Home Blog Page 2088

फडणविसांच्या बंगल्यासमोरील कॉंग्रेसचे आंदोलन पोलिसांच्या अभूतपूर्व बंदोबस्ताने रोखले

0

मुंबई-पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपनं दिल्यानं संघर्ष अटळ असल्याचं म्हटलं. ‘सागर’ बंगल्यावर मोर्चा नेण्याच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाम होते. आम्ही 100 ते 150 कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन करू पाहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  सागर बंगल्यावर करण्यात येणारे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलेले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात घोषणा केली. काँग्रेसला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे होते. पण भाजपने आक्रमक कार्यकर्ते रस्त्यावर उतरवून मुंबईतील वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आम्ही तात्पुरते हे आंदोलन मागे घेत आहेत. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.काँग्रेसच्या आजच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह  मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हेदेखील सहभागी झाले.काँग्रेसचे मुख्यप्रवक्ते अतुल लोंढे तोंडावर हाथ ठेवून लोंढेंना पोलीस गाडीत बसवण्यात आले आणि आंदोलनस्थळावरून पुढे नेण्यात आलं. 

पोलिसांनी आज सकाळपासूनच सागर बंगल्याच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सागर बंगल्यापर्यंत पोहोचता आलेले नाही. त्यामुळे याठिकाणी होणारा संभाव्य संघर्ष टळला आहे. आमचे अनेक कार्यकर्ते एकएकटे सागर बंगल्याच्या परिसरात पोहोचले होते. पोलिसांनी त्यांना अटकही केली. यानिमित्ताने आम्हाला भाजपचा महाराष्ट्रद्वेष्टा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यात यश मिळाले, असेही नाना पटोले यांनी म्हटले. पोलिसांनी नाना पटोले यांना त्यांच्या बंगल्याबाहेरच रोखून धरले होते काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनेही मोठी मोर्चेबांधणी केली होती. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे सकाळपासूनच भाजपच्या मोजक्या कार्यकर्त्यांसह सागर बंगल्यावर ठाण मांडून आहेत. मात्र, त्यांच्याशिवाय भाजपच्या अन्य कार्यकर्त्यांना सागर बंगल्यावर पोहोचण्यात यश आले नाही. पोलिसांनी आशिष शेलार, राम कदम, प्रसाद लाड आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह अन्य भाजप नेत्यांना बाबूलनाथ परिसरातच रोखून धरले होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली. या सगळ्यामुळे हाजीआली, ग्रँट रोड, गिरगाव चौपाटी, केम्प्स कॉर्नर, मलबार हिल या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील … : संजय राऊत

0

मुंबई -काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत भाजपाला खुलं आव्हान शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत दिलंय. तसेच पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील.  मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पक्ष म्हणून आम्ही येऊ. केंद्रीय तपास यंत्रणांची शिवसेना, ठाकरे परिवारावर जी काही दादागिरी सुरू आहे, खोट्या आरोपांचा चिखल उडवला जातोय त्या सर्वांना उत्तरं मिळतील.”

“काही लोक हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असं बोलत आहेत. मात्र, मला असं वाटतं की पुढील काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे साडेतीन लोकं हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. या साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हेही लक्षात घ्या आणि सरकार हे सरकार असतं. पाहू कोणात किती दम आहे. खूप सहन केलं आता उद्ध्वस्त करणार आहे. राजकारणात एक मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडली गेली आहे.”“मी कोणाविषयी बोलतोय हे सर्वांना माहिती आहे. त्यांची झोप उडाली आहे. तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही घाबरणारे नाहीत. मी तर कधीच घाबरणार नाही. जे करायचं ते करा,” असंही राऊतांनी नमूद केलं.

पुण्यात भारत आणि श्रीलंकेच्या लष्करादरम्यान चर्चा

0

पुणे -श्रीलंकेच्या सशस्त्र दलाच्या सहा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ 10 ते 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान उभय लष्करांमधील  चर्चेचा भाग म्हणून तीन दिवसांच्या  भारत दौऱ्यावर आले होते.  पुणे येथील दक्षिण कमांडच्या  मुख्यालया अंतर्गत अग्निबाज विभागातर्फे दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये  अधिक चांगला समन्वय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने 9व्या आर्मी टू आर्मी स्टाफ चर्चेचे  (AAST)  आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेचे नेतृत्व भारतीय लष्कराच्या शिष्टमंडळाचे प्रमुख मेजर जनरल अनिल कुमार काशीद,एव्हीएसएम, व्हीएसएम, आंतरराष्ट्रीय सहकार्य अतिरिक्त महासंचालक,  आणि श्रीलंकेच्या  लष्कराच्या शिष्टमंडळाचे प्रमुख मेजर जनरल एचपी रणसिंघे आरडब्ल्यूपी, आरएसपी  यांनी केले. दोन्ही देशांनी प्रशिक्षण, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सरावाचे आयोजन, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील संबंध वाढवणे या प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा केली. अंमलबजावणी करण्यात आलेल्या बाबींच्या प्रगतीवर आणि आगामी वर्षांतील नियोजित  कृती आराखड्यावर  चर्चा झाल्यावर  परिषदेचा समारोप झाला. ही चर्चा दोन्ही देशांदरम्यान वाढत्या  द्विपक्षीय लष्करी सहकार्य आणि सामंजस्य याचे प्रतीक  होती.

