पुणे- ज्येष्ठ समाजसेवक ,आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.त्यांनी म्हटले आहे कि,’ महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे.
आण्णा हजारे यांनी पुढे असेही म्हटले आहेकी,’ वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते. शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार? हा खरा प्रश्न आहे.
20 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या आणखी एका निर्णयात याच सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के केलेले आहे. उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करून हे मद्य स्वस्त करण्यात आले. यातून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल 100 कोटीवरून 250 कोटीवर जाईल असा विचार सरकारने केला असल्याचे समजते. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येतो.
काल सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे. असे हजारे यांनी म्हटले आहे .
नवी मुंबई, ३० जानेवारी २०२२: बलाढ्य चायना पीआरने आपल्या एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेतील विक्रमी नवव्या विजेतेपदाकडे आगेकूच करताना व्हिएतनामचा ३-१ गोलने पराभव केला. या शानदार विजयासह चायना पीआरने आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारतानाच ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंड यांच्या यजमानपदाखाली २०२३ साली होणाऱ्या फिफा महिला विश्वचषक स्पधेर्तील स्थानही निश्चित केले.
डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चायना पीआर कडून वाँग शाँग, वाँग शानशान आणि जियाली टँग यांनी प्रत्येकी एक गोल करत चायनाचा विजय साकारला. उपांत्य फेरीत चायना पीआरला आता जपानच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्याचवेळी, व्हिएतनाम आता प्ले ऑफ सामन्याद्वारे फिफा विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करतील.
चायना पीआरने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला होता. व्हिएतनाम आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याचा इतिहास रचून थेट विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांचा चायना पीआरच्या आक्रमकतेपुढे निभाव लागला नाही. व्हिएतनाम संघाने आक्रमक हूयन न्हू हिला विश्रांती देत फाम है येन आणि एनग्युयेन थी वान यांना आक्रमक म्हणून पसंती दिली. परंतु, हे दोन्ही खेळाडू सामन्यात दबावाखाली दिसले.
सातव्याच मिनिटाला चायना पीआरच्या वाँग शाँगने गोल केला, परंतु रेफ्रींनी ऑफ साइड दिल्याने चायनाचे खाते उघडले नाही. दोन मिनिटांनी चायना पीआरच्या टँग जियालीने मारलेल्या हेडरवर चेंडू बारला लागला. चायना पीआरच्या आक्रमक खेळीनंतरही व्हिएतनामने लवकरच स्वत:ला सावरले आणि ११ व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करत १-० अशी धक्कादायक आघाडी घेतली. चायना पीआरच्या यांग लिनाच्या खराब बचावाचा फायदा घेत एनग्युयेन् थी डंगने चेंडूवर पूर्ण नियंत्रण मारत चायना पीआरची गोलकीपर यू झू हिला चकवले.
या अनपेक्षित गोलने चवताळलेल्या चायना पीआरने आक्रमक प्रत्युत्तर दिले. स्पर्धेतील पहिला गोल स्विकारलेल्या चायना पीआरने यानंतर जोरदार खेळ करताना सामन्याचे चित्र स्पष्ट केले. तरीही वाँग शाँग, जियाली आणि वाँग झियाओक्सू यांनी केलेल्या आक्रमणावर चायना पीआरला यश मिळाले नाही. अखेर २५व्या मिनीटाला वाँग शाँगने संघाला बरोबरी साधून देत शानदार गोल केला. यानंतर दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ करत मध्यंतराला १-१ गोल अशी बरोबरी कायम राखली.
दुसऱ्या सत्रात मात्र चायना पीआरने जबरदस्त खेळ करताना भन्नाट आक्रमण केले. ५२व्या मिनिटाला वाँग शानशानने चायना पीआरला आघाडी मिळवून देताना संघाचा दुसरा गोल केला. कर्णधार वाँग शाँगने दिलेल्या पासवर चेंडूला अचूकपणे गोलजाळ्याची दिशा देत शानशानने शानदार गोल केला. पुढच्याच मिनिटाला टँगने व्हिएतनामच्या बचावफळीची कमजोरी हेरली आणि तिने व्हिएतनामच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत चायना पीआरचा तिसरा गोल केला. यासह चायना पीआरने सामन्याचे चित्र स्पष्ट करताना ३-१ गोलने विजय निश्चित केला.
