Home Blog Page 2123

सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र बना – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

0

मुंबई, दि. 13 : सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच, पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबरच वर्दीच्या सर्वोच्चतेचा सन्मान करा; असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

मंत्रालयातील गृहमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी श्री. वळसे पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी परिविक्षाधीन अधिकारी अभयसिंह देशमुख (प्रशिक्षण जिल्हा लातूर), गोकुल राज (प्रशिक्षण जिल्हा कोल्हापूर), अशीत कांबळे (प्रशिक्षण जिल्हा जळगाव), महक स्वामी (प्रशिक्षण जिल्हा वाशीम), रश्मिथा राव निथीपुडी (प्रशिक्षण जिल्हा बीड), पंकज अतुलकर (प्रशिक्षण जिल्हा औरंगाबाद ग्रामीण), ऋषीकेश रेड्डी सिंगा रेड्डी (प्रशिक्षण जिल्हा रत्नागिरी), तेगबीर सिंह संधू (प्रशिक्षण जिल्हा पुणे ग्रामीण), एम.व्ही. सत्या साई कार्तिक (प्रशिक्षण जिल्हा सोलापूर ग्रामीण), शफकत अम्ना (प्रशिक्षण जिल्हा वर्धा) उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री वळसे –पाटील  म्हणाले, पोलिसांकडून जनतेला चांगल्या वर्तनाची तसेच मदतीची अपेक्षा असते. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयातच नव्हे तर समाजात वावरतानादेखील आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याप्रति जागरूक राहिले पाहिजे. कोरोना काळात पोलिसांनी गरीब, गरजूंना मोठ्या प्रमाणावर केलेल्या मदतीमुळे पोलिसांबद्दल जनमानसामध्ये विश्वास अधिक वाढीस लागला आहे. हा विश्वास टिकविण्याबरोबरच जनतेशी संपर्क आणि संवाद वाढविण्यावर भर देण्यात यावा.

कर्तव्य बजावताना पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्नरत राहावे. पोलिसांनी जनतेचा मित्र म्हणून काम करावे. पीडित, अन्याय-अत्याचारग्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा, असेही वळसे-पाटील यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच अपराधसिद्धतेचा दर उंचाविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच पोलीस दलाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन विशेष प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्याकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

0

बई, दि. 13  :- मकर संक्रांत आपल्याला संक्रमण आणि बदल स्वीकारण्याचा संदेश देते. त्यासाठी आपण परस्परांची काळजी घेत कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करूया आणि या संक्रमणातून बाहेर पडून आरोग्याचा गोडवा वाढवूया, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणतात की , पृथ्वी आणि सूर्याचं हे नातं आपल्याला संक्रमणाला सामोरे जाण्यास शिकवते. जगावर गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचे संकट घोंगावते आहे. यातही आपण संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत पुढे जात आहोत. उद्या साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीकडूनही आपण हाच संदेश घेऊया. परस्परांची काळजी घेऊया. गर्दी टाळूया.  एकमेकाला आरोग्यदायी, समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा देऊया. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

“सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने साजरा होणारा मकर संक्रांतीचा सण आणि सुरु होणारे सूर्याचे उत्तरायण राज्यातील जनतेच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्य, आनंदाची समृद्धी घेऊन येवो. समाजातील अज्ञान, असत्य, अंधश्रद्धेचा अंध:कार यानिमित्ताने दूर होवो. मनातील, विचारातील कटुता संपून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री, आपुलकी, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. यंदाची मकर संक्रात राज्यासाठी कोरोनामुक्तीची पहाट ठरो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मकर संक्रांतीच्या दिवशीच पोंगल, बिहू आणि उत्तरायण पर्व हे सणही आज साजरे केले जात आहेत. पारंपरिक पद्धतीनं साजरा होत असलेल्या या सणांच्याही सर्वांना शुभेच्छा. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या सुरुवातीलाच साजरे होत असलेले हे सण कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरे करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

इंद्रायणी नदीवरील मोठा पुल जड वाहनांसाठी बंद

0


पुणे, दि.१३ : पुणे शहर हद्दीतील आळंदी-मरकळ, तुळापुर-फुलगाव, लोणीकंद- थेऊर- लोणीकाळभोर – वडकी – उंड्री कात्रज मार्गावरील तुळापुर येथील इंद्रायणी नदीवरील मोठा पुल धोकादायक झाला असल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहनाशिवाय (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी.) जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणुन शिक्रापूर ते चाकण किंवा विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

विमानतळ वाहतूक विभागांतर्गत नो-पार्किंगचे आदेश
विमानतळ वाहतूक विभागांतर्गत सुंदराबाई मराठे शाळेच्या संरक्षण भिंतीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बाहेरील बाजूस तसेच आनंद कार्नर सोसायटीच्या प्रवेशद्वार क्रमांक 1 ते आनंद पार्क सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून 15 मीटर अंतरापर्यत रोडच्या दोन्ही बाजुला अत्यावश्यक सेवेतील वाहना (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी) शिवाय अन्य वाहनांसाठी नो-पार्किंगचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांना याबाबत काही सुचना असल्यास त्यांनी पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रक शाखा, बंगला क्रमांक 6, येरवडा कचेरी कार्यालयाजवळ, पुणे-6 येथे 10 ते 24 जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त श्रीरामे यांनी केले आहे.

