Home Blog Page 2087

५० विरुद्ध पाच वर्षांचा हिशेब जनतेसमोर मांडणार -भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील

0

कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोडचे लोकार्पण

पुणे-महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार असे अनेक विकासाचे प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात ५० विरुद्ध पाच वर्षांच्या कामांचा हिशेब जनतेसमोर मांडणार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोड आ. पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला. या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आ. भीमराव तापकीर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील,किरण दगडे-पाटील, , नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, अल्पना वर्पे, अॅड. वासंती जाधव, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, सरचिटणीस दिनेश माथवड, स्विकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, गणेश वर्पे, प्रभाग क्रमांक १० (कोथरुड)चे अध्यक्ष कैलास मोहोळ, (खडकवासला) सागर कडू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री.‌पाटील म्हणाले की, १९८२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना, अनेकदा पुण्यात ‌येण्याचा योग आला. तेव्हापासून पुणे शहराची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे आशियातील सर्वात जलदगतीने वाढणारं शहर म्हणून पुण्याची ख्याती झाली. वाढत्या लोकसंख्येनुसार रस्ते, पाणीपुरवठा वाहिन्या, ड्रेनेज लाईन आदी नागरी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून निर्माण करण्याची गरज असते. गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून हे विषय मार्गी लावण्यासोबतच पुण्याच्या विकासाच्या अनुषंगाने मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार प्रकल्प यांसारखे अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार आहोत.

ते पुढे म्हणाले की, २० वर्षांपूर्वी पुणे महापालिकेचे बजेट १३०० कोटी होतं.‌ पण केंद्रातील भाजपा सरकारने मेट्रोच्या माध्यमातून ११ हजार कोटींचा प्रकल्प पुणेकरांसाठी आणला. आता त्याचे उद्घाटन, पाहाणी काही नेते करत आहेत. पण पुण्यातील नागरिकांना मेट्रो कुणामुळे आली हे माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात विविध ठिकाणी एक लाख ७६ हजार कोटींचे मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर वाहतूककोंडीची समस्या संपेल. त्यामुळे पुणेकरांच्या आशीर्वादाने महापालिकेत पुन्हा सत्ता आल्यानंतर, घर ते मेट्रो स्टेशनप्रवासासाठी मोफत ई-बस किंवा ई-रिक्षाची व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. चांदनी चौकातील सहापदरी रस्त्याचे कामही पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. असे एक ना अनेक प्रकल्प भाजपा सरकारच्या काळात पूर्ण होत आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. सागर कॉलनीतील रस्त्याचा प्रश्न ही संवादाच्या आणि सततच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लावता आला.

आ. भीमराव आण्णा तापकीर म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे कोथरुडचे आमदार झाल्यानंतर अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने कोथरुडकरांना वेळ देऊ शकतील का? पण प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळताना, त्यांनी मतदारसंघावर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ दिला नाही. डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतानाही माननीय दादांनी सर्वांना सोबत घेऊन कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाही हायब्रीड अँन्यूटीच्या माध्यमातून जे रस्ते उभारले गेले, त्यामुळे खडकवासला मतदारसंघातील सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

यावेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडे-पाटील नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक अल्पना वर्पे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना डीपी रस्त्याचे काम पूर्णत्वास येण्यापर्यंतचा इतिहास मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले. तर सागर कडू यांनी आभार मानले.

विकास पासलकर म्हणाले ,’सर्वधर्म समभाव ही काळाची गरज.

0

पुणे- धर्मनिरपेक्षता व सर्वधर्म समभाव हे शब्द संविधानाच्या कागदावरच राहिलेत कि काय ? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे , पण आज सर्व धर्म संभाव हि काळाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी येथे केले.