८८व्या मिनिटाला व्हिएतनामला पेनल्टी किक मिळाली. ली मेनग्वेनच्या हाताला चेंडू लागल्याने व्हिएतनामला पेनल्टीद्वारे काही प्रमाणात पुनरागमन करण्याची चांगली संधी मिळाली. पण एनग्युयेन थी बिच थ्यूने मारलेल्या किकवर गोल होऊ शकला नाही आणि चायना पीआरचा विजय स्पष्ट झाला.
पुणे ३० जानेवारी २०२२: जी सो युन हिच्या लांबवरून मारलेल्या गोलमुळे कोरिया रिपब्लिक संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या एकमात्र गोलच्या जोरावर त्यांनी गतउपविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १-० गोलने पराभव केला. हा सामना रविवारी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झाला.
सामन्याला दोन मिनिटे बाकी असताना चेल्सीची मध्यरक्षक जी युन हिने २५ यार्डावरून मारलेल्या अफलातून किकने कोरिया रिपब्लिकचा विजय साकार केला. विशेष म्हणजे त्यापूर्वी कोरिया रिपब्लिकच्या चो सो ह्यून हिला पेनल्टी साधण्यात अपयश आले होते. कोरियाची गाठ आता आज रात्री होणाऱ्या चायनीज तैपेई आणि फिलिपिन्स यांच्यातील विजेत्याशी पडणार आहे.
जी हिच्या गोलमुळे तिची क्लब सहकारी सॅम केर हिचा खेळ झाकोळला गेला. आज सॅमला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही. सामन्याच्या सातव्या मिनिटाला केर हिला गोल करण्याची संधी चालून आली होती. लांबवरून आलेला पास छातीवर घेत तिने चेंडू क्लिअर करून जोरदार किक मारली. मात्र, ती गोलपोस्टच्या वरून बाहेर गेली. त्यानंतर १२ मिनिटांनी ऑस्ट्रेलियाला गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली होती. या वेळी देखिल केर हिलाच गोल करण्याची संधी होती. पण, तिचा हा प्रयत्नही फसला.
त्यानंतर बेल यांच्या कोरिया रिपब्लिक संघाला गोल करण्याची संधी आयतीच चालून आली. पंचांनी व्हिअेआर (वारचा) आधार घेत कोरिया रिपब्लिकला पेनल्टी किक बहाल केली होती. ऑस्ट्रेलियाची कॅटलिन फूर्ड हिने कोरिया रिपब्लिकच्या ली जेऊन मिन हिला गोलकक्षात अडथळा निर्माण केला होता. पण, चो सो ह्यून हिला ही संधी साधता आली नाही. तिने मारलेली किक लिडिया विल्यम्सच्या क्रॉसबारवरून बाहेर गेली.
पूर्वार्धात पेनल्टी हुकल्यानंतर उत्तरार्धात कोरिया रिपब्लिकच्या मुलींनी अधिक आत्मविश्वासाने खेळ केला. उत्तरार्धात खेळ सुरू झाल्यावर सहाव्याच मिनिटाला चोए यु री हिची किक ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक विल्यम्स हिने अप्रतिम अडवली. त्यानंतर चार मिनिटांनी सो ह्यून हिचे हेडर विल्यम्सनेच सुरेख अडवून कोरिया रिपब्लिकच्या आक्रमकांना निराश केले.
सामन्याला १५ मिनिटे बाकी शिल्लक असताना केर हिचे प्रयत्न फोल ठरत होते. तिचे अनेक प्रयत्न दिशाहीन होते. राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या कोर्टनी व्हिने हिने उजव्या बगलेतून सुरेख चाल रचून केर हिच्यासाठी चांगली जागा केली होती. मात्र, केर आज तिच्या लयीत नव्हती. तिची किक बाहेर गेली.
त्यानंतर सामन्याला दोन मिनिटे बाकी असताना जी हिने निर्णायक गोल मारला. मैदानात ३० यार्डावर त्याने चेंडूचा ताबा मिळविला. तेथून ती चेंडू घेऊन सुसाट निघाली. परिस्थितीच अंदाज घेत तिने उजव्या बाजूने जोरदार मारलेल्या किकने विल्यम्सला चकवले आणि चेंडू जाळीत गेला.
