Home Blog Page 2108

शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ॲमेझॉनची तंत्रज्ञानाच्या सहकार्याची तयारी – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

0

मुंबई, दि. 28 :- राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम यासंदर्भात पूरक माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य करण्याबाबत ॲमेझॉनने तयारी दर्शविली असून त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तांत्रिक सहकार्यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. यासंबंधी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रोहित पवार, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, ॲमेझॉन इंडियाचे संचालक सलीम मेमन, ॲमेझॉन सीएसआरच्या प्रमुख मनिषा पाटील, फ्युचर इंजिनिअरचे प्रमुख अक्षय कश्यप, पब्लिक रिलेशन्स टीमच्या माधवी कोचर, लीडरशीप फॉर इक्व‍िटीचे मधुकर बानुरी, पब्लिक पॉलिसीच्या स्मृती मिश्रा यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिक्षणात तंत्रज्ञानाची मदत होण्यासाठी ॲमेझॉन सहकार्य करणार आहे. याअंतर्गत राज्यात 488 आदर्श शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण, संगणकशास्त्रातील कोडिंग लॅब, ॲमेझॉनमार्फत देण्यात येणाऱ्या मुलींच्या शिष्यवृत्तीमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींचा समावेश करण्याची तयारी, सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, पुणे येथे सायन्स सिटीच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञानाची मदत, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत 2022 पासून तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षण देणे या कामी ॲमेझानचे सहकार्य लाभणार आहे.   शालेय शिक्षण विभागामार्फत वर्ग डिजिटाईज्ड केले जाणार आहेत. यामध्ये देखील ॲमेझॉनच्या सहकार्याची सुरूवात म्हणून मुंबईच्या धारावीमधील महानगरपालिकेअंतर्गत शाळांमधील 769 विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार असून नियमित अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग करता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

हिंदी माध्यमिक शाळा (संत कक्कया शाळा इमारत) दादर, काळा किल्ला मराठी प्राथमिक शाळा, काळा किल्ला एमपीएस माध्यमिक, टी.सी.मनपा मराठी माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा उर्दू माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा इंग्रजी माध्यमिक या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात टॅबचे वितरण करण्यात आले.

जुनाट व्याधींनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षावरील लोकांना बूस्टर डोस द्यावा- आ.शिरोळे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

0

पुणे : रक्तदाब, मधुमेह आदी जुनाट व्याधींनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्ष वयावरील लोकांनाही कोविड प्रतिबंधक लसचा बूस्टर डोस द्यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

सध्या ६० वर्ष वयावरील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसचा तिसरा डोस- बूस्टर डोस दिला जात आहे. जुनाट व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांनाही त्यांच्यात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरिता तिसरा डोस देण्याची गरज आहे, वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालातही ही बाब नमूद करण्यात आली आहे. जुनाट व्याधीग्रस्तांना साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जास्त तडाखा बसला आहे. हे प्रमाण ५२ टक्के आहे. सरकारने यातील गांभीर्य लक्षात घेऊन तिसऱ्या डोससाठी ४५ वर्ष वयावरील जुनाट व्याधीग्रस्तांना समाविष्ट करावे, असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

अजिंक्य क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर(सर) स्मृती करंडक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत एस्.एस् अकादमी संघाची आगेकुच

0

पुणे, दि.28 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर(सर) स्मृती करंडक  14 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत एस्.एस् अकादमी संघाने आदिनाथ क्रिकेट क्लब संघाचा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय मिळवला. 
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एस्.एस् अकादमी संघाने आदिनाथ क्रिकेट क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना  राज पडवळ व जय पांडेच्या अचूक गोलंदाजीपुढे आदिनाथ क्रिकेट क्लब संघ 16.3 षटकात सर्वबाद 62 धावांत गारद झाला.  अभिग्यान कुंडूच्या 14 तर मंथन काकडेच्या 11 धावांनी संघाच्या डावाला आकार दिला. 62 धावांचे लक्ष राज पडवळच्या नाबाद 20 तर हार्दिक धनावनीच्या 16 धावांसह एस्.एस् अकादमी संघाने केवळ 8.3 षटकात 3 गडी गमावत 64 धावा करून सहज पुर्ण करत स्पर्धेत पहिला विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरी करणारा  राज पडवळ सामनावीर ठरला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
आदिनाथ क्रिकेट क्लब- 16.3 षटकात सर्वबाद 62 धावा(अभिग्यान कुंडू 14(4, 2×4, 1×6), मंथन काकडे 11 (16, 1×4), राज पडवळ 2-9, जय पांडे 2-3,  हार्दिक धनावनी 1-2, आशिष देशपांडे 1-7) पराभूत वि एस्.एस् अकादमी- 8.3 षटकात 3 बाद 64 धावा(राज पडवळ नाबाद 20(27, 3×4), हार्दिक धनावनी 16(16, 2×4), चैतन्य लांडगे 1-12, सुरज गुप्ता 1-14) सामनावीर- राज पडवळएस्.एस् अकादमी संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.