भारतभेटीवर आलेल्या  शिष्टमंडळाने 11 फेब्रुवारी 2022 रोजी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MILIT) आणि नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA), खडकवासला येथे भेट दिली. या पथकाने कमांडंट आणि शिक्षकांशी प्रशिक्षण पद्धती आणि एमआयएलआयटीमध्ये अवलंबलेल्या   सर्वोत्तम पद्धतींबद्दल संवाद साधला. शिष्टमंडळाला एमआयएलआयटीमध्ये सुरू असलेल्या सशस्त्र दलांशी संबंधित तांत्रिक अभ्यासाविषयी माहिती देण्यात आली आणि एमआयएलआयटीमध्ये डीएसटीएससी अभ्यासक्रम शिकणाऱ्या श्रीलंकेच्या लष्करातील  शिकाऊ  अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.

नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA) च्या भेटीचे उद्दिष्ट दोन्ही देशांमधील ‘प्रशिक्षण आदानप्रदान कार्यक्रमाचा’ भाग म्हणून सहकार्य वाढवणे हे होते. भारत-श्रीलंका द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा हा सर्वात मजबूत आणि शाश्वत स्तंभ आहे. शिष्टमंडळाच्या सदस्यांना एनडीए मधील प्रशिक्षण पद्धती आणि संबंधित पायाभूत सुविधांबद्दल माहिती देण्यात आली. एनडीएमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या श्रीलंकन कॅडेट्सनीही कॅडेट्स मेस येथे या  शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने एअर मार्शल संजीव कपूर, एव्हीएसएम, व्हीएम, कमांडंट, एनडीए यांची भेट घेतली.

श्रीलंकन शिष्टमंडळाने कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग (CME), पुणे येथेही भेट दिली. इथे  त्यांना या महाविद्यालयातील प्रशिक्षण संबंधी पायाभूत सुविधांबद्दल माहिती देण्यात आली,  ज्याचा वापर लढाईशी संबंधित क्षेत्रातल्या उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांसाठी सर्व संबंधित अभियांत्रिकी पैलूंवर प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. शिष्टमंडळासाठी लढाऊ अभियंता प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले होते. याशिवाय भारताच्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीची माहिती देणारा सांस्कृतिक दौराही प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आला होता.

आडते असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाप्पू भोसले यांचा सन्मान

0

पुणे: स्वारद फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड आडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाप्पू भोसले यांचा सन्मान करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुठा गावचे सरपंच शंकरनाना मोहोळ, स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती मोहोळ, गौरी चव्हाण, सौरभ जाधव, मारुती चव्हाण यावेळी उपस्थित होते. कामगार युनियनच्या अध्यक्षपदी निवड झालेले संतोष नागरे, सचिव विशाल केकाणे यांच्यासोबतच निवडून आलेल्या व सर्व संचालक, विविध मान्यवर,कामगार युनियनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्केटयार्डमध्ये व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच सर्व नवीन कार्यकारणी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेल,अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष बाप्पू भोसले यांनी दिली.

वाईन विक्री निर्णय जनतेच्या कोर्टात .. हजारेंचे उपोषण स्थगित

0

पुणे राज्य सरकारने अण्णा हजारेंशी केलेल्या चर्चेनंतर अण्णांनी आपले उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. वाईन विक्रीचा निर्णय आता जनतेच्या कोर्टात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या संदर्भात अण्णा हजारेन्निप्रसिद्धीस दिलेली प्रेस नोट आणि अण्णांना सरकारच्या वतीने देण्यात आलेले लेखी विवेचन जसेच्या तसे आम्ही येथे देत आहोत . वाचा आणि पहा …

राळेगणसिद्धी परिवाराने 45 वर्षापूर्वी गावातील दारुभट्ट्या बंद केल्या. तसेच संपूर्ण गाव दारुमुक्त करून व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती सुरू केली होती. त्यानंतर 1995 पासून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा दारू आणि व्यसनाधीनतेला नेहमीच कडाडून विरोध राहिलेला आहे. या विषयावर अनेक आंदोलनेही झालेली आहेत. त्या आंदोलनातून महिलांच्या ग्रामसभेद्वारे दारुबंदीचा कायदा, ग्रामरक्षक दलाचा कायदा अस्तित्वात आलेला आहे.