मुंबई, दि. ३० : राज्यातील यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे १२ कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने सहमती दर्शवली असून तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डिझेलच्या परताव्यामुळे मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेल तेलावरील विक्रीची प्रतिपूर्ती करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाची योजना असून या योजनेसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये ६० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. यापूर्वी ४८ कोटी रुपयांचा निधी मत्स्यव्यवसाय विभागाला वितरीत करण्यात आला होता. डिझेल परताव्याचा वाढत चाललेला अनुशेष पाहता उर्वरित १२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी सातत्याने पाठपुरावा केला, या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत ६० कोटी रुपयांपैकी उर्वरित १२ कोटी रुपये वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.
महाराष्ट्रात सध्या १६० मच्छीमार सहकारी संस्थांच्या ९६४६ यांत्रिकी नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्यात आला असून डिझेल परताव्याची रक्कम मिळणार असल्याने मासेमारी यांत्रिकी नौकाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालघर-६८ लाख , ठाणे – ७४ लाख, मुंबई -उपनगर ४ कोटी २७ लाख, मुंबई शहर- २ कोटी, रायगड-२कोटी, रत्नागिरी- २ कोटी) आणि सिंधुदुर्ग – ३१ लाख याप्रमाणे जिल्हानिहाय डिझेल परताव्याची रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिल्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
मुंबई, दि. ३० :- महात्मा गांधी यांच्याकडे केवळ व्यक्ती म्हणून पाहता येणार नाही, त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असून जगभर ते प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि करिअर कौन्सिलर आशुतोष शिर्के यांनी केले. अहिंसा, प्रेम, सहिष्णुता आणि सत्याग्रहाचे गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार’ या विषयावर श्री.केतकर आणि श्री.शिर्के यांच्या व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या.
खासदार कुमार केतकर म्हणाले, महात्मा गांधी ही विचारधारा आहे. त्यांच्या विचारांचे अनुयायी जगभर आढळतात. अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग पासून बराक ओबामा तसेच रशियाच्या गोर्बाचेव्ह पर्यंत महासत्तांचे राष्ट्राध्यक्ष देखील गांधीजींच्या विचारांपासून प्रेरणा घेत असत. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ मौन पाळून थांबता येणार नाही, तर गांधीजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. शस्त्रास्त्रे ही केवळ विध्वंस करू शकतात असा विचार मांडणाऱ्या गांधीजींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारून सत्याग्रहाच्या मार्गाने त्याचा प्रसार केला. सर्वांना सुख समाधानाने जगायचे असेल तर सर्वांना अहिंसेच्या मार्गानेच जावे लागेल, या त्यांच्या विचाराने जगभर प्रेरित झालेले अनेकजण आजही त्यांचा विचारांचा प्रसार करताना आढळतात.
श्री.केतकर म्हणाले, साधे राहणीमान असणाऱ्या आणि मर्यादित भाषा जाणणाऱ्या गांधीजींचे विचार काश्मिर पासून तामिळनाडूपर्यंत पोहोचत होते. मराठी येत नसतानाही त्यांच्या विचारांचा पगडा महाराष्ट्रातही होता. विनोबा भावे हे गांधी विचारांचा प्रसार त्यांच्या आश्रमातून करत. सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता हे बिरूद पहिल्यांदा लावले. गांधीजी सर्व धर्म समभाव मानणारे, श्रमाला महत्त्व देणारे होते. त्याच विचाराने भारत देश सर्वधर्मसमावेशक राष्ट्र बनला. गांधीजींच्या विचारांमुळे संस्थाने वेगवेगळी स्वतंत्र न होता भारत एकसंघ राहून एकात्मता टिकून राहिली.