सूडभावनेने घेतलेल्या निर्णयाला चाप– विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. २८ जानेवारी – सत्यमेव जयते! सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या मनमानी कारभाराला, सूडभावनेने घेतलेल्या निर्णयाला चाप लावला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त सणसणीत अशी चपराक मिळाल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

भाजपच्या १२ आमदारांचे केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केले. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे आघाडी सरकार रोज करतेय. सरकारने तीन-तीन लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचे निलंबन केले होते. आपली सत्ता टिकावी, विरोधकांचे बहुमत होऊ नये, त्यांची संख्या कमी करावी या वाईट उद्देशाने कुठल्याही प्रकारची चूक नसताना, निलंबनासाठी पार्श्वभूमी नसताना हुकुमशाही पद्धतीने १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर आम्हाला न्याय मिळाला. याबद्दल न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतानाच दरेकर यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने या निकालाच्या निमित्ताने देशाच्या लोकशाहीच्यादृष्टीने दिशादर्शक भूमिका घेतलेली आहे. सरकार कोणाचेही असू देत, मनमानीपणे अशा प्रकारे कोणालाही निलंबन करता येणार नाही, अशा आशयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. निकाल देताना न्यायालयाने काही गंभीर ताशेरे ओढलेत, तसेच या सरकारच्या भूमिकेवर केलेल्या कारवाईबद्दल आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याची प्राथमिक माहिती असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
आपले आमदार फुटतील का, विरोधी पक्षाची बहुसंख्या होईल का, अशा प्रकारची भीती महाविकास आघाडी सरकारला होती. १२ आमदारांचे निलंबन करत त्यांची संख्या कमी करावी, असा त्यांचा डाव होता. आता ते निवडणूक घ्यायला काहीतरी करतील, असे वाटते, असेही दरेकर म्हणाले.

त्या १२ आमदारांसाठी तुम्ही आमचे
१२ आमदार निलंबित केले होते का ?

भास्कर जाधव यांच्या विधानावर बोलताना दरेकर यांनी सांगितले की, त्या त्या विषयावर ती ती भूमिका पाहिजे. वड्याचे तेल वांग्यावर काढायचे हे बरोबर नाही. त्या १२ आमदारांसाठी तुम्ही आमचे हे १२ आमदार निलंबित केले होते का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालय आपल्या देशातील शेवटची न्यायलयीन संस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तो निर्णय स्वीकारला पाहिजे. राज्यपालांचा काही निर्णय असेल तर न्यायालय आहेत, न्यायायलय ठरवेल काय करायचे ते. परंतु ते त्यांनी केले म्हणून तुम्ही हे केले का? सूडभावनाच आहे का तुमच्या मनामध्ये, असा थेट सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

प्रवास मस्ट गो ऑन…(केरळ सफरनामा…. भाग 3)

