मुंबई, दि. 17 : महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणार आहे.
या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरिता तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 117 बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी मुंबई ४०००१८ येथे उपलब्ध आहे.
अर्ज स्वीकारण्यासाठी निकष अर्ज विहित नमुन्यात असावा तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या न जोडलेला प्रतीचे अर्ज, सेवा विषयक, आस्थापनाविषयक बाबी तसेच तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अशा स्वरुपाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा महिलाव बालविकास अधिकारी, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे जया एकादशीनिमित्त कीर्तन पुणे : व्यवहारामध्ये आपण अनुभवाने जरी शिकत असतो, तरी देखील गुरुचे महत्व फार वेगळे आहे. गुरु हा कोणत्याही व्यवहारातील बारकावा शिकवतो. कोणतीही कला असो, ती शिकण्याकरीता गुरु महत्वाचा आहे. गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. अगदी एखादे लहान मुल देखील गुरु होऊ शकतो. त्यात पोटाची विद्या शिकविणारा गुरु हा सर्वात मोठा आहे, असे मत कीर्तनभूषण ह.भ.प. ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांनी व्यक्त केले. श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात जया एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. ह.भ.प.ज्ञानेश्वरबुवा कपलाने म्हणाले, कीर्तनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कीर्तनामुळे पृथ्वीवर वैकुंठ व अयोध्या उभी राहिली. सद््गुरुंच्या बद्दल सांगणारे अभंग भरपूर आहेत. गुरु कोणाला म्हणायचे? याचे एकनाथी भागवतात ओव्यांतून चांगले वर्णन केले आहे. गुरु वेदाध्ययन, ज्योतिषशास्त्र शिकवितात, व्याख्यानातून तत्वज्ञान सांगतात, परंतु ते सद््गुरु नाहीत. ज्ञान देतात, पोटाची विद्या शिकवितात, त्यांना गुरु म्हणले जाते. ते पुढे म्हणाले, गुरुमध्ये वेगळ्या पद्धतीने ज्ञान देणारे अनेकजण आहेत. त्याचा फायदा शिष्यांना घेता आला पाहिजे. ज्ञानाचा व्यवहारीक फायदा शिष्यांना व्हावा, अशी विद्या गुरु देतात. आत्मज्ञान देऊन शिष्याला मोक्षापर्यंत नेणारा सद््गुरु असतो, असेही त्यांनी सांगितले.
बेलापूर जेट्टी आणि मुंबई बंदरावरील देशांतर्गत क्रूझ टर्मिनल दरम्यानच्या जलमार्ग टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडणारा पहिला जलमार्ग नागरिकांसाठी उपलब्ध – केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
मुंबई, 17 फेब्रुवारी 2022
मुंबई बंदर प्राधिकरण (MbPA)ने सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, जलमार्गाचा वापर करत, विविध प्रकल्प सुरु केले आहेत. आता याच मालिकेत प्राधिकरणाने जलमार्ग टॅक्सी सेवा सुरु केली असून, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वांनंद सोनोवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज, 17 फेब्रुवारी 2022 रोजी आभासी पद्धतीने या सेवेचे उद्घाटन झाले.
केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी बेलापूर इथे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
“देशाच्या जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, तसेच आपल्या अर्थव्यवस्थेचा जलद विकास व्हावा, यासाठी किनारपट्टी लगतची राज्ये, बंदरे आणि सागरमाला योजनेशी संलग्न मंत्रालये यांच्या मदतीने विविध प्रकल्प राबवत आहेत, त्याचाच भाग म्हणून मुंबईत आज ही पहिली जलमार्ग टॅक्सी सेवा सुरु झाली आहे,” अशा भावना केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केल्या.
“आज आपल्या सर्वांसाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठबळामुळे आपण बेलापूर जेट्टीची उभारणी पूर्ण करू शकलो याबद्दल मी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो,” असे ते पुढे म्हणाले.
सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून आज नवी मुंबईला बेलापूर येथे अत्याधुनिक जेट्टी मिळाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य यांचा समसमान वाटा असलेल्या 8.37 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची मुंबई मेरिटाईम बोर्डाने यशस्वी अंमलबजावणी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बेलापूर जेट्टी प्रकल्पाची सुरुवात जानेवारी 2019 मध्ये झाली होती आणि सप्टेंबर 2021 पर्यन्त हा प्रकल्प पूर्ण झाला. कोविड-19 महामारीमुळे निर्बंध लागू असतांनाही, हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.
बेलापूर जेट्टी आणि मुंबई बंदरावरील देशांतर्गत क्रूझ टर्मिनल दरम्यानच्या जलमार्ग टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई दरम्यानचा साधारण दीड तासांचा प्रवासाचा वेळ, अर्ध्या तासापर्यंत कमी झाला आहे; या सेवेमुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल आणि मुंबई बंदराचा वाहतुकीसाठी उपयोग करण्यास प्रोत्साहन मिळेल,असेही त्यांनी सांगितले.