पीडित महिला तसेच वेश्या व्यवसायातील महिलांनाही मिळणार शिधापत्रिका – अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ

0

मुंबई,दि.१३: अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना तसेच वेश्या व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

वेश्या व्यवसाय, बालवेश्या व वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या सल्लागार समितीच्या सूचनेनुसार वेश्या, बालवेश्या व वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन होण्यासाठी  त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.त्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेऊन याबाबत शासन निर्णयदेखील निर्गमीत करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्याकडे असणाऱ्या यादीतील स्वयंसेवी संस्थांकडून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडित महिला व वेश्या व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना  शिधापत्रिका देण्यात येणार आहे. नवीन शिधापत्रिकेसाठी आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणींचा सहानभूतीपूर्वक विचार करून ओळखीचा पुरावा (Identification Proof) व वास्तव्याचा पुरावा (Residential Proof) सादर करण्यापासून त्यांना सूट देण्यात येत आहे. या कागदपत्रांची संबधितांकडून मागणीदेखील करण्यात येवू नये असे या शासन निर्णयातदेखील नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था यांचेकडील यादीतील महिलांकडून नवीन शिधापत्रिकांसाठी अर्ज भरून घेऊन त्यांना शिधापत्रिका वितरण करण्याची कार्यवाही संबंधित संस्था व महिला व बालविकास विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात येणार असून व शिधापत्रिका केवळ भारतीय नागरिकांना वितरित होईल याची काटेकोरपणे दक्षता घेण्याबाबत संबधित कार्यान्वयीन यंत्रणांनी दक्षता घ्यावी असेदेखील निर्देश देण्यात आले आहेत.

सीडीएस परीक्षेत देशात प्रथम आलेल्या अपूर्व पडघान याचे उपमुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

0

मुंबई, दि. 13 : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कंबाइन्ड डिफेंस सर्विसेस (सीडीएस) परीक्षेत देशातून पहिला आलेला अपूर्व पडघान याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे. मंत्रालयात उपमुख्यमंत्री यांच्या दालनात पुष्पगुच्छ देऊन श्री.पवार यांनी अभिनंदन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.

मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अपूर्व पडघान याने नागपूर येथील एनआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात पदवी घेतली आहे. त्याचे वडील पोलीस विभागात कार्यरत आहेत. एअर फोर्समध्ये पुढे काम करण्याचे अपूर्व पडघान याने ठरविले आहे.  अपूर्वच्या या निवडीमुळे ग्रामीण भागातून या क्षेत्रात येऊ इच्छ‍िणाऱ्या युवकांसाठी प्रेरणा मिळणार आहे, असे उद्गार मान्यवरांनी काढले.

बारामती तालुक्यातील रहिवाशी नागरिकांना रोजगाराच्या संधी

0

पोस्टात जीवन विमा अंतर्गत अभिकर्ता नेमणार

पुणे, दि.१३ :- जीवन टपाल विमा तसेच ग्रामीण टपाल विमा अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे अभिकर्त्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या २२ जानेवारी रोजी बारामती येथील मुख्य पोस्ट कार्यालयात बारामती तालुक्यातील इच्छुकांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोस्टब विभागाकडून करण्यात आले आहे.

उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे यादरम्यान असावी. उमेदवार मान्यता प्राप्त संस्थामधून दहावी, बारावी उत्तीर्ण असावा. विमा क्षेत्रातील माहिती, विपणन कुशलता असणे आवश्यक राहील. बेरोजगार, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता बचत गटाचे पदाधिकारी, टपाल जीवन विमा अभिकर्ता यासाठी पात्र राहतील.

विमा अभिकर्ता म्हणुन निवड झाल्यानंतर टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिलेले कमिशन तसेच प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. नियुक्त उमेदवारांना आंतरिक प्रशिक्षण देण्यात येईल. परवाना देण्यासाठी २५० रूपये आणि परवाना परिक्षेसाठी २८५ रूपये शुल्क जमा करावे लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रूपये टपाल बचत खात्यामध्ये अथवा राष्ट्रीय बचत पत्रामध्ये भारताचे राष्ट्रपती यांच्या नावाने तारण म्हणून ठेवावे लागणार आहेत.

