Home Blog Page 2105

२० दिवसांच्या कालावधीत गुंठेवारी नियमितीकरणासाठी अत्यल्प प्रस्ताव दाखल,प्रोत्साहनपर योजना आणणार.

0

पुणे : गुंठेवारीची घरे नियमित करण्यासाठीची प्रक्रिया १० जानेवारीपासून महापालिकेने सुरू केली आहे. त्यास जवळपास २० दिवसांचा कालावधी झाला. बांधकामे नियमित करण्यासाठी घातलेल्या अटींमुळे २० दिवसांच्या कालावधीत नियमितीकरणासाठी अत्यल्प प्रस्ताव दाखल झाले आहेत. तर नियमितीकरणाची अंतिम मुदत संपण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. या कालावधीत तरी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव दाखल व्हावेत, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.शहराच्या हद्दीतील अधिकाधिक गुंठेवारीची बांधकामे नियमित व्हावीत, तसेच अशी बांधकामे नियमित करून घेण्यासाठी पुढे येणाऱ्या नागरीकांना सहकार्य मिळावे, या हेतूने पुणे महापालिका प्रोत्साहनपर योजना लागू करण्याचा विचार करीत आहे.

१) गुंठेवारीची बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या आर्किटेक्ट अथवा इंजिनिअरमार्फत प्रस्ताव दाखल करावा लागणार.
२) नियमितीकरणाचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करावे लागणार.
३) असे प्रस्ताव दाखल करताना नागरीकांना अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्यासाठी प्रतीप्रस्ताव पाच हजार रुपये मानधन देण्याची शिफारस केली आहे

महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या परवानाधारक आर्किटेक्ट अथवा इंजिनिअर्स यांना प्रती प्रकरण पाच हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
गुंठेवारी कायद्यांतर्गत बांधकामे नियमित करण्याची मुदत राज्य सरकारने मध्यंतरी वाढविली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे या कायद्यान्वये नियमित करता येणार आहे. महापालिकेने अशी बांधकामे नियमित करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत अशी अधिकाधिक बांधकामे नियमित व्हावीत. तसेच बांधकामे नियमित करून घेणाऱ्या नागरीकांना सहकार्य मिळावे, यासाठी ही प्रोत्साहनपर योजना लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता घेऊन ही योजना शहरात लागू करणार असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची माहिती आज खुली होणार, पहा कसा असेल प्रभाग रचनेचा कार्यक्रम

0

पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्याची महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ नंतर महापालिकेच्या संकेतस्थळासह, महापालिका भवन व सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रभागाची माहिती व नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरवात झाली आहे. २८ जानेवारी रोजी आयोगाने महापालिकेने तयार केलेला आराखडा मंजूर केल्यानंतर आता तो नागरिकांना हरकती सूचना नोंदविण्यासाठी खुला केला जाणार आहे. त्यामध्ये प्रभागाची चतुःसिमेसह प्रभाग निहाय व एकत्रित असे नकाशेही जाहीर केले जाणार आहेत.

पुणे महापालिका भवनाच्या विस्तारित नव्याइमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर प्रारूप प्रभाग रचना पाहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच क्षेत्रीय कार्यालय निहाय संबंधित प्रभागांचे स्वतंत्र नकाश नागरिकांसाठी उपलब्ध असतील. महापालिकेच्या संकेतस्थळावरही ही माहिती असणार आहे.

  1. प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे – १ फेब्रुवारी
  2. अधिसूचनेवर हरकती व सूचनांसाठी मुदत – १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी
  3. हरकती व सूचनांचे विवरणपत्र आयोगाला सादर करणे – १६ फेब्रुवारी
  4. हरकती व सूचनांवर सुनावणीसाठी अंतिम मुदत – २६ फेब्रुवारी
  5. सुनावणीनंतर शिफारशींसह विवरणपत्र आयोगाला पाठविणे – २ मार्च