मुंबई बंदरात आणखी अनेक जेट्टी सेवा सुरु करण्याची केंद्र सरकारची योजना आहे, यात काटामरान आणि रो-पॅकस अशा दोन्ही सेवा असतील, असे ते म्हणाले.
केंद्र आणि राज्यातल्या यंत्रणाच्या माध्यमातून 1.05 लाख कोटी रुपयांचे 131 प्रकल्प महाराष्ट्रात सुरु केले जाणार आहेत. या 131 प्रकल्पांपैकी, 2,078 कोटी रुपये किमतीच्या 46 प्रकल्पांना सागरमाला प्रकल्पाअंतर्गत वित्तीय सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सोनोवाल यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यांमध्ये, नागरी जलमार्ग वाहतूक सेवेसाठी प्रचंड वाव असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो: केंद्रीय मंत्री बंदर समूहाअंतर्गत, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा ठिकाणी, मच्छीमारांचे जीवनमान उंचावण्यासाठी 32 पेक्षा अधिक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. 4 मच्छिमार बंदर प्रकल्पांनाही सागरमाला अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,आजचा दिवस राज्यासाठी महत्वाचा आणि आनंदाचा आहे. देशातील पहिली जलमार्ग टॅक्सीसेवा महाराष्ट्रात सुरु होत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्व ओळखून त्याचा जनतेसाठी उपयोग करणे महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. एलिफंटाला जाण्यासाठी ही जलवाहतूक सेवा उपयोगी ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
जलमार्ग टॅक्सी सेवेविषयी माहिती
मुंबई बंदर प्राधिकरण सातत्याने लोकांच्या सेवेसाठी दक्ष असून, त्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. दक्षिण मुंबईला जलमार्गाने, विविध ठिकाणांशी, जसे उरण, मांडावा, नवी मुंबई शी जोडले गेले आहे. भाऊचा धक्का ते मांडवा आणि अलिबाग दरम्यान रो-पॅकस फेरी सेवा देखील अतिशय यशस्वी झाली आहे.
कार्यालयीन वेळेत चाकरमान्यांना सोयीचे व्हावे, यासाठी या मार्गावरील प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरुन कमी करत, 35 ते 45 मिनिटांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे, अंतर देखील 60 टक्क्यांनी कमी होणार आहे, ज्यामुळे इंधनाची तर बचत होईलच, शिवाय ही सेवा पर्यावरण पूरक देखील असेल. सध्या, सात स्पीड बोट्स ना प्रवासी वाहतूक करण्याचे परवाने मिळाले असून एका फेरीत 180 प्रवासी जाऊ शकतात. या जलमार्ग टॅक्सी, एका दिवसांत सहा फेऱ्या करु शकतात. मुंबई बंदर प्राधिकरण लवकरच, गरज पडल्यास या फेऱ्याची तसेच स्पीड बोट्सची संख्या वाढवणार असून लोकांच्या सेवेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. या सेवांमुळे, एलिफंटा लेण्या ते नवी मुंबई अशा पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे.नवी मुंबईतील प्रवाशांचा नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया हा तीन तास प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच हा प्रवास अतिशय सुखदायी असणार आहे.
नागरिकांच्या सोयीसुविधांसाठीचे उपक्रम सुरूच ठेवत, मुंबई बंदर प्राधिकरणाने रो-पॅकस टर्मिनल जवळच्या देशांतर्गत क्रूझ टर्मिनल पासून जलमार्ग टॅक्सी सुरु करण्यासाठीच्या सुविधाही विकसित केल्या आहेत. या जलमार्ग टॅक्सी सेवा नेरूळ, बेलापूर, एलिफंटा बेटे आणि जेएनपीटी इत्यादी स्थळांना जलमार्गाने जोडणार आहे. हा प्रवास आरामदायी तर असेलच, त्याशिवाय लोकांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी देखील टळेल. त्याशिवाय ही वाहतूक पर्यावरण पूरक देखील ठरेल. जलमार्ग टॅक्सी पहिल्यांदाच मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना जलद आणि विश्वासार्ह दळणवळण सेवेने जोडणार आहे. सर्व हितसंबंधियांच्या सहकार्याने, प्राधिकरण इतर ठिकाणी देखील या सेवेचा विस्तार करणार आहे.
मुंबई, दि. 17 :- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्ष संघटनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, युती शासनाच्या काळात शिक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
मराठा समाज शिष्टमंडळाने घेतली डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट.
पुणे दि.१७ : पानीपत येथे झालेल्या युद्धानंतर तेथेच स्थायिक झालेल्या रोड मराठा समुदायाच्या शिष्टमंडळाने विधानपरिषद उपाध्यक्ष ना.डॉ.नीलमताई गो-हे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी पानीपत येथील मराठा स्मारकाची दुरवस्था पुरातत्व खात्याने केली आहे, ती दूर करावी अशी मागणी केली.