बारामती येथील मुख्य पोस्ट कार्यालयात २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीस येताना शैक्षणिक प्रमाणपत्रासह पॅन कार्ड, आधार कार्ड, दोन छायाचित्रासह आणि इतर संबंधित दस्ताऐवजांसमवेत उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी श्री. व्ही.एस. देशपांडे ९४२०९६५१२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक डाक घर (पुणे ग्रामीण विभाग) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सर्वसामान्यांचे आधारवड व्हा; पोलीस दलाची शान वाढवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 13 : महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाची, बलिदानाची, शौर्याची परंपरा आहे. महाराष्ट्र पोलीस दल जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त झालेले पोलीस दल आहे. या पोलीस दलाचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. अशा महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याची आपणास मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत सर्वसामान्यांचे आपण आधारवड व्हा, पोलीस दलाची शान वाढवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना केले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी परिविक्षाधीन अधिकारी अभयसिंह देशमुख (प्रशिक्षण जिल्हा लातूर), गोकुल राज (प्रशिक्षण जिल्हा कोल्हापूर), अशीत कांबळे (प्रशिक्षण जिल्हा जळगाव), महक स्वामी (प्रशिक्षण जिल्हा वाशीम), रश्मिथा राव निथीपुडी (प्रशिक्षण जिल्हा बीड), पंकज अतुलकर (प्रशिक्षण जिल्हा औरंगाबाद ग्रामीण), ऋषीकेश रेड्डी सिंगा रेड्डी (प्रशिक्षण जिल्हा रत्नागिरी), तेगबीर सिंह संधू (प्रशिक्षण जिल्हा पुणे ग्रामीण),एम.व्ही. सत्या साई कार्तिक (प्रशिक्षण जिल्हा सोलापूर ग्रामीण), शफकत अम्ना (प्रशिक्षण जिल्हा वर्धा) उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलीस दलातील अधिकारी म्हणून सर्वसामान्य जनतेला तुमचा आधार वाटला पाहिजे. ‘आपला माणूस’ अशी तुमची समाजात प्रतिमा असली पाहिजे. नोकरी करताना तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुमच्या कार्यालयात येणाऱ्या आपल्या माता, भगिनींना आपण सन्मानाची वागणूक द्या. त्यांचे प्रश्न समजून घ्या. शाळकरी, महाविद्यालयीन मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करा. महाराष्ट्राचा वारसा, इतिहास, सामाजिक लढे, चळवळी, परंपरा आपण समजून घ्या.

महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढवण्याची, प्रतिष्ठा जपण्याची, प्रतिमा उंचावण्यासाठी कार्यरत राहून महाराष्ट्र पोलीस दलाचे वैभव समृध्द करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
00000

10 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस

0

मुंबई 13 जानेवारी 2022

बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट चालवण्यात येत असल्याच्या  गुप्त माहितीनुसार कारवाई करत, मुंबई प्रदेशाच्या अखत्यारीतील नवी मुंबई सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मंडळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी मे. महाराष्ट्र एंटरप्रायझेस या कंपनीच्या मालकाला अटक केलीआहे. तसेच केंद्रीय CGST विभागाने 10 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या 15 बनावट संस्थांच्या नावावरील आणखी एका बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, या व्यवहारात  57 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या वस्तूंच्या कोणत्याही पावत्या न घेता किंवा प्रत्यक्षात या वस्तूंचा पुरवठा न करता बनावट पावत्यांवर हे घोटाळेबाज धातूच्या भंगार सामानाच्या खोट्या पावत्या जारी करून इनपुट टॅक्स क्रेडिट हडपत होते. मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांमध्ये या कंपनीच्या बेकायदेशीर व्यवहारांचे हे जाळे पसरले आहे.

ही कंपनी, लोखंडी कचरा आणि भंगार वितळवून त्यातील लोखंड अथवा पोलाद विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडे नोंदणीकृत आहे. मात्र या कंपनीच्या मालकाने सीजीएसटी कायदा 2017 चे उल्लंघन करत, कोणत्याही वस्तू अथवा सेवा न घेता, अनुक्रमे, 5 कोटी 17 लाख आणि 5 कोटी 11 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट हडपले आणि फसवणुकीने त्याचा वापर केला असे तपासणीअंती निदर्शनास आले.

अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या पावत्यांवर इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन यांच्या संपर्कातील इतर संस्थांना त्याचे हस्तांतरण करून ही कंपनी नियमित वस्तू आणि सेवा कराचा महसूल ज्यांच्या हक्काचा आहे त्या कंपन्यांवर अन्याय करून त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने स्पर्धा करत होती.

या प्रकरणी एका व्यावसायिकाला CGST कायदा 2017 च्या कलम 69 अन्वये कलम 132 ibid चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आणि त्याला वाशीच्या प्रथमवर्ग माननीय न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर आरोपीला 27 जानेवारी 2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळ्यात सहभागी होऊन, प्रामाणिक करदात्यांची फसवणूक करणाऱ्या आणि सरकारचा अधिकार असलेला महसूल हडपण्याचा गुन्हा करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने मोठ्या प्रमाणावर सुरु केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून आजची कारवाई करण्यात आली. यापूर्वीच्या कारवाईत, नवी मुंबई आयुक्तालयाने 8 जानेवारी 2022 रोजी सरकारी नोंदणी असलेल्या मे. ओम्नीपोटंट या कंपनीच्या दोन व्यावसायिकांना अटक केली होती. सुमारे 385 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून ही कंपनी 70 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेच्या इनपुट टॅक्स क्रेडीटचे बनावट संस्थांना हस्तांतरण करत होती.

येत्या काळात हा विभाग असे फसवणुकीचे व्यवहार करणाऱ्या आणि करचुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करणार आहे.

