कालावधीची सुरुवात मानली जाईल. जर रुग्णाला आयसोलेशनदरम्यान सलग 3 दिवस ताप आला नाही तर आठव्या दिवसापासून तो कोरोना निगेटिव्ह मानला जाईल. यासाठी कोरोना तपासणीचीही गरज भासणार नाही.

लक्षणे नसलेला रुग्ण कोणाला मानले जाईल?

लक्षणे नसलेला रुग्ण म्हणजे ज्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे, परंतु त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्याच वेळी, खोलीच्या सामान्य हवेमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन 93% पेक्षा जास्त आहे. पूर्वी ऑक्सिजन सॅच्युरेशनचे हे प्रमाण 94% होते.

सौम्य लक्षणे असलेले रुग्ण कोण असतील?
ज्यांना तापासह किंवा तापाशिवाय अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्टशी संबंधित लक्षणे आहेत. परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होत नाही. याशिवाय, रुग्णाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन 93% पेक्षा जास्त आहे, अशांना सौम्य लक्षण असलेले रुग्ण समजले जाईल.

रुग्णांना घरी कसे आयसोलेट केले जाईल?

  • जर डॉक्टरांनी लेखी स्वरुपात सांगितले की, रुग्णात लक्षणे नाहीत किंवा असल्यास सौम्य आहेत, तर अशा रुग्णांना होम आयसोलेट केले जाईल.
  • ज्यांच्या घरी रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबाला क्वारंटाइन ठेवण्याची व्यवस्था आहे अशा लोकांना घरी आयसोलेट केले जाईल,
  • रुग्णाची काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती 24 तास तिथे असणे आवश्यक आहे. रुग्णाचा आयसोलेशनचा काळ संपेपर्यंत देखभाल करणारी व्यक्ती आणि डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात राहतील.
  • नियंत्रण कक्षाचा क्रमांक कुटुंबाकडे राहील आणि आयसोलेट झालेल्या रुग्णाला वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.

होम आयसोलेट रुग्णांनी काय करावे आणि काय करू नये?

  • घरातील आयसोलेट रुग्णाला कुटुंबातील इतर सदस्यांपासून दूर राहावे लागेल. विशेषत: वृद्ध आणि बीपी, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना अंतर ठेवावे लागेल.
  • आरोग्य विभागाने रुग्णासाठी ज्या खोलीची निवड केली आहे, त्याच खोलीत रुग्णाला आयसोलेट ठेवावे लागणार आहे. खोल्या वारंवार बदलता येणार नाही.
  • आयसोलेशनची खोली खुली आणि हवेशीर असावी जेणेकरून ताजी हवा आत आणि बाहेर जाऊ शकेल. रुग्णाने त्याच्या खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
  • आयसोलेट झालेल्या रुग्णाला खोलीच्या आतही ट्रिपल लेयर मास्क वापरावा लागेल. जर मास्क 8 तासांनंतर ओला किंवा गलिच्छ झाला तर तो बदलला पाहिजे.
  • रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती आणि रुग्ण दोघांनीही N-95 मास्क वापरावा.
  • मास्क टाकून देण्यापूर्वी, त्याचे तुकडे करावे आणि कागदाच्या पिशवीत किमान 72 तास ठेवावा. त्यानंतर मास्क फेकून द्यावा.
  • रुग्णाने विश्रांती घ्यावी आणि शरीरात पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नये.
  • सावधगिरी बाळगा आणि आपले हात वारंवार धुवा. किमान 40 सेकंद साबणाने हात धुवा आणि सॅनिटायझर वापरा.
  • रुग्णाने त्याची भांडी किंवा इतर वस्तू कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत शेअर करु नका.
  • दारे, स्विच बोर्ड, मास्क आणि हातमोजे यांसारख्या उपयुक्त वस्तू देखभाल करणारी व्यक्ती किंवा रुग्णाने स्वच्छ करत राहावे.
  • रुग्णाने त्याची नाडी आणि ऑक्सिजनची पातळी तपासत राहावी.
  • संक्रमित व्यक्तीने दररोज त्याच्या शरीराचे तापमान तपासावे आणि जर तब्येत बिघडली तर ही बाब ताबडतोब डॉक्टर आणि नियंत्रण कक्षाला कळवावी लागेल.

