Home Blog Page 2083

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक  यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

0

पुणे- शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक  यांच्यावर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका 24 वर्षीय तरुणीनं कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुनच पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचं आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं, असा आरोप या तरुणीनं तक्रारीत केला होता. त्यानुसार पोलिसांनी कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 24 वर्षाच्या तरुणीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, गोवा याठिकाणी असलेल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. तरुणीनं तक्रारीत रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध ठेवले. त्यांच्यापासून तरुणी गरोदर राहिली. हे कळताच रघुनाथ कुचिक यांनी जबरदस्तीनं गर्भपात करुन तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रघुनाथ बबनराव कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

यांच्या बगलबच्च्यांनीच नदीचे केले गटार – गणेश बिडकरांचे नदीसुधारप्रकल्पावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर

0

नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच!

पुणे -शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये ‘नदीचे केवळ सुशोभिकरण नव्हे तर नदीची सुधारणाच’ केली जाणार आहे. या नद्यांचे पर्यावरण जपणे, नदीत एकही थेंब दूषित पाणी न जाऊ देणे, तसेच नदीबरोबर नागरिकांचे नाते दृढ करण्यासाठी सुविधा विकसित करणे, नदीपात्र हा शहराच्या सौंदर्याचा भाग बनविणे, ही उद्दीष्टे ठेवण्यात आलेली आहेत, असे महानगर पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आज एका प्रसिद्धीमेसेजद्वारे स्पष्ट केले.
गेली ५० वर्षे महापालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी या नद्यांची वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहिली नाही तर त्यासाठी हातभार देखील लावला. हजारो ट्रक राडारोडा या नदीपात्रात टाकून पात्र उथळ आणि अरूंद केले गेले. नदीपात्रात दूषित पाणी जाणार नाही, यासाठी काहीही विचार न करता ओढ्या नाल्यांचे आणि ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात जाण्यापासून वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही, अशा शब्दात सभागृह नेते बिडकर यांनी नदी सुधारणा प्रकल्पावर टीका करणाऱ्या मंडळींचा समाचार घेतला. या योजनेवर टीका करणाऱ्या व्यक्तीच्याच अनेक बगलबच्च्यांनी नदीपात्रात भराव घालून इमारती उभ्या करण्याचा चंग बांधला होता. नदीची ही अवस्था पाहून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकार मधील केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी तर ‘ही नदी नव्हे तर हे गटार आहे’, अशी उव्दिग्न प्रतिक्रिया दिली होता. मात्र त्यानंतर देखील यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही.
केंद्रात आणि पाठोपाठ २०१४ मध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुळा-मुठा सुधारणेसाठी ठोस पावले उचलण्यास सुरूवात झाली. ‘नमामि गंगे’ प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नद्यांची निवड झाली. या प्रकल्पासाठी निवड झालेल्या नद्यांमध्ये गंगे व्यतिरिक्तच्या मुळा-मुठा या एकमेव नद्या आहेत. नदीमध्ये एकही थेंब दूषित पाणी जाऊ नये यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज होती. यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी अर्थात जायका ने एक हजार कोटी रुपयांचे अत्यंत कमी व्याजाचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाची हमी केंद्र सरकारने घेतलेली आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार असतांना देखील काँग्रेस, राष्ट्रवादीने अशी हमी घेतलेली नव्हती आणि यासाठी प्रयत्नही केलेला नव्हता, असे बिडकर यांनी सांगितले.
जायका अंतर्गत ११ नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात एसटीपी उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचेही काम प्रगतिपथावर आहे. नदीसुधार प्रकल्पाचे एकूण ११ टप्पे केले असून त्यातील प्राधान्याच्या टप्प्याच्या कामाच्या निविदाही निघालेल्या आहेत. हा प्रकल्प जगदविख्यात रचनाकार व साबरमती रिव्हरफ्रंटचे शिल्पकार पद्मश्री बिमल पटेल यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखी खाली राबविला जात आहे. पुण्याच्या दिमाखात भर घालणारा हा प्रकल्प पुण्याचे पर्यावरण समृद्ध करणारा असेल आणि पुण्याच्या विकासाला गती देणाराही ठरेल, असा विश्वास सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केला.

‘राजकीय विद्वानांकडून’ केवळ पुणेकरांची दिशाभूलच

बिडकर म्हणाले,या प्रकल्पाचे स्वरूप माहिती करून न घेता काही राजकीय विद्वान यावर भाष्य करत आहेत. त्यांच्या माहितीसाठी सांगितले पाहिजे की, नदी सुधार प्रकल्पाचा एकूण कालावधी हा दहा वर्षांचा आहे. यातील पहिली पाच वर्षे अभ्यास करण्यासाठीचीच होती. प्रदीर्घ अभ्यासानंतर याचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेसमोर सादर करण्यात आला. हा अहवाल जनतेच्या अवलोकनार्थ महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. दरम्यानच्या काळात नदी सुधारसाठीची स्वतंत्र एसपीव्ही देखील उभारण्यात आली. करोनाचे संकट असताना देखील प्रकल्पाचे काम पुढे जातच राहिले आहे.

