Home Blog Page 2089

शेकडो कोटीचा जीएसटी फ्रॉड दोघांना सुरत येथून अटक

0

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सहा महिने विभागास गुंगारा देत फिरत असलेल्या जोडप्यास गुजरातमधील सुरत येथून अटक केली. त्यांच्याकडून 450 कोटींहून अधिक रकमेची बोगस बिले जप्त करण्यात आली आहेत.मुंबई पोलिसांची आणि सुरत शहर पोलिसांची गुन्हा अन्वेषण शाखा यांच्या भरीव सहकार्यामुळे हे अभियान अथक परिश्रमांनंतर दोन दिवसाअखेरीस यशस्वीरित्या पूर्ण झाले.

मे. डॉल्फिन ओव्हरसीज [प्रोप्रायटरः श्रीमती प्रिमा म्हात्रे] आणि मे.प्राईम ओव्हरसीन [प्रोप्रायटरः श्री. संजीव सिंग] या दोन कंपन्यांनी करचुकवेगिरी केल्याची गुप्त माहिती व्यापक सर्वसमावेशक विश्लेषण प्रणालीद्वारे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झाली. माहे ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपन्यांवर छापे टाकले असता पहिल्या दिवसापासून या दोन्ही कंपन्यांचे संचालक वैद्यकीय कारण देऊन अन्वेषणासाठी गैरहजर राहिले व त्यानंतर ते फरार झाले. विभागाच्या कोणत्याही नोटीसांना न जुमानता हे जोडपे महाराष्ट्र राज्याबाहेर पळून गेले. या जोडप्याने इतर व्यक्तिंच्या नावे बोगस कंपन्या काढून त्याद्वारे साधारण रुपये 482 कोटी इतक्या रकमेची बोगस बिले प्राप्त करून रु. 111 कोटी इतक्या प्रचंड मोठ्या रकमेची करचुकवेगिरी केल्याचे तपासात दिसून आले.

प्रकरणाचे गांभीर्य पाहता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने मुंबई पोलिसांच्या विशेष व सातत्यपूर्ण मदतीने व माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन या जोडप्याचा ठावठिकाणा शोधून काढला.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाचे व मुंबई पोलिसांचे पथक तात्काळ रात्रीच पुढील कार्यवाहीसाठी सुरतला रवाना झाले. सुरत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अत्यंत भरीव मदतीने व मुंबई पोलीस दलातील माहिम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या जोडप्याला सुरत येथे त्यांनी भाड्याने घेतलेल्या आलिशान फ्लॅटमधून ताब्यात घेतले गेले. सुरत येथून मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या जोडप्यास शुक्रवारी पहाटे मुंबई येथे आणले गेले.

मुंबई येथे न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कार्यवाहीचे नियोजन व अंमलबजावणी राज्यकर सहआयुक्त (अन्वेषण-ब) श्रीमती संपदा मेहता, राज्य कर उपायुक्त विनोद देसाई, सहायक राज्य कर आयुक्त ऋषिकेश वाघ, राज्य कर अधिकारी श्रीमती स्वाती शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली.

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाने परराज्यातून व इतक्या मोठ्या घोटाळ्यातील आरोपीस अटक करण्याची ही विभागाच्या इतिहासातील पाहिलीच वेळ आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तिंना या घटनेमुळे जरब बसली असून, महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग, पोलीस प्रशासनाच्या सक्षम सहकार्याने धडक कारवाई भविष्यातही अशीच चालू ठेवेल, असा चोख संदेश करदात्यांस देण्यासही विभाग यशस्वी ठरला आहे.

७ नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

0

रत्नागिरी दि. 12 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 07 नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना महामहिम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज येथे केली.

मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते हे व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले की, 06 डिसेंबर हा डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. 2015 सालापासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जात आहे. 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी होते. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 07 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. कारण याच दिवशी 1900 साली बाबासाहेबांनी शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणास सुरूवात केली होती. मला असे वाटते की, हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून राष्ट्रीय पातळीवरील डॉ.आंबेडकरांच्या शिक्षण विषयक ओढ आणि निष्ठेचे स्मरण करुन देण्यासाठी तो साजरा करणे आवश्यक आहे. येथे बसलेल्या संसदेतील सदस्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, मी त्यांना माझ्या परीने मदत करीन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जीवन कार्याशी संबधित पाच ठिकाणांना पंचतीर्थाचे नाव देऊन  केंद्र सरकारने या सर्व ठिकाणी आदंराजली अर्पण करण्याची स्तुत्य पध्दत सुरु केली आहे. त्यांची जन्मभूमी, नागपूरची दीक्षा भूमी, दिल्लीचे परिनिर्वाण स्थळ, मुंबईची चैत्यभूमी आणि लंडन मधील आंबेडकर मेमोरियल होम या पाच ठिकाणी बाबासाहेबांचा आदर्श मानणारे लोक श्रध्दाजंली अर्पण करतात. माझी केंद्र सरकरला अशी सूचना आहे की, याच मालिकेत बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथील स्मारकही तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे आणि या गावाचे स्फूर्तीभूमी असे नामाभिधान करण्यात यावे.