रुग्णाची देखभाल करणा-या व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये?

मास्क कसा वापरायचा?

  • रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने ट्रिपल लेयर मास्क वापरावा.
  • रुग्णाच्या खोलीत जाताना N-95 मास्क घालावा.
  • जेव्हा तुम्ही तोंडावर मास्क घालता तेव्हा त्याला वारंवार स्पर्श करू नका. असे केल्याने संसर्ग पसरू शकतो.
  • जर तुमचा मास्क गलिच्छ किंवा ओला झाला असेल तर तो ताबडतोब बदला.
  • मास्क टाकून देण्यापूर्वी, त्याचे तुकडे करा आणि कागदाच्या पिशवीत किमान 72 तास ठेवा. त्यानंतर मास्क फेकून द्या.
  • मास्क टाकून दिल्यानंतर हात धुवा.
  • हात धुण्यापूर्वी शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करू नका.

वृद्धांना देखील होम आयसोलेट केले जाऊ शकते?

  • 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या संक्रमित आणि गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना डॉक्टरांच्या परवानगीनंतरच होम आयसोलेट केले जाईल.
  • एचआयव्ही किंवा कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना घरी आयसोलेट केले जात नाही, परंतु डॉक्टरांनी उपचारानंतर होम आयसोलेशनची परवानगी दिल्यास ते केले जाऊ शकते.

वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेअंतर्गत माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि.7 :  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १९५४-५५ पासून वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी मानधन योजना राबवण्यात येत आहे. आजमितीस जवळजवळ तीस हजार साहित्यिक व कलावंत या योजनेचा लाभ घेत आहेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे या योजनेतील काही कलाकारांची अतिरिक्त माहिती उपलब्ध नसल्यामुळे  कलाकारांनी स्वत:चा आधार क्रमांक, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक ही माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. राज्यातील मानधन योजनेतील सर्व कलाकारांनी तपशीलवार वैयक्तिक माहिती 8424920676 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठविण्यात यावी. याबाबत माहितीची एक प्रत जिल्हा समाज कल्याण अधिकारी / गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष कागदपत्रांच्या स्वरूपात सादर करावी. यामुळे मानधन धारकांना मानधन विषयक घडामोडी व इतर सर्व माहिती मेसेज द्वारे देता येईल.

तसेच मानधन योजनेअंतर्गत काही कलाकारांना मानधन मिळत नाही. अशा आशयाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मानधन न मिळण्यामागील कारणे म्हणजे, बँकेचा आयएफएससी कोड न देणे किंवा चुकीचा देणे, हयातीचा दाखला न देणे, चुकीचा बँक क्रमांक देणे, वारसाची नोंद न करणे इत्यादी आहेत. त्यामुळे ज्या साहित्यिक व कलाकारांना मानधन मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यांनी आपली सर्व माहिती संचालनालयाकडे वरील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावी, असे  आवाहन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत कलाकारांची व साहित्यिकांची सर्व माहिती ३१ जानेवारीपर्यंत संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक असल्याने सर्व कलाकार व साहित्यिक यांनी  ३१ जानेवारी २०२२ पर्यंत आपली माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी / गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी. अशी माहिती ३१ जानेवारीपर्यंत न पाठविल्यास मार्च २०२२ चे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही.

याबाबतचे विहित नमुन्यातील अर्ज सर्व पंचायत समिती व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहेत. वृद्ध साहित्यिक व कलावंतानी मानधन योजना माहिती अद्ययावतीकरणासाठी 1) कलाकाराचे छायाचित्र, 2) कलाकाराचे नाव, 3) स्वतः की वारस, 4) पत्ता, 5) निवड वर्ष, 6) कलाप्रकार, 7) आधार क्रमांक, 8) बँकेचे नाव व शाखा, 9) बँक खाते क्रमांक, 10) आय एफ एस सी क्रमांक, 11) पॅन कार्ड क्रमांक या विहित नमुन्यात अर्जासाठी कागद पत्रांची पूर्तता करुन आपली माहिती अद्ययावत करुन पाठवावी, असे सहायक संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणाला देखील मान्यता

0

नवी दिल्ली-

सुप्रीम कोर्टाकडून वैद्यकीय अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या ओबीसींच्या 27 टक्के आरक्षण आणि ईडब्ल्यूएसच्या 10 टक्के आरक्षणाच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे नीट पीजी समुपदेशन प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. यामुळे नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली होती. यामुळे ही प्रक्रिया लवरकच सुरू होणे महत्वाचे असल्याचे नमूद करत या प्रकरणावर शुक्रवारी निर्णय देण्यात येणार असल्याचे कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार कोर्टाकडून आज निर्णय देण्यात आला आहे.