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका !: नाना पटोले

0

मुंबई:दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद मध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, कॉलेज बंद असली तरी शिक्षणात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मविआ सरकारने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरुच ठेवलेले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्या पूर्ववत सुरु कराव्यात तसेच परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात अशी मागणीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी विचार करूनच सरकारने निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी व पालक यांना अजूनही काही शंका, समस्या असतील तर त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाऊ शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणे चुकीचे आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पुढे करत काही पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यावर राजकारण करणे अयोग्य आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना एमपीएससीच्या परिक्षेचा मुद्दा घेऊन अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून काही राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. या आंदोलनातून अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागणही झाली होती. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वात महत्वाचे आहे. सरकारने शिक्षणासंदर्भात सर्व स्तरातील लोक, विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ यांची मते विचारात घेतलेली आहेत असे असताना विद्यार्थ्यांच्या आडून राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, विद्यार्थ्यांना भडकवू नका, विद्यार्थ्यांनीही अभ्यासावर लक्ष द्यावे. मविआ सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी मी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

पुण्यात गुरुवार दि 3 रोजी या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद

0

पुणे : गुरुवार (दि.3) पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती LLR टाकीचे मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनला जोडण्यासाठीचे कामामुळे व नवीन होळकर व चिखली पम्पिंग भाग , भामा आसखेड जलकेंद्र परिसर येथील विद्युत / पम्पिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवार (दि.4) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :
1 ) पर्वती ( LLR ) जलकेंद्र परिसर : – शहरातील सर्व पेठा बुधवार (दि. 2) रात्री 10 ते गुरुवार (दि. 3) रात्री १०.०० पर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. शुक्रवार (दि. 4) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. डेक्कन परिसर , शिवाजीनगर परिसर , भवाजी पेठ व नाना पेठ येथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे .

2) सहकार नगर : – सहकार नगर नं . 2मधील सर्व भाग , शाहू वसाहत , लक्ष्मी नगर मनपा शाळा क्र . 111 चा भाग या परिसरातील गुरुवार दि ./03/2022 पाणीपुरवठा दु . 12.00 ते रात्री 8.00 पर्यंत बंद राहणार आहे .

3) लष्कर जलकेंद्र परिसर : – बेकर हिल जुन्या टाकीवर अवलंबून असणारा कौसर बाग परिसर , एन . आय.बी.एम. रोड , उंड्री रोड , साळुंके विहार रोड , उजवीबाजू , लोणकर गार्डन परिसर , वानवडी परिसर काही भाग , कोंढवा गावठाण , बेकर हिल जुन्या टाकीवर अवलंबून असणारा कौसर बाग परिसर , एन . आय.बी.एम. रोड , उंड्री रोड , साळुंके विहार रोड , उजवीबाजू , लोणकर गार्डन परिसर , वानवडी परिसर काही भाग , कोंढवा गावठाण , भाग्योदय नगर , मिठानगर , शिवनेरी नगर , गल्ली क्र . 1. स.नं. 354, ब्रम्हा इस्टेट , कृष्णा केवल , फकरी हिल , कुबेरा पार्क , ब्रम्हा एव्हेन्यू , शिवगंगा कॉम्प्लेक्स , निवृत्ती एन्क्लेव्ह , माउंटकार्मल स्कूल , सहाणी सुजाणा पार्क , लुल्ला नगर , संपूर्ण परिसर . | वानवडी , साळुंके विहार रोड दोन्ही बाजू , केदारी नगर , आझाद नगर , शांती नगर , शिवरकर रोड दोन्ही बाजू , विकासनगर , जगताप नगर , शिंदे छत्री , SRP गट क्र . 2 चा भाग , तात्या टोपे सोसायटी परिसर , शिवानंद , दयानंद सोसायटी , जगताप चौक व जांभूळकर चौक परिसर , संविधान चौक परिसर , रहेजा गार्डन , गंगा सॅटेलाईट परिसर .

4 ) नवीन होळकर व चिखली पम्पिंग भाग- विद्यानगर , तिन्ग्रे नगर , कळस , धानोरी , लोहगाव , मुला रोड इत्यादी .