याप्रसंगी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मोठा व्यासंग केला. आजच्या पिढीतही ही प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून या ठिकाणी उत्तमोत्तम पुस्तके असलेले ग्रंथालय निर्माण करण्याची सूचना राष्ट्रपती कोविंद यांनी आताच स्मारकाला भेट दिली तेव्हा केली आहे.त्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सहकार्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या उपक्रमामध्ये मी ही सहभागी होऊ इच्छ‍ितो. त्या दृष्टीने राज्यपालांनी राज्यपाल विवेकानुदान निधीतून 30 लाख रुपये देण्याची घोषणा  केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, त्यांच्या पत्नी सविता कोविंद आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा आणि या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन सर्वोतोपरी प्रयत्न करील, अशी ग्वाही दिली.

प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते यांनी बाबासाहेबांचे बालपण, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे विचार, आंबडवे गावाची पार्श्वभूमी, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ या शाळेच्या माध्यमातून केले जाणारे शैक्षणिक काम याविषयीचे विवेचन केले.

कार्यक्रमाची सुरुवात व सांगता पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे सुप्रसिध्द निवेदक मनोज क्षीरसागर यांनी केले.

या कार्यक्रमास राष्ट्रपती भवन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, विभागीय आयुक्त विलास पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, प्रांतधिकारी प्रवीण पवार, प्रांतधिकारी शरद पवार, तहसिलदार, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद तसेच प्रशासनातील इतर विभागाचे अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, आंबडवे ग्रामस्थ कोविड नियमांचे पालन करीत उपस्थित होते.

आळंदी येथे ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’

0

पुणे:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी  महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आळंदी येथे इंद्रायणी घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे शनीवार,१२ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर, महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे विसर्जन झाले. त्यातील एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले होते. त्याची स्मृती म्हणून रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. गेली ७४ वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.
यावर्षी सुद्धा हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इंद्रायणी नदीच्या घाटावर सकाळी ठीक साडेआठ वाजता  हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन, विश्वस्त डॉ. मच्छिंद्र गोर्डे, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, हभप श्यामसुंदर महाराज, आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष वैजयंती उमरगेकर, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, देवराम घुंडरे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, गणपतराव कुऱ्हाडे, तुषार झरेकर, सचिन चव्हाण, संस्थेचे कर्मचारी, शांतीदलाचे आणि युक्रांदचे कार्यकर्ते, गांधी प्रेमी नागरिक आदी उपस्थित होते.  सुरवातीला सकाळी ८.३० वाजता डॉ कुमार सप्तर्षी यांचे हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सौ. मोहिनी पवार, अभय देशपांडे  यांचा सर्वधर्म प्रार्थना आणि भजने गायनाचा कार्यक्रम झाला.

ब्रह्मोत्सवाला गरुड, कलश व यज्ञ स्थापनेने प्रारंभ

0

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ३८  व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
पुणे : गरुड, कलश व यज्ञ स्थापनेसारख्या धार्मिक कार्यक्रमांनी श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाला मंदिरात उत्साहात प्रारंभ झाला. धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसह नानाविध कार्यक्रमांनी हा ब्रह्मोत्सव सजला असून मंदिरामध्ये आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. 
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या आशिर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात सुरु आहेत. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा यांसह पूजेचे यजमान विशाल मेहता यावेळी उपस्थित होते. 

राजकुमार अग्रवाल म्हणाले, धार्मिक कार्यक्रमांमध्ये होम-हवन, महाअभिषेक, सुवर्ण पुष्पअर्चना तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य वंचित मुलांच्या संस्थेला वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीच्या गाभा-यात देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 
अमिता अग्रवाल म्हणाल्या, मंदिरात केशर दूध अभिषेक, पालखी सोहळा आणि पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी हे नाविन्यपूर्ण कार्यक्रम देखील होणार आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जैव सुरक्षा प्रयोगशाळेतील संशोधन आणि लस महत्वाची भूमिका बजावेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.12: शेतकऱ्यांना पशुधनापासून मिळणारे उत्पादन वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्नवाढ करुन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात जैव सुरक्षा प्रयोगशाळेतील संशोधन आणि कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळेत निर्मित होणारी लस महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

औंध येथे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे राज्यात पशुरोग निदानासाठी राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जैव सुरक्षा स्तर 2 आणि 3  प्रयोगशाळा उभारणी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळेच्या नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार, पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके, प्रधान सचिव जगदीश गुप्ता,  पशुसंवर्धन आयुक्त सचिंन्द्र प्रताप सिंह, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले,  सहआयुक्त डॉ. विनायक लिमये, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीमुळेच कोरोनाची तिसरी लाट आपण बऱ्यापैकी थोपवू शकलो. माणसाला कोरोना, पोलिओसारख्या रोगांपासून वाचवण्यात, प्रतिबंधक लशींनी जी भूमिका बजावली, त्याच धर्तीवर लशींचे संशोधन, उत्पादन व वापर करुन येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे पशुधन रोगांपासून वाचवायचे आहे. पशुधन क्षेत्रातल्या वाढीसाठी जनावरांतल्या सांसर्गिक रोगावर नियंत्रण आवश्यक आहे. पशुधन, पाळीव प्राणी आणि वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. पशु लसीकरणाचे महत्व अधिक आहे. लसीकरणामुळे या रोगाचा प्रतिबंध करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनावरे आणि कोंबड्यांचे आरोग्य तसेच दूध, अंडी आणि मांसांच्या उत्पादन वाढीकरिता लसीकरणाचा मोठा उपयोग होतो. जागतिक कृषि संस्थेच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार वाढत्या लोकसंख्येच्या अन्नविषयक गरजा भागविण्यासाठी 2050 पर्यंत अन्न उत्पादनात ७० टक्के वाढ आवश्यक आहे. यामध्ये प्राणीजन्य पदार्थांचा वाटा मोठा असून लसीकरणाशिवाय ही उत्पादनवाढ अशक्य आहे.