मागच्यावर्षी जून महिन्यामध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान यावेळी कोर्टाने आर्थिकदृष्टया मागास घटकासाठी आरक्षण मान्य केलेले आहे. मात्र आठ लाखांच्या उत्पन्न मर्यादेससंबंधीचा निर्णय मार्च महिन्यात दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या जुने निकष लावून काऊन्सलिंग सुरु करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 7 :- प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे राज्य शासनाचे धोरण आहे. पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची सोडत त्याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘सर्वांसाठी घरे’ हा कार्यक्रम शासनामार्फत प्राधान्याने राबविणार असून म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणे येथील जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 नवीन सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथील शासकीय निवासस्थानातील कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अधिकारी नितीन माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने अनेक मोठे निर्णय घेतले. त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था मिळाली. राज्यातल्या सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरे’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काचे घरे देण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुक्तीसाठी लसीकरण हेच मोठे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

या लॉटरीच्या निमित्ताने ज्यांना हक्काची घरे मिळणार आहेत, त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. इतरांनी निराश न होता, म्हाडाच्या पुढच्या सोडतीत भाग घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी केले.

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध – कृषिमंत्री दादाजी भुसे

0

मुंबई, दि. 7 : राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ जानेवारी २०२२) जारी करण्यात आल्याची माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाकरिता अनुदान देण्यात येते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ४५ टक्के अनुदान ५ हेक्टर कमाल क्षेत्राकरिता देण्यात येते. योजनेकरिता केंद्र शासन ६० टक्के व राज्य शासन ४० टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देते.

राज्य शासनाने  दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी  राज्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याचा निर्णय शासन निर्णयाद्वारे घेतला. त्यानुसार प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ४५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशा रितीने सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण ७५ व ८० टक्के अनुदान मिळणार आहे. सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता पूरक अनुदान देण्यासाठी लागणारा आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे.

या निधीतून सन २०२१-२२ या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. ७५ टक्के व ८० टक्के अनुदानाचा लाभ झाल्यामुळे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच यामुळे राज्यातील अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत होईल. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मंत्री श्री.भुसे यांनी केले आहे.

काळानुरूप बदलत जाणारी माध्यमे औचित्यपूर्ण ठरतात : हेमराज बागुल

0

नागपूर,दि.06 :  स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ तसेच त्यानंतरही काळानुरूप ज्यांनी बदल स्वीकारले ती माध्यमे, ते माध्यम प्रतिनिधी आजही औचित्यपूर्ण आहेत. माध्यमे व माध्यम प्रतिनिधींनी काळानुरूप बदल स्वीकारणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूर अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांनी आज येथे केले.

नागपूर जिल्हा माहिती कार्यालय व नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली व्यक्त केल्यानंतर उपस्थित मान्यवर माध्यम प्रतिनिधींना त्यांनी संबोधित केले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना पाळत नागपूर जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे, विशेष अतिथी ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य,पत्रकार संघाचे पदाधिकारी संजय देशमुख, सुभाष राऊत, शोभा जयपुरकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह माध्यमातील अन्य सदस्य उपस्थित होते.