0



देवाच्या कृपेने आपल्यावरील मोठ्ठं संकट टळलं. देवाचे आभार मानून त्याला नमस्कार करून पुन्हा प्रवास चालू झाला. आताची टेम्पो ट्रॅव्हलर अगदी साधी १८ सीटर गाडी होती. कुठे भारी इंटेरिअर नव्हते की लाईटिंग नव्हती. दुपारचे ३ वाजून गेले होते, जेवणाची वेळ टळून गेली होती. भूक लागली होती आणि नव्हती ही. सगळ्यांच्या मनात संमिश्र भावना होती. थोड्याच अंतरावर एक हॉटेल होते. तिथे जेवणासाठी थांबलो. वेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या आणि सर्वांनी ठरवले की आता अपघाताचा विषय काढायचा नाही कारण नुकतीच प्रवासाला सुरुवात केली होती. परत गाडीत चढलो ते एका वेगळा मूड क्रिएट करून. मुन्नारला पोहोचायला खूपच उशीर झाला. रात्री ९ च्या सुमारास क्लब महिंद्रा मुन्नार रिसॉर्टला पोहोचलो. थंडी बोचरी होती. रिसॉर्ट मुन्नार शहरापासून लांब होते. टी गार्डन अवतीभवती असलेले हे लेक व्ह्यू रिसॉर्ट आहे. सकाळी सकाळी रूमच्या बाल्कनीतून नयनरम्य देखावा आणि उगवत्या दिनकराचे दर्शन झाले. आज मुन्नार पाहायचे असे ठरवून बाहेर पडलो. सभोवताली नजर जाईल तिकडे चहाचे मळेच मळे आणि वर नीरभ्र, स्वच्छ आकाश. आल्हादायक वातावरण आणि शुद्ध हवा. अशातच मुस्तफाने गाडी थांबवली ती अशाच एका मनभावन लोकेशनवर…लोकहार्ट टी प्लांटेशन. त्या चहाच्या मळ्यात आम्ही सर्व मनसोक्त बागडलो. नंतर पेटपूजा करायची म्हणून मुन्नार शहरातील प्रसिद्ध ‘गुरु ढाब्या’ला भेट दिली.
मुन्नारमधील ‘एरावीकुलम नॅशनल पार्क’ला भेट देण्याचे ठरवले. हे नॅशनल पार्क निलगिरी तहर (जंगली बकरी) या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथून दिसणारा मुन्नारचा देखावा अप्रतिम आहे. मुन्नारमधील आमच्यासाठी खास आकर्षण होते ते ‘पुनर्जनि ट्रॅडिशनल व्हिलेज’ला भेट देणे. आपली परंपरा जपण्यासाठी या ठिकाणी रोज नवरासा क्लासिकल फ्युजन शोचे आयोजन केले जाते. यात कथकली, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, थेय्यम हे शास्त्रीय नृत्य प्रकार सादर केले जातात. तर कलारी शोमध्ये पारंपरिक मार्शल आर्ट्सचे खेळ दाखवले जातात. पुनर्जनिच्या मार्शल आर्ट परफॉर्म करणाऱ्या उंनीकुमारने सांगितले की १५ वर्षांचा असल्यापासून तो ही मार्शल आर्ट्सची कला शिकतो आहे. ४००० वर्षं प्राचीन अशी ही मार्शल आर्टस् कला आहे. गेली १० वर्षं आता तोही शिकवतो आहे. मोहिनीअट्टम सादर करणाऱ्या लक्ष्मी कलामंडळमने तिच्या मोहिनीअट्टम या नृत्य प्रकारची माहिती आम्हाला दिली. मुन्नारला जाणाऱ्या सर्वांनी प्रेक्षणीय स्थळांबरोबर पुनर्जनि ट्रॅडिशनल व्हिलेजला आवर्जून भेट द्यावी आणि त्यांच्या पारंपरिकतेला अनुभवावे.
त्यानंतर बघायचा राहिला होता तो सन राईझ पॉईंट. महिंद्रा रिसॉर्टच्या ट्रॅव्हल डेस्कच्या प्रतिनिधीकडून याबद्दल भरभरून वर्णन करण्यात आले आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की जाऊयाच उद्या सकाळी. आणि मग आल्लेपीला जायला निघूया. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ४.३० ला आम्ही तयार झालो. कार्थिक याच्या जीपमधून आम्ही जाणार होतो. तिकडे आपली गाडी नेता येत नाही. तिकडच्या स्थानिक लोकांचीच गाडी बुक करावी लागते. या ठिकाणी गेलात की तुम्ही ढगात असाल असेच तुम्हाला वाटेल. तो जो सूर्य उगविण्याचा क्षण आहे तो खूपच सॉल्लिड आहे. त्याच्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये कार्थिक रसभरीत वर्णन करीत होता.
