Home Blog Page 2122

राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल

0

मुंबई, दि. 14 : – महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार दिनांक 1 जानेवारी 2022 पासून शासन स्तरावर वाहन खरेदी करताना ते इलेक्ट्रिक वाहन असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. याची सुरूवात मकर संक्रांतीच्या दिवशी राजशिष्टाचार विभागाने जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनाकडे संक्रमण करून केली आहे.

राजशिष्टाचार विभागाअंतर्गत राज्य शासनाच्या अतिथींसाठी एकूण सात वाहने घेण्यात येत असून त्यातील दोन वाहने आज दाखल झाली आहेत. राजशिष्टाचार तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने जीवाश्म इंधनावरून इलेक्ट्रिक वाहनांकडे संक्रमण करून या वाहनांचे औपचारिक स्वागत केले. स्वच्छ, हरित ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन धोरणाला चालना देण्यासाठी हे संक्रमण दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उर्वरित वाहने 26 जानेवारी रोजी ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पर्यावरण व वातावरणीय बदल, पर्यटन तसेच राजशिष्टाचार विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण विभागाने वातावरणीय बदल रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण हा त्याचाच एक भाग असून याची सुरूवात सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करून यापूर्वीच करण्यात आली आहे. आता राज्य शासन आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालयात 1 जानेवारी 2022 पासून खरेदी करण्यात येणारी नवीन वाहने ही इलेक्ट्रिक वाहने असावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. राजशिष्टाचार विभागाने याची सुरूवात करून पहिले पाऊल टाकले आहे.

तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांना सुविधा विनासायास मिळतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि 14 : नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’  द्वारे सहजपणे उपलब्ध करून देणारी  बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका असून माहिती तंत्रज्ञानाचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी विविध समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’द्वारे जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ‘आपली मुंबई, माझी मुंबई’ साठी सातत्याने कार्यरत असणाऱ्यादेशातील क्रमांक एकच्या महानगरपालिकेद्वारे ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकाद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित करत या सुविधेचा स्वतः वापर करत लोकार्पण केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पाहता लोकांसाठी काम करावे. महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी  थेट व  सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते,  ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे.  वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली आहे.   महापालिका रोज काय काम करते ?  या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

तंत्रज्ञानस्नेही संक्रमण

मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, येणाऱ्या काळात इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास आहे. ऑनलाईन, पारदर्शक आणि अकाऊंटेबल महापालिकेचे मॉडेल आज आपण लोकांना दिले आहे.  माय बीएमसी ट्विटर हॅन्डलवर तक्रार दाखल करण्यात येत असून चॅट-बॉट हे पुढचे पाऊल आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी होत असलेले तंत्रज्ञानस्नेही संक्रमण हे अत्यंत चांगल्या दिशेने होत आहे.  मुंबईकरांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने करीत असलेल्या लोकाभिमुख प्रयत्नांचा त्यांनी याप्रसंगी आवर्जून उल्लेख केला.

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, उत्तम जागतिक सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याच्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या परिवर्तनशील पाऊलांचे नेहमीच खूप कौतुक वाटते. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधित बाबी मुंबईकरांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई शहर अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने बदलत आहे. कोविड काळात मुंबई पालिकेने केलले काम खूप कौतुकास्पद आहे, ज्याची दखल जागतिक आरोग्य संघटना व वर्ल्ड बँक यांनीही घेतली आहे.

महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा तत्परतेने उपलब्ध करुन देण्यात महानगरपालिका नेहमीच अग्रेसर असते. याच शृंखलेत आता ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर केवळ एक व्हॉट्सअप संदेश पाठवून नागरिकांना विविध सेवा-सुविधा व माहिती उपलब्ध होणार आहे, ही निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय बाब आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नमूद केले की, नागरिकांना घरबसल्या गणेशोत्सव मंडप परवानग्या, आपल्या विभागाची माहिती, संबंधित संपर्क क्रमांक यासारखी विविध माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअप कंपनीचे संचालक (सार्वजनिक धोरण) शिवनाथ ठुकराल यांनी नागरिकांना सेवा-सुविधा देण्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक करीत  अभिनंदन केले. ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेद्वारे नागरिकांना तब्बल ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका असल्याचाही श्री. ठुकराल यांनी आवर्जून उल्लेख केला.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, सहाय्यक आयुक्त (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे, यांच्यासह महानगरपालिकेतील विविध खात्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेची ठळक वैशिष्ट्ये

१. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे.

२. ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘Namaste किंवा Hi’ असा संदेश पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे २ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे ३ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या पर्यायानुसार महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांशी संबंधित पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात.

३. वरीलनुसार आपल्या आवश्यकतेनुसार नागरिकांद्वारे जे-जे पर्याय निवडले जातील, त्या-त्या पर्यायानुसार तब्बल ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होते. यामध्ये संबंधित पत्ते, संपर्क क्रमांक, संक्षिप्त माहिती यासारख्या बाबींचा समावेश आहे.

४. या सुविधे अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या८० सेवा-सुविधांविषयीची माहिती ही ‘लोकेशन’ आधारित पद्धतीने उपलब्ध होत असल्याने एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांपैकी कोणत्या विभागात आहे, याची माहिती अत्यंत सहजपणे व तात्काळ स्वरुपात उपलब्ध होत आहे.

५. वरीलनुसार लोकेशन आधारित पद्धतीने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ द्वारे माहिती उपलब्ध होत असल्यामुळे एखाद्या व्यक्तिच्या ठिकाणाजवळ असणारे महानगरपालिका दवाखाने – रुग्णालये, कोविड केअर सेंटर, मनपा शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रे इत्यादी बाबींची माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे.

६. या सुविधेद्वारे तक्रार वा सूचना करण्याची सेवा उपलब्ध आहे.

७. महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांशी संबंधित अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध.