5 ) भामा आसखेड जलकेंद्र परिसर : – लोहगाव विमान विश्रांतवाडी फुलेनगर येरवडा, वडगाव शेरी , कल्याणीनगर इत्यादी

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३ टक्के निधी कायमस्वरूपी – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0

मुंबई, दि. 31 : राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल सशक्तीकरण या सर्वसमावेशक योजनेकरिता (Umbrella Scheme) जिल्हा नियोजन समितीस नियोजन विभागाकडून मिळणाऱ्या एकूण निधीच्या किमान 3% इतका निधी कायमस्वरुपी महिला व बालविकास विभागाला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी दिली.

राज्यातील  महिला व  बालकांच्या सामाजिक, आर्थिक  व शैक्षणिक विकासाकरीता महिला  व बाल विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला व बाल सशक्तीकरण सर्वसमावेशक योजनेचे (Umbrella Scheme) मुख्य उद्दिष्ट महिला व बालकांचे सक्षमीकरण करणे हे आहे. महिला व बालकांचे सक्षमीकरण करताना महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणणे देखील आवश्यक असून त्याकरिता जिल्हाधिकारी प्राधान्याने जमीन उपलब्ध करून देतील. या जमिनीवर महिला व बाल विकास भवनाचे बांधकाम करण्यात येणार आहे. महिला व बाल विकास भवनाचे बांधकाम करण्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आलेल्या अमरावती पॅटर्नप्रमाणे बांधकाम करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील निर्माण करावयाच्या महिला व बाल विकास भवन करिता बांधकामासाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत थेट सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग  करण्यात येणार असून शिल्लक निधी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना वर्ग करण्यात येईल.

महिला सबलीकरण व बालकांचा विकास उपयोजना ‘अ’ यामध्ये जिल्हास्तरावर महिला व बाल भवनाचे बांधकाम करणे. जिल्हा व तालुका स्तरावरील महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय निरीक्षणगृहे, मुलींची शासकीय वसतिगृहे, महिलांसाठीचे राज्यगृहे, आधारगृहे, संरक्षणगृहे तसेच महिला व बाल विकास विभागाशी संबंधित गरज असलेल्या इमारतींचे शासन मान्यतेने बांधकाम व दुरुस्ती करणे. जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय कार्यालये व इमारतीमध्ये महिलांकरिता स्तनपानासाठी बंदिस्त कक्षाचे बांधकाम करणे. कोणत्याही कारणामुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावून अनाथ झालेल्या मुलांबाबत शासनाच्या मान्यतेने योजना राबविणे. कोणत्याही कारणामुळे पतीचे/ कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत शासनाच्या मान्यतेने योजना राबविणे याचा समावेश आहे.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण उपयोजना ‘ब’ यामध्ये महिला बचतगट मोहिमेच्या बळकटीकरणाकरिता जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय जागेवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाचे जागेवर महिला बचतगट भवनाचे बांधकाम करणे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकरिता प्रत्येक जिल्ह्याकरिता एक अशी एकुण 36 वाहने उपलब्ध करुन देणे. हे वाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी महिला बचतगटांच्या उत्पादक वस्तुला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी “समुदाय व्यवस्थापित संसाधन केंद्र” (CMRC) करिता महिला आर्थिक विकास महामंडळला (माविम) माल वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल.

एकात्मिक बालविकास सेवा योजना या उपयोजना ‘क’ यामध्ये अंगणवाडी केंद्रांचे नवीन बांधकाम करणे.  अंगणवाडी केंद्रांना नलिकांद्वारे पाणीपुरवठा करणे. अंगणवाडी केंद्रांना वीज पुरवठा करणे. अंगणवाडी केंद्रांतील स्वयंपाकघरांचे आधुनिकीकरण करणे. याचा समावेश आहे.