अमेरिका आणि रशिया महासत्ता झाले आणि जगात दोन गट तयार झाले. तथापि, सर्व जग एक असावे अशा विचारांमुळे पंतप्रधान पं.नेहरूंच्या पुढाकाराने अलिप्त राष्ट्रांची संघटना स्थापन झाली. यात पुढे १६९ देश सहभागी झाले. याद्वारे गांधीजींचा विचारच नेहरूंनी पुढे नेल्याचे श्री.केतकर यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रामध्ये लोकांच्या सहकार्याने अनेक कंपन्या उभ्या करून नेहरूंनी आत्मनिर्भर होण्याकडे पावले उचलली. पुढे इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून खेड्यापाड्यांपर्यंत बँका पोहोचविल्या आणि शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचवायला सुरूवात केली. त्यांच्या आर्थिंक विकासाच्या धोरणांमुळे देश खऱ्या अर्थाने प्रगती करू लागल्याचे त्यांनी सांगितले.
आशुतोष शिर्के यांनी विद्यार्थ्यांना पुढे जी आव्हाने येतील, समस्या येतील याचा शोध घेण्याचा आणि त्यावर मात करून मार्गक्रमण करण्याचा शिक्षणाचा उद्देश असल्याचे सांगितले. आताचे विद्यार्थी जेव्हा उद्याचे नागरिक बनतील तेव्हा त्यांच्यापुढे ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणाचा ऱ्हास ही महत्त्वाची समस्या उद्भवणार असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या रॉब ग्रीनफिल्ड, सुनिता नारायण, स्व.राजेंद्र पचौरी, लॉरी बेकर, अल गोर आदींची उदाहरणे देऊन या सर्वांमध्ये गांधीजींचे विचार हा दुवा होता. या मंडळींनी जेव्हा काम करायला सुरूवात केली तेव्हा त्यांना कुठल्यातरी वळणावर गांधीजींचा विचार भेटला, गांधीजींचे विचार त्यांचे प्रेरणास्त्रोत होते, असे ते म्हणाले.
श्री.शिर्के म्हणाले, जगभरात अनेक ठिकाणी अनेक बाबींची अती उपलब्धता आहे तर काही ठिकाणी काहीच मिळत नाही. अशा प्रश्नांवर काम करणाऱ्यांपैकी बांग्लादेशच्या मुहम्मद युनुस सारख्यांमध्ये गांधी विचार आवर्जून पुढे येतो. हिंसा, कलह आदींचा विचार करता मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, बराक ओबामा, जुआन सँटोस यांनी देखिल गांधींचा विचार स्वीकारावा लागेल, असेच सांगितले. सामाजिक न्यायासाठीची चळवळ उभारणारे सीझर शावेझ यांनाही गांधी नावाचा मार्गदर्शक भेटतो. या पार्श्वभूमीवर आज विद्यार्थी, पालक, शिक्षक म्हणून आपण काय करू शकतो, हा विचार करण्याची आवश्यकता असून अहिंसा, प्रेम, सहिष्णुता, सत्याग्रह हे विचार अंगिकारण्याची आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्नांची गरज त्यांनी प्रतिपादित केली. आज जे असत्य आपल्याभोवती येते त्यातील फेक न्यूज कशी ओळखायची हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी शाळाशाळांमधून राबवला जावा, असे आवाहन त्यांनी केले. शालेय शिक्षण विभाग गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याचा स्तुत्य प्रयत्न करीत असल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी महात्मा गांधीजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी ते विचार अंगिकारावेत, असे आवाहन केले.
करवीर तालुक्यातील विद्या मंदिरच्या राहूल भोसले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या आवडीचे भजन सादर केले. विकास गरड यांनी व्याख्यानमालेचे सूत्रसंचलन केले.
पुणे : माजी महापौर वत्सला आंदेकर यांचे दीर्घ आजाराने गुरुवार पेठेतील राहत्या घरी निधन झाले. ‘अक्का’ नावाने त्या प्रसिद्ध होत्या. त्या 69 वर्षाच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्यात आजारी होत्या. सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 2 वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा विकार होता. काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या
.1998-99 मध्ये वत्सला आंदेकर महापौर होत्या. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी त्यांनी वत्सला आंदेकर यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती . सुरेश कलमाडी यांनी उपेक्षित घटकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाचा सन्मान पोहोचविला .त्यातील आंदेकर या एक होत्या . त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार करण्याची कोणाची हिम्मत होत नसे .त्यांच्या कारकिर्दीत कधीही कुठल्याही टेंडर साठी विवाद झाल्याचे हि अक्धी दिसले नाही .नागरी सुविधा देण्यासाठी त्यांचा सोडा ,त्यांच्या पीए चा फोन पुरेसा होता .