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमहोत्सव सोहळ्याच्या द्वितीय सत्राच्या कार्यक्रमात सर्वधर्मीयांकडून शिवरायांना मानवंदनेचा कार्यक्रम लाल महालात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
त्या प्रसंगी पासलकर म्हणाले आजकाल धर्मनिरपेक्षता व सर्वधर्म समभाव हे शब्द संविधानाच्या कागदावर राहिलेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु धर्मनिरपेक्षता व सर्वधर्म समभाव छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्याचा सार म्हणून कृतीत उतरवले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात अहिंदू-प्रजा सुखात नांदत होती, त्यांचे हक्क सुरक्षित होते. त्यांचा धर्म त्यांना स्वाभिमानाने प्रतिष्ठेने पळता यावा यासाठी महाराज दक्ष आणि जागरूक होते. त्यांनी सर्व धर्मियांचा आदरभाव क्रियाशीलपणे जपला होता. स्वतःच्या धर्मावर प्रेम करता करता ते सर्वच धर्माच्या विषयी नितांत आदरभाव जोपासत होते. सतराव्या शतकातील धर्मश्रद्ध वातावरणात शिवरायांच्या रूपाने धर्माच्या नावाने परंपरेची गुलामी उभी नव्हती, तर धर्माच्या नावाने नैतिक माणसाचे स्वातंत्र्य साकारत होते आणि त्यामुळेच छत्रपती शिवराय हे धर्मनिरपेक्ष राजे होते असे आम्ही मानतो असे प्रतिपादन विकास पासलकर यांनी केले. लोकराजा छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीयांकडून शिवरायांना मानवंदनेचा अभिनव उपक्रम 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिनाच्या दिवशी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून साजऱ्या होत असलेल्या शिवजन्मोत्सवात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सारनाथ बौद्ध विहाराचे उपाध्यक्ष दीपक धनविज, ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष सगाई नायर, लिंगायत धर्माचे प्रतिनिधी स्वप्नील भासमारे, मुस्लिम धर्मीय प्रतिनिधी अंजुम इनामदार, हरियाणा मराठा सेवा संघाचे कमलजित महाले, हरियाणा पोलीस धरम प्रकाश, उद्योजक सत्येंद्र दाभाडे, विजयराव घाडगे, हिंदुराजे प्रतिष्ठाण वारजे पुणे हे उपस्थित होते. कैलास वडघुले यांनी सूत्रसंचालन केले, तर दत्ताभाऊ पासलकर यांनी आभार मानले. संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, जितेंद्र साळुंखे, श्रीकांत बऱ्हाटे, विराज तावरे, संतोष शिंदे, युवराज ढवळे, मयूर शिरोळे, मंदार बहिरट, निलेश इंगवले, अक्षय रणपिसे, सचिन जोशी आदी उपस्थित होते.

लॉकडाऊन नंतर पर्यटकांच्या सेवेसाठी MTDC ने कंबर कसली, कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि खानपान बाबतचं अत्याधुनिक प्रशिक्षण …….

0

संपूर्ण जगात आज रोजी कोरोनाव्हायरस या महामारी चे मोठे संकट आलेले होते. उभ्या जगाशी गनिमी कावा खेळणाऱ्या हा दुष्ट विषाणु मुळे आपला भारत देश पण प्रभावित झालेला आहे. सध्याच्या वातावरणामुळे सर्वाधिक परिणाम हा पर्यटन उद्योगावर झाला आहे. संचारबंदी मुळे सर्वच बाबतीत मर्यादा आल्या होत्या. तथापि, या काळामध्येही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कर्मचारी सतत काम करीत आहेत. स्वच्छता हीच सेवा आणि अतिथी देवो भव ही ब्रीद वाक्य उराशी बाळगुन संचारबंदी असली तरिही पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि सॅनिटायझेशनची कामे योग्य ती खबरदारी घेवुन सुरु करण्यात आली आहेत. पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना केल्याने आणि पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात यशस्वी झाली होती.
यापुर्वीही लॉकडाऊन कालावधीत पर्यटक कमी असल्याने महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. आता नव्याने महामंडळाचे अनुभवी कर्मचारी आणि तरुण कर्मचारी (शेफ) यांचा मेळ साधत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची संकल्पना ही महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालिका श्रीमती जयश्री भोज (भा.प्र.से.) यांची असुन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सदरच्या प्रशिक्षणाबाबत सर्वतोपरी महत्वाुणची भुमिका बजावली आहे. प्रशिक्षणासाठी मा. पर्यटन मंत्री महोदय आदीत्य ठाकरेसाहेब यांच्या पुढाकाराने महामंडळ आणि सदरचे प्रशिक्षण हे महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या मध्ये MoU करण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळ आणि महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्या मा. डॉ. अनिता मुदलीयार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.. सदरच्या कौशल्य विकास प्रशिक्षणा अंतर्गत Food and Beverages आणि Food Production याबाबतचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाअंतर्गत Training सह प्रात्यक्षिक देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये संस्थेच्या तवतीने प्राध्यापक डॉ. सीमा झगडे, सहा. प्राध्यापक सचिन रायरीकर, सहा. प्राध्यापक श्री. अभय मनोळीकर, सहा. प्राध्यापक पुजा पवार या तज्ञ प्राध्यापकांकडुन मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. श्रीमती विद्या कदम मॅडम या संयोजन करीत आहेत.
पर्यटकांना आनंदी ठेवणे, उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे, स्वच्छता आणि परिसराची साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकिकरण, पर्यटकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेणे याचा समावेश सदरच्या प्रशिक्षणामध्ये करण्यात आला आहे. सदरचे प्रशिक्षण हे दोन आठवडयाचे असुन उपरोक्त विषयातील तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक याद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण 14 फेब्रुवारी पासुन महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे या संस्थेत होत आहे. या प्रशिक्षणामध्ये साधारणपणे 60 पेक्षा जास्त शेफ / कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. सदरच्या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार असुन पर्यटकांना अतिउत्तम सेवा देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी जावुन रहावे आणि सोबत कामही करावे असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे लॉक डाऊन नंतर पर्यटक मोठया प्रमाणावर पर्यटनास निघणार आहेत. आगामी काळात पर्यटकांना वेगवेगळया प्रकारे आकर्षित करुन पर्यटन व्यवसायास भरभराटी येणार आहे. त्यामुळे आगामी पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.

महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.
“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यातील विविध रिसॉर्टवर रेस्टॉरंटची सुविधा दिली आहे. कोरोना संचारबंदीनंतर महामंडळाच्या पर्यटक निवासात पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोना बाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसुन येईल. निसर्गाचे भान ठेवुन आणि कोरोना बाबत दक्षता घेवुन आगामी संचारबंदीनंतरच्या काळात बिनधास्त पर्यटन करता येणार आहे.”
आगामी काळात महामंडळाकडुन देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत अधिक माहीतीसाठी महामंडळाच्या www.mtdc.co या वेब साईटवर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक, श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

श्री. दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

कलानिकेतन भरतनाट्यम संस्थेच्या विद्यार्थिनिंचा कलाअविष्कार

0

पुणे ता.१४ : अरंगेत्रम सारखे अवघड प्रशिक्षण व्हर्चुअल माध्यमातून पूर्ण करून तितक्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर त्याचे नेत्रदीपक सादरीकरण करण्याची किमया औंध येथील कलानिकेतन या संस्थेच्या विद्यार्थिनींनी रविवारी करून दाखवली.टिळक स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कलानिकेतनच्या अंकुरा राहुल चौधरी, दिया प्रदीप रमाणी, अनुषा वासुदेवन, अनुष्का दीपक कांबळे, दिया अभय दलाल, परख आदर्श त्रिपाठी, साक्षी कल्पेश पटेल, सानिका सूरज टिळक, आणि वैष्णवी सुनील भोंगाळे या विद्यार्थीनिंनी अरंगेत्रमचे उत्तम सादरीकरण केले.

यावेळी बोलताना माने म्हणाले, कोरोना काळात सर्वच शिक्षण ऑनलाईन झाले, कला क्षेत्रही याला अपवाद राहिला नाही. प्रत्यक्ष शिक्षण जितक्या सहजतेने घेता येते तितक्या सहजतेने ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. ऑनलाईन शिक्षण इतके समर्पकपण नसते हे शिक्षण घेताना अनेक समस्या भेडसावत आहेत. भरतनाटयम या नृत्यप्रकाराला तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. काळानुरूप यामध्ये अनेक बदल घडून आले. तथापि, आजचा अरंगेत्रम हा कलाअविष्कार सर्व अर्थांनी वेगळा होता. नाट्याबाबत कवी कालिदासाने लिहिलेल्या ‘नाट्य भिन्नरुचेर जनस्य बहुधापेक संमराधनम्’ या वाक्याची अनुभूती यावी असे यांचे सादरीकरण होते.

 संस्थेच्या प्रमुख उमा टिळक तसेच विश्वजितजी टिळक यांच्यासह सहका-यांनी गेली अनेक वर्षे शेकडो विद्यार्थिनी घडवल्या आहेत. गेली दोन वर्षे जगात कोवीडच्या साथीमुळे शिक्षणाच्या परिभाषा बदलल्या आहेत. प्रयोग आणि प्रात्यक्षिके करण्याची आवश्यकता असलेल्या शाखा-कलाशाखा आभासी म्हणजे व्हर्च्युअल पद्धतीने शिकवीत आहेत. या संस्थेनेही आपल्या चाळीस विद्यार्थिनींना एकाच वेळी व्हर्च्युअली नृत्य शिक्षण देऊन त्यांची कला आज प्रथमच रसिकांसमोर सादर केली. त्यामुळे हा कार्यक्रम वेगळ्या आव्हानांवर मात करीत कला सादर करताना वेगळे समाधान देणारा ठरला. विविध भावछटा,पद्ण्यास यांच्या उत्तम मिलाफातून प्रेक्षकांना उच्च दर्जाची नर्तन कला पाहायला मिळाली. कलानिकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींचे आणि त्यांच्या गुरूंचे सुनील माने यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फडणवीसांच्या घराबाहेर कॉंग्रेसचे आंदोलन:नवाब मलिक म्हणाले, “हे योग्य नाही..

0

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कोणाच्याही घराबाहेर आंदोलन करणं योग्य नसल्याचं म्हटलं असल्याने अप्रत्यक्षपणे त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर नाराजी जाहीर केली आहे. “नेत्यांच्या घराबाहेर आणि पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू नये ही आमच्या पक्षाचीच भूमिका आहे,” असं सूचक विधान नवाब मलिक यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे.“काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेत्यांच्या घराबाहेर आंदोलन कऱण्याची घोषणा करण्यात आली होती. ती भूमिका योग्य नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन करणं योग्य नाही. हा नवीन पायंडा म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी, हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण करण्यासारखं असून योग्य नाही,” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “लोकशाहीत विरोध करणं अधिकार असताना सरकारने, प्रशासनाने, कोर्टाने निश्चित करुन दिलेली जागा आहे. परवानगी घेऊन आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. ही नवीन सुरुवात असून योग्य नसून सर्व राजकीय पक्ष, नेत्यांनी फारकत घेतली पाहिजे अशी माझी आणि पक्षाची भूमिका आहे. यामुळे प्रशासन, पोलीस यंत्रणेवर ताण पडून वेगळी परिस्थिती निर्माण होते. यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाने पक्षांतर्गत बैठक घेऊन अशा प्रकारे आंदोलन नको असा निर्णय घेतला पाहिजे”.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानापुढे करण्यात येणारं आदोलन काँग्रेसने स्थगित केलं आहे. या आंदोलनाला भाजपानेही हिंमत असेल तर येऊन दाखवा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असं आव्हान दिलं होतं. दरम्यान आंदोलनासाठी निघालेल्या नाना पटोले यांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन स्थगित केलं. यावेळी काही कार्यकर्ते फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर पोहोचले होते. पण पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