स्वातंत्र्यपूर्व समाजजागृतीपासून स्वातंत्र्योत्तर लोक प्रबोधनाचे कार्य माध्यमांनी केले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये माध्यमे अग्रणी होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर देश उभारणीसाठी, त्यानंतर बदल स्वीकारण्यासाठी माध्यमांनी लढा दिला. माहिती तंत्रज्ञानातील विस्फोटानंतर माध्यमे अधिक गतिशील, नीटनेटक्या स्वरूपात पुढे आली. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी गती घेतल्याने प्रिंट माध्यमांमध्ये देखील अनेक बदल झाले. बदल ज्यांनी-ज्यांनी स्वीकारले ते स्पर्धेत टिकून राहिले. माध्यमे चिरतरुण आहेत. त्यांचे महत्त्व कधीच संपणार नाही. मात्र सृजनेतेसोबत एक डोळा बदलावर असणे आवश्यक आहे. शहर, ग्रामीण, महानगर, मुद्रीत, दृकश्राव्य, समाजमाध्यम असा कोणताही भेद न करता सर्व माध्यमांनी जगाच्या गतीने, तंत्रज्ञानाच्या क्रांतीप्रमाणे बदल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

माध्यमातील या बदलाकडे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लक्ष असून त्यानुरूप विभागाचे प्रगटीकरण होत आहे. पत्रकारांच्या सोयी, सवलती नव्या बदलाप्रमाणे देणे, माहितीच्या स्वरूपात बदल करणे, गतीशील माहिती पोहचविणे याकडे विभागाचे लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सुभाष वऱ्हाडे यांनी पत्रकारांच्या कोरोना काळातील जिगरबाज वृत्तीचे अनेक प्रसंग सांगितले. या काळात फ्रंटलाईन सोल्जर म्हणून ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांनी प्रशासनाला जागृत केले. यावेळी पत्रकारांच्या समस्या व सद्यस्थिती यावरही त्यांनी भाष्य केले. ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन शोभा जयपूरकर यांनी केले.

महसुली तूट भरुन काढण्यासाठी 17 राज्यांना केंद्राकडून 9,871 कोटी रुपये निधी वितरित

0
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत राज्यांना महसुली तूट भरुन काढण्यासाठी 98,710 कोटी रूपये निधी वितरित

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने आज मासिक पीडीआरडी, म्हणजेच कराच्या हस्तांतरणानंतरची महसूली तूट भरुन काढण्यासाठी म्हणून 17 राज्यांना 9,871 कोटी रुपये निधी वितरित केला आहे. पीडीआरडी अंतर्गत राज्यांना देण्यात येत असलेल्या रकमेचा हा दहावा हप्ता आहे.

आतापर्यंत, पात्र राज्यांना, पीडीआरडी अंतर्गत, चालू आर्थिक वर्षात 98,710 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. हया महिन्यात वितरित करण्यात आलेल्या निधीची तसेच पीडीआरडी अंतर्गत 2021-22 या वर्षात राज्यांना आतापर्यंत देण्यात आलेल्या निधीची राज्यनिहाय माहिती सोबत जोडली आहे.राज्यघटनेच्या कलम 275 अंतर्गत, राज्यांना पीडीआरडी –म्हणजेच कर हस्तांतरणानंतरची महसूली तूट भरुन काढण्यासाठीचा निधी दिला जातो. कर हस्तांतरणानंतर, राज्यांना महसूलीउत्पन्नात निर्माण झालेली दरी भरुन काढण्यासाठी, पंधराव्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार हा निधी दिला जात आहे. आयोगाने 17 राज्यांना हा निधी देण्याची शिफारस केली होती.यासाठी पात्र असलेल्या राज्ये आणि कोणत्या राज्यांना किती रक्कम दिली जावी, याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रत्येक राज्याची महसूली तूट आणि त्यांचे खर्च लक्षात घेऊन, तसेच केंद्राकडे करांचे हस्तांतरण किती होईल, याचा अंदाज बांधून 2021-22 या वर्षासाठी ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पंधराव्या वित्त आयोगाने, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण पीडीएआरडी पोटी 17 राज्यांना 1,18,452 कोटी रुपये निधी देण्याची शिफारस केली आहे.यापैकी, 98,710 कोटी रुपये (83.33%) निधी देण्यात आला आहे. ज्या राज्यांना हा निधी देण्याची शिफारस आयोगाने केली आहे, ती राज्ये म्हणजे : आंध्र प्रदेश, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशी आहे.

