Home Blog Page 2131

ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन

0

 ही अनोखी पर्वणीअभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी४५ प्रकारचे तांदूळ महोत्सवात

पुणे : जीवनावश्यक वस्तू उत्तम पद्धतीने घरपोच पोहोचविण्याची सेवा ग्राहक पेठ व इतर संस्था देत आहेत. पुण्याने मला ख-या अर्थाने मोठे केले. पुण्यामध्ये आता अनेक प्रकारचे महोत्सव होतात. परंतु या महोत्सवांची सुरुवात ग्राहक पेठेने तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून केली. गृहिणींकरीता असे विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी असते, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 
ग्राहक पेठेच्या वतीने सदाशिव पेठ खजिना विहिर चौक येथे आयोजित २९ व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अ‍ॅन्ड कंपनीचे राजेश शहा, महोत्सवाचे प्रमुख शैलेश राणिम यावेळी उपस्थित होते. बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून इंद्रायणी पर्यंत तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ महोत्सवात पहायला मिळत आहेत. उद््घाटनप्रसंगी मावळमधील शेतक-यांचा देखील सन्मान करण्यात आला. 
राजेश शहा म्हणाले, मागील २९ वर्षांपासून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरु आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तांदूळ स्वस्त दरात ग्राहकांपर्यत या माध्यमातून पोहोचत आहे. तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ या महोत्सवात ग्राहकांकरिता उपलब्ध करुन देण्यात येणे, हे याचे वैशिष्टय आहे.  
सूर्यकांत पाठक म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे.  ग्राहकाने एका वेळेस १०० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे. महोत्सवात उत्तमप्रतीचा तांदूळ थेट महाराष्ट्राबाहेरील राज्यांसह नाशिक, मावळ, भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध दिला जात आहे. याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला तांदूळ देखील महोत्सवात अत्यल्प दरात उपलब्ध आहे. तरी ग्राहकांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

महावितरणचे ‘एक दिवस एक गाव’ अभियान; वीजसेवा गावातच उपलब्ध

0

पुणे ग्रामीणमध्ये रविवारपर्यंत ५९ गावांमध्ये आयोजन

पुणे, दि. ०६ जानेवारी २०२२: थेट गावात जाऊन महावितरणची सर्व सेवा उपलब्ध करण्यासोबतच वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या जनजागृतीसाठी पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत ‘एक दिवस एक गाव’ अभियानाला सुरवात झाली आहे. कनेसर, पाईटकडूस(ता. खेड) व उरवडे, ओसाड (ता. मुळशी) या गावांमध्ये अभियान घेण्यात आले. येत्या रविवारपर्यंत मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागातील ५९ गावांमध्ये या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागामध्ये गावातच महावितरणची सर्व वीजसेवा उपलब्ध व्हावी तसेच तक्रारींचे निवारण व विविध योजनांच्या फायदे मिळवून देण्यासाठी ‘एक दिवस एक गाव’ राज्यभरात राबविण्याचा निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी हे अभियान राबविण्याचे एका परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. यामध्ये एकाच दिवशी एका गावात जाऊन घरगुती, कृषिपंपासह इतर नवीन वीजजोडण्या, वीजबिलांची दुरुस्ती, विविध तक्रारींचे निवारण, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत आहे. सोबतच वीजग्राहकांना ऑनलाइन ग्राहकसेवा, वीजबचत व सुरक्षा तसेच कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०ची सविस्तर माहिती दिली जात आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे तालुक्यांतील सर्व गावांमध्ये या अभियानाचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या रविवारपर्यंत या तालुक्यांमधील ५९ गावांमध्ये हे अभियान होणार आहे. आयोजनाबाबत संबंधीत गावांतील नागरिकांना पूर्वकल्पना देण्यात येत असून आवश्यक सर्व साधनसामग्रीसह संबंधित अभियंता व जनमित्रांचे पथक गावात दिवसभर राहणार आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी ग्रामीण मंडलमधील विविध उपविभाग व शाखा कार्यालयांना नुकत्याच भेटी देऊन ‘एक दिवस एक गाव’ अभियानाच्या आयोजनाबाबत सूचना केली आहे. त्याप्रमाणे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात येत आहे.

