Home Blog Page 2132

मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले, पंजाबमधील घटनेवरुन नाना पटोलेंंनी लावला टोला

0

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भाजपकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

पंतप्रधानांचा ताफा अडवल्याविषयी प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा असते, पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नियोजित कार्यक्रमामुसार ते हेलिकॉप्टरने सभेला जाणार होते परंतु अचानक त्यात बदल करून ते रस्ते मार्गाने निघाले. पंजाबमध्ये आधीपासूनच शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. भाजपा व नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे याची त्यांना जाणीव असेलच. मोदींच्या सभेला गर्दी जमली नाही त्यामुळे त्यांना सभा सद्द करावी लागली. पण खोटी माहिती पसरवून सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपाकडून खटाटोप केला जात आहे.

त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कोणी केली होती?

सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा कांगावा करत पंजाबमधील काँग्रेस सरकारवर दोष देण्याचा भाजापाचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सुरक्षेचाच मुद्दा विचारात घेतला तर गांधी कुटुंबाच्या जिवीताला नेहमीच धोका राहिला आहे. या कुटुंबाने देशासाठी इंदिराजी व राजीवजींच्या रुपाने दोन बलिदान दिली आहेत. तरीही सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी जनतेत सामिल होतात, सुरक्षेची चिंता न करता सामान्य लोकांमध्ये मिसळतात. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राहुलजी गांधी यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. उत्तर प्रदेशातील पीडित कुटुंबाला भेटण्यास जाताना राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांच्या सुरक्षेची काय परिस्थिती होती? प्रियंकाजी गांधी यांच्याशी पुरुष पोलिसांनी धक्कुक्की केली होती हे भाजपा विसरले काय? त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कोणी केली होती? कोणाच्या इशाऱ्यावर राहुलजी व प्रियंकाजी यांना अडवण्यात आले होते? याचे उत्तरही भाजपाने द्यावे, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

विदेशी मद्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0

मुंबई, दि 4 :  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज वरळी-मुंबई या ठिकाणी विदेशी मद्याविरोधात कारवाई करून आरोपीस अटक केली. या प्रकरणात विदेशी मद्य पुरवणाऱ्या मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आली असून फरारी आरोपींचा तपास सुरू आहे.

या गुन्ह्यात विदेशी मद्य (स्कॉच), एक मोबाईल, स्मार्ट वॉच, एक बॅग, एक दुचाकी सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट असे एकूण ४ लाख ६२ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात  शेहजाद हसनेन कुरेशी आणि मोहम्मद दानिश मुश्ताक अहमद खान या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क, ठाणेचे विभागीय उप-आयुक्त,  सुनिल चव्हाण, अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा  तसेच मुंबई शहर अधीक्षक  सी.बी. राजपूत, उप अधीक्षक श्री.पोकळे  यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गी कारवाई निरीक्षक प्रसाद सास्तुरकर, निरीक्षक ओ.एच.घरत, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक डी.बी.भदरगे, दुय्यम निरीक्षक आर. जी. जाधव, जवान सर्वश्री. शेलार, मोरे, कुंभार, तडवी, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.  गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक डी. बी. भदरगे हे करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. 1, मुंबई यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2021 वेळापत्रकानुसारच म्हणजे 7, 8, 9, 15 आणि 16 जानेवारी 2022 रोजी घेतली जाणार

0
परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी उमेदवार/परीक्षा कर्मचाऱ्यांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाची राज्य सरकारांना विनंती

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2022

कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा काळजीपूर्वक आढावा घेतल्यानंतर, नागरी सेवा  (मुख्य) परीक्षा, 2021 नियोजित वेळापत्रकानुसारच म्हणजेच  7, 8, 9, 15 आणि 16 जानेवारी 2022 रोजी  आयोजित करण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतला आहे.

आजाराचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून लागू  निर्बंध/प्रतिबंध  लक्षात घेऊन ,उमेदवार/परीक्षा कर्मचार्‍यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विशेषत: जे प्रतिबंधक  / सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रामधून येतात त्यांची  प्रवासात कोणतीही गैरसोय होणार नाही ,आणि आवश्यक असल्यास, उमेदवारांचे ई-प्रवेशपत्र आणि परीक्षा कर्मचाऱ्यांची  ओळखपत्रे  प्रवासासाठी पास म्हणून वापरली जातील,हे सुनिश्चित करण्याची विनंती आयोगाने राज्य सरकारांना केली आहे.

उमेदवार/परीक्षा कर्मचाऱ्यांचा सुरळीत  प्रवास  सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, परीक्षेच्या एक दिवस आधीपासून ते परीक्षा आयोजित केल्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 06.01.2022 ते 09.01.2022 आणि 14.01.2022 ते 16.01.2022 पर्यंत सार्वजनिक वाहतूक पुरेशा स्तरावर  कार्यान्वित करावी अशी विनंती राज्य सरकारांना करण्यात आली आहे.

महामारीच्या  काळात परीक्षा आयोजित करण्यासाठी, सर्व सक्षम जिल्हाधिकारी आणि परिक्षा केंद्र  पर्यवेक्षकांना  आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करण्यात आली आहेत.उमेदवार/परीक्षा कर्मचार्‍यांची वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे आणि उमेदवार/परीक्षा कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ मास्क परिधान करणे, परीक्षा स्थळी सोयीच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करणे आणि परीक्षा कर्मचाऱ्यांनी, उमेदवारांनी स्वतःचे सॅनिटायझर पारदर्शक बाटल्यांमध्ये घेऊन जावे, प्रत्येक परीक्षा केंद्राची नियमितपणे स्वच्छता करणे, खोकला, शिंका येत असलेल्या, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या, ताप येत असलेल्या उमेदवारांना बसण्यासाठी दोन अतिरिक्त परीक्षा खोल्या असाव्यात जेणेकरून ते योग्य सुरक्षा नियम इत्यादीनुसार परीक्षा देऊ शकतील.या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये  समावेश आहे.

पंतप्रधान या उड्डाणपूलावर 15 ते 20 मिनिटे अडकून पडले

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भटिंडा इथे पोहचले आणि त्यानंतर ते हुसैनीवाला इथे असलेल्या राष्ट्रीय शहीद स्मारकस्थळी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे नियोजित वेळी हेलिकॉप्टरचे उड्डाण झाले नाही.आकाश निरभ्र होण्यासाठी  सुमारे 20 मिनिटे पंतप्रधानांनी  वाट पाहिली. 

मात्र, त्यानंतरही आकाश स्वच्छ झाले नाही, त्यामुळे पंतप्रधान राष्ट्रीय शहीद स्मारकापर्यंत रस्त्याने जातील, असा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागणार होता. पंजाब पोलीस महासंचालकांकडून आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचा संदेश आल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने या प्रवासाला निघाले.

पंतप्रधान हुसैनीवाला इथल्या राष्ट्रीय शहीद स्मारकापासून  साधारण 30 किलोमीटर दूर अंतरावर असतांना, ज्यावेळी त्यांचा ताफा एका उड्डाणपूलावर पोहोचला, त्यावेळी असे लक्षात आले की तो रस्ता काही आंदोलकांनी अडवून धरला होता.

पंतप्रधान या उड्डाणपूलावर 15 ते 20 मिनिटे अडकून पडले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेली ही मोठी त्रुटी होती.

पंतप्रधानांचा कार्यक्रम आणि दौऱ्याचे नियोजित वेळापत्रक पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आले होते. सामान्य प्रक्रियेनुसार, पंजाब सरकारने पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठीची आवश्यक तयारी आणि सुरक्षा व्यवस्था तसेच आकस्मिक अडचणी आल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवणे अपेक्षित होते. तसेच, नियोजित कार्यक्रमात अकस्मात झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर, रस्त्यावरची वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करणे अपेक्षित होते. मात्र, तशी व्यवस्था तैनात करण्यात आलेली नव्हती, हे स्पष्टपणे आढळले.

सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर त्रुटी लक्षात घेता, पंतप्रधानांचा ताफा पुन्हा भटिंडा विमानतळावर परत नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या गंभीर त्रुटीची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून, राज्य सरकारकडून त्याचा सविस्तर अहवाल मागवला आहे. पंजाब सरकारनेही या गंभीर चुकीसाठीची जबाबदारी निश्चित करुन, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सूचना देण्यात आली आहे.

हत्येचा किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील इतर पात्र व्यक्तीला कौटुंबिक निवृत्तीवेतन लागू करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

0

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2022

केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने 16 जून 2021 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, जर एखाद्या सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याविरोधात, हत्या किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला गेला असेल, तर  त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील इतर पात्र व्यक्तीला निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाने आज, म्हणजेच पाच जानेवारी रोजी, आदेश जारी करुन निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने जारी केलेल्या निर्देशाचा मूळ गाभा तसाच ठेवून, त्यात गरजेनुसार बदल केले आहेत आणि लष्करी दलातील निवृत्तीवेतन धारकांनाही हा आदेश लागू केला आहे.ही सुविधा 16 जून 2021 पासून, पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

कराचा बोजा न टाकता विकास साधला पाहिजे – खा. गिरीश बापट

0

पुणे-नागरिकांवर कराचा बोजा न टाकता कॅन्टोन्मेंट बोर्डाने विकास साधला पाहिजे.अशी अपेक्षा खा.गिरीश बापट यांनी बुधवारी व्यक्त केली.
खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की
ब्रिटिशांच्या काळात कॅन्टोमेंटची स्थापना झाली. देशाला स्वतंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे तशाच स्थितीत आहे. त्यांना आर्थिक अडचण आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी प्रशासनाने उत्पन्नाची साधने वाढवली पाहिजेत, नागरिकांवर कराचा बोजा न टाकता बोर्डाने विकास साधला पाहिजे. यावेळी सदन कमांडचे प्रमुख के. जे. एस. चौहान, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीअर डी. जी. पटवर्धन, उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार, विनीत नायर उपस्थित होते. खासदार निधीतून तसेच केंद्राकडून बोर्डाला वेळोवेळी मदत केली जाते. मात्र सीएसआर च्या माध्यमातून खूप मदत मिळू शकते त्याचा उपयोग बोर्डाने केला पाहिजे असा सल्ला बापट यांनी यावेळी दिला. दरम्यान कॅन्टोमेंट दुरुस्ती कायदा संसदेत मांडला गेला असून त्याचा अभ्यास सुरु आहे अशी माहिती बापट यांनी यावेळी दिली. तसेच कोरोनाची तिसरी लाट येत असून सगळ्यांनी न घाबरता एकमेकांना मदत करून या संकटाचा सामना करण्याचा निश्चय करण्याचा संकल्प करू असे ही बापट यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला रुग्णालयातील स्टाफ, बोर्ड अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महाराणी छत्रपती सईबाई यांच्या समाधीस्थळ विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. ५- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी समाधी असून या समाधी परिसराचा विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या परिसराची पाहणी करावी आणि त्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी आज दिले. या समाधी परिसराच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी सअसलेल्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा फार मोठा इतिहास लाभला असून हे गडकिल्ले दुर्लक्षित होऊ नयेत त्यासाठी त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. या समाधीस्थळ व परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह जलसंपदा, भूमी अभिलेख, पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करुन अहवाल सादर करण्याचेही निर्देश सभापतींनी यावेळी दिले.