 नुकताच 27 जानेवारी 2022 रोजी राज्य मंत्रीमंडळाने वाईन विक्रीसंबंधी एक निर्णय घेतला. त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचे धोरण असल्याचे वृत्त समजले. हा निर्णय समाज, तरुण वर्ग आणि संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने घातक असल्याने 31 जानेवारी रोजी पत्रकार परिषद व प्रेसनोटद्वारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध करण्यात आला. वास्तविक लोकशाहीमध्ये मंत्रीमंडळाने असे निर्णय लोकांना विचारून घेतले पाहिजेत. कारण लोकशाही ही लोकांनी, लोकांची, लोकांसाठी, लोकसहभागातून चालवलेली असते. यापूढील काळात सरकारने निर्णय घेताना जनतेला विचारले पाहिजे. कारण जनता ही मालक आहे. सरकार जर जनतेला न विचारता निर्णय घेणार असेल तर राज्यभर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.

मंत्रीमंडळाने जनतेला न विचारता निर्णय घेतल्यामुळे 3 फेब्रुवारी 2022 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाईन विक्रीच्या नवीन धोरणाला विरोध करण्यात आला. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी पुन्हा एक पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. दोन्ही पत्रांना सरकारकडून उत्तर न आल्याने 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना तिसरे पत्र पाठवले. या पत्राद्वारे 14 फेब्रुवारी 2022 पासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाचा इशारा देण्यात आला.

            उपोषणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठवली. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची तयारी सुरू केली. विविध जैन संघटना, काही मुस्लिम संघटना यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. नगरसह काही ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनीही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे जाहीर केले. त्यानंतर सरकारने या मुद्द्यावर चर्चा सुरू केली. चर्चेवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीत चर्चेतून प्रश्न मार्गी लागू शकतात. त्यानुसार 10 तारखेला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन सावंत व इतर वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी राळेगणला आले. सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा झाली. त्यानंतर 10 तारखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि 11 तारखेला जिल्हाधिकारी यांनीही राळेगणसिद्धी येथे येऊन चर्चा केली. 12 तारखेला नाशिक विभागीय पोलीस आयुक्त बी. जी. शेखर यांनीही येऊन चर्चा केली.

वेळोवेळी झालेल्या चर्चेनंतर काल 12 तारखेला सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त, उपायुक्त, नगरचे जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी आले. सुमारे अडीच तास सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले…

1)      किराणा दुकानातून दारूची विक्री करण्यात येणार नाही.

2)      वाईन विक्रीच्या नवीन धोरणाचा निर्णय जनतेला विचारून घेण्यात येईल.

3)      वाईन विक्रीच्या प्रस्तावित धोरणाच्या निर्णयाला माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देऊन त्यावर जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यात येतील.

4)      जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.

5)      नागरिकांच्या सूचना व हरकती आल्यानंतर सरकारकडून त्या विचारात घेऊन यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल.

वरील मुद्दे सरकारने मान्य केले असून अशा प्रकारचे नागरिकाच्या जीवनावर दुष्पपरिणाम करणारे धोरण ठरवताना ते जनतेला विचारून ठरवावे असा आग्रह शासनाकडे धरण्यात आला. तो शासनाने मान्य केला आहे. तसे लेखी पत्र प्रधान सचिव यांनी दिले आहे. म्हणून आम्ही विश्वास ठेवला आहे. पण त्याचे पालन झाले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. आमचे आंदोलन हे कोणत्याही पक्ष-पार्टीच्या विरोधात किंवा व्यक्तीच्या विरोधात नाही. विविध सामाजिक कार्यकर्त्यांशी सातत्याने चर्चा झाली. कार्यकर्ते व ग्रामसभा यांनी या वयात उपोषण न करण्याची आग्रहाची विनंती केली. या सर्व बाबींचा विचार करून खालील निर्णय जाहीर करण्यात येत आहे.

1)      व्यसनाधीनतेस प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही धोरणास जन आंदोलनाचा विरोध कायम राहील.

2)      वाईन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिल्यामुळे कार्यकर्ते व ग्रामसभा यांच्या आग्रहानुसार 14 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणारे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कि. बा. तथा अण्णा हजारे

