Home Blog Page 2107

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात -पाच जणांचा जागीच मृत्यू

0

पुणे- जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कार्ला फाट्याजवळील ही घटना घडली आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 7.30 वाजेदरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार्ला फाटा सोडल्यानंतर रस्त्याच्यामध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरखाली कार घुसली. त्यामुळे कंटेनर जोरात धडक बसली. या अपघातात पाच जणांचा जीव गेला असून, कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनर खाली अडकलेल्या गाडी आणि मृत प्रवाशांना पोलिसांनी बाहेर काढले. अपघातामुळे काही वेळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.

हिमवादळ: न्यूयॉर्क आणि बोस्टनमध्ये वीजपुरवठा खंडित

0

अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर ‘केनान’ या हिमवादळाने कहर केला आहे. वादळामुळे सुमारे 7 कोटी लोक संकटात सापडले आहेत. न्यूयॉर्क आणि बोस्टनमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, त्यामुळे शहराचा वेग पूर्णपणे ठप्प झाला आहे. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, मेरीलँड, रोड आयलँड आणि वर्जीनिया राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. चार वर्षांनंतर या भागात असे वादळ आले आहे. शनिवारी, राष्ट्रीय हवामान सेवा (NWS) ने या ‘बॉम्ब चक्रीवादळ’ संदर्भात इशारा जारी केला होता.हिमवादळाचा हवाई सेवेवरही परिणाम झाला आहे. शनिवारी देशातील आणि देशाबाहेरील 3,500 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रविवारसाठी 885 उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली आहेत.

Courtesy-The Weather Channel

बोस्टनमध्ये स्नो इमर्जन्सी घोषित
बोस्टनच्या महापौर मिशेल वू यांनीही स्नो आणीबाणी जाहीर केली. एका टीव्ही मुलाखतीत त्यांनी सांगितले की, परिस्थिती आणखी धोकादायक होणार आहे. हे एक ऐतिहासिक वादळ असू शकते. NWS ने अंदाज वर्तवला आहे की वादळादरम्यान जोरदार वारे 80 ते 120 mph पर्यंत पोहोचतील. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर 4 इंच जाड बर्फाची चादर आहे
न्यूयॉर्क शहरातील रस्त्यांवर 4 इंचांपेक्षा जास्त जाड बर्फाचा थरही जमा झाला आहे. शहराचे मेयर एरिक अॅडम्स यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, एवढ्या बर्फवृष्टीमध्ये काही लोक कपड्यांशिवाय काउबॉय स्टाईलमध्ये गिटार वाजवत टाइम्स स्क्वेअरभोवती फिरत आहेत.

 Courtesy- New York Mayor Eric Adams

वादळ का आले?
जेव्हा थंड हवा उबदार समुद्राच्या हवेत मिसळते तेव्हा वातावरणाचा दाब झपाट्याने कमी होतो. यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘बॉम्ब सायक्लोन’ म्हणतात. यामुळे, फ्लोरिडामधील अटलांटिक किनारपट्टीच्या पूर्वेकडील कमी दाबामुळे आणि मैदानी भागात जेट स्ट्रीमच्या विस्कळीपणामुळे वादळ सुरू झाले. वादळामुळे किनारी भागात पुराचा धोकाही वाढला आहे. याबाबत इशाराही देण्यात आला आहे.

(Courtesy-The Weather Channel )

खासदार अमोल कोल्हेंचा आत्मक्लेश

0

पुणे – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील इंद्रायणी घाटावर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि आत्मक्लेश करीत या चित्रपटात नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.

या वेळी कोल्हे यांनी असे म्हंटले आहे कि ‘व्हाय किल आय गांधी’ चित्रपटात नथुरामची भूमिका केली त्यांना पण ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात नाही हे स्पष्ट करताना एखादं नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब आहे.

महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानीक – प्रकाश आंबेडकर

0

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, हा निर्णय असंवैधानीक असून सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही. आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

ते म्हणाले की, सभागृह, मग ते पार्लमेंट असो की राज्याची विधानसभा असो, “नेशन विदिन नेशन” या तत्वावर चालते. सभागृहातील लोकांवर निर्णय देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाहीये.