या अ,ब व क उपयोजनाच्या बाबतचे जिल्हा नियोजन समितीकडे प्रकरण सादर करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांची असेल. “सर्वसमावेशक योजना (Umbrella Scheme) अंतर्गत “त्रिस्तंभ धोरण (३ Pilar Strategy)” प्रमाणे एकूण 21 नवीन योजना (New Scheme)” राबविण्यात येणार आहेत

अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 31 : अवयवदान करण्याची चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

अवयवदान चळवळ व्यापक व्हावी यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहिमेची सुरुवात करण्यात आली. राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘हर घर है डोनर’ या अनोख्या मल्टी ऑर्गन आणि कॅडेव्हर दान जनजागृती मोहिमेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आरंभ केला.

अवयवदानाचा निर्णय ब्रेन डेड झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांकडून घेतला जातो. पण याबाबत पुरेशी आणि योग्यरित्या जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘हर घर है डोनर’ ही योग्य संकल्पना आहे. या चळवळीत शासन आणि स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या तरच जनजागृती होईल, असे श्री. टोपे म्हणाले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास, संचालक आरोग्य सेवा डॉ. रामास्वामी, यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा आरंभ करण्यात आला. यावेळी प्रोजेक्ट मुंबईचे शिशीर जोशी, रोटो-सोट्टो संस्थेच्या डॉ. सुजाता पटवर्धन, केईएमचे अधिष्ठाता डॉ. रावत आणि डॉ. अनिल उपस्थित होते.

प्रोजेक्ट मुंबई आणि रोटो-सोटो संस्था कुटुंबातील प्रत्येकाने अवयव दान करण्याची प्रतिज्ञा करावी यासाठी प्रयत्नशील आहेत. उपक्रमासाठी अमर गांधी फाऊंडेशन स्वयंसेवी संस्था मदत करत आहे.

यासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी शाळा, शैक्षणिक संस्था आणि गृहनिर्माण संस्थांपर्यंत पोहोचण्याचा प्रोजेक्ट मुंबईचा उद्देश आहे. इतर समविचारी संस्थांना सोबत आणण्याची योजना आखत आहोत जेणेकरून जागरूकता वाढेल, असे श्री.जोशी यांनी सांगितले.

‘हर घर है डोनर’ एक युनिट म्हणून देणगी देणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर जागरूकता आणि प्रतिज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी समुदायांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. प्रतिज्ञा फॉर्म www.projectmumbai.org वर मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या अंतिम निकाल

0

मुंबई-संतोष परब हल्ला प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या अंतिम सुनावणी होणार आहे. आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद पुर्ण झाला असून, उद्या दुपारी तीन वाजता अंतिम निकाल जिल्हा सत्र न्यायालय सुनावणार आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच 10 दिवसात न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार आज राणे शरण आल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात उद्या या प्रकरणात अंतिम निकाल दुपारी तीन वाजता न्यायालय सुनावणार आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना दिलासा मिळणार की अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकीलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही निराशाच पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना दहा दिवसात शरण येण्यास सांगितले होते.

काय आहे प्रकरण?

18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे.

कॉंग्रेसचे माजी नगरसेवक नाना वाबळे यांचे निधन

0

पुणे- कॉंग्रेसचे माजी नगसेवक नाना वाबळे (नरसिंग ऊर्फ नानासाहेब विठ्ठलराव वाबळे)यांचे आज येथे दुखःद निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते . काही दिवसांपासून ते आजारी होते . उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालविली . त्यांच्या मागे पत्नी २ विवाहित मुले असा मोठा परिवार आहे. त्यातील महेश वाबळे हे आता भाजपाचे विद्यमान नगसेवक आहे.

१९८५ साली बॅॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि प्रकाश ढेरे यांनी नानांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळवून दिली आणि ते या निवडणुकीत विजयी झाले . यावेळी २ वर्षे महापालिकेला वाढवून मिळाली त्यामुळे ते ७ वर्षे नगरसेवक होते. २ वेळा पी एम टी अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली . त्यांच्या काळात सुरुवातीला सहकार नगर मधील ‘जयंतराव टिळकनगर’ वसण्यास काहीसा विरोध झाला होता . पण त्यांनी त्यावेळी हिकमतीने तळजाई आणि जंगल परिसराचे रक्षण करणारी भूमिका घेत मर्यादा आखून घेऊन ते वसविण्यात मोलाचे योगदान दिले , भ्रष्टाचार विरोधी आणि, मेहनती, रात्री बेरात्री नागरिकांच्या मदतीला धाऊन जाणारा कॉंग्रेसचा एकनिष्ठ सेवक अशी त्यांची प्रतिमा होती .