भविष्यात नवीन युवा पिढीला संधी देणार : रमेश बागवे

0

पुणे : शिवाजीनगर आणि पुणे कंन्टोमेंट मतदारसंघ कांग्रेसचा बाले किल्ला होता पण काही स्वार्थी नेत्यांमुळे हातातून गेला. कॉंग्रेस पक्षाने ज्यांना महापौर केलं, उपमहापौर केलं ,आमदार केलं अशानीं गद्दारी करित पक्ष सोडला. आणि तेच आता पुन्हा कांग्रेस मध्ये दिसत आहे.शिवाजीनगर आणि पुणे कंन्टोमेंट मतदारसंघात काँग्रेसचा बालेकिल्ला प्रस्थापित करण्याची हीच वेळ आहे.आगामी निवडणूकीत नवीन युवा सूशिक्षत चेहर्‍यांना संधी दिली पाहिजे असे मत  पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले.
        पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद रणपिसे यांनी बोपोडी येथील अग्रवाल धर्मशाळा येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता.याप्रसंगी रमेश बागवे बोलत होते. कार्यक्रमांस माजी आमदार दिप्ती चौधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, नंदलाल धिवार, शैलेजा खेडेकर, पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा मनिष आनंद, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र भुतडा, अंजनेय साठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोपोडी प्रभागातील बोपोडी गावठाण, औंधरोड, चिखलवाडी, गोखलेनगर अशा विविध भागातून 10 महिला व 10 पुरुषांनी असे सुमारे 100 ते 150 कार्यकर्त्यांनी विनोद रणपिसे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी दत्ता बहिरट म्हणाले की, कॉग्रेसचे तिन्ही उमेदवार निवडून येथील असा बोपोडी मतदार संघ आहे. विनोद रणपिसे यांनी संवाद मेळावा आयोेजित केला, असेच संवाद, मंथन मेळावे पुणे शहरात ठिकठिकाणी पक्ष मजबूत करण्यासाठी आयोजित केले पाहिजे.
तसेच विनोद रणपिसे म्हणाले की, काँग्रेस शिवाय पुणे शहरासोबतच देशाला पर्याय नाही त्यामुळे महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व वाढले तर महाराष्ट्रातही सत्ता येईल आणि पुढे केंद्रातही येईल. त्यासाठी कॉंग्रेस मध्ये युवा पिढी प्रवेश करित आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भुतडा यांनी केले असून सौ.पूजा आनंद यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

0

पुणे, दि.१३:- डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील महसूल विभागाकडील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्यास भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार सुनील टिंगरे, माजी मंत्री सचिन अहिर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अतिरिक्त मनपा आयुक्त राहुल खेमणार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून राज्य शासन वन वाचविण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यंत करीत आहेत. पक्षी आणि वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळणे गरजेचे आहे. पक्षी अभयारण्य परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून संरक्षणाच्यादृष्टीने परिसरात पोलीसाची गस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच गैरप्रकार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही बसविण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अभयारण्य परिसरात पुणे महानगरपालिकेने स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबवावी. नागरिकांनी या पक्षी अभयारण्याला भेट द्यावी आणि पर्यावरणाच्यादृष्टीने पुण्यातील हिरवे आच्छादन टिकवण्यासाठी झाडाची लागवड करावी असे आवाहन मंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

पुण्यातील नागरिक पर्यावरणाप्रती जागरुक असून त्यांच्या सहकार्याने पुण्याला २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी अभयारण्य परिसरात होत असलेल्या कामांची माहिती दिली.

असले कितीही गुन्हे दाखल करू द्यात , आम्ही भीक घालत नाही

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक प्रतिक्रिया

पुणे-महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकर्त्यांवर सुडाच्या भावनेतून कारवाई केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने विविध आंदोलने आणि मोठा जमाव जमवून जाहीर कार्यक्रम केले. परंतु त्यांचावर कारवाई करण्यात आली नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर महापालिकेत प्राणघातक हल्ला करण्यात आला. परंतु गुन्हेगारांवर सौम्य कलमे लावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरल्याने सुडाच्या भावनेतून कारवाई करीत आहे. पुणे पोलिस सरकारच्या दबावाखाली आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. सरकारचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सातत्याने जनतेसमोर आणू. पुणेकर जनता या सरकारला नक्की धडा शिकवेल.

भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक

महापालिकेत धुडगूस: भाजपच्या शहर अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, मनपा पदाधिकाऱ्यांची नावे नाहीत.काही नगरसेवकांचीच नावे.

0

नागरी,सरकारी कामात अडथळे

पुणे – महापालिकेत शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. त्याच ठिकाणी त्यानंतर भाजप कडून किरीट यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, महापालिका पदाधिकारी, एक आमदार, यांच्यावर गुन्हा दाखल केला किंवा नाही हे समजू शकले नाही, मात्र भाजपा शहर अध्यक्ष आणि काही नगरसेवक यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .बंदी आदेश उल्लंघन,घोषणाबाजी आणि बेकायदेशीर जमाव जमवून, पोलीस साहित्याचे नुकसान करणे, नागरिक आणि काही ठराविक नगरसेवक, ठराविक पत्रकार यांना अटकाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करून त्यांच्या कामात अडथळे आणणे, धक्काबुक्की करणे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यात अनेक घडामोडी घडल्या होत्या. आधी त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली. त्यानतंर त्याच ठिकाणी भाजपकडून सोमय्यांचा सत्कार करण्यात आला होता.