मुलींच्या लग्नासाठी वय 18 वरून 21 वर ..विषयावर चर्चासत्र संपन्न

0

पुणे- राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आज खा.वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुलींचे लग्न वय 18 वरून 21वर्ष करणे या संसदेत सादर केलेल्या बिलावर समाजातील सर्व स्तरावर चर्चा व्हावी यासाठी पत्रकार भवन येथे आयोजित केलेले चर्चासत्रसंपन्न झाले .राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम तसेच डॉ.जया सागडे (विधीतज्ञ) किरण मोघे (सामाजिक कार्यकर्त्या) डॉ. हेमलता जालगावकर (स्त्रीरोग तज्ञ) यांनी आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, नगरसेविका अश्विनी कदम, विजय बापू डाखले, मृनालीनी वाणी इत्यादी उपस्थित होते.

बाळ कोणाला म्हणावे ,बालविवाहाचे शारीरिक परिणाम आजपर्यंत कसे झालेले आढळतात .शहर आणि ग्रामीण,सधन आणि गरीब यांच्या मुलींच्या बाबतीत कोणती परिस्थिती आढळते ऍनिमिया ,कॅन्सर,महिला आणि गर्भाच्या मृत्यूची भयानक आकडेवारीस्त्री रोग तज्ञ डॉ.हेमलता जालगावकर यांनी समोर ठेवली.

त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या व्यासंगी किरण मोघे यानी सामाजिक बदल आणि मुलांच्या हातात आलेल्या माहितीच्या महाजालातून मिळणाऱ्या माहितीमुळे मुलांची बदललेली शारीरिक भावनिक गरज आपण लक्षात घेऊन समाज म्हणून पालक म्हणून बदलणार कि नाही असा महत्वाचा प्रश्न मांडला .शहर भागात प्रत्यक्ष जाऊन काम करा तरच सत्य उमगेल असे त्यानी उपस्थित कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितले.

यानंतर विधीतज्ञ् डाॅ.जया सागडे यांनी या कायद्याच्या कलमांचा अर्थ काय हे सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल असे सांगितले . पहिल्या कलमात हा कायदा सर्व नागरिकांना लागू होतो ,सर्व जाती, धर्म, चालीरीतीत २१ वर्षे हे लग्नाचे वय. बालविवाह झाला तर २ वर्षांऐवजी ५ वर्षात वैद्यकारक करण्याची तरतूद . १४ अ कलम नव्याने तोच अर्थ सांगणारे आणखी एक कलम. प्रत्यक्षात विवाह,घटस्फोट,,पोटगी,दत्तक ,पालकत्व हे मूळ लक्ष देण्याचे कायदे आणि त्यात कोठे कसे बदल हवेत हे सांगूनही सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही. एसी ऑफिसमध्ये बसून कायदे करणाऱ्यांनी आधी तळागाळात येऊन परिस्थिती समजून घेऊन कायदे करावेत अशी जोरदार टीका करीत आपले अतिशय अभ्यासू मत जया सांगडे यांनी मांडले.त्यांनी हि गोंधळाची परिस्थिती नेमकी पुढील पद्धतीने मांडली.. उदाहरणार्थ आजची मुलगी पालकांना विचारेल कि ,
‘मी मोठी का लहान ?मला कार चालवायचा परवाना वय १८ वर्षे पूर्ण म्हणून मिळाला ,मतदानाचा अधिकार मिळाला ,कायदेशीर कागदपत्रे करण्याची परवानगी मिळाली ,मी शारीरिक संबंध ठेऊ शकते पण लग्न करू शकत नाही कारण सरकारने लग्नाचे योग्य वय २१ ठरवले आहे. माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची घाई आहे कारण मी पळून जाऊन लग्न करेन,मला कायदेशीर कटकटी होतील मग मी काय करू सांगा.’ देशासाठी फार गंभीर असा कायदा मांडताना हि जागृती समाजात होण्यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेलने प्रयत्न केल्याबद्दल आभार मानले.
नितीन जाधव यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अपयश झाकण्यासाठी वाद निर्माण करून लोकांचे लक्ष विचलित करायचे ही आघाडी सरकारची भूमिका – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0