कडूस, कनेरसर व पाईट (ता. खेड) तसेच उरवडे व ओसाडे (ता. मुळशी) या गावांमध्ये आयोजित अभियानात घरगुती, वाणिज्यिक व कृषी वर्गवारीसाठी नवीन वीजजोडण्यांची १२७ अर्ज स्वीकारण्यात आले तर ८२ अर्जांसाठी कोटेशन देण्यात आले. याआधी अर्ज केलेल्या ५३ ग्राहकांकडे नवीन मीटर बसवून वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली. तसेच वीजबिलांची दुरुस्ती, सदोष मीटर बदलणे, मीटर रिडींग नियमित करणे आदीं कामे करण्यात आली. सोबतच उपस्थित ग्रामस्थांना कृषिपंप वीजजोडणी धोरणातील फायदे समजून सांगण्यात आले व गाव परिसरातील वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली.

या अभियानाला पाचही गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सर्व ग्राहकसेवा व तक्रारींचे निवारण जागेवरच होत असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानामध्ये कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे (राजगुरुनगर) व माणिक राठोड (मुळशी), जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे (राजगुरुनगर) व फुलचंद फड (मुळशी), सहायक अभियंता राहुल फालके, ज्ञानेश्वर बोरचाटे, स्वाती पाटील यांच्यासह जनमित्रांनी सहभाग घेतला.

सनसिटी रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण- वाहतूक कोंडी सुटणार ?

0


पुणे- संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे  शिवपुष्प पार्क ते विश्व मेडिकल या भागात होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या विकास निधीतून हे काम पूर्णत्वास गेले आहे. सिंहगड रस्त्यावरून संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे जाणार रस्ता रुंद नसल्याने या भागातून ये जा करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता रुंद करून वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेविका नागपुरे या विशेष प्रयत्नशील होत्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार बैठका घेत त्या पाठपुरावा करत होत्या. हा रस्ता रुंद करण्यासाठी काही खासगी जागा मालकांची जागा ताब्यात घेणे आवश्यक होते. यासाठी देखील नागपुरे यांनी पुढाकार घेत प्रशासनातील अधिकारी आणि जागा मालक यांची बैठक घेतली होती. रस्ता रुंदीकरणासाठी २८ गुंठे जागा देण्याची तयारी जागा मालक चरवड कुटुंबियांनी दाखविल्यानंतर ही जागा ताब्यात घेत तेथे काम सुरू करण्यात आले होते. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे तसेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविणे ही आमची जबाबदारी आहे. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पर्यायी रस्त्यांची कामे देखील सुरू असल्याचे नगरसेविका नागपुरे यांनी सांगितले. 

या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा शब्द या भागातील नागरिकांना दिला होता. हे काम पूर्ण झाल्याने दिलेला शब्द पाळला याचे समाधान आहे. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.- मंजुषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका

नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

0

मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.

यावेळी संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री दिवाकर रावते, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत विविध पक्षांचे मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

000

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

त्यावेळी परळीत एका बसवर दगडफेक केली होती. त्यावेळी राज ठाकरेंवर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळाला होता. मात्र ते गैरहजर राहीले होते.

2008 साली राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक झाली होती, याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. परळीत देखील मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या अटकेचा निषेध केला. यादरम्यान, कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली. दगडफेकीत बसचे समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यामुळे बीडच्या परळी ग्रामीण पोलिस स्थानकात राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांविरोधात जमाबंदीचे उल्लंघन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, चिथानणीखोर भाष्य केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आता 55 वर्षांवरील महाराष्ट्र पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

0

मुंबई-

राज्यातील सर्वाधिक पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ’55 वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा’ असे आदेश दिले आहेत. तसेच यासंदर्भातील गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानही पोलिसांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते, तरीही या काळात जवळपास 500 पेक्षा जास्त पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यात मुंबई पोलिस दलातील जवळपास 123 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे आता लवकर खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.

मुंबईत 71 पोलिसांना कोरोना
मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत मुंबईत 9510 पोलीस कर्मचारी बाधित आढळले आहे. याशिवाय आजपर्यंत 123 पोलिसांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील पोलीस दल देखील पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये आता पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.