समाधीस्थळ व परिसराच्या विकासासाठी निधी देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचा विकास करण्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर केला जाईल. महाराष्ट्राचा अभिमान,अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. या आराखड्यामध्ये बंधारा आणि त्यावरील घाट विकसित करण्याच्या बाबींचा समावेश करतानाच गुंजवणी नदीच्या उगमाजवळच्या परिसराचे महत्त्व ओळखून त्याचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. समाधीस्थळ परिसराच्या विकासाचे काम हे दोन टप्प्यात करण्यात येईल, पहिल्या टप्प्यात झालेल्या कामांनंतर पुढील टप्प्यांमधील कामे केली जातील असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

यावेळी राजगडाच्या पायथ्याशी महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाच्या अनुषंगाने श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज स्मारक समिती ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.

सुरक्षित, समर्थ महाराष्ट्र

0

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा आलेख सातत्याने उंचावत असून यामध्ये गृह विभागाचे मोठे योगदान आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा राज्यशासनाचा प्राधान्याचा विषय असून पोलीस दलाचे आधुनिकीकरण-सक्षमीकरण करताना पोलीस दलाला लोकाभिमुख करण्यासाठी विशेष नियोजन केले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

दिलीप वळसे-पाटील (मंत्री, गृह)

गेल्या दोन वर्षात अनेक प्रकारच्या सामाजिक, आर्थिक समस्या निर्माण झाल्या. सायबर गुन्ह्यांची तीव्रता वाढली यासारख्या आव्हानांचा सामना पोलीस दलाने सक्षमपणे व प्रभावीपणे केला. तसेच नागरिकांना सर्व प्रकाराचे संरक्षण पुरवण्यासाठी अतिशय कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

अपराध सिद्धता वाढली

आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर दैनंदिन कार्यपद्धतीत समावेश केल्याने पोलिसांची कार्यक्षमता वाढली आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे उंचावलेला अपराधसिद्धतेचा दर.. आज राज्यातील अपराधसिद्धतेचा दर सुमारे 62 टक्के असून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रथम खबरी अहवाल, गुन्हा घटनास्थळ तपासणी, साक्षीदार, अटक, जखमा, भारतीय पुरावा कायदा ओळख परेड चाचणी, तज्ज्ञांचे अभिप्राय, दोषारोप पत्र न्यायालयात सादर करताना घ्यावयाची खबरदारी अशा विविध बाबींकडे बारकाईने लक्ष केंद्रीत करण्यात आले.

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी राज्यात सीसीटिव्हीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तसेच मुंबईसह प्रमुख शहरामध्येही मोक्याच्या ठिकाणी कॅमेरा बसवण्याचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. हेल्पलाइन्स, वेबसाईट विविध ॲप्स अशा बाबींद्वारे पोलीस विभाग अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे.

महिला व बालसुरक्षा

महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार अत्यंत सजग असून त्यासाठी विविध उपाययोजना, उपक्रम राबवण्यात येत आहेत. शक्ती विधेयक येत्या अधिवेशनात मान्यतेसाठी सादरकरण्याच्या दृष्टीने मसुदा अंतिम करण्यासाठी संयुक्त समितीच्या बैठका घेण्यात येत असून आगामी अधिवेशनात प्रारूप सादर करण्याचे प्रस्तावित आहे.

बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे त्वरित निकाली काढण्यासाठी राज्यात 138 विशेष जलदगती न्यायालयांना मान्यता देण्यात आली आहे. (108 विशेष जलदगती न्यायालये व 30 पोक्सो कायद्यांतर्गत खटले चालवण्यासाठी) त्यापैकी 12 विशेषजलदगतीन्यायालये व 20 पोक्सो कायद्यांतर्गत खटले चालवण्यासाठी न्यायालये कार्यरत झाली आहेत. मुंबई, नागपूर, पुणे येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये महिला व बाल अत्याचार गुन्ह्यामधील दाखल प्रकरणी पुराव्याचे जलदगतीने विश्लेषण करून दोषींवर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी जलदगती डीएनएयुनिट स्थापन करण्यात आले आहे.