कामगार, विशेषत: स्थलांतरित मजुरांचे कुठूनही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले नाही- राज्यांचे कामगार आयुक्त

0

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022

कोरोनाच्या ओमायक्रॉन उत्परिवर्तकामुळे उद्भवलेली सध्याची महामारीची परिस्थिती लक्षात घेता,सर्वसाधारणपणे कामगार आणि विशेषतः स्थलांतरित कामगारांच्या संदर्भातील राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव  सुनील बर्थवाल यांच्या अध्यक्षतेखाली 12.01.2022 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसोबत समन्वय बैठक झाली. अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, राज्य कामगार विभागांचे सचिव आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे कामगार आयुक्त आणि रेल्वे मंत्रालय आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

कोविड रुग्णांची  संख्या वाढत असलेल्या काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये  काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी  आणि शनिवार व रविवारची संचारबंदी वगळता, देशातील बांधकाम व्यवहार , व्यावसायिक उपक्रम , दुकाने सुरु ठेवण्यावर  आणि औद्योगिक व्यवहारांवर  कोणतेही निर्बंध नाहीत  आतापर्यंत, सरकारांनी  लागू केलेल्या मर्यादित स्वरूपातील निर्बंधांमुळे सध्या स्थलांतरित कामगारांच्या विशेष स्थलांतराचा कोणताही नोंद नाही. स्थलांतरित कामगार त्यांच्या मूळ राज्यात स्थलांतरित होण्याच्या काही माध्यमांच्या बातम्या असत्य असल्याचे आढळून आले आणि ही  वृत्त  जुन्या छायाचित्रांवर आधारित असल्याचेही लक्षात आले. आढाव्याच्या दिवसापर्यंत, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या  ५०% उपस्थितीचे निर्बंध वगळता.संपूर्ण देशात व्यवसायाची स्थिती सामान्य आहे, अशी माहिती राज्य सरकारांनी या बैठकीत दिली

केंद्र तसेच राज्य सरकारे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि परिस्थितीच्या मागणीनुसार परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.

काही राज्य सरकारांनी गरज भासल्यास गरजू मजुरांना कोरडा शिधा वाटप करण्याची योजना यापूर्वीच आखली आहे. काहींनी राज्यांनी  उपलब्ध असलेल्या इमारत आणि इतर बांधकाम कामगार (बीओसीडब्ल्यू ) उपकर निधी  आणि सामाजिक सुरक्षा निधीतून आर्थिक सहाय्य देण्याची तयारी केली आहे.

रेल्वे विभाग देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, विशेषतः मुंबई, दिल्ली, चेन्नई,कोलकाता, बेंगळूरू आणि सिकंदराबाद यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. रेल्वे विभागाने परिस्थितीच्या मागणीनुसार  विशेष रेल्वेगाड्या पुरविण्याची सज्जता ठेवली आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनाच्या सतत संपर्कात राहण्याच्या सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.

बांधकामे सुरु असलेल्या सर्व जागा, संबंधित कारखाने आणि  आस्थापना यांचे कामकाज सुरळीतपणे सुरु असून, त्या ठिकाणांहून आपापल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी स्थलांतरित कामगारांचे लोंढे निघालेले नाहीत याची खात्री राज्य कामगार आयुक्तांनी दिली. स्थलांतरित कामगारांच्या सोयीसुविधांकडे लक्ष पुरविण्यासाठी राज्य सरकारे डोळ्यात तेल घालून सतर्क आहेत आणि या कामगारांना येणाऱ्या कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी मदत पुरविण्याच्या कामी जय्यत तयार आहेत. ज्या राज्यांमधून कामगार येतात आणि ज्या राज्यांमध्ये ते काम करतात अशा दोन्ही राज्यसरकारांनी स्थलांतरित कामगारांच्या बाबतीत उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी परस्पर समन्वयाने काम करावे अशा सूचना केंद्रीय कामगार आणि रोजगार सचिवांनी संबंधित राज्यसरकारांना  दिल्या आहेत.

केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत 21 कोटींहून अधिक असंघटीत कामगारांनी नोंदणी केली आहे याकडे देखील सचिवांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.सर्व राज्ये आणि केंद्र सरकारांच्या प्रशासनांनी त्यांच्या भागातील स्थलांतरित कामगारांची नोंद व]ठेवावी आणि ज्या कामगारांनी अजूनही ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही अशा कामगारांची नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी अशा सूचना देखील सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना देण्यात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारांना स्थलांतरित कामगारांना मिळणारे आर्थिक आणि इतर लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठीचे नियोजन करणे आणि ते लाभ  योग्य वेळेत कामगारांपर्यंत पोहोचविणे सुलभ होईल.

केंद्रीय मुख्य कामगार आयुक्तांच्या कार्यालयाने यासाठी देशभरात एकवीस देखरेख केंद्रे सुरु केली आहेत. राज्यांना टोल फ्री दूरध्वनी क्रमांक देखील देण्यात आले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत कार्यरत कोणत्याही ठराविक विभागात ‘एक देश एक शिधापत्रिका’ योजनेअंतर्गत अन्नधान्याची असामान्यपणे वाढती मागणी दिसून आलेली नाही अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या संचालकांनी दिली आहे. काम करीत असलेल्या राज्यांमधून स्वगृही पोहोचण्यासाठी राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांची नोंद ठेवण्याच्या सूचना देखील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. कामगारांचे लोंढे निर्माण करणाऱ्या कोणत्याही अफवांबाबत सावधानता बाळगण्यास राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे. आपापल्या राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या स्थलांतरित कामगारांना त्यांची सुरक्षितता, संरक्षण आणि रोजगार याबाबत आश्वस्त करण्याचा सल्ला राज्य सरकारांना देण्यात आला आहे.