            दूधाचे आणि दूग्धजन्य पदार्थांचे उत्पन्न वाढविण्यासाठी चांगल्या दुधाळ जातीच्या, चांगल्या वंशांच्या जनावरांचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्यामार्फत ब्राझीलमधून शुद्ध गीर वंशाचे 10 वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असून यामाध्यमातून राज्यात शुद्ध गीर प्रजातीची पैदास करण्यात येणार आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याचा उल्लेखही श्री. पवार यांनी केला. तसेच पशुसंवर्धन विभागासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही ते म्हणाले.

पुशंसवर्धन मंत्री श्री. केदार म्हणाले,  एव्हीएनएन्फ्लूएन्झा, ब्रुसेलोसिस, रेबीज इत्यादी आणि सीसीएचएफसारख्या प्राण्यांपासून माणसाला होणाऱ्या आजारांचे  निदान करण्यासाठी बीएसएल 3 ची सुविधा आवश्यक आहे. प्रयोगशाळेच्या निर्मितीचा 75 कोटी रुपयांचा प्रकल्प आरकेव्हीवाय अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्याला आणि शेतीशी निगडीत काम करणाऱ्यांना पशूपालन हा उत्पन्नाचा शाश्वत मार्ग आहे. मात्र पशुआरोग्य हा पशुधन व्यवसायाचा मुख्य कणा आहे.

            रोगांच्या प्रादुर्भावामुळे पशुधनाच्या आरोग्यावर, उत्पादनावर परिणाम होतो. पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचे रक्षण तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी आवश्यक ठरते. जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देताना, त्यांचे वेळेत लसीकरण करुन घेतले पाहिजे. त्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वाची ठरणार असल्याचे श्री. केदार म्हणाले.

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, जैव सुरक्षा स्तर दर्जाच्या प्रयोगशाळांची उपलब्धता झाल्याने पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने करणे शक्य होणार आहे. रोग निदान वेळेत केल्याने बाधीत पशुधनास वेळेत उपचार मिळतील आणि रोग प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवून पशुपालकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टळणार आहे. प्रयोगशाळा शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव गुप्ता म्हणाले, पशुसंवर्धन विभाग लस उत्पादनात सक्षम होत असून या प्रयोगशाळाच्या उभारणीमुळे कुक्कुट व शेळ्या-मेंढ्याच्या लस उत्पादनाची क्षमता ५ पटीने वाढणार आहे. उत्पादन क्षमतेमधील होणाऱ्या वाढीमुळे राज्याची लसींची गरज अतिरिक्त लस राज्याबाहेर विक्रीसाठी उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

आयुक्त सचिंन्द्र प्रताप सिंह यांनी प्रास्ताविकात प्रयोगशाळेबाबत माहिती दिली. यावेळी पशुपालक, शेतकरी तसेच अधिकारी उपस्थित होते.

पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने होणार

जैव सुरक्षा स्तर दर्जाच्या प्रयोगशाळांची उपलब्धता झाल्याने राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळांना ब्रुसेल्लॉसिस, लाळखुरकुत, एव्हियन इन्फलुएंजा, रेबीज आदींचे रोग नमुने निदानासाठी पाठवता येणार आहे. प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणामुळे पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने करणे शक्य होणार आहे. रोग निदान वेळेत केल्याने बाधीत पशुधनास वेळेत उपचार मिळतील आणि रोग प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवून पशुपालकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावयास मदत मिळेल.

कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 61 कोटी 28 लाख रुपयाची तरतूद उपलब्ध करून पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेत आदर्श उत्पादन पद्धतीच्या मानकांचा (जी.एम.पी.) अवलंब करुन कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळांची टर्न की आधारावर उभारणी करण्यात आली आहे.  प्रयोगशाळेतील सर्व कामकाज हे बिल्डींग मॅनेजमेंट सिस्टीम या केंद्रीय संगणक प्रणालीद्वारे नियंत्रित करण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. कुक्कुट पक्ष्यातील मानमोडी, लासोटा, कोंबड्याची देवी, मरेक्स या तर शेळ्या-मेंढ्यातील देवी व पीपीआर या रोग देवी प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

‘एक जिल्हा परिषद गट एक उत्पादन’ प्रकल्पासाठी सामंजस्य करार

0

पुणे दि.12- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘एक जिल्हा परिषद गट एक उत्पादन’ प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे,  विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र.कुलगुरू डॉ.एम.एस. उमराणी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे,  प्रकल्प संचालक शालिनी कडू, विद्यापीठातील नवोपक्रम केंद्राच्या संचालक अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.