सातारा, दि. १४ फेब्रुवारी – महाविकास आघाडी सरकारला काय चांगले काम केले, ते दाखवता येत नाही. ते पूर्णपणे अपयशी झालेत. म्हणून भावनिक वादविवाद निर्माण करायचे, केंद्र सरकार-राज्य सरकार वाद उभा करायचा, राज्यपाल-राज्य सरकार वाद उभा करायचा, भाजपशी वाद उभा करायचा आणि संघर्षाचे वातावरण उभे करत लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित करायचे अशी त्यांची भूमिका आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
दरेकर आज सातारा दौऱ्यावर होते. आज सोमवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर कॉँग्रेसने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाना पटोले सांगतात की, मुंबईकरांना त्रास नको म्हणून आंदोलन मागे घेतोय. म्हणजे नाना पटोले यांना आता उपरती झाली का? काल आंदोलन करायचे ठरवले तेव्हा हा विचार आला नाही का की, उद्याच्या आंदोलनाने मुंबईकरांना त्रास होणार आहे. काल आम्हीही भूमिका घेतली की, ठोशास ठोसा देऊ. कोणी चाल करून आले तर आम्ही शांत बसायचे का? अंगावर आले तर शिंगावर घेऊ, हे जेव्हा आम्ही बोललो तेव्हा ते जमिनीवर आले, असेही दरेकर यांनी सांगितले.

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना न्यायालयाने सुनावला 1 वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटीचा दंड!

0

मुंबई-पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित अडचणीत सापडले आहेत. गावित यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. चेक बाऊन्स केस प्रकरणात त्यांना पालघर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने एक वर्ष शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे राजेंद्र गावित यांना हा मोठा दणका बसला आहे. न्यायालयाने सदर दंड आणि शिक्षेला 14 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.

खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 8 ऑक्टोंबर 2014 मध्ये पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे चिराग बाफना यांनी दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून, त्यानुसार खासदार राजेंद्र गावित यांना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिलात जाऊन निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.

25% अतिरिक्त भत्ता मिळेल-ATS जॉइन करा :राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या पोस्टने अवस्था चव्हाट्यावर ..

0

 

मुंबई- राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) संजय पांडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर राज्यातील दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) एसपीच्या दोन रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यांनी इच्छुक उमेदवारांना विभागाशी संपर्क साधावा किंवा सोशल मीडियाद्वारे त्यांचे अर्ज पाठवण्यास सांगितले आहे. खरे तर, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून एटीएससाठी आणखी टीम सदस्यांची मागणी केली होती. मात्र, संजय पांडे यांच्या या पोस्टवर अग्रवाल यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

संजय पांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये हे लिहिले
गेल्या आठवड्यात त्यांच्या फेसबुक पेजवर डीजीपी संजय पांडे यांनी लिहिले होते की, एटीएस, मुंबईमध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) ची दोन पदे रिक्त आहेत. एटीएस पोस्टिंग ही एक प्रतिष्ठित पोस्टिंग आहे. ज्यात 25% विशेष भत्ता आहे. इच्छुक अधिकारी थेट एडीजी एटीएस किंवा एडीजी सोबत संपर्क साधू शकतात.

एटीएसची ही पदे आहेत रिक्त
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनु कुमार श्रीवास्तव यांना सांगितले की, एटीएसमध्ये चार महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत आणि ती लवकरच भरली जावीत. एटीएसचे एसपी (टेक्निकल विश्लेषक) सोहेल शर्मा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले आहेत. एटीएसमधील आणखी एक एसपी दर्जाचे अधिकारी राजकुमार शिंदे यांची काही काळापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये (एसीबी) बदली करण्यात आली होती, परंतु त्यांना अद्याप एटीएसमधून मुक्त करण्यात आलेले नाही. सुहास वारके यांच्याकडे एटीएसचे आयजी पद होते, मात्र वर्षभरापूर्वी त्यांची बदली झाली. तेव्हापासून हे पदही रिक्त आहे. तसेच एटीएस डीआयजीचे पदही रिक्त असल्याने शिवदीप लांडे यांना नोव्हेंबरमध्ये बिहारला पाठवण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र एटीएस इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेक प्रकरणे हाताळत आहे. त्यात 2014 मध्ये कल्याण आणि 2015 मध्ये ISIS मध्ये सामील झालेल्या मालवणीतील तरुणाचाही समावेश होता. मात्र, काही काळापूर्वी ही दोन्ही प्रकरणे एनआयएकडे वर्ग करण्यात आली होती. एटीएसने 2006 आणि 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांचा तपास केला आणि आरोपपत्रही दाखल केले. मात्र, ही दोन्ही प्रकरणे नंतर त्यांच्याकडून ताब्यात घेऊन एनआयएकडे सोपवण्यात आली.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार , ‘महाराष्ट्र एटीएसने अँटिलिया स्फोटके रिकव्हरी प्रकरणात चांगले काम केले. युरेनियम रिकव्हरी प्रकरणाचाही एटीएसच्या पथकाने खुलासा केला होता आणि मनसुख हिरेनच्या मृत्यूबाबतही अनेक महत्त्वाचे क्लूस सापडले होते, परंतु हे प्रकरण देखील त्यांच्या हातून हिसकावून एनआयएकडे सोपवले. हे अत्यंत निराशाजनक होते आणि त्यामुळे एटीएस अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचले.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली सिरम इन्स्टिट्यूटला भेट