हॅकेथॉनमध्ये 10 समस्यांवरील तोडग्याचे आव्हान. 10 लाख रुपयांची पारितोषिके प्रस्तावित

0
नवी दिल्ली– दिनांक :  १३  जानेवारी 2022

१०  ते १६  जानेवारी 2022 या कालावधीत सुरु असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सप्ताहाचा एक भाग म्हणून एआरएआय टेक्नोवस यांनी आयोजित केलेल्या स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत वाहतुकीवरील विद्यार्थ्यांसाठीच्या  हॅकेथॉनचे ई-उद्‌घाटन  केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांच्या हस्ते १३  जानेवारी २०२२   करण्यात आले. देशाच्या विकासासाठी नवोन्मेष  हा महत्त्वाचा घटक आहे, असे त्यांनी युवा सहभागींना संबोधित करताना सांगितले. देशाला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणे हा राष्ट्र उभारणीचा मार्ग आहे.तरुणांना जलद आणि कल्पकतेने विचार करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे आणि या प्रयत्नासाठी  हॅकेथॉन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आर्थिक विकासात वाहन क्षेत्राचे  मोठे योगदान आहे ,तथापि , इंधनाचा अतिरिक्त वापर, हरितगृह परिणाम, प्रदूषण आणि अपघात यामुळे आव्हाने निर्माण झाली आहेत मात्र नवे  नवोन्मेष हे  शाश्वत प्रगतीसह सुरक्षित वाहतूक  सुनिश्चित करतील, असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. सरकारही या बाबींवर लक्ष केंद्रित करत आहे. तरुण विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या  हॅकेथॉनमुळे यादृष्टीने मार्गक्रमण सुरु होईल  असेही ते म्हणाले.

आत्मनिर्भर भारतसाठी स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत वाहतूक उपायांच्या  विस्तृत संकल्पनेवर आधारित या हॅकेथॉनमध्ये १०  समस्या घोषणापत्रांचे सादरीकरण केले जाईल. १० लाख रुपयांची पारितोषिके प्रस्तावित आहेत. विजेत्यांना टेक्नोवस द्वारे (TechNovuus) पुढील अंतर्वासिता  किंवा वरील स्तरावरील प्रशिक्षणासाठी  देखील विचारात घेतले जाईल.

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय ) च्या संचालक डॉ. रेजी मथाई यांनी  उद्घाटनपर भाषण केले.शिक्षण मंत्रालयातील मुख्य नवोन्मेष अधिकारी डॉ. अभय जेरे  यांनी हॅकेथॉनचे महत्त्व विशद केले आणि भारतातील तंत्रज्ञानाचे भविष्य घडवण्यात नवोन्मेषाची  भूमिका स्पष्ट केली. हॅकेथॉनच्या यशामुळे भारताने इतर देशांसोबत निर्माण केलेल्या संधीबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. एआरएआयच्या उपसंचालक उज्ज्वला कार्ले, यांनी एआरएआय येथे आयोजित कार्यक्रमांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या आढावा सादर केला.

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स, इंडियाचे उप महासंचालक व्यंकटराज के यांनी आभार मानले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्‍पर्धा:पुण्‍यातील विजेत्‍यांना मिळणार १,००,००० रूपयांचे रोख बक्षीस

0

जगभरातील विजेत्‍यांना मिळणार १००,००० डॉलर्सचे बक्षीस  

पुणे-उद्योजकतेला अधिक चालना देण्‍याप्रती असलेल्‍या आपल्‍या मिशनला अधिक पुढे घेऊन जात टीआयईने महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी व्‍यवसाय योजना स्‍पर्धा – बिझ क्‍वोशिएण्‍ट हा उपक्रम सुरू केला आहे. पुण्याच्या टीआयईचे अध्‍यक्ष विनीत पाटनी म्‍हणाले, ”आमचा विश्‍वास आहे की, तरूणांना योग्‍यरित्‍या मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी आपल्‍या देशाची सर्वोत्तम संपत्ती आहेत आणि नवीन व्‍यवसाय निर्मितीसाठी त्‍यांची क्षमता व सर्जनशीलतेचा उपयोग करत संपत्ती, रोजगार निर्माण करण्‍यास मदत करण्‍यामध्‍ये वावगे काय आहे?”

पुणे शहरामध्‍ये, तसेच आसपासच्‍या परिसरामध्‍ये कोणत्‍याही महाविद्यालयात कोणत्‍याही शाखेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. या उपक्रमाचे प्रमुख अद्वैत कुर्लेकर म्‍हणाले, ”आम्‍ही उपक्रम महाविद्यालयांच्‍या माजी विद्यार्थ्‍यांसाठी देखील विस्‍तारित केला आहे. पण २०१९ नंतर उत्तीर्ण झालेल्‍या माजी विद्यार्थ्‍यांसाठीच हा उपक्रम आहे. आमच्‍या वेबसाइटवर नोंदणी करण्‍याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२२ आहे.”