सर्व बाजूंनी काळाकुट्ट अंधार होता. एक एक जीप आता आमच्या जीपच्या मागे पुढे दिसू लागली होती. अरे व्वा! बरेच जण जातात तर हा पॉईंट बघायला, असं मी मनात म्हणत होते. या पॉईंटकडे जाणारा रस्ता एका खाजगी चहाच्या मळ्यातून जात होता. त्यासाठी तिकडे प्रवेश करताना चेकिंग केले जाते. रस्ता थोडा खराब असेल असं सुरूवातीला वाटले. पण जीप जसजशी पुढे जात होती तसतसे पूर्ण शरीराला जोरजोरात हिसके बसत होते. एकतर निमुळता रस्ता, एका बाजूला चहाचे मळे तर दुसऱ्या बाजूला दरी. आमच्या मनातील भीती घालविण्यासाठी जीपचा ड्रायव्हर आमच्याशी सतत गप्पा मारत होता. थोड्या अंतराने असा अगदीच खराब रस्ता आला की जणू जीप हेलकावे खात होती. ड्रायव्हरने हुशारीने आमचं लक्ष दुसरीकडे वेधून घेण्यासाठी १९८० च्या दशकातील रोमँटिक हिंदी गाणी लावली. मनात प्रचंड भीती दाटून आली होती. त्या क्षणी ठरवले की एवढा द्राविडी प्राणायाम करून या पुढे सन राईझ पॉईंट बघायला काही जायचे नाही.(मानेचे, पाठीचे, आणि कमरेचे दुखणे असणाऱ्यांनी हा पॉईंट बघायला जाण्याचा मोह टाळावा.) सहज घडणारे सूर्यदर्शनच काय ते पदरात घ्यायचे. शेवटी दीड तासाच्या प्रवासाने त्या पॉईंटच्या उंचीवर पोहोचलो. प्रचंड धुकं दाटून आलं होतं. दवबिंदू अंगावर पडत होते. गार वारं सुटलं होतं. दोन्ही हातांनी स्वतःला लपेटून घेतलं तरी थंडी कुठूनही अंगाला झोंबत होती. त्या पॉईंटच्या टोकावर चालत चालत आम्ही पोहोचलो. खूप गर्दी होती. दोन्ही बाजूस खोल दरी. आम्ही जास्त पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. अगदी आपल्या जवळच ढग आहेत असा भास होत होता. धुकं असल्यामुळे सूर्यदर्शन काही झालं नाही. पण अनुभवलेला तो क्षण स्वर्गीय सुखाचा आनंद देऊन गेला.
तो क्षण अनुभवून आता परत त्या भयंकर प्रवासाचा अनुभव घ्यायचा या विचाराने पोटात गोळा आला. ड्रायव्हरने बहुदा ते चेहऱ्यावरील भाव ओळखले असावेत. पटकन तो म्हणाला. “ये रास्ता ऐसा हे कि केरल में आते हो तो नॅचरल बॉडी मसाज हो जाता हें, अभि मी आपको ऐसी जगा ले जाऊंगा कि आप सब लोग खुश हो जायेंगे.” त्याचं हे संभाषण ऐकून मनात म्हटलं, याला काय जातंय बोलायला. इकडे आम्ही जीपमध्ये जीव मुठीत धरून बसलो होतो. आता अजून कुठे घेऊन जातोय कुणास ठाऊक. जीप परत त्याच खडकाळ रस्त्याने जाऊ लागली आणि नुकतंच उजाडू लागलं होतं. त्यामुळे आपण कुठल्या रस्त्याने आलो होतो ते दिसू लागलं. सभोवती चहाच्या मळ्याने लांबच लांब आच्छादलेले डोंगर खूपच सुंदर दिसत होते. एवढी हिरवाई बघायची सवय नाही ना. दाटलेलं धुकं आणि आता त्यातून तांबडं फुटू लागलं होतं. एका डोंगर उतरणीवर त्याने जीप थांबवली आणि म्हणाला, अभि यहा से नजारा देखो. चहुबाजूंनी हिरवे गालीचेच जणू पांघरले होते. वर शुभ्र आकाश, वाहत जाणारे मोठाले ढग. त्या हिरवाईतून दिसणारी २-४ घरं. अगदी सिनेमात असतं तसाच सिन डोळ्यांसमोर होता. त्या क्षणाचे आणि सौंदर्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील. डोळे गच्च मिटून ते सौंदर्य डोळ्यात साठवून घेतले. कार्थिकका जादू चल गया! मग त्याने आम्हाला सांगितले की सांगतो तसे तुम्ही उभे राहा, मी फोटो काढतो. एक एक ट्रिक वापरून तो आमचे फोटो काढत होता. एखाद्याला उपजतच कॅमेराचा अँगेल असावा तसं काहीसं कार्थिकच्या बाबतीत होतं. एकदम छान आमचे फोटो काढले. परतीच्या वाटेवरील भीती आता कुठच्या कुठे पळून गेली होती. मस्त मूडमध्ये रिसॉर्टवर पोहोचलो. आता परत निघायचे होते. पुढचे डेस्टिनेशन होते हॉटेल रमाडा- आल्लेपी… (क्रमशः)

  • पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

पृथ्वी पाटील ठरली देशातील सर्वोत्तम कॅडेट,‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्यांंचा बहुमान

0

नवी दिल्ली,दि.२८  : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त केला आहे. तर पृथ्वी पाटील एनसीसीच्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट  (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान आज महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले.

येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या लष्कर,नौदल आणि वायुदलातील प्रत्येकी एक मुलगा व मुलगी अशा बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा कॅडेट कॅप्टन निकिता खोत आणि महाराष्ट्र एनसीसी  संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी तर सिनियर अंडर ऑफिसर सिध्देश जाधव यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारले. देशातील एकूण 17  एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 20२० ते  नोव्हेंबर 20२१ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर दिल्ली एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राला तब्बल सात वर्षानंतर प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १७ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मागील वर्षी महाराष्ट्र हा प्रधानमंत्री बॅनरचा उपविजेता ठरला होता तर राज्याला जवळपास तब्बल सात वर्षाने हा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाल्याने या बहुमानाचे विशेष महत्व आहे.

 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वी पाटीलचा सन्मान

या कार्यक्रमात एनसीसीच्या वायुदलाच्या (सिनीयर विंग) बेस्ट कॅडेट्सचा बहुमान पटकाविणारी महाराष्ट्राची कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिचा पंतप्रधानांच्या हस्ते मानाचे पदक व केन प्रदान करून सन्मान करण्यात आला. एनसीसी वायुदलाच्या बेस्ट कॅडेटसाठी देशातील कॅडेट्समध्ये चुरस होती.लेखी परिक्षा, समुह चर्चा आणि एनसीसी महासंचालकांसमोर प्रत्यक्ष मुलाखत व शिबिरातील परेड या निकषांवर बेस्ट कॅडेट्ची निवड करण्यात आली.

प्रधानमंत्री गार्ड ऑफ ऑनरमध्येही महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी

या विशेष कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एनसीसीच्या विविध विंगच्यावतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात येतो या मानाच्या गार्ड ऑफ ऑनरमध्येही महाराष्ट्राचे कॅडेट्स चमकले. महाराष्ट्राच्या  सिनीयर अंडर ऑफिसर गितेश डिंगर याला एनसीसीच्या चारही विगंच्या परेड कमांडरचा बहुमान मिळाला. एनसीसीच्या छात्रा विंगच्या नेतृत्चाचा बहुमान सिनीयर अंडर ऑफिसर सोनाली पाटील तर एअर फोर्स विंगचे नेतृत्व सिनीयर अंडर ऑफिसर राघवेंद्र सिंह याने केले.  प्रधानमंत्री गार्ड ऑफ ऑनरसाठी  एनसीसीच्या चारही विंगसाठी  निवड  झालेल्या देशातील ५७ कॅडेट्सपैकी सर्वात जास्त ७ कॅडेट्स हे महाराष्ट्राचे होते.

महाराष्ट्राची उत्कृष्ट कामगिरी

लेफ्टनंट कर्नल अनिरुध्द सिंह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या एनसीसी संघाने यावर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिल्लीतील कँन्टॉनमेंट भागात आयोजित एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबीरात महाराष्ट्रातील ३४ मुले आणि २३  मुली असे एकूण ५७ कॅडेट्स सहभागी झाले .पुणे येथे 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 202१ या कालावधी दरम्यान या कॅडेट्सचा कसून सराव झाला व कोरोना चाचण्याअंती हे कॅडेट्स 1 जानेवारी  २०२२ रोजी  दिल्लीतील शिबिरात सहभागी झाले. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या पथ संचलनात सहभागी देशभरातील एनसीसीच्या १०० मुलींच्या तुकडीत महाराष्ट्राच्या ८ मुलींची निवड झाली. महाराष्ट्रातील १७ पैकी ९ मुलांची निवड राजपथवरील पथ संचलनासाठी झाली.

खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगदा अंतिम खुदाईद्वारे खुला करण्यास प्रारंभ

0

सातारा, दि. 28 : राज्यातील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 4( नवा राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे (प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या जुळया बोगद्याचे) अंतिम खुदाईद्वारे खुलेकरणाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाले.

 यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार जयंत आसगांवकर,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. वेळेची व पैशाची बचत होणार आहे. पुणे ते सातारा महामार्गाचे काम तीन महिन्यात पूर्ण होईल. पुणे ते बंगळूर सहा लेनचा नवीन ग्रीन फील्ड महामार्ग बांधण्यात येणार आहे. या ग्रीन फील्ड महामार्गालगत नवीन शहरे निर्माण करावेत.  त्यामुळे मुंबई व पुणे शहरावरील शहरीकरणाचा भार कमी होईल. सातारा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा विकास होण्यास या महामार्गाचा उपयोग होईल. त्याचबरोबर राज्याच्या विकासालाही गती मिळेल. उत्तर भारतातील वाहतूक मुंबई पुणे न जाता सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूरमार्गे दक्षिण भारतात जाण्यासाठी नवीन महामार्ग करीत असल्याचेही श्री.गडकरी यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, खंबाटकी घाटात नेहमी वाहतूकीची अडचण होत होती. परंतु या नवीन सहा मार्गिकामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सोयीची होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक व अन्य वाहतुकीला फायदा होणार आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी हा राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा आहे.

खंबाटकी घाटात नवीन सहापदरी बोगदा (प्रत्येकी तीन पदरी दुहेरी बोगदा) – सदरील बोगद्याच्या ॲप्रोचेस चे काम वेळे येथून किमी 771.730 येथे सुरु होते आणि खंडाळा किमी 782.000 येथे समाप्त होते. बोगद्याच्या प्रत्येक ट्यूबमध्ये 10.5 मीटर रुंदीच्या कॅरेजवेसह तीन पदरी आहेत. बोगद्याची एकूण अंतर्गत रुंदी सर्वसाधारणपणे 16.16 मीटर (कमाल) आहे. कॅरेजवेच्या वरच्या काउन पर्यंत बोगद्याच्या आतील उभा क्लिअरन्स 9.31 मीटर आहे आणि किमान 5.5 मीटर उभा क्लिअरन्स आहे. बोगद्यामधील रस्ता सिमेंट क्राँक्रीटचा आहे. बोगद्याची लांबी 1148 मीटर आहे. अडचणीच्या काळात दोन्ही बाजूच्या बोगद्यातून वाहतूक वळविण्यासाठी सिंगल लेन क्रॉस पॅसेज बोगदे 400 मीटर अंतरावर 5.5 मीटर कॅरेजवेसह बनविण्यात येत आहेत.

कॅनॉल रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधी द्या -मंजुषा नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

0

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याने या कामामुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे. यासाठी पर्यायी रस्ता म्हणून कॅनॉल रस्ता सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.-मंजुषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका

पुणे-सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या वडगाव बुद्रुक ते पु.ल. देशपांडे उद्यान दरम्यान असलेल्या कॅनॉल रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच या रस्त्याच्या कामासाठी काही निधी कमी पडत असल्यास आपल्या ‘स’ यादीतून ५० टक्के निधी देण्याची तयारी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी दाखविली आहे. त्याबाबतचे पत्र नागपुरे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे.
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम थिएटर असा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामामुळे पुढील काही वर्षे या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. ही कोंडी कमी करण्यासाठी या भागातील कॅनॉल वरून जाणारा ७.५ मीटर रुंदीचा डीपी रस्ता हा पर्यायी रस्ता लवकरात लवकर सुरु करणे गरजेचे आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडत असल्याचे समोर आले आहे. निधी अभावी हे काम रखडल्यास त्याचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या कामासाठी कमी पडत असलेला निधी सन २०२१-२२ च्या म्हणजे चालू आर्थिक वर्षातील ‘स’ यादीतील निधी मधून घ्यावा, असे पत्र नगरसेविका नागपुरे यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे.
आपल्या ‘स’ यादीतील एकूण तरतुदी मधून पन्नास टक्के निधी प्रभागातील विकास कामांसाठी राखीव ठेवावा. तसेच उर्वरित पन्नास टक्के निधी या रस्त्यासाठी म्हणजे ‘वडगाव बुद्रुक ते पु.ल. देशपांडे उद्यान आणि त्यापुढे जनता वसाहत पर्यंत कॅनॉल लगतचा साडेसात मीटर रुंदीचा डीपी रस्ता’ पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने खर्च करावा, असे या पत्रात म्हटले आहे.