महाराष्ट्राची विधानसभा हा निर्णय मान्य करते का? हे पाहावे लागेल. आमच्या मतानुसार हा निर्णय असंवैधानीक असून अधिकार क्षेत्र नसताना दिलेला निर्णय आहे. असेही ते म्हणाले.

गौरव घुलेंच्या पुढाकारातून १०२ लोकांचे रक्तदान

0

पुणे : बिबवेवाडी येथील गौरव गणेश घुले यांच्या पुढाकारातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित शिबिरात १०२ रक्तदात्यानी रक्तदान केले. महेश सोसायटीतील दत्त मंदिर आवारात सह्याद्री हॉस्पिटलच्या ओम ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन राजश्री देशमुख, देवांगी आरोळे, गंगा शिळीमकर यांनी केले. या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, गणेश घुले, गणेश मोहिते, वाल्मिकी कोळी, राजू पठारे आदी उपस्थित होते.
गौरव घुले म्हणाले, “स्वराज्यासाठी रक्त सांडता आले नाही. पण सुराज्यासाठी रक्तदान करुन राष्ट्रीय एकात्मतेचा धागा अधिक मजबूत करुयात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शहरातील ब्लड बॅंकांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरावर विशेष भर दिला आहे.”

कोरोना नियमांचे पालन करून स्पर्धेचे आयोजन-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे -: टाटा सारख्या उद्योग समूहाचे या स्पर्धेला मिळालेलं पाठबळ आणि कोरोना नियमांची अंमलबजावणी यामुळे या स्पर्धेला महाराष्ट्र सरकारने पाठिंबा दिला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या करंडकाच्या अनावरण प्रसंगी सांगितले. या अनावरण प्रसंगी मदत व पुनर्वसन विभाग मंत्री विजय वडेट्टीवार,आमदार दत्ता भरणे, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. 
पवार पुढे म्हणाले कीया स्पर्धेचे संयोजन कोविड आरोग्य नियमांचे काटेकोरपणे पालन करून होणार आहे.प्रेक्षकांना या स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार नसल्याचा निर्णय संयोजन समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.टाटा सारख्या उद्योग समूहाने याला पाठबळ दिले आहे आणि हा उद्योग समूह नेहमीच आघाडीवर राहिला आहे. 

स्वारगेट ते बेलवडे व मार्केट यार्ड ते कोळवण असे दोन नवीन बसमार्ग सुरू

0

पुणे -पीएमपीएमएल कडून दिनांक २६/०१/१०२२ पासून मार्ग क्रमांक २३२ स्वारगेट ते बेलवडे व मार्ग क्रमांक २३३- अ
मार्केट यार्ड ते कोळवण असे दोन नवीन बस मार्ग सुरू करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते चांदणी चौक येथे या दोन्ही नवीन बसमार्गांचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पीएमपीएमएलचे संचालक प्रकाश ढोरे,पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक दिलीप वेडे पाटील,नगरसेवक पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक दामू अण्णा कुंबरे,नगरसेविका अल्पना वरपे,नगरसेविका श्रद्धा प्रभुणे, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, माजी जि. प. सदस्य शांताराम इंगवले, मुळशीचे माजी पंचायत समिती सभापती रविंद्र कंधारे,
पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे,कामगार
व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे,स्वारगेट डेपो मॅनेजर विकास मते, मार्केट यार्ड डेपो मॅनेजर नारायण भांगे
यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्रमांक २३२ स्वारगेट ते बेलवडे या बससेवेचा मार्ग  स्वारगेट, एस पी कॉलेज, डेक्कन, एस एन डी टी, पौड
फाटा, एम आय टी कॉलेज, जयभवानी नगर, कोथरूड डेपो, चांदणी चौक, भुगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा, शिंदेवाडी, पौड,
खेचर गाव, बेलवडे असा असणार आहे. तसेच मार्ग क्रमांक २३३- अ मार्केट यार्ड ते कोळवण या बससेवेचा मार्ग मार्केट यार्ड,
भाजी मार्केट, स्वारगेट, दांडेकर पूल, डेक्कन, एस एन डी टी, पौड फाटा, एम आय टी कॉलेज, जयभवानी नगर, कोथरूड डेपो,
चांदणी चौक, भुगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा, सुतारवाडी, पौड स्टॅन्ड, करमोळी गाव, सावरगाव, चाले, दखणे पाटी, कुळे
पाटी, नाणेगाव पाटी, चिखलगाव पाटी, डोंगरगाव, नांदगाव, होतले, कोळवण असा असणार आहे.