सदाशिवभाऊ पेशवे यांचा पुतळा उभरवा हरियाणा राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करावा.ग्रंथालय व अन्य बाबींच्या मागणी केली. डॉ. गोर्हे यांनी या विषयात योग्य ती कार्यवाही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,लोकसभा सभापति ओमप्रकाश बिर्ला यांच्या सहाय्याने करण्यात येईल असे संगितले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानुसार महाराष्ट्रातील मराठी बांधव आणि हरियाणा व तेथे स्थायिक बांधव यांचा संपर्क स्थापित करण्यात येईल असे प्रतिपादन केले.या प्रसंगी रोड मराठा समाजाचे धुरीण कमलजीत महाले,सुरेंदर दाभाडे,.आ.चंद्र्कांत मोकाटे.विराज तावरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार डॉ.गो-हे यांनी केला.
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी – राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून याअंतर्गत महाराष्ट्रातील महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या १२० महिला उद्योजकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
इच्छुक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी २०२२ असून हा कार्यक्रम आणि प्रशिक्षण ८ मार्च २०२२ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू होईल. प्रशिक्षणामध्ये उद्योगाचा विकास कसा करावा यासह स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकांपर्यंत आपली कल्पना कशी “पिच” करावी अशा विविध मुद्द्यांवर माहिती देण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
“महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” या नावाने हा उपक्रम राबविण्यात येत असून यातून महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल. यामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या नवीन व्यवसायाचे सक्षम उद्योगात रूपांतर करता येईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, अमेरिकी दूतावास व अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च (ACIR) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रारंभिक टप्प्यातील उद्योगांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरीता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. ४ जानेवारी २०२१ रोजी या सोसायटीअंतर्गत एक समर्पित महिला उद्योजकता कक्षाची (Women Entrepreneurship Cell) स्थापना करण्यात आली आहे. स्टार्टअप आणि उद्योजकता परिसंस्थेत महिलांचे प्रतिनिधीत्व वाढविणे, महिला उद्योगांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दुवे स्थापित करणे, आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रदान करणे आणि राज्यातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ पुरवणे ही या कक्षाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. शिवाय पात्र महिला उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करावेत, असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
नागपूर, दि. 17 : नागपूर विभागातील महसूल अधिकाऱ्यांसाठी येथे 25 आणि 26 फेब्रुवारीला महसूल परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी चंद्रपूर येथे आज बैठकीत आढावा घेतला.
चंद्रपूर येथील वन अकादमीत झालेल्या या बैठकीस विभागातील अजय गुल्हाने (चंद्रपूर), आर. विमला (नागपूर), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), संजय मीणा (गडचिरोली), डॉ. संदीप कदम (भंडारा) या जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल उपायुक्त मिलिंद साळवे तसेच विद्युत वरखेडकर (चंद्रपूर) आणि राजेश खवले (गोंदिया) हे अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त यावेळी म्हणाल्या, महसूल अधिका-यांमार्फत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी व वेळेत काम पूर्ण होण्यासाठी ही महसूल परिषद अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. यात विविध प्रशासकीय बाबींबाबत चर्चा करण्यात येणार असल्याने त्याचा अधिका-यांना दैनंदिन कामकाजात लाभ होईल. आपत्कालीन परिस्थितीत सर्वच प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी काम करतात. मात्र दैनंदिन कामकाज करताना महसूलविषयक बाबींकडे दुर्लक्ष होता कामा नये, याबाबत सर्वानी सजग राहणे गरजेचे आहे.
या परिषदेमध्ये महसुली कायद्याच्या तरतुदींची प्रकरणे, गौण खनिज सुधारणा व तरतुदी, जमिनविषयक बाबी (भूसंपादन सोडून), अधिकारी अभिलेख संगणकीकरण, वित्तीय व आस्थापनाविषयक बाबी आणि भूसंपादन व मूल्यांकन या विषयांवर सादरीकरणातून चर्चा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिका-यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून सामान्य नागरिकांचा या विभागाशी दैनंदिन संपर्क येतो. नागरिकांना अधिक सुलभ पध्दतीने गतिमान सेवा देण्यासाठी नागपूर विभागाच्या अधिका-यांसाठी या महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला विभागातील सहाय्यक जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार निलेश गौंड, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम आदींनी केले.