नागरिकांच्या पैशातून कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून भाजपाची स्वजाहिरातबाजी – राष्ट्रवादीचा आरोप

0

पुणे- नागरिकांच्या आणि ठेकेदारांच्या पैशातून महापालिकेतील भाजपा सत्ताधारी आपापली जाहिरात बाजी करत असून ‘कॉफी टेबल बुक’ हा आता त्यातीलच एक प्रकार असल्याचा आरोप येथे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केला आहे. स्वार्थासाठी पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर सत्ताधार्यांनी दरोडा टाकला असा आरोप करत आणि याचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आवारात आंदोलन करण्यात आले.यावेळी विरोधीपक्षनेत्या सौ. दिपाली धुमाळ, नगरसेवक प्रकाश कदम,महेंद्र पठारे, नगरसेविका सौ. रेखा टिंगरे,स्मिता कोंढरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले कि,’महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करून केवळ भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच एरवी विकासकामांसाठी महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना निरुपयोगी कॉफी टेबल बुकसाठी मात्र महानगरपालिकेची तिजोरी ओसंडून वाहत आहे. कोरोनाच्या काळात पुणेकरांचे झालेले हाल आपण सर्वांनीच बाघितले आहेत. जम्बो कोविड हॉस्पिटल व इतर सुविधांची पुणेकरांना नितांत आवश्यकता असताना पैसेच नाही असं रडगाणं सत्ताधारी भाजपने मांडलं. कोरोनाच्या भयावह संकटात पुणे शहरातील तब्बल ९११४ नागरिकांनी आपले प्राण गमावले. ​मात्र कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची जाहिरात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने सामान्य पुणेकरांच्या हक्काच्या निधीस हात घातला आहे. या माध्यमातून आपल्या काही हितचिंतकांचा आर्थिक फायदा व्हावा हाच भाजपचा डाव आहे “पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माहितीसह पुणे शहराचा शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास व पुणे शहराने केलेली प्रगती जगासमोर मांडली होती. भारतीय जनता पक्षाच्या काळात तयार झालेल्या कॉफी टेबल बुकमध्ये मात्र कोरोनाच्या काळात पुणेकरांचे झालेले हाल जगासमोर मांडले जाणार आहेत. पुणे शहराच्या इतिहासातील एक काळा अध्याय कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून जगाला सांगण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉ. आशिष भारती ( आरोग्य प्रमुख )यांना निवेदन दिले आहे, तसेच या निविदेची चौकशी करण्यासाठी नगरविकास विभाग, गृह विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सीआयडी यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे.” अशी भूमिका यावेळी श्री. प्रशांत जगताप यांनी मांडली. “गली गली में शोर है, भाजपा चोर है”, “भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या..

शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु

0

पुणेदि जानेवारी २०२: पश्चिम महाराष्ट्रात थकबाकीदारांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा सोयीचे व्हावे यासाठी पुणे जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आघाडी सरकारला धक्का- भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील

0

कोल्हापूर –

भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. कृत्रिम बहुमताच्या आधारे मिळवलेली सत्ता आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात इतकी चढली होती की न्यायालयालाही धुडकावून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने ते वागत होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आघाडी सरकारला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर आ. चंद्रकांतदादा पाटील पत्रकारांशी बोलत होते.

आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा शुक्रवारचा भाजपाच्या बारा निलंबित आमदारांविषयीचा निर्णय हा देशातील कोणत्याही सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. अशा प्रकारे एखाद्या सरकारने मनमानी केली तर लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचे मत न्यायालयाने सुनावणीत व्यक्त केले होते. आघाडी सरकारने बहुमताच्या जोरावर भाजपाच्या बारा आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करून अन्याय केला असला तरी न्यायालय आम्हाला न्याय देईल याचा विश्वास होता.