0

कोरोना संकटात केलेल्या कामगिरीचा देशाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो-उद्योग मंत्री सुभाष देसाई

            पुणे, दि. १४:- सायरस पुनावाला यांच्या जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर सिरम इन्स्टिट्यूट ही संस्था उभी असून संस्थेने कोरोना संकटात केलेल्या कामगिरीचा महाराष्ट्रासोबतच  देशाला  अभिमान वाटतो असे गौरवोद्गार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

            उद्योग मंत्री देसाई यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देवून येथील लस उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, संजय देशमुख, इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश देशपांडे, कार्यकारी संचालक उत्पादन उमेश शालीग्राम, उपसंचालक उमेश शिरसावकर आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत सायरस पुनवाला यांच्याशी संपर्क करीत होते. कोविड लसीमुळे आपल्याला सुरक्षितता वाटत असून नागरिक आत्मविश्वासने घराबाहेर बाहेर पडतांना दिसत आहेत. कोरोना संकटातून बाहेर काढण्यात सिरम इन्स्टिट्यूटचे योगदान महत्वपूर्ण आहे. संस्थेने यापुढेही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन लस निर्मितीचे कार्य सुरुच ठेवावे, असेही ते म्हणाले.

            यावेळी उमेश शालीग्राम यांनी येथील कामकाजाची माहिती दिली.

सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

0

गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सावित्रीमाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

mymarathi.net पुणे, दि. १४: महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून हे कार्य आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दूरदृष्य प्रणालीद्वारे) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी पुढे म्हणाले, फुले दांपत्याने ज्यावेळी समाजसुधारणेचे काम केले त्या काळात इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा समाजाला कुप्रथांपासून दूर करणे अधिक कठीण होते. त्या काळात समाजातील सर्वात दबलेल्या महिला, मातृशक्ती तसेच मागास, गरीब समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी काम केले. त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या, समाजसुधारनेच्या कामाला प्रचंड विरोध झाला परंतू कुप्रथा दूर करण्याचे त्यांनी जे स्वप्न पाहिले ते जीवनाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम केले.सावित्रीबाई यांच्या जीवनाचा कालखंड हा इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्याचा, लिहिण्याचा कालखंड होता असेही श्री. कोश्यारी म्हणाले. सावित्रीबाई जर आज असत्या तर विद्यापीठे, शैक्षणिक क्षेत्रात मुली, महिलांचे अग्रस्थान पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला असता असेही ते म्हणाले.सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.देश आणी समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले आणी भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने हे विचार समाजापर्यंत पोहोचले असे म्हणता येईल.शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा नसावा-छगन भुजबळश्री.भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनावर जगातील विविध भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर लहान पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. या वास्तूचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या द्रष्ट्या महापुरुषांचे महत्व कळायला समाजाला उशीर लागतो. महात्मा फुले यांचा पहिला पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे बसविला. अशा महापुरुषांमुळे सामान्य माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे कार्य झाले. सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत फातिमाबी शेख या महिलेने शिक्षणाचा आग्रह धरला. प्रत्येक भेद दूर सारण्याच्या महापुरुषांनी प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा न देता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, त्यातून त्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडून येईल, असे त्यांनी सांगितले. महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन 3 कोटी देणार : उदय सामंतश्री.सामंत म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते श्री.फडणवीस म्हणाले, आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात ‍दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला सावित्रीबाईंची साथ होती. त्या द्रष्ट्या समाजसुधारक होत्या. त्यांनी आणि महात्मा फुले यांनी समाजाला संघर्ष शिकविला. न्याय आणी ज्ञान यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनेक हालअपेष्टा सहन करताना त्यांनी संघर्ष केला. विधवांच्या मुलांचे संगोपन, अंधश्रद्धेचा विरोध, बालहत्येचा विरोध अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचा ‘काव्यफुले’ हा संग्रह ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाला समर्पित आहे. सावित्रीबाई लिंग समानता चळवळीच्या आधारस्तंभ: डॉ. नीलम गोऱ्हे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे. अनेक समाजसुधारकांनी या राज्यात समाजजागृतीचे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणी तत्वचिंतक होत्या. विधवा ‍ महिलांची बाळंतपणं त्यांनी केली होती. सावित्रीबाई फुले लिंग समानतेच्या चळवळीचा आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार अध्यासनाच्या माध्यमातून व्हावा. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरतील, असे त्या म्हणाल्या.

कुलगुरू डॉ.करमळकर म्हणाले, समाजाच्या उद्धारासाठी ‍शिक्षण हे एकमात्र साधन आहे हे लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक कार्यातही आदर्श प्रस्तूत केला. हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर प्रस्तूत करण्यासाठी विद्यापीठ परिसरात पूतळा उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा १५०० किलो ब्रांझचा आणी साडेतेरा फुटाचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने सर्व परवानग्या तातडीने मिळाल्या. अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनीदेखील विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी ‍ दिली.