८. महानगरपालिकेशी संबंधित विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी यूपीआय आधारित ऑनलाईन सेवा उपलब्ध.

९. महानगरपालिकेशी व महानगरपालिका क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडींची अद्ययावत माहिती उपलब्ध.

१०. महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधित प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादी विषयीची माहिती.

११. ही सुविधा दिवसाचे चोवीस तास व आठवड्याचे सातही दिवस (24 x 7) पद्धतीने व भ्रमणध्वनी ॲपद्वारे सहजपणे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना घरबसल्या व अत्यंत सहजपणे माहिती उपलब्ध होणार आहे.

१२. या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी आवश्यक नसून केवळ व्हॉट्सअपद्वारे ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर एक संदेश पाठवून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

१८ जानेवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सावर्जनिक सुट्टी जाहीर

0

मुंबई, दि. 14 : दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका, 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सावर्जनिक सुट्टी देण्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.

मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.

राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकांकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल.

पर्यटन व वनसमृद्धी

0

पर्यटन  वनसमृद्धी

          वातावरणीय बदलाचे गंभीर परिणाम आपण सर्वचजण अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण विभागाने दोन वर्षात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत, तर कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर पर्यटकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाने विविध योजनांचे नियोजन करून त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

आदित्य ठाकरे

मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल,

पर्यटन, राजशिष्टाचार

          

विकास हा महत्त्वाचा आहेच, पण तो शाश्वत आणि पर्यावरणपूरक असावा या दिशेने राज्याची दमदार वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेने दखल घेतली आहे. स्कॉटलंड येथे झालेल्या सीओपी-26 (कॉन्फरन्स ऑफ द पार्टिज) कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्वासाठी ‘अंडर 2 कोलिशन फॉरक्लायमेट ॲक्शन’ कडून पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलँडमध्ये तीन पैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. राज्याच्या हवामान भागीदारी आणि क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्सची ही येथे विशेष दखल घेतली गेली. महाराष्ट्राच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान आहे.

वनसमृद्धीत वाढ

राज्यात काम करताना पर्यावरण विभागाने सांगलीतील 400 वर्षे जुने झाड केंद्राच्या मदतीने वाचवण्यात यश मिळवले. 9800 हेक्टर कांदळ वन भारतीय वन कायद्यात आणले. आरेचे 808 एकरचे जंगल वाचवण्यात यश आले. राज्यात नवीन जलाशये तयार केली आहेत. प्रशासनाच्या पातळीवर माझी वसुंधरा अभियान राबवण्यात आले. मुंबईसह राज्यात सुमारे 21 लाख झाडे लावली. राज्यात 1650 हरित क्षेत्रांची निर्मिती केली. 237 जुनी हरितक्षेत्रे पुनर्जीवित केली. 1.50 कोटी नागरिकांनी हरित शपथ घेतली. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचर्‍याचे शास्त्रीय पद्धतीने विलगीकरण, वर्गीकरण व उपचार केल्याने 10,663 टन कंपोस्ट खत दर महिन्याला तयार झाले. ज्याद्वारे 63,982.5 टन कार्बनडाय ऑक्साईडचे सेक्वेस्टरेशन करण्यात आले.

महत्त्वपूर्ण निर्णय

स्थानिक संस्थांना रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पर्कोलेशन या प्रक्रियांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले गेले. याद्वारे महाराष्ट्र जेवढे पाणी एका दिवसात वापरतो तेवढे पाणी वाचवण्यात यश आले. एलईडी लाईट्स, सोलर पॅनल, रूफ टॉपसोलर पॅनलचा वापर वाढवण्यात आला. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले आहे. शाश्वत आणि प्रदूषणरहित वाहनांचा अंगीकार करणे, इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरात महाराष्ट्र राज्यदेशात अग्रेसर बनवणे हा या धोरणाचा उद्देश आहे. याधोरणाची सुरुवात सार्वजनिक वाहतुकीसाठी ही वाहने वापरून केली जात आहे.

नदी, तळे व नाले यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सहभागी संस्थांनी राज्यातील 775 जलसंस्था स्वच्छ करण्याचे काम केले. नूतनीकरणीय योग्य ऊर्जास्रोत, सौरऊर्जा, एलईडी आणि पुनर्न विकृत ऊर्जा अभियाना दरम्यान 12.23 लाख एलईडी बल्ब तसेच 70 हजार सोलर लाईट्स लावण्यात आले. ज्यामधून 1.4 लाख युनिट वीज वाचवण्यात मदत झाली. ग्रामीण भागात अभियाना दरम्यान 736 बायोगॅस प्लांट व 701 सोलर पंप बसवण्यात आले. ज्यामुळे जवळपास 32.5 टन कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले. पहिल्याच वर्षात 3,70,978 टन कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले. तुलना केल्यास हे प्रमाण 1.7 कोटी मोठी झालेली झाडे जेवढा कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतील तितके किंवा 34 आरे जंगले जेवढा कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतील तेवढे आहे.

हेरिटेजट्री

वृक्षसंवर्धन अधिनियमानुसार 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृक्ष हे ‘हेरिटेजट्री’ (प्राचीनवृक्ष) परिभाषित केले जाणार आहेत. वृक्षांचे वय हे हेरिटेजट्री दर्जा देण्यासाठी व भरपाई वृक्षारोपण करण्यासाठी लागवड करावयाच्या झाडाची संख्या निश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा पैलू आहे.