स्वयं सहायता समूहामार्फत उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्यादृष्टीने समूहातील सदस्यांना प्रशिक्षण देत बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला असल्याने बचत गटातील महिला सदस्यांना व्यवसाय सुरू करण्याच्यादृष्टीने चांगली मदत होईल. गटातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम करण्याच्या जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना प्रकल्पामुळे अधिक बळ मिळेल, असा विश्वास श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

‘एक जिल्हा परिषद गट एक उत्पादन’ प्रकल्पाद्वारे 70 उद्योग व्यवसायांची उभारणी होणार आहे. याद्वारे ग्रामीण महिलांची व्यावसायिक क्षमता बांधणी करून त्यांच्या व्यवसायात वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर स्वयं सहायता समूहाच्या उत्पादनांना विविध स्तरावरील स्थानिक आणि ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायाला चालना मिळून बचत गटाच्या महिला सदस्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकेल.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत 39 लक्ष 61 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत 2019 मध्ये 8 हजार 342 स्वयं सहायता समूहांची स्थापना झाली असून जिल्ह्यात 24 हजार 549 स्वयं सहायता समूह आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत 70 गटात स्वयंसहायता समूहामार्फत व्यवसाय सुरू करण्याच्यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, संशोधन व साहचर्य केंद्राचे  सहकार्य मिळणार आहे.

स्वयं सहायता समूहाच्या सदस्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देणे, खरेदी, उत्पादन तयार करणे, मूल्यसाखळी तयार करणे, प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करणे, प्रस्तावाचा पाठपुरावा करून शासकीय विभाग आणि  बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळवून देणे,  मूल्यवर्धित साखळी तयार करून बँक जोडणी आदी बाबींचा यात समावेश असणार आहे. या बाबींची विविध टप्प्यात जोडणी करण्यात येणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.१२: जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे, जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, १५ ते १८ वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन लशीचा अधिक प्रमाणात पुरवठा होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. तसेच सभागृह आणि खुल्या मैदानातील कार्यक्रमांना २०० पेक्षा अधिक व्यक्तिंच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्याबाबत राज्यस्तरावर चर्चा करण्यात येईल. शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रमांना परवानगीबाबतही शासनस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे श्री.पवार म्हणाले.

बैठकीत श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर १५.१० टक्के होता. मागील आठवड्यात १९ हजार २७३ नवीन रुग्ण आढळले आणि ४६ हजार ३३८ रुग्ण कोविडमुक्त झाले. जिल्ह्यात एकूण १ कोटी ६९ लाख ५२ हजार लसीकरण झाले आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ४७ टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे, तर १५ ते १८ वयोगटातील ६९ टक्के मुलांनी लशीची मात्रा घेतली आहे. लशीच्या पहिल्या मात्रेचे ११० टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे ८७ टक्के लसीकरण झाले.

बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, अशोक पवार, अतुल बेनके, दिलीप मोहिते, चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, कृष्ण प्रकाश, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

बैठकीपूर्वी कौस्तुभ बुटाला यांनी सामाजिक दायित्व अंतर्गत नाविन्यपूर्ण आरोग्य सुविधांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आमदार अरुण लाड यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेली रुग्णवाहिका आणि ५ फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले, तसेच हिराभाई बुटाला विचारमंच मार्फत ससून सर्वोपचार रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि मोबाईल ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले.

आतापर्यंत 38 खेळाडूंचा लिलाव; इशानला सर्वाधिक 15.25 कोटी मिळाले, लॉर्ड शार्दुल 10.75 कोटींमध्ये झाला दिल्लीचा

0

बेंगळुरू -आयपीएल 2022 चा मेगा लिलाव बेंगळुरूमध्ये सुरू आहे. 10 बोली लावणाऱ्या फ्रँचायझींनी आतापर्यंत 38 खेळाडूंना खरेदी केले आहे. त्यापैकी आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू इशान किशन ठरला आहे. त्याला मुंबईने 15.25 कोटींना विकत घेतले. ईशानवर बोली लावण्यासाठी नीता अंबानी यांच्या मुंबई आणि गुजरातदरम्यान 10 मिनिटांची शर्यत सुरु होती. त्यानंतर, निकोलस पूरनसाठी दुसरी सर्वात मोठी स्पर्धा झाली. पूरनला हैदराबादने 10.75 कोटींना विकत घेतले.

या लिलावासह ईशान आयपीएलमधील दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी युवराजला दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटींना विकत घेतले होते. इशानने त्याचा गुरू महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले, ज्याला चेन्नईने १२ कोटींमध्ये कायम ठेवले आहे.

ईशाननंतरचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू दीपक चहर ठरला आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटींना विकत घेतले. मधल्या फळीतील फलंदाज आणि यष्टिरक्षक निकोलस पूरन यांच्यातही दीर्घ लढत होती. सुमारे 8 मिनिटांच्या बोलीनंतर पुरनला हैदराबादने 10.75 कोटींना विकत घेतले.