संसर्ग वाढत असल्याने आवश्यक असणारी पूर्वतयारी करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

0

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी सतर्क राहण्याच्या सूचना

मुंबई, दि. 6 :- राज्यात कोविड विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना सध्या दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी.  आवश्यक त्या उपाययोजना करण्यारबरोबरच सज्ज राहून इतर संबंधित विभागांबरोबर समन्वयाने काम करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या.

राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, डॉ. संजय बिजवे यांच्यासह शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि अधीक्षक उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, सर्व अधिष्ठाता आणि अधीक्षकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा करुन ठेवावा. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकाने योग्य प्रकारच्या मास्कचा वापर, सॅनिटायझर याचा वापर करणे आवश्यक असून यासाठी रुग्णालयाने लक्ष द्यावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अहोरात्र काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पॅरामेडिकल कर्मचारी यांना सुध्दा आता कोविडची लागण होताना दिसत असल्याने यांना बुस्टर डोस तातडीने देण्यासाठी संबंधित अधिष्ठाता यांनी तातडीने प्रयत्न करावेत.

येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुगणालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करुन द्यावीत. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी यापुढील काळात आणखी दक्ष राहावे असेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले.

राज्यातील कोविड संसर्गाने बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. तसेच रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णाबरोबरच केवळ एकच नातेवाईकाला बरोबर राहण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरुन अधिक संसर्ग पसरणार नाही. कोविडची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत कोविडचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने व्हेंटिलेटर्स, सीटी स्कॅन मशीन, एमआरआय मशीन्स, ऑक्सीजन मशीन्स सर्व सुस्थितीत आहेत किंवा नाही याची सुध्दा चाचपणी तातडीने करुन घ्यावी. नादुरुस्त असल्यास तातडीने दुरुस्त करुन घेण्यात यावे अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. ६ :- आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन केले आहे. तसेच मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या विद्वत्तेच्या बळावर परकीय राजवटीत मराठी पत्रकारितेचा पाया घातला. आपल्या लेखनातून ब्रिटिशांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा बाणेदारपणा दाखवला. आज  पर्यावरणीय बदल आणि मानव, जीवमात्रांचे आरोग्य, त्यांचे अस्तित्व अशी आव्हाने उभी राहू लागली आहेत. या नव्या संदर्भाने माध्यमांची भूमिका, पत्रकारिता याबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. पण पत्रकारितेच्या मूल्यांना कुणीही धक्का लावू शकत नाही, असा धडाच आचार्य बाळशास्त्री यांनी आपल्या कर्तृत्वातून घालून दिला आहे. हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे. हा बाणेदारपणा जागवणे हेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आहे. त्यासाठी पत्रकार बंधू-भगिनींना मराठी पत्रकार दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन.

117 खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबिराचा कालावधी 31 मार्चपर्यंत वाढवण्यास मान्यता

0

नवी दिल्‍ली-

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने या वर्षअखेर बर्मिंगहॅम आणि हँगझोऊ येथे होणाऱ्या राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांच्या तयारीसाठी देशभरातील 117 ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आणि 45 प्रशिक्षक आणि सहायक स्टाफसाठी 31 मार्चपर्यंत राष्ट्रीय शिबिराचा कालावधी वाढवण्यास मान्यता दिली आहे.

नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (पटियाला), लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (तिरुवनंतपुरम), SAI नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (बेंगळुरू), जवाहरलाल नेहरू स्टेडियम (नवी दिल्ली) आणि उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स (बाल्युझरी) येथे 64 पुरुष आणि 53 महिला खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबिरे होत आहेत.

20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद लांब उडी स्पर्धेत वयाच्या 17 व्या वर्षी रौप्यपदक विजेती शैली सिंग शिबिरार्थींमध्ये सर्वात लहान आहे. सीमा पुनिया, जिने 2002 मध्ये तिचे जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद थाळी फेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते आणि मागील चार राष्ट्रकुल खेळांपैकी प्रत्येक खेळात सहभाग असलेली ती शिबिरार्थींमध्ये सर्वात अनुभवी खेळाडू आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा अमेरिकेतील चुला विस्टा येथे प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिएझ यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.