जमावबंदी आदेश भंग, विनापरवाना कार्यक्रम घेणे यात महापालिका पदाधिकारी अग्रभागी होते काय, याबाबत त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख पोलिसांकडून केला गेला नाही .

निव्वळ सरकारीच नाही तर ठराविक नगरसेवकांच्या कामात, नागरिकांच्या कामात, ठराविक माध्यम प्रतिनिधींच्या कामात अडथळे आणल्याचे हे प्रातिनिधिक छायाचित्र.

बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून निर्माण होणारा एकोपा महत्त्वाचा- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

0

पुणे, दि.12:- बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून या शर्यतीच्या माध्यमातून आपापसात निर्माण होणारा एकोपा आणि  प्रेम ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले

अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्यावतीने तळेगाव महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ परिसरातील नाणोली येथील हिंदकेसरी बैलगाडा घाटात आयोजित बैलगाडा शर्यतीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, जि. प. पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाते, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी, बैलगाडा मालक, चालक, शेतकरी उपस्थित होते.

श्री. केदार म्हणाले, येत्या दिवसात बैलगाडा शर्यतीचे चोखपणे आयोजन व्हावे यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी यापुढेही उभे राहू. भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषिप्रधान देशात शेतकरी जनावराची  सेवा करतो, त्यांच्यावर प्रेम करतो. शेतकरी एक वेळ आपल्या पोटाचा विचार करणार नाही मात्र आपले पशुधन उपाशी राहणार नाही याची काळजी घेतो.  बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था असते, असेही श्री. केदार म्हणाले.यावेळी खासदार बारणे आणि आमदार शेळके यांनीदेखील बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीचे उत्तमरित्या आयोजन केल्याबद्दल आयोजकांचा सन्मान करण्यात आला.

राहुल बजाज सदैव स्मरणात राहतील- पंतप्रधान

0

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“वाणिज्य आणि उद्योग जगतासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राहुल बजाज सदैव स्मरणात राहतील. व्यापारविश्वाच्या पलीकडे देखील त्यांना समाजसेवा करण्याची अत्यंत आवड होती. ते एक अत्यंत संभाषणचतुर व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने मी अत्यंत दुःखी झालो आहे. बजाज यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती.

राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी देशासाठी दुःखद आहे. त्यांच्या निधनाने औद्योगिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या निर्मितीत त्यांनी पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर नेले. ते केवळ यशस्वी उद्योजकच नव्हते तर त्यांची विचारांची दिशा स्पष्ट होती. राज्यसभेत त्यांनी उत्तम काम केले. ते आग्रही आणि अभ्यासू पद्धतीने विषयाची मांडणी करीत. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
-खासदार प्रकाश जावडेकर

महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र हे संपूर्ण देशातील प्रमुख क्षेत्र आहे. राज्याला हे स्थान मिळण्यामध्ये उद्योगपती राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगसमुहामार्फत केलेले काम खूप मोलाचे आहे. बजाज ऑटोचे पन्नास वर्षे नेतृत्व करून त्यांनी त्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. पुणे – पिंपरी चिंचवड हा परिसर औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाला आणि येथे समृद्धी निर्माण झाली यामध्ये बजाज ऑटोचे ऐतिहासिक स्थान आहे. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगताची अपरिमित हानी झाली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन केवळ उद्योग क्षेत्रासाठीच नाही तर सामाजिक क्षेत्रासाठीही धक्कादायक आहे. उद्योग व्यवसायाचा पसारा वाढवताना त्यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले. सामानांच्या वाहन खरेदीची स्वप्नपूर्ती करतानाचा त्यांनी देशाच्या वाहन उद्योगासाठी दिलेले योगदान जगाच्या नकाशावर भारताला ओळख मिळवून गेले. बजाज यांना समस्त पुणेकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

पाच दशकांहून अधिक काळ राहुल बजाज यांनी भारतीय उद्यमी जगतावर आपला प्रभाव टाकला. भारतीय सर्वसामान्य माणूस व मध्यमवर्गीय कुटुंबाचे परवडणाऱ्या सुखद प्रवासाचे स्वप्न राहुल बजाज यांनीच सर्वप्रथम प्रत्यक्षरूपात आणले. भारतीय प्रवासी संकल्पनेत तसेच तरुण उद्योजकांमध्येही ‘हमारा बजाज’ हे अविभाज्य अंग म्हणून समोरे आले.
– दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास शांती आणि कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती देवो.
– सुभाष देसाई, उद्योगमंत्री