या लिलावात इशान व्यतिरिक्त श्रेयस अय्यर, हर्षल पटेल आणि श्रीलंकेचा हसरंगा 10 कोटींहून अधिक रुपयांना विकले गेले. 10 कोटींहून अधिक किमतीत विकला जाणारा हसरंगा हा पहिला परदेशी खेळाडू आहे.

या लिलावात यंगिस्तानवरही पैशांचा पाऊस पडला. युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला बेंगळुरूने ७.७५ कोटींना विकत घेतले. पडिक्कलची 2 कोटी बेस प्राईसची बोली 40 सेकंदात 4 कोटी पार गेली होती. त्याचप्रमाणे हर्षल पटेलला राजस्थान रॉयल्सने 10.75 कोटींना खरेदी केले. गेल्या वर्षी त्याची सॅलरी 20 लाख होती म्हणजेच यामध्ये 53 पट वाढ झाली आहे. केकेआरने नितीश राणाला 8 कोटींना विकत घेतले.

ऑक्शनच्या चकित करणाऱ्या गोष्टी
मोठी नावे विकली गेली नाहीत: बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसनही पहिल्या फेरीत विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेश रैना विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. आयपीएल 2021 च्या मधल्या हंगामात चेन्नईने त्याला वगळले होते. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेला स्टीव्ह स्मिथही विकला गेला नाही. त्याची मूळ किंमतही २ कोटी रुपये होती. गेल्या वर्षी स्मिथ दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता.

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. १२ :- राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल  बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

राहुल  बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.

राहुल  बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.

सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे , दि. 12 : बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

0

बजाज समूहाचे 50 वर्षे अध्यक्ष; 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

पुणे-बजाज ग्रुपचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज हे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते. रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुर्वेझ ग्रांट म्हणाले की, गेल्या एक महिन्यापासून ते रुग्णालयात होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता आणि हृदयाचा त्रासही होता. राहुल बजाज यांनी दुपारी 2.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित होते. राहुल बजाज यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी पुण्यातील नानापेठ परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे मारवाडी उद्योगपती कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांच्या घरी झाला. बजाज आणि नेहरू कुटुंबात तीन पिढ्यांपासून कौटुंबिक मैत्री सुरू होती. राहुल यांचे वडील कमलनयन आणि इंदिरा गांधी यांनी काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतले होते.

1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींपर्यंत पोहोचली आणि स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी बनली. 2005 मध्ये राहुल यांनी कंपनीची कमान मुलगा राजीवकडे सोपवण्यास सुरुवात केली. त्यांनी राजीव यांना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक बनवले, त्यानंतर ऑटोमोबाईल उद्योगातील कंपनीच्या उत्पादनांची मागणी केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढली.

पहिली बजाज स्कूटर गॅरेजच्या शेडमध्ये बनवली

देशातील नंबर टू टू व्हीलर ब्रँड बजाजचे मूळ स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेले आहे. जमनालाल बजाज (1889-1942) हे त्यांच्या काळातील एक यशस्वी उद्योगपती होते ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला होता. स्वातंत्र्यलढ्यात ते महात्मा गांधींचे ‘भामाशाह’ होते. 1926 मध्ये त्यांनी ट्रेडिंग करण्यासाठी त्यांना दत्तक घेणाऱ्या सेठ बच्छराज याच्या नावाची एक फर्म बच्छराज अँड कंपनी स्थापन केली. 1942 मध्ये वयाच्या 53 व्या वर्षी त्यांच्या निधनानंतर, त्यांचे जावई रामेश्वर नेवातिया आणि दोन मुले कमलनयन आणि रामकृष्ण बजाज यांनी बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनची स्थापना केली.

1948 मध्ये, कंपनीने आयात केलेल्या घटकांपासून एकत्रित केलेल्या दुचाकी आणि तीन चाकी वाहने बाजारात आणली. पहिली बजाज व्हेस्पा स्कूटर गुडगावमधील गॅरेज शेडमध्ये बनवण्यात आली होती. यानंतर बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनने कुर्ला येथे उत्पादन कारखाना उभारला जो नंतर आकुर्डी येथे हलविण्यात आला. येथे बजाज कुटुंबाने फिरोदियाझसोबत भागीदारी करून दुचाकी आणि तीनचाकी वाहने तयार करण्यासाठी स्वतंत्र संयंत्रे उभारली. 1960 मध्ये कंपनीचे नाव बदलून बजाज ऑटो असे करण्यात आले.

बजाजचे बुकिंग नंबर विकून लोकांनी लाखो कमावले
लहान कुटुंबांसाठी आणि लहान व्यापार्‍यांसाठी अतिशय योग्य, कमी किमतीच्या आणि कमी देखभालीसह बजाज ब्रँडच्या वेस्पा स्कूटर इतक्या लवकर लोकप्रिय झाल्या की 70 आणि 80 च्या दशकात लोकांना बजाज स्कूटर खरेदी करण्यासाठी 15 ते 20 वर्षे वेटिंग करावी लागत होती. त्या काळात अनेकांनी बजाज स्कूटरचे बुकिंग नंबर विकून लाखो कमवले आणि घरे बांधली.