खेळाडू:

पुरुष:

  • 400 मी: मोहम्मद अनस याहिया, अरोकिया राजीव, अमोज जेकब, नोहा निर्मल टॉम, नागनाथन पांडी, हर्ष कुमार, आयुष दाबास, विक्रांत पांचाल, मोहम्मद अजमल, सार्थक भांबरी, कपिल, राजेश रमेश, करणप्रीत सिंग आणि रशीद.
  • 800 मी आणि 1500 मी: मनजीत सिंग, अजय कुमार सरोज, अनकेश चौधरी, कृष्ण कुमार, राहुल, शशी भूषण, अभिनंदन सुंदरसन, अंकित आणि मुजमिल अमीर
  • 5000 मी आणि 10,000 मी: अभिषेक पाल, धर्मेंद्र, कार्तिक कुमार आणि अमित जांगीर
  • 3000 मीटर स्टीपलचेस: अविनाश साबळे, शंकर लाल स्वामी, बालकिशन, मो. नूर हसन आणि अतुल पुनिया.
  • 400 मीटर अडथळ्यांची शर्यत: अय्यासामी धारुन, एमपी जबीर, संतोष कुमार, धवल महेश उतेकर आणि थॉमस मॅथ्यू.
  • चालण्याची स्पर्धा: मनीष सिंग रावत, संदीप कुमार, राम बाबू, विकास सिंग, एकनाथ, जुनेद, सूरज पवार आणि अमित खत्री.
  • लांब उडी: निर्मल साबू, मोहम्मद अनीस, युगांत शेखर सिंग आणि टीजे जोसेफ.
  • तिहेरी उडी: यू कार्तिक, अब्दुल्ला अबूबकर, एल्डोस पॉल आणि गेली वेनिस्टर देवसहायम.
  • गोळा फेक: तेजिंदरपाल सिंग तूर, ओम प्रकाश सिंग आणि करणवीर सिंग.
  • थाळी फेक: अभिनव, इक्रम अली खान आणि अर्जुन कुमार.
  • भालाफेक: रोहित यादव, साहिल सिलवाल, यशवीर सिंग, अर्शदीप सिंग आणि अभिषेक ड्रॉल.

महिला:

  • 100मी आणि 200मी: दुती चंद, एस धनलक्ष्मी, हिमा दास, ए के दानेश्वरी, पीडी अंजली, एनएस सिमी, कावेरी पाटील आणि नित्या गंधे.
  • 400 मी: अंजली देवी, एमआर पूवम्मा, व्हीके विस्मया, प्रिया एच मोहन, व्ही रेवती, व्ही सुभा, सुमी, रचना, नॅन्सी, आर विथ्या, दांडी ज्योतिका श्री आणि जिस्ना मॅथ्यू.
  • 800 मी, 1500 मी आणि 5000 मी: लिली दास, पीयू चित्रा, चंदा आणि चत्रु गुमनारम.
  • 5000 मी आणि 10,000 मी: कविता यादव.
  • मॅरेथॉन: सुधा सिंग.
  • 3000 मीटर स्टीपलचेस: पारुल चौधरी आणि प्रिती लांबा.
  • चालण्याची स्पर्धा: भावना जाट, प्रियांका गोस्वामी, सोनल सुखवाल, रमणदीप कौर आणि रविना.
  • लांब उडी: शैली सिंग, रेणू, अँसी सोजन आणि पूजा सैनी.
  • गोळा फेक: मनप्रीत कौर सीनियर, आभा कठुआ आणि कचनार चौधरी.
  • थाळी फेक: सीमा पुनिया, कमलप्रीत कौर, निधी राणी आणि सुनीता.
  • भालाफेक: अन्नू राणी, कुमारी शर्मिला आणि संजना चौधरी.
  • हातोडा फेक: मंजू बाला आणि सरिता आर सिंग.
  • हेप्टॅथलॉन: पूर्णिमा हेमब्रम, मरीना जॉर्ज, सोनू कुमारी आणि काजल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

0

मुंबई, दि. ६ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, “मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी  ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात  दि. 6 जानेवारी 1832 रोजी करुन मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन. मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”

प्राप्तिकर विभागाचे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे

0

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2022

प्राप्तिकर विभागाने 31.12.2021 रोजी परफ्युम उत्पादन आणि बांधकाम व्यवसायात गुंतलेल्या दोन समूहांवर शोध आणि जप्तीची कारवाई केली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि गुजरात राज्यातील 40 हून अधिक परिसरात शोधमोहीम राबवली गेली.