महाराष्ट्रासह देश आणि संपूर्ण जगात राहुल बजाज यांनी आपली ओळख निर्माण केली होती. राज्यसभेचे सदस्य म्हणून 2006 ते 2010 च्या दरम्यान निवडून गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि राहुल बजाज चांगला संवाद आणि मैत्री होती. ज्या-ज्या वेळी महाराष्ट्रावर संकटे आली त्यावेळी ते मदतीसाठी धावून आले.
– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

फिरोदिया कुटुंबामुळे राहुल बजाज यांच्याशी माझी ओळख झाली. नवलमलजी फिरोदिया जे बजाज ऑटो बघत होते, त्यांनी कमलनयन बजाज यांना विचारले की राहुल परदेशातून शिकून आला आहे, तर त्याला काहीतरी काम दिले पाहिजे. मग फिरोदिया यांनी त्यांना बजाजमध्ये बसवले. तेव्हापासून त्यांचे काम सुरू झाले. राहुल बजाज यांचे काका रामकृष्ण यांच्यामुळे शरद पवार यांचा राहुल यांच्याशी संबंध आला. यातूनच एकमेकांचा स्वभाव आवडला म्हणून आमची मैत्री फुलत गेली. आमच्या बैठका व्हायच्या आम्ही अनेकदा भेटायचो. ते मला धाकट्या भावासारखे मानायचे. त्यांचे विकसनावर अधिक लक्ष असायचे. त्यांनी मुलांनाही तसेच शिक्षण दिले. राजीव आणि संजीव यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. ते परखडपणे त्यांचे मत मांडायचे. अर्थशास्त्र त्यांचा विषय होता. एखाद्या विषयात धोरण चुकले असेल तर त्यावर ते कोणाचे सरकार आहे याचा विचार न करता ते मत मांडत असत.
– विठ्ठलशेठ मणियार, स्नेही-मित्र

देशाच्या औद्योगिक विकासात बजाज उद्योग समुहाचा वाटा मोठा असून, त्यात राहुल बजाज यांचे भरीव योगदान होते. त्यांनी बजाज उद्योग समुहाची पुण्यात उभारणी करुन अनेक लघुउद्योजकांना वाव दिला आणि असंख्य कामगारांना रोजगार देऊन त्यांचे आयुष्य घडवले. जमनालालजी बजाज हे महात्मा गांधींचे सहकारी होते. महात्मा गांधींकडून प्रेरणा घेऊन बजाज परिवार देशसेवेत सदैव कार्यरत राहिला आहे.
– मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, कॉंग्रेस

पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील बजाज ऑटोमधील मागणीवर अनेक उद्योग तरले. बजाजला सुट्या भागांचा पुरवठा करण्यासाठी मिळणाऱ्या ऑर्डर्समुळे अनेक लघु, मध्यम व सूक्षम उद्योग निर्माण झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या उद्योग समूहाचा दबदबा निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्यानंतरही त्यांनी आपल्या मातीशी नाळ तुटू दिली नाही. आकुर्डीतील त्यांचे वास्तव्य हे तमाम पिंपरी-चिंचवडकरांना अभिमानाची बाब होती. कामगारांची काळजी, महिला कामगारांचा सन्मान आणि समाजाप्रति असलेला आदर त्यांनी काय ठेवला. त्यांच्या या असामान्य कार्यामुळे त्यांची स्मृती कायम उद्योजक व कामगारांच्या ह्दयात तेवत राहिन.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना

‘ऑटो हब’ म्हणून नावारुपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीच्या भरभराटीमध्ये बजाज आणि टाटा मोटर्स या दोन्ही उद्योग समूहांचा सिंहाचा वाटा आहे. बजाज उद्योग समूहाने बाजारात आणलेल्या स्वदेशी बनावटीच्या दुचाकी वाहनांना विशिष्ट दर्जा मिळाला. हा दुचाकी उत्पादनाच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. सर्वच स्तरातील नागरिकांना परवडणाऱ्या स्वदेशी दुचाकी बनविणाऱ्या बजाज समूहाने जगातील अनेक देशांमध्ये भारतीय उत्पादने पोहचविली आहेत. हमारा बजाज ते पल्सर अशी त्यांची झेप माझ्यासारख्या उद्योजकांना स्फुर्तीदायक आहे. त्यांच्या दुचाकी, तीनचाकी निर्मितीच्या निर्णयाने उद्योग क्षेत्रात क्रांती घडली आहे.
– विजय देशमुख, संचालक, इंजिनिअरिंग क्‍लस्टर

राहूल बजाज यांचे साधु वासवानी मिशनशी आपुलकीचे नाते होते. त्यांच्याबद्दल दादा वासवानी म्हणाले होते, की ‘राहूल बजाज हे विश्‍वासू आणि धैर्यशील व्यक्तिमत्व आहेत.’ आपल्या जीवनाचा हेतू सर्वांना मदत करणे हा आहे, हे सत्य त्यांना उमगले होते. राहूल बजाज हे जीवनाकडे सकारात्मक नजरेने बघणारी व्यक्ती होती म्हणून ते सर्वाकडे प्रेमाच्या प्रगल्भ दृष्टीने बघत. ते आयुष्य भर बंधुभाव जपणारे आणि शांतीप्रिय माणूस होते.
– साधू वासवानी मिशन

राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय वाहन उद्योगाला नवा आयाम देणारा द्रष्टा उद्योगपती हरपला. उद्योग क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणारे आणि दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणून बजाज यांची ओळख होती. उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांच्याकडे कमालीचे सामाजिक भान होते. आदर्श उद्योजक आणि समाजसेवक गमावल्याची भावना आहे.
– राजेश राठी, व्यवस्थापकीय संचालक, सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज

राहुल बजाज यांचे जाणे आपल्या सर्वांसाठीच वेदनादायी आहे. ते केवळ पुण्याचेच नाही, तर देशाचे भूषण होते. उद्योग क्षेत्रातील उत्तम नेतृत्व, मार्गदर्शक आणि पितामह हरवला आहे. भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय होते. उद्योगसह सामाजिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच मी अधिक प्रभावित झाले होते.
– रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

राहुल बजाज यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झाले आहे. माझे वडील पी. पी. छाब्रिया यांचे ते खास मित्र होते. त्यांची ही मैत्री आमच्या तीन पिढ्यांशी आणि कुटुंबाशी जोडलेली आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझे व्यक्तिगत किंवा उद्योग जगताचेच नाही, तर राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. आयुष्यभरात त्यांनी केलेल्या कार्याची यादी मोठी आहे. दूरदर्शी आणि कल्पनारम्य अशा रिक्षाची निर्मिती करून सामान्य माणसाला सक्षम बनवण्याचे काम त्यांनी केले. उद्योगसह सामाजिक कार्यात त्यांचे योगदान प्रेरक आहे. त्यांचा हा वारसा राजीव आणि संजीव दोघेही पुढे घेऊन जातील, अशी अपेक्षा आहे.
– प्रकाश पी. छाब्रिया, चेअरमन, फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज

मे.ऋषभ बुलियन या कंपनीच्या भागीदाराला 7 कोटी 11 लाख रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट चा लाभ घेतल्याबद्दल अटक

0

पुणे -सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाच्या दक्षिण मुंबई कर-चुकवेगिरी विरोधी शाखेने आज 12 फेब्रुवारी 2022 रोजी मे.ऋषभ बुलियन या सोन्याचांदीच्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या भागीदाराला 7 कोटी 11 लाख रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे.

प्रधान मुख्य आयुक्तांच्या नेतृत्वाखालील मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या केंद्रीय गुप्तचर पथकाने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. मे.ऋषभ बुलियन (GSTIN 27AAMR1367B1Z9) या कंपनीच्या मुख्य व्यवहारांच्या ठिकाणी 11 फेब्रुवारी 2022 रोजी धाड टाकून शोधमोहीम राबविण्यात आली. या कंपनीच्या भागीदाराने आज दिलेल्या निवेदनाद्वारे मे.गोल्डमाईन बुलियन आणि मे.रिद्धी बुलियन या कंपन्या मुंबईत असल्याचे भासवून त्यांच्याशी केलेल्या व्यवहारातून 7 कोटी 11 लाख रुपयांचे अस्वीकरणीय इनपुट टॅक्स क्रेडीट हडपल्याची कबुली दिली. या दोन कंपन्यांच्या उल्लेखित उद्योगाच्या ठिकाणी जाऊन केलेल्या तपासणीअंती या दोन्ही कंपन्या बनावट असल्याचे आणि अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. मे.ऋषभ बुलियन या कंपनीने मे.गोल्डमाईन बुलियन कडून 4 कोटी 89 लाख रुपये तर मे.रिद्धी बुलियन कडून 2 कोटी 22 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविले.

तपासणी दरम्यान मिळालेले पुरावे तसेच निवेदन यांच्या आधारावर सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अन्वये मे.ऋषभ बुलियन या कंपनीच्या भागीदाराला अटक करून त्याच्यावर सीजीएसटी कायदा 2017 मधील कलम 132(1)(क) आणि कलम 132(5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला आज मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजार करण्यात आले आणि नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधात सीजीएसटी कार्यालयाच्या मुंबई विभागाने सुरु केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत, सीजीएसटी मुंबईच्या  दक्षिण क्षेत्र आयुक्तालयाने आतापर्यंत सुमारे 570 कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस आणली असून, त्यापैकी 7 कोटी रुपये वसूल केले आहेत  आणि  गेल्या सहा महिन्यांत एकूण आठ जणांना संबंधित प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

करचुकवेगिरीशी संबंधित असण्याची  शक्यता असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीजीएसटी विभाग, डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करत आहे तसेच करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी इतर कर अधिकाऱ्यांशी समन्वय देखील साधत आहे. येत्या काही काळात, करचुकवेगिरी विरुद्धची ही मोहीम  अधिक तीव्र करण्यासाठी विभागातर्फे नियोजन केले जात आहे.