माजी महापौर वत्सलाताई आंदेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
“पुण्याच्या माजी महापौर वत्सलाताई आंदेकर यांच्या निधनाने पुणे शहरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील धडाडीच्या कार्यकर्त्या हरपल्या आहेत. पुणे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून वत्सलाताईंनी शहराच्या विकासात भरीव योगदान दिले. आंदेकर घराण्याला असलेला राजकीय, सामाजिक वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. वत्सलाताईंच्या कुटूंबियांना, आप्तांना, कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. वत्सलाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” -उपमुख्यमंत्री अजित पवार.
नवी मुंबई ३० जानेवारी २०२२ : जपानने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना थायलंडचा ७-० गोलने धुव्वा उडवला. डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात जपानने जबरदस्त आक्रमक खेळ करताना थायलंडला कोणतीही संधी दिली नाही. या शानदार विजयासह दोन वेळच्या विजेत्या आणि गतविजेत्या असलेल्या जपानने २०२३ साली ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंड यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रताही मिळवली.
उपांत्य सामन्यात जपानचा सामना चीन विरुद्ध व्हिएतनाम यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल. दुसरीकडे, १९८३ सालानंतर पहिल्यांदाच महिला आशिया चषक उंचावण्याची थायलंडचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, असे असले तरी प्ले ऑफ सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करुन विश्वचषक स्पधेर्साठी पात्र ठरण्याची संधी त्यांच्याकडे आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्याने थायलंडला आपल्या काही खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये जपानविरुद्ध खेळावे लागले. याचा मोठा फटका त्यांना बसला. युइका सुगासवा हिने चार गोल नोंदवत जपानच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. हिनाता मियाझावा, रिन सुमिदा आणि रिको युएकी यांनी प्रत्येकी एक गोल केला.
जपानने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत अल्पावधीतच सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. माना इवाबुचीने दोन वेळा आक्रमण केल्यानंतर १४व्या मिनिटाला जपानला आघाडीवर नेण्याची सुवर्ण संधी गमावली. पेनल्टी बॉक्समध्ये थायलंडच्या विलैपोर्न बूथडुआंग हिने रिन सुमिदाला पाडून फाऊल केल्याने जपानला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. यावेळी मानाने मारलेली किक थायलंडची गोलकीपर वारापोर्न बून्सिंगने अचूकपणे रोखत जपानला आघाडी घेण्यापासून दूर ठेवले.
यानंतरही बून्सिंगने अडखळत का होईना, पण जपानचे आक्रमण रोखले आणि २७व्या मिनिटाला तिने जपानला गोल करु दिले नाही. मात्र, २७व्या मिनिटाला युइका सुगासवाने गोलजळ्याच्या बरोबर समोरुन जोरदार किक मारत जपानला १-० गोल असे आघाडीवर नेले. थायलंडने यानंतर कडवा प्रतिकार करत पुन्हा एकदा भक्कम बचाव केला. मात्र मध्यंतराच्या काही सेकंद आधी हिनाता मियाझावानेही गोलजाळ्याच्या जवळून अचूक किक करत जपानची आघाडी २-० गोल अशी भक्कम केली.
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला सुमिदाने जपानचा तिसरा गोल नोंदवत थायलंडच्या स्वप्नांना सुरुंग लावला. तिसरा गोल स्विकाराल्यानंतर थायलंडने काहीसे सावरत असतानाच जपानने मात्र आपला खेळ आणखी वेगवान करताना सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. थायलंडकडून काहीसा धुसमुसळा खेळही झाला. फोनफिरुन फिलावनने सुगासवाला खाली पाडल्याने जपानला आणखी एक पेनल्टी किक मिळाली. या संधीचा फायदा घेत सुगासवा हिने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल केला.