मुख्यतः मुंबई आणि उत्तर प्रदेशातील पहिल्या समूहाच्या बाबतीत, शोध मोहिमेत असे दिसून आले की हा समूह परफ्युमची विक्री कमी झाल्याचे दाखवून, साठ्यामध्ये हेराफेरी करून, करपात्र उत्पन्नातून नफा करमुक्त उत्पन्नात वळवण्यासाठी खातेवहीत फसवेगिरी करून, वाढीव खर्च दाखवून कर चुकवेगिरीत सामील आहे. बोगस खरेदी बिले दाखवून 5 कोटी रुपयांपर्यंतची अफरातफर केल्याचे पुरावे आढळले आहेत.

दोषी पुराव्यांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की त्यामुळे निर्माण झालेले बेहिशेबी उत्पन्न मुंबईतील विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये, भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या दोन्ही देशांतील मालमत्ता संपादनात गुंतवले आहे. या समूहाने विक्रीसाठी असलेल्या मालाचे संबंधित उत्पन्न लपवून ते भांडवल म्हणून दाखवून 10 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या समूहाने सेवानिवृत्त भागीदारांना देय लाभापोटीचे 45 कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केलेले नाही.

हे देखील उघड झाले आहे की संयुक्त अरब अमिराती मधील समूहाच्या एका कंपनीने कथितपणे 16 कोटी रुपये समूहाच्या एका भारतीय कंपनीमध्ये बाजार मूल्यापेक्षा अधिक प्रीमियम दाखवून अवैध शेअर भांडवल सादर केले आहे. या प्राप्तकर्ता समूह कंपनीने कोलकाता स्थित काही बनावट संस्थांकडून बेकायदेशीर भाग भांडवलाच्या रूपात 19 कोटी रुपये प्राप्त केले आहेत.

आत्तापर्यंत 9.40 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड आणि 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बेहिशोबी दागिने जप्त करण्यात आले आहेत. अनेक बँक लॉकर्स प्रतिबंधित करण्यात आले असून ते अद्याप तपासायचे आहेत.पुढील तपास सुरू आहे.

PMPML कामगारांची अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेची अनेक वर्षांच्या थकीत वैद्यकीय बिलांची पूर्तता तातडीने करा : आम आदमी पक्षाची मागणी

0

पुणे-पीएमपीएमएल कामगारांची अनेक वर्षांची थकीत वैद्यकीय बिलांची अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेतून तातडीने पुर्तता करा अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, आपचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे आणि घनश्याम मारणे (बिबवेवाडी वार्ड कार्याध्यक्ष) यांनी आज चेतना केरुरे (सह-व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल) यांना या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे.

डॉ अभिजीत मोरे म्हणाले,’पीएमपीएमएल कामगारांना अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेतून करावयाच्या वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीबाबत आम आदमी पक्षाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात प्रचंड दिरंगाई होत असल्याचे आपच्या निदर्शनास आले आहे. वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीमध्ये मोठा भ्रष्टाचार चालत असल्याच्या तक्रारी देखील आम आदमी पक्षास प्राप्त झाल्या आहेत.

आम आदमी पक्षाला मिळालेल्या माहितीनुसार पीएमपीएमएल सेवेत असलेल्या पीएमपीएमएल कामगारांची अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेतून आत्तापर्यंत केवळ नोव्हेबर २०१८ पर्यंतच्या वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केवळ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया केवळ ३० दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असताना वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीसाठी ३ वर्षांचा विलंब लागणे ही पीएमपीएमएल प्रशासनाबद्दल अतिशय लाजिरवाणी आणि कामगारांसाठी अतिशय वेदनादायी बाब आहे. पीएमपीएल प्रशासनामधील ढिसाळपणा, बेजबाबदारपणा आणि कामगारांप्रती असंवेदनशीलता यातून प्रकट होते.