कार्यक्रमाला उपमहापौर सुनिता वाडेकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आदी उपस्थित होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मूर्तीकार संजय परदेशी यांचा सत्कार राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आला. हरी नरके लिखीत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

0


पुणे-कर्वे रस्त्यावरील म.ए.सो.च्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. म.ए.सो. अंतर्गत स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेले हे दुसरे महाविद्यालय आहे अशी माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज (सोमवार, दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी) पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. बी. बुचडे यावेळी उपस्थित होते.
शिक्षणाचे माहेर घर म्हणून पुण्याची ओळख ही अनेक शैक्षणिक संस्थांमुळे आहे. यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान आहे. १८६० मध्ये आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी स्थापन केलेली पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) म्हणून ओळखली जाऊ लागली. सन १८९६ मध्ये संस्थेने महाराष्ट्र कॉलेज सुरू केले होते. या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी विद्रोही भाषणे केल्याने हे महाविद्यालय इंग्रज सरकारच्या रोषाला पात्र ठरले आणि त्यानंतर बंद पडले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण करताना एम.ई.एस. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स १९४५ साली सुरू करण्यात आले, जणू हा महाराष्ट्र कॉलेजचा पुनर्जन्मच! हेच कॉलेज आज मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. हे महाविद्यालय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय विचारांशी व चारित्र्यवान नागरिक आणि सशक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या मूल्यांशी सुसंगत आहे. गेली १६१ वर्ष ‘मएसो’चे कार्य याची साक्ष देते, या मध्ये मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने गेली ७५ वर्षे योगदान दिले आहे. मागील वर्षी हे महाविद्यालयाचे हीरक महोत्सवी वर्ष होते.
१९४५ साली स्थापन झालेल्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये आता २५ पदवीधर शिक्षण विभाग आहेत ज्यामध्ये १८ पदव्युत्तर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त विज्ञान आणि कला विद्याशाखेतील ०७ संशोधन केंद्रे आहेत. महाविद्यालयात ५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम शिकवले जातात.
महाविद्यालयाला तीन वेळा NAAC द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. चालू वर्षात वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात अद्ययावत वर्ग आणि प्रयोगशाळा आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. महाविद्यालयात अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रमही राबवले जातात. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्ये रुजवणे, त्यांना राष्ट्रीय विकासात योगदान देण्यास सक्षम बनवणे, त्यांच्यामध्ये जागतिक दर्जाची क्षमता विकसित करणे, त्यांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनवण्यासाठी कार्य करत असते.
ऑगस्ट २०२० मध्ये महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा मिळवण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केला होता. कोविडच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर २०२१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणीनंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा देण्याची शिफारस केली.
नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन स्वायत्ततेत कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याची महाविद्यालयाची इच्छा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रमांद्वारे ज्ञान मिळू शकेल तसेच त्यांची रोजगारक्षमताही वाढेल. स्वायत्ततेअंतर्गत, भविष्यात व्यापक संधी असणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाविद्यालयाचा प्रस्ताव आहे. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच नॅनोसायन्सेस आणि नॅनोटेक्नॉलॉजी यासारख्या विषयांमध्ये नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. नवीन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स सुरू करण्याचीही महाविद्यालयाची इच्छा आहे. चांगले नेते आणि प्रशासक विकसित करण्यासाठी आणि जागतिक समस्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून हे अभ्यासक्रम विकसित करण्याची योजना आहे.

शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता

0

मुंबई, दि. १४: – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.  तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

‘चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, टायगर्स, एफसी मेटालिका संघांचे विजय

0


पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2022: फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन चार्जर्स, टायगर्स, एफसी मेटालिका या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत  डेक्कन चार्जर्स संघाने एसेस युनायटेड संघाचा 24-06 असा सहज पराभव करून आगेकूच केली. डेक्कन चार्जर्स संघाकडून  नितीन जोशी, जयदीप डाली,  मुकुंद जोशी, आशिष पुंगलिया,  मदन गोखले, अजित सैल,  ऋषिकेश पाटसकर, रक्षय ठक्कर यांनी विजयी कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्यात  प्रशांत गोसावी, ऋतू कुलकर्णी,  पराग नाटेकर, योगेश पंतसचिव,  केदार शहा, अभिषेक ताम्हाणे,  अनुप मिंडा, अमित लाटे यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर  टायगर्स संघाने डेक्कन आरएफ संघाचा 24-03 असा एकतर्फी पराभव केला. अन्य लढतीत एफसी मेटालिका संघाने हॉक्स संघावर 23-14 अशा फरकाने विजय मिळवला.