सध्या या दोन्ही मार्गावर प्रत्येकी एक बस धावणार असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गांवर बसेस
वाढविल्या जातील. स्वारगेट ते बेलवडे पहिली बस सकाळी ५.५० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ६.४५ वा. आहे. तसेच
बेलवडे ते स्वारगेट पहिली बस सकाळी ७.३० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ८.३५ वा. आहे. तसेच मार्केटयार्ड ते कोळवण
पहिली बस सकाळी ९.०० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ७.४५ वा. आहे. तसेच कोळवण ते मार्केटयार्ड पहिली बस सकाळी
६.३० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ५.०० वा. आहे.

याप्रसंगी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मुळशी तालुका पुणे शहराला लागून आहे. पीएमपीएमएलच्या माध्यमातून मुळशी तालुक्याला पुणे शहराशी जोडणारी बस सेवा सुरू झाल्याचे समाधान आहे.” मुळशीचे माजी पंचायत समिती सभापती रविंद्र कंधारे यांनी प्रास्ताविक केले. बबनराव धिडे यांनी आभार मानले. सदरच्या उदघाटन समारंभास बेलवडे व कोळवण ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच मुळशी तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मराठी विश्वकोशाने मराठी भाषेच्या अभिजाततेसाठी मूलभूत पायाभरणी केली – डॉ. राजा दीक्षित

0

मुंबई. दि. 29 : मराठी विश्वकोशाने दर्जेदार व विश्वासार्ह नोंदीच्या माध्यमातून मराठी भाषेच्या अभिजाततेसाठी मूलभूत पायाभरणी केली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विश्वकोश कार्यालयात आयोजित अभिजात मराठी भाषा व मराठी विश्वकोश या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विश्वकोशाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, किसनवीर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे, वाई शहरातील कन्याशाळा, भारत विद्यालय, जॉय चिल्ड्रन ॲकॅडेमी, गर्ल्स हायस्कूल, रमेश गरवारे स्कूल, नॅशनल पब्लिक स्कूल, द्रविड हायस्कूल, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, सेंट थॉमस स्कूल, ब्लॉसम चिल्ड्रन ॲकॅडमी, दिशा पब्लिक स्कूल आदी शाळांतील मराठी विषय शिक्षक उपस्थित होते.

मराठी विश्वकोश मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून दर्जा मिळवून देण्यात कायमच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे जगभरातील मराठी वाचक विश्वकोशाकडे विश्वासार्ह माहितीचा स्त्रोत म्हणून पाहत आहे. मराठी विश्वकोशाच्या अद्ययावत संकेतस्थळावर कोट्यवधी वाचकांनी दिलेली भेट ही याची पोच पावती आहे. मराठी विश्वकोशाचे हे काम सातत्यपूर्ण असून शिक्षकांनी या विश्वकोशाशी मैत्री करुन अद्ययावत ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन डॉ. दीक्षित यांनी केले.

याबरोबरच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने विश्वकोशाच्या विविध विद्यापीठीतील 45 ज्ञानमंडळांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, तसेच लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांचे अभिजात भाषा आणि लोक या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. राजेंद्र मगर, डॉ. सूर्यकांत गायकवाड यांचे व्याख्यान तसेच ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कविसंमेलन घेण्यात आले. तसेच विश्वकोषाच्या 45 ज्ञानमंडळांच्या वतीने शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे या विषयावरील चित्रफित दाखवून मराठी भाषेच्या अभिजाततेबद्दल जागर करण्यात आला.

निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यामुळेच साक्री’ प्रकरणात सरकारकडून दबावतंत्र विधीमंडळात या प्रकरणाचा पर्दाफाश करणार-प्रवीण दरेकर

0

धुळे – धुळेमधील साक्रीतील महिलेच्या मृत्यूची जी दुर्दैवी घटना घडली, त्याबाबत आमच्याही सहवेदना आहेत. परंतु मृत्यूचे भांडवल करुन भाजपा नेते व कार्यकर्त्यांना यामध्ये नाहक गोवण्याचे प्रयत्न काही मंडळींकडून केला जात आहे. याप्रकणात महाविकास आघाडी सरकार दबावतंत्राचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात याप्रकरणाचा पर्दाफाश करणार असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
धुळे येथील शासकीय विश्रामगृह येथे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलतना दरेकर यांनी सांगितले की, साक्री नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधा-यांची ४० वर्षाची सत्ता उलथून लावत भाजपाने बाजी मारली. मात्र नगरपंचायत निवडणुकीनंतर एका महिलेचा मृत्यू झाला व या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु याप्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्यांना नाहक गोवले जात आहे. त्यामुळे आज याप्रकरणाच्या अनुषंगाने आपण अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव भेट घेतली व या प्रकरणाचा तपास पारदर्शकपध्दतीने करण्याची मागणी केल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
दरेकर म्हणाले की, साक्रीतील महिलेचा मृत्यू झाला. हे निश्चितच दुदैर्वी आहे, परंतु मृत्यूचे भांडवल करुन भाजपच्या पदाधिका-यांना जर याप्रकरणात नाहक गोवले जात असेल तर ते सहन केले जात नाही. पोलिस यंत्रणेवर दबाव टाकून सरकारकडून भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही महाविकास आघाडी सरकारचा चुकीचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली त्यावेळी खासदार हिना गावीत तेथेच होत्या. त्यांना घटनाक्रम माहित असून मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल अजुन उघड झालेला नाही. असे सांगतानाच दरकेर म्हणाले की, साक्रीमध्ये भाजपने सत्ता काबीज केली हीच येथील विरोधकांची पोटदुखी आहे. अॅड. भोसले यांना याप्रकरणात गोवता येईल का? यासाठी प्रयत्न करण्यात आले. साक्रीतील पराभवानंतर देखील सत्तेसाठी काही बेबनाव करता येते का? असाही महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. पोलिसांच्या तपासावर आमचा आक्षेप नाही. मात्र राज्य सरकारकडून दबाव आणला जात असेल तर आम्हीच याप्रकरणाची सीबीआय तपासाची मागणी कोर्टातही करु असेही दरकेर यांनी स्पष्ट केले.
साक्री प्रकरणाची सीबीआय तपास आणि न्यायालयात पारदर्शक सखोल तपास करावा अशी आमची मागणी असल्याचे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, आगामी अधिवेशनात या प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहे.
किराणा दुकानामधून वाईन विक्रिया निर्णय चुकीचा आहे. शेतकऱ्यांच्या भल्याचे कारण ते पुढे करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर ठेवून हे सरकार कुणाचे भले करत आहे हे सर्वांना माहित आहे असा आरोप करतानाच दरेकर यांनी सांगितले की, गारपीट, पुर, वादळ नैसर्गिक आपत्तीमधील नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकराने फुटकी कवडी दिली नाही, तसेच या शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली नाही. परंतु आपले पाप लपविण्यासाठी वाईनचे कारण सरकारकडून पुढे केले जात आहे. कोविडच्या संकटाच्या काळात जे सरकार वैदयकीय सुविधा, आवश्यक औषधे देऊ शकले नाहीत तेच आता जनतेला वाईन देत आहेत. हे सरकार आता महाराष्ट्रालाच बेवडे करायला निघालात का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
वाईनच्या मुद्यावरून सरकार इतर राज्यांशी तुलना का करते असा सवालही त्यांनी केला.मुळात सरकारचे धोरण असेच आहे की प्रश्न एक विचारला की उत्तर दुसरे द्यायचे, उत्तर देण्याचे सरकारमध्ये धाडस नाही असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेप्रसंगी खासदार. डॉ. सुभाष भामरे, नंदुरबारच्या खासदार.डॉ.हिना गावीत, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शिवाजीराव दहिते, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, महिला जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी आदी उपस्थित होते.