जवळजवळ गेली दोन वर्षे कोविडची जागतिक साथ सुरु असताना हॉस्पिटलची बिले ३ वर्षे थकीत राहणे हे माणुसकीच्यासुद्धा विरुद्ध आहे. कित्येक कामगारांनी रुग्णालयाची बिले भरण्यासाठी उसनवारी केलेली आहे, कर्ज घेतलेले आहे. अशा वेळी अडवणूक करत वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती वेळेत न करणे हे असंवेदनशील प्रशासनाचे लक्षण आहे.असेही डॉ अभिजीत मोरे यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या गेल्या सात वर्षातील कामगिरीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचा गोव्याची राजधानी पणजी इथे शुभारंभ

0

पणजी -माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील ब्यूरो ऑफ आऊटरिच कार्यालयाची शाखा असलेल्या गोव्यातील जनसंपर्क विभागाने,  केंद्र सरकारच्या गेल्या सात वर्षातील कामगिरीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पांच दिवसांच्या या बहुमाध्यमी प्रदर्शनात, भारत सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे.गोव्याची राजधानी पणजी इथे होणाऱ्या सरस मेळाव्याच्या बाजूला, हे प्रदर्शन भरवण्यात आले असून, “सेवेची सात वर्षे’ अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले, गोवा सरकारचे ग्रामविकास मंत्री मायकल लोबो हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. केंद्र सरकारच्या तेरा योजना, ज्यात आत्मनिर्भर भारत, आयुष्मान भारत, जल जीवन मिशन, एमएसएमई योजना, किमान हमीभाव, पीएम मुद्रा योजना, पीएम आवास योजना, पीएमजीकेवाय, पीएम किसान योजना यासह प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य), स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना आणि मोफत कोविड लसीकरण याविषयीची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.

वर नमूद केलेल्या विविध योजनांची तपशीलवार आकडेवारी आणि वैशिष्ट्ये या प्रदर्शनात देण्यात आलेली आहे. ज्यामुळे लोकांना केवळ योजनेची माहितीच मिळत नाही तर लोकांना योजनेचे लाभ घेण्यासाठी आणि  अंमलबजावणीसाठी प्रेरणा मिळते. या प्रदर्शनात, असलेली तपशीलवार माहिती,  समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारची दृढ वचनबद्धता व्यक्त करणारी आहे.

प्रदर्शनात दाखवण्यात आलेले महत्वाचे टप्पे, गेल्या सात वर्षांतील एक राष्ट्र म्हणून झालेला प्रवास एक राष्ट्र म्हणून आपल्या सामर्थ्याचा पुरावा आहे. गेल्या काही वर्षांत देशात जो मजबूत पाया घातला गेला आहे, त्यामुळे, आज आपण ज्या आव्हानात्मक आणि कठीण काळातून जात आहोत, त्यातून पुन्हा चिवटपणे बाहेर पडू शकू, असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण झाला आहे.

नाना पटोले, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना इशारा

0

पुणे-पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभर निवडणूक लांबवून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत राज्यपालांवर खापर फोडण्याचा त्यांच्या आघाडीचा प्रयत्न म्हणजे नौटंकी होती. नाना पटोलेंच्या राजकीय आयुष्यात नौटंकीचे अनेक प्रसंग आहेत. नौटंकी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी तोंड सांभाळून बोलावे.

ते म्हणाले की, नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेची तूलना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्याशी करणे हास्यास्पद आहे. राहुल गांधी अमेठीमध्ये लोकसभा निवडणूक हारलेले आहेत तर प्रियंका गांधी अद्याप एकाही निवडणुकीत विजयी झालेल्या नाहीत. त्यांच्या सुरक्षेची तूलना देशातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेशी करणे असा प्रकार नाना पटोलेच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान असून ते जागतिक नेते आहेत, हे पटोले यांनी तुलना करताना विसरू नये.

त्यांनी सांगितले की, नाना पटोले यांनी पंतप्रधानांविषयी आज घडलेल्या घटनेबाबत बोलताना राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याची आठवण करून दिली आहे. अशी आठवण करून देऊन नाना पटोले यांना धमकी द्यायची आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे. आज मोदीजींच्या गाडीवर हल्ला होण्यासाठी पटोले यांच्या पक्षाच्या सरकारने ढिसाळपणा केला का, हे सुद्धा त्यांनी सांगावे.