पंधरा फिल्म प्रसिद्ध करणार

बिडकर म्हणाले, हा प्रकल्प तांत्रिक स्वरूपाचा आहे. अत्यंत सोप्या भाषेत या प्रकल्पाची माहिती देण्याचीही गरज आहे. ही गरज ओळखून आम्ही पंधरा फिल्म्सच्या माध्यमातून ही माहिती पुणेकरांसमोर मांडणार आहोत. या मालिकेतील रोज एक फिल्म आम्ही पुढील पंधरा दिवस प्रसिद्ध (रिलीज) करणार आहोत. यातून जिज्ञासूंचे समाधान होईल, सामान्य पुणेकरांना नेमकी माहिती मिळेल आणि वेड पांघरून पेडगावला निघालेल्यांनाही बोध होइल, असा टोला सभागृह नेते गणेश बिडकर यांनी लगावला.

महापालिकेचे ५ पदाधिकारी आणि ११ हजार कोटीच्या कामांचे प्रस्ताव राष्ट्रवादीच्या रडारवर: एसीबीकडे नोंदविणार तक्रार

0

उधारीचा धंदा पुणेकरांना खड्डयात घालणार..

पुणे- नुकताच गुजरात दौरा झालेला नदीसुधार प्रकल्प, पीपीपी चे रस्ते ,वैद्यकीय महाविद्यालय , २४ बाय ७ चा पाणीपुरवठा प्रकल्प ,बाणेर-वारजेचे १००० कोटीचे हॉस्पिटल,वडगाव शेरी येथील अ‍ॅमिनीटी स्पेसच्या जागेवर एका बांधकाम व्यावसायीकाला शाळा बांधण्याची परवानगी देण्याचा ठराव अशा विविध सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या कामांची, प्रस्तावांच्या प्रवासाची चौकशी आणि महापालिकेतील ५ पदाधिकारी यांनी या संदर्भात केलेल्या हालचाली, त्यांचे संपर्क (सीडीआर) यांची चौकशी करण्यासाठी उद्या आम्ही लाचलुचपतविरोधी विभागाकडे तक्रार करणार आहे.असे येथे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले . भाजपच्या ज्या ३/४ लोकांच्या वर्तुळात सत्ता फिरत राहिली ती आपल्या पुढच्या १० पिढ्यांच्या कल्याणाचा धंदा करत आली असून , महापालिकेची ऐपत नसताना उधारीने त्यांनी पुढील ५ वर्षे महापालिकेला पैसे फेडत बसावे लागेल अशा पद्धतीची ठेके लादून पुण्याला खड्ड्यात घालणारा कारभार केला आहे. या सर्वांची चौकशी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

या ५ हि जणांचे मोबाईल कॉल, संपर्क , सीडीआर यांची तपासणी करावी अशी मागणी करून जगताप म्हणाले कि , आम्ही काही पुरावेही देऊ , आज त्यांची नावे सांगणार नाही पण एसीबी कडे निश्चित त्यांची नावे देऊ .पुढील ५ वर्षे कोणाचीही सत्ता आली तरी त्यांना मागचेच हप्ते देत बसावे लागेल अशा पद्धतीचा कारभार करून या ५ जननी आपापल्या पुढील पिढ्यांची सोय करून ठेवली आहे. आणि काही प्रमाणात आता निवडणुकीला फंडिंग व्हावे यादृष्टीने देखील ठराव आणले जात असल्याचा आरोप जगताप यांनी केला . अॅॅमिनिटी स्पेस ची विक्री , रुग्णालये उभारताना काहींशी करून ठेवलेली पार्टनरशिप, महापालिकेची जागा , कर्ज हि महापालिकेवर आणि प्रत्यक्षात मालकी,कमाई दुसऱ्याच्या कक्षेतील या सर्व आक्षेपार्ह बाबींचा आणि हजार कोटीच्या हॉस्पिटलच्या प्रस्तावाचा प्रवास तपासून पाहावा असे आमचे म्हणणे आहे .

धर्मादाय योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक

0

मुंबई, दि. 16 : खाजगी रुग्णालयांमध्ये धर्मादाय योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत-सुविधा मिळताना होणारा विलंब तसेच प्रत्यक्ष रुग्णालय आस्थापनांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधि व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती आढावा बैठक झाली.

यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार देवेंद्र भुयार, सह धर्मादाय आयुक्त आर.यू. मालवणकर, सह धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई नि.सु. पवार, धर्मादाय उपायुक्त पुणे राहुल मामू, धर्मादाय सह आयुक्त ठाणे इंगोले संबंधित रुग्णालयांचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय संचालक व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते. खाजगी रुग्णालयांशीही प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

रुग्णालयांमध्ये योजनेच्या तरतूदीनुसार कागदपत्र सादर करुनही दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा उपचारास विलंब होणे, आपत्कालीन रुग्णास तात्काळ वैद्यकीय मदत न मिळणे, रुग्ण तथा नातेवाईकांची कागदपत्रे व पुराव्यांबाबत उलट तपासणी करणे, या योजनेंतर्गत अर्ज प्राप्ती व उपचाराधीन रुग्णांची माहिती उपलब्ध करणे तसेच रुग्णालयांच्या निर्धन रुग्ण निधी 2 टक्क्यांहून 5 टक्के एवढा वाढविणे अशा विविध विषयांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

विधी व न्याय राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, कोविड परिस्थितीमध्ये अहोरात्र सेवा देणाऱ्या वैद्यकीय यंत्रणांबाबत सर्वस्तरांत आदराची भावना आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य सेवेसाठी लोकप्रतिनिधींना आलेल्या अनुभवाप्रमाणे प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या रुग्णालयांना येणाऱ्या अडचणींचाही विचार घेणे महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीमध्ये विविध आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रमाणात दिसते आहे. रुग्णांना वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे सर्वांचे सामाजिक कर्तव्य आहे. धर्मादाय अंतर्गत सुविधा देतांना रुग्णालयांना येणाऱ्या समस्यांबाबतही विचार करण्यात यावा,असे राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.

धर्मादाय अंतर्गत रुग्णांना योग्य वैद्यकीय सहकार्य करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालय व खाजगी रुग्णालये यांच्या समन्वयाने ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे’ या समितीच्या पुढील बैठकीमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करुन यावर उपाययोजना करण्यात येतील, असे राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत उपस्थित रुग्णालयाच्या प्रतिनीधींनी या योजनेंतर्गत सुविधा देण्यात प्रत्यक्ष भेडसाविणाऱ्या समस्यांविषयी आपली मते मांडली. ज्यामध्ये रुग्णांचे उत्पन व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास होणारा विलंब, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची विशेष मागण्या रोबोटीक सर्जरी, त्रयस्थांमार्फत होणारी फसवणूक, खोटे पुरावे सादर करणे आदी विषयावरही यावेळी सखोल चर्चा झाली.

मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे उद्या ध्वजांकन

0

मुंबईहून बेलापूर, एलिफंटा आणि जेएनपीटीचा प्रवास सुखकर होणार- बंदरे मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई, दि. १६ : रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करुन प्रवासी जलवाहतूक सेवा सुरु करण्यासाठी बेलापूर येथे बांधण्यात आलेल्या प्रवासी जेट्टीचे उद्या, दि. १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे केंद्रीयमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते ध्वजांकन होणार आहे, अशी माहिती बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

बेलापूर जेट्टी येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, बंदरे मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचेसह खासदार राजन विचारे आणि विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, बाळाराम पाटील, रमेश पाटील आणि श्रीमती मंदा म्हात्रे, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतुकीचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबईपासून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबई येथे सुमारे ८.३७ कोटी खर्च करुन प्रवासी जेट्टीचे बांधकाम करण्यात आले आहे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याचेही बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. वॉटर टॅक्सी सेवेमुळे निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुद्धा जोडणी मिळणार आहे तर नवी मुंबईमधून थेट एलिफंटा येथे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार असल्याने पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे, असेही मंत्री श्री. शेख यांनी सांगितले.

बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचे भाडे प्रतिप्रवासी ८०० ते १२०० रुपये असून कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी २९० रुपये इतके भाडे ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर सुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे व खाड्यांमधून दरवर्षी सुमारे दीड कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन व वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या प्रचंड वाहतूक असलेल्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते व रेल्वे वाहतूकीला पर्याय म्हणून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महिला धोरणाच्या मसुद्यावर अधिवेशनात चर्चा व्हावी – विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

0

मुंबई, दि. 16 : राज्यात समाजकारणात आणि राजकारणात महिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. मात्र समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची अद्यापही गरज आहे.  महिला सबलीकरणाची वाटचाल योग्य दिशेने होत असून महिलांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शासन प्रयत्नशिल आहे. चौथ्या महिला धोरणाच्या प्रारूप मसुद्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा व्हावी, असे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

विधानभवन येथे ४थ्या महिला धोरणाच्या प्रारूपावर सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आमदार मंजुळा गावीत, गीता जैन, आमदार सर्वश्री राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, महादेव जानकर, संजयमामा शिंदे, प्रताप अडसड, अरूण लाड, भिमराव केराम, महिला आयोग सदस्य ॲड.संगिता चव्हाण, सचिव आय.ए. कुंदन उपस्थित होते.