जपानचा वेग झाला नाही. उर्वरीत वेळेत जपानने आणखी ३ गोल केले. रिको युएकीने ७५ व्या मिनिटाला गोल केला. पाच मिनिटांनी सुगासवाने आपली हॅटट्रिक पूर्ण करत संघाचा सहावा गोल केला आणि यानंतर ८३व्या मिनिटाला वैयक्तिक चौथा गोल करत जपानच्या ७-० गोलने दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंबई, दि, 30 : राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. या परवानगीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने देखील प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
मुंबईच्या आयएनएचएस अश्विनी कुलाबा येथील इन्स्टिट्यूट ऑफ नेवल मेडिसिन या संस्थेमध्ये एम.डी. (मरीन मेडिसीन) हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतो, या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता दोन जागांनी सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एमबीबीएस या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 80 वरुन 100 करण्यास मान्यता दिली आहे. अमरावतीच्या शिवाजीनगर येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.डी. (पेडियाट्रिक्स) हा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम 2 विद्यार्थी प्रवेश क्षमतेने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांमधील मान्यता मिळालेल्या वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार राहणार आहे. सदर प्रवेश क्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सर्व अभ्यासक्रमांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.
मुंबई, दि. ३०:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची उर्मी जागवतानाच महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली. बलाढ्य राजवट उलथून टाकली अन् भारतीयांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सुर्योदय झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपली लोकशाही आणखी बळकट व्हावी यासाठी महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसा, समता-बंधुता या तत्वज्ञानाचे पदोपदी स्मरण व्हावे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.’ 000
पुणे- राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर काँग्रेस भवन ते महात्मा गांधी पुतळा, पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत दुचाकी वरून ‘‘प्रभात फेरी’’ काढण्यात आली. पुणे स्टेशन येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास शहराध्यक्ष रमेश बागवे व स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची ७४ वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या अहिंसा आणि सत्याग्रही मार्गामुळेच ब्रिटिश सरकारला भारत सोडून जावे लागले. गांधींजींनी दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून आपल्या आंदोलनाला सुरूवात केली होती. भारतात परतल्यावर त्यांचे गुरू गोपाळकृष्ण गोखले यांच्या प्रेरणेने त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरोधात अनेक आंदोलने केली. असहकार चळवळ, दांडीयात्रा, बारडोली सत्याग्रह, चंपारण्य सत्याग्रह, सविनय भंग चळवळ व ‘छोडो भारत’ आंदोलन अशा विविध प्रकारची आंदोलने केली. पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, खान अब्दुल गफार खान, सरोजनी नायडू आदी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांनी स्वातंत्र्यांला चळवळ एक वेगळी दिशा दिली. समाजातील सर्व घटकांना एकत्र करून शांतीचा व पुरोगामी विचाराचा संदेश जगाला दिला. त्यांच्या विचारांना प्रेरित होवून मार्टिन ल्युथर किंगने अमेरिकेत व नेल्सन मंडेलाने द. आफ्रिकेमध्ये वर्णभेदाच्या विरोधात आंदोलन छेडले. आज १८० देशात महात्मा गांधींचे पुतळे आहेत. आज देशात नथुराम गोडसेच्या विचारसरणीची काही मंडळी देशामध्ये जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. या विचारसरणीच्या लोकांचा योग्यवेळी बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा देशात अनर्थ घडेल. आजच्या पिढीने गांधीजींचा अहिंसेचा मार्ग व विचार घेवून पुढे चालले पाहिजे त्यामुळेच देशाची आणि जगाची प्रगती होईल. या महाननेत्यांला मी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.’’
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक अरविंद शिंदे, माजी आमदार दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी यांचीही भाषणे झाली.
यावेळी उपाध्यक्ष शिवाजी केदारी, हाजी नदाफ, महिला अध्यक्षा पुजा आनंद, युवक अध्यक्ष विशाल मलके, नगरसेविका लता राजगुरू, अविनाश बागवे, अजित दरेकर, रमेश अय्यर, नुरूद्दीन सोमजी, वाल्मिक जगताप, द. स. पोळेकर, अरुण वाघमारे, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रविण करपे, रमेश सकट, अजित जाधव, रजनी त्रिभुवन, मुन्नाभाई शेख, अविनाश अडसुळ, किरण मात्रे, मेहबुब नदाफ, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्हिड, विनोद रणपिसे, अनुसया गायकवाड, सुंदरा ओव्हाळ, विजय वारभुवन, ज्योती परदेशी, सुविधा त्रिभुवन, गणेश शेडगे, राहुल तायडे, लतेंद्र भिंगारे, विठ्ठल गायकवाड, कन्हैय्या मिनेकर, राजू शेख, सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.