राज्य निहाय पीडीआरडी निधी वितरित (रक्कम- कोटींमध्ये)

S.No.Name of StateAmount released in January 2022(10th installment)Total amount released in 2021-22
1Andhra Pradesh1438.0814380.83
2Assam531.335313.33
3Haryana11.00110.00
4Himachal Pradesh854.088540.83
5Karnataka135.921359.17
6Kerala1657.5816575.83
7Manipur210.332103.33
8Meghalaya106.581065.83
9Mizoram149.171491.67
10Nagaland379.753797.50
11Punjab840.088400.83
12Rajasthan823.178231.67
13Sikkim56.50565.00
14Tamil Nadu183.671836.67
15Tripura378.833788.33
16Uttarakhand647.676476.67
17West Bengal1467.2514672.50
 Total9871.00

बँकिंग विषयावर चर्चासत्राचे आयोजन

0

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ जानेवारी रोजी होणार कार्यक्रम…..  
पुणे : भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या आमूलाग्र बदल होत आहेत, त्यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नागरी बँकांचे स्थान कसे असेल, त्याचे भवितव्य कसे राहील, याविषयावर संवाद या संस्थेतर्फे येत्या ९ जानेवारी रोजी बँकिंग वार्तालाप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतल्या एस. एम जोशी सभागृहात सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, यांच्याबरोबरच विविध नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष आणि संचालक उपस्थित राहणार आहेत.  कार्यक्रम झाल्यानंतर केंद्रीय अर्थराज्य मंत्री यांच्याबरोबर प्रश्नोत्तरे होणार आहेत.  हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी ठेवण्यात आला आहे. कोरोना संदर्भात सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सुनील महाजन आणि सचिन इटकर यांनी पत्रकाद्वारे  कळवले आहे. 

पुणे न्यायालयाच्या बाहेर “कालीचरण मुर्दाबाद” ची घोषणाबाजी

0

पुणे–राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कालीचरण महाराज यांस शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कालीचरणचा तीव्र शब्दात निषेध करत आंदोलन करण्यात आहे. यावेळी “महात्मा गांधीजी की जय” , “कालीचरण मुर्दाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अँड.रूपालीताई ठोंबरे पाटील, माजी उपाध्यक्ष युवक अध्यक्ष महेश हांडे, युवती कार्याध्यक्ष ॲड.श्रुतीताई गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते.

विभागीय माहिती कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

0

            पुणे, दि.6 :-  मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. उपसंचालक (माहिती) डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे, माहिती सहायक गणेश फुंदे, गीतांजली अवचट तसेच विलास कसबे, वैशाली रांगणेकर, सचिन बहूलेकर, संजय गायकवाड, सुहास सत्वधर, स्वाती साळुंके, सुजित भिसे, संतोष मोरे, मोहन मोटे, सुनील झुंजार, संजय घोडके, सुमेध मनोर, पांडूरंग राक्षे, दिलीप कोकाटे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे, मीरा गुथालिया आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोदींंच्या दीर्घायुष्यासाठी मुंबादेवीला प्रार्थना

0

मुंबई-  पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये एका जीवघेण्या संकटातून सुखरूप बचावल्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी मुंबईत मुंबादेवीचे दर्शन घेतले.

          आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाड्यांचा ताफा बुधवारी पंजाबमध्ये एक फ्लायओव्हरवर अडकला तेथून पाकिस्तानची सीमा केवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे. पंतप्रधान फ्लायओव्हरवर वीस मिनिटे होते. त्यावेळी कोठूनही हल्ला होण्याचा धोका होता. पंजाबमधील काँग्रेस सरकारमुळे हे संकट ओढवले पण मोदीजी सुखरूप वाचले. त्याबद्दल देवाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि मोदीजींना दीर्घायुष्य मिळण्याची प्रार्थना करण्यासाठी आपण मुंबादेवीचे दर्शन घेतले.  ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना दीर्घ आयुष्य मिळो, त्यांचे आरोग्य चांगले राहो आणि त्यांच्या हातून अशीच देशाची सेवा घडो यासाठी जगभरातील भारतीयांनी प्रार्थना केली. देशभरातील भारतीयांनी इष्टदेवतेचे ऋण व्यक्त केले.

          काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या विषयी केलेल्या टीका टिप्पणीबाबत एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, नाना पटोले कधीच गंभीर नसतात आणि कोणी त्यांची गंभीर दखलही घेत नाही. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांचे म्हणणे किमान ऐकले जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना नाना पटोले यांनी मर्यादेत रहावे नाही तर आम्हाला बोलावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.