जवळपास १० युनिव्‍हर्सिटीज व महाविद्यालयांनी टीआयई, पुणे सोबत सहयोग केला आहे आणि नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी या युनिव्‍हसिर्टीज व महाविद्यालयांमध्‍ये आंतर महाविद्यालयीन स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येईल. अद्वैत म्‍हणाले, ”आंतर महाविद्यालयीन स्‍पर्धेनंतर टीआयई पुणे चॅप्‍टर स्‍तरावर इंटर कॉलेज स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येईल. या इंटर कॉलेज लेव्‍हल स्‍पर्धेचा विजेता जागतिक स्‍पर्धेमध्‍ये टीआयई पुणेचा प्रवेशक म्‍हणून पात्र ठरेल. विजेत्‍यांना सिलिकॉन व्‍हॅली येथे पाठवण्‍यात येईल, जेथे ते जगभरातील इतर टीआयई चॅप्‍टर्समधील विजेत्‍यांसोबत स्‍पर्धा करतील.”

पुण्‍यामधील विजेत्‍यांना १,००,००० रूपयांचे रोख बक्षीस मिळेल आणि जगभरातील विजेत्‍यांना १००,००० डॉलर्सचे बक्षीस मिळेल. याव्‍यतिरिक्‍त सिलिकॉन व्‍हॅलीसाठी पात्र सर्व विद्यार्थी बूट कॅम्‍प्‍समध्‍ये सहभाग घेतील, जागतिक गुरूंकडून मार्गदर्शन मिळवतील आणि त्‍यांच्‍या नेटवर्क्‍सचा विस्‍तार करतील.

तसेच टीआयई पुणे विविध महाविद्यालयांमधील पहिल्‍या तीन विजेत्‍यांना सवलतीची असोसिएट मेम्‍बरशीप ऑफर करेल आणि सर्व उमेदवार टीआयईमधील उद्योजकता कौशल्‍याचा लाभ घेऊ शकतात. अद्वैत म्‍हणाले, ”आमचा या विद्यार्थी स्‍टार्ट-अप्‍सचा शोध घेऊन त्‍यांची प्रगती करण्‍याचा आणि त्‍यांना युनिकॉर्न्‍स बनताना पाहण्‍याचा मनसुबा आहे.”

वेबसाइट https://www.tiepune.org/biz-quotient/

पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सीआयसीटीच्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले

0
वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागांची संख्या सुमारे 1 लाख 48 हजारांवर गेली आहे, 2014 मधील 82 हजार जागांच्या तुलनेत सुमारे 80% वाढ .

एम्सची संख्या 2014 मधील 7 वरून आज 22 इतकी झाली आहे

नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तामिळनाडू मध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ (CICT) च्या नवीन संकुलाचे  उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया, डॉ एल मुरुगन आणि डॉ भारती पवार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू एम के स्टॅलिन उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना  संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 11 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनामुळे समाजाचे आरोग्य आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक बळकट होत आहे.

डॉक्टरांची कमतरता ही अनेक वर्षांपासूनची समस्या होती आणि सध्याच्या सरकारने ही गंभीर त्रुटी दूर करण्यास प्राधान्य दिले याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  2014 मध्ये देशात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती . गेल्या सात वर्षांत ही संख्या 596 वैद्यकीय महाविद्यालये इतकी झाल्याचे त्यांनी सांगितले.  ही वाढ 54% आहे. 2014 मध्ये भारतात वैद्यकीय पदवी  आणि पदव्युत्तर पदवीच्या सुमारे 82 हजार जागा होत्या. गेल्या सात वर्षांत ही संख्या सुमारे 1 लाख  48 हजार जागांवर गेली आहे. ही वाढ  सुमारे 80% आहे. 2014 मध्ये देशात फक्त सात एम्स होत्या. परंतु 2014 नंतर मान्यताप्राप्त एम्सची संख्या 22 वर पोहोचली आहे. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षण क्षेत्र अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध सुधारणा हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडूमध्ये एकाच वेळी 11 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करून,  अलीकडेच उत्तर प्रदेशात 9 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनाचा स्वत:चाच विक्रम मोडला, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. रामनाथपुरम आणि विरुधुनगर या दोन महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांसह निलगिरीच्या डोंगराळ जिल्ह्यात महाविद्यालये स्थापन करून प्रादेशिक असमतोल दूर केला जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले की,  कोविड-19 महामारीने आरोग्य क्षेत्राचे महत्व पुन्हा एकदा पटवून दिले आहे. येणारा काळ हा  आरोग्य सेवेत गुंतवणूक करणाऱ्या समाजाचा असेल.केंद्र सरकारने या क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. आयुष्मान भारतमुळे गरीबांना उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध आहे. गुडघा प्रत्यारोपण आणि स्टेंटची किंमत पूर्वीपेक्षा एक तृतीयांश झाली आहे. 1 रुपयात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिल्यामुळे  महिलांमध्ये निरोगी जीवनशैलीला चालना मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत पायाभूत सुविधा विकास मिशनचे उद्दिष्ट आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य संशोधनामध्ये विशेषतः जिल्हा स्तरावर असलेल्या  गंभीर त्रुटी दूर करणे हे  आहे. पुढील पाच वर्षांत तामिळनाडूला तीन हजार कोटींहून अधिक रुपयांची मदत दिली जाईल. यामुळे राज्यभर शहरी आरोग्य आणि कल्याण केंद्रे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि गंभीर आजारांवरील उपचार विभागांची स्थापना करण्यात मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले. येत्या काही वर्षांत, “भारत हा दर्जेदार  आणि परवडणारी सेवा देणारा देश  बनावा असे माझे स्वप्न आहे . वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी भारतात आहेत. हे मी आपल्या डॉक्टरांच्या कौशल्याच्या आधारे म्हणतो आहे ,” असे त्यांनी सांगितले.  त्यांनी वैद्यकीय समुदायाला  टेलीमेडिसिनकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले.