मुंबई-आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. राहुल गांधींनी ट्वीट करत आजच्याच दिवशी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली होती, असं म्हटलंय. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, की गोडसे जर खरा हिंदुत्ववादी असता तर जिनाला गोळी मारली असती. गांधींना का गोळी मारली. पाकिस्तानची मागणी तर जिनांनी केली होती. असं ते म्हणाले. “मर्दानगी होती, तर गांधींना का मारलं, जिनांना का मारलं नाही, असा सवाल राऊतांनी केला. वेगळ्या पाकिस्तानची मागणी जिनांनी केली होती. जर गोळी मारणारा खरा हिंदुत्वावादी होता आणि त्याच्यात हिम्मत होती, तर फाळणीला कारणीभूत असलेल्या जिनांवर गोळी झाडायला हवी होती, नि:शस्त्र गांधींवर का गोळी झाडण्यात आली. गांधींच्या काही भूमिकांवर टीका होऊ शकते, परंतु त्यांच्यावर टीका होऊच शकत नाही, क्रांतीकारक म्हणून त्यांचं योगदान असामान्य होतं. कोणताही राष्ट्रभक्त गांधींवर कधीच गोळ्या झाडू शकत नाही,” असं राऊतांनी सांगितलं.
पुणे ःमहाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल आणि ‘संविधान घर ‘ यांच्या तर्फे ३० जानेवारी २०२२ रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित गांधी भवन, कोथरूड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी दरवर्षीप्रमाणे गांधी भवन येथे सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत गांधी आश्रमातील सामुदायिक प्रार्थना यावेळी संदीप बर्वे , बाबा बीडीवाले आणि गांधी भवनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सादर केली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांचे ‘गांधी समजून घेताना ‘ या विषयावर व्याख्यान झाले.यावेळी बोलताना ते म्हणाले, गांधी, स्वातंत्र्यलढा आणि संविधान ही त्रिमूर्ती आहे. जो सच्चा भारतीय आहे तो तिन्ही मूर्तींना मानेल. तीनपैकी एका मूर्तीला मानतो तो खोटारडा आहे.सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाचा सिध्दांत मांडला. स्वातंत्र्य लढ्याला कायम विरोध केला. ते पुढे म्हणाले, हिंदुत्ववाद आणि हिंदुत्ववादाची बदनामी हिंदुत्ववादीच करतात. नथुराम गोडसे हिंदुत्ववादी होता तो पुण्यातला असावा याची खंत वाटल्याने मामासाहेब देवगिरीकरांनी महाराष्ट्र स्मारक निधीची जबाबदारी स्विकारली. भगवे कपडे घालणारे लोक हरिद्वारच्या धर्म संसदेत मुसलमानांना संपविण्याची भाषा करतात, हत्यारे उचलायला सांगतात हा भगव्या रंगाचा अपमान आहे. आपली ही जबाबदारी आहे की , या प्रवृत्ती विरोधात आपण लढले पाहिजे. शांतीने जो राहतो तोच खरा आनंदी आहे. हिंसा करून शत्रूचा नाश होतो असे नाही तर आत्मनाश, परनाश आणि सर्वनाश होतो. महात्मा गांधी म्हणायचे मी १२५ वर्षे जगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु नथुराम गोडसे म्हणायचे मी त्यांना इतकी वर्ष जगू देणार नाही. पुण्यातूनच गांधी हत्येचे षडयंत्र रचले गेले . त्यामुळे गांधीजींच आणि पुण्याच एक वेगळ नात आहे. हिंदुराष्ट्राच स्वप्न साकार झाला नाही म्हणून नैराश्याने गांधीचा खून करण्यात आला. यावेळी डॉ. प्रवीण सप्तर्षी, प्रशांत कोठडीया, डॉ. उर्मिला सप्तर्षी, कृतार्थ शेवगांवकर, गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक श्री . खानविलकर , श्रीधर रायरीकर, डॉ. संतोष म्हस्के, पथारी व्यावसायिक संघटनेचे दीपक मोहिते, महाराष्ट्र स्मारक निधीचे विश्वस्त एम.एस. जाधव, युक्रांदचे पदाधिकारी संदीप बर्वे,जांबुवत मनोहर , अप्पा अनारसे , शालिनी पंडीत, प्रा. निलम पंडित , निर्भय गायकवाड , विनय शेडगे व नागरीक उपस्थित होते. सकाळी ११ वाजता मिनी थिएटरमध्ये श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘ संविधान ‘ या मालिकेचे दोन भाग दाखवून त्यावर चर्चा आयोजित करण्यात आली .