साखळी फेरी:
डेक्कन चार्जर्स वि.वि.एसेस युनायटेड 24-06(100अधिक गट: नितीन जोशी/जयदीप डाली वि.वि.सुनील लुल्ला/मयूर पारेख 6-4; 90 अधिक गट: मुकुंद जोशी/आशिष पुंगलिया वि.वि.सुनील खेमचंदानी/जस्मित शौरी 6-0; खुला गट: मदन गोखले/अजित सैल वि.वि.अमित शर्मा/सुनील लुल्ला 6-2; खुला गट: ऋषिकेश पाटसकर/रक्षय ठक्कर वि.वि.हुजेफा हकीम/रोहन नाईक 6-0);

टायगर्स वि.वि.डेक्कन आरएफ 24-03(100 अधिक गट: प्रशांत गोसावी/ऋतू कुलकर्णी वि.वि.दिलीप धामणकर/समीर सावला 6-0; 90 अधिक गट: पराग नाटेकर/योगेश पंतसचिव वि.वि.अमित सुमंत/सुमंत डी. 6-1; खुला गट: केदार शहा/अभिषेक ताम्हाणे वि.वि.राहुल मंत्री/संदीप माहेश्वरी 6-0; खुला गट: अनुप मिंडा/अमित लाटे वि.वि. अमलेश आठवले/आशिष धोंगडे 6-2);

एफसी मेटालिका वि.वि.हॉक्स 23-14(100 अधिक गट: अभय सोनटक्के/सिद्धेश परळकर वि.वि.मंदार कापशीकर/अमृत मुळ्ये 6-4; 90 अधिक गट: नकुल फिरोदिया/महेंद्र देवकर पराभूत वि.बाळासाहेब पवार/सुनील आहिरे 5(2)-6(7); खुला गट: सुमित सातोस्कर/लक्ष्मण विडेकर वि.वि.अविनाश पवार/अनिरुद्ध जाधव 6-1; खुला गट: नितेश पांडेवाल/शौनक कासट वि.वि.सचिन कुलकर्णी/आशुतोष सोवनी 6-3);

जागे व्हा ,वाईन विक्री निर्णयाला विरोध करा – अण्णा हजारे

0

पुणे- जागे व्हा,लाखो लोकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य आणि लोकशाही चे राज्य मिळालेले आहे त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका ,वाईन विक्रीचा सरकाने घेतलेला निर्णय आपली मुले ,सामाज आणि संस्कृतीवर परिणाम करणारा आहे , त्यास अनेक जन विरोध करत आहेतच पण त्याच प्रमाणे समाजामध्ये अज्ञानाच्या पोटी किंवा जाऊद्या, मला काय करायचे अशा संकुचित वृत्तीने काही जण झोपेत असतील तर त्यांनी जागे व्हावे आणि या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्वांनीच हरकती घ्याव्यात असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे . .पुढील काळात सर्व कार्यकर्ते संस्था, संघटना आणि राष्ट्रप्रेम असणाऱ्या सर्व व्यक्ती आपण या निर्णयाला संघटीतपणे विरोध करू या सेही त्यांनी म्हटले आहे.

अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’27 जानेवारी 2022 रोजी मंत्रीमंडळाने वाईन विक्री संबंधाने जो निर्णय घेतला होता तो निर्णय युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असल्याने त्या युवाशक्ती, मुले, समाजावर दुष्परिणाम करणारा असल्याने तसेच आमची संस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती असल्याने त्या संस्कृतीचे रक्षण आणि जतन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, व्यक्ती, सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींनी या निर्णयाला विरोध करून सरकारला जाणीव करून देण्याचे महत्वाचे कार्य केले. त्याच प्रमाणे समाजामध्ये अज्ञानाच्या पोटी किंवा जाऊद्या, मला काय करायचे अशा संकुचित वृत्तीने जीवन जगणाऱ्या काही लोकांना वाईनच्या संबंधाने  जागविण्याचे कार्य केले त्याबद्दल सर्व कार्यकर्ते, संस्था, संघटना, व्यक्ती आणि बंधू भगिनींना धन्यवाद देतो. आणि आभार व्यक्त करतो.

        हजारे यांनी पुढे असेही म्हटले आहे,’  तुमच्या या कृतीमुळे 84 वर्षाच्या वयामध्ये मला जनसेवेची नवीन उर्जा मिळाली आहे. नवीन पाठबळ मिळाले आहे. आणि विश्वास निर्माण झाला आहे की, ज्या लोकशाहीसाठी 1857 ते 1947 नव्वद वर्षे लाखो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. पण स्वातंत्र्याच्या 74 वर्षापर्यंत लोकांची लोकांनी लोकसहभागातून चालविलेली लोकशाही काही लोकांनी तिला येऊ दिली नाही. आता मात्र राज्यातील तुमच्या संघटीत कृतीमुळे ती लोकशाही किमान महाराष्ट्र राज्यात तरी येऊ शकेल असा विश्वास निर्माण झाला. आपण प्रतिज्ञा करूया आणि आपल्या लोकशाहीसाठी ज्यांनी बलिदान केले त्यांच्या आत्म्यांना सांगूया की, आम्ही तुमचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यासाठी भलेही आम्हाला  पुन्हा बलिदान करावे लागले तरी आम्ही हसत हसत बलिदान करू.पुढील काळात सर्व कार्यकर्ते संस्था, संघटना आणि राष्ट्रप्रेम असणाऱ्या सर्व व्यक्ती आपण संघटीतपणे प्रयत्न करूया.