सभापती श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली. जोपर्यंत समाजाच्या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत स्त्री-पुरूष समानता येणार नाही. महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. संधी दिली तर महिला खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे आपण पाहतो. येणाऱ्या अधिवेशनात याबद्दल चर्चा व्हावी, त्यामुळे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करता येईल, असेही ते म्हणाले.

महिलांना समान संधीसाठी शाश्वत विकासाच्या दृष्टीने धोरण करणार – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीसारखी महिलांच्या विकासासाठी जिल्हास्तरीय समिती असावी. महिलांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग असेल तेंव्हाच महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने होईल. महिलांना समान हक्क, समान संधी मिळावी यासाठी शाश्वत विकासाच्या दृष्टीने धोरण असणार आहे. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी मनुष्यबळ व भरीव आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याचबरोबर, विशाखा कमिटीची अंमलबजावणी झाली पाहिजे.  1994 मध्ये पहिले महिला धोरण राज्यात अंमलात आले. 1994 ते 2022 या 28 वर्षाच्या वाटचालीत धोरणात काळानुरूप बदल आवश्यक आहेत. या धोरणात ग्रामीण कामगार महिला ते जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने विचार व्हावा. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2020 ते 2030 ही दहा वर्ष ‘डिकेड ऑफ अॅक्शन’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शाश्वत विकासासाठी कृती करायची आहे. सर्व स्तरातील महिलांना  न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार : महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, शहरी भागातील महिला आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे असले तरी त्यांना स्वतःच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे.  महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार असून, महिला धोरणात महिलाविषयक कायदे व त्याची अंमलबजावणी आणि जनजागृतीवर भर देणार आहे. महिला धोरणातील कलमांची अंमलबजावणी किती दिवसात केली जाईल, अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना कोणत्या असतील आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाच्या कोणत्या विभागाची असेल, या मुद्द्यांचा समावेश धोरणातच करण्यात येणार आहे. सर्व स्तरातील महिला आणि एलजीबीटीक्यू (तृतीयपंथी, समलैंगिक आदी)  वर्गासही या  धोरणामध्ये स्थान देऊन त्यांच्या कल्याणाचाही विचार करण्यात आला आहे.

प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी प्रास्ताविकात सांगितले, या धोरणाच्या मसुद्याबाबत नऊ समित्या तयार करण्यात आल्या. या समितीतील सदस्यांचे अभिप्राय आणि सूचना या मसुद्यात घेतले आहेत. या धोरणाचा मसुदा विविध शासकीय विभाग, विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, सामान्य नागरिक यांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला. सर्व क्षेत्रातून प्राप्त अभिप्राय एकत्र करून मसुदा तयार करण्यात आला आहे.

बैठकीस सहसचिव श.ल. अहिरे, महिला व बालविकासचे आयुक्त राहुल मोरे, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वारसा जपण्यासाठी पुढील शंभर वर्षाचे नियोजन करून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि.16 :- परळ-मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय 135 वर्षापूर्वीची इमारत आहे. देशात या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा वारसा जपण्यासाठी या ठिकाणी बांधण्यात येणारी इमारत पुढील शंभर वर्षाचे नियोजन करून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने बांधण्यात येणार असून या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पशुवैद्यक महाविद्यालय परळ-मुंबई येथे ‘प्राणीजन्य अन्न सुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्राचे’ उद्घाटन आणि  गोरेगाव येथील विद्यार्थी वसतिगृह इमारतीच्या ऑनलाईन भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉ.आशिष पातुरकर हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, माणूस म्हणून आपण जे अन्नधान्य, खाद्यपदार्थ वापरतो, त्या अन्नधान्याची, खाद्यपदार्थांची सुरक्षितता जेवढी महत्त्वाची आहे. तेवढीच महत्त्वाची पशुखाद्याची सुरक्षितता आहे. माणसाच्या खाद्यपदार्थांत दूध, अंडी, मांस यासारख्या पशुधनापासून मिळणाऱ्या उत्पादनांचा समावेश असतो. त्यामुळे ‘प्राणीजन्य अन्न सुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्रा’चे महत्त्व मानवी आरोग्यासाठीही खूप अधिक असणार आहे.

जागतिक बँकेच्या सहकार्याने, कृषि, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सुरु होत असलेले हे नवीन संशोधन केंद्र, राज्यात उत्तम प्राणीजन्य अन्नपदार्थ निर्मितीसाठी, पशुधन समृद्धतेसाठी, पशुधनापासून मिळणाऱ्या दूध, अंडी, मांस आदी उत्पादन वाढीसाठी, शेतकरी व पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी उपयोगी ठरणार आहे.

प्राणीजन्य अन्नपदार्थ सुरक्षा संशोधन केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे. देशात, राज्यात पशुजन्य अन्नपदार्थांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना पशुखाद्य गुणवत्तेची चाचणी व परीक्षण करण्यास या प्रयोगशाळेची मदत होईल.