पर्वती मतदार संघात विनामूल्य आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका-: नगरसेविका अश्विनी कदम

0

पुणे-पर्वती मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांच्या विकास निधीतून नगरसेविका सौ.अश्विनी नितीन कदम यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्णवेळ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन येथे आज संपन्न झाला.


याप्रसंगी नगरसेविका अश्विनी कदम म्हणाल्या की पर्वती मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निवडणूक लढवली असताना पर्वती मतदार संघातील नागरिकांच्या उत्तम आरोग्या सुविधेच्या विषयी मी कायम प्रयत्नशील असते. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कोरोनाच्या प्रादुर्भावात लसीकरण,आरोग्य तपासणी शिबीर , राज्य स्तरावर नामाजलेले सुसज्य असे अल्प दरातील MRI सेंटर व त्यामध्ये एक्सरे,सर्व रक्त-लघवी चाचण्या व तसेच प्रभागात डोळे तपासणी ,विनामूल्य चष्मे वाटप,अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव देणे असे आरोग्य विषयक शिबीर घेत जास्तीत जास्त लोकांना कसा आरोग्याचा फायदा होईल यासाठी प्रयत्नशील राहिले आहे व पुढे ही राहील.याचाच भाग म्हणून खूप पाठपुरावा करत पर्वती मतदार संघातील नागरिकांसाठी पूर्णवेळ रुग्णवाहिका उपलब्ध केली.यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सांगली जिल्हा परिषद गटनेते शरद लाड,विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ , महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी , युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, अमोल ननावरे, विनीत मोकाशी, ऍड.प्रमोद गालिंदे, डॉ.सुनीता मोरे,फारुख शेख,संकेत शिंदे, सचिन समेळ,संग्राम वाडकर ,सचिन जमदाडे ,राहुल गुंड, अमोल पोतदार, प्रमोद कोठावळे, मंथन जागडे,महादेव जाधव ,सोमनाथ खंडाळे, प्रसाद खंडाळे, सौरभ ढावरे ,सुरज बनसोडे ,कृष्णा कोळी, मयूर शिंदे ,गणेश हनवते, यश नांदे, अरुण ढावरे ,योगेश लोंढे, अजय मिसाळ उपस्थितीत होते.

मनसेचे युवा नेते अंजनेय साठे कॉंग्रेसमध्ये दाखल …

0

पुणे – गेल्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर कात्रज मधील शिरोळे, कदम यांच्यानंतर आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला झटका बसला तो रुपाली पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने, आता त्यानंतर रावडी नसलेल्या पण शिवाजीनगरच्या परिसरात सभ्यपणे हक्कासाठी लढाई लढणाऱ्या युवा नेत्याला मनसे मुकली आहे, मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ.अंजनेय साठे यांनी पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईत टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, प्रणिती शिंदे, यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रोहित टिळक यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि गौरव बोराडे यांनी या प्रवेशात मोलाची भूमिका बजावली. तरूण युवा कार्यकर्त्याला कॉंग्रेसने संधी दिली आहे.

शिवाजीनगर परिसरातील पाणीप्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारे मनसे युवा नेते म्हणून अंजनेय यांच्याकडे पाहिले जात . सुशिक्षित आणि विविध स्वतरावरील वर्गात साठे यांचा असलेला सरळमार्गी ,अभ्यासू संपर्क कॉंग्रेसला बळ देणारा ठरेल असे नगरसेवक अविनाश बागवे यांनी म्हटले आहे.

‘माझ्या घरातच कॉंग्रेसची वैचारिक विचारसरणी आहे. माझे पणजोबा स्वर्गीय विनायक साठे हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या कार्याचा गौरव करत कॉंग्रेसकडून 1957 मध्ये त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. त्यांचाच वैचारीक वारसा घेऊन मी राजकारणात असून कॉंग्रेसकडून माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला दिलेला मान सन्मान तसेच माझ्यावर दाखविलेला विश्‍वास मी निश्‍चितपणे सार्थ करून दाखविण’ – डॉ. अंजनेय साठे

“१० मार्चनंतर महाविकास आघाडीवर सत्ता सोडण्याची वेळ येईल” ; चंद्रकांत पाटील यांचं भाकीत!

0

पुणे-राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी सांगितले.भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता. या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल.

त्यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड व एकूण संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करून काल पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा आपला सवाल आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी केली नाही तर आपण न्यायालयात जाऊ.

पुण्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने गोमुत्र आणि गुलाबजल टाकून त्या पायऱ्या स्वच्छ केल्या. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून आपल्याला खूप आनंद झाला.