ठाणे, दि.१७ (जिमाका): देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणेदरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बेलापूर जेट्टी आणि बेलापूर मुंबई वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत बेलापूर येथून सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आणि बेलापूर जेट्टीच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री श्री. ठाकरे, केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, मंदा म्हात्रे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा असून देशातील पहिली वॉटर टॅक्सी महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईतून सुरू झालेल्या सेवेचे अनुकरण देशभर केले जाते हे मुंबई ठाणे दरम्यानच्या पहिल्या रेल्वेसेवेरून दिसून आले आहे. जलवाहतुकीच्या या सेवेचेदेखील देशात अनुकरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग जनसेवेसाठी
छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर हुकूमत असली पाहिजे या भावनेने त्याकाळात कल्याणमध्ये आरमाराची बांधणी सुरु केली तेव्हापासूनच या परिसराचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यानंतर इंग्रजांनी रेल्वे आणली. आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्त्व आपण किती ओळखतो आणि त्याचा जनतेला किती उपयोग करून देतो याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर
विकासात दळणवळणाची सेवा महत्त्वाची भूमिका बजावते. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरु झाली. नवी मुंबईला मुंबईशी आणि एलिफंटा लेण्यांना जोडणारी ही जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.
समुद्र हा केवळ पाहण्यासाठी नसून त्याचा उपयोग जलवाहतुकीसारख्या प्रकल्पांसाठी वाढला पाहिजे. येत्या दोन तीन वर्षात समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणार असून हा क्रांतिकारक टप्पा असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई परिसरात परिवहनाचे जाळे विकसित
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील ५५ उड्डाणपूल, सागरी किनारा मार्ग, मुंबई- कोकणाला जोडणारा सागरी मार्ग, शिवडी न्हावा शेवा मार्ग असे परिवहनाचे जाळे विकसित केले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, ती जगाशी हवाई मार्गाने जोडली. पण मुंबई महानगर परिसराला जोडणारी जलवाहतूक सेवा महत्वाची आहे, कामासाठी, उद्योग व्यवसायासाठी मुंबई येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ही सेवा अधिक उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईत पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य
नवी मुंबई विमानतळासोबतच नवी मुंबई स्पोर्टस सिटी म्हणून विकसित होत आहे हे सर्व लक्षात घेता येथे अनेक पायाभूत सुविधांचा राज्य शासनामार्फत विकास केला जात आहे. गुंतवणूक करतांना उद्योजक पायाभूत सुविधांचा विचार करतात त्यादृष्टीनेही या सर्व कामांना वेगळे महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. जनतेच्या हिताचे काम करतांना केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला बलशाली बनवण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महाराष्ट्र देईल अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून महाराष्ट्रात १३१ प्रकल्प- केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल
केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल म्हणाले, सागर किनारपट्टी जिल्ह्यात सागरमाला प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे. यातून सागरतटीय जिल्ह्यातील लोकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्नआहे. यातून रोजगार निर्मिती करून आर्थिक विकासाचे चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.कोरोना काळातही बेलापूर जेट्टीचे काम सुरु राहिले. नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या जलवाहतूक सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. आणखी काही जे्ट्टी मुंबई हार्बर भागात प्रस्तावित आहेत.
मुंबई ते अलिबाग रो रो सेवा सुरु झाली आहे. वॉटर टॅक्सीला मिळणारा प्रतिसाद पाहून जलवाहतूकीसाठी अतिरिक्त जेट्टीचे बांधकाम केले जाईल. केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, जेट्टीचे निर्माण, कौशल्य विकास अशा विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. सागरमाला कार्यक्रमातून जलद आर्थिक विकासाला चालना देण्यात येत आहे. १.०५ लाख कोटीचे १३१ प्रकल्प महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यात सागरमाला कार्यक्रमांतर्गत ४६ प्रकल्पास २७८ कोटीचे वित्तीय सहाय्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या सक्षमीकरणाचे काम करण्यात येत असल्याचे सांगतांना त्यांनी ससून डॉकसह सिंधुदुर्ग आणि रायगडच्या बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी काम सुरु असल्याचेही ते म्हणाले.
कोरोना संकटातही विकास कामांना गती- उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई महानगरच्या परिवहन सेवेच्या विकासासाठी शासन मागील दोन वर्षांपासून काम करत आहे. चक्रीवादळ, अतिवृष्टीसारखं नैसर्गिक संकट आलं, कोरोना सारखं संकट आलं, पण या अडचणीतून विकास कामांना गती देण्याचं काम शासनाने केले. मेट्रो , मोनो नंतर जलवाहतूक प्रकल्प आज सुरु होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडकरांसाठी आजचा दिवस अभिमानाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
गेट वे ऑफ इंडियाजवळ केंद्र शासनाच्या तर्फे आणखी एक प्रकल्प प्रस्तावित आहे. तो लवकर सुरु व्हावा यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू या असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केले.