‘महाराष्ट्र वातावरणीय बदल परिषद’

इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑनक्लायर्मेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने, वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाचे राज्य मंत्रिमंडळापुढे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री यांच्यासह-अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र वातावरणीय बदल परिषद’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पर्यटनास चालना

पर्यावरण संवर्धनाबरोबरच कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार पर्यटन धोरणांतर्गत पात्र पर्यटन प्रकल्पांना वस्तू व सेवा कराचा परतावा अनुज्ञेय करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समुद्र किनार्‍यांचा सर्वांगीण, शाश्वत व एकसमान विकास करण्याकरिता राज्याचे बीच शॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. यामुळे राज्याच्या किनार्‍या लगत पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सोयी-सुविधांचा विकास होईल, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनीचा खासगी करणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबतचे धोरणही जाहीर करण्यात आले आहे. मुंबईला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी विविध ठिकाणी पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी समन्वय व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

कृषीपर्यटन धोरण

पर्यटकांची निसर्गाकडे ओढ लक्षात घेता राज्याचे कृषीपर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. पर्यटकांना खेडेगावात निसर्गरम्य ठिकाणी राहता यावे, प्रत्यक्ष शेतीच्या कामाचा अनुभव घेता यावा, ग्रामीण संस्कृती, कला, खाद्ययांचा आस्वाद घेता यावा, यासाठी हे धोरण आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

कॅराव्हॅन पर्यटन धोरण

महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनाची ठिकाणे आहेत. यापैकी जेथे हॉटेल किंवा राहण्याच्या सोयी कमी आहेत, तेथे कॅराव्हॅन पर्यटनाकरिता मोठा वाव आहे. अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्यात कॅराव्हॅन पर्यटन धोरण राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी कराव्या लागणार्‍या प्रक्रियेमध्ये पूर्वी 70 परवानग्यांसाठी अर्ज करावे लागत होते. यामध्ये सुलभता आणण्याकरिता एक खिडकी योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यापुढे फक्त 10 परवानग्या/ परवाने/ ना-हरकत प्रमाणपत्रे आणि नऊ स्वयंप्रमाणपत्रे आवश्यक असतील. यामुळे भविष्यात आदरातिथ्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार वाढेल.

राज्यात आदरातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जा देण्यात आला आहे. यानुसार केंद्रशासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून 1 एप्रिल 2021 पासून वीज दर, वीज शुल्क, पाणी पट्टी, मालमत्ता कर, विकास कर, वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक व अकृषिक कराची आकारणी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साहसी पर्यटन धोरण

महाराष्ट्रात किनारपट्टीचा प्रदेश, त्याला समांतर सह्याद्री पर्वत रांगा, सह्याद्रीच्या जोडीला सातपुडा आणि विंध्य अशा पर्वतरांगा आहेत. प्राचीन दुर्गवैभव, पर्वतांमधून उगम पावणाऱ्या नद्या तसेच विदर्भातील घनदाट जंगले असा वैविध्यपूर्ण आणि समृद्ध निसर्ग लाभलेल्या राज्यात जमीन, हवा आणि पाणी या तीनही प्रकारातील साहसी पर्यटन उपक्रम आयोजित करण्यास मोठा वाव आहे. यामुळे पर्यटन धोरण 2016 अंतर्गत महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करून राज्यात साहसी पर्यटन उपक्रम धोरणास मान्यता देण्यात आली आहे.

ऐतिहासिक वास्तूंचे प्रकाश प्रदीपन

मुंबई शहरात पर्यटकांचे आकर्षण असणार्‍या उच्च न्यायालय, जुने सचिवालय, मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्ट, उच्च न्यायालय परिसरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालय, पोलीस मुख्यालय, पदवीदान सभागृह, एल्फिन्स्टन महाविद्यालय, एल्फिन्स्टन तंत्र संस्था, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, पश्चिम रेल्वे मुख्यालय, गेटवे ऑफ इंडिया, जनरल पोस्ट ऑफिस या 13 प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंचे प्रकाश प्रदीपन करण्यात येणार आहे.

शब्दांकन :ब्रिजकिशोर झंवर,

विभागीय संपर्क अधिकारी

महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

पुणे, दि. १४ जानेवारी २०२२: थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन आरोपीविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत नवी पेठ शाखा कार्यालयाचे कर्मचारी सफल शांताराम आताग्रे हे सहकारी सुनील संतोष कोळी यांच्यासमेवत शुक्रवारी (दि. १३) पीएमसी कॉलनी, साने गुरुजी वसाहत, आंबिल ओढा येथे वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत होते. दुपारी १२.३० च्या सुमारास तीन थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर हे दोन्ही कर्मचारी व्ही. के. जाधव नामक थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. तेथे एका महिलेने फोन लावल्यानंतर आलेल्या धनजंय जाधवने ‘मला ओळखत नाही का, मी माजी नगरसेवक आहे. तू कोणाच्या दारात आला आहे’, असे म्हणत व शिवीगाळ करीत एका अनोळखी इसमाच्या साथीने कर्मचारी सफल आताग्रे यांच्या पोटावर व डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शासकीय गणवेश फाडून टाकला. दुसरे कर्मचारी सुनील कोळी यांनी आताग्रे यांना दोघांच्या तावडीतून सोडवले व प्रकाराची वरिष्ठांना माहिती दिली. त्या ठिकाणी नवीपेठ व पेशवेपार्क कार्यालयातील अधिकारी गेल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 

या प्रकरणी धनजंय जाधव व एक अनोळखी इसम विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास सुरु आहे.

राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन

0

मुंबई दि, 14 : 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत.

या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी उद्या दि. १५ जानेवारी, २०२२ पर्यंत कला संचालनालयाच्या http://doaonline.in/doakalapradarshan/public/home  या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन कला संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

केरळ सफरनामा… भाग १

0

मस्त झाली ना आपली केरळ ट्रिप!…मुंबई एअरपोर्टवर आम्हा सगळ्यांच्या तोंडी हे एकच वाक्य होते आणि चेहऱ्यावर सगळे नीट पार पडल्याचे समाधान.