पशुसंवर्धन विभागात शिक्षण घेणाऱ्या या महाविद्यालयात चांगले प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच राज्य आणि देशातील नागरिकांचे आरोग्य जपले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

आपल्या राज्यात अनेक प्रगत शेतकरी आहेत. प्रगतशील पशुपालक आहेत. मुंबई व्हेटर्नरी कॉलेजसारखी संस्था त्यांच्या पाठीशी आहे. ‘प्राणीजन्य अन्न सुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्राचे’ उद्घाटन झालेली प्राणीजन्य अन्नपदार्थ सुरक्षा संशोधन केंद्रासारखी संस्था यापुढच्या काळात, राज्याच्या पशुधन समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार म्हणाले, राज्यामध्ये  ‘प्राणीजन्य अन्न सुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्रा’सारख्या प्रयोगशाळेची गरज होती. जगाशी स्पर्धा करताना गुणवत्ता नसेल तर स्पर्धा करू शकत नाही. या महाविद्यालयात सूक्ष्म चाचणी करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ठिकाणच्या चाचणी केंद्रामुळे  मानवासाठी लागणाऱ्या पोषक पदार्थ अधिक वाढवण्यासाठी मास, मासे अंडी, यांची चाचणी झाल्यानंतर संशोधनातून योग्य प्रमाणात मिळण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुजन्य पदार्थ निर्मिती वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पशुपालनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला महत्त्व येत आहे शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना अतिशय लाभदायक ठरत असल्याचे मंत्री श्री.केदार यांनी सांगितले.

पशुसंवर्धन राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून, राज्यात पशुधन वाढ होण्यासाठी, पशुधनाच्या आरोग्यासाठी, सुरक्षेसाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत.राज्यामध्ये आणि देशामध्ये पशुजन्य अन्नपदार्थांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना प्राणिजन्य खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेची चाचणी व परीक्षण करण्यास या प्रयोगशाळेची फार मदत होणार आहे.

हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचा अहवाल खुला करुन सूचना मागवाव्यात – कृषीमंत्री दादाजी भुसे

0

मुंबई, दि. 16 : राज्यातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रिया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला अहवाल खुला करुन यावर सूचना मागविण्यात याव्यात, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

आज मंत्रालयात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या अहवालाचे कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सादरीकरण करण्यात आले. यावेळी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, आमदार अमित झनक, आमदार महेश शिंदे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, तेलगंणा, तमिळनाडू, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सन 2020-21 मध्ये महाराष्ट्र हे हळद पीक क्षेत्रानुसार देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. त्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण महत्वाचे असून शासन याबाबत सकारात्मक आहे. या समितीने प्राथमिक अहवाल खुला करावा. पुढील 15 दिवसात योग्य सूचनांचा समावेश करुन अंतिम अहवाल लवकर सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सादर करुन सर्वसमावेशक हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांच्या माध्यमातून हळद पिकासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य कसे करता येईल याचाही विचार करावा. तसेच पणन विभाग, शेतकरी गट, सार्वजनिक खासगी सहभागी तत्वावर, पवई येथे केलेले संशोधन या सर्वांचा अभ्यास करुन अंतिम अहवाल लवकर सादर करावा, असे सांगून मंत्री श्री.भुसे यांनी समितीचे अभिनंदन केले.

‘चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत एफसी मेटालिका, डेक्कन चार्जर्स, मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन संघांची आगेकूच

0

पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2022: फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन चार्जर्स, एफसी मेटालिका, मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. 

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात एफसी मेटालिका संघाने डेक्कन आरएफ संघाचा 22-16 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. एफसी मेटालिका संघाकडून  अभय सोनटक्के, शौनक कासट,  सिद्धेश परळकर, अमित नूलकर,  सुमित सातोस्कर, लक्ष्मण विडेकर यांनी अफलातून कामगिरी बजावली.  दुसऱ्या सामन्यात  मुकुंद जोशी, नितीन जोशी,  अमोद वाकलकर, अजित सैल,  ऋषिकेश पाटस्कर,  आशिष पुंगलिया, चिराग शहा यांच्या विजयी खेळीच्या जोरावर  डेक्कन चार्जर्स संघाने ओडीएमटी 2 संघाचा 24-06 असा पराभव केला. अन्य लढतीत  मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन संघाने टेनिस द मिनाज संघाचा 23-11 असा पराभव केला.            
साखळी फेरी: एफसी मेटालिका वि.वि.डेक्कन आरएफ 22-16(100 अधिक गट: अभय सोनटक्के/शौनक कासट वि.वि.धनंजय सावंत/आशिष धोंगडे 6-4; 90 अधिक गट: सिद्धेश परळकर/अमित नूलकर वि.वि.श्रीनिवास रामदुर्ग/संदीप माहेश्वरी 6-2; खुला गट: सुमित सातोस्कर/लक्ष्मण विडेकर वि.वि.राहुल मंत्री/समीर सावळा 6-4; खुला गट: नकुल फिरोदिया/शौनक कासट पराभूत वि.आशिष धोंगडे/अमलेश आठवले 4-6; 
डेक्कन चार्जर्स वि.वि.ओडीएमटी 2 24-06(100 अधिक गट: मुकुंद जोशी/नितीन जोशी वि.वि.जे. श्रीधर/कार्तिक श्रीधर 6-0; 90 अधिक गट: अमोद वाकलकर/अजित सैल वि.वि.पंकज खरे/शैलजा कुमार 6-1; खुला गट: मुकुंद जोशी/ऋषिकेश पाटस्कर वि.वि.राहुल पाटील/अमित बागडे 6-0; खुला गट: आशिष पुंगलिया/चिराग शहा वि.वि.डीके दर्शन/अजिंक्य गुजराती 6-0);

मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन वि.वि.टेनिस द मिनाज 23-11(100 अधिक गट: गिरीश कुकरेजा/सुधाकर आर पराभूत वि.राजीव पागे/कल्पक पत्की 5-6(7-3); 90 अधिक गट: मनिष टिपनीस/सचिन माधव वि.वि.शैलेश लिमये/अजिंक्य मुठे 6-1; खुला गट: सतीश ओरसे/सोमनाथ पवार वि.वि.अभिजीत शहा/निलेश कुंटे 6-0; खुला गट: गिरीश कुकरेजा/जॉर्ज वरघसे वि.वि.रोहन जमेनीस/कल्पक पत्की 6-4)

संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील

0

कोल्हापूर – मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील का, याची काळजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करू नये. पण संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले की, मोहित कंबोज हे मा. देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील. याची काळजी संजय राऊत यांनी करू नये. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही समर्थ आहोत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘ पे रोल’वर राहून पवार साहेबांचा अजेंडा चालविणारे संजय राऊत हे अंतिमतः वाट लावणार आहेत व आपल्याला खड्ड्यात घालणार आहेत, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.
त्यांनी सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना युती तोडण्यासाठी भरीस घातले. भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेने मुस्लिम मतांच्या मागे लागून आपला मूळ पाया संपविला. यामुळे आपल्याला मानणारी जनता तसेच आपले जुने नेते – कार्यकर्ते सोबत राहणार नाहीत, हे उद्धवजींच्या लक्षात येत नाही.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबाबत १९ बंगल्यांचा विषय एक वर्षापूर्वी मांडण्यात आला. या काळात संजय राऊत याविषयी बोलले नाहीत. संजय राऊत स्वतः किंवा त्यांचे सीए किंवा त्यांच्या मुलींपर्यंत विषय येत नव्हता तेव्हा त्यांच्यासाठी सर्व काही आलबेल होते. आता त्यांच्या गळ्याशी विषय आल्यानंतर त्यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण शिवसेना वापरण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील शिवसैनिकांची संख्या कमी पडली तर नाशिक व पुण्यातून शिवसैनिकांना आणले. ही पत्रकार परिषद शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावरील हल्ले परतविण्यासाठी होती तर आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे हे सेनेचे नेते का उपस्थित नव्हते, असा प्रश्न निर्माण होतो.

ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना भाजपा घाबरत नाही. भाजपाच्या विरोधकांनी हे ध्यानात घ्यावे की, हा नवा भाजपा आहे. देवेंद्रजींच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न शंभरजणांनी केला तर पाठिंब्यासाठी भाजपाचे एक हजार कार्यकर्ते पोहोचले. किरीट सोमय्या यांच्या हत्येचा प्रयत्न झाला तर त्यांच्या समर्थनासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. हल्ले कराल तर निराशेशिवाय काहीही हाती लागणार नाही.
त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची मर्यादा साडेसात लाखापर्यंत वाढवली पण मराठा युवकांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिली जाणारी दहा लाख रुपये बिनव्याजी कर्जाची योजना ठप्प केली. महाविकास आघाडी सरकारने अरबी समुद्रातील शिवस्मारकाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी दोन वर्षात पाठपुरावा केला नाही. या सरकारला मराठा आरक्षण देण्याची इच्छा नाही. मराठा समाजासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणाला भाजपाने पाठिंबा दिला आहे. मराठा समाजासाठी जे कोणी रस्त्यावर उतरतील त्यांना भाजपा पाठिंबा देईल.

विद्युत सुरक्षेसह आरोग्य जपण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या – मुख्य अभियंता सचिन तालेवार

0

पुणे :वीज कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही यासाठी सतर्क राहून सदोदित काळजी घ्यावी. तसेच धकाधकीच्या वीजक्षेत्रात काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व नियमित वैद्यकीय तपासणी करावी असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले.