तमिळ भाषा आणि संस्कृतीच्या समृद्धीची आपल्याला नेहमीच भुरळ पडते, असे पंतप्रधान म्हणाले. ” जेव्हा मला जगातील सर्वात जुनी भाषा, तामिळ मधील काही शब्द  बोलण्याची संधी  संयुक्त राष्ट्रांमध्ये  मिळाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता”,अशा भावना त्यांनी प्रकट केल्या. ते म्हणाले की, बनारस हिंदू विद्यापीठात तमिळ अभ्यासावर ‘सुब्रमण्य भारती अध्यासन ‘ स्थापन करण्याचा मानही त्यांच्या सरकारला मिळाला आहे. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात असलेले हे अध्यासन तमिळबद्दल अधिक कुतूहल  निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान प्रणालींच्या संवर्धनावर भर दिल्यासंदर्भात  भाष्य करताना,पंतप्रधान म्हणाले की, शालेय शिक्षणात माध्यमिक किंवा मध्यम स्तरावर तमिळ भाषेचा अभ्यास आता अभिजात  भाषा म्हणून करता येईल. शालेय विद्यार्थ्यांना ज्या ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून  विविध भारतीय भाषांमधील 100 वाक्ये परिचित होतात, त्या भाषा-संगममधील एक भाषा ही तमिळ आहे. भारतवाणी प्रकल्पांतर्गत तमिळ भाषेतील सर्वात मोठी ई-सामग्री डिजिटल करण्यात आली आहे. “आम्ही शाळांमध्ये मातृभाषा आणि स्थानिक भाषांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत. आमच्या सरकारने  विद्यार्थ्यांना भारतीय भाषांमध्येही  अभियांत्रिकीसारखे  तांत्रिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.”, असे त्यांनी सांगितले.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम विविधतेतील एकतेची भावना वाढीस लावण्याचा  आणि आपल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा हरिद्वारमधील एका लहान मुलाला तिरुवल्लुवरची मूर्ती दिसते आणि तिची   महानता समजते तेव्हा त्याच्या कोवळ्या  मनात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे बीज रुजते”, यावर  त्यांनी भर  दिला.त्यांनी सर्वांना सर्व खबरदारी घेण्यास आणि कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तन ठेवण्यास सांगून भाषणाचा समारोप केला.

नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुमारे 4000 कोटी रुपये खर्चून स्थापन करण्यात आली आहेत , त्यापैकी सुमारे 2145 कोटी रुपये केंद्र सरकारने  आणि उर्वरित निधी तामिळनाडू सरकारने दिला आहे. विरुधुनगर, नमक्कल,  द निलगिरीज , तिरुपूर, तिरुवल्लूर, नागापट्टिनम, दिंडीगुल, कल्लाकुरीची, अरियालूर, रामनाथपुरम आणि कृष्णगिरी या जिल्ह्यांमध्ये नवीन महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत.  परवडणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाच्या सर्व भागात आरोग्य पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पंतप्रधानांच्या सततच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. ‘विद्यमान जिल्हा/रेफरल रुग्णालयाशी  संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना’ या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 1450 जागांची एकूण क्षमता असलेली नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत. या योजनेंतर्गत, ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नाही अशा जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जातात.

चेन्नईमध्ये केंद्रीय अभिजात तमीळ संस्थेच्या (सीआयसीटी) नवीन संकुलाची  स्थापना ही भारतीय वारशाचे संरक्षण आणि जतन आणि अभिजात भाषांना प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. नवीन संकुल हे संपूर्णपणे केंद्र सरकारद्वारे अनुदानित आहे आणि 24 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले  आहे. केंद्रीय अभिजात तमीळ संस्था आतापर्यंत भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या  इमारतीतून कार्यरत होती, या संस्थेचे काम आता नवीन 3 मजली संकुलातून होणार आहे.  एक प्रशस्त ग्रंथालय, ई-ग्रंथालय , सेमिनार हॉल आणि मल्टीमीडिया हॉलने सुसज्ज आहे.

तामिळ भाषेचे प्राचीनत्व आणि वेगळेपणा स्थापित करण्यासाठी संशोधन कार्ये करून अभिजात तमिळच्या संवर्धनासाठी, केंद्रीय अभिजात तमीळ संस्थाही  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था  योगदान देत आहे. संस्थेच्या ग्रंथालयात 45,000 हून अधिक प्राचीन तमिळ पुस्तकांचा समृद्ध संग्रह आहे. अभिजात  तमिळला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या भाषेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ही संस्था, चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, फेलोशिप देणे इत्यादी शैक्षणिक उपक्रम राबवते. विविध भारतीय तसेच 100 परदेशी भाषांमध्ये ‘थिरुक्कुरल’ चे भाषांतर आणि प्रकाशन करण्याचेही या संस्थेचे उद्दिष्ट आहे. हे नवीन संकुल  जगभरात अभिजात  तमिळ भाषेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने संस्थेसाठी कार्यक्षम वातावरण प्रदान करेल.