ट्रिपचे प्लॅनिंग करायला सुरुवात केल्यापासून गेले काही महिने आमची केरळ ट्रिप गाजत होती. कुठेतरी जाऊया आता, कंटाळा आला आहे आणि महिंद्रा क्लबचे दिवसही फुकट जातील – आमच्यात आणि भावना मावशीच्या कुटुंबात चर्चा सुरू झाली. मग नोव्हेंबर – डिसेंबर म्हटलं की कुठे कुठे जाता येईल…जास्त थंड हवेची ठिकाणे नको…आणि त्यात उत्तराखंड भागात दरड कोसळण्याच्या बातम्या अधूनमधून पेपरमध्ये येतच होत्या. शेवटी एकमताने केरळ डेस्टिनेशन फिक्स करून टाकले. २२ वर्षांपूर्वी आम्ही आणि भावना मावशीच्या फॅमिलीने एकत्र केरळ ट्रिप केली होती. आता पुन्हा केरळला जाण्याचा योग जुळून आला होता. महिंद्रा क्लबचे रिसॉर्ट ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी रूम उपलब्ध आहेत का त्यावर केरळ टूरचे प्लॅनिंग होणार होते. गुरुवायूर ते पूवर आयलँड असे साधारण ठरले. सध्या अजूनही करोनाचे सावट आहे, ट्रेनची तिकीटं सहज मिळतील, अशा भ्रमात तिकीट बुक करायला जरा उशिराच गेलो तर काय नेत्रावतीला ४०० वेटिंग होते. अरे बापरे! एवढे वेटींग कसे काय ? पद्मावती टूर्स अँड ट्रॅव्हलच्या बुकिंग क्लार्कला प्रश्न विचारताच ती उत्तरली, ‘मॅडम आता सगळे फिरायला बाहेर पडलेत. हीच ट्रेन काय गुजरातच्या ट्रेन पण फुल्ल आहेत.’ आम्ही जाणार त्या ठिकाणी कुठल्या ट्रेन आहेत? किती वाजता पोहोचतात? याची जवळपास यादी घेऊनच मी आणि ओमकार घरी परतलो.

कामाच्या गडबडीत परत बुकींगचे मागे पडले. तोपर्यंत ठरवलेल्या ठिकाणी महिंद्रा क्लबची रिसॉर्ट आहेत का आणि असतील तर ती उपलब्ध आहेत का ते बघून त्याचे बुकिंग करून ठेवले. पुन्हा डोळ्यांसमोर प्रश्न होताच की नेत्रावतीचे बुकिंग मिळत नाही. (नेत्रावतीच फक्त केरळला कमी तासात पोहोचणारी ट्रेन आहे त्यामुळे आम्ही प्राधान्य तिला दिले.) परत एकदा एकत्र मीटिंग ठरली. जवळजवळ केरळला जाणाऱ्या सगळ्या ट्रेन बघून झाल्या. एक तर वेटिंग लिस्ट किंवा ट्रेनचे वेळापत्रक जुळत नव्हते. एसी टू टायर आणि फ्लाईटचे तिकीट किंबहुना सारखेच, बघायला गेलं तर थोडे स्वस्तच होते. ट्रेनने गेलो तर निसर्गसौंदर्य बघता येतं म्हणून ट्रेनने जाण्याचा हट्ट होता. तो अट्टाहास सोडून शेवटी एकमताने फ्लाईटने जायचे ठरले आणि लगेच बुकिंगसुद्धा करून टाकले. नाहीतर तेही नशिबात नसायचे.

कोचीन-गुरुवायूर-मुन्नार-अल्लेप्पी- पूवर आयलँड असा प्रवासी मार्ग निश्चित करून महिंद्रा क्लबचे बुकिंग झालेच होते. आता त्या त्या ठिकाणी जाताना काय काय बघता येईल याचा अभ्यास करायला लागलो. रोज रात्री यु ट्यूबवर केरळचा अध्याय सुरू झाला. फक्त प्रेक्षणीय स्थळच नाहीत तर मंदिर आणि खवय्येगिरीसाठी काय काय कुठे मिळते याची एक यादीच बनवली. त्यात ओमकारची नुकतीच केरळच्या नवीनशी ओळख झाली होती. मग काय त्याचा पिच्छा पुरवला. त्यानेही घरी येऊन केरळमधील आडवाटेवरील काही बघण्यासारखी ठिकाणे होती ती सुचवली. घरातील वातावरण काही महिने केरळमयच झाले होते. तिकडे ८ दिवस फिरण्यासाठी नवीनच्या ओळखीने टेम्पो ट्रॅव्हलरचे बुकींग करून झाले. गुरुवायूरला महिंद्रा क्लबचे रिसॉर्ट नसल्याकारणाने हॉटेल सोपानमचे बुकिंग केले गेले. करोना काळात देऊळदर्शनाच्या बदललेल्या वेळेबद्दलही विचारून झाले. सोपानम हॉटेलच्या मॅनेजर माणिकांथा यांनी यासाठी आम्हाला फोन करून पुरेशी माहिती दिली.    

निघण्याचे दिवस जवळ येत होते तशी खरेदी, बॅग भरणे इत्यादी तयारी सुरू झाली. त्यात केरळमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आणि काही ठिकाणी पूर आल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या. अरे बापरे! आता काय करायचे, सगळे बुकिंग तर झाले आहे. आता शेवटच्या क्षणाला कॅन्सल करायला लागते की काय अशी परिस्थिती होती. केरळमधील एकदोन मित्रांना फोन करून पावसाचा अंदाज घेतला. माणिकांथा यांना फोन केला तर ते म्हणाले की, थोडा पाऊस आहे पण त्रिशूरला काही पूर वगैरे आलेला नाही. हे मीडियावाले केरळला कुठल्याही भागात पाणी जास्त झाले तरी ‘केरळमध्ये पूर परिस्थिती’ असं जाहीरच करून टाकतात. पाऊस असल्याने बॅगांमध्ये आता बाकीच्या सामानाबरोबर छत्रीचीही वर्णी लागली.