विशेष तपास पथके

महिलांवरील अत्याचार विशेषत: बलात्कार, हुंडाबळी, अपहरण, अनैतिक व्यापार आणि घरगुती हिंसाचार इ. गुन्ह्यांबाबत संपूर्ण राज्यात प्रत्येक पोलीस घटकात विशेष तपास पथके गठित करण्यात आली आहेत. या तपासपथकांचे काम राज्यात प्रभावीपणे सुरू आहे. महिला व बालकांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी राज्यात 45 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अशा खटल्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी मुंबई येथे एक जलद गती न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. तसेच कम्युनिटी पोलिसिंग राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये राबवण्यात येत आहे. यामध्ये भरोसा सेल, बडीकॉप/पोलीस दिदी या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तत्काळ दखल घेऊन प्रभावी पावले उचलण्यात येत आहेत.

ऑपरेशन मुस्कान हरवलेल्या बालकांचा व महिलांचा शोध घेण्यासाठी सर्व पोलीस घटकातील नियंत्रण येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. गेल्या 2 वर्षांत राज्यात तीन मुस्कान ऑपरेशन्स राबवून मिसिंग रेकॉर्डवरील 3173 व मिसिंग रेकॉर्ड व्यतिरिक्त 3558 लहान मुले व मुली आढळून आल्या. या मुस्कान मुळे एकूण 6731 बालके कुटुंबामध्ये परतली आहेत.

इतर महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र पोलीस दलाच्या सक्षमतेच्या दृष्टीने पोलीस दलात एकूण 12 हजार पदे भरतीची प्रक्रिया सध्या दोन टप्प्यात सुरू आहे. त्याच प्रमाणे पोलीस शिपाई पदावर पोलीस सेवेत दाखल होणारे शिपाई किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावेत, यादृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाने कठोर धोरण स्वीकारले असून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर uअमली पदार्थ विरोधी कक्षष निर्माण करण्यात येत आहेत.

नवीन युगाची गुन्हेगारी म्हणजेच सायबरगुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी सायबर सेल सक्षम केला जात आहे. राज्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत, अग्निशमन सुविधा व रुग्ण वाहिन्या या महत्त्वाच्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा प्रकल्प 112 कार्यान्वित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.

नक्षल्यांच्या वरील कारवायांना यश

पोलीस दलाने केलेल्या प्रभावी कार्यवाहीमुळे चार राज्यातील नक्षल्यांच्या वरील कारवायांना मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या या नक्षली कारवायांचे हे मॉडेल इतर नक्षलग्रस्त राज्यांसाठी उपयुक्त ठरतआहे. पोलीस भाषेबरोबरच अन्य अडथळ्यांवर मात करुन रहिवाशांशी संवाद साधत आहेत. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पोलीस अनेक उपक्रम राबवत आहेत. स्थानिक जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी दादालोरा खिडकी उपक्रम तसेच अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत साहाय्य केले जात आहे. ऑक्टोबर 21 अखेरपर्यंत या वर्षात 71 हजार 700 पेक्षा जास्त नागरिकांना या माध्यमातून लाभ देण्यात आले आहेत. पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आज स्थानिक नागरिक पोलिसांकडे येत आहेत. पोलीस आपलेच आहेत ही विश्वासाची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

मुंबईची सुरक्षा

मुंबईचे आंतररष्ट्रीय पातळीवरील महत्त्व लक्षात घेता सुरक्षिततेसाठी सरकारने भरभक्कम उपाययोजना केल्या आहेत. एनएसजीच्या धर्तीवर कार्यान्वित करण्यात आलेल्या फोर्सवन  या पथकाला अत्यंत सुसज्ज अशी उपकरणे आणि अद्ययावत प्रशिक्षणातून परिपूर्ण करण्यात आले आहे. सागरी सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून आधुनिक बोटी आणि साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. मुंबई शहरातील नागरिक आणि पर्यटक यांची सुरक्षितता लक्षात घेऊन गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलास विशेषतः चौपाटी परिसरातील गस्तीसाठी सुसज्ज आणि अत्याधुनिक अशी सर्व पृष्ठीय वाहने देण्यात आली आहेत.