बारामतीजवळच्या एका जळगाव कपया खेडेगावात जिरायती शेतीवर गुजराण करणारे शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला घरात चार भावंड आणि आई-वडील. घरातली गरिबी स्वस्थ बसू देईना. रोजगाराच्या शोधात त्यांनी पुण्याची वाट धरली. खासगी कंपनीत नोकरी करताना कामगार चळवळीत ते सहभागी झाले. या काळात बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या प्रचारात नानासाहेबांनी आघाडी घेतली. याची दखल थेट घेत त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप देखील टाकली.तत्कालीन शहर काँग्रेसचे अध्यक्ष पेनवाले यांनी त्यांना वॉर्ड अध्यक्षपदी नेमले. याच काळात साधारणपणे १९८० च्या सुमारास पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. पण अवघ्या १७५ मतांनी पराभव झाला.पुन्हा १९८५ साली निवडणुकीच्या रिंगणात उतरले.यावेळी मात्र मतदारांनी त्यांच्या कामाची पावती दिली.

महावितरणच्या ‘सौर ऊर्जा’ प्रकल्पांची वाटचाल जोमात- मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेच्या विकेंद्रीत प्रकल्पांना वाढता प्रतिसाद

0

मुंबई : महावितरणच्या विकेंद्रीत सौर कृषी ऊर्जा प्रकल्पांची वाटचाल जोमात सुरु आहे. प्रकल्पांसाठी वाढत्या प्रतिसादामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न साकार होऊ लागले आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजने अंतर्गत आतापर्यंत १४४० मेगावॅट क्षमतेचे करार करण्यात आले आहेत तर राज्यभरात १०८ सौर कृषिवाहिन्यांद्वारे सध्या ४५ हजार ६६४ शेतकर्‍यांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषिपंप वीज धोरण २०२० मध्ये कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषिवाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी महावितरण मार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सौर ऊर्जा प्रकल्पांना वेग देण्यावर अधिक भर दिला असून त्याप्रमाणे यंत्रणा देखील गतिमान झाली आहे. या योजनेमध्ये कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या ५ किलोमीटरच्या परिघात २ ते १० (२x५) मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौर प्रकल्प कार्यान्वित करून संबंधित कृषिवाहिनीद्वारे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणकडून सातत्याने निविदा काढण्यात येत आहेत. यापूर्वी १३०० मेगावॅटसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये प्रथम महावितरणला १११ मेगावॅटचा प्रतिसाद मिळाला होता. परंतु आणखी प्रतिसाद मिळावा यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी विशेष प्रयत्न केले. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या निविदांना प्रतिसाद मिळावा यासाठी यंत्रणेमार्फत प्रसिद्धी व प्रकल्पधारकांच्या संपर्क मोहिमेला वेग दिला. परिणामी नुकत्याच काढलेल्या निविदांना तब्बल ३८५ मेगावॅट क्षमतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

महावितरणकडून राज्यभरात विविध ठिकाणी उभारलेल्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांमधील १४४० मेगावॅट क्षमतेच्या वीजखरेदीचे करार करण्यात आले आहेत. त्यापैकी ३९६ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. त्यात लवकरच १११ मेगावॅटची आणखी भर पडणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणकडून सातत्याने निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर नुकत्याच झालेल्या निविदा प्रक्रियेत सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी आणखी ३८५ मेगावॅट क्षमतेचे प्रतिसाद प्राप्त झाले आहे. या प्रकल्पांशी देखील करार करण्याची पुढील कार्यवाही वेगाने सुरु आहे.