महावितरणच्या पुणे परिमंडल व जहांगीर रुग्णालयाच्या वतीने मंगळवारी (दि. १५) रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अभियंता सचिन तालेवार बोलत होते. शिबिराला अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत, जहांगीर रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी संदीप दत्तो, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता मधुकर घुमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये वीजसुरक्षेबाबत विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच विद्युत अपघात किंवा ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर घ्यायची काळजी, प्रथमोपचार, कृत्रिम श्वासोश्वास आदींची माहिती जहांगीर रुग्णालयाचे वरुण कृष्णन व सहकाऱ्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटणी यांनी केले. शिबिराला रास्तापेठ विभागातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

स्मार्टफोनवर चित्रित पहिला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’ २५ फेब्रुवारीपासून

0

स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘पॉंडीचेरी’चे निसर्गसौंदर्य, अथांग समुद्रकिनारे, रंगीबेरंगी फ़्रेंच धाटणीची घरे आणि या शहरात निर्माण होणारे अनोखे नातेसंबंध या ट्रेलरमध्ये दिसले. ‘पॉंडीचेरी’बाबतची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढत असतानाच आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘गुलाबजाम’ सारख्या दर्जेदार चित्रपटाची मेजवानी दिल्यानंतर आता सचिन कुंडलकर ‘पॉंडीचेरी’ची सैर घडवणार आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणकाराची भूमिका निभावत निसर्गरम्य ‘पॉंडीचेरी’ आणि तिथे निर्माण होणारे भावनिक नातेसंबंध टिपले आहेत.

निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेल्या ‘पाँडीचेरी’ शहरात घडणारी ही कथा आहे. सई, वैभव आणि अमृता यांच्या आगळ्यावेगळ्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असून ट्रेलर पाहता हा चित्रपट लव्ह ट्रॅन्गल असल्याचे जरी दिसत असले तरी नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या ‘पाँडीचेरी’च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास दिसत आहे. हा प्रवास त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर घेऊन जातो आणि त्यांच्या नात्यातील हा गुंता सुटतो का, हे ‘पाँडीचेरी’ पाहिल्यावरच कळेल.

सई ताम्हणकर आपल्या भूमिकेबद्दल सांगते, ” यात मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे, जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.” तर वैभव तत्ववादी आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो, ”माझ्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. ज्या चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा आहेत. एक अशी कथा जी पॉंडीचेरी शहरावर आधारित आहे, याच गोष्टीने माझे पहिले लक्ष वेधून घेतले. आकर्षक फ्रेम्स, जबरदस्त दिग्दर्शन आणि संपूर्ण चित्रपटाचे चित्रण हे प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आहे, जे त्यांना नक्कीच आवडेल.” ‘पाँडीचेरी’तील आपल्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ” मी एक अशी व्यक्तिरेखा साकारतेय, जिचे आयुष्य अत्यंत गुंतागुंतीचे होते आणि भूतकाळात झालेल्या आघातांवर ती मात करण्याचा प्रयत्न करत आहे. या भूमिकेसाठी हो म्हणायचे मुख्य कारण म्हणजे ही कथा मला खूप भावली आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी खूपच रंजक पद्धतीने ती मांडली. मुळात हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे हा अनुभवही खूप आगळावेगळा होता. कलाकारांसह केवळ पंधरा लोकांसोबत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मर्यादित क्रू सोबत काम करणे खूपच आव्हानात्मक होते. मात्र हे आव्हान पेलून आम्ही सगळ्यांनीच चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. हा माझ्यासाठी नवीन आणि खूप छान अनुभव होता.”

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर ‘पाँडीचेरी’बद्दल म्हणतात, ”हा चित्रपट नात्याभोवती फिरणारा असला तरी नात्याची परिभाषा बदलणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण स्मार्टफोनवर झाले आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र पडद्यावर बघताना प्रेक्षकांना याची कुठेही जाणीव होणार नाही. इतक्या सराईतपणे तो चित्रित करण्यात आला आहे. मोठ्या कालावधीनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा प्लॅनेट मराठीचा हा पहिला चित्रपट असून सिनेरसिकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल आणि याचा अनुभव त्यांनी चित्रपटगृहातच घ्यावा. प्लॅनेट मराठी दर्जेदार, उत्कृष्ट आणि अनोख्या निर्मितीला नेहमीच प्रोत्साहन देते. आम्हाला फार आनंद आहे की, ‘पाँडीचेरी’ हा आमच्या या परिवाराचा एक भाग आहे.”