जलवाहतुकीमुळे नवी मुंबई, ठाणेकरांना लाभ
जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे. दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे, नवी मुंबईकरांना याचा लाभ होईल. यामध्ये पर्यावरणाचाही विचार आहे. सर्व मिळून या कामांना गती देऊ या. आज चार मार्गावर जल टॅक्सी सेवा सुरु होत आहे. प्रवाशांचा वेळ, पैसा श्रम तर यामुळे वाचेलच परंतू प्रदुषणालाही आळा बसेल, असे श्री. पवार यावेळी म्हणाले.
एमएमआरक्षेत्राला लागून खाडी आहे त्यामुळे जलवाहतूकीला चालना देऊन या सुविधेचा लाभ घेता आला पाहिजे. सुरक्षित प्रवासाला चालना देत ही जलवाहतूक सेवा सुरु केली तर प्रवाशांनाही सुलभ सुविधा उपलब्ध होईल. पायाभूत सुविधांसाठी निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आग्रह असतो असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी सगळे मिळून काम करू असे आवाहन ही त्यांनी केले. मेट्रो चे काम पूर्ण झाले, जलवाहतूक सुरु झाली तर एमएमआरचे रुप एकदम पालटलेले दिसेल असेही ते म्हणाले.
जलवाहतुकीमुळे रस्ते वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत- मंत्री एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील वाहतूकीस आज या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून चालना देण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, नवी मुंबईकरांना जलवाहतूक सेवा उपलब्ध झाली तर रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. ठाणे- मुंबई सेवाही लवकरच सुरु होईल. एमएमआरक्षेत्रातील वाढत्या नागरिकीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम एमएमआरडीए, सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सागरमाला कार्यक्रमातून केंद्र आणि राज्याच्या ५०:५० टक्क्यांच्या सहभागातून बंदर विकासाच्या कामाला गती दिल्याचे ते म्हणाले.
नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, अशा विविध ठिकाणाहून जलवाहतूक सुरु झाल्यास प्रवाशांना उत्तम परिवहन सेवा उपलब्ध होईल. काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय नौवहन मंत्र्यांचे त्यांनी आभार मानले.
१६ लाख लोकांना जलवाहतुकीची सेवा- मंत्री अस्लम शेख
बंदरे विकास मंत्री श्री. शेख म्हणाले, कोरोनाकाळातही वर्षानुवर्षे रखडलेली कामे एकेक करून पूर्ण करत आहोत. जलवाहतूकीची ही सेवा आज १६ लाख लोकांना उपलब्ध करून देत असलो तरी ही सेवा अधिक व्यापक करण्याची गरज आहे. नॅशनल वॉटर वेजचे, जेट्टी बांधण्याचे काही प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यास मान्यता मिळाली तर वाहतूक कोंडी फोडण्यास नक्कीच मदत होईल.
जलवाहतूकीमध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच महाराष्ट्रात जलवाहतुकीच्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज आहे, असेही श्री. शेख यावेळी म्हणाले.
कोरोना संकटातही विकास कामांना चालना- राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातून समुद्र पाहण्यास येणाऱ्यांना या वॉटर टॅक्सीची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. यातून पर्यटकांची सोय होईल, पर्यटन वाढेल. देश आणि राज्य भरातून येणाऱ्या लोकांना ही सेवा उपयुक्त सेवा देईल. कोरोना संकटातही विकास कामांना शासनाने चालना दिली. त्याला कुठेही निधी कमी पडू दिला नाही, असे राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले. यावेळी खासदार श्री. विचारे, आमदार श्रीमती म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र सागरी मंडळाला (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) २५ वर्षे पूर्ण झाली त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे, तिकीट काऊंटरचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. वॉटर टॅक्सीला ध्वजांकन करून उपमुख्यमंत्री श्री.पवार, मंत्री श्री. शेख आणि अधिकारी त्याच वॉटर टॅक्सीतून मुंबईकडे रवाना झाले. जलवाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कंत्राटदारांचा यावेळी उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देशातील 5 राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीत माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचीही एंट्री झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी त्यांनी व्हिडिओद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला. माजी पंतप्रधान म्हणाले की, मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा आहे. जो ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबतो.
डॉ.सिंह यांनीही चीनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. ते म्हणाले की, एक वर्षापासून चिनी सैन्य भारताच्या पवित्र भूमीवर बसले आहे. या सरकारचा संविधानावर विश्वास नाही. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. सरकार केवळ देशातच नाही तर परराष्ट्र धोरणाच्या मोर्च्यावरही अपयशी ठरले आहे.
मनमोहन सिंहांच्या व्हिडिओतील महत्त्वाच्या गोष्टी 1. महागाईने जनता हैराण झाली आहे आज देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था एका बाजूला कोलमडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. दुसरीकडे 7 वर्षे सरकार चालवूनही केंद्र सरकार चुका मान्य करत नाही. लोकांच्या समस्यांसाठी ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत.