पोलिसांसाठी…

महाराष्ट्र पोलीस दल हे सुमारे दोन लाख सदस्यांचे एक विशाल कुटुंबच आहे. आधुनिक साधनसामग्री आणि तंत्रज्ञानाने पोलीस दल सक्षम करतानाच विविध जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यास सरकारअग्रक्रम देत आहे. त्यात पोलिसांच्या घरांचा प्रश्न प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून एक लाख घरे बांधण्याचे नियोजन आहे. पोलीस दलातील वेगवेगळ्या युनिटमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या भत्त्यात आधीच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली.

कोरोनामुळे कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडल्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आपण मंजूर केले. एकूण 390 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्यात आले. तसेच पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत नवीन 11 आजारांचा समावेश करण्यात आला आहे.

पोलीस घटकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्कृष्ट पोलीस घटक व उत्कृष्ट पोलीस ठाणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कामामध्ये प्रोत्साहन मिळत असून त्यांची कार्यक्षमता वाढली आहे. या सर्व उपाययोजनांमुळे अत्यंत सुरक्षित आणि सक्षम महाराष्ट्राचा लौकिक पुढील काळातही टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

शब्दांकन : मनीषा पिंगळे,

विभागीय संपर्क अधिकारी

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत परंदवाल संघाचा विजय

0

पुणे,5 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत परंदवाल संघाने 2एन् क्रिकेट अकादमी संघाचा तर एम्.एस्.एफ संघाने 30 यार्ड्स ए संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 
ए.के स्पोर्ट्स क्लब साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विराज घारेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर परंदवाल संघाने 2एन् क्रिकेट अकादमी संघाचा 37 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना परंदवाल संघाने 20 षटकात 3 बाद 152 धावा केल्या. विराज घारेने 52 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 67 तर यश सुर्यवंशीने 30 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 40 धावा करत संघाचा डाव मजबुत केला. 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आशिष बेडेकर, विराज घारे व सुधांशू कांबळेच्या अचूक गोलंदाजीने 2एन् क्रिकेट अकादमी संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 115 धावांत रोखत संघाला विजय मिळवून दिला. विराज घारे सामनावीर ठरला.
दुस-या सामन्यात आर्यन भामरेच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर एम्.एस्.एफ संघाने 30 यार्ड्स ए संघाचा 10 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ओम अगरवालच्या नाबाद 38 तर महेश्वर वाघ व माऊली बडे यांच्या प्रत्येकी 18 धावांसह एम्.एस्.एफ संघाने 20 षटकात 6 बाद 126 धावा केल्या. 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अरूष पासलकर व आर्यन भामरे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे 30 यार्ड्स ए संघ 20 षटकात 9 बाद 116 धावांत गारद झाला. आर्यन भामरे सामनावीर ठरला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी
परंदवाल- 20 षटकात 3 बाद 152 धावा(विराज घारे नाबाद 67(52, 9×4), यश सुर्यवंशी नाबाद 40(30, 6×4), शौनक चांदपुरे 1-17, भावेश चौधरी 1-22) वि.वि 2एन् क्रिकेट अकादमी- 20 षटकात 8 बाद 115 धावा(सुरेखा खराडे 18(31, 1×4), कृष्णा देशमुख 12(11, 1×4), आशिष बेडेकर 3-17, विराज घारे 1-8, सुधांशू कांबळे 1-10) सामनावीर- विराज घारेपरंदवाल संघाने 37 धावांनी सामना जिंकला.
एम्.एस्.एफ- 20 षटकात 6 बाद 126 धावा(ओम अगरवाल नाबाद 38(39, 3×4), महेश्वर वाघ 18(15, 3×4), माऊली बडे 18(15, 3×4), आर्यन भामरे 13(11, 2×4), ओजस अलटेकर 2-28, अर्णव मधुगिरी 2-25) वि.वि 30 यार्ड्स ए- 20 षटकात 9 बाद 116 धावा(दक्ष किरोदीयन 42(41, 4×4, 1×6), विहान बागड 17(18, 2×4), अरूष पासलकर 3-19, आर्यन भामरे 2-16) सामनावीर- आर्यन भामरे एम्.एस्.एफ संघाने 10 धावांनी सामना जिंकला. 