महावितरणच्या २७२५ उपकेंद्रांच्या ५ किलोमीटर परीघात कमीतकमी ३ तर जास्तीत जास्त ५० एकर क्षेत्रफळाच्या शासकिय व खासगी नापीक व पडीक जमिनी भाडेपट्टीवर घेण्यात येत आहे. राज्य शासनाने नाममात्र एक रुपया भाडे पट्टीवर ३० वर्षांसाठी शासकिय जमिनी घेण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक, समूहगट, सहकारी संस्था तसेच ग्रामपंचायतींच्या मालकीच्या जमिनींसाठी प्रतिएकर प्रतिवर्ष ३० हजार रुपये भाडे देण्यात येत आहे. तसेच भाडे पट्टीमध्ये दरवर्षी तीन टक्के वाढ होणार आहे.

आतापर्यंत राज्यातून सौर प्रकल्पांच्या जागांसाठी ११११ अर्जांद्वारे एकूण १६ हजार ४९ एकर जागेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तांत्रिक पाहणीमध्ये यामधील ४ हजार ८ एकर जमिन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे दिसून आले आहे. उर्वरित जागांची पाहणी करण्यात येत असून अर्ज मंजूरीची प्रक्रिया देखील युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. नापीक व पडीक जमिनी भाडे पट्टीवर देण्यासाठी जमीन धारकांनी नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ऑटोरिक्षा मीटर कॅलीब्रेशनकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

0

पुणे दि.३१-मीटर कॅलीब्रेशनकरिता प्रलंबित असलेल्या ऑटोरिक्षांची संख्या लक्षात घेऊन ऑटोरिक्षा परवानाधारक आणि चालकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑटोरिक्षा मीटर कॅलीब्रेशनकरिता २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मुदतवाढ दिली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेतर्फे मीटर तपासणीसाठी अलंकार पोलीस ठाण्यासमोर कर्वेनगर, फुलेनगर आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट इगलबर्ग कंपनी लेन नं ३, दिवे (पासिंग वाहने) आणि इयॉन आयटी पार्कजवळ खराडी पोलीस चौकीसमोर ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. रिक्षाचालकांनी मीटर कॅलीब्रेशन पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी वरीलपैकी नजीकच्या ट्रॅकवर सादर कराव्यात.

विहीत मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी १ दिवस परवाना निलंबित करण्यात येईल. निलंबन कालावधी किमान ७ दिवस तर कमाल ४० दिवस राहील. निलंबनाऐवजी तडजोड शुल्क भरण्याची तयारी असल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपयांप्रमाणे किमान ५०० रुपये तर कमाल २ हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही असे तडजोड शुल्क भरावे लागेल, असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.

राज्याच्या एनसीसी संचालनालयाच्या कठोर परिश्रमामुळे ‘प्रधानमंत्री ध्वज’ – क्रीडामंत्री सुनील केदार

0

मुंबई, दि. 28 : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने सात वर्षानंतर मोठ्या फरकाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री ध्वज’ चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करून दिला. महाराष्ट्राच्या एनसीसी  पथकातील छात्रसैनिक आणि अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे हे यश शक्य झाले असल्याचे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मंत्री श्री. केदार यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिक आणि अधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी मेजर जनरल वाय पी खटूरी, ब्रिगेडीअर श्री. लाहीरी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. केदार म्हणाले, महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) पथकातील छात्रसैनिकांनी नेत्रदिपक यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 17 वेळा प्रधानमंत्री ध्वजाचा बहुमान मिळाला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मागील वर्षी महाराष्ट्र हा प्रधानमंत्री ध्वजाचा उपविजेता ठरला होता. तर राज्याला  तब्बल सात वर्षांनी हा प्रधानमंत्री ध्वजाचा बहुमान मिळाल्याने या बहुमानाचे विशेष महत्त्व आहे. भविष्यात पुन्हा अशीच कामगिरी करावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