2. मी कमी बोललो आणि जास्त काम केले पंतप्रधानपदाला विशेष महत्त्व आहे, असे माझे मत आहे. इतिहासाला दोष देऊन तुमचे पाप कमी होऊ शकत नाही. पंतप्रधान म्हणून काम करताना मी जास्त बोलण्याऐवजी कामाला प्राधान्य दिले. आम्ही राजकीय फायद्यासाठी देशाचे विभाजन केले नाही. सत्य झाकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.
3. चिनी कब्जाची चर्चा दडपली जात आहे आपल्या पवित्र भूमीवर गेल्या एक वर्षापासून चिनी सैन्य ठाण मांडून आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुने मित्र आपल्यापासून दूर जात आहेत. शेजारी देशांशीही आपले संबंध बिघडत आहेत. मला आशा आहे की सत्तेत असलेल्यांना हे समजले असेल की बळजबरीने मिठी मारणे, फिरवणे किंवा निमंत्रण न देता बिर्याणी खाणे याने देशाचे संबंध सुधारू शकत नाहीत. ‘सूरत बदलने से सीरत नहीं बदलती’, हेही सरकारने समजून घेतले पाहिजे. सत्य नेहमी समोर येते.
4. पंजाबसाठी काँग्रेसच योग्य डॉ.सिंह म्हणाले की, पंजाबमधील जनतेसमोर निवडणुकीच्या वातावरणात मोठी आव्हाने आहेत. त्यांचा योग्य मुकाबला करणे महत्त्वाचे आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांची समृद्धी आणि बेरोजगारी केवळ काँग्रेसच दूर करू शकते. पंजाबच्या मतदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणाले की, भारत आज एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. मला पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर येथील माझ्या बंधू-भगिनींसोबत देशातील आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्याची खूप इच्छा होती, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने मी ते असे संबोधित करत आहे.
5. सुरक्षेतील त्रुटींबद्दल पंतप्रधानांनी पंजाबची बदनामी केली काही दिवसांपूर्वी पंजाबच्या सुरक्षेच्या नावाखाली पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि तेथील लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जे कोणत्याही प्रकारे योग्य मानले जाऊ शकत नाही.
6. शेतकरी चळवळीत पंजाबींची बदनामी केली शेतकरी आंदोलनाच्या काळातही पंजाब आणि पंजाबियतला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. ज्या पंजाबींच्या शौर्याला, कतृत्त्वाला, देशभक्तीला आणि बलिदानाला साऱ्या जगाने सलाम केला आहे. त्यांच्या बाबतीत काय काय केले नाही. पंजाबच्या मातीत जन्मलेला एक सच्चा देशवासी या नात्याने मला याचे खूप दु:ख झाले.
7. आर्थिक धोरणांची समज नाही कोणतीही आर्थिक समज नाही. चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिलांना त्रास होत आहे. देशातील अन्नदाते दान्या-दान्याचे मोहताज झाले आहेत. देशात सामाजिक विषमता वाढली आहे. लोकांवरील कर्ज वाढत असून उत्पन्न कमी होत आहे. श्रीमंत हे अधीक श्रीमंत होत आहे आणि गरीब अधिक गरीब होत आहे. सरकार आकडेवारीशी फसवणूक करून सर्वकाही बरोबर असल्याचे दाखवत आहे. सरकारच्या धोरणात आणि हेतूंमध्ये दोष आहे.
8. भाजप लोकांमध्ये फूट पाडत आहे सरकार आपला स्वार्थ साधण्यासाठी जात, धर्म आणि प्रदेशाच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहे. त्यांना आपापसात लढवले जात आहे. केंद्र सरकार फोडा आणि राज्य करा चे राजकारण करत आहे.
पुणे- एकूण ११ हजार कोटीच्या प्रकल्पांच्या प्रस्ताव बद्दल संशय असल्याचा आरोप करणाऱ्या शहर राष्ट्रवादीने आज महापालिकेतील ६ हजार कोटींच्या कामांच्या प्रस्तावाबद्दल चौकशी ची मागणी करणारे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे .आम्ही पहिल्या टप्प्यात हि मागणी केली आहे , अन्य प्रकल्पांची पुढील टप्प्यात तक्रार करू असे यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे यांची भेट घेतली. सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.अशी तक्रार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. नदी सुधार प्रकल्पाचा काल उल्लेख केला असला तरी आज तक्रार देताना या प्रकल्पाला वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ६ विषयांच्या निविदा ज्यांचे मुल्य सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने त्या संबंधित प्रकरणाची पुणेकरांच्या व महानगरपालिकेच्या आर्थिक हितासाठी ताबडतोब चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी माजी आमदार .जयदेवराव गायकवाड, माजी महापौरअंकुश काकडे, माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर, नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक बाबुराव चांदेरे, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, समन्वयक महेश हांडे उपस्थित होते.