आता आणखीन एक नवीन संकट आले की सगळ्यांचे दोन्ही डोस झाले आहेत की नाही. त्याची कागदपत्रे तर हवीच आहेत पण त्याच बरोबर जाग्रता  या वेबसाईटवर जाऊन विझिटर पास घेणे ही तितकेच आवश्यक आहे. त्याशिवाय तिकडे टुरिस्टना फिरायला परवानगी नाही. सगळ्यांचे दोन डोस झालेच होते फक्त तेजीलच्या वयोगटाला (वय वर्ष १५) लसीकरण सुरू झाले नसल्याने त्याची आरटीपीसीआर टेस्ट करायला लागणार होती. जाग्रता या वेबसाईटवरून टुरिस्ट पासही काढून झाला. सामानाबरोबर या सर्व कागदपत्रांचे एक एक पाकीट सगळ्यांकडे देण्यात आले. 

जवळपास आता सगळं फायनल पॅकिंग झालंच होतं आणि जाण्याचा दिवस उजाडला… (क्रमशः )

– पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

१४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा; साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद

0

मुंबई, दि. 13 : राज्य शासनाच्या वतीने दि. 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत भाषा संचालनालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मी का लिहितो? या विषयावरील मान्यवरांच्या व्याख्यानासह कवी संमेलन, शालेय विद्यार्थी  आणि वाचन, भाषा आणि जीवन  यासह इतर विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांपैकी काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.

भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा – 2022 दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.    

दि. 14 जानेवारी

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा लेखकांशी  संवाद हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी हे आहेत. या कार्यक्रमात  श्री.प्रणव सखदेव (कथाकार), श्रीमती सोनाली नवांगुळ (अनुवादक), रवी कोरडे (कवी), संजय वाघ, बाल साहित्यिक, सहभागी होणार आहेत या परिसंवादाच्या  अध्यक्षस्थानी भाषा संचालक श्रीमती विजया डोनीकर या असतील, प्रास्ताविक  नामदेव कोळी, आणि सूत्रसंचालन -डॉ.महादेव डिसले करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 ते दु.1 या दरम्यान होणार आहे.

दि. 17 जानेवारी

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात मराठी तरुण कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष  महेश दत्तात्रय लोंढे  असतील. यात कवी अनिल साबळे, पवन नालट, प्रशांत केंदळे, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, प्रदीप कोकरे, वृषाली विनायक, अक्षय शिंपी, कमलेश महाले कुमार सहभागी होणार आहेत.  सूत्रसंचालन नामदेव कोळी, आभार प्रकटन भारत जाधव करतील.

दि. 18 जानेवारी

आभासी परिसंवाद- मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल का? याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे आयोजक वाडिया महाविद्यालय, पुणे हे आहेत. या परिसंवादात वक्ते – अच्युत गोडबोले, दिनकर गांगल, अनिल गोरे, विवेक सावंत, अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, सूत्रसंचालन – प्रा.मनोहर सानप, प्रास्ताविक – भारत जाधव करणार आहेत.

दि. 19 जानेवारी

आभासी व्याख्यान – मी काय वाचतो? या विषयावर  वक्ते  नितीन वैद्य, सोलापूर, हे व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचे आयोजक – भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण हे आहेत. अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक : डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन :- डॉ.मनीषा पाटील करणार आहेत.

दि. 20 जानेवारी

आभासी व्याख्यान- प्रशासनात मराठी भाषेचे उपयोजन वक्ते – विजया डोनीकर, भाषा संचालक, आयोजक – संत गोन्साल्वो महाविद्यालय, वसई, अध्यक्ष : सोमनाथ विभुते, प्राचार्य, प्रास्ताविक- संतोष गोसावी

दि. 21 जानेवारी

आभासी चर्चासत्र-  शालेख विद्यार्थी आणि वाचन संस्कृती, आयोजक श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. सहभाग – दीपा देशमुख, पुणे, सुरेश सावंत, नांदेड, नामदेव माळी, सांगली, रमेश पानसे, अध्यक्ष -विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक -डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन – प्रा.राजश्री कुलकर्णी

दि. 24 जानेवारी

व्याख्यान -मुखी माझ्या रमो माय मराठी, प्राचार्य डॉ. महेशचंद्र जोशी, चेतना महाविद्यालय, वांद्रे आयोजक. अध्यक्ष- श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद गांगण. आभार प्रकटन भारत जाधव

दि. 25 जानेवारी

व्याख्यान- भाषा आणि जीवन. वक्ते -डॉ. संतोष बोराडे, स्थळ- महात्मा गांधी विद्यालय, वांद्रे (पूर्व), अध्यक्ष -श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद गांगण, आभार प्रकटन -संतोष गोसावी

दि. 27 जानेवारी

आभासी चर्चासत्र (फेसबुक लाईव्ह) मराठी विद्यापीठ कसे असावे ? आयोजक -विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभूर्णी जि. सोलापूर. वक्ते : लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. रणधीर शिंदे,  श्रीपाद भालचंद्र जोशी,  डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (अध्यक्ष), संवादक – डॉ. महेंद्र कदम, अध्यक्ष : श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक – भारत जाधव

दि. 28 जानेवारी

समारोप

साहित्य अभिवाचनाने समारोप होणार आहे. यात भाषा संचालनालय येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. अध्यक्ष -श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक संतोष गोसावी करतील असे भाषा संचालक यांनी कळविले आहे.

केंद्र सरकारकडे अधिक लस पुरवठ्याची मागणी – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 13 : कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोव्हीशिल्ड 50 लाख आणि कोव्हॅक्सिनच्या 40 लाख  लसींच्या मात्रांचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड स्थितीबाबत आढावा घेतला.

बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, केंद्र सरकारने स्टँडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉलबाबत राज्यांना कळवावे. होम किटद्वारे टेस्टींग केल्यानंतर बाधित असलेल्या रुग्णांची कुठेही नोंद होत नाही. या नोंदी ठेवण्यासाठी ज्या मेडिकल दुकानातून या किट खरेदी केल्या आहेत त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या नोंदीसाठी यंत्रणा उभी करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे ठरवावी. राज्यातील निर्बंधाबाबत केंद्र सरकारने विशेष कार्यपद्धती ठरवावी, असे श्री.टोपे यांनी सांगितले.