पुणे मनपा भवन ते पाबळ गाव नवीन बसमार्ग सुरू

0

पुणे – पीएमपीएमएल कडून आज दिनांक २९/०१/१०२२ पासून मार्ग क्रमांक १५९ ब पुणे मनपा भवन ते पाबळ गाव हा
नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला आहे.खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते पुणे मनपा बस स्थानक येथे
या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अॅड. सुरेश पलांडे,अमित सोनवणे, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक
दत्तात्रय झेंडे, न.ता.वाडी डेपो मॅनेजर नारायण करडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्रमांक १५९ ब पुणे मनपा भवन ते पाबळ गाव या बससेवेचा मार्ग पुणे मनपा भवन, जुना बाजार, पुणे स्टेशन,
बंडगार्डन, येरवडा, रामवाडी, विमाननगर कॉर्नर, चंदन नगर, बायपास, खांदवेनगर, वाघेश्वर मंदिर, वाघोली, केसनंद फाटा,
बी.जी.एस.कॉलेज, लोणीकंद, पेरणे फाटा, कोरेगाव, कल्याणी फोर्ज, सणसवाडी, शिक्रापूर, पाबळ फाटा, कस्तुरी कॉलेज,
जातेगाव, मुखई, गंगासागर, धामारी, डफळ वस्ती, शिवराज ढाबा, चौधरी वस्ती, पाबळ गाव असा असणार आहे.
याप्रसंगी बोलताना बापट म्हणाले,“ही बस सेवा सुरू झाल्यामुळे पाबळ परिसरात उद्योगधंद्यांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.

बस सेवा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी पाबळ परिसरातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.” स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले,“मागील पाच वर्षात पीएमपीएमएलच्या ताफ्यात
महानगरपालिकेच्या माध्यमातून १००० सीएनजी व ई बस दाखल झालेल्या आहेत. पीएमपीएमएलच्या सक्षमीकरणासाठी
आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.” याप्रसंगी बोलताना पीएमपीएमएल चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, “पुणे मनपा भवन ते
पाबळ गाव या बससेवेसाठी खासदार गिरीश बापट, हेमंत रासने यांनी विशेष प्रयत्न केले. सध्या या बसमार्गावर ३ बसेसद्वारे बससेवा उपलब्ध असेल. मनपा ते पाबळ गाव १२ खेपा व शिक्रापूर ते पाबळ गाव १० खेपा होणार आहेत. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.” मनपा ते पाबळ गाव पहिली बस सकाळी ५.१५ वा. तर शेवटची बस संध्याकाळी ८.४० वा. आहे. तसेच पाबळ गाव ते मनपा पहिली बस सकाळी ६.३० तर शेवटची बस संध्याकाळी ७.२० वा. आहे. सदरच्या उदघाटन समारंभास पाबळ, जातेगाव, मुखई यासह परिसरातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला करण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे, दि. २९:- नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असून याकरिता येत्या काळात टप्प्याटप्प्याने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत राज्यातील मनपा व राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी १८ शीघ्र प्रतिसाद वाहनांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मदत व पुनवर्सनमंत्री विजय वडेट्टीवार, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात निसर्गाचे ऋतूचक्र बदलले असून अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळासारख्या घटना घडत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिक, पशु-पक्षी, मालमत्तेला बसत आहे. अचानक येणाऱ्या आपत्तीमुळे जीवितहानी व मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येणाऱ्या आपत्तीची पूर्वसूचना मिळते.

आपत्तीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज आणि तत्पर असण्यासोबत कमीत कमी वेळेत ठिकाणी पोहोचली पाहिजे. आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पुनवर्सन करण्यासाठी ११ हजार ७५० कोटी रुपये लागले आहेत. आपत्तीचा मुकाबला  करण्याकरीता येत्या काळात टप्प्याटप्प्याने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच नियोजन करण्यात येईल.