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ

0

मुंबई, दि. 5 :  यंदाच्या प्रजासत्ताक दिनी  होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. वातावरणातील होणाऱ्या बदलांचा विचार करता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा समावेश आहे. तसेच राज्य शासनाने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. ‘शेकरू’  हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. तसेच दीड फूट दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत त्यावर इतर छोटी फुलपाखरे यांच्या प्रतिमा आहेत. चित्ररथावर १५ फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या कास पठाराची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ ३ फूट उंच दर्शविला आहे, त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा दर्शविण्यात आली आहे.  चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिमा व त्यामागे राज्यवृक्ष आंबा वृक्षाची प्रतिमा सुमारे १४ ते १५ फूट उंचीपर्यंत आहे. तसेच दुर्मिळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले आहेत.

या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.

आद्य संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

0

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. आज या घटनेस 190 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या या महत कार्याची आठवण आपणास रहावी म्हणून प्रतिवर्षी 6 जानेवारी रोजी राज्यात ‘दर्पण दिन’ साजरा केला जातो.
दर्पण परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र

बाळशास्त्रींनी त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग त्यांनी करून घेतला आणि दर्पणरुपी ज्योत समाजप्रबोधनासाठी तेवत ठेवली. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. 25 जून 1840 यावर्षी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पण
वृत्तपत्राची निर्मितीच नव्हे तर समाजसुधारणेचे कार्यही बाळशास्त्री जांभेकरांनी केले. किंबहुना सामाजिक सुधारणेच्या बाबतीत ते आग्रही होते. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे त्यांचे मत. सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रासारखी मोठी शक्ती आहे. तिचा उपयोग समाजात बदलासाठी होऊ शकतो. याचा त्यांना अभ्यास होता. त्यामुळेच बाळशास्त्रींनी तत्कालीन चुकीच्या रुढी परंपरांवर प्रहार केला. धार्मिक व सामाजिक सुधारणांबाबत बाळशास्त्री जांभेकर हे प्रगमनशील व्यवहारवादी होते. म्हणूनच त्यांनी दर्पणला समाज परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र म्हणून वापरले.

विविध ग्रंथसंपदा

वयाच्या अकराव्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली होती. मुंबईत इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन त्यांनी विविध विषयांचे ज्ञान मिळविले. या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. जांभेकरांनी सतत परिश्रम करुन त्याकाळच्या जवळपास नऊ देशी-विदेशी भाषा आत्मसात केल्या होत्या.

दर्पण

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते, असे सुप्रसिध्द माध्यम तज्ज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटले आहे. त्यानुसार आचार्य जांभेकरांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘दर्पण’ प्रकाशित केले. 1832 चा काळ, अर्थातच इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता. राष्ट्रभक्तीसाठी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन, परिस्थितीची जाणीव
करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे बाळशास्त्रींना वाटले आणि त्यांनी दर्पण सुरु केले. ‘दर्पण’मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र सुरु ठेवले. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: इंग्रजी मजकूराची बाजू ते ‘दर्पण’साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’ मधील मजकूराचा दर्जा उच्च होता.
भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्रपाठक होण्याचा बहुमान 1834 यावर्षी बाळशास्त्रींना मिळाला. पुढे ते 1845 यावर्षी ते शिक्षण विभागाचे संचालक झाले. त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल,इतिहास, भौतिकशास्त्र, गणित, खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत.
याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले आहेत. एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानाच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ 1851 यावर्षी त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. बाळशास्त्री त्यांच्या विद्यार्थीयांमध्ये लोकप्रिय होते. त्यांचा शिष्यांच्या यादीत दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी, नारायण दाजी, प्रा. केरो लक्ष्मण छत्रे, डॉ. आत्माराम पांडूरंग, नाना नौरोजी, नौरोजी बेहरामजी, रामचंद्र बाळकृष्ण, वासुदेव पांडूरंग, अर्देसर फ्रान्सिस मूस, दफ्तदार केशवराव नरसिंह आदी मान्यवरांचा समावेश आहे.
बोलके नव्हे कर्ते