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘पाँडीचेरी’ या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. तर नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

२९ एप्रिलपासून सर्वत्र घुमणार ‘चंद्रमुखी’च्या घुंगरांचे बोल

0

नवीन वर्षात मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिनाच घेऊन आले आहेत. एका पेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत असतानाच त्यात आता भर पडणार आहे एका भव्य चित्रपटाची. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ असे जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर प्रसाद ओक आता ‘चंद्रमुखी’ हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

टिझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना दिसत आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ.पाहायला मिळत आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली प्रेमकहाणी प्रेक्षकांना ‘चंद्रमुखी’मध्ये पाहायला मिळणार आहे.

‘चंद्रमुखी’बद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट आशय देण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. त्यानुसार एक दर्जेदार कलाकृती आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. प्रसाद ओकसोबत काम करताना निश्चितच आनंद होत आहे. यापूर्वी प्रसाद ओकने आपल्या दोन्ही चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले आहेत. यावरून प्रसाद किती संवेदनशील दिग्दर्शक आहे, हे आपल्याला कळलेलेच आहे. यापूर्वीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र मधल्या काळात थिएटर बंद असल्याने याचे पदार्पण थांबवावे लागले. मात्र आता सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आली असून मला वाटले ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित करण्याची हीच योग्य वेळ आहे. ही एक वेगळी प्रेमकहाणी आहे. मला खात्री आहे, प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील.” तर गोल्डन रेशो फिल्म्सचे सीओओ पियुष सिंग म्हणतात, ‘प्लॅनेट मराठीसोबत काम करण्याचा अनुभव खूपच अनोखा असतो. हा प्लॅनेट मराठीसोबतचा तिसरा प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची कथा अतिशय दमदार आहे. दिग्दर्शक, कलाकार एकंदरच चित्रपटाची संपूर्ण टीमच जबरदस्त आहे आणि मुख्य म्हणजे बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अजय – अतुलचे मराठीत पुनरागमन होत आहे आणि तेही तमाशाप्रधान चित्रपटातून. हा एक भव्य चित्रपट आहे आणि याची भव्यता प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहताना नक्कीच दिसेल.”

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय – अतुल या दमदार जोडीने ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे. या चित्रपटातील ‘चंद्रमुखी’आणि इतर कलाकारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज

0

मुंबई, दि. 16 : कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे पर्यटन क्षेत्रापुढे काही मर्यादा आल्या. तथापि, कोरोनानंतर पर्यटकांना चांगल्या सुविधा देता याव्यात या उद्देशाने या काळातही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) कर्मचारी सतत कार्यरत आहेत. ‘स्वच्छता हीच सेवा’ आणि ‘अतिथी देवो भव’ हे ब्रीद उराशी बाळगून पर्यटक निवासात साफसफाई, दुरूस्ती आणि सॅनिटायझेशनची कामे योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करण्यात आली आहेत. या प्रशिक्षणासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने एमटीडीसी आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्यामध्ये करार करण्यात आला असून महामंडळाचे अनुभवी कर्मचारी आणि तरूण कर्मचारी (शेफ) यांचा मेळ साधत त्यांना आदरातिथ्य आणि खानपानाबाबतचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पर्यटकांसाठी सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे निवास व्यवस्था. ही बाब लक्षात घेऊन पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना केल्याने पर्यटकांना आपली निवासे आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात एमटीडीसी यशस्वी झाले आहे. यापुर्वीही लॉकडाऊन कालावधीत पर्यटक कमी असल्याने एमटीडीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज यांच्या संकल्पनेनुसार महामंडळाचे अनुभवी कर्मचारी आणि तरूण कर्मचारी (शेफ) यांचा मेळ साधत आता नव्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी या प्रशिक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावली आहे. यानुसार प्राचार्या डॉ.अनिता मुदलीयार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या दोन आठवड्याच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत 60 हून अधिक कर्मचाऱ्यांना फूड अँड बेव्हरेजेस आणि फूड प्रोडक्शन याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येत आहे.

एमटीडीसीने राज्यातील विविध रिसॉर्टवर रेस्टॉरंटची सुविधा दिली आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे खानपानाबरोबरच पर्यटकांना आनंद देणे, उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे, स्वच्छता आणि परिसराची साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकीकरण, पर्यटकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेणे याचाही समावेश प्रशिक्षणामध्ये करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी महामंडळाला त्याचा उपयोग होणार आहे.

पर्यटनाच्या वैविध्यपूर्ण संधी आणि तेथे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांमुळे आगामी काळात पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी एमटीडीसीने कंबर कसली असून आगामी काळात महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत अधिक माहितीसाठी महामंडळाच्या www.mtdc.co या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन एमटीडीसीच्या पुणे कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश….

0

पुणे- शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर सुरू केले आहे. सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असून आज मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक. सुभाष जगताप, रुपाली ठोंबरे व अभय मांढरे, बंडूभाऊ केमसे,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद पवार अजितदादा पवार व सुप्रिया सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जयश्रीताई राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील.” असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.