या तक्रारीत प्रामुख्याने म्हटले आहे तरी काय ते पहा –
विषय क्र.१) २४/७ समान पाणीपुरवठा योजनेत खासगी ठेकेदाराच्या आर्थिक हितासाठी अनेक बदल पुणे महानगरपालिकेच्या २४/७ समान पाणीपुरवठा योजना मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व यामध्ये खासगी ठेकेदाराच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अनेक ठिकाणी बदल करून सदर योजनेची किंमत आणि अनियमितपणे वाढवण्यात आली आहे.
विषय क्र.२) विशिष्ट संस्थेच्या फायद्याचाच विचार करून बाणेर, वारजे येथे १००० कोटीचे रुग्णालयाचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर व वारजे येथे महानगरपालिकेच्या प्रचलित नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता अनियमित पद्धतीने काही व्यक्ती व संस्था यांच्या आर्थिक हिताचा विचार करून बाणेर व वारजे येथे एक हजार कोटी रुपये कर्ज घेऊन हॉस्पिटल उभे करण्याची प्रक्रिया करण्याचे प्रयत्न चालू आहे. यामध्ये देखील मोठे आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता आहे.याचीही सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.३) 350 अँमिनिटी स्पेसेस पुणे शहरातील पुणेकरांच्या हक्काच्या 350 अँमिनिटी स्पेसेस या खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठी देण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे याची देखील आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.४) ‘जायका’ काही खाजगी ठेकेदार कंपनीच्या मार्फत गैरव्यवहार -अनियमितता ‘जायका’ प्रकल्पांतर्गत उभारण्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता दिसून आले आहे काही खाजगी ठेकेदार कंपनीच्या विशेष विचार करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येते यामुळे पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.५) खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी शाळेचे आरक्षण असलेल्या जागेचा प्रस्ताव मान्य १६ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समिती या बैठकीमध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिक व सत्ताधारी यांच्या हितासाठी नियमबाह्य पद्धतीने आरक्षित असलेल्या प्राथमिक शाळा उभारणीचा प्रस्ताव नियम डावलून मान्य करण्यात आला या प्रस्तावामध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिकाचा पुरेपूर आर्थिक हितसंबंध आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते यामुळे या प्रकरणाची आपले विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.६) समाविष्ट गावांत ड्रेनेज लाईन साठी ३९३ कोटीच्या टेंडर मध्ये गफला समाविष्ट गावांचा ड्रेनेज लाईन टाकणे या ३९३ कोटीचे निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते या निविदेबाबत अनेक व्यक्ती व संस्था यांनी न्यायालयाने देखील दाद मागितली आहे व तक्रार दाखल केलेली आहे या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व आर्थिक हितसंबंध असल्यामुळे भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येते याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
मुंबई -शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते. ते दीर्घकाळापासून आजारी होते. त्यातूनच आज मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं.
सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांसोबत उल्लेखनीय काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत काम करत असलेले सुधीर जोशी १९७३ मध्ये मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री ही पदेही त्यांनी भूषवली आहेत.संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला’ आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता असं त्यांचं वर्णन केलं जातं. मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत. सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते.
पुणे-माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे निवडणुक अधिकारी पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस कमिटींचा डिजीटल सभासद नोंदणी बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते पल्लम राजू यांचा श्री गणेश मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना पल्लम राजू म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण देशात काँग्रेस पक्षातर्फे सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. डिजीटल मेंबरशिपद्वारे आपण जनतेमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सांगून त्यांना पक्षाचे क्रियाशिल सभासद करणार आहोत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नेहमी केंद्रिय नेतृत्वाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहकार्य केले आहे. या डिजीटल सभासद नोंदणी व संघटनात्मक निवडणुकीसाठी माझी नेमणुक प्रदेश निवडणुक अधिकारी म्हणून केली आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी केली पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात मुख्य नोंदणीकृत व बुथमध्ये नोंदणीकृतची नेमणूक करावी. पक्षातील सर्व प्रमुख नेते मंडळी, पदाधिकरी, नगरसेवक यांनी हे डिजिटल सभासद नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी हे पक्ष बळकट करण्यासाठी भरपूर मेहनत करीत आहे. केंद्रातील भाजप सरकार आपल्या बहुमताच्या आधारावर देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. या जातीयवादी शक्तींना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करून २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्तेत आणण्याचा निर्धार करावा. मला खात्री आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या सभासद नोंदणीमध्ये पहिला क्रमांक मिळविणार.’’
यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सोनल पटेल यांनी डिजीटल सभासद नोंदणीच्या कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातले पाहिजे अशी सूचना केली. जे नेतेमंडळी या सभासद नोंदणीमध्ये भाग घेवून जास्तीत जास्त सभासद करतील त्यांना पक्ष संघटनेच्या विविध पदांवर नेमणुक केली जाईल. पक्ष संघटना मजबूत झाली तरच आपण सत्तेवर येवू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याची गरज आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘गेली १५ दिवस आपण या डिजीटल सभासद नोंदणीसाठी शहर पातळीवर व ब्लॉक पातळीवर प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविला. पुणे शहरामध्ये ६५ मुख्य नोंदणीकृतांची नेमणुक केली आहे आणि बुथ पातळीवर १ महिला व १ पुरूष यांची नेमणुक करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या डिजीटल सभासद नोंदणी अभियानामध्ये सहभागी होऊन पुण्यात जास्तीत जास्त सभासद केले पाहिजे.’’
यानंतर माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे डिजीटल सभासद नोंदणी अभियान अत्यंत शिस्तबध्द पद्धतीने राबविण्यात येत आहे. पक्षाचे पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, फ्रटंलचे प्रमुख व विविध सेलचे प्रमुख यांनी पुढच्या दिड महिन्यात ही सभासद नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.’’
प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यात डिजीटल सभासद नोंदणीच्या संदर्भामध्ये माहिती दिली. या आढावा बैठकीत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व मुख्य नोंदणीकर्ता उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे डिजीटल सभासद नोंदणीचे महाराष्ट्राचे समन्वयक राहुल साळवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे, विशाल पाटील, आ. संग्राम थोपटे, आ. संजय जगताप, पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष कैलास कदम, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, राजन भोसले, चिटणीस राजेंद्र शेलार, नगरसेवक अविनाश बागवे, राजेंद्र शिरसाट व इतर पदधिकारी उपस्थित होते.
पुणे- शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक म्हणाले, “मला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी एक राजकीय षडयंत्र, हनी ट्रॅपसारखे प्रकरण तयार करुन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून माझे कामगार क्षेत्रातील काम आणि माझी अनेक वर्षांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे.”
माझा तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचेही रघुनाथ कुचिक म्हणाले. “मला पूर्ण खात्री आहे, की तपास यंत्रणा या प्रकरणाचा संपूर्ण तपास करतील आणि मला न्याय मिळवू देतील. तसेच याबाबत आज खटला दाखल झाल्याने मी आज जास्त काही बोलणार नाही, मात्र माझी कायदेशीर टीम काम करत असून पुढील एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत कागदपत्रांसह सविस्तर बाजू मांडणार” असे कुचिक यांनी सांगितले.एका 24 वर्षीय तरुणीने कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. लग्नाचं आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं, असा आरोप या तरुणीनं तक्रारीत केला होता. यावर आता रघुनाथ कुचिक यांनी त्यांच्याविरोधातील आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे, ता. १७ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात (स्वायत्त) फॅशन डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनिंगचे व्यावसायिक पदवी अभ्याक्रम (बी. व्होक) जून २०२२ पासून सुरू करणार असल्याची माहिती डीर्इएसचे उपाध्यक्ष महेश आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, बी. व्होकचे समन्वयक प्रशांत गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आठवले म्हणाले, ‘बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन फॅशन आणि इंटिरियर या दोन क्षेत्रांतील सर्जनशील डिझायनर तयार करणे हा या अभ्यासक्रमांचा मुख्य उद्देश आहे. ऐश्वर्या डिझाईन स्टुडिओ, प्रतिभा रचकर बुटीक या फॅशन क्षेत्रातील रॉयल टच लॅमिनेट, रावत ब्रदर्स मॉड्युलर फर्निचर, ई-सेरॅमॉल इंडिया, स्पेस न स्टाईल या इंटिरियर क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांशी संलग्नता आणि सर्वच प्राध्यापक तज्ज्ञ आणि अनुभवी व्यावसायिक असल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करणे, भरपूर प्रात्यक्षिकांचा सराव आणि बाजारपेठेतील नवनवीन ट्रेंडची माहिती मिळणार आहे. अभ्यासक्रम यशस्वी करणार्या विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी करता येईल किंवा कोणत्याही विद्यापीठात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेता येईल.’
प्राचार्य परदेशी म्हणाले, ‘तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमांसाठी डिजिटल वर्ग, संगणक कार्यशाळा आणि ग्रंथालयात पुस्तकांचे स्वतंत्र दालन निर्माण करण्यात आले आहे. यूजीसीच्या वैकल्पिक अभ्यासक्रम धोरणानुसार सहा महिन्यांनंतर प्रमाणपत्र, एक वर्षानंतर पदविका, दोन वर्षांनंतर प्रगत पदविका आणि तीन वर्षांनंतर पदवी प्रदान केली जाणार आहे. कोणत्याही शाखेची बारावीची परीक्षा किंवा १०+२ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहेत. पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
अमृतसर- विद्यमान महापौर करमजीत सिंग गिंघू यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत रिंघू यांनी आपमध्ये प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच रिंघू यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सरकार स्थापन केले तर अमृतसरला जागतिक दर्जाचे शहर बनवले जाईल, असे केजरीवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे आणि 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.