पद्मभूषण आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मानही मिळाला

2001 मध्ये त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान देखील प्रदान करण्यात आला आहे. 2006 ते 2010 या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती, प्रणव मुखर्जी यांनी त्यांना 2017 मध्ये जीवनगौरवसाठी CII अध्यक्ष पुरस्कार प्रदान केला.

कर सल्लागार अर्थव्यवस्थेला चालना देणारा दुवा-सुरेश कोते

0

एमटीपीए’तर्फे १५ व्या कर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन 
पुणे : “कर सल्लागार हा शासन आणि करदाते यांना जोडणारा दुवा आहे. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे. लोकांना कर भरण्यासाठी प्रेरित करण्याची भूमिका कर सल्लागारांनी निभवावी. कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून देण्यासाठी कर सल्लागारांनी प्रयत्न करावेत,” असे प्रतिपादन श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड समूहाचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी केले.

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने आयोजित १५ व्या कर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सुरेश कोते बोलत होते. शिवाजी रस्त्यावरील ‘एमटीपीए’च्या सभागृहात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, उपाध्यक्ष श्रीपाद बेदरकर, सचिव ज्ञानेश्वर नरवडे, अभ्यासक्रम चेअरमन स्वप्नील शहा, समन्वयक मिलिंद हेंद्रे, अमोल शहा, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, शरद सूर्यवंशी, मिलिंद भोंडे, सीए अविनाश मुजुमदार, व्ही. एन. जोशी, ऍड. व्ही. जी. शहा, पदाधिकारी अनुरुद्र चव्हाण, अश्विनी बिडकर, अश्विनी जाधव, ऍड. उमेश दांगट आदी उपस्थित होते.

सुरेश कोते म्हणाले, “कर सल्लागार हे स्वयंरोजगार देणारे शाश्वत क्षेत्र आहे. यातील बदल आत्मसात करत व्यवसाय वाढीसाठी सतत नवनव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. हा व्यवसाय ज्ञानाधारित आहे. बदलती करप्रणाली समजून घेत करदात्यांना चांगली सेवा देण्यावर आपण भर दिला पाहिजे. शिक्षण तुम्हाला ओळख, मानसन्मान मिळवून देते. त्यामुळे जिज्ञासू, चौकस वृत्तीने सतत शिकत राहिले पाहिजे. कर सल्लागारांना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी ‘एमटीपीए’ राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.”

“जगातील सर्वात मोठी महिलांची संस्था अशी श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड समूहाची ओळख आहे. वेगळ्या विचारांवर उभा असलेल्या या संस्थेत आज देशभर ५० हजार महिला काम करताहेत. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थेला ६० वर्षे होत असून, या संस्थेशी जोडल्याचा आनंद आहे,” अशी भावना कोते यांनी व्यक्त केली.

अनिल चव्हाण म्हणाले, “आज सर्वत्र चांगल्या कर सल्लागाराची गरज आहे. कर प्रणाली आपण समजून घेतली पाहिजे. चांगली सेवा दिली तर कर सल्लागार म्हणून यशस्वी व्हाल. कर रचनेतील बारकावे समजून घेत क्लायंटला विश्वासार्ह सेवा देण्यावर आपला भर असला पाहिजे. ग्रामीण भागातील कर सल्लागारांना मार्गदर्शन उपलब्ध करून द्यायला हवे.”

मिलिंद हेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. आभार श्रीपाद बेदरकर यांनी मानले.

नाशिकहून आता सुरत ५ तासात नाही सव्वा तासात बाय रोड -नितीन गडकरींची आणखी एक घोषणा

0

चेन्नई-सुरत हा ग्रीन फील्ड सहापदरी महामार्ग

मुंबई -केंद्र सरकारच्या ग्रीन फील्ड महामार्ग संकल्पनेनुसार चेन्नई-सुरत हा ग्रीन फील्ड सहापदरी महामार्ग उभारला जाणार असून तीन महिन्यांत त्याचे काम सुरू होणार आहे. हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याने नाशिक ते सुरतदरम्यानचे अंतर अवघे १७६ किमीवर येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या सव्वा तासात सुरत शहर गाठता येणार असल्याची घाेषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

सध्याचे मार्ग
सध्या नाशिक-धरमपुर-सुरत या मार्गाचे अंतर २२५ किमी आहे. दुसरा २४० किमीचा मार्ग नाशिक-दिंडाेरी-सापुतारा मार्गे सुरत असा आहे. या दाेन्ही मार्गांनी सुरतला पाेहाेचण्यासाठी किमान ५ तास लागतात. त्याची आता बचत होईल.

११,००० काेटींचा खर्च
सुरत ते चेन्नई हे १,६०० किमीचे अंतर १,२५० किमीवर येईल. मुंबई, पुणे, साेलापूर या शहरांच्या वाहतुकीचा बोजा निम्याने घटेल.
यंदा मार्चमध्ये निविदा काढून मार्च २०२३ मध्ये काम सुरू हाेऊन पुढील अडीच वर्षांत पूर्ण हाेईल.
नाशिक जिल्ह्यामार्गे दरराेज सुरतकडे सुमारे ४६,००० वाहने जातात. जिल्ह्यात १२२ किलोमीटरच्या या महामार्गासाठी ११,००० काेटी रुपये खर्च येईल.