आघाडी सरकारने घेतलेला बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केले आहे. कृत्रिम बहुमताच्या जोरावर देशाच्या संविधानाचे उल्लंघन करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. सरकारला या निकालामुळे धक्का बसला आहे, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना गारपिटीनंतर, अतिवृष्टीनंतर, पूरानंतर योग्य नुकसानभरपाई दिलेली नाही. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण केली नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही. शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर फळांना योग्य भाव द्यावा. दारुचा सुळसुळाट करून शेतकऱ्यांच्या मुलांना दारुच्या नादी लावणार आहात का ?

“शाब्बास… दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलात…!”

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूचे अभिनंदन

मुंबई, दि. 28 : – ‘…महाराष्ट्राच्या जिद्द आणि चिकाटीचा झेंडा दिल्लीत फडकवलात..छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा वारसा सांगणारी कामगिरी बजावलीत…शाब्बास..भले बहाद्दर…’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनिस्टर्स बॅनर) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने देशातील सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे, त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र  संचालनालयाचे अभिनंदन केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमूला हा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. या यशासाठी पृथ्वी हिचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान ध्वजाचा (प्राईम मिनिस्टर बॅनर) वाहक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, सर्वोत्कृष्ट संचालनालयासाठीचा पारितोषिक स्वीकारण्याचा मान मिळालेले महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

भैय्यू महाराजांच्या आत्महत्येचे गूढ उकलले :तिघांना झाली प्रत्येकी ६/६/वर्षांची शिक्षा

0

इंदूर -मध्य प्रदेशातील बहुचर्चित भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात इंदूरच्या जिल्हा न्यायालयाने केयरटेकर पलक, मुख्य सेवादार विनायक आणि शरद यांना दोषी ठरवले आहे. तिघांनाही 6-6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आदेशानुसार, भैय्यू महाराज यांचा सेवकांनी इतका छळ केला की त्यांनी आत्महत्या केली.भैय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

याप्रकरणी इंदूर जिल्हा न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. सर्व पुरावे व साक्षीदार न्यायालयासमोर सादर करण्यात आले. आरोपी पक्षाने भय्यू महाराज यांनी लिहिलेली सुसाईड नोट या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर केली. त्याचवेळी फिर्यादी पक्षाने तिन्ही आरोपींविरुद्ध बहीण व दुसरी पत्नी आयुषी यांना साक्षीदार म्हणून जिल्हा न्यायालयात हजर केले.मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध केला आहे. महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले होते. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा सेवेकरींवर जास्त विश्वास होता. त्यांना सेवेकरींवर एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचे आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते. मात्र सेवेकरींनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.

हुतात्मादिनी दोन मिनिटे मौन पाळण्याचे निर्देश

0

मुंबई, दि. 28 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दि. ३० जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यावर्षीही रविवार दिनांक ३० जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

रविवार, दि. ३० जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता पाळण्यात यावयाच्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी १०.५९ पासून ११.०० वाजेपर्यन्त इशारा भोंगा वाजविण्यात येईल. हा इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/आस्थापना/शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे यामधील अधिकारी/कर्मचारी/शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे, सकाळी ११.०२ मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी ११.०३ मिनिटांपर्यंत वाजविण्यात येईल.

जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी ११.०० वाजता मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

प्रजासत्ताक संचलनातील कामगिरीसाठी मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाचे अभिनंदन

0

मुंबई, दि. 28 :- यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे तसेच एनसीसी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राच्या एनसीसी सिनीयर एअर फोर्स विंगची छात्रसैनिक, वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने यापूर्वी 17 वेळा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याचे, तसेच गेली दोन वर्षे उपविजेतेपद जिंकल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या छात्रसैनिकांच्या आजवरच्या गौरवशाली कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राचे सर्व छात्रसैनिक ‘एकता व अनुशासन’ या ब्रीदाचे पालन करुन समर्पित वृत्तीने राष्ट्रसेवा करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर बॅनर)चा वाहक छात्रसैनिक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, उत्कृष्ट ‘गार्ड ऑफ ऑनर’साठी सन्मानित सिनीयर अंडर ऑफिसर गितेश डिंगर, सिनियर अंडर ऑफिसर सोनाली पाटील, सिनियर अंडर ऑफिसर राघवेंद्रसिंह या छात्रसैनिकांसह महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत आदी एनसीसी अधिकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.