लसीकरण मोहीम राबविताना राज्यात पहिली मात्रा 90 टक्के, दुसरी मात्रा 62 टक्के तसेच 15 ते 18 किशोरवयीन मुलांचे 36 टक्के लसीकरण झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना द्यावयाच्या प्रतिबंधात्मक मात्रांचे लसीकरण सुरु केले असून लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी लसीकरण मोहिमेला आणखी गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेबाबत दिलेल्या सूचनेची दखल घेत राज्यातील अर्थव्यवस्थेची गती कायम राहील याची दक्षता घेऊन उपाययोजना करण्यात येतील. तसेच आपत्कालीन कोविड प्रतिसाद पॅकेज (ECRP-II) अंतर्गत मनुष्यबळासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. हा निधी 100 टक्के खर्च करण्यात येईल. या पॅकेजद्वारे राज्यांना मिळालेल्या निधीचा खर्च अधिक गतीने करण्यासाठी द्रव्य वैद्यकीय ऑक्सिजन (Liquid Medical Oxygen), ऑक्सिजन पाईपलाईनसाठी केंद्र सरकारने ठरविलेल्या दरात तफावत असल्याने वाढीव खर्चाला मान्यता देण्यात यावी, असेही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी सांगितले.

महापालिका प्रभाग रचनेचा आराखडा सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात पोलिसात राष्ट्रवादीची तक्रार

0

पुणे -महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा सोशल मिडीयावर दाखल करून अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई साठी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .

याबाबत ते म्हणाले कि,’ महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आम्हाला माध्यमांमधून व पुणे महापालिकेच्या वर्तुळातून समजते, असे असताना काही राजकीय मंडळी जाणीवपूर्वक सदर प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतात. किंबहुना त्यामध्ये अफवा पसरविण्याच्या प्रयत्न करत असतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात पुणे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. असे असताना सायंकाळपासून समाज माध्यमांमध्ये पुणे शहराची संभाव्य प्रभाग रचना म्हणून एक आराखडा व्हायरल होत आहे. अशा प्रकारच्या व्हायरल प्रभाग यादी रचनेचा आराखडा विविध ग्रुप व्हाट्सअप ग्रुप वर आम्हाला सुध्दा पाहायला मिळाला. ही घटना महानगरपालिकेच्या अंतर्गत कामकाजाच्या गोपनीयतेचा भंग आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणूनच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यामागे कुठली व्यक्ती अथवा संघटना आहे हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून या संदर्भामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे पुणे सायबर पोलिसांकडे आम्ही आज सायंकाळी तक्रार दाखल केली असून हा नकाशा कुणाच्या माध्यमातून तयार करण्यात आला, तसेच हा नकाशा कोणी समाज माध्यमांवर व्हायरल केला यासंबंधी व्यक्ती व संघटना यांचा कसून शोध घ्यावा अशी मागणी आम्ही पुणे सायबर पोलिसांकडे केली आहे. पुणे सायबर पोलिस या गोष्टीचा सखोल तपास करतील व संबंधित आरोपीस वर कारवाई करतील,असा आम्हाला विश्वास आहे.

एमआयटी डब्ल्यूपीयूचा ६ संस्थांबरोबर सामंजस्य करार

0

पुणे, दि.१३ जानेवारी: शाश्‍वत विकासाचे उद्दिष्टये लक्षात ठेवून विद्यार्थी आणि व्यावसायिकांची क्षमता विकसित करण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सस्टेनेबल स्टडीज विभागतर्फे शाश्‍वत इकोसिस्टम तयार करण्यासाठी ६ संस्थांबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या करारावर यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या फॅकल्टी ऑफ सस्टेनेबल स्टडिज प्रमुख डॉ. विलास बालगावकर आणि  ट्री पब्लिक फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक कविटकर, एएनएस इकों कन्सल्टन्सी प्रा.लि.चे संचालक अभय बाचुका, बी बास्केटचे अध्यक्ष अमित गोडसे, अर्थवाईज अ‍ॅडव्हायझरीचे सह संस्थापक इशान कामत, कानजो कन्सल्टन्टचे संचालक डॉ. यशोधन जोशी, हुमे सेंटर फॉर इकॉलॉजी अ‍ॅण्ड वाईल्ड लाईफ बॉयोलॉजीचे कार्यकारी संचालक सी.के. विष्णूदास यांनी स्वाक्षरी केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली हे करार करण्यात आले.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. भानुदास कुचेकर हे उपस्थित होते.
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि नवनर्मितीचे वातावरण निर्माण करणे हे या करारातून अपेक्षित आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,“ नवनिर्मितीच्या संकल्पनांना उजाळा देण्यासाठी माइंड टू मार्केट या वर आधारित तसेच, स्टार्टअप नंतर ही एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी त्यांना मदत करेल. नव भारत निर्माण करण्यासाठी हे विद्यापीठ कार्य करीत आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थी नोकरी मागणारे नाही तर देणारे होतील.”
डॉ. विलास बालगावकर म्हणाले, “ युनाइटेड नेशन्सने शाश्‍वत विकासाची १७ उद्दिष्टये जाहिर केली आहेत. ते साध्य करण्याच्या दृष्टीने भावी संशोधनाची गरज भासते. विद्यार्थ्यांना फिल्ड स्टडी व प्रात्यक्षिकतेचा अनुभव व त्यांच्या करियरच्या विविध संधी उपलब्ध होतील. यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंध स्थापित होईल. पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्था सुधारणे हे या करारांचे मुुख्य उद्दिष्ट्य आहेत.”
अमित गोडसे म्हणाले, “शेतकरी आणि दुर्बल घटकांनी मधमाशी पालनापासून केलेल्या उत्पदानांना सध्या योग्य अशी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे त्यांना योग्य असा मोबदला मिळत नाही. त्यामध्ये विद्यार्थी, प्र्राध्यापकांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना संगठीत करुन त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. व त्यातून त्यांना त्या उत्पादनाचा योग्य तो मोबदला मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. ”
अभिषेक कविटकर म्हणाले, “शहरी व ग्रामीण भागात होत असलेल्या पर्यावरणाचा र्‍हास कमी करण्यासाठी जैवविविधता टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश ग्रामीण भागात व शहरी भागात रुजविणे आवश्यक आहे. त्यासाठी या विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात संशोधन करुन लोक जागृती केली जाईल. यातून समाजाला व निर्सगाला ही फायदा होईल.”

महाराष्ट्राचा ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराने सन्मान

0

‘गुणवत्ता सुधार’ वर्गवारीत महावितरणचा तृतीय क्रमांक

मुंबई, दि. १३ जानेवारी २०२२ : नवनवीन संकल्पनांचा प्रभावी वापर, महावितरणच्या ग्राहकांना उच्चदर्जाची सेवा मिळावी व त्याकरिता आधुनिक  तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून  वीजहानी कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न करणे या निकषांवर महाराष्ट्राची ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराकरिता प्रथम क्रमांकाने तर ‘गुणवत्ता सुधार’ या वर्गवारीत महावितरणची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

१५ व्या इंडिया एनर्जी समिटमध्ये देशभरातील २९ वीज वितरण कंपन्यांनमधून विविध निकषांच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले. आज ऑनलाईन संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या वतीने संचालक(प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

इंडियन चेबर ऑफ कॉमर्सच्यावतीने आज दि.१० व ११ जानेवारी असे दोन दिवस या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारताचे माजी मुख्य ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्काराची  निवड केली. राज्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता महावितरण ही अत्यंत कठीण परिस्थितीतही चांगले काम करत असल्याचे गौरव उद्गार अनिल राजदान यांनी काढले.

महावितरणला हा सन्मान म्हणजे अधिकारी-कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्ना चे फलित आहे. ग्राहकसेवेचे हे व्रत असेच जोपासत त्यात गुणात्मक वाढ करण्याचा मानस यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्कारकाच्या निमित्ताने व्यक्त केला.

महावितरणने राज्यात गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधा व वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात यशस्वी ठरली आहे. महावितरणने आपल्या दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविला असून यामुळे ग्राहकांना वीजबिल भरणे, नवीन वीजजोडणी घेणे, मीटर रीडिंग पाठवणे, तक्रार नोंदणी करणे अशा अनेक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. ईआरपी प्रणालीमुळे महावितरणच्या कामात अधिक पारदर्शकता व गतिशीलता आली आहे. येत्या काही वर्षात महावितरणकडून स्मार्ट मीटरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

मांजरेकरांच्या सिनेमाला पुण्यातून मिळाला फटका : आक्षेपार्ह दृश्ये वगळून दिलगिरी केली व्यक्त

0

पुणे राष्ट्रीय महिला आयोगाने ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ सिनेमाच्या ट्रेलरमधील आक्षेपार्ह दृश्यांबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आता ट्रेलरमधून ‘ती’ दृश्य वगळल्याचं स्पष्ट करून माघार घेऊन माफी मागितली आहे .भाजपाचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी या ट्रेलर पाहून त्यावरील दृश्ये आणि भाषा यांवर आक्षेप घेत महिलांची अवहेलना कराल तर खबरदार असा इशारा दिला होता आणि याबाबत राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती .

बुधवारी (12 जानेवारी) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सिनेमाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिलं होतं. सिनेमातील काही लैंगिक दृश्य सेंसॉर करण्याचं त्यांनी सुचवलं होतं.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही , “महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला. असून हे दृश्य या चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची या निर्मितीमागची संकल्पना,कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविले आहे. “

महेश मांजरेकर यांनी याबाबत आपलं सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

“समाजात उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखत आम्ही ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या सिनेमाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी दृश्य काढून टाकली आहेत. जुना प्रोमो सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला आहे. सुधारित प्रोमो सर्वांना पाठवण्यात येत आहे,” असं महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे.दिवंगत ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. येत्या 14 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘प्रोमोमधूनच नव्हे तर चित्रपटातूनही ती दृश्य काढली आहेत’

आपल्या निवेदनात ते म्हणतात, ‘जुना प्रोमो काढून टाकून नवीन प्रोमो प्रकाशित करण्याच्या सूचना संबंधित माध्यमांना देण्यात आल्या आहेत. सिनेमाच्या निर्मितीसंस्थेपासून, लेखक, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ आम्ही सर्व जण तमाम स्त्रियांचा मनापासून आदर करतो. या चित्रपटाच्या माध्यमातून कोणताही चुकीचा संदेश पोहचवण्याचा आमचा हेतू नव्हता.”प्रोमोमधील काही दृश्यांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आक्षेपार्ह वाटणारी दृश्य केवळ प्रोमोमधून नव्हे तर चित्रपटातूनही वगळण्यात आली आहेत,’ असंही पुढे त्यांनी स्पष्ट केलं.