मकर संक्रांतीला एक कोटींहून अधिक जण सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमात सहभागी होणार : सर्बानंद सोनोवाल

0

नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2022

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव सोहळ्यांतर्गत, 14 जानेवारी 2022 रोजी   जागतिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी आयुष मंत्रालय सज्ज आहे.आणि 75 लाखांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत एक कोटींहून अधिक लोक यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

कोविड-19 च्या पुन्हा वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, मकर संक्रांतीदिवशी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक अधिक प्रासंगिक आहे,असे आज आभासी माध्यमातून घेतलेल्या  पत्रकार परिषदेत आयुष मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. सूर्यनमस्कार चैतन्य आणि प्रतिकारशक्ती निर्माण करतो आणि त्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यास सहाय्य्यकारी आहे, ही  सिद्ध झालेली वस्तुस्थिती आहे. आम्ही कार्यक्रमात 75 लाख लोकांच्या सहभागाचे उद्दिष्ट ठेवले आहे,मात्र नोंदणी आणि आमची तयारी पाहता, ही संख्या एक कोटींची मर्यादा ओलांडेल अशी अपेक्षा मला आहे, असे ते म्हणाले.

आयुष मंत्रालयाने पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली  हा कार्यक्रम सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले.

या आभासी माध्यमातून झालेल्या पत्रकारपरिषदेत  आयुष राज्यमंत्री डॉ  महेंद्रभाई मुंजापारा म्हणाले की, सूर्यनमस्कार मन आणि शरीराला नवचैतन्य  देतो. मॉलिक्युलर जेनेटिक्सवर योगाभ्यासाच्या  प्रभावाचा अभ्यास केला जात आहे,” असे त्यांनाही सांगितले.

हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले. “ सूर्यनमस्कार चैतन्यदायी जीवनासाठी, सूर्यनमस्कार जीवन शक्तीसाठी आहे,असे त्यांनी सांगितले.

भारतातील आणि परदेशातील सर्व आघाडीच्या योग संस्था, भारतीय योग संघटना, राष्ट्रीय योग क्रीडा महासंघ, योग प्रमाणन मंडळ, फीट  इंडिया आणि अनेक सरकारी आणि बिगर -सरकारी संस्था या जागतिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.ख्यातनाम व्यक्ती आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी चित्रफीत संदेशाद्वारे सूर्यनमस्काराचा प्रचार करणे अपेक्षित आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे  खेळाडू आणि कर्मचारी देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.

यासाठी सहभागी आणि योगाभ्यासप्रेमी लोक संबंधित पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात आणि त्यांना 14 जानेवारी रोजी सूर्यनमस्कार करतानाची  त्यांची  चित्रफीत अपलोड करायची आहे. नोंदणीसाठीचे दुवे  संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि आयुष मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले  जात आहेत.

सहभागी होणारे आणि योगाभ्यासप्रेमी  खालील पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करू शकतात:

https://yoga.ayush.gov.in/suryanamaskar

https://yogacertificationboard.nic.in/suryanamaskar/

https://www.75suryanamaskar.com

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न असल्याचे स्पष्ट-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

0

कोल्हापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाड्यांचा ताफा पंजाबमध्ये एका फ्लायओव्हरवर वीस मिनिटे अडकणे हा त्यांच्या हत्येसाठी घातपाताचा पूर्वनियोजित प्रयत्न होता हे एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे स्पष्ट झाले आहे. देशाच्या सुरक्षिततेविषयीच्या या गंभीर प्रकाराबाबत भारतीय जनता पार्टी जनजागरण करेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत घडलेली घटना किरकोळ असल्याचे सांगून काँग्रेसचे नेते खिल्ली उडवतात. तथापि, स्टिंग ऑपरेशनमुळे स्पष्ट झाले आहे की, पंतप्रधानांच्या मार्गावर आंदोलन होणार याची खबर स्थानिक पोलिसांनी दोन तीन दिवस आधी उच्च पदस्थांना देऊनही कारवाई करू नका असा सूचना देण्यात आल्या. ही घटना घडली तेथून पाकिस्तानची सीमा दहा किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ड्रोन हल्ल्याच्या टप्प्यात आहे.

हा घातपाताचा आणि पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न होता हे आता तरी काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या पंजाब सरकारने मान्य केले पाहिजे. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाची काँग्रेस नेते खिल्ली उडवतात. देशाच्या सुरक्षिततेविषयीच्या गंभीर विषयाची खिल्ली उडवणे चिंताजनक आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, या विषयात पंजाबच्या काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना ब्रिफिंग केले. प्रियंका गांधी या कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना त्यांना मुख्यमंत्र्यांनी माहिती देणे म्हणजे हा प्रकार काँग्रेस सरकार आणि पक्षाच्या समन्वयाने झाला का, अशीही शंका उत्पन्न होते.

कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली

0

मुंबई, दि.१२: ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या  पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून  घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच  आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून व  स्पर्धा पुढे घेण्यात यावी, अशी अनेक संघांनी ई मेलद्वारे व दूरध्वनीवरून केलेली विनंती लक्षात घेऊन, येत्या १५ जानेवारीपासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे.

विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर  शासनाच्या त्यावेळी असणाऱ्या नियमांस अनुसरून  नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे.