Home Blog Page 2124

बोर्डाची 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा, लवकरच जारी होणार वेळापत्रक

0

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, MSBSHSE 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार आयोजित करेल. बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली. कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बोर्डाने परीक्षा पुढे न ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांत बाधितांच्या संख्येत घट झाली आहे.

या घोषणेनंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. याशिवाय शाळांना वेळापत्रकानुसार तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेता येतील, मात्र बोर्डाच्या परीक्षा नियोजित तारखांनाच होतील.

4 मार्चपासून परीक्षा सुरू होणार आहेत
महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षा 4 मार्च 2022 पासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर 10वीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी इयत्ता 10वी, 12वीच्या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले होते. यावर्षी सुमारे 32 लाख विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2022 मध्ये बसणार आहेत.

‘टारझन’ अभिनेते हेमंत बिर्जेना एक्स्प्रेस वेवर अपघात …

0

पुणे-‘टारझन’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते हेमंत बिर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा रात्री उशिरा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्यावर अनेकवेळा पलटी झाली. यामध्ये हेमंत आणि त्यांची मुलगी रेश्मा जखमी झाले आहेत. हेमंत हे मुंबईहून पुण्याला जात होते.

नवी मुंबईजवळील उर्से गावात हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी हेमंत यांच्या सोबत आमना आणि मुलगी रेश्मा याही कारमध्ये होत्या. हेमंत गाडी चालवत होते. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी लेन काही काळ बंद करण्यात आली होती. महामार्ग पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठून वाहन बाजूला करून सर्व जखमींना रुग्णालयात नेले.हेमंत बिरजे यांनी सांगितल्यानुसार, “ते मुंबईहून पुण्याला निघाले होते. तिथे आमचं घर असून तिथे राहण्यासाठी चालला होते. तिकडे जाऊन आराम करण्याचा विचार होता”.

 सेक्युरिटी गार्ड ते थेट सुपरस्टार; किमी काटकरसोबतच्या इंटिमेट सीन्समुळे रातोरात प्रसिद्धी

हेमंत हे मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. मग एके दिवशी दिग्दर्शक बब्बर सुभाष यांची त्याच्यावर नजर पडली. सुभाष आपल्या चित्रपटात असा हिरो शोधत होते, मग तो दिसायला मजबूत असावा आणि सोबत लाजरा देखील. त्यांच्या चित्रपटाच्या नायकासाठी आवश्यक असलेले सर्व गुण दिग्दर्शकाने हेमंतमध्ये पाहिले. त्यांनी चित्रपटाची ऑफर दिली आणि हेमंत यांनी घाईघाईने होकार दिला. 55 वर्षीय हेमंत यांनी किमी काटकरसोबत ‘टार्जन’ चित्रपटातून पदार्पण केले. किमीचे बॉलिवूड करिअर चांगले होते. त्यांनी अनेक हिट चित्रपट आणि सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली. पण हेमंत यांना त्यांच्या कारकिर्दीत फारसे काम मिळाले नाही.हेमंत यांनी मिथुन चक्रवर्तींसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ते सलमान खानच्या गर्व या चित्रपटातही दिसले होते. मात्र, त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारशी पसंती मिळाली नाही. त्यानंतर एक वेळ अशी आली की त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यानंतर अचानक हेमंत बॉलिवूड इंडस्ट्रीतून गायब झाले.

राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतच असणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला निर्णय

0

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ५०० चौ.फूट पर्यंतच्या निवासी मालमत्तांना मालमत्ता करातून सुट

मुंबई-राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेविषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दुकानाच्या पाट्या आता मराठीमध्येच दिसणार आहेत.मराठीत असणाऱ्या पाट्या या मोठ्या अक्षरात असणे बंधनकारक असणार आहे. दुकानात एक जरी व्यक्ती काम करत असली तरी दुकानावर मराठी भाषेतील पाटीचा नियम अनिवार्य असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी याविषयी माहिती दिली आहे.

यापूर्वी देखील दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्या असाच राज्य सरकारचा नियम होता. मात्र याची अमलबजावीन केली जात नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरांमध्ये नाव होते. तर मराठीतील नावे ही लहान अक्षरांमध्ये ठेवली जात होती. आज घेतलेल्या निर्णयानंतर मराठी नावे ही मोठ्या अक्षरात असणे अनिवार्य असणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर मंत्रिमंडळाचा बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना आणि दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळले होते. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. तसेच त्यावर उपाययोजना करण्याचीदेखील मागणी होत होती. अखेर मंत्रीमंडळाने आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेत पळवाट बंद केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्या देखील आता मराठीत कराव्या लागणार आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जानेवारी, २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार ४६.४५ चौ.मी. (५०० चौ. फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते.
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार आता या निर्णयाची १ जानेवारी २०२२ पासून अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील १६.१४ लाख निवासी मालमतांना या संपूर्ण कर सवलतीचा लाभ मिळणार आहे. या सवलतीमुळे महापालिकेच्या कर महसुलात सुमारे ४१७ कोटी आणि राज्य शासनाच्या महसुलात सुमारे ४५ कोटी असा एकूण ४६२ कोटींचा महसूल कमी होणार आहे.

कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी

कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वार्षिक करातून 100 टक्के कर माफ करण्यात येईल.

मात्र ज्या स्कूल बस प्रकारातल्या वाहनांनी वरील कालावधीसाठीचा कर भरला असेल तर अशा कराचे महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम 1998 मधील कलम 9 (4 अ) नुसार आगामी काळात समायोजन करण्यात येईल.

पुणे, नागपूर, अकोला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे भरणार

सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेंतर्गत नागपूर, पुणे तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्याच्या उपलब्ध मनुष्यबळात वाढ करून 9 अध्यापकीय पदांची निर्मिती करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

त्यानुसार वै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला या तीन संस्थांकरिता १ प्राध्यापक, ३ सहयोगी प्राध्यापक व ५ सहायक प्राध्यापक अशी एकूण ९ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांसाठी वार्षिक रु.१.७५,१०,६५२/- (रु. एक कोटी पंच्चाहत्तर लाख दहा हजार सहाशे बावन्न फक्त ) खर्च होईल. तसेच सद्याच्या एकूण २७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त ५९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची वाढ होईल.

महिला व बाल सशक्तीकरणासाठी जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजनात 3 टक्के निधी

जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक सर्वसाधारण योजनेत महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी कायमस्वरूपी 3 टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

जिल्हा नियोजन समित्यांना नियोजन विभागाकडून कायमस्वरुपी मिळणाऱ्या निधीतून किमान 3 टक्के म्हणजेच दरवर्षी सुमारे 450 कोटी रुपये इतका निधी महिला व बाल विकास विभागास मिळणार आहे. महिला व बाल सशक्तीकरण ही सर्वसमावेशक (Umbrella Scheme) योजना महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येते. महिला व बालकांचे सक्षमीकरण करताना महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हयांत महिला व बाल भवनाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय यात “त्रिस्तंभ धोरण” म्हणजेच उपयोजना “अ”, “ब” व “क” या पुढील प्रमाणे राबविण्यात येतील.
जिल्हा स्तरावरील महिला व बाल भवनांच्या बांधकामासह महिला सबलीकरण व बालकांचा विकास यांच्याशी संबंधीत बाबी तसेच जिल्हा स्तरावर / मोठया धार्मिक स्थळांच्या ठिकाणी शासकीय भिक्षेकरी गृहांचे बांधकाम, दुरुस्ती करणे इत्यादी बाबींसह अन्य महिला व बाल विकास विभागाशी संबंधीत अन्य इमारती/योजनांचा विकास करण्यात येईल.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासकीय जागेवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जागेवर महिला बचतगट भवनाचे बांधकाम करणे. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकरीता प्रत्येक जिल्हयाकरीता एक अशी 36 वाहने उपलब्ध करुन देणे. महिला बचत गटांच्या उत्पादक वस्तुला सुलभ प्रकारे विक्री होण्याकरीता राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच मुख्य जिल्हा मार्गाला लागून शासकीय जागेत / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेत लहान स्टॉल बांधकाम करण्यात येईल.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेत अंगणवाडी केंद्रांचे नवीन बांधकाम, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, स्वयंपाकघरांचे आधुनिकीकरण, इमारतीचे विस्तारीकरण, इमारतींची विशेष दुरुस्ती करणे, मातांच्या स्वतंत्र प्रतिक्षागृहाचे बांधकाम, संरक्षक भिंत, वाढ संनियंत्रण संयंत्रांचा पुरवठा व देखभालीसाठी खर्च इत्यादी बाबींचा समावेश आहे.
या घटकांअंतर्गत राज्यातील निराधार, निराश्रीत, अनाथ, अनैतिक संकटात सापडलेल्या, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला तसेच अनाथ व काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली बालके, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, दुर्बल घटकातील महिला, भिक मागणाऱ्या व्यक्ती इत्यादींसाठी व्यापक प्रमाणावर नवीन कार्यक्रम, योजना हाती घेता येणार आहेत.

शांताबाई केरकर मेमोरीयल चॅरीटेबल संस्थेस भुईभाड्याने जमीन

शांताबाई केरकर मेमोरीयल चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेस भुईभाडे आकारून 30 वर्षाकरिता भाडेपट्टयाने जमीन देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन या संस्थेस मौजे आंबिवली, ता. अंधेरी, स.नं. १४१अ, न.भू.क्र.८३३ (भाग) येथील ३७०० चौ.मी. क्षेत्राची शासकीय जमीन, “मटिर्निटी होम व डिस्पेन्सरी” या प्रयोजनासाठी जमिनीच्या सन १९९८ च्या प्रचलित सिध्द शीघ्रगणकातील दरानुसार येणाऱ्या किंमतीच्या ५०% रक्कमेच्या १५% दराने भूईभाडे आकारुन, नेहमीच्या अटी व शर्तीवर ३० वर्षाकरीता भाडेपट्टयाने मंजूर करण्यास आज मान्यता देण्यात आली.
या जमिनीच्या भुईभाडे दराची प्रचलित धोरणानुसार, प्रत्येक १० वर्षांनी त्यावेळीचे जमिनीचे मुल्यांकन आणि धर्मादाय संस्थांना रुग्णालय प्रयोजनासाठी जमीन वाटपासाठी त्यावेळीचे प्रचलित असलेले सवलतीचे दर विचारात घेऊन, मंजूर करण्यात आले.

पायाभूत सुविधांच्या कामाकरिता रात्री देखील
गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक

केंद्र किंवा राज्य शासनाच्या पायाभूत अथवा जलसंपदा प्रकल्पाच्या कामाकरीता विभागीय आयुक्त यांना आवश्यकता वाटल्यास रात्रीच्या वेळी देखील गौण खनिजाच्या उत्खननाची व वाहतूकीची परवानगी देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.याशिवाय आपला खाणकामाचा पारंपरिक व्यवसाय चालू ठेवण्यास इच्छुक असणाऱ्या कुंभार आणि वडार समाजाच्या कुंटुंबाच्या बाबतीत अर्ज केल्यावर स्फोटके वापरून अथवा स्फोटकाशिवाय उत्खनन करण्यास देखील परवानगी देण्यात येईल. राज्यामध्ये होणा-या खनिजाच्या वाहतूकीस राज्य शासन वेळोवेळी विनिर्दिष्ट करील त्याप्रमाणे प्रति मेट्रिक टन किंवा प्रति ब्रास ‘नियमन शुल्क’ आणि सेवा शुल्क वाहतूकदाराने अथवा खाणपट्टाधारकाने राज्य शासनास अदा करावे लागणार आहे.

महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 अन्वये गौण खनिजाच्या बाबतीत जिल्हाधिका-याने दिलेल्या आदेशाच्या बाबतीत विभागीय आयुक्तासह अपर विभागीय आयुक्त यांचेकडेही अपील दाखल करता येईल.
या तरतुदींसंदर्भात महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 या नियमामध्ये सुधारणा करण्यात येतील.

गौण खनिजावरील रॉयल्टी, डेड रेंट दरात सुधारणा

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 31 गौण खनिजाच्या रॉयल्टी (स्वामित्वधन) व डेड रेंट (मृतभाटक) या दरात सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ मधील संबंधित नियमात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. खनिज अगेट, कोरोंडम हे प्रती मेट्रिक टन २०० रुपये किंवा विक्री मुल्याच्या २० टक्के यापैकी जे जास्त असेल ते दर, चायना क्ले, डोलोमाईट, फायर क्ले, लॅटराईट, क्वार्टझाईट, शेल, सिलिका सँड व अन्य घोषित गौण खनिजे ही प्रती मेट्रिक टन १०० रुपये किंवा विक्री मुल्याच्या १० टक्के यापैकी जे जास्त असेल ते दर, फेल्सपार हे खनिज प्रती मेट्रिक टन १०० रुपये किंवा विक्री मुल्याच्या २० टक्के यापैकी जे जास्त असेल ते दर, पायरोफिलाईट प्रती मेट्रिक टन १५० रुपये किंवा विक्री मुल्याच्या २० टक्के यापैकी जे जास्त असेल ते दर, क्वार्टझ प्रती मेट्रिक टन १२० रुपये किंवा विक्री मुल्याच्या १० टक्के यापैकी जे जास्त असेल ते दर.
मृतभाटकाचे दर १० फेब्रुवारी, २०१५ रोजीच्या अधिसूचने अन्वये ९ हजार रुपये प्रती हेक्टर असतील.

एनएसएफडीसीची थकीत रक्कम भरण्यास मान्यता

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडे एनएसएफडीसी दिल्ली यांची थकीत ८८.२४ कोटी रक्कम भरणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
यासंदर्भात विशेष बाब म्हणून लवादाने दिलेल्या निर्देशानुसार हा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर केला होता.

आज १२ जानेवारी २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

•छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास मान्यता
(नगर विकास विभाग)

• पायाभूत सुविधांची कामे वेगाने होण्यासाठी आता दिवसाप्रमाणे रात्री देखील गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक करण्यास मान्यता
(महसूल विभाग )

• गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व मृतभाटकाच्या दरात सुधारणा. (महसूल विभाग )

• मौजे आंबिवली येथील जमीन “शांताबाई केरकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टला “मॅटर्निटी होम व डिस्पेन्सरी” साठी भुईभाडयाने प्रदान करण्यास मान्यता. (महसूल विभाग )

• महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान ३% इतका निधी कायमस्वरुपी उपलब्ध करून देणार.
(महिला व बाल विकास विभाग )

• कोविड- १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणा-या स्कूल बसेसना वाहन करातून १००% सूट देण्याचा निर्णय.
( परिवहन विभाग )

• दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक
( कामगार विभाग )

•साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुंबई महामंडळाकडून राष्ट्रीय मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ, दिल्ली यांची थकित वसुली ८८.२४ कोटी रक्कम भरणा करण्यास मान्यता. (सामाजिक न्याय विभाग)

• बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे मनोविकृतीशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ९ अध्यापकीय पदांची निर्मिती.

(वैद्यकीय शिक्षण विभाग)

• बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ४६.४५ चौ.मी. (५०० चौ.फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या “निवासी” हा वापरकर्ता प्रवर्ग असलेल्या मालमत्तांना मालमत्ता करामधून सवलत.
(नगर विकास विभाग)

‘ नाय वरन भात लो न्चा ,कोण नाय कोन्चा’वर संक्रांत ? स्त्री अवहेलना नको: मागणी

0

प्रदर्शनापूर्वीच तपासा – संदीप खर्डेकरांची महिला आयोगाला विनंती

पुणे- मराठी चित्रपट ‘ नाय वरन भात लो न्चा ,कोण नाय कोन्चा’ प्रदर्शित होत असताना त्याचा ट्रेलर पाहून भाजपाचे शहर प्रवक्ते आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवून स्त्री अवहेलनेचा तर प्रयत्न यातून होत नाही ना ? असा सवाल करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून याबाबत प्रदर्शनापूर्वीच खबरदारी घ्यावी अशी विनंती केली आहे. . नेमके खर्डेकर यांनी या पत्रात काय म्हटले आहे , ते वाचण्यासाठी हे पत्रच आम्ही जसेच्या तसे इथे देत आहोत .


मा. रुपालीताई चाकणकर,
अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य महिला आयोग,
गृहनिर्माण भवन, गांधी नगर, बांद्रा ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र.

विषय – नाय वरन भात लो न्चा ,कोण नाय कोन्चा ह्या चित्रपटाबाबत.

मा. महोदया,
काल whatsapp वर नाय वरन भात लो न्चा ,कोण नाय कोन्चा ह्या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटाचा ट्रेलर एकाने फॉरवर्ड केला आणि तो बघून अंतरबाह्य हादरलो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली किंवा जळजळीत सत्य दाखवण्याच्या नादात स्त्रियांची अवहेलना केल्याचे सकृतदर्शनी ट्रेलर वरून दिसत आहे. चित्रपट परीक्षण मंडळाने एवढ्या आई बहिणीवरील शिव्यांनी भरलेल्या चित्रपटाला मान्यता दिली कशी हा प्रश्न आहेच पण त्यासोबतच लहान मुलांना केवळ हिंस्त्र दाखविले आहे असे नाही तर यात लहान मुलाने स्त्रीचे पाय / मांड्या दाबणे व तिने त्याला विकृतरित्या छातीशी कवटाळणे हे सगळेच वेदनादायक आणि संतापजनक आहे.तरी आपण प्रदर्शनपूर्व चित्रपट बघावा व आपणास ही गैर वाटल्यास ह्यातील या प्रसंगांवर आक्षेप नोंदवावा व कात्री लावण्यास किंवा चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सेन्सर बोर्डास बाध्य करावे अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.

दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

अकोला – राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पुरोगामी विचारांचं सरकार आहे. कल्याणकारी राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. या राज्यातील दिव्यांग बांधवांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी हे शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच अकोला जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षणाचा उपक्रमही राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याबाबतही शासन लवकरच निर्णय घेऊ,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ११९ दिव्यांग बंधू भगिनींना इलेक्ट्रिक फिरते तीन चाकी विक्री क्रेंद्र वितरण करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते. जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात आयोजित या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधान सभा सदस्य आ. रणधीर सावरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, माविमचे विभागीय संनियंत्रण अधिकारी केशव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सुरुवातीला सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते फिरते विक्री केंद्राच्या चावीचे प्रतिकात्मक वितरण करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा नियोजन समिती मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणुन राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील मिळून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांच्या सदस्य असलेल्या महिलांना वा त्यांच्या कुटुंबातील दिव्यांग सदस्यांपैकी ११९ जणांना ही बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल तथा फिरते विक्री केंद्र वितरीत करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात मंगला सुरेश बुंदेले व अब्दुल रशीद या दिव्यांगांना ही चावी देण्यात आली. या उपक्रमासंदर्भात माविमंच्या व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे यांनी माहिती दिली. तसेच एका चित्रफितीद्वारे सादरीकरण केले.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी डी.एम पुंड यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षण या उपक्रमाविषयी माहिती सांगून त्याचे एका चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. तसेच दिव्यांग सर्व्हेक्षणाद्वारे प्राप्त युडीआयडी कार्ड अर्थात दिव्यांगत्व ओळखपत्र बद्रुद्दीन अहमद व संजना बोरकर या दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

हीच जिजाऊ माँसाहेबांना खरी आदरांजली- उपमुख्यमंत्री पवार

आपल्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्याप्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला. जिजाऊ माँसाहेबांच्या याच स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. त्यांच्याच जयंतीदिनी दिव्यांग भगिनींना ई-ट्राय सायकल वितरण करुन स्वाभिमानाने आपली उपजिविका चालविण्याची संधी यानिमित्ताने देणे हीच जिजाऊ माँसाहेबांना खरी आदरांजली आहे. या उपक्रमामुळे जिजाऊच्या लेकींना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. आता त्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतील. स्वाभिमानानं आणि अभिमानानं जीवन जगतील, अश्या शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांना शारिरीक मदतीच्याबरोबरीनं त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे. त्यासाठी समाजाने आपली जबाबदारी ओळखावी. दिव्यांग बांधवांना लागणाऱ्या विविध उपकरणांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येत असतात. तेव्हा दिव्यांग बांधव आणि दानशूर व्यक्ती, संस्था यांच्यातला दुवा बनण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले. दिव्यांगांच्या विकासासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती देतांना ते म्हणाले की, दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाप्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. राज्यातील बेरोजगार दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देणं, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविणे इ. उपक्रम या महामंडळामार्फत राबविले जातात. दिव्यांगांना समाजाचा उत्पादक घटक बनविणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, स्वाभिमानानं उभं करणं हाच आपला उद्देश आहे. दिव्यांगांमधील गूण ओळखून त्यांना संधी उपलब्ध करुन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक असतं, यासाठी समाजाने एकत्र आलं पाहिजे. दिव्यांगांसाठी तीन चाकी सायकली, श्रवणयंत्रे , व्हीलचेअर, ब्रेल साहित्य, पंढरी काठी, स्वयंचालीत जयपूर फूट, केलीपर्स यांसारखी साधनं विनामुल्य उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा लाभ योग्य आणि पात्र दिव्यांग बांधवांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिव्यांग बांधवांना स्वाभिमानानं उभं करण्याची गरज आहे. हे काम सेवाभावाने करत असल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांचे कौतुक केले. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र भवन उभारणे, दिव्यांगांचे सर्व्हेक्षण करणे याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यांगांना विकासाची पुरेपूर संधी देऊ- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

यावेळी बोलतांना सामाजिक न्याय मंत्री मुंडे म्हणाले की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागामार्फत दिव्यांगांच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. दिव्यांगांना लागणारी विविध कृत्रिम अवयवे, यंत्रे इ. उपलब्ध करुन देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येतात. ह्या व्यक्ती, संस्था आणि दिव्यांग व्यक्ती यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी ‘महाशरद’ हे पोर्टलही शासनाने सुरु केले आहे. दिव्यांगांना उपकरणे व यंत्रांच्या माध्यमातून सामान्य जीवन जगता यावे, देशाचे नागरिक म्हणून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. यासोबतच दिव्यांगांना एक वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लातूर जिल्ह्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात ऑफिजम पार्क उभारण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे लहान वयातच दिव्यांगत्व लक्षण ओळखून त्यावर लगेचच इलाज करण्याची सुविधा उपलब्ध होते. तसेच दिव्यांगांचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणे इ. उपक्रमांसाठी निधीची तरतूद करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

दिव्यांग सर्व्हेक्षणाचा उपक्रम राबविणारा ‘अकोला’ हा पहिला जिल्हा-पालकमंत्री कडू

पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थितांशी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र वाटप करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम अकोला जिल्ह्यात राज्यात प्रथमच राबविण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या विकासासाठी कृतिबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी मोलाची माहिती आवश्यक असते ती माहिती दिव्यांग सर्व्हेक्षणाद्वारे उपलब्ध करणारा अकोला हा पहिला जिल्हा ठरला,अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. दिव्यांगांच्या विकासासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून निधी द्यावा. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग संशोधन केंद्र बांधावे,असे आवाहन केले तसेच त्यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचे दिव्यांग कल्याणाच्या योजना राबविल्याबाबत कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास कोविड नियमांचे पालन करीत दिव्यांग व्यक्ती, त्यांचे सहायक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते

भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

0

मुंबई, दि. 12 : भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होणारी भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे असून, यासाठी पाणीपुरवठा आणि कृषी विभागामार्फत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

अटल भूजल योजनेची राज्यस्तरीय शिखर समितीची दुसरी बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषिमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची उपस्थिती होती. बैठकीत आयुक्त सी.डी.जोशी, उपसचिव राजेंद्र गेनजे तसेच राज्यस्तरीय शिखर समितीचे सदस्य आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, लाभार्थींनी ठिबक सिंचन योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी लोकसहभागाबरोबर अनुदान निधी उपलब्ध करून दिला तर लाभार्थ्यांची संख्या वाढेल. यामुळे पाणी उपसा कमी होण्यास मदत होणार आहे. पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी आणि तूट भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अटल भूजल योजना राबविण्याकरिता राज्यासाठी एकूण ९२५ कोटी रुपये एप्रिल २०२० ते मार्च  २०२५ या कालावधीसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये भूजलसंबंधित माहिती व अहवाल जनसामान्यांसाठी खुले करणे, लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडे तयार करणे, अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण साध्य करणे, कार्यक्षम पाणी वापर (सूक्ष्म सिंचन) पद्धतीचा अंगीकार करणे, भूजल पातळीमधील घसरण दरामध्ये सुधारणा करणे तसेच, संस्थात्मक बळकटीकरण व क्षमता बांधणी याकरिता हा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, अटल भूजल योजनेत राज्यातील एकूण एक हजार ४४३ गावे आहेत. राज्यातील आणखी गावे या योजनेस पात्र होतील याकरिता पुनर्सर्वेक्षण करणे गरजचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचाही लाभ मिळू शकेल.

या योजनेच्या अमंलबजावणी करण्यासाठी पीक आणि पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सूक्ष्म सिंचन, मल्चिंग, मूरघास, फळबाग व इतर नाविन्यपूर्ण कामांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाचा सलग दुसरा विजय

0

पुणे, दि.12 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत पार्थ सोनावणे(3-8)याने केलेल्या चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने सेकंद क्रिकेट अकादमी संघाचा 7 गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चंद्रोस क्रिकेट अकादमीच्या पार्थ सोनावणे(3-8), दिप पाटील(1-12) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे सेकंड क्रिकेट अकादमीचा डाव 20 षटकात 9बाद 62धावावर कोसळला. यात मयुरेश मुदगल 16, सर्वज्ञ कुलकर्णी 14यांनी थोडासा प्रतिकार केला. हे आव्हान चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने 9.2षटकात 3 बाद 63 धावा करून पूर्ण केले. यात अमन शेखने नाबाद 27धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:सेकंड क्रिकेट अकादमी: 20 षटकात 9बाद 62धावा(मयुरेश मुदगल 16, सर्वज्ञ कुलकर्णी 14, पार्थ सोनावणे 3-8, दिप पाटील 1-12) पराभूत वि.चंद्रोस क्रिकेट अकादमी: 9.2षटकात 3 बाद 63 धावा(अमन शेख नाबाद 27(24,4×4), पार्थ सोनावणे 8, समिक्षा कुलकर्णी 1-15, भावेश चौधरी 1-14);सामनावीर-पार्थ सोनावणे; चंद्रोस क्रिकेट अकादमी संघ 7 गडी राखून विजयी.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर प्रत्यक्ष कृतीतून अंमलबजावणी -आ. चंद्रकांत पाटील यांचा संकल्प

0
  • मोबाईल प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ.

पुणे – ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असून, त्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून अंमलबजावणी करत असल्याचा संकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आ.चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी आ. पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या मोबाईल प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ एरंडवणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात झाला. यावेळी आ. पाटील यांनी आपला संकल्प व्यक्त केला.

यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक जयंत भावे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या डॉ. अलकनंदा बानू आदी उपस्थित होते.

श्री.‌पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. त्यामुळे केवळ त्यांना आश्वसने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून अंमलबजावणी करत आहे. यातूनच मोबाईल प्रशिक्षण शिबीर सुरु करत असून, या शिबीरामुळे ज्येष्ठ नागरिकांना अॅड्राईंड मोबाईल वापरताना येणाऱ्या सर्वप्रकारच्या अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल. तसेच कोथरुड मतदारसंघात भविष्यात ही असे विविध उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे.

आ. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मोबाईल प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात आले असून, या मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार, त्यांच्या बॅचेस तयार करुन संख्येनुसार नियोजन केले आहे. या शिबिरात आठ आठवड्यांचा अभ्यासक्रमही तयार करण्यात आला असून, त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना अॅड्रॉइड मोबाईल हताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दर मंगळवार, गुरुवार, शनिवार हे मार्गदर्शन केंद्र सुरु असते.

स्वामी विवेकानंद ही बंधुत्वाची खरी ओळख सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा यांचे मत

0
  • ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती साजरी

पुणे : जाती, धर्म, पंथ अशा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे. हिंदू धर्माचा परिचय विवेकानंदांनी ख-या अर्थाने जगाला करुन दिला. भारतात बंधूभावाची भावना असली, तरी देखील ती स्वामी विवेकानंदांनी जगाला करुन दिली. त्यामुळे स्वामी विवेकानंद ही बंधुत्व व भाईचा-याची ओळख आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा यांनी व्यक्त केले. 
ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेच्या प्रांगणात स्वामीजींना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
युवराज शहा म्हणाले, आज समाज आत्मकेंद्री झाला आहे. माझे कल्याण म्हणजे जगाचे कल्याण, असा प्रत्येकाचा विचार असून समाजाचा कोणीही विचार करत नाही. गैरमार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न देखील केला जातो. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी आयुष्याला विसरु नका, सोबत घेऊन जा, हा दिलेला संदेश प्रत्येकाने लक्षात ठेऊन आचरणात आणायला हवा. 
सूर्यकांत पाठक म्हणाले, स्वामी विवेकानंद हे युवकांचे नेतृत्व आहे. त्यांचा आदर्श घेऊन कार्य करणारे अनेकजण आहेत. युवा पिढीसाठी कार्य करणारे पुण्यात देखील अनेक कार्यकर्ते आहे. त्यांना स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने सन्मानित करुन त्यांची ओळख समाजाला व्हावा, असा प्रयत्न आहे.

झी टॉकीजवर रंगणार ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ मकरसंक्रांत विशेष सोहळा

0

सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील करणार निरूपण

गेले दोन वर्ष प्रत्येक जण कोरोनाच्या भीतीछायेखाली वावरत आहे. अजूनही याचे सावट दूर झालेले नाही. या सावटामुळे सण साजरे करण्याची मजा ही प्रत्येकजण हरवून बसला आहे. अशावेळी आपल्या रसिक प्रेक्षकांना घरबसल्या सणाचा आनंद मिळावा मनोरंजनाने त्याचे रंजन व्हावे या उद्देशाने झी टॉकीजने नाचू कीर्तनाचे रंगी या कीर्तनाच्या आगळयावेगळया सोहळयाच्या भक्तीरसाची भावपूर्ण मेजवानी आपल्या प्रेक्षकांना देण्याचे ठरविले आहे. प्रेक्षकांचा विचार करून झी टॉकीजने नेहमीच नाविन्यपूर्ण संकल्पना आणल्या आहेत. भक्तिरसपूर्ण कीर्तनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. संतांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी अभंग, संतवाणी, कथा, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने निरुपण करत समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा तसेच चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही परंपरा जपत महत्त्वाच्या धार्मिक सणांचं औचित्य साधत त्यानंतर येणाऱ्या रविवारी नाचू कीर्तनाचे रंगी हा कीर्तनाचा विशेष सोहळा रंगणार आहे.

जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. सौभाग्यवती स्त्रियांचा हा अतिशय महत्त्वाचा सण. या सणाला सौभाग्यवती स्त्रिया वाण देतात. ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ असं म्हणत आपल्या स्नेहसंबंधातील कटुता नष्ट करुन मैत्रीचे बंध निर्माण करायचे व एकमेकांना चांगली दिशा दाखवायची हा या सणामागचा उद्देश. याच उद्देशाने नाचू कीर्तनाचे रंगी या सोहळयातून संताच्या वाणीचे गोड विचार ऐकायला मिळणार आहेत.

नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण सणांची महती सांगितली जाणार आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे निरूपण रंगणार आहे. रविवार १६ जानेवारीला दुपारी १२.००वा. आणि सायं ६.०० वा. झी टॉकीजवरयाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. शिवलीलाताई पाटील या महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा स्त्री कीर्तनकार असून महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर त्यांच्या कीर्तनाचे अनेक कार्यक्रम संपन्न होतात.