फायदा
रस्त्याच्या बाजूला, लाॅजिस्टिक-रिसर्च सेंटर्स, गाेडाऊन्स, उद्याेग, अन्न प्रक्रिया उद्याेग, काेल्डस्टाेअर उभे राहतील. दक्षिणेतही भाजीपाला पाेहाेचवता येईल. सूरतमधील भाविकांना शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी जाण्यासाठी मोठी साेय होईल.

सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्वाचा -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

0

जलसंपदा विभागाच्या पुरस्काराचे वितरण

पुणे, दि. 11 : सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असून राज्यातील पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. जलसंपदा विभागाच्यावतीने दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

बालगंधर्व रंगमंदीर येथे जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन व अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव विलास राजपूत, पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह.वि. गुणाले उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, पाणी वापर संस्थाचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासोबतच पाणी वापर संस्था सक्षम होण्यासाठी जलसंपदा विभागाने सुरू केलेली महात्मा फुले पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. राज्यात पाणी वापर संस्थाच्या माध्यमातून पाण्याची सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. गावशिवारातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणांसोबत पाणी वापर संस्थाचाही सहभाग आवश्यक आहे. पाणी वापर संस्थानी गावशिवारात पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासाठी जलसंपदा विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, सिंचन क्षेत्रात लोकसहभाग वाढावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने पाणी वापर संस्था व जलसंपदा विभागातील अधिकारी यांचा समन्वय महत्वाचा आहे. पाण्याचा कार्यक्षमतेने वापर होण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग गरजेचा आहे.  जलसंपदा विभागाच्यावतीने प्रोत्साहन म्हणून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी कार्य करणाऱ्या संस्था व गुणवंत अभियंत्याचा पुरस्काराने गौरव करण्यात येतो, यापुढे दरवर्षी 15 सप्टेंबरला पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात येईल.

जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम म्हणाले, सिंचन क्षेत्रात पाणी वापर संस्था व अभियंता यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंचन क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव होण्यासोबतच इतरांना प्रेरणा मिळावी यासाठीच ही पुरस्कार योजना आहे. पाणी वापर संस्थांनी सक्षम होण्यासोबतच पाण्याच्या काटेकारे नियोजनात अधिकाधिक सहभाग वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पाणी वापर संस्था व अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला यावेळी जलसंपदा विभागाच्या सर्व खोऱ्यांचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, अधिकारी पाणीवापर संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार

सन 2014-15 राज्यस्तरीय पुरस्कार

प्रथम – कृषी देवता कालवा पाणी वापर संस्था, गुनवडी ता. बारामती, जि. पुणे.

द्वितीय – संत कदम माऊली पाणी वापर संस्था, पाथरे ता. राहुरी जि. अहमदनगर.

तृतीय – बागाईतदार पाणी वापर संस्था आराई, ता. बागलाण जि. नाशिक

सन 2014-15 विभाग नाशिक

प्रथम – जय बजरंग पाणी वापर संस्था, जानोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

द्वितीय- श्री. समर्थ पाणी वापर संस्था, मोहाडी ता. दिंडोरी जि. नाशिक

सन 2014-15 विभाग पुणे

प्रथम- श्री. गुरुनाथ पाणी वापर संस्था क्र. 37 वडनेर खुर्द, जांबूत ता. शिरुर जि. पुणे

द्वितीय- श्री. खांडेश्वरी पाणी वापर संस्था मर्यादित खांडज, ता. बारामती, जि. पुणे

सन 2014-15 विभाग अमरावती

प्रथम – अंब्राजी बाबा पाणी वापर संस्था, परसापूर ता. अचलपूर, जि. अमरावती

द्वितीय – जय किसान पाणी  वापर संस्था परसापूर ता. अचलपूर, जि. अमरावती

सन 2014-15 विभाग नागपूर

प्रथम- गजानन पाणी वापर संस्था, बोंडगाव/तुट, ता. अर्जुनी, जि. गोंदिया

द्वितीय – माँ गंगा पाणी वापर संस्था, अरततोंडी अरुणनगर, ता. अर्जुनी, जि. गोंदिया

सन 2014-15 विभाग औरंगाबाद

प्रथम – जलस्वराज्य पाणी वापर संस्था, बारड, ता.मुदखेड, जि. नांदेड

द्वितीय – मुक्तागिरी  पाणी वापर संस्था, देळुब, ता. अर्धापूर जि. नांदेड

सन 2014-15 विभाग कोकण

प्रथम – गंगेश्वर पाणी वापर संस्था, शिरगाव ता. देवगड, जि. सिधुदुर्ग

द्वितीय – लिंगेश्वर पावणादेवी  पाणी वापर संस्था, निळेली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

सन 2017-18 करिता मोठे प्रकल्प राज्यस्तरीय पुरस्कार

प्रथम – जानुबाई पाणी वापर संस्था, शिरवली, ता. बारामती जि. पुणे

द्वितीय – ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्था, ता. बारामती जि. पुणे

तृतीय – वारेगाव ग्रुप उपसा जलसिंचन सहकारी  पाणी वापर संस्था, ता. सिन्नर , जि. नाशिक

सन 2017-18 कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुरस्कार

प्रथम – पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था, संघ मेहकर, जि. बुलढाणा

सन 2018-19 करिता मोठे प्रकल्प पुरस्कार

प्रथम – केशवराज पाणी वापर संस्था, अन्वी मिर्झापूर जि. अकोला.