ते म्हणाले की, पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती त्याचा उल्लेख नाना पटोले यांनी बलिदान असे म्हणत आज केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या जीवघेण्या ढिसाळपणामुळे आज निर्माण झालेल्या परिस्थितीत इंदिराजींच्या हत्येचा उल्लेख करून नाना पटोले यांना काय सुचवायचे आहे, हे ही त्यांनी सांगावे.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या धमक्यांना भाजपा घाबरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचे आशिर्वाद मिळालेले आहेत आणि त्या आशिर्वादांचे भक्कम कवच त्यांच्याभोवती आहे, असे आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी ठणकावले.

पुणे हे विद्येचे माहेरघर तसेच समाजसेवेची पंढरी – चित्रा वाघ

0

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून विद्यार्थिनींना ड्रेस वाटप कार्यक्रम संपन्न

पुणे-मुलींनी समाजात आत्मविश्वासाने वावरावे आणि कोणत्याही परिस्थितीत शिक्षण अर्धवट सोडू नये असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रज्वलीत केलेली ज्ञानज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे, जो शिकेल तोच टिकेल असा संदेश ही त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावावर असलेल्या शाळेत हा कार्यक्रम होतो आहे याचे विशेष महत्व असून पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी जी अंत्योदयाची कल्पना मांडली ती प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील प्रत्यक्षात आणत आहेत याचा आनंद वाटतो. दादांनी कोरोना काळात केलेले कार्य अफाट असून, प्रदेशात अनेक ठिकाणी ज्यांना कोरोनाच्या संकटाचा फटका बसला, ज्यांचे छत्र हरपले अश्यांना चंद्रकांतदादांनी यथाशक्ती मदत केली व पक्षाच्या आपदा कोषातूनही मदत करा असे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. दादा म्हणजे बाप माणूस आणि अश्या कार्यक्षम आणि संवेदनशील प्रदेशाध्यक्षांच्या टीम मध्ये मी काम करते याचा मला अभिमान वाटतो असेही चित्राताई म्हणाल्या.पुणे हे जसे विद्येचे माहेरघर आहे तसेच पुणे हे समाजसेवेची पंढरी देखील आहे. माझ्या ह्या वर्षातील कार्यक्रमांची सुरुवात ह्या सुंदर कार्यक्रमाने होते आहे आणि येथे तुम्हा मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य मला वर्षभराची ऊर्जा देऊन गेले आहे असेही त्या म्हणाल्या.शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि भाजप चे प्रवक्ते, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयोजित केलेल्या ड्रेस वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरोना काळात प्रत्येक घटकाला कर्तव्यभावनेतून मदत केली आणि त्यांनीच ही कल्पना मांडली की वस्ती विभागासह अनेक ठिकाणी मुलींना ह्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटकाळात अंगावर नवीन कपडे शिवता आले नाहीत, अश्या सर्वांना नवीन ड्रेस द्यावेत आणि त्यानुसारच आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. चंद्रकांतदादांनी केवळ ड्रेस मटेरियल दिले असे नाही तर बचत गटाच्या महिलांना शिलाई मशीन घेऊन दिले व ड्रेस शिवण्याचे काम ही दिले असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.यावेळी संयोजक शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे,शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,नगरसेविका वृषाली चौधरी,पेट्रोल डीलर असोसिएशन चे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारुवाला,शहर चिटणीस प्रशांत हरसूले,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, महिला मोर्चा उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, जयश्री तलेसरा,सुप्रिया माझीरे,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे,ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण,शंतनू खिलारे,उद्योग आघाडीचे प्रदेश सह संयोजक विश्वजित देशपांडे, शहर सरचिटणीस रामदास गावडे,युवा मोर्चा सरचिटणीस दीपक पवार, आर्थिक आघाडीच्या शहर अध्यक्ष भाग्यश्री बोरकर,पक्ष पदाधिकारी श्रीकांत गावडे, संगीता शेवडे, मंगलताई शिंदे,विठ्ठल मानकर,माणिकताई दीक्षित,अमर खंडागळे,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी दीपक पोटे, पुनीत जोशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन, मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर शंतनू खिलारे यांनी आभार प्रदर्शन केले.