शिवलीलाताई पाटील यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनातून लोकरंजनाचा वसा जपला जाणार आहे. भक्ती आणि मनोरंजनाचा मिलाफ साधत आणलेला ‘नाचू कीर्तनाचे रंगी हा विशेष सोहळा प्रेक्षकांना निश्चितच आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरेल.

पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी दोन कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

0
  • आतापर्यंत चार विशेष मोहिमेत ८ कोटींच्या वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

पुणे, दि१२ जानेवारी २०२२: पुणे प्रादेशिक विभागात वीजचोरांविरुद्ध महावितरणने कठोर कारवाई सुरु केली असून चौथ्या एकदिवसीय विशेष मोहिमेत १४४५ ठिकाणी २ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर उघडकीस आणला आहेत. वीजचोरीविरुद्धच्या नियमित कारवाईसोबतच आतापर्यंत एकूण चार एकदिवसीय विशेष मोहिमेत ६४२८ ठिकाणी ७ कोटी ७१ लाख ४५ हजार रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

       महावितरणची वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी वीजचोऱ्यांचा शोध घेणे व त्याविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचे शेकडो पथके महिन्याच्या एका दिवसात एकाच वेळी पाचही जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करीत आहेत. तसेच वीजचोरी व दंडाची रक्कम न भरणाऱ्या चोरट्यांविरुद्ध विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

पुणे प्रादेशिक विभागात शनिवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता पाचही जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वीजजोडण्यांची तपासणी सुरु झाली. दिवसभरात १२ हजार ४१० वीजजोडण्यांच्या तपासणीमध्ये १४४५ ठिकाणी वीजचोरी व विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले. यामध्ये सुमारे १४ लाख ६० हजार ५८० युनिटची म्हणजे २ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर झाल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांना चोरी केलेल्या युनिट व दंडाचे वीजबिल देण्यात येत आहे. हे वीजबिल व दंड भरला नाही तर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात ५५१ ठिकाणी १ कोटी ६२ लाख ३२ हजार, सातारा- १२३ ठिकाणी ९ लाख ८१ हजार, सोलापूर- ६७० ठिकाणी २२ लाख ४८ हजार, कोल्हापूर- ४१ ठिकाणी ६ लाख १५ हजार आणि सांगली जिल्ह्यात ६० ठिकाणी ६ लाख ८० हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे.

चोरीद्वारे इतर ठिकाणाहून आकडे किंवा केबल टाकून वीज वापर करताना स्वतःच्या, घरातील लहानमोठ्या व्यक्तीच्या किंवा परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जीवघेणा अपघाताची शक्यता असते. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर मागेल त्यांना अधिकृत वीजजोडणी देण्यात येत आहे. तसेच ज्या ग्राहकांचा बिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यांच्याही वीजजोडण्यांची विशेष पथकांद्वारे नियमित तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये परस्पर अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडून घेतल्यास किंवा शेजाऱ्यांकडून वीज घेण्याचा प्रकार दिसून आल्यास संबंधित थकबाकीदार ग्राहक व शेजाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0

‘राष्ट्रीय युवक दिना’च्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

“स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. स्वामी विवेकानंदांनी आपल्या तेजस्वी विचारांनी, ओघवत्या वक्तृत्वाने आणि राष्ट्रप्रेमाच्या ऊर्जेने जगभरातल्या युवकांना कायमच प्रेरणा दिली. जगभरातील युवकांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र स्वामी विवेकानंदांनी दिला. आपण दुर्बल आहोत, हा विचार पहिल्यांदा प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकावा. जीवन जगताना कोणतेही एक ध्येय मनाशी बाळगावे, त्याचा आयुष्यभर ध्यास धरावा, तो विचार पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावावी, ही शिकवण स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिली. राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी, त्यांच्या शिकवणीनुसार सर्व युवकांनी संघटीतपणे काम करावे, हीच स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली ठरेल.‘राष्ट्रीय युवक दिना’च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.”
-अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना वाटणार श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती

0

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची घोषणाः एमआयटी डब्ल्यूपीयूत स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी

पुणे,दि.१२ जानेवारी:“ विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वधर्माचे मर्म अंतर्भूत असलेल्या श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख ग्रंथ प्रतीxचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे.” अशी घोषणा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे भारताचे थोर सुपुुत्र स्वामी विवेकानंद यांची १५९ वीं जयंती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.प्रकाश बी.जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे, प्रा.निरंजन खैरे व विष्णू भिसे हे उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी १८९३ साली जागतिक धर्म परिषदेमध्ये भाकित केल्या प्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती  नांदेल. तसेच त्यांनी १८९७ साली पुन्हा भाकित केले की ५० वर्षानंतर माझी भारत माता स्वतंत्र होईल. त्याप्रमाणे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.  पुढे त्यांनी भाकीत केले की,२१ व्या शतकात माझी भारत माता ज्ञानाचे दालन व विश्व गुरू म्हणून उदयास येईल. त्या प्रमाणे आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. स्वामी विवेकांनदांनी जगाला भारताची ओळख करुन दिली. त्यांच्या कडे असलेली दूरदृष्टी आणि वाचासिद्धी असलेले युगपुरूष होते. धर्म, प्रार्थना आणि ज्ञान याबद्दलचे विवेचन योग्य प्रकारे स्वामी विवेकानंदांनी जगासमोर मांडले आहे. प्रत्येकाने स्वामी विवेकानंदाचा आदर्श घेतला पाहिजे.”
“लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा घुमट नसून त्यातून दिला जाणारा संदेश महत्वाचा आहे. ती एक अध्यात्मिक प्रयोगशाळाच आहे. येथून संपूर्ण मानवजातीला शांतीचा व मानवतेचा संदेश दिला जाईल. २ एप्रिल २०२२ म्हणजेच गुडीपाडव्याच्या निमित्ताने ही वास्तू भारतीय जनतेला अर्पण केली जाणार आहे. दि. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, ३ फे्रबुवारी २०२२ अर्थात भारतीय अस्मिता दिन आणि २ एप्रिल म्हणजेच गुढीपाडवा यांचे औचित्य साधून या ग्रंथाच्या प्रतीचे वितरण केले जाणार आहे.”
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,“स्वामी विवेकांनद हे आधुनिक काळातील संत ज्ञानेश्वर आहेत. एकीकडे संपूर्ण जगाने भौतिक प्रगती केली आहे. परंतु आज संपूर्ण जगाला भारतीय कुटुंब पद्धती आकर्षित करीत आहे. या देशाला स्वामी विवेकानंद आणि साधु संतांचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे हा देश जगाचे आध्यात्मिक नेतृत्व करेल.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“ स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस भारताने १९८५ साला पासून १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. स्वामींचे विचार देशातील युवकांना प्रेरित करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. २१ व्या शतकात भारत विश्वगुरू म्हणून उद्यास येईल. त्याचे उत्तरदायित्व नवयुवकांकडे असल्याने त्यांनी स्वामींजींचा आदर्श घेतला पाहिजे.”
डॉ. मिलिंद पात्रे, विष्णू भिसे आणि निरंजन खैरे यांनी देखील स्वामी विवेकानंदांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

“लडकी हूँ लड सकती हूँ” प्रियांका गांधींंच्या घोषणेने महिलांना स्वबळाचा जाणीव – पूजा आनंद

0

महिलांची आणि काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचा पुणे शहर महिला काँग्रेसचा निर्धार
पुणे – अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी “लडकी हूँ लड सकती हूँ” अशी घोषणा दिली आहे. या घोषणेमुळे महिला कार्यकर्त्यांना स्वबळाची जाणिव त्यांनी करून दिली. आजा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व महिला कार्यकर्त्या काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार करू असे आवाहन पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका पूजा मनिष आनंद यांनी आज काँग्रेस भवनात झालेल्या
कार्यक्रमात केले.
पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस भवनात करण्यात आले होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, कमल व्यवहारे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, संगीता तिवारी, नगरसेविका लता राजगुरू, नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेविका वैशाली मराठे नगरसेवक रफिक शेख, यांच्यासह शोभा पणीकर, पल्लवी सुरसे, इंदिरा आहिरे, नंदा ढवरे, रमा भोसले, अंजली सोलापूरे, स्वाती शिंदे, रोहिणी मल्लव, प्राची दुधाने, सुंदराताई ओव्हाळ, आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लडकी हूँ लड सकती हूँ अशी घोषणा देऊन पूजा आनंद म्हणाल्या, या घोषणेमुळे महिला कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यांच्यासह सर्व उपस्थितांनी यावेळी समाजातील अपप्रवृत्तीविरूद्ध लढणाचा, तसेच समाजातील सर्व घटकांना समावून घेत पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर केक कापून प्रियांका गांधी याना शुभेच्छा देण्यात
आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी प्रशांत सुरसे यांनी केले तर आभार शोभना पणिकर यांनी मानले.

कोयना वन्यजीव प्रकल्पातील बाधित मौजे वेळे ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

0

मुंबई, दि. 11 : कोयना वन्यजीव प्रकल्पातील बाधित मौजे वेळे ग्रामस्थांच्या मागणीबाबत शासन सकारात्मक आहे. ग्रामस्थांनी पुनर्वसनाच्या अनुषंगाने केलेल्या मागणीनुसार कार्यान्वयीन यंत्रणांकडून तात्काळ कार्यवाही  करण्यात येईल, असे  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात सातारा जिल्ह्यातील  कोयना वन्यजीव प्रकल्पातील प्रकल्पबाधीत लोकांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. या बैठकील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.या बैठकीला प्रधानसचिव मदत व पुनर्वसन असिमकुमार गुप्ता,डॉ.जितेंद्र दहाडे, अमोल पवार, दिपक कांबळे, चंद्रकांत कांबळे, रामचंद्र पाटील तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सातारा उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर  वन विभागाचे  मुख्य वनंसरक्षक समाधान चव्हाण, अलिबाग, साताराचे उपवनसंरक्षकही या बैठकीला उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, मौजे वेळे, (ता. जावली), (जि. सातारा) येथील कोयना वन्यजीव – अभयारण्य प्रकल्पासाठी शासनाने जमीन संपादित केलेली  आहे. मौजे वेळे  ग्रामस्थांनी  रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात त्यांच्या पसंतीची जमिनीची मागणी केली आहे.तरी कोल्हापूर,अलिबाग तसेच सातारा जिल्ह्याचे पुनर्वसन अधिकारी व वन विभागाच्या अधिका-यांनी या प्रकरणाचा तात्काळ निपटारा करून ग्रामस्थांना त्यांच्या मागणीनुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून  पुनर्वसनाची कार्यवाही  करावी, अशा सूचना श्री.वडेट्टीवार यांनी केल्या.