आर्यन पंम्पसारख्या नवीन उद्योगाच्या माध्यमातून  यश मिळवून मराठी माणूस    राज्याचे नाव जागतिक पातळीवर कोरण्याचे काम करीत आहे, याबद्दल अभिमान वाटत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

आपत्तीत नागरिकांचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य-विजय वडेट्टीवार

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन विभागात शीघ्र प्रतिसाद अग्निशमन वाहन उपलब्ध होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कोरोनासारख्या महामारीशी मुकाबला करत राज्य शासनाचे दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित संकटात नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य असून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम विभागाच्यावतीने  करण्यात येते. देशात महाराष्ट्र कोणत्याही संकटास तोंड देण्यासाठी समर्थ आहे. जागतिक पातळीवरील गरज लक्षात घेऊन मराठी उद्योजक काम करीत असल्याचा अभिमान वाटतो. पूरपरिस्थितीच्या वेळी नागरिकांना तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने वाहनाची निर्मिती करावी, असे आवाहन मदत व पुनवर्सनमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले.

इंदापूर तालुक्यात चांगली निर्मिती होत असल्याचा अभिमान-दत्तात्रय भरणे

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन प्रणालीचा घटक म्हणून याप्रकारच्या वाहनांचे इंदापूर तालुक्यात उत्पादन होत आहे, अभिमानाची बाब आहे. येत्या काळात अशा उद्योगासाठी सहकार्य करण्यात येईल.

यावेळी स्वतःचे जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पुणे मनपाचे सुनील शंकर, ठाणे मनपाचे संतोष कऱ्हाळे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अरविंद सावंत यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

आर्यन पंम्पस् चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार यांनी सॅनिटेशन, अत्याधुनिक अग्निशमन, शीघ्र प्रतिसाद वाहनाची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. बालेवाडी येथे होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र २०२२ या टेनिस स्पर्धेच्या चषकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला अटक: 9 कोटीची जीएसटी चोरी

0

मुंबई,

9 कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी  मेसर्स  प्रतिभा सीएसएल सुधीर कन्स्ट्रक्शन्स संयुक्त उपक्रमाचा  सह- व्यावसायिक असलेल्या एका व्यावसायिकाला मुंबई क्षेत्राच्या सीजीएसटी नवी मुंबई आयुक्तालयाने अटक केली आहे. या कंपनीने 2016 मध्ये नागपूर येथे मेट्रो ट्रेन डेपोच्या बांधकामासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कंत्राट घेतले होते आणि जीएसटी वसूल केला होता.तीन वर्षांपूर्वी 2018 मध्ये संकलित केलेल्या जीएसटीचे 8.05 कोटी रुपये कंपनीने जीएसटी अधिकाऱ्यांकडे जमा केले नाहीत. याव्यतिरिक्त, करदात्याने 95 लाख रुपयांच्या अपात्र इनपुट टॅक्स क्रेडिटचाही (आयटीसी) लाभ घेतला.

करदात्याने संकलित केलेला जीएसटी  हा जमा केल्यापासून तीन महिन्यांच्या आत सरकारी तिजोरीत जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा  सीजीएसटी कायद्याच्या कलम 132 अंतर्गत तो गुन्हा आहे. या व्यावसायिकाला  सीजीएसटी  कायद्याच्या कलम 69 अन्वये 27.01.2022 रोजी अटक करण्यात आली आणि 28.01.2022 रोजी न्यायदंडाधिकारी, वाशी यांच्यासमोर हजर करण्यात आले.न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कर, व्याज आणि दंड भरण्याव्यतिरिक्त, या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे.

प्रामाणिकपणे अनुपालन करणाऱ्या करदात्यांवर अन्याय करणाऱ्या आणि सरकारची फसवणूक करणाऱ्या  करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सीजीएसटी  मुंबई विभागाने, सुरु केलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने आतापर्यंत  415 कोटी रुपयांची करचोरी शोधून काढली असून,  18.63 कोटी रुपये जप्त केले आहेत आणि  10 जणांना अटक केली आहे.

सीजीएसटी  विभाग कर चुकवणार्‍यांना शोधून काढण्यासाठी  डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहे. गेल्या पाच महिन्यांत डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण वापरून, सीजीएसटी  मुंबई क्षेत्राच्या  अधिकार्‍यांनी 625 हून अधिक करचोरीची  प्रकरणे नोंदवली असून   5500 कोटी रुपयांची करचोरी शोधून काढण्यासह  630 कोटी रुपये वसूल केले आहेत.आणि 47 जणांना अटक केली.