सेन्सॉरने या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र दिलं असलं तरी आक्षेपार्ह आणि भविष्यात ज्याचा त्रास होईल अशी वाटणारी दृश्य सुद्धा काढून टाकली आहेत, अशी माहितीही महेश मांजरेकर यांनी आपल्या निवेदनातून दिलं. तसंच हा चित्रपट प्रौढांसाठी असणार आहे, असं आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत असंही ते म्हणाले.प्रेक्षकांनी पूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर त्यांचा अभिप्राय कळवावा, अशी अपेक्षा मांजरेकरांनी या निवेदनाच्या शेवटी व्यक्त केली आहे. “मुंबईत तीन दशकांपूर्वी उद्भवलेली परिस्थिती आणि त्यातील दाहकता दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे केला आहे. तरीही काही गोष्टी काहींना सहन करणे किंवा बघणे चुकीचे वाटत असेल, त्यांच्यासाठी ही दृश्यं सिनेमातूनही पूर्णपणे काढण्यात आली आहेत. नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या माध्यमातून एक वास्तववादी सिनेमा आपल्या भेटीला आणला आहे. १८ वर्षांवरील प्रत्येकानं सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा. सिनेमा पूर्ण पाहिल्यावर आपला अभिप्राय कळवावा”, असं यात म्हटलं आहे.

महिला आयोगाने पत्रात नेमकं काय म्हटलंय?

10 जानेवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात काही आक्षेपार्ह दृश्य असून हा ट्रेलर इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसून येत आहे.या पत्राची एक प्रत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनाही पाठवण्यात आली आहे.महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे.यापूर्वी महेश मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबर 2020 रोजी महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीच्या दिवशीच, नथुराम गोडसेवर चित्रपट तयार करण्याची घोषणा केली. यावरूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त भागाची पाहणी; मृताच्या कुटुंबियास चार लाख देण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची घोषणा

0

नागपूर,दि. 13 : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. आज या भागाची पाहणी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गावास प्रथम भेट देऊन नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या हेमंत रोशन निवते यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे आस्थापूर्वक विचारपूस करुन सांत्वन केले. मृत मुलगा दुग्ध वाटपाचे काम करत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियास पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून गाय व म्हसी देण्यासोबत सानुग्रह अनुदान म्हणून चार लाख रुपये देण्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली. शासकीय योजनेतून गुरांचा गोठा मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी दिल्या. त्यासोबत पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आकस्मित निसर्गाचा कोपामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यशासनातर्फे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. राज्य शासनातर्फे मदतीचा हात नक्कीच मिळेल. सर्वे करतांना शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने नुकसान झाले आहे,त्यांना मदत करा. त्यासोबत ग्रामीण भागातील गरीब व झोपडीपटीतील लोकांचेही नुकसान झाले आहे. त्याचाही  सर्वे करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, व ग्रामपंचाय सदस्यांनी या कामात शासकीय यंत्रणेला सर्वे करण्यासाठी सहकार्य करावे. लोकप्रतिनीधी व शासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे,  असे आवाहन त्यांनी केले.

या दौऱ्यात त्यांनी  नागपूर तालुक्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमथी, लोणखैरी, सावनेर तालुक्यातील दहेगाव(रं), पारशिवणी तालुक्यातील  इटगांव, भागीमहारी, रामटेक तालुक्यातील जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या गावातील अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे हानी झालेल्या शेतांची पाहणी केली.

जिल्ह्यात जवळपास 7 हजार 431 हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस,गहू,हरभरा, तूर,उ्न्हा ळी भुईमुग, भाजीपाला व संत्रा व टमाटर या फळपिकांचे नुकसान झाले आहे. 8 हजार 334 खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे.

या भागाचे पंचनामे तात्काळ करण्यात येणार असून त्याची नुकसानभरपाई आपतग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल, असे सांगून  शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठिशी अशी ग्वाही  श्री. केदार यांनी दिली.

या दौऱ्यात त्यांचेसमवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जि.प.  सदस्य कुंदा राऊत, प्रकाश खापरे, राजु कुसुबे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश  भोयर तसेच पंचायत समितीचे सभापती, सदस्य, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

समाविष्ट गावांत महापौरांनी केले ३५० कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन ,म्हणाले ४ वर्षात पूर्ण करेल

0

पुणे (प्रतिनिधी)
‘समाविष्ट गावांना मुलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुणे महापालिका कटिबद्ध असून त्यातीलच महत्त्वाचा भाग असणाऱ्या मल:निसारण व्यवस्थेचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत समाविष्ट ११ गावांसाठी मैला वाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प साकारण्यात येत असून समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा सक्षमपणे उभ्या करण्यास महापालिकेचे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

महापौर मोहोळ यांच्या हस्ते नऱ्हे येथे ३५० कोटींच्या मलवाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी महापौर मोहोळ बोलत होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, खडकवासल्याचे आमदार श्री. भीमरावअण्णा लतापकीर, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या अश्विनी पोकळे, गणेश ढोरे, हरिदास चरवड, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महापौर मोहोळ पुढे बोलताना म्हणाले, ‘समाविष्ट ११ गावांमध्ये शिवणे, संपूर्ण उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, उंड्री, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), लोहगाव आदी गावांचा समावेश असून मल:निसारण व्यवस्थेचा मास्टर प्लॅन या सर्व गावांसाठी महत्त्वाचा भाग ठरणार आहे’

‘समाविष्ट गावांसाठीची ही कामे ४ वर्षात राबवण्याचे नियोजन केले असून या अंतर्गत ११ गावांमध्ये १८२ किलोमीटर लांबीची मलवाहिनी विकसित करण्यात येत आहे. तसेच मुंढवा येथे १२ एमएलडी क्षमतेचा आणि मांजरी बुद्रुक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेचा असे दोन मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहेत. यात मांजरी प्रकल्पास देवाची उरुळी, उंड्री, फुरसुंगी, मांजरी तर मुंढवा प्रकल्पास केशवनगर, साडेसतरा नळी, हडपसर (उर्वरित) हा भाग जोडला जाणार आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

‘समाविष्ट गावांचा विकास करताना तो नियोजनबद्ध आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊनच करत आहोत. म्हणूनच मलनिसरण व्यवस्थेचा आधी मास्टर प्लॅन तयार केला गेला आहे. सदरील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचेदेखील नियोजन केले आहे. या मास्टर प्लॅनमधील कामांना ‘७२ ब’ अंतर्गत मान्यताही दिली आहे, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.