सन 2018-19 करिता मध्यम प्रकल्प

प्रथम – कै. रंगनाथ गोपाळपाटील पाणी वापर संस्था, वलखेड, ता. दिंडोरी जि. नाशिक

जलसंपदा विभाग अभियंता गौरव पुरस्कार

अधिक्षक अभियंता र. रा शुक्ला, कार्यकारी अभियंता राजेश मोरे, उपसचिव ज्ञा. आ. बागडे, कार्यकारी अधिकारी श्रीराम हजारे, सहायक अभियंता योगेश सावंत, शाखा अभियंता बबन राठोड, शाखा अभियंता श्रीरंग ठवरे, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचे दिलीप जोशी, कार्यकारी अभियंता जयंत खाडे, उपविभागीय अभियंता दिपीका भागवत, सहायक अभियंता गिरीश अपराजित, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे विलास पाटील, सहायक अभियंता गजानन घुगल, अधिक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, कार्यकारी अभियंता प्रविण कोल्हे, उपविभागीय अधिकारी प्रशांत आडे, महेंद्र जोशी उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता जयसिंग हिरे, शाखा अभियंता कैताण बार्देस्कर, शाखा अभियंता राजकुमार पवार यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच सन 2016-17 मध्ये वाशिम जिल्हा सिंचन प्रकल्पाबाबत उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत अधीक्षक अभियंता प्रमोद मांदाडे व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

राज्य तांत्रिक सल्लागार समिती-1 चे महासंचालक श्री. रा.वा. पानसे व त्यांचे सहकारी अधिकारी  व राज्य तांत्रिक सल्लागार समिती -2 मध्ये मुख्य अभियंता राजेंद्र पवार व त्यांचे सहकारी अधिकारी यांचा सांघिक गौरव करण्यात आला. तसेच गोसखुर्द प्रकल्पासाठी सांघिक पुरस्कार मुख्य अभियंता अरुण कांबळे व त्यांच्या सहकारी अधिकारी यांचाही गौरव करण्यात आला.

विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची राष्ट्रपतींना विनंती – विधानपरिषद सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर

0

मुंबई, दि. ११ : विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. या निर्णयामुळे देशातील विधिमंडळांच्या सार्वभौम सभागृहांच्या अधिकाराचा संकोच होत राज्यघटनेला अभिप्रेत असलेले तीन स्तंभामधील “सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण हे तत्त्व बाधित झाले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद १४३ नुसार राष्ट्रपती यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयासंदर्भात परामर्श घ्यावा, अशी विनंती राष्ट्रपती यांना करण्यात आली असल्याची माहिती, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होते. राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांची विधानपरिषदेचे सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राजभवन येथे भेट घेवून त्यांची स्वाक्षरी असलेले निवेदन राष्ट्रपती यांना सादर केले.

राष्ट्रपती यांची भेट घेतल्यानंतर सभापती श्री. निंबाळकर याबाबतची माहिती देताना म्हणाले, राष्ट्रपती यांना सादर केलेल्या निवेदनात, विधानसभेने बेशिस्त वर्तनासंदर्भात संमत केलेला ठराव आणि त्यानंतरची कारवाई हा पूर्णतः विधानमंडळाच्या अधिकार कक्षेतील विषय आहे. सभागृहाने संमत केलेल्या ठरावाविरुध्द न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही. विविध राज्यातील केवळ उच्च न्यायालये नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने देखील राजाराम पाल प्रकरणात (सन २००७) हाच मुद्दा अधोरेखित करत निर्णय दिला आहे, असे श्री.निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

श्री.निंबाळकर पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाविषयी पूर्ण आदर व्यक्त करत आम्ही, सभागृहाचे अधिकार, विशेषाधिकार आणि उन्मुक्ती यांना बाधा उत्पन्न होऊ नये या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. राज्यघटनेतील अनुच्छेद १४३ नुसार राष्ट्रपती यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयासंदर्भात परामर्श घ्यावा. २८ जानेवारी, २०२२ च्या या निर्णयामुळे केवळ देशातील राज्य विधानमंडळेच नव्हे तर संसदेच्या देखील कर्तव्यवहनासाठी आवश्यक असलेल्या अधिकार कक्षेला बाधा पोहचली आहे. त्यामुळे आपण याबाबत परामर्श घ्यावा आणि या निर्णयाचा फेरविचार व्हावा, याकरिता निर्देश देण्याची विनंतीही  राष्ट्रपती यांना केली असल्याची माहितीही श्री.निंबाळकर यांनी यावेळी दिली.