सीजीएसटी मुंबई क्षेत्र आणि महाराष्ट्र राज्य जीएसटी  प्राधिकरण यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये एक बैठक देखील झाली , या बैठकीमध्ये  कर चुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध समन्वित करचोरी विरोधी कृती योजना सुरू करण्यास  दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी  रोड मॅपही तयार करण्यात आला आहे.  येत्या काही दिवसांत कर चुकवेगिरी विरोधी प्रयत्न अधिक तीव्र करण्याचा निर्णय दोन्ही प्राधिकरणांनी घेतला.

टाटा ओपन महाराष्ट्र 2022 टेनिस स्पर्धेत प्रजनेश गुन्नेश्वरण व अर्जुन कढे यांना वाईल्ड कार्ड प्रदान

0

मुख्य ड्रॉमध्ये चार भारतीय खेळाडूंचा सहभाग 

पुणे, जानेवारी २९, २०२२ – भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरन आणि अर्जुन कढे यांना शनिवारी टाटा ओपन महाराष्ट्र २०२२ स्पर्धेसाठी पुरुष एकेरीच वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस  कोर्टवर ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या दरम्यान पार पडणार आहे. 
प्रज्ञेशन आणि अर्जुनपूर्वी भारताच्याच युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना वाल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. यामुळे आता या स्पर्धेच्या मुख्य फेरीत चार भारतीय टेनिसपटू खेळतील.
अर्जुन हा पुण्याचाच खेळाडू असून, त्याने २०२० मध्ये पहिले राष्ट्रिय विजेतेपद मिळविले. प्रज्ञेश २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता आहे. दक्षिण पूर्व आशियातील या एकमेव एटीपी २५० मालिकेतील पूर्वीच्या तीन स्पर्धेत तो खेळला आहे.
भारतातील या सर्वात जु्न्या एटीपी स्पर्धेचे महाराष्ट्र राज्य लॉन टेनस संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून, टाटा समूहाने या स्पर्धेला आर्थिक पुरस्कार दिला आहे.
अर्जुन आणि प्रज्ञेशला वाईल्ड कार्ड देताना आम्हाला आनंद होत आहे. एकावेळी चार भारतीय खेळाडूंना येथे खेळताना पाहण्याचा अनुभव नक्कीच अभिमानास्पद आहे. अर्जुन हा पुण्याचा असून, प्रज्ञेशही देशात चांगला लोकप्रिय आहे. सहजिक आता भारताची ताकद भक्कम झाली आहे. या चार खेळाडूंच्या समावेशामुळे भारताची सुरवात चांगली होईल. या स्पर्धेतून भारतीय खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा आणि संधी उपलब्ध करून देणे हे आमचे या स्पर्धा आयोजनामागील मुख्य उद्दिष्ट आहे, असे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले. 
जगातील अव्ल खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग आहे. यामध्ये १५व्या स्थानावरील अस्लन कारात्सेव, गतविजेता जिरी वेसेली आणि माजी युवा ऑलिंपिक विजेता कामिल मॅजच्राझेक यांच्यासह या आठवड्यात स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीचा खेळ रंगणार आहे. एकूणच चित्तथरारक टेनिस बघायला मिळेल यात शंका नाही. 
अर्जुन आणि प्रज्ञेश दोघेही चांगले खेळाडू आहेत. सध्या सर्वोत्तम भारतीय टेनिसपटूंमध्ये त्यांची गणना होते. टाटा ओपन स्पर्धेमुळे त्यांना जगाती सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध होणारआहे. मर्यादित स्पर्धा संख्येमुळे आपल्या खेळाडूंना मायदेशात खेळण्याची फारशी संधी मिळत नाही. आता ही संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. ते याचा निश्चित फायदा उठवतील असा विश्वास राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनी व्यक्त केला. 
गेल्या स्पर्धेत प्रज्ञेशने उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याचवेळी २८वर्षीय अर्जुनला विजेत्या वेसेलीकडून पराभव  पत्करावा लागला होता. 
या स्पर्धेची मालकी आयएमजीकडे असून, राईज वर्ल्डवाईडच्या वतीने भारतातील स्पर्धेचे आयोजन बघितले जाते. पात्रता फेरीचे सामने ३० आणि ३१ जानेवारीस खेळले जातील.

महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.29: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविड विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करून 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बालेत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात यावे, तर नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत. पुढील आठवड्यात कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शाळा पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यावा, त्याबाबत तूर्तास सक्ती करू नये. 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत असल्याने लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, लसीकरण झाले नसल्यास विद्यार्थ्यांना लसीकरणाबाबत सूचना देण्यात याव्या.

लसीकरणामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट होत असल्याने लसीकरणावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे तर शहरी भागात कमी आहे. ग्रामीण भागातील शाळांमधून लसीकरणाची सुविधा दिल्याने हे प्रमाण वाढले असल्याने महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

लसीकरण वाहनासोबत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. संस्थाचालकांनी शाळेत कोविड नियमांचे पालन होईल आणि पात्र विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण होईल याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी शाळेतदेखील मास्कचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

मास्क आवश्यकच!
मास्क न वापरण्याविषयी मंत्रीमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, अद्यापही कोविडचे संकट असल्याने नागरिकांनी मास्क वापरणे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यकच आहे. नागरिकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी चांगला मास्क वापरावा. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

गृहमंत्री श्री.वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा लवकर सुरू करण्याची सूचना केली.

श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आणि विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा तणाव असल्याने पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात यावे. शाळेतही विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही आणि ते एकमेकांच्या संपर्कात अधिक वेळ येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

बैठकीत श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात मागील आठवड्यात 90 हजार 137 नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील 109 टक्के लाभार्थ्यांनी लशीची पहिली मात्रा तर 85 टक्के लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या 23 टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करून 75 लक्ष 92 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीस आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

12 आमदार निलंबिन प्रकरणी कायदे तज्ञ लोकांशी चर्चा करून पुढचा निर्णय विधिमंडळाचे पदाधिकारी घेतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

वाईन आणि दारू यात फरक उगाच गैरसमज केला जातोय

पुणे:आघाडी सरकारने घेतलेला बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केले आहे.त्यावर विविध नेत्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.त्यावर हा निर्णय विधिमंडळाने घेतला होता. सर्वोच  न्यायालयाच्या निर्णयानंतर कायदे तज्ञ लोकांशी  चर्चा करून पुढचा निर्णय विधिमंडळाचे पदाधिकारी घेतील . असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे.त्यावर अजित पवार म्हणाले,वाईन आणि दारू यात फरक उगाच गैरसमज केला जातोय,अनेक गोष्टीतून वाईन तयार केली जाते,वाईन पिण्याचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे,आम्ही सरकार मध्ये असताना जनतेच हित पाहून करू,काही लोकांनी व्हीडीओ काढून सरकार विरोध प्रचार करत आहेत,जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जातोय .असे अजित पवार म्हणाले.

एसटी या अजूनही खेडेगावात सुरू झाल्या नाहीत.त्यामुळे खेडेगावातील शाळकरी मुलांचे हाल होत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. यामुळे एसटी आता पूर्वपदावर यायला पाहिजे. एसटी बाबत अनिल परब यांनी शेवटची संधी दिली. माझी कामगारांना विनंती आहे की सर्वसामान्यांसाठी सामंजस्यची भूमिका घ्यायला हवी. असे आवाहन त्यांनी केले आहे.मंत्रिमंडळाच्या बेठकित मास्क्मुक्ती बाबत चर्चा होऊन निर्णय झाल्याच्या बातम्या काल काहींनी दिल्या पण .त्यावर असा कोणताही निर्णय झाला नाही.याबाबतची बातमी धादांत खोटी आहे.अशाप्रकारे जनतेत गैरसमज पसरवू नये. मास्क हा सगळ्यांनी वापराला पाहिजे .असे अजित पवार म्हणाले.