एनसीसीच्या वायुदलाच्या (सिनीयर विंग) बेस्ट कॅडेट्सचा बहुमान पटकाविणारी महाराष्ट्राची कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिचा मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. एनसीसी वायुदलाच्या बेस्ट कॅडेटसाठी देशातील कॅडेट्समध्ये चुरस होती. लेखी परिक्षा, समूह चर्चा आणि एनसीसी महासंचालकांसमोर प्रत्यक्ष मुलाखत व शिबिरातील परेड या निकषांवर बेस्ट कॅडेट्ची निवड करण्यात येत असल्याने मंत्री श्री. केदार यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

पथकातील विजेत्या सर्व छात्रसैनिकांचा यावेळी मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मेजर जनरल वाय पी खटूरी यांनी महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने घेतलेल्या परिश्रमाबाबत माहिती दिली. तसेच शासनाच्या संबंधित सर्व विभागांनी वेळेत सहकार्य केल्याने आम्हाला हे यश मिळविणे शक्य झाले असल्याचे सांगून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया देसाई हिने केले.

महापौरांनी गुजरातच्या प्रकल्पाशी तुलना करण्यापेक्षा मुंबईतील मूलभूत नागरी समस्या सोडवाव्यात – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. ३१ जानेवारी – कुठल्याही प्रकारची माहिती न घेता गुजरातच्या प्रकल्पात भ्रष्टाचार झालाय असे जर मुंबईच्या महापौर म्हणत असतील तर ते अत्यंत बेजबाबदारपणाचे ठरेल. कारण गुजरातमध्ये सायन्स सेंटरचा तो एक मोठा प्रकल्प आहे. त्याचा एक भाग वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि इतर सर्व यावर तो खर्च झाला आहे. फक्त पेंग्विनवर झालेला नाही. इथे जो खर्च झालेला आहे तो फक्त पेंग्विनवर झालेला आहे. त्यामुळे त्या संपूर्ण प्रकल्पाची इथल्या प्रकल्पाशी तुलना होऊ शकत नाही. महापौरांनी गुजरातच्या प्रकल्पाशी तुलना करण्यापेक्षा इथल्या मूलभूत नागरी समस्या सोडवाव्यात, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

गुजरातच्या वाइल्ड प्रकल्पात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच गुजरातच्या प्रकल्पाची आणि मुंबईच्या राणीबाग पेंग्विन प्रकरणाची तुलना महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. त्यावर दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, त्या मुंबईच्या महापौर आहेत. गुजरातचे काय करायचे असेल तर खासदार असतील, आमदार असतील, देशपातळीवरच्या नेत्यांनी ते बघावे. गुजरातचे प्रकल्प बघून तसे इथे राबवणार असू तर त्याचे स्वागतच आहे. परंतु आज मुंबईमध्ये अनेक समस्या आहेत. आजही मुंबईमध्ये मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत. शौचालये नहीत, प्यायचे पाणी मिळत नाही. आज गटारांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मुंबईतले अनेक नागरी प्रश्न आहेत. प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यांना जास्तीत जास्त गती देऊन ते प्रकल्प गतीने पुढे गेले तर महापौरांना आम्ही धन्यवाद देऊ.
गुजरातला जाऊन वेळ फुकट घालवण्यापेक्षा तेवढा वेळ मुंबईकरांच्या सेवेत जर दिला तर त्याचा उपयोग होईल आणि मुंबईकर त्यांना धन्यवाद देतील.
गुजरातला जाऊन केवळ राजकारणापोटी तेथील माहिती काढायची आणि येथे तुलना करायची हे काही योग्य नाही. सोयीप्रमाणे दुसऱ्या राज्यातले भाजप योग्य आहे, दुसऱ्या राज्यात चुकीच्या गोष्टी झाल्या की, इथले उदाहरण द्यायचे आणि इथे चुकीच्या गोष्टी झाल्या की दुसऱ्या राज्यातील भाजपचे उदाहरण द्यायचे, सोयीने चांगले, सोयीने वाईट, अशा प्रकारच्या यांच्या भूमिका आहेत.
गुजरात भाजप तर देशाचे नेतृत्व करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब , अमित शाह साहेब आज देशाचे नेतृत्व करतात. आणि त्यामुळे गुजरातचे भाजप चांगले, याचा अर्थ देशाचे नेतृत्व करणारे नेते मंडळी चांगलीच आहेत. त्यामुळे संपूर्ण देशातील भाजप चांगली आहे हे त्यांनी नकळत सांगून टाकलेय, असेही दरेकर यांनी सांगितले