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजसुधारणा, शिक्षण आणि वृत्तपत्र प्रसार यासाठी केलेले कार्य हे अलौकिक असे आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर जेम्स कॉर्नोक यांनी 1840 यावर्षी जस्टीस ऑफ पीस अशी पदवी देऊन
बाळशास्त्रींचा गौरव केला. आज वर्तमानपत्राची भव्यता पाहता झालेली प्रगती लक्षात येते. परंतु त्याकाळी अत्यंत बिकट स्थितीमध्ये वर्तमानपत्र चालविण्याचे कार्य आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल न्यायमूर्ती ना.ग.चंदावरकर
यांनी म्हटले आहे की, “बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते. न्यायमूतींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे. तर आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. मुंबई महानगरीच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली, असेही आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. आद्य संपादक, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ अशा बहूआयामी व्यक्तीमत्वाचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्याकाळी
केलेल्या कष्टाची जाणीव निश्चितच आजची माध्यम क्रांती पाहून होते. त्यांच्या या महान कार्यास शतश: प्रणाम…
डॉ.राजू पाटोदकर
उपसंचालक (माहिती),
पुणे विभाग,

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन

0

मुंबई, दि. 5 : महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणार आहे.

या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरिता तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 117 बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी मुंबई ४०००१८ येथे उपलब्ध आहे.

अर्ज स्वीकारण्यासाठी निकष अर्ज विहित नमुन्यात असावा तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या न जोडलेला प्रतीचे अर्ज, सेवा विषयक, आस्थापनाविषयक बाबी तसेच तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अशा स्वरुपाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई यांनी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग व परीक्षा 15 फेब्रवारीपर्यंत ऑनलाईन – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

0


मुंबई, दि. 5 : कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालयीन परीक्षा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) राज्यातील विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासमवेत कोविड-19 परिस्थितीचा काल आढावा बैठक घेतली. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, कला संचालक राजीव मिश्रा उपस्थित होते.

विद्यापीठे तसेच महाविद्यालयानी अद्याप लसीकरण न झालेल्या विद्यार्थी यादी स्थानिक प्राधिकरणना देऊन लसीकरण साठी विशेष मोहीम राबवून तसेच विद्यार्थीया मध्ये जनजागृती करून तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे. तंत्रनिकेतन मधील विद्यार्थी 15 ते 18 या वयोगटातील असल्याने व या वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण सुरू झाले असल्याने संचालक तंत्रशिक्षण यांनी लसीकरण करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला उपलब्ध करून द्यावी व विशेष मोहिमेद्वारे लसीकरण पूर्ण करून घावेत. तसेच संचालक कला यांनी ऑनलाईन चित्रकला परीक्षेसंदर्भात नियोजन करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच विद्यापीठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची चक्राकार पद्धतीने 50 टक्के उपस्थितीचे नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही श्री.सामंत यांनी यावेळी केले.

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2021 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2022 असा आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरात देखील कोरोनाचा शिरकाव-चार जण पॉझिटिव्ह

0

मुंबई-राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या आई, पत्नी आणि मुलीसह चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

राऊत यांच्या आई, त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे होते. यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना सौम्य लक्षणे होते. यामुळे सध्या तरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यातील अनेकांना नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, के. सी. पाडवी आणि प्राजक्त तनपुरे तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा देखील समावेश आहे. जवळपास 61 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.