मुंबई, दि. 30 :- राष्ट्रपिता महात्मा गांधीं ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार आहे. गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या मूल्यांचं महत्त्व जगाला समजावून सांगितलं. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढला. साधी राहणी, उच्च विचारांचा आदर्श प्रस्थापित केला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचं कल्याण आहे ही शिकवण दिली. खेडी स्वयंपूर्ण झाली तरंच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजींच्या विचारातच देशाचं, जगाचं, मानवाचं कल्याण सामावलं आहे. महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत. त्या विचारांवर चालण्यासाठी आपण पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधींजींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या शहीद वीरांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनाही हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केले आहे.
नवी दिल्ली -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 74 वी पुण्यतिथी आहे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल यांनी महात्मा गांधी यांचे आवडते भजन रघुपति राघव राजा राम आणि गांधीच्या चश्माचा फोटो ट्विटर शेअर केला आहे.
एक हिंदुत्ववादी ने गाँधी जी को गोली मारी थी। सब हिंदुत्ववादियों को लगता है कि गाँधी जी नहीं रहे।
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एका हिंदुत्ववादीने महात्मा गांधींची हत्या केली होती. सर्व हिंदुत्ववाद्यांना असे वाटते की, गांधीजी जिंवत नाहीत, मात्र जिथे सत्य आहे, तिथे गांधीजी नेहमी जिंवत राहतील. असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 30 जानेवारी 1948 रोजी नाथूराम गोडसेनी महात्मा गांधी यांनी गोळी झाडून हत्या केली होती. त्यामुळे या दिवसाला शहीद दिवस म्हणून साजरा केले जाते.
पुणे :माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ७१ रोपे लावून वृक्षारोपण कार्यक्रम आज”स्मृतिवन”-नागरी वन उद्यान गणपती माथा, वारजे टेकडी येथे उत्साहात झाला तेर पॉलिसी सेंटर च्या वतीने आज सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमात तेर पॉलिसी सेंटर च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर,आमदार भीमराव तापकिर, डॉ. संजय बुटाला, शिवराम मेंगडे, आदित्य माळवे आदी पदाधिकारी, वन खात्याचे अधिकारी,नागरिक उपस्थित होते.
‘संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याविषयी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, कार्बन उत्सर्जन तातडीने कमी करण्याची गरज असून त्यासाठी वृक्षलागवड हा महत्त्वाचा उपाय आहे त्याचप्रमाणे आगामी काळात नागरी वने हा ध्यास व्हावा, ‘ असे प्रतिपादन माजी केंद्रीय वने व पर्यावरण, हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या कार्यक्रमात केले. ते म्हणाले, ‘ देशभरात नागरी वने ही चळवळ झाली पाहिजे. वारजे नागरी वनाचा पुढील टप्पा लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे. प्रत्येकाने वाढदिवसाला वाढीचे प्रतिक म्हणून झाडे लावली पाहिजेत. वारजे टेकडी नागरी वन हा यशस्वी प्रकल्प : डॉ. विनिता आपटे
वारजे शहरी वनक्षेत्र हा अतिक्रमणाच्या सावटाखाली असणारा असाच एक भाग होता. २०१५ साली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निर्देशांनुसार वारजेला पर्यावरण आणि परिसंस्थेच्या दृष्टीने एक ‘हरितस्थळ’ म्हणून रूपांतरित करण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी – खासगी (PPP) भागीदारीतून हे ‘स्मृतीवन’ अस्तित्वात आले असून २०१५ ते २०२२ या काळात वारजे येथे सुमारे साडेसात हजार झाडे लावली गेली जी आता २० ते २० फूट उंच वाढली आहेत. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतिनिमित्त झाडे लावली आणि ती दत्तक घेतली, असे डॉ. विनिता आपटे यांनी सांगीतले.