दिघी-आळंदी वाहतूक विभागांतर्गत वाहन उभे करण्यास मनाईचे आदेश

0

पुणे दि.३१: पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी यापूर्वीचे निर्बंध रद्द करून दिघी-आळंदी विभागांतर्गत वाहन उभे करण्यास मनाई करण्याचे (नो पार्कींग) तात्पुरत्या स्वरुपातील आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार ममता स्वीट्स ते दत्तनगरकडे, दिघी गावठाणकडे, दिघी रोडकडे व फुगेवाडी बसस्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस आणि घुंडरे आळी चौकापासून चाकण चौकाकडे, वडगाव चौकाकडे, केळगाव चौकाकडे, माऊली मंदिराकडे अशा घुंडरे आळी चौकाच्या चारही बाजूच्या रस्त्यावर ५० मी. नो पार्कींग असेल. साईमंदिर कमान समोरील सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) ते मॅगझीन चौकाकडे व आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर १०० मी. नो पार्कींग असेल.

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम

0

पुणे, दि. 31: शैक्षणिक, सेवा, निवडणूक आदी कारणाकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. 2021-22 या वर्षात त्रुटीअभावी प्रलंबीत आहेत अशा विद्यार्थ्यांचे आणि अर्जदारांचे नुकसान होवू नये यासाठी शासनाच्या निर्देशान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्रुटी असलेल्या प्रकरणात त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यास व अर्जदारास कळवण्यास तसेच त्यांच्या प्रकरणांतील त्रुटींची मुदतीत पूर्तता करुन घेण्याबाबत कळवण्याच्या सूचनाही समित्यांना देण्यात आलेल्या आहेत.

जात वैधता प्रमाणपत्र त्रूटीअभावी प्राप्त झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी, अन्य अर्जदारांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे आणि मूळ कागदपत्रांसह 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा राज्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याचे मुख्य समन्वयक महाधम्मज्योती गजभिये यांनी केले.

‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर भाग्यश्री टिकलेचा जबरदस्त कमबॅक

0

सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ‘इंडियन आयडल मराठी ‘ हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अजयअतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. या आठवड्यात स्पर्धकांची खरी परीक्षा होती. कारण स्पर्धकांना गायचं होतं परीक्षकांच्या आवडीचं गाणं! हे आव्हान सगळ्या स्पर्धकांनी अगदी चोख उचललं. भाग्यश्री टिकले हिला परीक्षकांनी ‘जिवलगा’ हे अतिशय अवघड गाणी दिलं होत आणि या गाण्याला तिनी पुरेपूर न्याय देऊन ‘झिंगाट परफॉर्मन्स’ मिळवलं आहे.स्वतःच्याआवडीचं गाणं निवडून ते सादर करणं तसं सोप्प असतं. पण जेव्हा परीक्षक गाणं देतात, तेव्हा त्या गाण्याला पूर्णपणे न्याय देणं, परीक्षकांच्या अपेक्षांना खरं उतरणं हे जबाबदारीचं काम असतं. गेले अनेक आठवडे भाग्यश्रीला परीक्षांकडून विशेष असं कौतुक मिळालं नव्हतं. पण यंदाच्या आठवड्यात मात्र भाग्यश्रीने ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवत दमदार सादरीकरण करून प्रेक्षकांच्या कौतुकावर स्वतःचं नाव कोरलं.भाग्यश्री आता हा मिळालेला सूर असाच जपणार का हे बघण्यासाठी फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘इंडियन आयडल मराठी’, सोम.-बुध.,रात्री ९ वाजता, सोनी मराठी वाहिनी पहावी लागणार आहे.